श्रीकृष्णलीला - अभंग ३६ ते ३७

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


३६.
मंथना आरंभ करीतसे राधा । आठवी गोविंदा मना-माजी ॥१॥
मेळवोनी मुलें खेळे तिचे द्वारीं । देखिला श्रीहरी राधि-केनें ॥२॥
विसरोनी मंथन रित्या डेरीयांत । रवी फिरवित गरगरां ॥३॥
डेरा खडबडां वाजतं ऐकोन । वृद्धा ते धांवोन बाहेर आली ॥४॥
सासू म्हणे काय गेले तुझे नेत्र । देतसे उत्तर राधा तीसी ॥५॥
डेरा धड किंवा फुटका म्हणुनी । रवी घुसळोनी पाहातसें ॥६॥
वृद्धा म्हणे तुझें चित्त नाहीं स्थीर । द्वारीं हो श्रीधर देखियेला ॥७॥
रागें भरोनियां बोलत म्हातारी । येथें कांरे हरी खेळसी तूं ॥८॥
कृष्ण ह्मणे आह्मीं खेळतों बिदिशीं । तूं कां दटाविसी थेरडिये ॥९॥
ऐसें बोलेनियां श्रीहरी पळाला । घरासी तो गेला नामा ह्मणे ॥१०॥

३७.
मध्यान्हकाळीं मग हरीसी घेऊनि । करीतसे भोजन यशोदा तें ॥१॥
भोजन करूनि पलंगीं निजत । श्रीकृष्णासी घेत पुढें तेव्हां ॥२॥
यशोदेसी सुखनिद्रा हो लागली । राधिका ते गेली यमुनेसी ॥३॥
नेत्रासी पदर लावोनि रडत । अंतरीं अनंत आठ-वोनि ॥४॥
करुणा शब्द तिचा ऐकोनि श्रवणीं । उठला चक्रपाणी तेथोनियां ॥५॥
जावोनियां राधा धरिली पदरीं । तिजलागीं हरि समजावित ॥६॥
संसारासी माझ्या पडियेलें पाणी । ऐसें चूक्र-पाणी तुवां केलें ॥७॥
इकडे यशोदा ती जागी जंव होत । हरिसी धुंडीत तयेवेळीं ॥८॥
एखादी हा कळी घेऊन येईल आतां । पाहातसे माया चहूंकडे ॥९॥
पाउलाचा माग चालिली काढीत । पावली त्वरित यमुनातीरा ॥१०॥
राधा तयेवेळीं ह्मणे रे अनंता । पैल तुझी माता येत असे ॥११॥
मातेसी देखूनि गडबडां लोळत । यशोदा ते घेत कडेवरी ॥१२॥
मातेसी ह्मणत चोरोनि कंदूक । घेऊनियां देख आली येथें ॥१३॥
माता ह्मणे कां वो यासी रड-विसी । चेडुं तूं हरिसी देईं वेगीं ॥१४॥
मामी हा मजवरी घेई गे तुफान । मजपाशीं जाण चेंडु नाहीं ॥१५॥
कृष्ण ह्मणे माते झाडा  घेईं आतां । कंदूक तत्त्वतां निघेल पैं ॥१६॥
वस्त्र जंव झाडीत राधा तयेवेळीं । पडिला भूतळीं कंदूक तो ॥१७॥
ऐसें देखोनियां लज्जित जहाली । हांसत वनमाळी नामा ह्मणे ॥१८॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP