शुकाख्यान - अभंग २७६ ते ३००

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


मग ते ह्मणेरे बुद्धिहीना । महा मूर्खा पुरुषत्वहीना । स्त्रीसुख सोडोनी वनामरणां । इच्छिलें त्वां ॥२७६॥
मिथ्या तूं जन्मलासी । वांयां येथें कष्टसी । तारुण्य व्यर्थ दवडिसी । स्त्रीभोगाविणें ॥२७७॥
भोगिजे द्वादश वरुषांची नारी । षोडश वर्षांची सुंदरी । गौर वर्णाचे परिकरी । सुगंध युवती ॥२७८॥
एकाहूनि एक साजिर्‍या । चंद्रवदनी गोजिर्‍या । माझि-याहूनि सकुमार्‍या । मृगनयनी ॥२७९॥
बोले जाणती बरवें । सेवा करिती मनोभावें । जयांचा माज दृष्टि भाव्वे । पद्मिणी ऐशा ॥२८०॥
शुकें इतकें ऐकिलें । मग प्रतिउत्तर बोलिलें । तें ऐका तुह्मीं वहिलें । योगि जन ॥२८१॥
शुक ह्मणे सत्य सत्य । आह्मी एक पत्नी वृ-तस्थ । रंभे दुजें बोलसी व्यर्थ । सत्रावी भोगितो सुंदरी ॥२८२॥
नारी सत्रावी भोगिजे । हें सुख गुरुवचनीं लहिजे । तियेसंगें पाविजे । मोक्ष सायुज्यता ॥२८३॥
तिचे प्रसंगीं घर । चुकूनि सं-सार येरझार । ते नारी सुंदर मनोहर । पुरोन उरली ॥२८४॥
येरी तुह्मी नाशिवंत शरीरीं । दुर्गंधी मळमूत्र अघोरी । शरीरीं काम लक्ष त्यवरी । ते सुंदरी नावडे ॥२८५॥
तव रंभा ह्मणे अवधारीं । तुज कष्ट सदा संसारीं । सुख नेणसी तिळभरी । योगिया तूं ॥२८६॥
कष्ट भोगी अष्टमा सिद्धी । आमच्या वरीं नवविधी । हे कां नावडे तुज बुद्धी । ओढवली असे ॥२८७॥
सुख राज्य संपत्ति । चारी पदार्थ असती । धर्मकाम कर्म राज्य प्राप्ती । यज्ञ भोगदान ॥२८८॥
गाई ब्राह्मणांचें पाळन । लोकांचें सांभाळण । ये जा ह्मणती देशुगुण ऐसें न सांडीं मी सांगतें ॥२८९॥
उपकार करिसी लोकां । ओ-ळखी पडेल मंडळिका । राजासारिखे सुखा । नसे जाणा ॥२९०॥
सकळ धर्म जोडिसी । राया इंद्रातें मानसी । सर्व सुखभोगा लाभ तुजसी । मी नाचेन गायनीं ॥२९१॥
मग शुक ह्मणे चतुरी । तूं बोलसी वैखरी । नावडे मज अंतरीं । राज्यांतीं सुख नाहीम ॥२९२॥
राज्यपद करितां । पाप होतसे निभ्रांता । महा दोष पावतां । वेळु न लगे ॥२९३॥
राज्य करूनि नरक प्राप्ती । ऐसा कोण करूनि तरला क्षिती । सुकृतांच्या राशी नासती । राज्य करूनि जाण पां ॥२९४॥
राज्य करितां सरे धर्म । राज्य करी घडे अधर्म । राज्य करोनि पाविजे श्रम । निभ्रांत जाणा ॥२९५॥
अगे सुकृत जोडावें नानापरी । तें हारवी राज्यांतरीं । तें तूम नेणसी गे सुंदरी । बुद्धिहीने ॥२९६॥
म्हणोनि धर्मासी जतन करावें । सर्वसुख पदार्थ त्यजावे । हरिचरण सेवावे । जन्मोजन्मीं ॥२९७॥
जाण हरिश्चंद्ररायें आपण । राज्य दिधलें ब्राह्मणां । मुक्तपद निर्वाण । धरिलें निरंतरीं ॥२९८॥
पाहे पां राज्याभीतरी । राज्य पृथ्वीचें करी । तें तुजवांचोनि सुंदरी । नेणे कांहीं ॥२९९॥
राज्यें नव्हे चिरंजीवित्व जाणा । ऐसे आलें माझिया मना । यास्तव सांडूनियां वना । निघता झालों ॥३००॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP