निरंजन स्वामी कृत - अभंग १ ते ५

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


अभंग १.
अहो धन्य तेचि जाणा । जे कां जाणती आपणा ।
धन्य त्याची देशभूमी । चित्त अर्पियलें रामीं ॥१॥
मातापितरें धन्य केली । कुळें बेताळीं तारिली ॥२॥
केली कल्पना खंडण । चुकविलें येणें जाणें ॥३॥
निरंजनीं झाले स्थिर । गुरु पाहिला रघुवीर ॥४॥

अभंग २
धन्य ते संसारीं प्राणी उदासीन । निजरूपीं मन ठेलें ज्यांचें ॥१॥
जयांचिया वृत्ती मागें ऊलटल्या । स्थिति पालटल्या एकसरा ॥२॥
त्याच्या दरशनें जोडे पुण्यराशी । स्पर्शितां पायासी मुक्ति जोडे ॥३॥
निरंजन ह्मणे तया शरण जावें । स्वकार्य साधावें तया कृपें ॥४॥

अभंग ३.
धन्य तेचि प्राणी स्वरुपिं वेधले । अंतरीं बोधले एकसरा ॥१॥
कल्पनेचें झाड टाकिलें छेदून । वैराग्याचें उष्णवरी दीलें ॥२॥
सद्गुरुवाक्याचा लाऊनिया अग्न । जहाले निमग्न ब्रह्मरूपीं ॥३॥
निरंजन ह्मणे ठाईंच निमाले । पुन्हा नाहीं आलें आकारासीं ॥४॥

अभंग ४.
निंदकाचे घर असवें शेजारी । उणें सर्वापरी लक्षीतसे ॥१॥
निंदक आमूचा सोइरा सज्जन । धुणें मोलवीण धूवीतसे ॥२॥
निंदकाची जात सूकराप्रमाणें । न ठेवी मळीण संतांलागी ॥३॥
निरंजन ह्मणे निंदुनीया घ्यावें । दोषातीत व्हावें सर्वापरी ॥४॥

अभंग ५.
ऐक रे निंदका जळो तूझें तप । योग खटाटोप सर्व कांहीं ॥१॥
अंतरि मांगासी देउनिया थारा । वरती आचारा दाखवीसी ॥२॥
तुझे अंगीं पाप ताप वसे सदा । पराव्याची निंदा करीतोसी ॥३॥
निरंजन ह्मणे नरकाची सामुग्री । मेळवीसी बरी निंदका तूं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 23, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP