निरंजन स्वामी कृत - अभंग ६ ते १०

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


अभंग ६.
निंदक ह्मणजे खेड्याचा कुतरा । साधुच्या धोतरा फाडूं धावे ॥१॥
हाड ह्मणुनीया उगारितां धोंडा । विचकूनी तोंडा पूढें धावे ॥२॥
पळोनियां जातां करि पाठलाग । मनामाजि राग धरूनीयां ॥३॥
निरंजन ह्मणे मुकाट्या बैसावें । श्वान सांडी हाव भुंकायाची ॥४॥

अभंग ७.
हरिभक्ति करा सांडूनि फुगारा । जन्म बारोबारा येणें नाहीं ॥१॥
संपत्तिच्या भरी नका जाऊं कोणी । राहिल ठिकाणीं जैशी तैशी ॥२॥
पुत्रमित्रदारा मसणिचे बोळावे । यांसि जीवेंभावें भूलूं नका ॥३॥
निरंजन ह्मणे सखा करा हरी । जन्ममृत्यू फेरी चुके जेणें ॥४॥

अभंग ८.
आपुणचि देव झाला । सर्व होऊनि राहिला ॥१॥
तोचि धन्य या संसारीं । चूकविली जन्मफेरी ॥२॥
चारि वर्णिताती गूण । साहि झाले बंदीजन ॥३॥
निरंजन धन्य झाला । रघुवीर गुरू केला ॥४॥

अभंग ९.
आधिं देव आपुण व्हावें । मग देव पाहूं जावें ॥१॥
तैसें झाल्या वांचुनि कांहीं । अनुभव सत्य येतचि नाहीं ॥२॥
आपण राज्यावरी बैसावें । सौख्य उपभोग घ्यावे ॥३॥
आपण मेल्यावीण कांहीं । स्वर्ग दीसतची नाहीं ॥४॥
रघुवीरासि शरण जावें । निरंजन तेणें व्हावें ॥५॥

अभंग १०.
खोड्यामधीं पाय घातला ज्या द्वारें । काढावा सत्वरें तिकडोनी ॥१॥
चक्रव्यूहामाजी शिरावें जेथूनी । यावें परतूनि त्याचि वाटे ॥२॥
तैसेंचि हें मन उठिलें जेथूनी । न्यावें त्या ठिकाणीं फीरुनियां ॥३॥
सहजीं जाईल मन हें विलया । मुक्त होणें जाया नको कोठें ॥४॥
निरंजन सांगे अनुभवाची गोष्टी । नका होऊं कष्टी आणीकानें ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 23, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP