श्रीलक्ष्मीनारायणदेवाचा झुला

श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

गोमांतक-सिवोली येथील श्रीलक्ष्मीनारायण देवाच्या शिबिकोत्सवाच्या वेळीं म्हणण्याकीरतां स्वतंत्र तयार केलेला

श्री लक्ष्मी नारायण ह्रदयीं भावं । नाम तयाचें गाउनि सन्निध राहू ॥ धृ० ॥
साधन या रिति करितां चित्सुख पावूं । दुस्तर हा भव सागर तरुनी जाऊं ॥१॥
तुजविण दुसरा देव न या जगिं मातें । पुरवीं सत्त्वर निज दर्शन कामातें । करुनि कृपा मज पावविं सुखधामातें । किति विनवूं तुज मुनिमन विश्रामातें ॥२॥
गृह धन दारा सर्वहि दु:ख पसारा । व्यर्थाचे गेलें भुलुनी या संसारा । सोडविं मजला यांतुनि करुणागारा । वाटे त्रिजगीं तारक तूंचि उदारा ॥३॥
नाहीं केलें प्रेमें तव भजनासी । मन हें गुंतुनि गेलें आशा पाशीं । करुनि कृपा हें सकळहि दुरित विनाशीं । लक्ष्मीनाथा तव पद गंगा काशी ॥४॥
तव गुण कीर्तन कानीं श्रवण करावें । रूप तुझें हें सुंदर नयनिं भरावें ॥ पूजन या करिं घडउनि पाप हरावें । पुरवुनि या परि हेतू पदरिं धरावें ॥५॥
रक्षुनि धर्मा निज भजकां ताराया । नाम रुपात्मक धरिसी अवतारा या ॥ भक्त त्रासद दुष्टां संहाराया । प्रधटसि हें तव ब्रीदचि असुख हराया ॥६॥
आवडि चित्ता निशिदिनिं या विषयांची । अनादिकाला पासुनि वाटे साची । पूर्ण कृपा तव होतां स्वस्वरुपाची । गोडी लागुनि तळमळ जाइल त्याचि ॥७॥
चिन्मय भेटी दे मज लक्ष्मीनाथा । सज्जन संगति मागतसें तुज आतां ॥ तूं करुणेंचा सागर दीन अनाथां । तारिसि आला अनुभव तव गुण गातां ॥८॥
नारायण गुरु राघव एकचि झाले । कृष्ण जगन्नाथात्मजमीपण गेलें ॥ निजरंगीं रंगुनियां सहजचि डोले । असंग चिन्मय होऊनि मन हें ठेलें ॥९॥

॥ श्री लक्ष्मी नारायणदेवार्पणमस्तु. ॥

N/A

References : N/A
Last Updated : June 13, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP