शुकाख्यान - अभंग २५१ ते २७५

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


मग बोलता झाला शुकदेव । श्रोतीं देउनी चित्त ऐका प्रभाव । रंभेचा फिटे अहंभाव । ऐसें बोले व्याससुत ॥२५१॥
मग वदला शुकदेव । भला सांगसी प्रभाव । शाहाणी च-तुर तूं हो । रंभिका ॥२५२॥
तुजवरी कासया कोपावें । आमचें दैव असेंचि बरवें । जेवीं तव स्वामी भावे । तें तूं बोलसी ॥२५३॥
बहुत चतुर तूं होसी । स्वामी कार्या झळ-कसी । ऐसें पुनरपि कोणासी । बोलूं नको ॥२५४॥
येरी ह्मणे जी योगिया । तुह्मी कोपलेती कवणें कार्या । तें उत्तर स्वामीया । जाण-वीजे ॥२५५॥
शुकदेवें कर जोडिले । नमन करूनि बोलिले । रंभे ऐक ह्मणितलें । योगिरायें ॥२५६॥
तूं बोलिसी सुंदरी । तें मज बाणांपरी । खोंचतसे उरीं । मनीं माझे ॥२५७॥
आतां परियेसी निनवणी । तूं आटोप आपली वाणी । ऐसी भ्रष्ट बोलणीं । मी कर्णी नायकें ॥२५८॥
त्वां संसारू वाणिला । तो म्यां बहुत जन्मीं भो-गिला । आतां झणीं वीट आला । मज तयाचा ॥२५९॥
हे शरिरीं दु: ख पाहे । सुटण्यास अन्य नाहीं उपाय । मग मी धरिले पाय । श्री-कृष्णदेवाचे ॥२६०॥
आतां असो सर्व स्नेहो । हरिस्मरणीं भाव राहो । ऐसा मनींचा हावो । धरिला म्यां ॥२६१॥
आतां न सोडीं हा मार्ग । धरिला साधूचा संग । न करीं मी निश्चयभंग । जाण रंभे ॥२६२॥
मज नाहीं वस्त्राची चाड । नग्न राहावें हेंचि गोड । धनादि सुखाचें कोड । मनीं आथीचना ॥२६३॥
मी जन्मलों ते वेळां । देवें कौपीन दिधला । वस्त्राचा पांग फिटला । जाण रंभे ॥२६४॥
पाटावू आणि सारळें । तेणें मन माझें कंटाळलें । स्वयंभ दिधलें गोपाळें । जें न मिळे कदापि ॥२६५॥
राम सकळ परिमळाचें भांडार । विभूतीहुनी नाहीं थोर । अंगीम चर्चितां सुकुमार । दुर्गंधी नासे ॥२६६॥
विभूति अंगीं चर्चिती । तयासी जन मानिती । शीव-रूप त्या भाविती । पूजा करिती मनोभावें ॥२६७॥
विभूतीनें देव जाहले । विभूती नाम विष्णु बोले । विभूत लवितां पिसें गेलें । विभूत भैरव ॥२६८॥
तूं आणितेसी पुष्पजाती । त्या सवेंचि कोमती । बरवेम चर्म पशुपती । पांघुरला आवडी ॥२६९॥
अति सुरंग रातो-त्पळें । हरिचरणींचीं चरणकमळें । तेंचि अति प्रेमळें । जाण रंभे ॥२७०॥
ह्मणसी षड्रस भोजन । तरी हरिचरणीं अमृतपान । करोनी तृप्त झालें मन । अमरत्व पावलें ॥२७१॥
तेणें सर्व सुख लाधलें । तृप्त होऊन राहिलें । तें तुज अंतरलें । बुद्धिमंदे ॥२७२॥
आणिक लक्षी नारायण । अपरमित त्याचें सदन । रत्नकीलेचे मंचक पूर्ण । तेथें शयन शुक योगी ॥२७३॥
मुखीं रंगला श्रीर्मग । तो केवळ कर्पूर बिडा सुरंग पिकदाणी धरिती मुख रंग । तुज ऐशा वामांगीं ॥२७४॥
इतुकें शुक वदला । मग उगाची राहिला । बोलाचा शब्द सरला । वदतसे रंभा यावरी ॥२७५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP