प्रसंग पहिला - ईश्वर स्‍तवन - ॐ कार

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.




ॐ नमोजी श्रीअव्यक्तरामा । परात्‍पर तूं मेघःशामा । ब्रह्मादिकां न कळे महिमा । अविनाश म्‍हणोनियां ॥१॥
वोंवियां साक्षें निज कल्‍पतरु । कोटि मयंकांहूनि प्रकाश थोरु । तेथें वेदशास्त्रांचा विचारु । पावो न शके ॥२॥
वोरस मन वाचे अगोचर । ज्‍याचें प्रेम त्‍यासी साक्षात्‍कार । येरा टकमक विचार । सर्‌गुरुविण ॥३॥
‘ॐ’कार मूळ रचना प्रबंध । जो वेदशास्त्राचा आधारकंद । तेथूनि गुण साहाकारिला त्रिविध । शून्याकार पर-वस्‍तु ॥४॥
ॐकाराहूनि ‘अ’कार उद्भोवोनी । स्‍तवन केलें बोबडिया वचनीं । तें ऐकावें संतश्रोतेजनीं । भाव धरोनियां ॥५॥
ॐकार सत्‍य क्षर अक्षर । पाहे पां अर्ध मातृकेचा पसर । तेथूनि वोळखा हें चराचर । साहाकारिलें पैं ॥६॥
वोंविली विवेकरत्‍नांची माळ । चर्चितां वाढेल पाल्‍हाळ । सकळ तोडोनियां विव्हळ । हरिसी स्‍तविलें ॥७॥
ॐ नमोजी परम दीनोद्धारणा । मज लावावें कृपेचिया स्‍तना । मग तो द्रव पैं पान्हा । परावाचेचा ॥८॥
मग तें परेच्यानी वचन । तीव्र होय तूयेंचें कथन । तेव्हां हरिनाम स्‍मरण । हृदयीं सिद्ध वसे ॥९॥
ॐ राहिलिया माघार । ‘न’ आरंभिला तो अवधारा । संतीं चित्त द्यावें या उत्तरा । शेख महंमद म्‍हणे ॥१०॥

टीपः

१. यापूर्वी ‘श्रीगणेशाय नमः।’ - (वा) प्रतींत व ‘ॐ स्‍वस्‍ति श्रीगणेशाय नमः ।’ - (ब) प्रतींत आहे.
२. या शब्‍दाचा लोप = शब्‍दलोप - (वा).
३. ‘वो व्यासाक्ष०’ - (वा)
४. ‘वेदभेदशास्त्राचा०’ -  (वा) (ब).
५. ‘०शके तेथें ।’ - (ब).
६. ‘मन’ - (वा).
७. शब्‍दलोप - (ब).
८. ‘पासार’ - (ब).
९. ‘हरि स्‍तविला’ - (ब).
१०. ‘प्रेमें’ - (ब).
११. ‘वचनें’ - (वा, ब).


N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP