समओवी ज्ञानेश्वरी - अध्याय नववा

ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी या तिन्ही ग्रंथांतून काव्य आणि तत्वज्ञान संत ज्ञानेश्वर आपल्या विलक्षण भाषासौंदर्याने मराठी माणसाला विस्तारून सांगतात.


तर अवधान एकवेळ द्यावे । मग सर्व सुखा पात्र व्हावे । माझे उघड ऐकावे । प्रतिज्ञावचन हे ॥१॥
हे प्रौढीने बोलत नाही जी, । तुम्हा जाणत्यांचे समाजीं । अवधान द्यावे ही माझी । सलगीची विनवणी ॥२॥
लडिवाळांचे लळे पुरवीत । मनोरथियांचे पुरती मनोरथ । जर माहेरे असती श्रीमंत । तुम्हाऐसी ॥३॥
तुमचे दिठीचे ओलाव्यात । प्रसन्नतेचे मळे बहरत । तयांचे छायेत मी श्रांत । लोळत आहे जी, ॥४॥
सुखामृताचे डोह तुम्ही प्रभुराया । म्हणुनि घेऊ इच्छेऐसा गारवा । येथेही सलगीस भिऊ देवा, । तर निवावे कोठे? ॥५॥
नातरि बाळाची बोली । चाले गोड वाकुडया पाउली । ते कौतुकें देखत माउली । आनंदे जैसी; ॥६॥
तैसे तुम्हा संतांचे प्रेम अहो । कैसे आम्हा लाभावे हो । या अति उत्कंठेने आहों । सलगी करीत ॥७॥
ऐसे सर्वज्ञ श्रोते असता । बोलण्याची मज काय योग्यता । परि काय धडा घेउनि सरस्वतीपुता । शिकवावे लागे? ॥८॥
काजव्याचे तेज कितिहि असे । सूर्यतेजापुढे फिकेचि दिसे । अमृताचे ताटीं वाढता ये ऐसे । कोणते पक्वान्न ? ॥९॥
शीतल चंद्रकिरणां वारा घालणे । नादब्रह्मा गाणे ऐकविणे । अलंकारा लेणे लेवविणे । कैसे होय? ॥१०॥
सांगा परिमळें काय हुंगावे? । सागरें कोणे ठायी नहावे? । हे गगनहि सामावे । ऐसा विस्तार कोणता? ॥११॥
तैसे तुमचे अवधान फळावे । तुम्ही म्हणाया तैसे असावे । ऐसे वक्त्तृत्व कोणा लाभावे । जे रिझवील तुम्ही ॥१२॥
रवी विश्व करी प्रकाशित । काडवात का ओवाळू न शकत? । चुळकाभर जळें सा़गराप्रत । का न द्यावे अर्घ्य? ॥१३॥
तुम्ही साक्षात महेशाची मूर्ती । आणि मी दुबळा करि भक्ती । बेल म्हणुनि निर्गुडीपत्ती । स्वीकाराल की ॥१४॥
बालक बापाचे ताटीं जेवत । आणि बापासीचि जेवू घालत । की तो आनंदाचे भरात । पुढे करी मुख ॥१५॥
तैसी मी जरि तुम्हापाशी । बडबड करी बाळाऐशी । तरि तुम्ही व्हावे संतोषी । ऐसीचि जाति या प्रेचाची ॥१६॥
आणि त्या आपलेपणाचे मोहें । तुंम्हा संतां बहुत कवळिले आहे । म्हणोनि या सलगीचा नोहे । भार तुम्हा ॥१७॥
अहो, तान्हुल्स उराशी झटे । तर अधिकचि पान्हा फुटे । रोषें प्रेम दुणवटे । लाडक्याचिया ॥१८॥
म्हणोनि मज लेकराचे बोलें । तुमचे कृपाळूपण निजलेले -। जा़गे झाले जी, जाणवले । यास्तव बोलिले म्यां ॥१९॥
चांदणे अढींत पिकवी का कोणी? । वार्‍या गति देता ये झणी? । अहो, गगना गवसणी । घालावी कैसी? ॥२०॥
लागे का पातळ करावे पाणी? । घुसळावे लागे का लोणी? । तैसे गीतार्थ उकलण्या लाजुनी । व्याख्यान मागे फिरे ॥२१॥
हे असो, वेद ज्या गीतार्थबाजेवरती । शब्द मावळता निवांत निजती । तो गीतार्थ मराठीत तुम्हाप्रती । कथिण्या मी यो़ग्य काय? ॥२२॥
परि तशातही मज धीर । पुढल्या एका आशेवर । की धिटाई करुनि आपणासमोर । लाडका व्हावे आपुला ॥२३॥
परि आता चंद्राहुनिही निववी । अमृताहून जीवनदायी ऐशा अवधानें वाढ करावी । मनोरथीं माझिया ॥२४॥
तुमची कृपादृष्टी वर्षेल । तर बुद्धीत सकळार्थसिद्धी पिकेल । एरवी अंकुरले ज्ञान सुकेल । जर उदासीन तुम्ही ॥२५॥
सहजी हे अवधारा । वक्तृत्वा अवधानाचा चारा । तृप्तीने सुटती अक्षरां । दोंदे प्रमेयांची ॥२६॥
अर्थ शब्दाची वाट पाही अभिप्राय अभिप्राया प्रसवी । भावफुलोरा बहरुनि येई । मतीवरी ॥२७॥
वाहती अनुकूल संवादवारे । जर ह्रदयाकाशीं विद्यामेघ भरे । आणि श्रोता दुश्चित तर विरे । व्याख्यानीं बहरला रंग ॥२८॥
अहो, चंद्नकामणी पाझरेचि परि ती हातोटी चंद्राची । म्हणोनि वक्ता तो वक्ता नव्हेचि । श्रोत्यांविण ॥२९॥
आम्हा गोड करुनि घ्यावे । ऐसे तांदुळें का सेवित्या विनवावे ? । कळसूत्री बाहुलीने का प्रार्थावे । सूत्रधारा ? ॥३०॥
तो बाहुल्यांचे कामास्तव तयां नाचवी -। की आपुले कौशल्य दाखवी? । म्हणोनि या उठाठेवी । कशासी आम्हा? ॥३१॥
तर श्रीगुरु म्हणती काय जाहले? । हे समस्तही आम्हा पावले । आता सांग, जे निरूपिले । नारायणें ॥३२॥
निवृत्तिदास अति संतोषें । जी, जी, म्हणत उल्हासें -। अवधारा, श्रीकृष्ण ऐसे । बोलिले तेथ ॥३३॥

श्रीभगवान् म्हणाले:

आता गुपित हे थोर सांगतो निर्मळा तुज
विज्ञानें कसिले ज्ञान अशुभातूनि सोडवी ॥१॥

अर्जुना, हे ज्ञानबीज । पुढे सांगेनचि तुज । हे जे अंतःकरणींचे गुज । जिवाचिये ॥३४॥
यापरी ऊर फोडावे । मग गुज का मज सांगावे । ऐसे काही स्वभावें । कल्पिसी जरी ॥३५॥
तरि ऐक गा प्राज्ञा, । ज्ञानेच्छा हीचि तुज संज्ञा । बोलिल्या गोष्टीची अवज्ञा । नच करिसी ॥३६॥
म्हणोनि गूढपण आमुचे मोडो । न बोलावे तेही बोलणे घडो । परि आमुचे जीवींचे पडो । तुझिये जीवीं ॥३७॥
अगा, स्तगीं दूध गूढ । परि स्तनासीचि नसे गोड । सेविता लाभे तृप्ती गाढ । लेकरासी अनन्य ॥३८॥
कणगीतुनि बीज काढिले । नांगरल्या भूमींत पेरिले । तर सांडले, विखुरले । म्हणावे काय? ॥३९॥
यास्तव मनाचा निर्मळ, शुद्धमती । जो अनिंदक, अनन्यगती । अगा गौप्यही तयाप्रती । सांगावे सुखें ॥४०॥
आता ऐसा गुणीही । तुजवाचुनि आणिक नाही । म्हणोनि गुज तरि तुजठायी । लपवू नये ॥४१॥
आता वारंवार म्हणता गुज । अवघड होईल तुज । तरि ब्रह्मज्ञान सांगेन सहज । प्रपंचविज्ञानासह ॥४२॥
जैसे खरे-खोटे भेसळलेले । काढावे वेगवेगळे । तेचि निवाडा केलेले । सांगेन पारखूनिया ॥४३॥
चोचीचे सांडशीने जैसे । निनडावे दूध-पाणी राजहंसें । तुज ज्ञान-विज्ञान तैसे । वेगळे करुनि सांगू ॥४४॥
मग वार्‍याचे झोतात । जैसा कोंडा नुरत । आणि धान्यकणांच्या राशी जमत । आपोआप ॥४५॥
तैसे ते जाणण्यासाठी । जन्ममरण-प्रपंच्याचिया गाठी -। घालुनी, बैसवी पीठीं । मोक्षाचे ऐश्वर्याच्या ॥४६॥

राजविद्या महागुह्य उत्तमोत्तम पावन
प्रत्यक्ष हे सुखें लाभे धर्मसार सनातन ॥२॥

जया अवघ्या ज्ञानियांचे गावीं । गुरुत्वाची आचार्यपदवी । सकळ गुह्यांचे श्रेष्ठपद भूषवी । जे परमपवित्र; ॥४७॥
आणि धर्माचे निजधाम । जे उत्तमाचे उत्तम । ज्या ज्ञाना पावता नाही काम । जन्मांतराचे ॥४८॥
गुरुमुखातुनि उगवे अल्पसे । आणि ह्रदयींही स्वयंभू असे । प्रत्यक्ष अनुभवा येतसे । आपेआप ॥४९॥
सुखाच्या पायर्‍या चढत । जावे ज्याचे भेटीसी तेथ । ते भेटता सरत । बोयणेही ॥५०॥
भोगाचे ऐलथडीसी उभे राही । आणि चित्त सुखें भरून जाई । ऐसे सुलभ आणि सोपे होई । परब्रह्मचि हे ॥५१॥
अगा, याचे एक आणिकही; । हे हाती आले तर न जाई । अनुभविता उणावे न काही । आणि विटेही ना ॥५२॥
येथ जर तर्क चालवून । शंका घेई तुझे मन । एवढी वस्तू लोकांचे हातून । सुटली कैसी? ॥५३॥
व्याजाची हाव केवढी । जळत्या आगींत घालिती उडी । सहज लाभल्या स्वरूपसुखाची गोडी । ते सोडिती कैसी? ॥५४॥
स्वरूपसुख रम्य पवित्र हे । लाभेही सोप्या उपायें । परि धर्मासी अनुसरत, पाहे -। मिळे आपुल्याचि ठायी ॥५५॥
अवघेचि अनुकूल ऐसे । तरि लोकांहातोनि सुटले कैसे? । शंकेसी साचचि थारा असे । परि न घ्यावी तुवा ॥५६॥

लोक नास्तिक हा धर्म अश्रद्धेने न सेविती
मृत्यूची धरिती वाट संसारीं मज सोडुनी ॥३॥

पहा, दूध पवित्र आणि गोड । परि त्वचेचिया पदराआड । परि ते अव्हेरुनी गोचीड । काय रक्त न सेविती? ॥५७॥
कमलकंद आणि बेंडूक । जरि एकेचि घरीं नांदणूक । पराग सेविती भ्रमर कितीक । जवळच्यासि चिखल उरे ॥५८॥
नातरी दैवहीनाघरीं । मोहोरा पुरलेल्या सहस्त्रवरी । परि तेथ बैसोनि उपवास करी । दरिद्री जैसा ॥५९॥
तैसा ह्रदयामध्ये मी राम । जणु सुखोद्यानी वसंतागम । तरि काय भ्रांतासि काम । विषयावरी? ॥६०॥
देखोनि मृगजळाचा पूर मोठा । थुंकावे अमृताचे घोटा । वा परीस बांधिलेला कंठा । तोडावा शिंपलीचे लाभें ॥६१॥
तैसे मी माझे या नादात । बापुडे मज न पावत । म्हणोनि जन्ममरणाचे नदीत । गटांगळ्या खाती ॥६२॥
एरवी मी तरी कैसा । समोरी सूर्य की जैसा । कधी दिसे न दिसे ऐसा । परि उणा नसे ॥६३॥

मीचि अव्यक्तरुपाने जग हे व्यापिले असे
माझ्यात राह्ती भूते मी न भूतांत राह्तो ॥४॥

माझ्या विस्तारलेपणाचे नावें । हे जगचि नव्हे का आघवे? । जैसे दूध विरजता स्वभावें । तेचि दही ॥६४॥
की बीजचि जाहले तरुवर । अथवा सोनेचि अलंकार । तैसा मज एकाचा विस्तार । ते हे जग ॥६५॥
हे अव्यक्तपणें थिजलेले । तेचि मग विश्वाकारें वितळले । तैसे अमूर्त मी विस्तारले । त्रैलोक्य जाण ॥६६॥
महत्‌तत्त्वापासुनि देहापावत । हे सकळ भूतजात । माझे ठायी भासत । जैसा जळीं फेस ॥६७॥
परि त्या फेसाआत पाहता । जळ न दिसे पांडूसुता । नातरी स्वप्नींची अनेकता । जागृतींत नसे; ॥६८॥
तैसी भूते ही माझेठायी । परि तयांमाजी मी नाही । हा विचार तुज काही । सांगितया मागे ॥६९॥
बोलिल्याचि बोलाचा पान्हाळ नसो । म्हणोनि आता हे असो । तर मजआंत प्रवेशो । दिठी तुझी ॥७०॥

न वा भूतेहि माझ्यात माझ्यात माझा हा दिव्य योग की
करितो धरितो भूते परी त्यांत नसे कुठे ॥५॥

मम स्वरूप मायेपलिकडील । कल्पनेविण तू पाहशीला । तर मजठायी भूते हे व्यर्थ ठरेल । कारण सर्व मीचि ॥७१॥
एरवी कल्पनेचे सांजवेळे । क्षणभर झाकोळत बुद्धीचे डोळे । माझे अखंडत्व दिसे झावळे । मी - भूते भिन्न ऐसे ॥७२॥
कल्पनेची सांज जेव्हा लोपे । तेव्हा अखंडचि मी स्वरूपें । जैसे शंका घेताक्षणीं संपे । सर्पपण माळेचे ॥७३॥
एरवी तरि भूमीआतुनि निघाले -। काय कोंभ घडयागाडग्यांचे कोवळे? । ते तर कुंभारबुद्धीतुनि उमटले - । विविध आकारें ॥७४॥
नातरी पहा सागराचे पाणी । तेथ काय तरंगांच्या खाणी? । ती तर स्वतंत्र करणी । नव्हे काय वार्‍याची? ॥७५॥
पाहे बा कापसाचे पोटीं । काय कापडाची होती पेटी ? । परि तो नेसणार्‍यांचे दृष्टीं । कापड जाहला ॥७६॥
सोने लेणे होऊनि घडे । तरि तयाचे सोनेपण न मोडे । वरवरचे अलंकारत्व जडे । लेणार्‍याचे भावें ॥७७॥
सांग, पडसादें मिळे प्रत्युत्तर । वा आरसा जो करी आविष्कार । ते सर्व आपले, की खरोखर -। तेथेचि होते? ॥७८॥
तैसे या निर्मळ माझ्या स्वरूपीं । जो भूतभावना आरोपी । तयासी तयाचे संकल्पीं । भूताभास असे ॥७९॥
तीचि कल्पित माया नुरे । आणि भूताभास आधीचि सरे । मग एकसंध स्वरूप उरे । निखळ माझे ॥८०॥
स्वतःभोवती फिरुनी भोवंडता । दर्‍या डोंगर दिसती फिरता । तैसी दिसती भूते कल्पिता । अखंड स्वरूपीं ॥८१॥
तेचि कल्पना सोडूनि पाही । तर मी भूतीं, तीं माझे ठायी -। हे स्वप्नींहि नाही । कल्पिण्या जोगे ॥८२॥
मी धारण करी भूतजात । मी भूतांमध्ये वसत  । हे कल्पनावातातिल होत । बरळणे केवळ ॥८३॥
म्हणोनि ऐक गा प्रियोत्तमा, । यापरि मि विश्व आणि विश्वात्मा । जो या लटिक्या भूतग्रामा । कल्पी सदा ॥८४॥
सूर्यकिरणांचे आधारें जैसे । नसलेचि मृगजळ आभासे । मजठायी भासवी भूतजात तैसे । आणि मजही तयांठायी ॥८५॥
ऐसा भूताभासा मी आश्रय । परस्परांत नसे भिन्नत्व । जैसे प्रभा आणि सूर्य । एकचि ते ॥८६॥
हा आमुचा ऐश्वर्ययोग । तुज भला समजला का सांग । भूतमात्र आणि मी न अलग । काही भेद नसे ॥८७॥
यालागी मजपासोनि भूतजात । वेगळे नव्हे निश्चित । आणि मजही वेगळा येथ । कधी न मानी गा ॥८८॥

आकाशात महावायु सदा सर्वत्र राहतो
माझ्यात सगळी भूते राहती जाण तू तशी ॥६॥

गगन जेवढे जैसे । पवनही गगनीं तेवढाचि असे । सहज हालविता वेगळा दिसे । एरवी गगन पवन एकचि ॥८९॥
तैसे भूतमात्र माझे ठायी । कल्पावे तर आभासे काही । न कल्पावे तर नाही । तेथ मीचि मी सर्वत्र ॥९०॥
म्हणोनि असे आणि नसे । हे कल्पनेयोगेंचि होतसे । कारण कल्पनालोपें भ्रंशे । कल्पनेसवे होई ॥९१॥
कल्पित मुळातचि जाई । तेव्हा असे नसे हे कोठे काही ? । म्हणोनि पुढती तू पाही । हा ऐश्वर्ययोग ॥९२॥
ऐशा अनुभवज्ञानसागरीं । तू आपणा लाट एक करी । मग जेव्हा पाहसी चराचरीं । तेव्हा तूचि अससी ॥९३॥
या ज्ञानाची जाग । तुज आली ना? सांगा, । ते द्वैतस्वप्न मग । मिथ्या जाहले ना? ॥९४॥
पुढती जर कदाचित, पाही -। बुद्धीसी कल्पनेची झोप येई । तर हा अभेदबोध जाई । आणि पुन्हा स्वप्नीं पडसी ॥९५॥
म्हणोनि या निद्रेची वाट मोडे । आणि निखळ उद्बोध घडे । ऐसे कर्म असे ते पुढे । दावितो आता ॥९६॥
तर धनुर्धरा धीरादत्ता । भले ध्यान देई बा आता । अगा, माया सर्व भूतां । घडवी मोडी ॥९७॥

कल्पांतीं निजवी भूते मी माझ्या प्रकृतीमधे
कल्पारंभी पुन्हा सारी मीचि जागवितो स्वयें ॥७॥

जिचे नाव प्रकृती । जी द्विविध कथिली तुजप्रती । एक आठपरींनी विभागली ती । दुजी जीवरूप ॥९८॥
हा प्रकृतिविषय आघवा । तू मागेचि ऐकिलासी पांडवा, । म्हणोनि असो, काय सांगावा । पुन्हा पुन्हा ॥९९॥
तर महाकल्पाचे अंतीं । सर्व भूते ऐक्य़ासि येती । अव्यक्त प्रकृतीप्रती । या माझिया ॥१००॥
ग्रीष्माचे प्रखरपणें । जैसी बीजासहित तृणे । भूमिवरि मान टेकित पूर्णपणें । लीन होती; ॥१०१॥
वा वर्षेचे अवडंबर फिटे । शरदाचा अंकुर फुटे । तेव्हा मेघजात आटे । गगनींचे गगनीं; ॥१०२॥
अथवा आकाशाचे खोपीत । वायू निवांतचि लोपत । अथवा  तरंग हरपत । जळीं जैसा; ॥१०३॥
किंवा जागृतीचे वेळे । स्वप्न मनींचे मनीं मावळे । तैसे प्रकृतिनिर्मित प्रकृतिसि मिळे । कल्पक्षयीं ॥१०४॥
मग कल्पारंभीं पुढती । मीचि सृष्टि सृजी म्हणती । तर याविषयीं उपपत्ती । निश्चित ऐक ॥१०५॥

हातीं प्रकृति घेऊनि - जा़गवी मी पुन्हा पुन्हा
भूतांचा संघ हा सारा प्रकृतीच्या अधीन जो ॥८॥

याचि प्रकृतीसि धनुर्धारी, । जेव्हा मी अंगिकारी । तेव्हा तंतू मिळूनि वस्त्रीं । जैसी वीण दिसे; ॥१०६॥
मग त्या विणीचे आधारें । चौकडयांनी वस्त्र भरे । पंचमहाभूतांचे आकारें । प्रकृतीचि प्रकटे ॥१०७॥
जैसे विरजणाचेसंगत । दूधचि घट्ट होत । तैसी प्रकृति साकारत । सृष्टिरूपें ॥१०८॥
बीजा - जळाची जवळीक होई । तेचि शाखोपशाखीं जाई । तैसे मज करणे ठायीं ठायीं । भूतांचे हे ॥१०९॥
अगा, नगर राजाचे केले । हे म्हणणे शिष्टसंमत झाले । वास्तविक काय शिणले । राजाचे हात? ॥११०॥
आणि मी प्रकृति कैसी अंगिकारी? । जैसा एक स्वप्ननगरीं । मग तोचि प्रवेश करी । जागृतावस्थेत ॥१११॥
तर स्वप्नातुनि जागृतीत येता । काय पाय दुखती पंडुसुता? । की स्वप्नामाजी असता । प्रवास होय ? ॥११२॥
या अवघ्याचा अभिप्राय पाही । तर या भूतसृष्टिचे काही । मज एकही करणे नाही । ऐसाचि अर्थ ॥११३॥
राजाचे अधिष्ठानात । प्रजा आपुले कार्य करीत । तैसा मी प्रकृतिशी संबंधित । एरवी करणे ते हिचेचि ॥११४॥
पूर्णचंद्राचे भेटीनेही । समुद्रा अपार भरती येई । तर चंद्रासि काय काही । परिश्रम होती? ॥११५॥
समीप परि अचेतन होय । हलले तर हलेना का लोह । ते ओढण्याचा काय । चुंबका शीण होई? ॥११६॥
किंबहुना याचिपरी येथ । मी निजप्रकृति अंगिकारित । आणि भूतसृष्टी प्रसवोचि लागत । एकसारखी ॥११७॥
जो हा भूतमेळावा आघवा । प्रकृतिआधीन असे पांडवा, । जैसी सृजावया वेलपल्लवां । भूती समर्थ; ॥११८॥
बाल्य - तारुण्य - वृद्धावस्थेसी । परमेश्वरचि आधारभूत जाणसी । आकाशीं मेघावलींसी । वर्षाकाळ जैसा; ॥११९॥
वा स्वप्नासी कारण निद्ना । तैसी प्रकृति हे नरेंद्रा, । या अवघ्याही भूतसमुद्ना । आधार गा ॥१२०॥
स्थावरा आणि जंगमा । स्थूळा अथवा सूक्ष्मा । हे असो, सकळ भूतग्रामा । प्रकृतीचि मूळ ॥१२१॥
म्हणोनि भूते ही सृजावी । वा सृजिली प्रतिपाळावी । ही कार्ये न येती आघवी । आमुच्यावरी ॥१२२॥
जळीं चांदण्याच्या पसरती वेली । परि ती वाढ चेंद्रें नाही केली । तैसी मजपासोनि राहिली । दूर कर्मे ॥१२३॥

परी ही सगळी कर्मे बांधू न शकती मज
उदासीनापरी राहे अनासक्त म्हणूनिया ॥९॥

आणि सुटता सिंधुजळाचा लोट । धरू न शके मिठाचा घाट । तैसा सकळ कर्मां मीचि शेवट । ती काय बांधिती मज? ॥१२४॥
धूम्रकणांचे पटल । सुसाट वार्‍या थोपवील । वा सुर्याबिंबी शिरेल । अंधार जर ॥१२५॥
हे असो, पर्वताचे ह्रदया । पर्जन्यधारा न खुपत या । तैसे प्रकृतीचे कर्मजात जया -। न शिवे मज ॥१२६॥
एरवी या प्रकृतिचे विकारीं । एक मीचि असे अवधारी । परि उदासीनापरी । काही करी न करवी ॥१२७॥
दीप ठेविला घरीं । कोणा न नियमी, न निवारी । वर्ते कोण कोण्य व्यवहारीं । तेही न जाणे; ॥१२८॥
तो जैसा साक्षीभूत । गृहव्यापारा केवळ कारणीभूत । तैसा भूतकर्मीं अनासक्त । मी भूतीं असे ॥१२९॥
पुन्हा पुन्हा हा एकचि अभिप्राय । सांगे देत बहुत पर्यात । एदवेळ हे अवश्य । जाण गा एवढे ॥१३०॥

साक्षी मी प्रकृतीद्वारा उभारी सचराचर
त्यामुळे सर्व सृष्टीचई ही घडामोड होतसे ॥१०॥

की लोकव्यवहारा सकळ । जैसा सविता निमित्त केवळ । तैसा जगचुत्पत्तीसी, आकळ - । कारण मी ॥१३१॥
मी अंगिकारिली प्रकृती । करि चराचराची उत्पत्ती । म्हणोनि मी कारण, ही उपपत्ती । योग्य येथ ॥१३२॥
विचारप्रकाशें या आता । ऐश्वर्ययोग नीट न्याहाळिता । पाहसी मजठायी भूतजातां । परि मी भूतीं नसे ॥१३३॥
अथवा भूते न माझे ठायी । आणि मी भूतांमाजी नाही । हे मूळवर्म तू कधीही । चुकू नको ॥१३४॥
हे सर्वस्व आमुचे गूढ । दाविले तुज उघड । आता लावुनि इंद्रियां कवाड । हदयीं भागी ॥१३५॥
जोवरि हे वर्म न ये हाता । तोवरि माझे सत्यस्वरूप पार्था, । न गवसे सर्वथा । जैसा कोंडयात धान्यकण ॥१३६॥
एरवी तर्कबळें वाटतसे । साचचि आकळले ऐसे । परि काय भूमी भिजतसे । मृगजळाचे ओलाव्याने? ॥१३७॥
जाळे जळीं पसरिले । तेथ चंद्रबिंब दिसे गवसले । परि तीरीं काढुनि झाडिले । तेव्हा बिंब कोठे सांग? ॥१३८॥
तैसे शब्दप्रभू वाचाबळें । व्यर्थ चकविती प्रतीतिचे डोळे । मग साच परीक्षेवेळे । तो बोध नसेही, नच होई ॥१३९॥

मज मानवरूपात तुच्छत्वें मूढ देखती
नेणूनि थोरले रूप जे माझे विश्वचालक ॥११॥

किंबहुना असेल संसाराचे भय । आणि साच चाड मजलागी होय । तर तुम्ही ही उपपत्ती अवश्य । जतन करावी ॥१४०॥
एरवी दृष्टीसी होता  कावीळ । चांदणे पिवळे म्हणाल । तैसे माझिये स्वरूपीं निर्मळ । देखाल दोष ॥१४१॥
नातरि ज्वरें मुख दूषित होता । कडू विष म्हणती क्षीरामृता । तैसे मनुष्य मी नसता । मानाल मज मानुष ॥१४२॥
म्हणोनि पुन्हा सांगतो धनंजया, । विसंबू नये या अभिप्राया । ही स्थूळदृष्टी जाइल वाया । मज देखावया ॥१४३॥
जे मज देखती देहधारी म्हणून । तेचि साच देखणे नच जाण । जैसे स्वप्नीं अमृत पिऊन । अमर न हो कोणी ॥१४४॥
एरवी स्थृळदृष्टी मूढ । मज जाणती जणु गाढ । परि ते जाणणेचि ठाके आड । साच स्वरूपज्ञानाच्या ॥१४५॥
जैसा नक्षत्रांचे आभासें । घात करुनि घेतया हंसे । रत्नांचिया आशें । जळीं सूर मारुनि ॥१४६॥
सांग, गंगा या बुद्धीने मृ़गजळ । जवळ करिता कोणते फळ? । काय कल्पतरू म्हणुनि बाभूळ -। आश्रयिता लाभ? ॥१४७॥
हा नीलमण्यांची हार दुपदरी । या बुद्धीने घे सर्प विषारी । की रत्ने म्हणुनी करी । गारांची वेच; ॥१४८॥
अथवा द्रव्यठेव प्रगटली । म्हणोनि खदिरांगारें खोळ भरली । की पडछाया न जाणुनि घेतली । आडात उडी सिंहें; ॥१४९॥
तैसे मज प्रपंची गणोनी । बुडी दिली कृतनिश्चयाची ज्यांनी । चंद्रास्तव जळींची प्रतिमा त्यांनी । धरिली असे ॥१५०॥
तैसा कृतनिश्चय वाया जाई । आणि कोणी एक कांजी सेवी । मग परिणाम मात्र पाही । अमृताचा ॥१५१॥
मी नाशिवंत स्थूळ आकृती । ऐसा भरवसा बांधोनि चित्तीं । मज अविनाशा जर पाहती । तर दिसेन कैसा ? ॥१५२॥
पश्चिमसमुद्राचे तटा जावया । काय निघावे वाटांनी पूर्वेचिया ? । अगा, कोंडा कांडिता धनंजया, । काय धान्य मिळे? ॥१५३॥
तैसे मी म्हणजे आकार स्थूळ । हे काय जाणणे मत्स्वरूप केवळ । काय फेस पिता जळ -। सेविले होय? ॥१५४॥
म्हणोनि मोहमूढ मनोधमें । स्थूळचि मज मानुनी संभ्रमें । येथली जन्मादि कर्मे । मजवरी लादिती ॥१५५॥
ऐसे मज अनामा नाम । अकर्त्यावरी कर्म । विदेहासी देहधर्म । आरोपिती ॥१५६॥
मज आकारशून्या मानिती साकार । देहहीना अर्पिती उपचार । लाविती शास्त्रबंधमुक्ता व्यवहार । आचारादिक ॥१५७॥
मज जातिअतीता जात लादिती । निगुर्णासी सगुण मानिती । अचरणा चरण कल्पिती । करहीना कर ॥१५८॥
मज अमर्यादाचे करिती मापन । सर्वगतासी स्थानापन्न । जैसा निजलेला पाही वन । शेजेवरी ॥१५९॥
तैसे अश्रवणा देती श्रोत्र । मज अचक्षूसी नेत्र । अगोत्रासी गोत्र । अरूपा रूप ॥१६०॥
मज अव्यक्ता व्यक्त । निरिच्छासी इच्छायुक्त । स्वयंतृप्ता तृप्त । मानिती गा ॥१६१॥
मज अनावरणा लेवविती वस्त्रिप्रावरण । भूषणातीतासी आभूषण । मज करू पाहती उत्पन्न । जो सकळां सृजी ॥१६२॥
मज स्वयंसिद्धा मूर्त करिती । स्वयंभूसी प्रतिष्ठापिती । निरंतरा आवाहन करिती । विसर्जिती गा ॥१६३॥
मी सर्वदा स्वतःसिद्ध । तरि बाल - तरुण - वृद्ध -। ऐसे मज एकरूपासी संबंध । जोडिती गा ॥१६४॥
मज अद्वैता दुजेपण । अकर्त्यासी कर्तेपण । मी अभोक्ता तरि भोक्तेपण । देती मज ॥१६५॥
मज अकुळाचे कुळ वानिती । मज नित्याचे निधनें शिणती । मी सर्वांतरी असुनि कल्पिती । शत्रूमित्र गा ॥१६६॥
मी स्वानंदाभिराम । म्हणती अनेक सुखांचा काम । मी सर्वत्र सदा सम । तरि म्हणती एकदेशी ॥१६७॥
मी आत्मा एक चराचरीं । म्हणती मी पक्षपात करी । आणि कोपोनि एका मारी । हेचि वाढविती ॥१६८॥
हे मजही असतात । सामान्य मनुष्यधर्म समस्त । ऐसे ज्ञान विपरीत । तयांचे गा ॥१६९॥
जोवरि आकार एक देखती । तोवरि देव या नावें भजती । मग तो भाव भंगता टाकिती । देव नाही म्हणोनि ॥१७०॥
मज ऐशा ऐशा प्रकारें । जाणती मनुष्प ऐसे आकारें । ज्ञानचि तयांचे ते अंधारे -। करी स्वरूपज्ञाना ॥१७१॥

ते आशावाद मूढांचे कर्मे ज्ञानेहि ती वृथा
संपत्ति जोडिली ज्यांनी आसुरी मोहकारक ॥१२॥

व्यर्थचि ते जन्मले । जैसे वर्षेविण मेघ जमले । वा मृगजळाचे तरंग उठले । जे दुरूनचि पहावे ॥१७२॥
अथवा मातीचे घोडेस्वार । किंवा जादूचे अलंकार । वा नभीं गंधर्वनगर । आभासे मेघांचे ॥१७३॥
शेरी वाढल्या सरळ । ना फळल्या आत पोकळ । जैसे गळ्यात स्तन अजागळ । व्यर्थ अजासी ॥१७४॥
तैसे मूर्खांचे ते जिणे । धिक् कर्म तयांचे करणे । जैसे घेणे न देणे । सावरीचे फळ ॥१७५॥
मग जे काही ते पढले । ते मर्कटें नारळ तोडिले । वा अंधाहातीं पडले । मोती जैसे ॥१७६॥
किंबहुना तयांचे शास्त्र । जैसे बालिकेहातीं शस्त्र । अपवित्रा बीजमंत्र । कथिले जैसे ॥१७७॥
तैसे तयांचे ज्ञानजातही । आणि आचरिले जे काही । ते आघवेचि वाया जाई । अस्थिर चित्तामुळे ॥१७८॥
तमोगुणाची राक्षसी । जी सद्‌बुद्धीसी ग्रासी । विवेकाचा ठावचि नाशी । निशाचरी ॥१७९॥
तिचे आधीन जाहले । चिंतेचे कपोलें गेले । आणि त्या तामसीचे पडले । मुखामाजी; ॥१८०॥
जेथ आशेचे लाळेत । हिंसाजीभ लोळत । तैसाचि संतोष अखंडित । चघळुन टाकी ॥१८१॥
जी अनर्थाचे कानापावत वरी । ओठ चाटित निघे बाहेरी । ती प्रमादपर्वताची दरी । मातली असे ॥१८२॥
जेथ द्वेषांचिया दाढा । कचकचा ज्ञानाचा करिती रगडी । अगस्तीसी कुंभ - गवसणी, तैसी मूढां । ही स्थूळबुद्धी ॥१८३॥
ऐसे आसुरी प्रकृतीचे तोंडी । जाहले जैसे भुतासि उंडी । बुडोनि गेले कुंडीं । व्यामोहाच्य़ा ॥१८४॥
तमोगुणाच्या पडले गर्तेत । विचारांच्या हाता न लागता । हे असो, गेले जेथ । ठावचि नसे ॥१८५॥
म्हणोनि असो या निष्फळ । मूर्खांच्या कथा बाष्कळ । वायाचि वाढविता शिणेल -। वाणी येथ ॥१८६॥
ऐसे बोलिले देवें । तेथ जी, जी, म्हटले पांडवें । ऐक, जेथ वाचा विसावे । ती साधुकथा ॥१८७॥

दैवी संपत्ति जोडूनि महात्मे भजती मज
अनन्यभावें जाणूनि मी विश्वारंभ शाश्वत ॥१३॥

जयांचिये शुद्ध मानसीं । मी होउनि राही क्षेत्रसंन्यासी । निजले असताहि उपासी । वैराग्य जयां; ॥१८८॥
जयांचे आस्थेचे सद्‌भावीं । धर्म राज्य करी ठायी ठायी । जयांची मन ओलावा देई । विवेकासी; ॥१८९॥
जे ज्ञानगंगेत नाहले । पूर्णतेसि जेवुनि तृप्त झाले । जे शांतीसी आले । पल्लव नवे: ॥१९०॥
जे पूर्णावस्थेसि आले कोंभ । जे धैर्यमंडपाचे स्तंभ । जे आनंदसमुद्रीं कुंभ । तुडुंब भरले; ॥१९१॥
जयां भक्तीची एवढी प्राप्ती । जे मोक्षा दूर सर, म्हणती । जयांचे सहज आचरणीं नीती । जगतांना दिसे; ॥१९२॥
सर्व इंद्रियांसी ज्यांनी । लेवविली शांतीचि लेणी । जयांचे चित्त गवसणी । सर्वव्यापका मज; ॥१९३॥
ऐसे जे महान अनुभवी । सुदैवचि प्रकृतीचे दैवी । जे जाणोनिया माझेचि ठायी । स्वरूप हे सर्व; ॥१९४॥
मग वाढत्या प्रेमें । मज भजती ते महात्मे । परि दुजेपणासि मनोधर्में । नच शिवती ॥१९५॥
ऐसे मीचि होऊनि पांडवा, । करिती माझी सेवा । परि नवलाचा तो सांगावा । असे ऐक ॥१९६॥

अखंड कीर्तनें माझ्या यत्नशील दृढव्रती
भक्तीने मज वंदूनि भजती नित्य जोडिले ॥१४॥

जयांनी उत्कर्षाने कीर्तनाचे । व्यवसाय नाशिले प्रायश्चित्तांचे । नावचि नाही पापाचे । ऐसे केले ॥१९७॥
यमदमा अवकळा आणिली । तीर्थे स्थानावरुनि उठविली । यमलोकींची खुंटली । चालरीत आघवी ॥१९८॥
यम म्हणे काय नियमावे । दम म्हणे कोणाचे दमन करावे? । तीर्थे म्हणती काय खावे । पाप औषधाहि ॥१९९॥
ऐसे माझें नामघोषें । नाहीशी करिती विश्वाची दुःखे । अवघे जगचि महासुखें । दुमदुमूनि भरले ॥२००॥
ते पहाटेवीण प्रकाशीत । अमृतावीण जगवीत । योगावीण दावीत । कैवल्य डोळ्यांसी ॥२०१॥
राव - रंकीं न मानिती अंतर । भेद न जाणिती सान - थोर । एकसरिसे आनंदाचे आवार । होत जगा ॥२०२॥
एखाद्याने वैकुंठा जावे । ते तयांनी वैकुंठचि केले आघवे । ऐसे नामघोषगौरवें । प्रकाशले विश्व ॥२०३॥
तेजस्वी ऐसे, जणु सूर्य । परि दोष एक, तो अस्ता जाय । चंद्र पूर्ण एकवेळ होय । हे सदा पूर्ण ॥२०४॥
मेघ उदार परि ओसरे । म्हणोनि उपमेसी न पुरे । निःशंकपणे कृपाळू खरे । सिंहाऐसे, परि सदय ॥२०५॥
प्रेमें वाचेत जयांचे गाजे । नाव नाचत सदा माझे । एकवेळ मुखीं येण्या जे । जन्मसहस्त्र सेवावे लागे ॥२०६॥
तो मी वैकुंठी नसे । एक वेळ भानुबिंबींही न दिसे । वरि योगियांचीहि मानसे । उल्लंघुन जाई ॥२०७॥
परि तयांपाशी पांडवा, । मी हरपला शोधावा । जे नामघोष बरचा । करिती माझा ॥२०८॥
माझिये गुणीं तृप्त जाहले । देशकाळा विसरले । कीर्तनें सुखी जाहले । आत्मस्वरूपीं ॥२०९॥
कृष्ण विष्णु हरी गोविंद । ही नामकाव्ये गाती सानंद । तयांमाजी करिती विशद । उदंड आत्मचर्चा ॥२१०॥
हे बहु असो यापरी -। कोणी संचरती चराचरीं । वर्णित मज, अवधारी । पांडुकुमरा ॥२११॥
अगा, अर्जुना, किती एक । बहु तत्परतेने आणिक । मन पंचप्राण आदिक । वाटाडे घेती ॥२१२॥
बाहेरी यमनियमांचे कुंपण । वज्रसनाचा तट आतून । वरि प्राणायामाच्या ठेवून । धडाडत्या तोफा; ॥२१३॥
तेजें कुंडलिनीशक्तीचे । साहाय्यें प्राणवायूचे । तळे लीलया सतराव्या कलेचे । बळकाविले त्यांनी ॥२१४॥
तेव्हा इंद्रियनिग्रहें कीर्ती केली । विकारांची संपविली बोली । इंद्रिये बांधोनि आणिली । ह्रदयाआत ॥२१५॥
तोंचि धारणावारू उसळले । पंचमहाभूतांसि एकवटले । मन - बुद्धि - चित्त - अहंकार निपटिले । संकल्पाचे चतुरंग सैन्य ॥२१६॥
त्यावरी जैत रे जैत -। म्हणोनि ध्यानाची वाजे नौबत । दिसे तद्नूपतेचे झळकत । एकछत्र ॥२१७॥
समरसून होता पट्टाभिषेक । समाधिलक्ष्मीचे संपूर्ण देख । आत्मानुभव - राज्यसुख । तया लाभे ॥२१८॥
ऐसे अर्जुना, गहन । माझे अष्टांगयोग - भजन । आता ऐक सांगेन । जे करिती अन्य परींनी ॥२१९॥
तर दोण्ही पल्लवांतरी । जैसा एक तंतू वस्त्रीं । तैसे अन्य ते चराचरीं । जाणती ना ॥२२०॥
ब्रह्मदेवापासूनि आरंभत-। तों क्षुद्र चिलटांपावत । मध्ये जाणोनि हे समस्त । स्वरूप माझे; ॥२२१॥
मग वडिल - धाकटे न म्हणती । सजीव - निर्जीव न जाणती । देखिल्या वस्तूसी लोटांगण घालिती । मीचि म्हणोनि ॥२२२॥
आपुले श्रेष्ठत्वीं उदास असती । समोरी योग्य - अयोग्य न मानिती । एकसरिसे व्यक्तिमात्रांप्रती । नमणेचि आवडे ॥२२३॥
जैसे उंचावरून उदक पडत । तळाशी ये निवांत । तैसे भूतमात्र देखता नमित । ऐसा स्वभावचि तयांचा ॥२२४॥
फळभारें तरुशाखा लहडती । सहजचि भूमीवरी वाकती । तैसे सकळ प्राणिमात्रांपुढती । लवती ते ॥२२५॥
अखंड निगर्वी होउनि असती । तयांची विनय हीचि संपत्ती । ती जयजयमंत्रें अर्पिती । माझेचि ठायी ॥२२६॥
नमिता मान - अपमान गळाले । म्हणोनि सहजी ते मीचि जाहले । ऐसे मजस्वरूपीं मिसळले । निंरतर उपासिती ॥२२७॥
अर्जुना, ही श्रेष्ठ भक्ती । सांगितली तुजप्रती । आता ज्ञानयज्ञें यजिती । ते ऐक भक्त ॥२२८॥
परि भजनाची हातोटी । तू जाणत आहेसी किरीटी, । कारण मागे या गोष्टी । कथिल्या आम्ही ॥२२९॥
तेव्हा होय जी, अर्जुन म्हणे । ते दैवी प्रसादाचे करणे । तरि काय अमृताचे वाढणे । पुरे म्हणवे? ॥२३०॥
या बोलांनी अनंतें । आतुर देखिले तयाते । मग सुखावल्या चित्तें । डोलतसे भगवंत ॥२३१॥
म्हणे भले केले पार्था, । हा प्रसंग नव्हे सर्वथा । परि बोलवीतसे आस्था । तुझी मज ॥२३२॥
तेव्हा म्हटले धनंजयें । चकोराविण का चांदणेचि नोहे ?। सकळ जग निववावे । हा स्वभावचि चंद्राचा ॥२३३॥
चकोर आपुल्या इच्छावेडें । चोच करिती चंद्राकडे । तैसे आम्ही विनवू ते थोडे । देवा, आपण कृपासिंधू ॥२३४॥
मेघ केवढा उदार । जगाची पीडा करी दूर । तो वर्षाव अपार । चातकाची तहान किती? ॥२३५॥
चूळभर जळाचे इच्छेपोटी । जावे लागे गंगातटी । श्रवणेच्छा सान असो वा मोठी । सांगावी देवा ॥२३६॥
तेथ देव म्हणे, राहो हे । जो संतोष आम्हा जाहला आहे । त्यावरि स्तुती साहावी, पाहे - । ऐसे उरले न काही ॥२३७॥
तव श्रवणाचे चांगुलपण । हेचि वक्तृत्वा आमंत्रण । ऐसा अर्जुना देऊनि मान । श्रीकृष्ण बोलू लागले ॥२३८॥

दुसरे ज्ञानयज्ञाने भजती व्यापका मज
ब्रह्मभावें विवेकाने अविरोधेंचि देखुनी ॥१५॥

तर ज्ञानयज्ञाचे ऐसे रूप । पंचमहाभूते हा मंडप । वधस्तंभ आदिसंकल्प । द्वैत हाचि पशु ॥२३९॥
पंचमहाभूतांचे विशेष गुण । वा इंद्रिये आणि प्राण । हीचि यज्ञसामुग्री भरभरून । आणि ज्ञान हे तूप ॥२४०॥
सुखदुःखांत समबुद्धी । हीचि सुह्रदा यज्ञवेदी । यज्ञकुंडे होत मन - बुद्धी । तेथ प्रज्वलित ज्ञानाग्नी ॥२४१॥
विवेकबुद्धीचे कुशलत्व । हाचि मंत्रविद्यागौरव । यत्रकर्ता होत जीव । आणि यज्ञपात्र शांती ॥२४२॥
तो जीव प्रतीतीचे पात्रें । विवेकमहामंत्रें । आणि ज्ञानाग्निहोत्रें -। जीव - परमात्मा भेन नाशी ॥२४३॥
तेथ अज्ञान सरोनि जाई । थांबती यजमान - यज्ञक्रियाही । यजमानाचे आत्मैक्यजळीं होई । अवभृतस्नान ॥२४४॥
तेव्हा महाभूते, विषय, इंद्रिये -। वेगळाले न म्हणे हे । एकचि ऐसे जाणे आघवे । तो आत्मबुद्धी ॥२४५॥
तैसा जागा होता कुणी अर्जुना, । स्वप्नींची ती विचित्र सेना । मीचि जाहलो होतो ना । निद्रावशें? ॥२४६॥
सेना ती सेना नसे । तर मीचि एक अवघा असे । ऐसे एकरूप भासे । विश्व तया ॥२४७॥
मग तो जीव ही भाषा सरे । आब्रह्म परमात्मा या बोधें भरे । ऐसे भजती ज्ञानयज्ञाद्वारें । ऐक्यभावें ॥२४८॥
वा अनादि असती हे अनेक । एकासारिखे न एक । आणि नामरूपादिक । तेही भिन्न ॥२४९॥
म्हणोनि विश्व भिन्न भिन्न । तरि न भेदे तयांचे ज्ञान । अवयव अन्य अन्य असून । जैसे एकेचि देहीं; ॥२५०॥
अथवा शाखा सान - थोर । परि असती एकेचि तरूवर । बहुत किरण परि दिनकर । एकचि जैसा; ॥२५१॥
तैशा नानाविध व्यक्ती । अन्य नावे, अन्य वृत्ती । ऐशा भिन्न भिन्न भूतीं । अभिन्न मज जाणती ॥२५२॥
या वेगळालेपणे पांडवा । करिती ज्ञानयज्ञ बरवा । भेद न पावत जाणिवा । ते ज्ञानी म्हणोनि ॥२५३॥
नातरि जेव्हा ज्या ठायी । देखति जे जे काही । ते मजवाचूनि नाही । ऐसाचि बोध ॥२५४॥
पहा बुडबुडा जेथ जाई । तेथ जळचि एक तयाठायी । मग विरे अथवा राही । तरि जळींचि की; ॥२५५॥
पवनें धूलिकण उचलिले । परि ते पृथ्वीहुनि वेगळे न झाले । आणि मागुते जरि पडले । तरि पृथ्वीवरिचि; ॥२५६॥
तैसे कोठेही कोणत्याहि भावें । काही व्हावे अथवा न व्हावे । तरि ते मीचि ऐसे आघवे । तया जाहले ॥२५७॥
अगा, ही जेवढी माझी व्याप्ती । तेवढीचि तयांची प्रतीती । ऐसे बहुत आकारीं वर्तती । बहुतचि होउनी ॥२५८॥
भानुबिंब जो पाही तया । सन्मुखचि जैसे धनंजया, । तैसेचि ते विश्वा या । सामोरे सदा ॥२५९॥
अगा, तयांचिया ज्ञाना । पाठपोट नाही अर्जुना, । वायू जैसा गगना । सर्वांगीं असे ॥२६०॥
तैसा मी जितुका आघवा । तितुकीचि व्याप्ती तयांचे सद्‍भावा । न करिताचि तयांनी पांडवा, । भजन जाहले ॥२६१॥
एरवी तरि मीचि ठायी ठायी । तर कोणी केव्हा उपासिला नाही? । या ज्ञानाविण अप्राप्य तयां राही । माझे स्वरूप ॥२६२॥
परि ते असो, ऐसा उचित । ज्ञानयज्ञ ते करीत । मजचि उपासीत । कथिले तुवा ॥२६३॥
अखंड सकळ हे सकळांमुखीं । सहज समर्पित मजचि एकीं । हे न जाणिती मूर्ख की । न पावती मज ॥२६४॥

मीचि संकल्प मी यज्ञ स्वावलंबन अन्न मी
मंत्र मी हव्ह ते मीचि अग्नि मी मीचि अर्पण ॥१६॥

त्याचि ज्ञानाचा जर होई उदय । तर मूळ वेद मीचि होय । मीचि विधिअनुष्ठान यज्ञ । वेदात जो कथिला ॥२६५॥
मग त्या कर्मापासुनि बरवा । जो सांगोपांग आघवा । यज्ञ प्रगटे पांडवा । तोही मी गा ॥२६६॥
स्वाहा आहुति देवांसी । तैसीचि स्वधा पितरांसी । सोमवल्ली, समिधा, मंत्र, यज्ञासी । तूप, होमद्रव्यहि मीचि ॥२६७॥
हवन करावे मीचि ऋत्विजें । तेथ अग्नि तो स्वरूप माझे । आणि हवनद्नव्य जे जे । तेही मीचि ॥२६८॥

मी ह्या जगास आधार माय बाप वडील मी
मी तिन्ही वेद ॐ कार जाणण्या योग्य पावन ॥१७॥

जयाचा होता अंगसंग । या प्रकृतीसवे अष्टांग । जन्म पावे हे जग । तो पिता मी ॥२६९॥
अर्धनारीनटेश्वरीं । जो पुरुष तोचि नारी । तेयी मी चराचरीं । माताही होय ॥२७०॥
आणि जाहले जग जेथ राहे । जेणें जीवित वाढत आहे । ते मजवाचूनि नोहे । निश्चित दुसरे ॥२७१॥
ही प्रकृति - पुरुष दोन्ही । उपजली जयाचे मनरहित मनीं । तो पितामह त्रिभुवनीं । विश्वाचा मी ॥२७२॥
ज्ञानाच्या वाटा अवघ्या । अगा, येती ज्या गावा । चव्हाटयावरी वेदांचिया । जे जाणण्यायोग्य ॥२७३॥
जेथ नान मते एकरूप झाली । शास्त्रांची परस्परां अनोळख फिटली । जेथ चुकली ज्ञाने एकमेका भेटली । ते पवित्र स्थान मी ॥२७४॥
ब्रह्मरूप बीजासि फुटला अंकुर -। घोष - ध्वनी - नाद - आकार -। तयांचे भुवन जो ॐ कार । तोही मी गा, ॥२७५॥
ज्या ॐ काराचे कुशीसी । अकार, उकार, मकार, अक्षरे ऐसी । जी उपजतचि तिन्ही वेदांसी । घेऊनि प्रगटली ॥२७६॥
म्हणोनि ऋग‌वेद, ययुर्वेद, सामवेद । हे तिन्ही मी, म्हणे गोविंद । ऐसा मीचि कुलक्रम सबंध । शब्दब्रह्माचा ॥२७७॥

साक्षी स्वामी सखा भर्ता निवास गति आसरा करी हरी धरी मीचि ठेवा मी बीज अक्षय ॥१८॥

कल्पांतीं हे चराचर आघवे । ज्य़ा प्रकृतीत सामावे । ती शिणता जेथ विसावे । ती परमगती मी ॥२७८॥
प्रकृति जगे जयायोगें । जयाने अंगिकारिता प्रसवी जगें । जो गुण भोगे । तिजसि समरसत; ॥२७९॥
तो विश्वलक्ष्मीचा भर्ता । मीचि गा पांडुसुता । धनी मी कर्ता-करविता । समस्त त्रैलोक्याचा ॥२८०॥
आकाशें सर्वत्र वसावे । वायूने क्षणही उगे नसावे । अग्नीने जाळावे । वर्षावे जळाने; ॥२८१॥
पर्वतांनी बैठक न सोडावी । समुद्रांनी सीमा न ओलांडावी । पृथ्वीने ही भूते वाहावी । ही आज्ञा माझी ॥२८२॥
मी बोलविता वेद बोले । मी चालविता सूर्य चाले । मी हालविता प्राण हाले । जो जगा चालवी ॥२८३॥
मीचि नियमिला असता । काळ ग्रासितसे भूतां । भूते आज्ञा पाळत, पंडुसुता, । सकळ जयाच्या ॥२८४॥
ऐसा जो समर्थ । तो मी जगाचा नाथ । आणि गगनाऐसा साक्षीभूत । तोही मीचि ॥२८५॥
या नामरूपीं खरोखर । जो भरला असे सर्वत्र । आणि या नामरूपाही आधार । आपणचि जो ॥२८६॥
जैसे जळाचे कल्लोळ । आणि कल्लोळीही जळ । तैसे वसवी सकळ । तो निवास मी ॥२८७॥
जो अनन्यशरण होई । तयाचे निवारी मी जन्ममरणही । शरणागता शरण्य तेवी । मीचि एक ॥२८८॥
मीचि एक अनेकपणें । वेगळाल्या प्रकृतीगुणें । सजीव जगाचे प्राणें । संचरत असे ॥२८९॥
समुद्रात वा डबक्यातही । सविता बिंबे कोठेही । तैसा ब्रहम्यापासुनि कीटकांही । सुह्रद तो मी ॥२९०॥
मीचि गा पांडवा, । या त्रिभुवना ओलावा । उत्पत्ति - स्थिति - लया । मूळ ते मीचि ॥२९१॥
बीज शाखांसी प्रसवे । मग वृक्षपण बीजीं सामावे । तैसे संकल्पें होत आघवे । मग संकल्पींचि मिळे; ॥२९२॥
ऐसे जगाचे बीज तो संकल्पें । अव्यक्त वासनारूप । तो कल्पांतीं जेथ सूक्ष्मरूप -। वसे, ते स्थान मी ॥२९३॥
ही नामरूपे जेव्हा सरती । वर्ण, व्यक्ती आटती । जातींचे भेद मिटती । आणि आकाशही नुरे; ॥२९४॥
तेव्हा वासनारूप संकल्पसंस्कार । पुन्हा रचावया जगदाकार । जेथ राहोनि असती अमर । ते निधान मी ॥२९५॥

तापतो सूर्यरूपें मी सोडितो वृष्टि खेचितो
मृत्यु मी आणि मी मोक्ष असे आणि नसेहि मी ॥१९॥

मी सूर्याचे वेषें -। तापे तेव्हा हे शोषे । मग इंद्र होऊन वर्षे । तेव्हा फिरुनि सर्व भरे ॥२९६॥
अग्नी काष्ठ खाई । तेव्हा काष्ठचि अग्नि होई । तैसे मरते - मारते, दोन्हीही । स्वरूप माझेचि ॥२९७॥
यास्तव मृत्यूचे स्वरूप जे जे । तेही गा स्वरूप माझे । आणि न मरते अविनाश दुजे । ते तर मीचि ॥२९८॥
आता बहुत जे सांगावे । ते एकदाचि घे आघवे । सत् - असत् सर्व जाणावे -। ते मीचि गा ॥२९९॥  
म्हणोनि अर्जुना मी नसे । ऐसे कोणते स्थान असे? । परि प्राण्यांची दैव कैसे । न देखती मज ॥३००॥
तरंग पाण्याविना सुकती । रश्मी दिव्याविण न देखती । तैसे मीचि असून मद्रूप न होती । आश्चर्य पहा ॥३०१॥
हे अंतर्बाह्म मजरूपीं कोंदले । जग निखिल माझेचिरूपें ओतले । कैसे कर्म तयांचे ओढवले । जे मीचि नाही म्हणती ॥३०२॥
परि अमृताचे विहिरीत पडावे । आपणचि आपणा वरी काढवे । ऐसे होता काय सांगावे । त्या अभाग्यासी? ॥३०३॥
एक घास अन्नासाठी । अंध धावताहे किरीटी । चिंतामणिरत्न लोटी । अडखळता पाय ॥३०४॥
जेव्हा ज्ञान सोडुनि जाई । तेव्हा ऐसी दशा होई । म्हणोनि केले ते केलेचि न काही । ज्ञानाविण ॥३०५॥
अंधा गरुडाचे पंख असती । तर कोण्या उपयोगा येती? । तैसे सत्कर्माचे सायास ठरती । ज्ञानाविण व्यर्थ ॥३०६॥

वेदाभ्यासी सोमापानें पुनीत
माझ्या यज्ञें इच्छिती स्वर्ग जोडू
ते पुण्याने जाउनी इंद्रलोकीं
तेथींचे ती भोगिती दिव्य भोग ॥२०॥

पाही हे सुभगा । आश्रमधर्माचे आचरणें गा । जे आपणचि विहितमार्गा । कसोटी होती ॥३०७॥
जे यजन करिता कौतुकें । तिन्ही वेदांना माथा तुके । यज्ञक्रिया सफळ उभी ठाके । जयांपुढे ॥३०८।
तैसे सोमरसपानकर्ते याज्ञिक । जे आपणचि यज्ञाचे स्वरूप एक । त्यांनी पुण्याचे नावें वास्तविक । जोडिले पापचि ॥३०९॥
ते तिन्ही वेदांसि जाणत । शतकांवरी यज्ञ करीत । पूजिल्या मज चुकवीत । क्षुद्र स्वर्गप्राप्ती इच्छिती ॥३१०॥
कल्पतरूखाली बैसत । झोळीसी गाठी मारित । मग अभागी निघत । भीक मागण्या; ॥३११॥
तैसे शतयज्ञें मज यजिती । आणि स्वर्गसुख इच्छिती । हे पुण्य की ते करिती । पापचि खचित? ॥३१२॥
म्हणोनि मजविण लाभावा स्वर्ग । तो अज्ञानजनांचा पुण्यमार्ग । ज्ञानी तया उपसर्ग -। हानी म्हणती ॥३१३॥
नातरि नरकीचे दुःख -। देखोनि, स्वर्गा नाव सुख । एरवी नित्य आनंद गा निर्दोष । ते स्वरूप माझे ॥३१४॥
अर्जुना, यावया मजठायी । आडवाटा नेत भलतीकडेही । एक स्वर्गाकडे, एक नरकाही । दोन्ही गा चोरांच्या ॥३१५॥
स्वर्गा पुण्यात्मक पापे यावे । पापात्मक पापें नरका जावे । मग मजचि जेणें पावावे । ते शुद्ध पुण्य ॥३१६॥
आणि मजचिठायी असता । जेणें मी दुरावे पंडुसुता, । ते पुण्य ऐसे म्हणता । जीभ न तुटे काय ? ॥३१७॥
परि हे असो, प्रस्तुत । यापरी ते दीक्षित । यजुनि मज याचित । स्वर्गभोग ॥३१८॥
मग मी न पावे । ऐसे जे पापरूप पुण्य हे । ते लाभोनि आनंदोत्सवें । स्वर्गा येती ॥३१९॥
जेथ अमरत्व हेचि सिंहासन । ऐरावताऐसे वाहन । राजधानीभुवन । अमरावती ॥३२०॥
जेथ महासिद्धींची भांडारे । अमृताची कोठारे । ज्या गावीं खिल्लारे । कामधेनूची ॥३२१॥
ज्या स्वर्गीं सुरगण सेवा करीत । चिंतामणिरत्नांची भूमी जेथ । आणि आनंदोद्याने बहरत । कल्पतरूंची ॥३२२॥
जेथ गंधर्व गाती गाणी । रंभेऐशा रिझविती नर्तनीं । आणि कितिएक वियासिनी । त्यात मुख्य़ उर्वशी ॥३२३॥
मदन सेवी शेजघरीं । चंद्र सडाशिंपण करी । चपळ संदेशधारी । वारा जेथ ॥३२४॥
आशीर्वादा बृहस्पतीऐसे विद्वान । जे चिंतिती कल्याण । आणि पंक्तीसी सुरगण । बहुत जेथ ॥३२५॥
धुरंधर अष्टदिक्पाळ जेथ । अश्वारूढ सरदार जेथ । उच्चैःश्रवा पुढे धावत । अश्व इंद्राचा ॥३२६॥
हे बहु असो जे ऐसे । भोग इंद्रसुखासरिसे । पुण्याचा अंश असे । तोवरि भोगित यज्ञकर्ते ॥३२७॥

त्या स्वर्गाते भोगुनी ते विशाळ
क्षीणें पुण्यें मृत्युलोकास येती
ऐसे निष्ठा ठेवुनी वेदधर्मीं
येणे-जाणे जोडिती काममूढ ॥२१॥

मग त्या पुण्याचा ठेवा सरे । सवेचि इंद्रपणाची उटी उतरे । आणि येऊ लागत माघारे । मृत्युलोका ॥३२८॥
वेश्याभोगीं कवडी-कवडी वेचे । मग दारहि स्पर्शिता न ये तिचे । तैसे लाजिरवाणे याज्ञिकांचे -। काय सांगावे ? ॥३२९॥
ऐसे मज शाश्वत मुकले । जयांनी पुण्यें स्वर्ग इच्छिले । तयांचे अमरपण व्यर्थ गेले । अंतीं मृत्युलोक ॥३३०॥
मातेचे उदरकुहरीं । शिजुनी विष्ठेचे थरीं । उकडुनि नवमासवरी । जन्मजन्मीनी मरती ॥३३१॥
अगा, स्वप्नीं ठेवा पावे । जागे होता हरपे आघवे । तैसे स्वर्गसुख जाणावे । वेदज्ञ यज्ञकर्त्यांचे ॥३३२॥
अर्जुना, वेदवेत्ता जरि जाहला । तरि मज न जाणता वाया गेला । कण सोडुनी उफणिला । कोंडा जैसा ॥३३३॥
म्हणोनि मज एकाविण । तिन्ही वेदधर्म अकारण । मज जाणोनि अन्य न जाण । तू सुखी होसी ॥३३४॥

अनन्यभावें चिंतूनि भजती भक्त जे मज
सदा मिसळले त्यांचा मी योगक्षेम चालवी ॥२२॥

जे सर्वभावांसह चित्तें । विकले गेले मज उक्ते । जैसा गर्भगोळा उद्यामाते । कोणत्याही न जाणे; ॥३३५॥
तैसे मजवाचूनि काही । आणिक गोमटे नाही । जिण्यासि माझेचि नावही । जयांनी ठेविले ॥३३६॥
ऐसे अनन्यगतिक चित्तें । चिंतित असता मज एकाते । जे उपासिती तयांते । मीचि सेवी ॥३३७॥
ज्या क्षणीं ते एकवटुनि पार्था, । अनुसरले माझिया पथा । तेव्हाचि तयांची चिंता । मजवरी पडली ॥३३८॥
मग तयांनी जे जे करावे । ते मजवरीचि पडे आघवे । पंख न फुटल्या पिलांस्तव जगावे । पक्षिणीने जैसे ॥३३९॥
आपुली तहानभूक न जाणे । तान्हुल्याचे माउलीसीचि पडे करणे । तैसे अनुसरले मज जिवेंप्राणें । तयांचे सर्व मी करी ॥३४०॥
जर माझिया एकरूपतेची ओढ । तर तेचि पुरवी कोड । सेवावे म्हणती तर गाढ । प्रेम निर्मी उभयीं ॥३४१॥
ऐसे जे जे भाव मनीं धरिती । ते पुन्हा पुन्हा पुरवावे लागती । आणि दिल्याची जपणूक पुरती । तीही करी मीचि ॥३४२॥
हा योगक्षेम तयांचा पांडवा । मजवरिचि पडे आघवा । तयांचे सर्व भावां । आश्रय मी ॥३४३॥

श्रद्धापूर्वक जे कोणी यजिती अन्य दैवते
यजिती तेहि मातेचि परी मार्गास सोडुनी ॥२३॥

आणिकही संप्रदाय असती । परि मज सर्वव्यापका न जाणती । अग्नि - इंद्र - सूर्य़ - सोम यां यजिती । म्हणूनि ते ॥३४४॥
ते यजनहि माझेचि होई । कारण आघवे मीचि असे पाही । परि ते भजती तो सरळ नाही । वाकडाचि मार्ग ॥३४५॥
पहा शाखापल्लव वृक्षाचे । नव्हेत काय एकाचि बीजाचे? । परि पाणी घेणे कार्य मुळाचे । ते मुळासीचि घायावे ॥३४६॥
अथवा दहा इंद्रिये ती । एकाचि देहाची असती । त्यांनी सेविले विषय जाती । एकेचि ठायी; ॥३४७॥
तरि करोनि रससिद्धी बरवी । कानीं कैसी भरावी ? । फुले आणोनि बांधावी । डोळ्यांसी कैसी ॥३४८॥
तेथ रस तो मुखेंचि सेवावा । परिमळ तो घ्राणेंद्रियेंचि घ्यावा । तैसा मी तो यजावा । मीचि म्हणोनि ॥३४९॥
एरवी मज न जाणोनि भजन । ते वायाचि गा हे न, ते न । म्हणोनि कर्माचे डोळे ज्ञान । ते निर्दोष असावे ॥३५०॥

भोक्ता मी सर्व यज्ञांचा फलदाताहि मीचि तो
नेणती तत्त्व हे माझे म्हणूनि पडतीचि ते ॥२४॥

एरवी तरि पहावे येथ । या यज्ञोपचारा समप्त । मजवाचुनि भोक्ता समर्थ । कोण आहे? ॥३५१॥
मी सकळ यज्ञांचे आरंभीही । आणि मीचि यज्ञांचे शेवटीही । दुर्बुद्ध भजति इंद्रादि देवांठायी । चुकवुनि मज ॥३५२॥
गंगोदक गंगेतचि जैसे । अर्पिती देव - पितरोद्देशें । माझे मज देती तैसे । परि अन्य अन्य भावें ॥३५३॥
म्हणोनि ते पार्था, । मज न पावती सर्वथा । मग मनीं वाहती जेथली आस्था । तेथचि जाती ॥३५४॥

देवांचे भक्त देवांस पितरांचे तयांसचि
भूतांचे भक्त भूतांस माझेहि मज पावती ॥२५॥

मन - वाचा - इंद्रिये ज्यांनी । लाविली देवांचिये भजनीं । शरीर जाताक्षणीं । ते देवचि होती ॥३५५॥
अथवा पितरांची व्रते । वाहती जयांची चित्ते । जीवित सरता तयांते । पितृलोक लाभे ॥३५६॥
वा क्षुद्र देवतादि भूते । हीचि जयांची परमदैवते । आणि जारण-मारण कर्माते । उपासिले ज्यांनी; ॥३५७॥
तयां देहाची गवसणी फिटली । भूतयोनिची प्राप्ती जाहली । ऐसी संकल्पवशें फळली । कर्मे तयां ॥३५८॥
मग जे दिठीने मजचि देखती । कानीं माझेचि नाव ऐकती । मनें मजसीचि ध्याती । वानिती वाचेने; ॥३५९॥
सर्वांगीं सर्वत्र ठायी ठायी । मजचि नमिती प्रत्यही । दान - पुण्यादिक जे काही । माझेचि उद्देशें; ॥३६०॥
जयांनी माझेचि अध्ययन केले । आतबाहेरी मजयोगें तृप्त झाले । जयांनी जीवित जोडिले । मजचिसाठी; ॥३६१॥
जे अहंकार वाहत अंगीं । आम्ही हरीचे या भूषणालागी । जयां एकचि लोभ जगीं । माझेचि लोभें; ॥३६२॥
जे माझेचि कामें सकाम । माझेचि प्रेमें सप्रेम । जे मज भुलोनि सभ्रम । जाणती न लोकां; ॥३६३॥
मजचि जाणिती जयांची शास्त्रे । मी जोडिला जाय जयांचे मंत्रें । ऐसे जे कर्ममात्रें । भजती मज; ॥३६४॥
मरणाअलीकडे ते । मज मिळोनि गेले पुरते । मग मरणोत्तर अन्यत्र तेथे -। मजविण जातिल कैसे ? ॥३६५॥
माझे पूजन ज्यांनी केले । ते मद्रूपचि जाहले । ज्यांनी सेवाभावें समर्पिले । आपणासीचि मज ॥३६६॥
तयांनी आत्मभाव माझे ठायी -। अर्पिण्याविण अन्य आनंद नाही । अवांतर उपचारीं कोणत्याही । न आकळे मी ॥३६७॥
मज जाणिले म्हणे तोचि न जाणे । संपन्नपणें मिरवे, तेचि उणे । आम्ही मुक्त जाहलो म्हणे -। तो काहीचि नव्हे ॥३६८॥
वा यज्ञ दान तप यांचा किरीटी, । जर ते गर्व धरिती उठाउठी । तर जाण हे सर्व मजसाठी । तृणवत् केवळ ॥३६९॥
पहा, ज्ञानबळें कोणी । अधिक काय वेदाहुनी? । की सहस्त्रवदन शेषाहुनी । बोलके असे? ॥३७०॥
तो शेषहि मम शयम होत । वेदही मुरडे नेति नेति म्हणत । सनकादिक राजे भांबावुनि येथ । वेडेपिसे जाहले ॥३७१॥
तपस्व्यांत शंकराऐसे कोण? । तोही सोडूनि अभिमान । शिरीं गंगा करी धारण । चरणोदक माझे ॥३७२॥
नातरी ऐश्वर्यें सरिसी । कोण आहे लक्ष्मीऐसी? । समृद्धीऐशा दासी । घरी जियेच्या ॥३७३॥
ज्यांनी खेळता करित घरकुले । तयां नाव अमरपुरी ठेलिले । तर न होत काय बाहुले । इंद्रादिक तयांची? ॥३७४॥
ती नावडोनि जेव्हा मोडिती । तेव्हा इंद्राचे रंक होती । ज्या झाडांकडे पाहती । ते होती कल्पवृक्ष ॥३७५॥
ऐशा जिच्या जवळिकेच्या । समर्थ दासी घरच्या । मुख्य नायिका लक्ष्मीच्या । तिजही न मानिती येथ ॥३७६॥
मग सर्वस्वें करुनि सेवा । अभिमान सोडूनि पांडवा, । पाय प्रक्षाळण्याचे दैवा । प्राप्त जाहली ॥३७७॥
म्हणोनि थोरपण दूर सारावे । शास्त्रवेत्तेपण अवघे विसरावे । जगा धाकुटे व्हावे । तेव्हा जवळीक माझी ॥३७८॥
सहस्त्ररश्मीपुढे अर्जुना, । चंद्रही लोपतोचि ना? । तेथ तेजाचा गर्व कोणा-। काजव्याने का करावा ? ॥३७९॥
तैसे लक्ष्मीचे थोरपणही गमे थोडे । शंभूचेही तप तोकडे पडे । तेथ अज्ञानी वेडेबागडे । कैसे जाणिती मज? ॥३८०॥
यास्तव देहाभिमाना त्यजावे । सकळ गुणांचे लिंबलोण उतरावे । संपत्तिमदा टाकावे । ओवाळूनिया ॥३८१॥

पत्र वा पुष्प जो प्रेमें फळ वा जळ दे मज
ते त्या पवित्र भक्ताचे अर्पिले खाय मी सुखें ॥२६॥

मग निःसीमभावउल्हासें । मज अर्पावयाचे मिषें । फळ एक आवडे तैसे । कोणतेही असो; ॥३८२॥
भक्त मजकडे देई । आणि मी ओंजळीत घेई । मग देठ न काढिता सेवी । आनंदाने ॥३८३॥
अगा, भक्तीचे नावें । फूल एक मज द्यावे । खरे तर मी हुंगावे । परि मुखींचि घाली ॥३८४॥
हे असो, कासया फुले ? । जरि पानचि एक मिळे । ताजे असो वा सुकले । कसलेही असो; ॥३८५॥
परि सर्वभावें भरले देखे । आणि भुकेला अमृतें तोषे । तैसे पानचि परि ते सुखें । सेवू लागे ॥३८६॥
अथवा ऐसेही एक घडे । पालाहि जरि न सापडे । तरि उदकाची पडे । वाण कोठे? ॥३८७॥
ते मोल न देता भेटले । कोठेही सहज लाभले । तेचि सर्वस्वें अर्पिले । जयाने मज: ॥३८८॥
तयाने वैकुंठाहुनि विशाळ । राउळे केली मजसाठी केवळ । कौस्तुभाहूनि निर्मळ । लेणी दिधली; ॥३८९॥
दुधाची शेजघरे खरोखर । क्षीराब्धीऐसी मनोहर । मजसाठी अपार । सृजिली तयाने ॥३९०॥
अर्पुनि अगरु चंदन कर्पूर । ऐशा सुगंधाचा मेरुवर । मजसाठी लाविला दिनकर । दीपमाळेसी ॥३९१॥
गरुडासारिखी वाहने । सुरतरूंची उद्याने । कामधेनूंची गोधने । अर्पिली तयाने; ॥३९२॥
अमृताहुनी रसभरित । नैवेद्य मज वाढिले बहुत । ऐसा थेंबभर उदकेंहि संतोषत -। भक्ताचे मी ॥३९३॥
हे काय तुजसि सांगावे? । तुवाचि देखिले, मज ठावे । मी सोडिल्या गाठी स्वयें । पोह्यांस्तव सुदामजीच्या ॥३९४॥
अगा, भक्ति एक मी जाणे । तेथ सान - थोर न म्हणे । आम्ही भावाचे पाहुणे । कोणत्याही ॥३९५॥
पत्र पुष्प फळ जळ । ते भजावया निमित्त पोकळ । आम्हासाठी साधन सरळ । शुद्ध भक्तितत्त्व ॥३९६॥
म्हणोनि अर्जुना अवधारी । तू बुद्धि एक स्वाधीन करी । मग आपुलिये मनोमंदिरीं । न विसंबे मज ॥३९७॥

जे खासी होमिसी देसी जे जे आचरिसी तप
जे काही करिसी कर्म ते करी मज अर्पण ॥२७॥

जे काही व्यवहार करिसी । अथवा भोग भोगिसी । वा यज्ञीं यजिसी । नानाविध; ॥३९८॥
किंवा सत्पात्रीं दाने । वा सेवकां देसी वेतने । अथवा तपादि साधने । व्रते करिसी; ॥३९९॥
ते क्रियाजात आघवे । जे जैसे घडेल स्वभावें । ते भाव धरुनि करावे । माझियेप्रीत्यर्थ ॥४००॥
परि सर्तथा आपुले जीवीं । केल्याचा आठव मुळीच नुरवी । ऐसी धुवोनि कर्मे द्यावी । माझे हातीं ॥४०१॥

अशाने तोडुनी सर्व कर्मबंध शुभाशुभ
योग - संन्यास सांधूनि निळसी मज मोकळा ॥२८॥

अग्निकुंडी बीजे घातली । ती अंकुरदशेस जैसी मुकली । तैसी न फळती जी मज अर्पिली । शुभाशुभ कर्मे ॥४०२॥
कर्म न अर्पिता उरते । तेव्हा ते सुखदु:खीं फळतो । आणि ते भोगण्या यावे लागते । देहा एका ॥४०३॥
ते अर्पिले मज कर्म । तेव्हाचि पुसले मरण - जन्म । जन्मासवे श्रम । सारेचि गेले ॥४०४॥
म्हणोनि अर्जुना देख । उद्याचा वेळ नव्हे का अधिक? । ही संन्यासयुक्ती सोपी एक । आज दिली तुज ॥४०५॥
या देहाचे बंधनीं न पडावे । सुखदुःखाचे सागरीं न बुडावे । सुखें सुखरूया जडावे । माझियेचि अंगा ॥४०६॥

सम मी सर्व भूतांस प्रियाप्रिय नसे मज
परी प्रेमबळें राहे भक्त माझ्यात त्यात मी ॥२९॥

तो मी पुससी कैसा । तर सर्वांभूतीं सदा सरिसा । जेथ आपपर ऐसा । भेद नाही ॥४०७॥
जे ऐसिया मज जाणिती । अहंकाराचा ठा मोडिती । मनोभावें कर्मे करिती । भजती मज; ॥४०८॥
ते वागता दिसती देहीं । परि देहीं ना, माझेठायी । आणि मी तयांचे ह्रदयीं । समग्र असे ॥४०९॥
सविस्तर वटत्व जैसे । बीजकणिकेत असे । आणि बीजकण वसे । वृक्षीं जैसा; ॥४१०॥
तैसे आम्हा - तयांत खरोखर । बाह्य नावाचेचि अंतर । करिता अंतरंगाचा विचार । मी तेचि ते ॥४११॥
आता उसनी जैसी लेणी । अंगावरी वरकरणी । तैसी देहधारणीं । उदासी तयांची ॥४१२॥
परिमळ जाता पवनापाठी । ओस फूल राही देठीं । तैसे आयुष्याचे मुठीं-। केवळ देह ॥४१३॥
एरवी अहंकार जो आघवा । तो आरूढोनि सद्‍भावा । मजचिआत पांडवा । प्रविष्ट जाहला ॥४१४॥

असो मोठा दुराचारी भजे मज अनन्य जो
मानावा तो जसा साधु त्याचा सुंदर निश्चय ॥३०॥

ऐसे भजता प्रेमभावें । तो जन्महि पुन्हा न पावे । मग तयाने असावे । कोणत्याही जातीचे गा; ॥४१५॥
आनी आचरण पाहता सुभटा, । तो पापाचा शेलका वाटा । परि जीवित वेचले तो चव्हाटा । भक्तीचाचि ॥४१६॥
अगा, अंतसमयीं जैसी मती । तैसीचि पुढील गती । म्हणोनि । जीवित तयाने अंतीं । दिधले भक्तीसी; ॥४१७॥
तो आधी जरि अनाचारी । तरि सर्वोत्तमचि, अवधारी । जैसा बुडाया महापुरीं । न मरता निघाला; ॥४१८॥
तयाचे जीवित ऐलथडीसी आले । म्हणोनि बुडलेपण वाया गेले । तैसे नुरेचि पाप केले । शेवटल्या भक्तियोगें ॥४१९॥
यालागी पापी जरि जाहला । तरि अनुतापतीर्थीं नाहला । नाहुनी मजआत आला । सर्वभावें ॥४२०॥
तर पवित्र तयाचेचि कुळ । अभिजात तेचि निर्मळ । जन्मल्याचे फळ । तयानेचि जोडिले; ॥४२१॥
केले सकळ शास्त्रांचे अध्ययन । तपांचेही नित आचरण । अष्टांगयोगही जाण । अभ्यासिया तयाने; ॥४२२॥
हे असो बहुत पार्था । तो तरला कर्मातून सर्वथा । जयाची अखंड गा आस्था । मजचिलागी ॥४२३॥
अवघ्या मन-बुद्धीचे व्यवहार नित । भरोनि एकनिष्ठेचे पेटीत । ठेविले मजआत । जयाने गा; ॥४२४॥

शीघ्र तो होय धर्मात्मा शांति शाश्वत मेळवी
जाण निश्चित तू माझा भक्त नाश न पावतो ॥३१॥

तो कालांतरें मजसारिखा होईल । ऐसेही तव मनीं येईल । तर अगा, अमृताआत राहील । तया मरण कैचे? ॥४२५॥
सूर्य ज्यावेळी न उगवे । त्या वेळे की रात्र म्हणावे । तैसे माझिये भक्तीविण करावे । ते पापचि नव्हे का? ॥४२६॥
म्हणोनि तयाचिये चित्ता । माझी जवळीक असे पांडुसुता । तेव्हाचि तो तत्त्वता । स्वरूप हो माझे ॥४२७॥
जैसा दीपें दीप लावावा । आधीचा कोणता जाणावा? । तैसा सर्वस्वें जयाने मी भजावा । तो मीचि होऊनि ठाके ॥४२८॥
मग माझी नित्य शांती । तीचि दशा तया, तीचि कांती । किंबहुना ते जगती । माझेच जिवें ॥४२९॥
येथ तेचि ते वारंवार । सांगू किती खरोखर? । जर मज इच्छिसी तर । भक्तीसी न विसंबावे ॥४३०॥
नलगे कुळाचे श्रेष्ठत्व अगा । अभिजाततेचा गर्व त्यागा । पांडित्याचा वावगा । सोस का वाहावा? ॥४३१॥
का रूपतारुण्यें माजा ? । संपन्नपणें का गाजा? । एक भाव चित्तीं न माझा । तर पाल्हाळ सर्व ॥४३२॥
दाण्याविण सोपट । कणिसे लागली घनदाट । काय करावे आटपाटा -। ओस नगर? ॥४३३॥
नातरि सरोवर आटले । रानीं दुःखिता दुःखी भेटले । वा वांझ फुलीं फुलले । झाड जैसे; ॥४३४॥
तैसे सकळ ते वैभव । आणि कुलजातिगौरव । जैसे शरीज आहे सावयव । परि जीवचि नाही ॥४३५॥
माझिये भक्तीविण । जळो ते जगलेपण । अगा, पृथ्वीवरी पाषाण । नसती काय? ॥४३६॥
काटेरी झाडाची दाटही सावली । सज्जनें जैसी टाळिली । तैसी पुण्ये डावलूनि गेली । अभक्ताने ॥४३७॥
कडुनिंब निंबोळ्यांनी बहरला । कावळ्यांसीचि सुकाळ जाहला । तैसा भक्तीहीन वाढया । पापाचिसाठी ॥४३८॥
वा षड्‍रस खापरीत वाढिले । चव्हाटयावरि रात्री ठेविले । ते कुत्र्यास्तवचि जाहले । ज्यापरी गा; ॥४३९॥
तैसे भक्तीहीनाचे जगणे । तो स्वप्नींही सुकृत न जाणे । संसारदुःखा आमंत्रणे । दिधली तयाने ॥४४०॥
म्हणोनि कुळ नसेना उत्तम । जातीनेही असो अधम । वरि देहाचे नांव जन्म । भले पशुचाही दिसो ॥४४१॥
पहा मगरें गजेंद्रा ध्ररिले । तयें काकुळतीने मज स्मरले । ययाचे पशुत्व आड व आले । पावण्या मज: ॥४४२॥

धरूनि आसरा माझा भोळे स्त्री - वैश्य - शूद्रहि
की पापयोनि जे जीव तेहि मोक्षास पावती ॥३२॥

अगा नावे घेताही अनिष्ट । जेथ अवघ्या अधम योनींचा शेवट । अर्जुना, त्या पापयोनीत दुष्ट । जन्मले जे; ॥४४३॥
ते सर्वथा मूढ । मूर्ख ऐसे जे दगड । परि माझेठायी दृढ । सर्वभावें ॥४४४॥
जयांचे वाचेत माझे आलाप । दृष्टी भोगी माझेचि रूप । जयांचे मन, संकल्प -। माझाचि वाहे; ॥४४५॥
माझिये कीर्तीविण । जयांचे रिते न श्रवण । जयां सर्वांगी भूषण । माझी सेवा ॥४४६॥
जयांचे ज्ञान जाणे न विषय । मजचि एका मानी जाणीव । हे लाभे तरचि सार्थक होय । एरवी जिणे मरणप्राय ॥४४७॥
ऐसा आघवाचि गा पांडवा । जयांनी आपुल्या सर्वभावां । जगण्यास्तव ओलावा । मजचि केला; ॥४४८॥
ते दुष्टयोनीतहि जन्मोत कोठे । वा पंडितही नसोत मोठे । परि मजहुनि उणे ना थिटे । तोलताही ॥४४९॥
पहा, भक्तीचे संपन्नपणें । दैत्यांनी देवां आणिले उणे । माझे नृसिंहत्व जाहले लेणे । जयाचे माहात्म्यें; ॥४५०॥
त्या प्रल्हादें मम प्राप्तीसाठी । बहु संकटे सोसली मोठी । म्हणोनि मी द्यावयाच्या गोष्टी । तयाचे स्तवनेंही लाभती ॥४५१॥
जी लाभली तया दैत्यकुळीं जन्मूनही । ती थोरवी न लाभे इंद्राही । म्हणोनि जाति न प्रमाण पाही । भक्तीचीच सरशी ॥४५२॥
राजाज्ञेची अक्षरे पुरी । वसती ज्या चर्मतुकडयावरी । तो दावुनी व्यवहारीं । मिळती सकळ वस्तू; ॥४५३॥
सोने रुपे प्रमाण न येठ । राजाज्ञाचि असे समर्थ । तो तुकडा एक लाभत । तर अवघे मिळे ॥४५४॥
तैसे उत्तमपण तरे -। जेव्हा सर्वज्ञता ठरे । तेव्हा मन-बुद्धी भरे । माझेचि प्रेमें ॥४५५॥
म्हणोनि कुळ जाति वर्ण । हे आघवेचि गा निष्कारण । येथ माझे अस्तित्व जाण । हेचि सार्थक ॥४५६॥
तेचि कोणतेही भावें । मन मजआत येते व्हावे । आले तर आघवे । मागिल जाय पुसुन ॥४५७॥
तोंवरिचि वहाळ ओहळ । जोवरि न न भेटे गंगाजळ । मग होऊनि राहती केवळ । गंगारूप ॥४५८॥
खैर, चंदन वा कोणेहि काष्ठ-। भिन्नत्वाची तोवरिचि गोष्ट । जोवरि न मिळती एकवट । अग्नीमाजी ॥४५९॥
तैसे क्षत्रिय, वैश्य, स्त्रिया, । वा शूद्र, हीन या -। जाति तोंवरचि वेगळाल्या । जोंवर न पावत मज ॥४६०॥
मग वृत्ती जेव्हा हो मद्रूप । जाति-व्यक्ती भेद नुरे आपोआप । सागरीं लवणकण अमाप । घातले जैसे ॥४६१॥
भिन्न नावें वाहत नदी - नद - । तोंवर पूर्व - पश्चिमवाही हे भेद । जोंवर न मिळती अगाध - । सागरामाजी ॥४६२॥
हेचि कोणतेही मिषें । चित्त मजठायी प्रवेशे । इतुके हो, मग सहजसे । मी होणे असे ॥४६३॥
परीस फोडावयालागी । घण पडे तयाचे अंगीं । परि त्या मेळाचे प्रसंगी । घणही सोनेचि होत ॥४६४॥
प्रेमाचे निमित्ताने । त्या गोपींची अंतःकरणे । मज मिळोनि मद्रूप होणे । घडलेच ना? ॥४६५॥
नातरि भयाचेचि मिषें खरोखर । येऊन मिळाला कंस असुर । वा अखंड धरुनि वैर । शिशुपाल आदिक मज ॥४६६॥
अगा, सोयरेपणेंचि पांडवा, । मी प्राप्त झालो यादवां । वा ममत्वें वसुदेवा -। आणिक सकळां ॥४६७॥
नारदा, ध्रुवा, अक्रूरासी । शुकमुनी, सनत्कुमारासी । भक्तियोगें मी यांसी । प्राप्य जैसा ॥४६८॥
तैसाचि गोपींसी कामें । त्या कंसा भयसंभ्रमें । इतरां घातक मनोधर्में -। शिशुपाल आदिकां ॥४६९॥
अगा, मि निर्वाणीचे स्थान । मजकडे यावे कोण्याही वाटेतून । विषय, वैराग्य, वैर पूर्ण -। अथवा भक्ती ॥४७०॥
म्हणोनि पार्था, पाही । प्रवेशावया माझे ठायी । उपायांची नाही । वाण येथ ॥४७१॥
आणि कोणत्याहि जातीत जन्मावे -। मग भजावे वा विरोधावे । परि भक्त वा वैरी व्हावे । माझेचि गा; ॥४७२॥
अगा, कोणे एके बोलें । मद्रूप जर जाहले । तर मी होणे आले -। हातीं निश्चित ॥४७३॥
यापरि पापयोनिहि अर्जुना, । वैश्य, शूद्र, अंगना; । मज भजता सदना -। माझिया येती ॥४७४॥

तेथे ब्रह्मर्षि राजर्षि ह्यांची गोष्ट कशास ती
भज तू मज आलास लोकी दु:खद नश्वर ॥३३॥

मग चतुर्वर्णामाजी छत्रचामर । स्वर्ग जयां वतन खरोखर । मंत्रविद्येसी माहेर । पंडित जे ॥४७५॥
अखंड यज्ञ वसती जेथ । जे वेदांचे चिलखत । आणि मंगल वाढत । जयांचे दिठीअंकीं ॥४७६॥
जे पृथ्वीतलावरील देव । जे तपोवतार सावयव । सकळ तीर्थांसी सुदैव । उदेले जे ॥४७७॥
जयांचे आस्थेचे ओलाव्यात । सत्कर्मवेल विस्तार पावत । सत्य संकल्पें जगत । जयांचिया; ॥४७८॥
जयांचे गा बोलें । अग्नीसी आयुष्य लाभले । समुद्रें प्रेमें जळ आपुले । दिधले वडवानला ॥४७९॥
मी लक्ष्मीसि सारिले दुरी । कंठींचा कौस्तुभ घेतला करी । जयांचे चरणरज लेइण्या उरीं - । उरींची खळगी केली पुढे ॥४८०॥
आजहि त्या पावलांची मुद्रा । मी ह्रदयीं वाहे गा वीरभद्रा । आपुलिया दैवसमुद्रा । जतन करावया; ॥४८१॥
जयांचा कोप काय जाण । काळाग्निरुद्राचे वसतिस्थान । जे होता प्रसन्न । विनायास लाभत सिद्धी; ॥४८२॥
ऐसे परमपूजनीय विद्वान । आणि माझेठायी अति निपुण । मज पावती, याचे समर्थन । वेगळे कशासी? ॥४८३॥
चंदनतरुची झुळुक सुगंधी । जवळीचे निंबा स्पर्शे कधी । तो निंबहि जाउनि बैसे आधी । देवाचे मस्तकी; ॥४८४॥
मग तो चंदनवृक्ष तेथ न पावे । ऐसे मनीं तरि कैसे धरावे? । अथवा पावला हे समर्थावे । तेव्हाचि साच काय? ॥४८५॥
निववील ऐशा आशेवर । अर्धा चंद्र शिवशंकर -। वाहती निरंतर । मस्तकावरी; ॥४८६॥
निवविता आणि सगळा । परिमळें चंद्राहुनी आगळा । मग चंदन कैसा न बसे, निर्मळा, । देवाचे सर्वांगीं सहजी? ॥४८७॥
रस्त्यातिल पाट जिला मिळाले । तर अनायासे समुद्र झाले । त्या गंगेसि समुद्राविण वेगळे । गत्यंतर काय? ॥४८८॥
राजर्षी वा पंडितां म्हणून । गतीमतीसी माझीचि राखण । तयां त्रिवार मीचि निर्वाण । स्थितीही मीचि ॥४८९॥
यालागी शिरुनि शतजर्जर नावेत । कैसे राहावे निवांत? । कैसे शस्त्रवर्षावात । असावे उघडे? ॥४९०॥
अंगावरि पाषाण पडेल । तरि का न धरावी ढाल? । रोगें ग्रासिल्या कैसे निभेल । औदासीन्य औषधाविषयीं ? ॥४९१॥
जेथ चहुकडे जळत वणवा । तेथुनि का न निघावे, पांडवा, ?। या लोकीं भोगुनि उपद्रवा । का न भजावे मज? ॥४९२॥
अगा, मज न भजावे ऐसे । कोणते बळ अंगीं दिसे । काय घरीं की भोगीं वसे । की यांनी निश्चिंत रहावे? ॥४९३॥
अथवा विद्या की तारुण्य ऐसा । या प्राण्यांसी निश्चितसा । मज न भजताही भरवसा । सुखाचा कोणता? ॥४९४॥
जितुके म्हणुनी भोग्यजात । ते एका देहाचे सुखालागत । येथ देह तर पडत । काळाचे तोंडीं ॥४९५॥
महादुःखाच्या गोणी सुटल्या । जेथ मरणाचे मापीं लोटल्या । त्या मृत्युलोकाचे बाजारीं शेवटल्या । येणे जाहले ॥४९६॥
आता सुखाचे जीवित । कैसे विकत घेशील येथ । काय राखाडी फुंकोनि लागत । दीप अर्जुना? ॥४९७॥
अगा विषाचे कांदे वाटून । जो रस घ्यावा पिळून । तया नाव अमृत ठेवून । जैसे अमर होणे; ॥४९८॥
तैसे विषयांचे जे सुख । ते केवळ परमदुःख । परि काय करावे मूर्ख । सेविल्याविण नच राहती ॥४९९॥
की शिर खांडोनि आपुले । पायीचे क्षतीं बांधावे । तैसे मृत्युलोकींचे आघवे । आहे चालले ॥५००॥
म्हणोनि मृत्युलोकीं सुखाची कहाणी । ऐकावी कवणे श्रवणीं । कैसी सुखनिद्ना अंथरुणीं । विस्तवाचिये? ॥५०१॥
ज्या लोकींचा चंद्र क्षयरोगी । जेथ सूर्योदय होय अस्तालागी । दुःख लेवुनि सुखाची आंगी । छळित जगा; ॥५०२॥
जेथ मंगल अंकुरत । तोंचि अमंगलाची कीड पडत । उदराचे परिसरात । मृत्यु गर्भा गिळी; ॥५०३॥
जे नाही तयाते चिंतवी । मिळे ते ने यमदूतांकरवी । गेल्याचा कोण्या गावीं । शोध न लागे; ॥५०४॥
अगा, अवघ्या वाटा शोधिता । परतले पाऊलचि नाही, पार्था, । सर्वत्र निमालियांच्याच कथा । हीचि पुराणे जेथली; ॥५०५॥
जेथिल अशाश्वततेची थोरवी । वानिली ब्रह्मदेवाचे आयुष्यभरही । तरी न सरेचि पाही । पंडुसुता; ॥५०६॥
ऐसी लोकीची ज्या नांदणूक । तेथ जन्मले असती जे लोक । तयांच्या निश्चिंततेचे कौतुक । वाटतसे मज ॥५०७॥
इह‌ - पर - लोकींचे लाभास्तव देख । भांडवल न सुटे कवडी एक । सर्वस्वें हानी तेथ कित्येक -। कोटी वेचिती गा ॥५०८॥
जो विषयविलासी गुंतला । तो म्हणती सुखात पडला । जो अभिलाषाभारें दडपला । तया ज्ञानी म्हणली ॥५०९॥
जयाचे आयुष्य थोडकं होय । बळ प्रज्ञा जिरोनि जाय । तयाचे नमस्कारिती पाय । वडिल म्हणोनि ॥५०१॥
जो जो बाळ वाढे वयाने । तो तो नाचति कोडकौतुकाने । आयुष्य आतुनी होय उणे । याची न खंत ॥५११॥
जन्मल्यावरी दिवसें दिवसें । काळाचाचि होऊ लागतसे । परि वाढदिवस करिती उल्हासें । उभारिती गुढया ॥५१२॥
अरे मर, हा बोल न साहली । आणि मेला तर रडती । परि आयुष्य सरे हे न गणती । मूर्खपणें ॥५१३॥
सर्प बेडुका उभा गिळित । तरि तो माशीस्तव जिभा वेटाळीत । तैसे प्राणी तृष्णा वाढवीत । कवणे लोभें? ॥५१४॥
अरेरे येथ अनिष्ट वसे । मृत्युलोकींचे सर्व उफराटे ऐसे । अर्जुना जरि दैववशें । जन्मलासी येथ; ॥५१५॥
तरि झडझडोनि आधी नीघ । भक्तीचिये वाटेसि लाग । जेणे पावसी अव्यंग । निजधाम माझे ॥५१६॥

प्रेमाने ध्यास घेऊनि यजी मज नमी मज
असे जोडूनि आत्म्यास मिळसी मज मत्पर ॥३४॥

तू मन हे मीचि करी । माझिये भजनीं प्रेम धरी । सर्वत्र नमस्कारी । मज एकाते ॥५१७॥

माझेचि अनुसंधानें । संकल्प निःशेष जाळणे । चोख मज भजणे-। याचेचि नाव ॥५१८॥

ऐसा मजयोगें संपन्न होसी । तेथ माझेचि स्वरूपा पावसी । हे अंतःकरणींचे तुजपाशी । बोलतसे ॥५१९॥

अवघ्यांसी चोरुनि आपुले । जे सर्वस्व आम्ही ठेविले । ते पावोनि सुख बहरले-। होईल तुज ॥५२०॥

ऐसे सावळा परब्रह्म । भक्तकामकल्पद्रुम । बोलिला आत्माराम- । संजय म्हणे- ॥५२१॥

“ अहो, ऐकतसा का? अवधारा येथ” । या बोलावर म्हातारा राहे निवांत । रेडा जणु बैसला पुरात-। तैसा उगाचि असे ॥५२२॥

तेथ संजयें माथा डोलाविला । अहा, अमृताचा पाऊस वर्षला । परि हा येथ असून गेला-। जणु शेजारिल गावा। ॥५२३॥

परि दाता हा आमुचा । म्हणून बोलता मळेल वाचा । काय करावे याचा । स्वभावचि ऐसा ॥५२४॥

परि थोर भाग्य माझे । युद्धवृत्तांत सांगण्याचे काजें । कैसे रक्षिले श्रीव्यासमुनिराजे । यांनी मज ॥५२५॥

इतुके हे अति सायासें । बोलतसे दृढ मानसें । तोंचि न धरवती ऐसे । अष्टसात्त्विक भाव दाटले ॥५२६॥

संकोचू लागे चित्त चकित । वाचा कुंठित जेथल्यातेथ । शरीरीं नखशिखांत । रोमांच आले ॥५२७॥

अर्धोन्मीलित डोळे । वर्षती आनंदजळें । आतल्या सुखोर्मींचे बळें । बाहेरी कापे ॥५२८॥

अवघ्या रोमारोमातून । आले निर्मळ स्वेदकण । लेईला मोत्यांचे प्रावरण । शोभे तैसा ॥५२९॥

ऐसी महासुखाचे अतिरसें । जिवाची आटणी होतसे । परि व्यासाज्ञा तैसे । होऊ न देई ॥५३०॥

आणि कृष्णार्जुनांचे बोलणे । धो धो करीत आले श्रवणें । की देहस्मृतीचा तेणें । वाफसा केला ॥५३१॥

तेव्हा नेत्रींचे जळ विसर्जी । सर्वांगीचा स्वेद परिमार्जी । तैसेचि, अवधारा म्हणे हो जी, । धृतराष्ट्राते ॥५३२॥

आता कृष्णवाक्यबीजे निवडक । आणि संजयाची भूमी सात्त्विक । श्रोत्यां सुकाळ होईल वेचक । प्रमेयपिकांचा ॥५३३॥

अहो, अल्पसे अवधान द्यावे । इतुक्यानेही  आनंदराशीवर बैसावे । धन्य श्रवणेंद्रिया दैवें । घातली माळ ॥५३४॥

म्हणोनि विभूतींचा ठाव । अर्जुना दाविल सिद्धांचा राव । ते ऐका म्हणे ज्ञानदेव । निवृत्तीचा ॥५३५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP