कृष्णदासांची बाळक्रीडा - माहिती व विवेचन

श्री कृष्णदासांनी लिहीलेली काव्ये महानुभावीय स्वरूपाची आहेत.बाळक्रीडा हें ९९० ओव्यांचें ओवीबद्ध काव्य तंजावर येथील सरस्वती महाल ग्रंथसंग्रहालयांत M. S. १४३४ या क्रमांकाखालीं नमूद झालें आहे. प्रस्तुत काव्याच्या ओवीला सुरुवात होणापूर्वी व नमनानंतर मध्ये अशुद्ध संस्कृत ओळी येतात. त्या खालीलप्रमाणें :---

‘नदीनां गोमती तुल्यं कृष्णतुल्य न देवता: ॥
स्वर्गे मृत्ये पाताळे न द्वारका: समानो परी ॥१॥

अंगनीत्रंग सागर: तस्यावतार पुन: पुनां ।
भुक्ती मुक्ती वायकं तस्यावतारं जनार्दना ॥२॥

कृष्णे ती मंगळं नामं तस्यां वानी प्रवर्तते ।
स्यामपीतचरणांबुज सर्व पाप प्रमुच्यते ॥३॥

कृष्ण कृष्णेति कृष्णेति स्मरंन्‌ नीत्येस्यां ।
जलभीत्वा यथापदा नरकेद दर्दुरामही ॥४॥

काव्याचें नमन, प्रथम प्रसंगातल्या ओव्या व काव्याची धाटणी यावरून हें काव्य महानुभावीय असल्याचें स्पष्ट दिसतें. याच नांवाचें व या काव्याबरोबर बरेंच साम्य असलेलें एक काव्य ‘प्रतिष्ठान’ मासिकांत जानेवारी ते एप्रिल १९५८ मध्यें प्रकाशित झालें. त्याचे दहा. प्रसंग असून पहिले दोन प्रसंग व तिसर्‍याच्या ४८ ओव्या उपलब्ध नाहींत. पुढच्या उपलब्ध ओव्या ८९८ आहेत. तिसर्‍या प्रसंगाची ४९ वी ओवी प्रस्तुत महानुभावीय प्रतीच्या १५८ ओवीशी जुळते. प्रतिष्ठानमधील काव्याची पूर्ण प्रत सुमारें साडेदहाशे ओव्यांची असावी. तिची शेवटली ओवी “या ग्रंथाचें महिमान । जो जाणेल सज्ञान । तेणें पापा होय दहन । कृष्णदास मुद्नल म्हणे ॥”
अशी असून तींत कवीचें नांव कृष्णदास मुद्नल असल्याचें नमूद केलें आहे. कृष्णदास मुद्नलांचें रामायणांतील युद्धकांड पाहतां बाळक्रीडेची भाषा कृष्णदास मुद्नलांच्या भाषेसारखी वाटत नाही. साधारणत: महानुभावीतर काव्यांवर महानुभावीय संस्करण चढवल्याचें आढळतें. पण या बाबतींत तसा प्रकार वाटत नाही. तंजावर प्रतीची भाषा व शब्द बरेच जुने असल्याचें दिसून येते व तीच अधिक जुनी व मूलभूत वाटते.
तंजावर प्रतींत ‘ण’ ऐवजी ‘न’, ‘श’ ऐवजी ‘स’,‘द्ध’ हें अक्षर ‘त्ध’ असें अनेक ठिकाणीं आढळतात. जुन्या हस्तलिखिताप्रमाणें ‘ख’ ऐवजी ‘ष’ ये तो. अशुद्धताहि फार आहे. अनेक ठिकाणीं अक्षरें व शब्द गळाल्याचें दिसतें. प्रतिष्ठान प्रतीच्या अनुरोधानें शक्य तितक्या दुरुस्त्या केल्या. दुरुस्त्या करणें कांहीं झालें तरी जरूर असल्यानें त्याबरोबर ‘ष’ ऐवजी जरूर तेथें ‘ख’ इत्यादि फरक कंले. या दोन प्रतींत भिन्नता बरीच असल्यानें पाठभेद देता येण्याजोगे नाहींत. जरूर तेथें उपयुक्त पाठ दिले आहेत. पुणें येथील भारत इतिहास संशोधक मंडळांतले माबळभट चरित्र (परिशिष्ट) बाळक्रीदेचा ६ व ७ या प्रसंगांशी थोडेंफार जुळते त्यांत शेवटीं कवींचें नांव ‘कृष्णदास तानो’ असें आहे. ही कृष्णदास नांवापुढें जोड कशाची तें कळत नाही.

काव्याच्या पहिल्या प्रसंगांत माहूरचा व दोन तळ्यांचा उल्लेख येतो. माहूर येथें मेरुवाळा हें तळें अजून आहे असें कळतें. या तळ्याचा उल्लेख श्रीचक्रपाणी चरित्रांण आढळतो. ‘आम्हालें’ हा शब्द ‘आत्माळे’ याचें अपभ्रष्ट रूप दिसतें, पंचालेश्वर येथें आत्मऋषीनें निर्माण केलेलें आत्मालय नांवाचें तळें होतें असें ‘आत्मतीर्थप्रकाश’ या ग्रंथात सांगितलें आहे (‘आत्मालये तेया ठेविलें नाम’ - ६११).
पंचालेश्वर येथें गोदावरी नदी आहे. तिला ‘गोतमी’ नांव गौतमऋषीवरुन दिलें गेलें. ‘गोमती’ ऐवजी ‘गोतमी’ नांव पाहिजे.

कृष्णदास नांवाचे अनेक कवि व व्यक्ती होऊन गेल्या. त्यांची मिळाली तेवढी माहिती खाली देतो ---

१) महानुभावीय रुक्मिणी स्वयंवरकार संतोषमुनींचे गुरू कृष्णदास : यांच्याबद्दल माहिती नाही - काल साधारण सोळावे शतकाचा आरंभ - हा ग्रंथ हैदराबादचे कृष्णदास महाराज यांनी नुकताच प्रकाशित केला (इ. स. १९६४).

२) भागवत दशमस्कंधटीका, कृष्ण चरित्र कथा यांचा कर्ता कृष्णदास सामा अथवा सामराज. सोळावे शतक पूर्वार्ध. (मराठी संशोधन पत्रिका - जानेवारी १९५५ व महाराष्ट्र सारस्वत)

३) आदिपर्वकार कृष्णदास दामा - एकनाथ पूर्वकालीन कवि. याच्या काव्याचे कांहीं उतारे व माहिती ‘नवें नवनीत’ मध्यें दिली आहे.

४) कृष्णदास नामा - याचे एक लहान सुदामचरित्र प्रकारण व त्रुटित विराटपर्वहि आढळतें. कर्णपर्वाच्या एका प्रतींत कवीचें नांव कुठें कृष्णदास नामा तर कुठें विष्णुदास नामा असें येतें. विष्णुदास नाम्याच्या चक्रव्यूह कथेंतहि ‘कृष्णदास’ असें नांव मधून मधून येतें.

५) कृष्णदास मुद्नल - एकनाथाचे समकालीन ‘युद्धकांडाचे कतें’.

६) महानुभावीय दिवाकर शिष्य कृष्णदास - यांचे वनपर्व उपलब्ध आहे. हा एकनाथांच्या आसपासच्या कालांत असावा.

७) कृष्णदास डिंभ - सतरावे शतक. या महानुभावीय कवीचें ‘आत्मतीर्थ प्रकाश’ हे काव्य संपूर्ण माहितीसह कृष्णदास महाराजांनी प्रसिद्ध केलें आहे (१९६३).

८) जयरामस्वामी वडगांवकरांचे गुरू कृष्णप्पा अथवा कृष्णदास.

९) ‘सीमंतकहरण’ काव्य कर्ता केमा कृष्णदास - याचा उल्लेख भाव्यांच्या महानुभावीय ग्रंथसूचीत येतो.

१०) दत्त विजय कर्ता कृष्णदास - महानुभावीय ग्रंथसूची.

११) कृष्णदास कवि धावडेकर दत्तराज गुरू - महानुभावीय ग्रंथसूची.

१२) कृष्णदास जयराम - पदें असून महानुभावीय. (महाराष्ट सारस्वत).

१३) कृष्णदास बैरागी - मूळ नांव एकनाथ धर्माधिकारी-ग्रंथ चैतन्यलीला. अठरावें शतक (महंत कृष्णदास बैरागीकृत चतु:श्लोकी भागवतावरील निरूपण. श्री. वा. सी. बेंद्रे, १९५५ व तुकाराम महाराजांची गुरुपंरपरा - श्री. वा. सी. बेंद्रे, १९६०. पहिल्या पुस्तिकेंत पांच प्रसंग आहेत.)

१४) कृष्णदास पंडित - संत कवि काव्य सूचीत उल्लेख.

१५) कृष्णदास गोविंद - ,, अश्वमेध.

बाळक्रीडा, रासक्रीडा इत्याद्रि ग्रंथ - काळ १६८०-१७३०
हरिदास कान्हा शिष्य हरिदास सूत कान्हा याचा पुत्र कृष्णदास याची भागवत दशमस्कंधावर टीका आहे. हे दोघे एकच असण्याचा संभव आहे. ११ अध्यायाचे व ३७१ ओव्यांचें एक बाळक्रीडा काव्य एका बाडांत आढळतें. हें काव्य जुनें नाहीं. हा कवीदेखील कृष्णदास गोविंद असण्य़ाची शक्यता आहे.

१६) एकनाथ चरित्रकार कृष्णदास जगदानंदन - (म. सा.).

१७) दामोदर गणेश जोशी ऊर्फ कृष्णदास - अठरावें शतक (महाराष्ट्र कवि चरित्र)

१८) पदें करणारा कृष्णदान --- काव्यसंग्रहांत याची पदें आहेत. हा दुसर्‍या बाजीरावाचा समकालीन दिसतो. महाराष्ट सारस्वतांत सुदाम चरित्रकार कृष्णदासांचा उल्लेख आहे. या काव्यांत आर्या व वृत्ते वापरलेली दिसतात.

वरील कृष्णदासापैकी (१) खेरीज बाळक्रीडाकर कोणी असावेतसे दिसत नाहीं. संतोष मुनींच्या गुरू कृष्णदासाबद्दल माहिती नसल्यानें त्याबद्दल कांहींत ठरवता येत नाहीं. बाळक्रीडेचे हस्तलिखित इ. स. १६५१ चें आहे. भाषा, धाटणी वगैरे लक्षांत घेता हें काव्य नाथपूर्वकालीन वाटतें. हें भागवत दशमस्कंध टीकेचा भाग असावा असें काव्याच्या शेवटानंतरच्या नोंदीवरून वाटतें.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP