निरंजन स्वामी कृत - अभंग १६ ते २०

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


अभंग १६.
मायामोहपाश सोडवि संसार । हेंचि वारंवार मागतसे ॥१॥
नलगे संपत्ति धनाचिये राशी । वैकुंठ मिराशी आह्मांलागीं ॥२॥
एकवेळां पाय दाखवी सत्वरी । हेचि सर्वापरी मागतसे ॥३॥
निरंजन ह्मणे देई आतां भेटी । नको करूं कष्टी देवराया ॥४॥

अभंग १७.
षडभूजमूर्तिं सावळी सुंदर । रूपमनोहर देखियली ॥१॥
शंखचक्र हातीं त्रिशूळ डमरू । कासे पीतांबरु कसीयेला ॥२॥
माळा कमंडलू शोभति दोंहाती । गळां वैजयंती रुळतसे ॥३॥
निरंजन ह्मणे सद्गुरु निधान । हेंची माझें धन सर्वापरी ॥४॥

अभंग १८.
आम्ही तरी जालों सर्वस्वी उदार । धरियेली कास देवा तूझी ॥१॥
सोडियले सर्व घरे संवसार । लौकिक वेव्हार घेणें देणें ॥२॥
सर्व जगताची नाहीं आह्मां लाज । जाहलों निर्लज्ज सर्वापरी ॥३॥
निरंजन ह्मणे स्वामि दत्तात्रया । सांभाळी सखया कृपासिंधू ॥४॥

अभंग १९.
मायबाप आणि सोईराधाईरा । तूचि दिगंबरा आम्हालागीं ॥१॥
तुजवीण आतां आह्मासी जिवलग । आहे कोण सांग देवरावा ॥२॥
पापी तरी आम्ही आठवितों तूज । कां गा नये लाज बाळकाची ॥३॥
निरंजन ह्मणे देवा तुझे पायीं । ठेवियेली डोई सर्वापरी ॥४॥

अभंग २०.
मज नाहीं धन संपत्तीची चाड । आयुष्यही वाड नको आह्मां ॥१॥
सिद्धीचीही आह्मा नको खटाटोपी । मुक्तीही आटोपी तूझी तूंची ॥२॥
सोडियेली आशा आह्मी सर्वापरी । वाईट वा बरी देवराया ॥३॥
निरंजन ह्मणे गुण तुझे गाऊं । संगतीनें राहूं संतांचिये ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 23, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP