शुकाख्यान - अभंग १७६ ते २००

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


बाहु दंड सरळा । बरवी शोभे मेखळा । कांसे कासिला पिंवळा । पीतांबर ॥१७६॥
आंगीं सुवास कस्तुरीची उटी । मुक्तमाळा रुळे कांठीं । टिळा केशराचा लल्लाटीं । तये रंभेचे ॥१७७॥
हातीं रत्नजडीत कंकणें । गळां नव-रत्नांचीं भूषणें । व्यंकट दृष्टि पाहणें । अळूमाळ ॥१७८॥
कानीं तानीवडे जडीत । सांखळ्या नाग भिरवत । भोंवर्‍या शोभिवंत । हिरे जडिले ॥१७९॥
माथां मोतियांची जाळी । दोहींकडे शोभे हसळी । तेज झळके गंडस्थळीं । मिरवे रंभा ॥१८०॥
सुवर्ण कनकाची झारी । हातीं मिरवे सुंदरी । परम चतुर मनोहरी । काम-रूपा ॥१८१॥
नाकीं जडित मुक्ताफळ । तेज मिरवे सुढाळ । मुखीं शोभे तांबूल । तेर गुणांचा ॥१८२॥
दंतपंक्ति तेज देखा । त्यांची चंद्रसारखी शुभ्रता । हिरे जडिले मुखा । रंभेचिया ॥ १८३॥
अति सुंदर पुष्प जाती । चंपकें बकुलें शेवंती । तयावरी मिरवे सोनकेतकी । आणिक मोगरी ॥१८४॥
करीं चंदनाची उटी । अंगीं कंचुकी गोमटी । तयावरी मिरवे पत्रवेटी । चंपकाचे पानांची ॥१८५॥
चरणीं वांक्या तोडरू । अंदुवाचा गजरू । अंगीं तारुण्याचा भरू । अनुपम्य ॥१८६॥
चाले डोले हस्तिनी गति । विद्युल्लतेप्रमाणें नेत्र लवती । तयांसी देखोनी गिरजापति । भूलों शके ॥१८७॥
ऐसी ते महा खेंचरी । निघाली झडकरी । सिंधुवनामाझारीं । प्रवेशली ॥१८८॥
तये वनीं वृक्ष खजुरी पोफळी । फणस महाळुंगी नारळी । आणि द्राक्ष मंडप स्थळोस्थळीं । डुल्लताती ॥१८९॥
गगनचुंबित ताड । आम्रवृक्ष जांभळी उदंड । केळी जांभ अंजिर रगड । बागशाई ॥१९०॥
मालती आणि शेवंती । पाडाळा जाई अनंत जाती । तया वनीं केतकी शोभती । आणिक बहु पुष्पलता ॥१९१॥
तया वनीं जाळीं । रंभा वृक्ष न्याहाळी । आणि सिंह शार्दूल तये स्थळीं । गर्जना करिती ॥१९२॥
तेथें गाइ ह्मैशींचे थवे । तृणें भक्षिती बरवें । अवघ्यांशीं शुकदेवें । ज्ञान उपदेशिलें ॥१९३॥
पशुपक्षी होऊनि एकरूप । उदक पिती सांडुनी विकल्प । परम तयातें सुख । क्रीडा करितां ॥१९४॥
मूषक मांजरें एकेठायीं । नकुळा सर्पा वैर नाहीं । अवघियांचे ठायीं । हरीचें प्रेम ॥१९५॥
ऐसी ते वनस्थळीं । रंभा दृष्टि न्याहाळी । मग पावली जवळी । शुकदेवाश्रमीं ॥१९६॥
डावें घालून शुक आसनास । पूर्वद्वारीं करी प्रवेश । सन्मुख देखे योगि-राजास । ती रंभा ॥१९७॥
लक्ष लविलेंसें ऊर्ध्व दृष्टी । स्वयंभ असे कासोटी । सर्वांगीं शोभे उटी । यज्ञ विभूतीची ॥१९८॥
तंव लावण्य खेंचरी । आपुले मनीं विचार करी । नेत्र हा उघडील जरी । तरी मी थोर दैवाची ॥१९९॥
आनंदें घातली कास । गायन आ-रंभीं सुरस । सप्तस्वर केदारास । आळवी रंभा ॥२००॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP