वारांची गीते - अभंग ज्ञानपर

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥ अभंग ज्ञानपर ॥१॥
एक देव आहे खरा । माया नाथिला पसारा ॥२॥
हेंचि विचारें जाणावें । ज्ञान तयासी म्हणवें ॥२॥
साच म्हणों तरि हें नासें । मिथ्या म्हणों तरि हें दिसे ॥३॥
पाहों जातां आकारलें । मुळीं कांहीं नाहीं झालें ॥४॥
कैसा देहीं देहातीत । कैसें अनंत अनंत ॥५॥
रामदासाचें बोलणें । स्वप्रामाजिं जाईजेणें ॥६॥

॥ अभंग ॥२॥ पूर्वीं पाहतां मी कोण । धुंडूं आपण आपण ॥१॥
स्वयें आपुला उगव । जाणे तोचि महानुभाव ॥२॥
कोण कर्म आचारला । कैसा संसारासी आला ॥३॥
आले वाटे जो मुरडे । देव तयासी सांपडे ॥४॥
आली वाट ती कवण । मायेचें जें अधिष्ठान ॥५॥
रामदासाची उपमा । ग्राम नाही कैंची सीमा ॥६॥

॥ अभंग ॥३॥ गेला संदेहाचा मळ । तेणेम नि: संग निर्मळ ॥१॥
बाह्य गंगाजळस्नान । चित्तशुद्धि ब्रह्मज्ञान ॥२॥
सर्वकाळ कर्मनिष्ठ । सर्वसाक्षित्वें वरिष्ठ ॥३॥
रामदासीं स्नानसंध्या । सुत करी माता वंध्या ॥४॥

॥ अभंग ॥४॥ सृष्टी दृष्टीसी नाणावी । आत्मप्रचीत जाणावी ॥१॥
दृश्यविरहीत देखणें । दृश्य नुरे दृश्यपणें ॥२॥
सृष्टीवेगळा निवांत । देवभक्तांचा एकांत ॥३॥
राम अनुभवा आला । दासा विवाद खुंटला ॥४॥

॥ अभंग ॥५॥ आत्मारामाविण रितें । स्थान नाहीं अणुपुरतें ॥१॥
पाहतां मन बुद्धि लोचन । रामेंविण नदे आन ॥२॥
संधि नाहीं तीर्थगमना । रामें व्यापिलें भूवना ॥३॥
रामदासीं तीर्थ भेटी । तीर्थ रामेंहूनी उठी ॥४॥

॥ अभंग ॥६॥ रूप रामाचें पाहतां । मग कैंची रे भिन्नता ॥१॥
द्रष्टा दृश्यासी वेगळा । राम जीवींचा जिव्हाळा ॥२॥
वेगळीक पाहतां कांहीं । हें तों मुळींच रे नाहीं ॥३॥
रामदासीं राम होणें । तेथे कैचें रे देखणें ॥४॥

॥ अभंग ॥७॥ देव जवळी अंतरीं । भेटि नाहीं जन्मवरी ॥१॥
मूर्ति त्रैलोकीं संचली । दृष्टि विश्वाची चुकली ॥२॥
भाग्ये आले संतजन । झालें देवाचें दर्शन ॥३॥
रामदासीं योग झाला । देहीं देव प्रकटला ॥४॥

॥ अभंग ॥८॥ कल्पनेचा देव कल्पनेचा पूजा । तेथें कोणी दूजा आढळेना ॥१॥
आढळेना देव आढळेना भक्त । कल्पनेरहित काय आहे ॥२॥
आहे तैसें आहे कल्पना न साहे । दास म्हणे पाहे अनुभव ॥३॥

॥ अभंग ॥९॥ करीं घेतां नये टाकितां न जाये । ऐसें रूप आहे राघवाचें ॥१॥
राघवाचें रूप पाहतां न दिसे । डोळां भरलेंसें सर्वकाळ ॥२॥
सर्वकाळ भेटी कदा नाहीं तूटी । रामदासीं लुटी स्वरूपाची ॥३॥

॥ अभंग ॥१०॥ स्वानुभवाचे पालवें । शून्य गाळिलें आघवें ॥१॥
सघनीं हरिलें गगन । सहज गगन सघन ॥२॥
शुद्धरूप स्वप्रकाश । अवकाशाविण आकाश ॥३॥
रामीं रामदास म्हणे । स्वानुभवाचिये खुणे ॥४॥

॥ अभंग ॥११॥ संतलक्षण ॥ पांचां लक्षणीं पूरता । धन्य धन्य तोच ज्ञाता ॥१॥
विवेकवैराग्य सोडिना । कर्ममर्यादा सांडिना ॥२॥
बाह्य बोले शब्दज्ञान । अंतर्यामीं समाधान ॥३॥
रामीं रामदास कवी । न्यायनीतीनें शीकवी ॥४॥

॥ अभंग ॥१२॥ अंतर्यामीं समाधान । बाह्य सगुणभजन ॥१॥
धन्य धन्य तेंचि ज्ञान । अंतर्यामीं समाधान ॥२॥
निरूपणें अंतरत्याग । बाह्य संपादी वैराग्य ॥३॥
रामीं रामदास म्हणे । ज्ञान स्वधर्म रक्षणें ॥४॥

॥ अभंग ॥१३॥ जीवन्मुक्त प्राणी होवांनियां गेले । तेणें पंथें चाले तोचि धन्य ॥१॥
जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी । नि:संदेह मनीं सर्वकाळ ॥२॥
मिथ्या देहभान प्रारब्धाअधीन । राहे पूर्णपणें समाधानीं ॥३॥
आवडीनें करी कर्म उपासना । सर्वकाळ मना ध्यानारूढ ॥४॥
पदार्थाची हानि होतां नये कानीं । जयाची करणी बोलाऐसी ॥५॥
धन्य तेचि दास संसारीं उदास । तयां रामदास नमस्कारी ॥६॥

॥ अभंग ॥१४॥ भाव धरी संतांपायीं । तेणें देव पडे ठायीं ॥१॥
नाना देवांचें भजन । तेणें नव्हे समाधान ॥२॥
सकळ देवांमध्यें सार । आहे अनंत अपार ॥३॥
रामीं रामदास म्हणे । अवघे देव केले जेणें ॥४॥

॥ अभंग ॥१५॥ शरण जावें संतजनां । सत्य मानावें निर्गुणा ॥१॥
नानामतीं काय चाड । करणें सत्याचा नीवाड ॥२॥
ज्ञानें भक्तीसी जाणावें । भक्त तयासी म्हणावें ॥३॥
रामीं रामदास सांगे । सर्वकाल संतसंगें ॥४॥

॥ अभंग ॥१६॥ सगुणाकरितां निर्गुण पाविजे । भक्तिविणें दुजें सार नाहीं ॥१॥
साराचें हे सार ज्ञानाचा निर्धार । पाविजे साचार भक्तियोगें ॥२॥
वेदशास्त्रीं अर्थ शोधोनि पाहिला । त्यांहि निर्धारिला भक्तिभाव ॥३॥
रामीं रामदासीं भक्तिच मानली । मनें वस्ती केली रामपायीं ॥४॥
ज्ञानपर अभंग संख्या ॥६८॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP