प्रसंग पहिला - मातृपितृ वंदन

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.



मायबापें प्रतिपाळिलें तुज । महा सायासें आरंभिलें काज । सायासीं केली शरीराची वोज । नव मास जठरीं ॥३३॥
सद्‌गुरु बोले दृष्‍टांत उत्तर । पाहे पां पुडलीक सत्त्वधीर । मायबापाची सेवा करी साचार । सद्भाव धरूनियां ॥३४॥
पूर्वीं लोहदंड क्षेत्र पंढरी । होती महाविष्‍णूची नगरी । तेथें पुंडलीक राज्‍य करी । सत्त्वधीरपणें ॥३५॥
ऐकोनि भक्तीचा निर्धार । कौतुक पहाती ईश्र्वर । वरुनी घातली भीमेची धार । सत्त्व पहावया ॥३६॥
दुभाग झाले असे भीमातीर । द्वारकेहूनि आले शारङ्गधर । उभे ठाकले पुंडलिकासमोर । चरित्र पहावया ॥३७॥
पितृसेवा करी पुंडलीकरावो । उजवा धरोनि हृदयीं पावो । वाम करें वीट टाकिली बैसा वो । स्‍वामी महा श्रीपति ॥३८॥
पुंडलीक म्‍हणे श्रीरंग । पित्‍याचा होईल निद्रा भंग । म्‍हणवूनि न घडेचि प्रसंग । बोलावयालागीं ॥३९॥
पुंडलिकें विनविलें विश्र्वनायका । भाक मागितली सांगेन टीका । तुम्‍ही माझें गांवीहूनि जाऊं नका । सेवा घेतल्‍याविण ॥४०॥
विठ्ठलें विटेचा आदर घेतला । अठ्ठाविस युगें तो उभा ठाकला । परी व्रत भंग नाहीं केला । पुंडलिकें पित्‍याचा ॥४१॥
पुत्रभावें करी मायबापाची भक्ति । सत्‍य लाधेल त्‍या सायोज्‍यता मुक्ति । स्त्रीसहि भ्रताराविण भक्ति । असेचि ना ॥४२॥
ऐसी सांगोनि निबंध वार्ता । निवांत केला शेख महंमद श्रोता । आतां भावें वंदी माता पिता । सद्‌गुरु म्‍हणत असे ॥४३॥


Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP