समओवी ज्ञानेश्वरी - अध्याय सहावा

ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी या तिन्ही ग्रंथांतून काव्य आणि तत्वज्ञान संत ज्ञानेश्वर आपल्या विलक्षण भाषासौंदर्याने मराठी माणसाला विस्तारून सांगतात.


मग धृतसाष्ट्रासी म्हणे संजय । ऐक तोचि अभिप्राय । कृष्ण सांगती जो काय । योगरूप ॥१॥
सहजे ब्रह्मरसाचे पारणे । केले अर्जुनास्तव नारायणें । की त्याचि समयीं पाहुणे । आलो आम्ही ॥२॥
कळेना कैसी देवाची थोरवी । तहानलेला पाणी सेवी । घोट घेऊनि चव पाही । तर अमृत असे; ॥३॥
तैसे आम्हातुम्हा जाहले । अकल्पित ब्रह्मज्ञान पावले । तेव्हा धृतराष्ट्रें संजया म्हटले, । हे न पुसत तुजसी ॥४॥
संजयासि या बोलें । राजाचे ह्रदय उमगले । जे अतिप्रेमें असे घेरिले । कौरवपुत्रांचे ॥५॥
हे जाणोनि मनीं हासला । म्हणे म्हातारा मोहें नाशला । एरवी कृष्णार्जुनसंवाद भला जाहला । अवसरीं या ॥६॥
परि यास काय त्याचे । जन्मांधा उजाडेल कैचे? । बोलावे तर संकट रोषाचे । म्हणोनि ध्याला ॥७॥
परि तो आपण आपुला । चित्तीं भला संतोषला । संवाद ऐकण्या लाभला । कृष्णार्जुनांचा ॥८॥
त्या आनंदाचे तृप्तीने । प्रफुल्लित अंत:करणें । आता होईल आदरें सांगणे । धृतराष्ट्रासी ॥९॥
सहावा अध्याय हा गीतेचा । प्रसंग असे चतुराईचा । जैसा क्षीरसमुद्रीं अमृताचा । लाभ जाहला ॥१०॥
तैसे गीतार्थाचे सार । विवेकसिंधूचे पैलतीर । अथवा योगवैभव भांडार । उघडले की ॥११॥
जे विश्रांतिस्थान आदिमायेचे । जेथ शब्द खुंटती वेदांचे । जेथुनि स्वरूप गीतावेलीचे । बहरतसे ॥१२॥
तो अध्याय हा सहावा । अलंकारुनिया बरवा - । सांगेन, म्हणोनि ऐकावा । चित्त देउनी ॥१३॥
माझा मराठीचि बोल कौतुके । परि अमृतातेही पैजा जिंके । ऐसी अक्षसे रसिके । मेळवीन; ॥१४॥
जयांचे कोवळिकेपुढे । सुरांचे रंग पडती तोकडे । आणि सुगंधाचा गर्व मोडे । जयांयोगे ॥१५॥
लोभावुनि शब्दां रसाळ । कानचि जिभा होतील । इंद्रिये कलह करितील । एकमेकांशी ॥१६॥
शब्द हा विषय श्रवणाचा । परि रसना म्हणे रस हा आमुचा । परिमल विषय जर घ्राणेंद्रियांचा । हा तोचि होईल ॥१७॥
नवल, ही बोलत्या रेखेची वाहणी । देखता डोळेहि समाधानी । ते म्हणती उघडल्या खाणी । रूपाच्या या ॥१८॥
जेथ संपूर्ण पद जुळेल । तेथ मनचि बाहेरी धावेल । बाहूही सरसावतील । आलिंगावया ॥१९॥
इंद्रिये झोंबती आपुलाल्या भावीं । परि तो समभावेंवि बुझावी । जैसा एकला जग जागवी । सहस्त्ररश्मी; ॥२०॥
तैसे शब्दांचे व्यापकपण । जाणावे असाधारण । भावार्थ जाणता दिसती गुण । चिंतामणी रत्नाचे ॥२१॥
हे असो, या शब्दांची ताटे भली । कैवल्यरस वाढलेली । ही मेजवानी मी केली । निष्काम जनांसी; ॥२२॥
आत्मज्योत नित्य नवी । तीचि समई तेवत ठेवी । जो इंद्रियां चोरुनि जेवी । तयासीचि लाभे; ॥२३॥
येथ सर्व श्रोत्यांनी । श्रवणाचे साह्य सोडुनी । मनानेंचि ही मेजवानी । उपभोगावी ॥२४॥
गवसणी शब्दांची फेडित । आतिल ब्रह्मांगा भिडत । मग सुखामाजी रंगत । सुखी व्हावे ॥२५॥
ऐसे हळुवारपण जर येईल । तरचि हे उपयोगी पडेल । एरवी अवघी गोष्ट होईल । मुक्याबहिर्‍याची ॥२६॥
परि ते असो आता आघवे । न लागे श्रोत्यांसी सांगावे । येथ तेचि अधिकारी जाणावे । जे स्वभावें निष्काम ॥२७॥
आत्मबोधाचे आवडीवरूनी । स्वर्ग - संसार टाकिती ओवाळुनी । यातिल गोडी तयांवाचुनी । जाणिती न कोणी ॥२८॥
कावळ न ओळखे चंद्रा । तैसे सामान्य न जाणे हा ग्रंथ पुरा । आणि तो चंद्र जैसे चकोरां । खाद्य असे; ॥२९॥
तैसा ज्ञानवंतां येथ ठाव । अज्ञजनां हे नवखे गाव । म्हणोनि बोलण्यात विशेषत्व । काही नसे; ॥३०॥
प्रसंगें गेलो बोलुनी । क्षमा करावी सज्जनांनी । आता निरूपिले जे श्रीकृष्णांनी । सांगतो ते ॥३१॥
ते बुद्धीसीही आकळण्या साकडे । शब्दीं क्वचितचि सापडे । परि ते निवृत्तिकृपादीपउजेडें । पाहीन मी ॥३२॥
जे न दिसे दृष्टीसीही । ते दृष्टीविण पाहता येई । जर अतींद्रिय प्राप्त होई । ज्ञानबळ ॥३३॥
जे न लाभे किमयेनेही । ते सोने मिळे लोहीं । जर दैवयोगें येई । परीस हाती; ॥३४॥
तैसी सद्‍गुरुकृपा लाभे जर । यत्नें काय ना प्राप्त तर । मजवर ती कृपा अपार । ज्ञानदेव म्हणे ॥३५॥
त्यायोगें मी बोलेन । बोलीं अरूपाचे रूप दावीन । अतींद्रिय तरी भोगवीन । इंद्रियांकरवी ॥३६॥
ऐका, यश लक्ष्मी औदार्य । ज्ञान वैराग्य ऐश्वर्य । हे साडी गुणवर्य । वसती जेथ; ॥३७॥
म्हणोनि जया भगवंत म्हणती । जो निःसंगाचा सांगाती । तो म्हणे पार्थाप्रती । चित्त देई आता ॥३८॥

श्रीभगवान्‍ म्हणाले:
फळीं आश्रय सोडूनि करी कर्तव्यकर्म जो
तो संन्यासी तसा योगी न जो निर्यज्ञ निष्क्रय ॥१॥

योगी आणि संन्यासी, जनीं - । एकचि ते, वेगळे न मानी । विचारात घेता दोन्ही । एकेचि तोलाचे ॥३९॥
दुज्या नावाचा सोडिला आभास । तर योग तोचि संन्यास । ब्रह्मस्वरूपीं पाहता दोहोंस । भेद नुरे ॥४०॥
जैसे नावाचे वेगळेपणें । एका व्यक्तीसी बोलावणे । अथवा दोन मार्गांनी जाणे । एकेचि ठायी ॥४१॥
पाणी एकचि स्वभावता । परि वेगवेगळ्या घटात भरता - । तैसी जाण भिन्नता । योग आणि संन्यासात ॥४२॥
ऐक, जगीं सकळसंमत । अर्जुना तोचि योगी दिसत । जो कर्मे करुनी आसक्त । नसेचि फळात ॥४३॥
जैसी पृथ्वी या वृक्षादिकांसी । अहंतेविण घाली जन्मासी । परि तयांचे फळांसी । अपेक्षीना; ॥४४॥
तैसे परंपरेचे आधाराने । वर्णाश्रमधर्मा अनुसरणे । जे ज्या समयीं करणे । प्राप्त असे; ॥४५॥
ते तैसेचि उचित करी । परि देहीं अहंकार न धरी । आणि बुद्धीही फळावरी । जावो न दे; ॥४६॥
ऐसा तोचि संन्यासी । पार्था, गा, परियेसी । तोचि भरवशानिशी । योगीश्वर ॥४७॥
उचित कर्म नैमित्तिक । त्यजुनि म्हणे ते बंधनकारक । तरी लगोलग आणिक एक । आरंभीचि तो ॥४८॥
जैसा धुवूनिया लेप एक । तात्काळ लावी आणिक । तैसाचि आग्रहाचा पाईक । कुचंबे व्यर्थ ॥४९॥
गृहस्थाश्रमाचे ओझे एक । कपाळीं आधीचि स्वाभाविक । त्यातचि संन्यासाश्रम आणिक । घेई शिरीं ॥५०॥
म्हणोनि अग्निसेवा न सोडित । कर्मरेखा न ओलांडिता । आहे योगसुख स्वभावता । आपुल्याचिपाशी ॥५१॥

संन्यास म्हणती ज्यास योग तो जाण पांडवा
सोडिल्याविण संकल्प कोणी योगी न होतसे ॥२॥

ऐक, संन्यासी तोचि योगी । ऐशा एकवाक्यतेची जगीं । गुढी उभारिली, अनेकांगीं - । शास्त्रांतुनी ॥५२॥
जेथ संन्यासिला संकल्प तुटे । तेथचि योगाचे सार भेटे । ऐसे हे अनुभवेंचि पटे । प्रमाण जया ॥५३॥

योगावरी चढू जाता कर्म साधन बोलिले
योगीं आरूढ तो होता शम साधन बोलिले ॥३॥

आता योगाचलाचा माथा । जर गाठावयाचा पार्था । तर सोपाना या कर्मपथा । नये चुकवू ॥५४॥
यमनियमांचे पायथ्याने निघे । योगासनांचे पाउलवाटेसी लागे । प्राणायामाचे कडयामार्गें । वरी येई ॥५५॥
इंद्रियनिग्रहाचा तुटका कडा । बुद्धीचेही पाया निसरडा । जेथ हठयोगीही धडाधडा । त्यजिती प्रतिज्ञा ॥५६॥
तरी अभ्यासाचे बळावर । चढती अधांतरी कडयावर । नखीचा घेत आधार । वैराग्याच्या ॥५७॥
वाहनातून प्राण-अपानाचे । पैस मार्गातून धारणेचे । शिखर लंघून ध्यानाचे । जात राही ॥५८॥
मग त्या मार्गाची धाव सरे । प्रवृत्तीची हाव नुरे । साध्य-साधन एकरूप पुरे - । समरसून ॥५९॥
जेथ वाट सरे पुढील । विसरे सारे मागील । ऐशा भूमिकेवरी नितळ । समाधिस्थ होई ॥६०॥
ऐसिये उपायें योगारूढ । पूर्णत्व पावे अखंड । त्या लक्षणांची करुनि निवड । सांगतो तुज, ऐक ॥६१॥

कर्मात जो अनासक्त विरक्त विषयीं असे
संकल्प तुटले तेव्हा तो योगारूढ बोलिला ॥४॥

जयाचे इंद्रियांचे घरात । विषयांच्या येरझारा न होत । जो आत्मबोधाचे तळघरात । पहुडला असे ॥६२॥
सुख-दुःखें अंगासी झटून । चेवत नाही जयाचे मन । इंद्रियविषयांचे न भान । जवळ असून; ॥६३॥
इंद्रिये कर्माचे ठायी - । लाविली, परि कधीही । फळहेतूची आस नाही । अंत:करणीं ॥६४॥
ऐसा जो असे देहधारी । जागृताऐसे व्यवहार करी । निद्रिताऐसा क्रियाशून्य दिसे परी । तोचि योगारूढ जाणावा ॥६५॥
तेथ अर्जुन म्हणे अनंता । हो विस्मय बहु ऐकता । सांग तया ऐसी योग्यता । कोण देई? ॥६६॥

उद्धरावा स्वयें आत्मा खचू देऊ नये कधी
आत्माचि आपुला बंधु आत्माचि रिपु आपुला ॥५॥

तेव्हा हासोनि म्हणे कृष्ण । नवलचि तुझे हे भाषण । कोणा काय देईल कोण । या अद्वैत स्थितीत? ॥६७॥
व्यामोहाचिये शय्येत । गाढ अज्ञानें निद्रिस्त । त्यावेळीं दुःस्वप्न हा भोगत । जन्म-मृत्यूचे ॥६८॥
मग अकस्मात होता जागृत । ते अवघेचि ठरे व्यर्थ । ऐसा सद्‍भाव उपजत । तोही आपुलेचि ठायी ॥६९॥
म्हणोनि आपणचि आपुला वाया । घात करितो धनंजया । देहाभिमाना मिथ्या । चित्त देऊनि ॥७०॥

जिंकूनि घेतला आत्मा बंधु तो होय आपुला
सोडिला तो जरी स्वैर शत्रुत्व करितो स्वयें ॥६॥

विचारें अहंकारा त्यजावे । मग अस्तित्वचि ब्रह्मरूप व्हावे । आपणचि सहज साधावे । आपुले कल्याण ॥७१॥
एरवी कोषकीटकापरी । तो आपणचि आपुला वैरी । जो लुब्ध होऊनि शरीरीं । विसरे आत्मस्वरूप ॥७२॥
कैसे लाभाचिये वेळे । करंटया आंधळेपणाचे डोहाळे । की असलेले आपुले डोळे । आपणचि झाकी ॥७३॥
कोणी एक भ्रमलेपणीं - । गेलो म्हणे मी हरवुनी । ऐसा लटिका छंद अंत: करणीं । घेऊनि बसे ॥७४॥
एरवी तो तोचि आहे । बुद्धि न वळे, काय करावे । जैसे स्वप्नींचे घावें । मरे का कोणी? ॥७५॥
जैसी पोपटाचे भारें । दांडी उलटी फिरे । त्याने उडावे, परि न सरे । मनींची शंका; ॥७६॥
व्यर्थचि मान मुरडी । रोधुनि छाती आखडी । पावलात दांडी । धरूनी ठेवी; ॥७७॥
म्हणे, जखडलो मी पुरा । भावनेच्या खोडयात अडके खरा । मोकळा पाय घाबरा । गुंतवी अधिकचि; ॥७८॥
ऐसा अकारण जखडला । सांग, काय कोणी बांधिला? । दांडी न सोडी, जरि नेला - । तोडुनि अर्धा ॥७९॥
आपणचि आपुला शत्रू म्हणून । जो वाढवी हा देहाभिमान । दुसरा जो न धरी जाण । तोचि आत्मज्ञानी ॥८०॥

जितात्मा शांत जो झाला देखे ब्रह्मचि एकले
मानापमानीं शीतोष्णीं सुखदुःखीं समावले ॥७॥

जयाने जिंकिले स्वमना । शांतवुनि सकळ वासना । परमात्मा तया कोणा । दूरस्थ नसे ॥८१॥
जैसे हिणकस तावता दोष जाय । तेचि शुद्ध सोने होय । तैसे अहंकार लोपुनि, ब्रह्मत्व - । प्राप्त जीवा ॥८२॥
घट फुटता, निराकार पोकळीसी - । मिळण्यास आकाशासी । जावे न लागे दुज्या स्थानासी । अन्य कोठे; ॥८३॥
मिथ्या अहंकार तैसा येथ । समूळ जयाचा नष्ट होत । तो आधीचि ओतप्रोत । परमात्मा असे ॥८४॥
आता शीतोष्ण हे प्रकार । वा सुखदुःखाचा विचार । मानापमानाचे आवडंबर । असंभव ॥८५॥
ज्या वाटेने जाई सूर्य । तितुके विश्व तेजोमय । तैसे जया जे पावे श्रेय । ते तयाचेचि स्वरूप ॥८६॥
मेघातुनि सुटती धारा । त्या न रुतती सागरा । तैसे शुभाशुभ योगीश्वरा । नसती भिन्न ॥८७॥

तोषला ज्ञान-विज्ञानें स्थिर जिंकूनि इंद्रिये
तो योगी सम जो देखे सोने पाषाण मुत्तिका ॥८॥

जे अनुभवांनी समजले । ते जगत् मिथ्या उमगले । विचार करिता तयें जाणिले । आपणचि ते ज्ञान ॥८८॥
आता व्यापक की सीमित । हा ऊहापोह सहजी थोपत । जेथल्यातेथचि राहत । दुजेपणाविण ॥८९॥
ऐसा जरी देहधारी । तरि परब्रह्याशी बरोबरी । जयाने जिंकिली सारी । इंद्रिये आपुली ॥९०॥
सहजचि तो जितेंद्रिय । तोचि योगयुक्त होय । सान-थोर भेद काय । न जाणे कोणे काळीं ॥९१॥
सोन्याचा निखळ । मेरूऐसा ढिगोल । आणि मातीचे ढेकूळ । सारिखेचि तो मानी ॥९२॥
ज्यापुढे पृथ्वीचेहि न मोल । ऐसे रत्न अमोल । पाही पाषाण, रत्ने समतोल । निरिच्छ इतुका ॥९३॥

शत्रु मित्र उदासीन मध्यस्थ परका सखा
असो साधु असो पापी सम पाहे विशेष तो ॥९॥

तेथ शत्रू आणि मित्र । परका आणि सगोत्र । हा भेदभाव विचित्र । कल्पावा कैसा? ॥९४॥
बंधु कोण कैचा तयासी । कोण तयाविषयी द्वेषी । मीचि विश्व ऐसा जयासी । बोध जाहला ॥९५॥
मग तयाचिये दिठी । अधम - उत्तम असे का किरीटी? । काय दावी परिसाची कसोटी । अन्य अन्य कसीं सोने? ॥९६॥
तो जैसे चोखचि सोने करी । तैसी तयाची बुद्धि चराचरीं । समतेचा उदय करी । निरंतर ॥९७॥
प्राणिरूप अलंकार विश्वाचे । जरि विविध आकारांचे । घडिले एकेचि सोन्याचे । ब्रह्मरूप ॥९८॥
ऐसे जे उत्तम ज्ञान । ते जाहले जया पूर्ण । तया वरवरचे म्हणून । चकविती न आकार ॥९९॥
वस्त्र पाहता खोल दृष्टीं । दिसें तंतूंची सर्व सृष्टी । परि एके सुतावाचुनि गोष्टी । दुज्या नसती ॥१००॥
ऐशा अनुभवें हे गवसे । हे जया प्रतीत होतसे । तोचि समबुद्धी, ऐसे - । निश्चित जाण ॥१०१॥
प्रयागतीर्थ जया नाव । दर्शनेंचि गमे पूजनीय । जयाचे संगे ब्रह्मभाव । मोहग्रस्तांसीही ॥१०२॥
जयाचे शब्दावरि जगे धर्म । दिठीतुनि महासिद्धींचा जन्म । पहा, स्वर्गसुखादींसम । खेळ जया ॥१०३॥
सहजी चित्तीं स्मरता । देई आपुली योग्यता । हे असो, तया प्रशंसिता । कल्याण होई ॥१०४॥

साधकें चित्त बांधूनि इच्छा संग्रह सोडुनी
आत्म्यास नित्य जोडावे एकांतीं एकलेपणें ॥१०॥

पन्हा अस्तावेना ऐसे । जया उजाडले अद्वैतदिवसें । मग आपणातचि आपण असे । अखंडित ॥१०५॥
ऐशा दृष्टीने जो विवेकी । पार्था, तो एकाकी । अपरिग्रही तिन्ही लोकीं । तोचि म्हणुनी ॥१०६॥
ऐसिया सिद्धपुरुषाची लक्षणे । जी विशेष आवश्यक जाणणे । ती आपुलिया सर्वज्ञपणें । सांगती श्रीकृष्ण ॥१०७॥
तो ज्ञानियांचा बाप । देखणारांचे दिठीसी दीप । ज्या समर्थाचा संकल्प । विश्व रची ॥१०८॥
प्रणवाचिया पेठेसी । विणिले वेदरूप वस्त्रासी । ते तोकडे जयाचे यशासी । वेढाया न पुरे ॥१०९॥
जयाचे अंगींच्या तेजात । सूर्य-चंद्राचे व्यापार तेजीत । तयाविण जग हे प्रकाशित । कैसे होई? ॥११०॥
नाममाहाम्य जयाचे पाहून । गगनही दिसे सान । त्या भगवंताचे एकेक गुण । आकळशील कैसे? ॥१११॥
म्हणोनि पुरे हे वाखाणणे । श्रीकृष्णें कोणाची लक्षणे । कथिली काय मिषाने । समजेना ते ॥११२॥
द्वैतासी टाकी पुसून । ते जर उघड केले आत्मज्ञान । तर परमप्रिय अर्जुन । सोडील प्रीती ॥११३॥
म्हणोनि तैसे ते बोलणे - । नव्हे, आडपडदा लावणे । मन ठेविले वेगळेपणे । भोगावया स्नेहसुख ॥११४॥
जे अहंभावीं अडकून । मोक्षसुखास्तव होती दीण । तयांची दृष्टी जाण । लागेल तुझिया प्रेमा ॥११५॥
जर अहंभाव याचा लोपेल । हा माझ्यातचि समरसेल । तर मग काय होईल । मज एकल्याने? ॥११६॥
पाहताचि डोळे निवावे । की तोंड भरुनि बोलवे । कडकडुनि आलिंगावे । ऐसे कोण मग? ॥११७॥
आपुले मना सुखवीत । जीवीं मावेना ऐसे गुपित । एकवटे जर मजसी पार्थ । तर कोणा सांगावे? ॥११८॥
या काकुळतीने कृष्णाने । अन्य उपदेशाचे हातोटीने । आपुल्या मधुर बोलाने । मनें मना आलिंगिले ॥११९॥
ऐकण्या हे अवघड वाटत । तर जाण हा पार्थ साक्षात । कृष्णसुखाचीच मूर्त । ओतीव ऐशी ॥१२०॥
हे असो, वय होता शेवटी । एकचि जन्मा घाली वांझोटी । मग ती प्रेमाची पुतळी एकटी । नाचू लागे; ॥१२१॥
तैसेचि अनंताचे होते । हे बोलिलो नसतो येथे । जर दृष्टीस न पडते । अपार प्रेम तयाचे ॥१२२॥
पहा हे नवल, कैसे चोजले । काय उपदेश संग्रामवेळे । परि पुढे प्रेमाचे बाहुले । नाचत असे ॥१२३॥
आवडीस लाज असे का सांग । व्यसना कोठला शीणभाग । भुलवीना तर पिसे सांग । कायसे ते? ॥१२४॥
भावार्थ ऐसा एकूण । अर्जुन मैत्रीचे निधान । सुखें शृंगारिल्या मना दर्पण । कृष्णाचिया ॥१२५॥
ऐसा थोर पुण्यपवित्र । जगीं भक्तिबीजा सुक्षेत्र । अर्जुन कृष्णकृपेस पात्र । तो याचिलागी ॥१२६॥
आत्मनिवेदनभक्तीचे निकटची ती । जी आठवी सख्यभक्ती । पार्थ तेथलीचि अधिष्ठात्री । आसनस्थ देवता ॥१२७॥
जवळिकीचे स्वामीसि न वर्णावे । प्रेमळ भक्ताचेचि गुण गावे । इतुका अर्जुन स्वभावें । लाडका हरीचा ॥१२८॥
पहा जी अनुरागें भजत । प्रियोत्तम जिला मानीत । ती पतीहूनही वानली जात । पतिव्रता; ॥१२९॥
तैसे अर्जुनचि विशेष स्तवावा । ऐसे आवडले माझिजे जिवा । कारण त्रिभुवनाचे दैवा । तोचि एक पात्र ॥१३०॥
जयाचे प्रेमाआधीन । तो निर्गुण होई सगुण । आणि स्वतः जरि तो पूर्ण । जयास्तव उत्कंठित ॥१३१॥
श्रोते म्हणती, “ काय भाग्य । कैसे रंगलेले भाष्य । नादब्रह्यासि हे सौंदर्य । जिंकुनी आले ॥१३२॥
अहो नवल नव्हे का देशी - । भाषा मराठी बोलता ये ऐशी । अलंकार उमटती आकाशीं । साहित्यरंगाचे ॥१३३॥
ज्ञानचांदणें टिपुर रुपेरी । भावार्थ गारवा भरी । श्लोकार्थकमळे मनोहारी । सहज उमलती ॥१३४॥
निरिच्छाही इच्छा व्हावी । ऐसी मनोरथांची थोरवी । अंतरीं रंगूनि डोलवी । श्रोत्यांसी” ॥१३५॥
ते निवृत्तदासें जाणिले । मग अवधान द्यावे म्हटले । नवल, पांडवकुळीं उजाडले । कृष्णदिवसें ॥१३६॥
देवकीने उदरीं वाहिला । यशोदेने सायासेम वाढविला । तो शेवटी उपयोगासि आला । पांडवांसी ॥१३७॥
म्हणोनि बहु दिवस सेवावे । वा अवसर पाहुनि विनवावे । हे सायास तया सुदैवें । नाही पडले ॥१३८॥
“हे असो कथा सांग वेगीं ।” म्हणे, अर्जुनें करित सलगी । ही संतचिन्हे माझे अंगीं । नच वसती देवा ॥१३९॥
लक्षणांचे या काढिता सार । मी अपुराचि खरोखर । परि तुमचे बोलांनीचि थोर । होईन देवा ॥१४०॥
जर तुम्ही द्याल ध्यान । तर ब्रह्मही मी होईन । काय झाले, अभ्यासीन । सांगाल ते ॥१४१॥
न जाणे कोणाची कहाणी । ऐकोनि स्तवतसे अंत:करणीं । सिद्ध जो ऐसिया लक्षणीं । केवढी योग्यता तयाची ॥१४२॥
हे अंगीं माझे येईल ? । प्रभु, आपलेपणें कराल? । तेव्हा हासोनि कृष्ण कृपाळ । करू म्हणती ॥१४३॥
संतोषाची जोड न सबळ । तोवरिचि सुखाचा दुष्काळ । मग मानिता समाधान केवळ - । अपुरे न कोठे ॥१४४॥
सर्वेश्वराचा सेवक धनुर्धारी । जो ब्रह्महि होईल खरोखरी । तयाचे दैवसामर्थ्यें ऐशापरी । फलद्रूप होय श्रीकृष्ण ॥१४५॥
घेताहि जन्म कोटिकोटीसी । जो इंद्रादिकांहि महाग भेटीसी । तो आतुर किती बोलासी । पार्थाचिया ॥१४६॥
मग ऐका जे पांडवें - । म्हटले, ब्रह्म मी व्हावे । ते अशेषहि देवें । अवधारिले ॥१४७॥
तेव्हा मनीं ये भगवंतांचे । यासि डोहाळे ब्रह्मत्वाचे । तर बुद्धीचे उदरीं याचे । वसे वैराग्यगर्भ ॥१४८॥
एरवी दिवस तर अपुरे । परि वैराग्यवसंताचे बहरें । सोऽहं भावाचे मोहरें । लहडुनि आला ॥१४९॥
परब्रह्मप्राप्तिफळें फळता । ह्यासि वेळ न लागेल आता । हा होय विरक्त, ऐसा अनंता । भरवसा जाहला ॥१५०॥
म्हणे जे जे हा आचरील । ते ते आरंभीचि फळा येईल । म्हणोनि कथिलेला ना जाईल । अभ्यास वाया ॥१५१॥
श्रीहरी ऐसे विचारपूर्वक । म्हणाले त्यासमयी, ऐक - । अर्जुना, हा देख । राजमार्ग ॥१५२॥
प्रवृत्तितरुचे तळासी । निवृत्तिफळे कोटिकोटीसी । या मार्गाचे यात्री देखसी । महेश अजुनी ॥१५३॥
सत्वर आडवाट धरित । योगिवृंद मूर्ध्निआकाशीं निघत । तेथ अनुभवाचे पाउलीं रुळत । सुलभ मार्ग ॥१५४॥
आत्मबोधाचे सरळ पथीं । योगिवृंद धाव घेती । सकळ अज्ञानमार्गां अंतीं । सोडूनिया ॥१५५॥
महर्षी याचि मार्गें आले । साधकांचे सिद्ध जाहले । आत्मज्ञानी थोरावले । याचि पंथें ॥१५६॥
मार्ग हा पाहून । विसरे भूक तहान । दिवस-रात्रीचे न भान । वाटेवरी या ॥१५७॥
चालते पाऊल जेथ पडे । तेथ मोक्षाची खाण उघडे । भरकटला तरि जोडे । स्वर्गसुख ॥१५८॥
पूर्वदिशेने निघावे । पश्चिमेचे घरा यावे । निश्चलपणें चालावे । येथ धनुर्धरा ॥१५९॥
या पथें ज्या गावा जावे । ते गाव आपणचि व्हावे । हे काय तुज सांगावे? । जाणिसी तू सहज ॥१६०॥
तेव्हा अर्जुन म्हणे श्रीकृष्णासी । तेचि मग केव्हासी । उत्कंठासमुद्रातुनि काढा मजसी । बुडतो जी, मी ॥१६१॥
तेव्हा म्हणती श्रीकृष्ण । काय हे उतावळेपण । आम्ही सांगू आपणहोऊन । तर पुसिले तुवा ॥१६२॥

पवित्र स्थान पाहूनि घालावे स्थिर आसन
दर्भ चर्म वरी वस्त्र न घ्यावे उंच नीच ते ॥११॥

आता विशेष सविस्तर बोलावे । तर ते उपयोगा ये अनुभवें । प्रथम एक लागे पाहावे । ऐसे स्थान ॥१६३॥
जेथा समाधान भेटे । बैसता उठावे न वाटे । वैराग्य दुणवटे । देखता जे ॥१६४॥
संतांनी वसविले होय । संतोषा करी साह्य । देई मनासि उत्साह । धैर्याचा जे ॥१६५॥
अभ्यासचि स्वतःसि साधकांकडुनि करवी । अनुभव ह्रदयसखा होई । ऐसी रमणीयतेची थोरवी । अखंड जेथ ॥१६६॥
जेथूनि सहजी जाता । तपश्चर्येविषयी पार्था । पाखंडयांचेही मनीं आस्था । पूर्ण उपजे ॥१६७॥
सहजचि वाट चालत । येथ येई अवचित । तो असे जरि विषयासक्त । विसरे माघारी फिरणे ॥१६८।
जे न राहणार्‍यासि राहवी । भटकणार्‍यासि बैसवी । आणि थापटुनी जागवी । विरक्तीसी; ॥१६९॥
राज्य आपुले सोडावे । निवांत येथेचि राहावे । ऐसे शृंगारमग्नाही वाटावे । पाहताचि जे स्थान ॥१७०॥
जे ऐशापरी सुंदर । आणि तैसेचि अति पवित्र । जेथ पाहती नेत्र । साक्षात ब्रह्म ॥१७१॥
आणिकही एक पाहावे । जेथ साधकांनीचि बैसावे । आणि जनांचे पायरवें । वर्दळले नसावे ॥१७२॥
अमृताऐसी अवीट । गोड मुळासकट । असावी झाडे दाट । सदा फळती ॥१७३॥
पावलोपावली जळ । वर्षाकाळीही निर्मळ । ऐसे निर्झर पुष्कळ । सुलभ जेथ ॥१७४॥
हे ऊनही मवाळ । जाणवे परि शीतल । पवन अति निश्चिल । मंद झुळझुळे ॥१७५॥
बहुतकरुनी निःशब्द । शिरकू न शके श्वापद । राघू आणि भ्रमरसाद । तीही नसावी ॥१७६॥
जलप्रिय हंस । दोन चार सारस । कोकीळही आसपास । असावे कधी ॥१७७॥
निरंतर नाही । तरि आले गेले काही । असोत मोरही । ना नाही आमुची ॥१७८॥
परि अवश्य पांडवा । ऐसा ठाव जोडावा । तेथ निगूढ मठ असावा । वा शिवालय ॥१७९॥
दोन्हींमाजी जे आवडत । जे मानुनि घेई चित्त । बहुतकरुनि एकांतात । बैसावे गा ॥१८०॥
म्हणोनि तैसे ते जाणावे । मन स्थिरावेलसे । पहावे । स्थिर होय तर मांडावे । आसन ऐसे ॥१८१॥
वरी शुद्ध मृगाजिन । मध्ये धूतवस्त्र घालून । तळीं साग्र दर्भासन । मांडुनी बैसावे ॥१८२॥
कोवळे एकसरिसे । सहजी जुळतीलसे । भरगच्च दाट ऐसे । दर्भ साक्षेपें मांडावे ॥१८३॥
ते आसन उंच होईल । तर शरीर डळमळेल । अति सखल होईल । तर बाधतील भूमिदोष ॥१८४॥
म्हणोनि तैसे न करावे । समभावें अंथरावे । असो, किती हे वर्णावे? । असे असावे आसन ॥१८५॥

चित्तेंद्रियांचे व्यापार वारावे तेथ बैसुनी
आत्मशुद्‍ध्यर्थ जोडावा योग एकाग्र मानसें ॥१२॥

मग तेथ आपण । करुनि एकाग्र अंतःकरण । निर्मळ सद्‍गुरुस्मरण । अनुभवावे ॥१८६॥
त्या स्मरणाणे आदरें । अहंभावाचे काठिण्य विरे । सात्त्विकता भरे । अंतर्बाह्म ॥१८७॥
विषयांचा विसर पडे । इंद्रियांची रग मोडे । स्थिर घडी मनाची घडे । ह्रदयामाजी ॥१८८॥
ऐसे ऐक्य हे स्वभावें । लाभे तोवरि राहावे । मग त्याचि बोधें बैसावे । आसनावरी ॥१८९॥
आता अंग अंगासि सावरी । वायूचि वायूसि आवरी । अनुभव ऐसा त्या आसनावरी । येऊनि लागे ॥१९०॥
प्रवृत्ति माघारी फिरे । समाधि पैलतीरी उतरे । अवघा अभ्यास सरे । बैसताक्षणीं ॥१९१॥
मुद्रेची थोरवी ऐसी । तेचि सांगे, ऐकसी । मांडी पोटरीशी । जुळवुनि घालावी ॥१९२॥
चरणतळे वाकडी करून । आधारद्रुमतळीं जेथ शिवण । तेथ एकमेकां भिडवून । बळकट ठेवावी ॥१९३॥
उजवी टाच खाली घालुनी । ठेवावी शिवण दाबुनी । उजव्यावरी सहज मग बैसवुनी । डावे पाउल ॥१९४॥
गुदवृषणांमध्ये नेमकी । जागा जी चार अंगुळे की । दीड दीड अंगुळे तीपैकी । खाली-वर सोडुनी; ॥१९५॥
मध्ये राही एक अंगुळ । तेथ टाचेचे भागाने वरील । पेलूनिया सर्व तोल । अंग नेटाने रेटावे ॥१९६॥
उचलिलेहि न वाटावे । ऐसे कण्यासि उचलावे । दोन्ही घोटेही उचलुनि धरावे । त्याचिपरी ॥१९७॥
मग हा शरीरसंच पार्था, । उमगावे तू सर्वथा । खालील टाचेचा माथा । स्वयंभू होई ॥१९८॥
अर्जुना हे जाण । मूळबंधाचे लक्षण । वज्रासन ऐसे गौण । नाम यासी ॥१९९॥
ऐशा मूळबंध मुद्रेत । खालचा मार्ग बंद होत । आणि अपानवायू आत आत । संकोचू लागे ॥२००॥

शरीर समरेखेत राखावे स्थिर निश्चळ
दृष्टि ठेवूनि नासाग्रीं न पहावे कुणीकडे ॥१३॥

तेव्हा द्रोणाकार करांजुली । सहजी बैसे डाव्या पाउलीं । म्हणोनि दिसे उंचावली । खांद्यांची ठेवण ॥२०१॥
उंचावल्या दंडात । मस्तक बुडे आत । नेत्रद्वारींची कवाडे तेथ । लागो पाहती ॥२०२॥
वरच्या पापण्या ढळती । खालच्या खाली विकसती । तेथ अर्धोन्मीलित स्थिती । होई तयांची ॥२०३॥
दिठी राहोनि कडेसि एके । बाहेर पाऊल घाली कौतुकें । तेथचि स्थिर राही, देखे । नासाग्रावरी ॥२०४॥
ऐसी आतल्याआतचि राही । पुन्हा बाहेरी न येई । म्हणोनि अर्धीचि राहे पाही । दिठी तेथ ॥२०५॥
आता दिशा न्याहाळाव्या । की आठवावे रूपविषया । या इच्छा सरती आघव्या । आपोआप ॥२०६॥
तेथ कंठनाळ आटे । हनुवटी गळाघटित दाटे । आणि दृढावुनि थाटे । वक्षस्थळीं ॥२०७॥
मध्ये कंठमणी लोपुनि जाये । ऐसा जो बंध आहे । तया जालंधर म्हणावे । पंडुकुमरा ॥२०८॥
नाभी वरी पुष्ट होई । पोट खपाटीस जाई । आत प्रफुल्लित होई । ह्रदयकमळ ॥२०९॥
ऐसा लिंगमुळाचे वरील काठीं । आणि नाभिस्थानातळवटी । जो बंध पडे, किरीटी, । तो वोढियाणा ॥२१०॥

शांत निर्भय मच्चित ब्रह्मचर्यव्रतीं स्थिर
मन रोधूनि युक्तीने रहावे मत्परायण ॥१४॥

ऐसी देहाचे बाहेर । अभ्यासाची पडे पाखर । मग आत बळ मोडे सत्वर । मनोधर्मांचे ॥२११॥
कल्पना निमे । प्रवृत्ति शमे । अंग मन विरमे । आपोआप ॥२१२॥
क्षुधा काय जाहली । निद्रा कोठे गेली । ही आठवणही हरपली । नसे शुद्ध ॥२१३॥
जो मूळबंधें कोंडला । अपान माघारी फिरला । तो सहजचि वरि अडकला । फुगवटा धरी ॥२१४॥
क्षोभूनि तो माजे । कोंडल्या जागीं वाजे । मणिपूरचक्राशी झुंजे । देई धडका ॥२१५॥
वावटळ ती बावत्तर । ढवळी  देहाचे घर । काढी खळमळ बाहेर । बाळपणापासूनिचा ॥२१६॥
अपान आत न समावत । कोठयामाजी संचरत । थारा न उरू देत । कफपित्तासी ॥२१७॥
सप्तधातूंचे समुद्र ओलांडी । मेदाचे पर्वत फोडी । आतली मज्जा काढी । अस्थिगत ॥२१८॥
नाडया करी शिथिल । अवयव करी सैल । साधका भेडसावील । परि ना भ्यावे ॥२१९॥
तो व्याधी दाखवी । लगोलग परिहार करवी । पाण्याचे - पृथ्वीचे कालवी । अंश एकत्र ॥२२०॥
तर दुसरीकडे धनुर्धरा । वज्रासनाचा उबारा । जागवी शक्तीसी जरा । कुंडलिनीचे ॥२२१॥
नागाचे तान्हुले । कुंकवाने नाहले । घालुनिया वेटोळे । निजे जैसे; ॥२२२॥
तैसी ती कुंडलिनी । नेटक्या साडेतीन वेढयांनी । अधोमुख सर्पिणी । निजली असे ॥२२३॥
की विद्युल्लतेचे कंकणचि एक । वा अग्निज्वालेची घडी देख । की घोटीस सोन्याची चोख । वेढणी जैसी; ॥२२४॥
तैसी चपखल बैसली । नाभिस्कंदीं दाटली । वज्रासनें चिमटली । सावध होय ॥२२५॥
तेथ नक्षत्र जैसे तुटावे । की सुर्याचे आसन ढाळवे । वा तेजावे रुजावे । बीजांकुर ॥२२६॥
तैसी कुंडलिनी वेढे सोडित । अंगा अळेपिळे देत । नाभिस्कंदीं उभी राहत । उठली दिसे ॥२२७॥
बहु दिवसांची चेते भूक । त्यात डिवचल्याने निमित्त एक । मग आवेशें पसरी मुख । सरळ वरी ॥२२८॥
तेथ ह्रदयकमळाचे तळीं । जी वायुभरली पोकळी । त्या सगळ्याते कवटाळी । खाऊनि टाकी ॥२२९॥
ज्वाळांनी मुखींचिया । खालवरी कवळुनिया । खाऊ लागे तोडूनिया । लचके मांसाचे ॥२३०॥
मांस असे ज्या ज्या ठायी । तेथ आयताचि मिळे घासही । एक दोन ग्रास ह्रदयाचेही - । भरी मग ॥२३१॥
तळवे तळहात शोधी । वरचे भागहि भेदी । सांधा सांधा छेदी । झाडुनि अंगप्रत्यंग ॥२३२॥
अधोभागहि न सोडी । नखातलेही सत्त्व काढी । त्वचा धुवूनि जोडी । अस्थिपिंजर्‍यासी ॥२३३॥
अस्थींचे नळे निरपे । शिरांच्या काडया ओरपे । केशमूळांची करपे । वाढे तेव्हा ॥२३४॥
मग सप्तधातूंचे सागरीं । तहानलेली घोट भरी । आणि सर्वचि उन्हाळा करी । खडखडीत ॥२३५॥
नाकपुडयातुनि वाहे वारा । मोजुनि अंगुळे बारा । तो गच्च धरुनि माघारा - । आत घाली ॥२३६॥
खालचा अपान वर आकुंचे । वरचा प्राणवायू तळी खेचे । या भेटीत षड्‍चक्रांचे । पदर उरती ॥२३७॥
दोन्ही तेव्हाचि एकवटत । परि कुंडलिनी क्षणभर दुश्चित । तुम्हीचि काय ते राहिलात । म्हणे ती तयां ॥२३८॥
पृथ्वीचे धातू सर्वही । फस्त करी, नुरवी काही । पाण्याचे तर नावही । ठेवीना कोठे ॥२३९॥
पृथ्वी, आप, दोन्ही खाय । पूर्ण तृप्त ती होय । मग होउनिया सौम्य । राही सुषुम्नेपाशी ॥२४०॥
तेथ तृप्तीचे संतोषें । गरळ ओके जे मुखें । त्या गरळातिल अमृतलेशें । जगे प्राणवायू ॥२४१॥
तो गरळातून निघे । परि सबाह्य निववूचि लागे । त्यावेळी सामर्थ्य होय जागे । हरपले पूर्वीचे ॥२४२॥
वाहणे थांबे नाडीचे । तैसे नवविध वायूंचे । म्हणोनि धर्म शरीराचे । नच उरती ॥२४३॥
इडा, पिंगळा एकवटती । गाठी तिन्ही सुटती । साही पदर फुटती । चक्रांचे हे ॥२४४॥
डाव्या-उजव्या नाकपुडयात । चंद्र, सूर्य हे वायू कल्पित । शोधू जाता न दिसत । सूत धरूनही नाकीं ॥२४५॥
बुद्धीचे स्फुरण नुरे । परिमल घ्राणेंद्रियीं जो उरे । कुंडलिनीसह तोही शिरे । सुषुम्नेत ॥२४६॥
तों हलकेचि वरच्या बाजूचे । तळे चंद्रामृताचे । कलते होउनी कुंडलिनीचे । मुखीं पडे ॥२४७॥
तेणें कुंडलिनीत रस भरे । तो सर्वांगात संचरे । जेथल्या तेथेचि मुरे । प्राणवायू ॥२४८॥
तापल्या मुशीतून । निघोनि जाय मेण । मग ओतल्या रसें भरून । राहे जैसी; ॥२४९॥
तैसे शरीराचे आकारें । तेजचि की अवतरे । वरि त्वचेचिये पदरे । पांघरिले असे ॥२५०॥
जैसे अभ्राचे अवगुंठन । वेढी सूर्यनारायण । मग फेडुनि दीप्तिमान । होई पुन्हा ॥२५१॥
तैसा वरवरचा कोरडा । त्वचेचा असे पोपडा । तो झडोनि जाय कोंडा । जैसा की ॥२५२॥
मग स्वयंभू स्फटिक सुंदर । की रत्नबीजा फुटले अंकुर । ऐसी अवयवकांतीची मनोहर । शोभा दिसे ॥२५३॥
अथवा संधिप्रकाशाचे रंग  - । काढुनी, घडविले ते अंग । की आत्मचैतन्यतेजाचे लिंग । पवित्रसे ॥२५४॥
केशरें ओतप्रोत । अमृतें ओसंडत । मज वाटे साक्षात । शांतीचि ते ॥२५५॥
ते आनंदचित्रींचे रंगलेप । अथवा ब्रह्मसुखाचे रूप । की संतोषतरूचे रोप । बहरलेले ॥२५६॥
तो सोनचाफ्याचा कळा । की अमृताचा पुतळा । अथवा बहरला । मळ । कोवळिकेचा ॥२५७॥
शरदऋतूने ओलावले । जणु चंद्रबिंब पालवले । की मूर्मिमंत तेजचि बैसले । आसनावरी ॥२५८॥
कुंडलिनी पिते चंद्रामृत । त्यावेळी शरीर ऐसे होत । मग त्या देहाकृतीने भयभीत । कृतांत काळही ॥२५९॥
वार्धक्य मागे फिरे । तारुण्याची नव्हाळी नुरे । लोपलेली अंकुरे । बाळदशा ॥२६०॥
वय जरी गमे सान । पराक्रम बलवानाऐसा महान । धैर्याची थोरवी परिपूर्ण । निरुपम ॥२६१॥
कनकद्रुमाची पालवी । की रत्नकलिका नित्य नवी । नखे तैसी बरवी । नवी निघती ॥२६२॥
दातही येती नवीन । परि ते अपूर्वसे सान । जैसे दुतर्फा ओळींतून । जडवावे हिरे ॥२६३॥
माणिकांचे कण साच । झळकले जणु सहजच । तैसे सर्वांगीं रोमांच । उभे राहिले ॥२६४॥
आणि करचरणतळ । जैसे की लाल कमळ । डोळे होती सुनिर्मळ । किती सांगावे? ॥२६५॥
उतटे परिपक्व होऊन । मोती न राहे समावून । मग उकले जैसी शिवण । शिंपलीची; ॥२६६॥
तैसी पापण्यात न समावे । दिठी बाहेरी निघो पाहे । ती, तीचि, परि घालो जाये । गवसणी गगना ॥२६७॥
शरीर होय सोन्याचे । परि हलकेपण ये वायूचे । तेथ पाण्याचे, पृथ्वीचे । अंश नसती ॥२६८॥
मग समुद्रापार देखे । स्वर्तींचा नाद ऐके । मनोगत ओळखे । मुंगीचेही ॥२६९॥
वार्‍यावर स्वार होय वेगें । चाले, परि पाण्या पाय न लागे । प्राप्त होती ऐशा प्रसंगे । बहुत सिद्धी तया ॥२७०॥
सुषुम्नेचा धरुनि हात । गगनाची पायरी उतरत । जी आली ह्रदयांत । सुषुम्नेचे सोपानायोगें; ॥२७१॥
ती कुंडलिनी जगदंबा । चैतन्यचक्रवर्तीची शोभा । जिने विश्वबीजाचे कोंभा । साउली केली ॥२७२॥
पिंडी जी निराकार ब्रह्माची । जी शिवपरमात्म्याचे संपुष्टचि । जी उघड उघड प्राणाची । जन्मभूमी ॥२७३॥
हे असो, ही कुंडलिनी बाळी । ह्रदयाचे आत आली - । की अनाहत नादाची बोली । बोलू लागे ॥२७४॥
कुंडलिनीशक्तीचे निकटसे । बुद्धीचे चैतन्य वसे । त्यासी किंचित् ऐकू येतसे । तो अनाहत नाद ॥२७५॥
घोषाचिया कुंडात । नादचित्रांची रुपडी उमटत । ॐ काराचिया आकारात । रेखिली ऐसी ॥२७६॥
हे कल्पावे तर कळावे । परि कल्पिणारे कोठुनि आणावे? । काय गाजे कैसे जाणावे? । तिचे ठायी ॥२७७॥
अर्जुना, होतो विसरत । जोवरि प्राणवायू न नाशत । तोंवरि ह्रदयाकाशात । तो नाद घुमे ॥२७८॥
या अनाहताचे मेघें । आकाश दुमदुमू लागे । तेव्हा ब्रह्मस्थानींचे द्वार वेगें । उघडे सहजी ॥२७९॥
कमळातील पोकळीपरी । पोकळी जी ह्रदयाकाशाचे अंतरीं । तेथ चैतन्य वास करी । अतृप्त ऐसे ॥२८०॥
त्या ह्रदयाकाशाचे अंतरीं । कुंडलिनी परमेश्वरी । तेजाची शिदोरी । अर्पितसे चैतन्या ॥२८१॥
बुद्धीचे कालवणासहित । जेथ द्वैताचे नाव नुरत । ऐस नैवेद्या वाढुनि ताटात । अर्पण करी ॥२८२॥
ऐसी निजकांती हरपली । मग प्राणचि केवल जाहली । त्यावेळी कैशी गमली । म्हणशील तू? ॥२८३॥
जणु पवनाची पुतळी । वस्त्रे जरतारी लेईलेली । फेडूनिया वेगळी । ठेविली तिने ॥२८४॥
किंवा वार्‍याशी झगडली । दीपज्योत निमाली । की लखलखोनि हरपली । वीज गगनीं ॥२८५॥
तैसी ह्रदयकमळावरी । दिसे सोनियाची सरी । वा प्रकाशजळाची झरी । वाहत आली ॥२८६॥
मग त्या ह्रदयपोकळीत । जिरूनि अदृश्य होत । तैसे शक्तीचे रुप मावळत । शक्तीचिमाजी ॥२८७॥
तेव्हा जरी शक्ती म्हणती । एरवी तो प्राणवायू जाणती । आता नाद, बिंदू, कला, ज्योती, । हे चारीही नसती ॥२८८॥
मनोनिग्रह करणे । की प्राणवायूसी कोंडणे । अथवा ध्यान करणे । काही नुरे ॥२८९॥
धरसोड कल्पनांची । ती नाही येथ कधीचि । पंचमहाभूते आटविण्याची । मूसचि ही केवळ ॥२९०॥
पिडें पिंडा ग्रासावे । हे आदिनाथांचे मर्म समजावे । ते येथ दाविले जाणावे । महाविष्णूंनी ॥२९१॥
या गुढार्थाचे बासन सोडुनी । यथार्थाची घडी उलगडूनी । पसरिली मी तुम्हा जाणुनी । ग्राहक श्रोते ॥२९२॥

असे आत्म्यास जोडुनि योगी आवरिला मनें
मोक्षास भिडली शांति माझ्या ठाईचि मेळवी ॥१५॥

ऐक, शक्तीचे तेज लोपत । तेव्हा देह सूक्ष्म होत । तो डोळ्यांसी न दिसत । जगाचिये ॥२९३॥
एरवी पूर्वीचाचि असे । सावयवचि दिसे । परि वायूचेचि जैसे । घडिले होय शरीर ॥२९४॥
अथवा केळीचा गाभा । सोपट गळूनि उभा । की अवयवचि नभा । फुटला असे ॥२९५॥
तैसे होय शरीर । करी गगनीं संचार । घडवीत चमत्कार । शारीर जगीं ॥२९६॥
पहा, साधक निघोनि जाई । मागे पावलांची ओळ राही । तेथ वसत ठायी ठायी । अष्टसिद्धी ॥२९७॥
परि सिद्धींचे काय आपणा? । ऐक गा हे अर्जुना । देहीचे देहींचि लोप होय ना । तिन्ही भूतांचा? ॥२९८॥
पृथ्वीसी आप विरवी । आपासी तेज जिरवी । तेजासी वायू नाशवी । ह्रदयामाजी ॥२९९॥
मागे वायू एकला उरे । परि शरीराचेचि आकारें । मग तोही कालांतरें । गगना मिळे ॥३००॥
त्यावेळी कुंडलिनी ही भाष जाई । मारुत ऐसे नाव होई । परि शक्तीपण ते राही । जोवरी न मिळे शिवासी ॥३०१॥
मग जालंधर बंध सोडी । शक्ती कंठस्थान फोडी । ब्रह्मरंध्रनभाचे पहाडीं । प्रविष्ट होई ॥३०२॥
ॐ काराचे पाठीवरी । पाय देत झडकरी । पश्यंतीवाणीची पायरी । मागे टाकी ॥३०३॥
पुढे ॐकारचिया मात्रा । मिळती मूर्ध्निआकाशअंतरा । जैशा नद्या सागरा । मिळताती ॥३०४॥
मग ब्रह्मरंध्रीं स्थिरावुनी । सोऽहंभावाचे बाहु पसरुनि । परमात्मलिंगीं धावोनि । एकवटे ॥३०५॥
महाभूतांचा पडदा सरून । शिव-शक्तीचे होई मीलन । तेथ गगनासह मिळून । ब्रह्मानंदीं ॥३०६॥
मेघांचे मुखातुनी निघाला । समुद्र नदीचे ओघीं पडला । तो मागुता जैसा मिळाला । आपणचि आपणा ॥३०७॥
तैसा देहाचे मिषें । परमेश परमेशात प्रवेशे । ते एकत्व होय तैसे । पंडुकुमरा ॥३०८॥
आता दुजेपण होते । की एकत्वचि ते असते । ऐशा विवंचनेहिपुरते । उरेचिना ॥३०९॥
गगनीं गगन लया जाई । ऐसे होय जे काही । ते अनुभवें जो होई । तोचि सिद्ध ॥३१०॥
म्हणोनि तेथला वृत्तांत । न पावेचि शब्दाचा हात । जेणे संवादाचे गावात । प्रवेश करावा ॥३११॥
पहा, एरवी तरी । या वर्णनाचा गर्व धरी । ती वाचा तर दुरी । राहिली गा ॥३१२॥
भ्रूलतेमागे । आज्ञाचक्रात । मकाराचे रूपचि मोडत । परि सडया प्राणवायूसी पडत - । संकट गगना येता ॥३१३॥
मग तेथाचि तो मिसळला । तेव्हा शब्दांचा दिवस मावळता । त्याहिवरी लोप जाहला । आकाशाचा ॥३१४॥
आता परब्रह्माचे डोहीं । गगनाचाचि ठाव नाही । तेथ शब्दांचा वेळू, पाही - । काय ढकली नाव? ॥३१५॥
म्हणोनि शब्दामाजी गवसावे । की श्रवणीं लाभावे । ऐसे हे नव्हे - । त्रिवार सत्य गा ॥३१६॥
सुदैवें ज्या समयीं । अनुभवा ते प्राप्त होई । त्यावेळी तद्रूप होउनि राही । अनुभविणारा ॥३१७॥
पुढती जाणणे ते नुरेचि । म्हणोनि असो किती हेचि । बोलावे आता व्यर्थचि । धनुर्धरा ? ॥३१८॥
ऐसे शब्दजात माघारे फिरे । तेथ संकल्पाचे आयुष्य सरे । वाराहि जेथ न शिरे । विचारांचा ॥३१९॥
जे उन्मनी स्थितीचे लावण्य । समाधिअवस्थचे तारुण्य । अनादि जे अगण्य । परमतत्त्व ॥३२०॥
जे आकारातीत । जे मोक्षस्थान निश्चित । जेथ आदि आणि अंत । विरोनि गेले ॥३२१॥
जे विश्वाचे मूळ । जे योगद्रुमाचे फळ । ए आनंदाचे केवळ । चैतन्य गा; ॥३२२॥
जे महाभूतांचे बीज । जे महातेजाचे तेज । तेचि पार्था समज । निजस्वरूप माझे ॥३२३॥
ते हे चतुर्भुज मूर्त झाले । अभिव्यक्तीने रूपा आले - । देखोनि नास्तिकांनी छळिले । भक्तवृंदा ॥३२४॥
हे महासुख वर्णनातीत । तेचि पुरुष पावत । जयांचे निर्धार स्थिर राहत । इच्छित प्राप्तीपावत ॥३२५॥
आम्ही साधन जे सांगितले । ते अंगी ज्यांनी बाणविले । ते शुद्ध होऊनि, जाहले - । आमुचेचि तोलाचे ॥३२६॥
देहाची घेऊनि मूस । ओतावा परब्रह्मरस । तैसी जाहली तेजस । अंगे तयांची ॥३२७॥
ही प्रतीती अंतरीं फाके । तर विश्वचि अवघे झाके । तेव्हा अर्जुन म्हणे सुखें । साचचि जी, हे ॥३२८॥
कारण देवा आपण । जो उपाय गेलात सांगून । तो ब्रह्मप्राप्तीचा म्हणून । ती प्राप्ती घडे ॥३२९॥
या योग्याभ्यासीं दृढ होती । ते निश्चित ब्रह्मत्वा पावती । हे सांगण्याचेचि रीती । कळले मज ॥३३०॥
देवा वर्णन ऐकता । बोध उपजे चित्ता । मग अनुभवें तल्लीनता । का न यावी? ॥३३१॥
म्हणोनि यात काही । संशया वाव नाही । परि क्षणभरि चित्त देई । बोला एका ॥३३२॥
तुम्ही कथिले जे योगसाधन । ते मना रुचले पूर्ण । परि करू न शके सामर्थ्याविण । योग्यतेचिया ॥३३३॥
अंगीं जितुकी योग्यता, पाही - । तितुक्यानेचि साध्य होई । तर सुखेनैव हाचि मार्गही । अभ्यासीन ॥३३४॥
अथवा देव जे सांगतील । ते मज न झेपेल । तर योग्यतेविण होईल । तेचि पुसू ॥३३५॥
ऐसा घेतला समज करून । म्हणोनि पुसावया झाले कारण । मग म्हणे, तर आपण । चित्त द्यावे ॥३३६॥
हां, अहो जी, अवधारिले । हे साधन तुम्ही निरूपिले । कोणीही त अभ्यासिले । तर येई का हाता? ॥३३७॥
की योग्यतेविण नसे । ऐसे काही येथ असे? । कृष्ण म्हणती, हे पुससी कैसे? । धनुर्धरा, ॥३३८॥
हा योगाभ्यास मोक्षदायी । परि आणिक जे साधारण काही । ते योग्यतेवाचूनि जाई । काय सिद्धीसी? ॥३३९॥
जी काय योग्यता म्हणून । ती ठरे कार्यसिद्धीवरून । जे करावे योग्य होऊन । ते आरंभीचि फळे ॥३४०॥
योग्यता म्हणजे काय । विकाऊ माल होय? । आणि योग्य पुरुषांची का अनन्य । खाण असे? ॥३४१॥
काहीसा जो विरक्त । देहधर्मा आवर घालित । तोचि नव्हे का व्यवस्थित । अधिकारी? ॥३४२॥
युक्तीयुक्तीने ऐसी । योग्यता लाभेल तुजसी । ऐसे तयाचे आशंकेसी । निवारिले देवें ॥३४३॥
मग म्हणे गा पार्था, । ती ही ऐशी व्यवस्था । अनियमितासि सर्वथा । योग्यता नाही ॥३४४॥

न योग फार खाऊनि किंवा खाणेचि सोडुनी
न फार झोप घेऊनि किंवा जागत बैसुनी ॥१६॥

जो जिव्हेचे अंकित । वा निद्रेसि जीव विकत । तो न म्हटला जात । अधिकारी येथ ॥३४५॥
किंवा हट्टाने बंधनात । भूक-तहान कोंडत । आहारा तोडत । मारुनि भूक; ॥३४६॥
निद्रेचे वाटे न जाई । हट्टाग्रहें नाचत राही । शरीरही कह्यात नाही । मग योग कोठला? ॥३४७॥
म्हणोनि विषय अति सेवावा । ऐसा विरुद्ध विचार न व्हावा । सर्वथा कोंडमारा अथवा । तोही नको ॥३४८॥

निजणे जागणे खाणे फिरणे आणि कार्यहि
मोजूनि करितो त्यास योग हा दुःखनाशन ॥१७॥

आहारा तर सेवावे । परि नियमनें मापावे । क्रियाजात आचरावे । त्याचिऐसे ॥३४९॥
मितबोलीं बोलावे । मितचालीं चालावे । निद्रेसीही मानावे । योग्य अवसरीं ॥३५०॥
लागे जरि जागावे । तरि ते सीमित व्हाबे । एवढयानेहि समतोल राहे । कफवातादि धातूंचा ॥३५१॥
ऐसे करुनी नियमन । जर इंद्रियां पुरविले अन्न । तर वाढवी मन । संतोषासी ॥३५२॥

संपूर्ण नेमिले चित्त आत्मरूपीचि रंगला
निमाली नासना तेव्हा योगी तो युक्त बोलिला ॥१८॥

बाहेरी नियमनाचे वळण पडे । तेव्हा अंतरीं सुख वाढे । तेथ सहजचि योग घडे । न अभ्यासिता ॥३५३॥
जैसे भाग्याचे बहराने । आणि उद्यमाचे निमित्ताने । समृद्धिजात सहजपणें । घरीं चालत येई; ॥३५४॥
तैसा राही नियमित । आणि सहजी योगाभ्यासी वळत । तयाचा अनुभव परिपक्व होत । आत्मसिद्धीचे रूपें ॥३५५॥
म्हणोनि युक्ती ही अर्जुना । साधली ज्या दैववाना । तो मोक्षाचे सिंहासना । भूषवीतसे ॥३५६॥

निर्वातीं ठेविला दीप तेवतो एकसारखा
तसे आत्मानुसंधानीं योग्याचे चित्त वर्णिती ॥१९॥

नियम, योग, एकत्रित - । ऐसे बरवे प्रयागतीर्थ । तेथ स्थिरावे ज्याचे चित्त । क्षेत्रसंन्यास करुनी ॥३५७॥
तयासीचि योगयुक्त म्हण । तैसेचि आणिक जाण । दिव्यापरि असे तयाचे मन । निवार्‍यातील ॥३५८॥
जाणोनि तुझे मनोगत । काही एक आम्ही सांगत । ते नीट देउनी चित्त । परिसावे गा ॥३५९॥
योगप्राप्तीची इच्छा करिसी । परि अभ्यासीं दक्ष नससी । तर सांग काय घाबरसी । कठिणपणासी? ॥३६०॥
परि पार्था, सायासाचे व्यर्थ । भय धरिसी मनात । ही दुर्जन इंद्रिये करितत । बागुलबुवा अभ्यासाचा ॥३६१॥
पहा, जे आयुष्य अढळ करी । सरते जीवित सावरी । त्या औषधासि वैरी । काय जिव्हा न म्हणे? ॥३६२॥
ऐसे आपुले हित ज्यात । ते सदाचि इंद्रियां दुःख देत । एरवी योगासारिखे सोपे येथ । काय आहे? ॥३६३॥

निरोधें जेथ चित्ताचा सर्व संचार संपला
जेथ भेटूनि आत्म्याते अंतरीं तोषला स्वयें ॥२०॥
भोगूनि इंद्रियातीत बुद्धिगम्य महासुख
न ढळेचि कधी जेथ तत्त्वापासूनि लेशहि ॥२१॥

आसनाचे दृढतेपासूनिया । भला अभ्यास गेलो सांगूनिया । तेणेंचि जाहला तर होईल या - । निग्रह इंद्रियांचा ॥३६४॥
या योगाने एरवीही । इंद्रियांचा निग्रह होई । तेव्हा चित्त भेटीसि येई । आत्मस्वरूपीं ॥३६५॥
परतोनि मागे येई । आपण आपणासि पाही । पाहताचि ओळखुनी घेई । म्हणे, तत्त्व ते मी ॥३६६॥
त्या ओळखीसरिसे । सुखाचिये साम्राज्यीं बैसे । मग चित्तपण समरसे । विरोनि जाय ॥३६७॥
यापरते आणिक नाही । जया इंद्रिये न जाणतीही । ते आपणचि आपुले ठायी । होऊनि ठाके ॥३६८॥

जया लाभापुढे लाभ दुसरा तुच्छ लेखितो
न चळे जेथ राहूनि दुःखभारेंहि दाटला ॥२२॥

मग मेरूहुनी थोर । कोसळो दुःखाचा डोंगर । द्डपील देहा तो भार । परि चित्त न दडपे ॥३६९॥
शरीर शस्त्रांनी तोडिले । वा आगीमाजी पडिले । तरि चित्त महासुखें पहुडले । जागे न होई ॥३७०॥
ऐसे आपणात निमग्न । मग देहा विचारी कोण? । अलौकिक सुख होऊन । सकळ विसरे ॥३७१॥

तयास म्हणती योग दुःखाचा जो वियोगचि
जोडावा निश्चयाने तो योग उत्साह राखुनी ॥२३॥

ज्या सुखाची लागता गोडी । मन वासनेचे स्मरणहि सोडी । संसाराचिये तोंडी । गुंतलेले ॥३७२॥
जे योगाचे सौभाग्य देख । संतोषाचे राज्य आणिक । ज्ञानाचा परिचय आवश्यक । जयालागी; ॥३७३॥
ते ब्रह्मसुख अभ्यासयोगें । मूर्तिमंत दिसू लागे । देखता तो सर्वांगें । तद्रूप होई ॥३७४॥

संकल्पीं उठिले सारे काम निःशेष सोडुनी
इंद्रिये ही मनानेचि ओढूनि विषयातुनी ॥२४॥

हा योग सोपा आचरण्यासी । जर वधूनिया कामासी । पुत्रशोक संकल्पासी । घडविला ॥३७५॥
वासना निमाल्याचे हा ऐके । नेमिल्या स्थितीत इंद्रिये देखे । तर ऊर फुटुनी मुके । जीवितासी ॥३७६॥
ऐसे वैराग्य जर लाभेल । तर संकल्पाची वारी सरेल । बुद्धी सुखाने नांदेल । धैर्याचे महालीं ॥३७७॥

धरूनि धीर बुद्धीने निवर्तावे हळू हळू
आत्म्यात मन रोवूनि काही चिंतू नये स्वयें ॥२५॥
फुटेल जेथजेथूनि मन चंचल अस्थिर
तेथतेथूनि बांधूनि लावावे आत्मचिंतनीं ॥२६॥

बुद्धि धैर्या करि आश्रयस्थान । तर अनुभवाचे वाटेने मन । हळू हळू चालवून । स्थापील आत्मभुवनीं ॥३७८॥
याही युक्तीने एके परी । ब्रह्मप्राप्ती होय, विचार करी । ही न साधे तरी । सोपी आणिक ऐक ॥३७९॥
आता नियमचि हा एकला । जिवेभावे करावा आपुला । की कृतनिश्चयाचे बोला । न उल्लंघावे ॥३८०॥
एवढयाने चित्त स्थिरावले । तर कामचि जाहले । न राही तर, मोकळे - । सोडावे खुशाल ॥३८१॥
मग मोकाट जेथ जाई । तेथूनि नियमचि घेउनि येई । ऐसा स्थैर्याचा होई । सराव तया ॥३८२॥

विकारांसह ते ज्याचे शमले मन निर्मळ
झाला ब्रह्मचि तो योगी पावला सुख उत्तम ॥२७॥

मग जाता काही काळ । स्थैर्याचा बैसूनि मेळ । मन आत्मस्वरूपाजवळ । येईल सहजी ॥३८३॥
मग मनचि आत्मस्वरूप होईल । तेथ अद्वैतीं द्वैत बुडेल । आणि ऐक्यतेजें उजळेल । त्रैलोक्य हे ॥३८४॥
आकाशीं दिसे दुसरे । ते अभ्र जेव्हा विरे । की गगनेंचि भरे । विश्व जैसे; ॥३८५॥
तैसे चित्त लया जाय । आणि चैतन्यचि आघवे होय । ऐसा प्राप्तीसी सुखोपाय । आहे या योगें ॥३८६॥

आत्म्यास नित्य जोडूनि ह्यापरी दोष जाळुनी
सुखेंचि भोगितो योगी ब्रह्मानंद अपार तो ॥२८॥

ही सोपी योगस्थिती । बहुत जन अनुभविती । वासना, ती संकल्पसंपत्ती । त्यागूनिया ॥३८७॥
त्या सुखाचे संगत । योगी आले परब्रह्माआत । लवण जैसे जळात । वेगळे न राही ॥३८८॥
तैसे होय त्या मेळीं । मग समरसतेचे राउळीं । महासुखाची दिवाळी । जगासह तया दिसे ॥३८९॥
ऐसे आपुले पायावरी - । चालणे आपुलेचि पाठीवरी - । हे तुज न ये तरी - । पार्था, आणिक ऐक ॥३९०॥

भूतात भरला आत्मा भूते आत्म्यात राहिली
योगाने जोडिला देखे हेचि सर्वत्र दर्शन ॥२९॥
मज सर्वात जो पाहे पाहे माझ्यात सर्वहि
त्याचा मी आणि तो माझा एकमेकांस अक्षय ॥३०॥

असे मी तर सकळ देहीं । तेथ अन्य विचार नाही । आणि तैसेचि माझे ठायी । सकळ असे ॥३९१॥
हे ऐसेचि एकवटले । परस्परात मिसळले बुद्धीने इतुके ग्रहण केले । ऐसे मात्र व्हावे ॥३९२॥
एरवी तरी धनंजया, । ऐक्यभाव एकवटुनिया । सर्वाभूतीं समान या । भजे मज; ॥३९३॥
प्राणिमात्रांतिल भेदांनी । द्वैत नसे अंत: करणीं । निखळ एकत्वचि माझे जाणी । सर्वत्र जो; ॥३९४॥
तो आणि मी एकचि असे । हे बोलणेही व्यर्थ दिसे । एरवी न बोलिले तरि सहजसे । मीचि तो आहे ॥३९५॥
दीपा आणि प्रकाशा । एकत्वाचा मान जैसा । तो माझेठायी तैसा । आणि मी तयामाजी ॥३९६॥
जैसा उदकाचे अस्तित्वें रस । वा गगनायोगें अवकाश । तैसा माझेचि रूपें रूपस । पुरुष तो गा ॥३९७॥

स्थिर होऊनि एकत्वीं सर्व भूतीं भजे मज
राहो कसाहि तो योगी माझ्यामध्येचि राहतो ॥३१॥

जो ऐक्याचिये दिठीने नित । सर्वत्र मजचि देखत । जैसा की वस्त्रात । तंतू एक; ॥३९८॥
वा अलंकाररूपें जरि बहुतसे । तरी सोने एकचि असे । ऐसी अचल होतसे । ऐक्यस्थिती जयाची; ॥३९९॥
वा वृक्षा पाने जितुकी आली । तितुकी रोपे नसती लाविली । ऐशा अद्वैतसूर्यें उजाडली । अज्ञानरात्र जयाची; ॥४००॥
तो पंचमहाभूतीं जरि सापडत । तरि सांग, कैसा अडके तेथ? । जो अनुभवसामर्ध्यें घडत । तुल्यबळ मजसी ॥४०१॥
माझा व्यापकपणा आघवा । गवसे तयाचे अनुभवा । म्हणोनि व्यापक न म्हणावा । जरि तो व्यापकचि ॥४०२॥
आता शरीरीं जरि असे । तरि शरीराचा तो नसे । हे शब्दांत अवघे कैसे । येई सांगता? ॥४०३॥

जो आत्मौपम्य-बुद्धीने सर्वत्र सम पाहतो
जसे सुख तसे दुःख तो योगी थोर मानिला ॥३२॥

म्हणोनि असो ते विशेष आता । आपणाचिसारिखे जो तत्त्ववेत्ता । देखे चराचर पार्था । अखंडित; ॥४०४॥
सुखदुःखादि वर्मे । वा शुभाशुभ कर्मे । द्वंद्वे ऐसी मनोधर्में । जो न जाणे ॥४०५॥
हे समविषम भाव । आणिकही विचित्र जे सर्व । ते मानी जणु अवयव । आपुलेचि जो; ॥४०६॥
हे एकेक काय सांगावे? । जया त्रैलोक्यचि आघवे - । मी, ऐसे स्वभावें । जाहले ज्ञान; ॥४०७॥
तयाहि देह असे निश्चित । लौकिकीं सुखी म्हणत । परि आम्हा होय प्रतीत । परब्रह्मचि तो ॥४०८॥
म्हणोनि आपुले ठायी विश्वा पहावे । वा आपणचि विश्व व्हावे । ऐशा समदृष्टीसी उपासावे । पांडवा तुवा ॥४०९॥
हे तुज बहुत प्रसंगीं । सांगितले याचिलागी । की समदृष्टीहुनि जगीं । आणिक लाभ नाही ॥४१०॥

अर्जुन म्हणाला:
तू बोलिलास जो आता साम्ययोग जनार्दना
न देखे स्थिरता त्याची ह्या चंचळ मनामुळे ॥३३॥
मन चंचळ हे कृष्णा हट्टी छळितसे बळें
धावे वार्‍यावरी त्याचा दिसे निग्रह दुष्कर ॥३४॥

अर्जुन म्हणे तेधवा । सांगता कणवेने देवा । परि पुरे न पडतो स्वभावा । मनाचिया ॥४११॥
मन हे केवढे? । शोधू जाता न सापडे । एरवी वावरण्या थोडे । त्रैलोक्यही ॥४१२॥
म्हणोनि ऐसे कैसे घडेल । की माकड समाधि घेईल । वा थांब म्हणुनि थांबेल । वादळवारा? ॥४१३॥
जे बुद्धीचा छळ करी । निश्चया टाळाटाळ करी । धैर्याचे हातावरी तुरी । देउनी जाय; ॥४१४॥
जे विवेका भुलवी । संतोषा आशा लावी । बैसावे तरि हिंडवी । दाही दिशा; ॥४१५॥
घेई उसळी, जरि रोधिले । संयमें बांधिता अधिक उसळे । ते मन कैसे न कळे - । सोडील स्वभाव? ॥४१६॥
म्हणोनि मन निश्चिल राहील । आम्हा समदृष्टी येईल । हे सहसा न घडेल । याचिलागी ॥४१७॥

श्रीभगवान्‍ म्हणाले;
अवश्य मन दुःसाध्य म्हणतोस तसेचि ते
परी अभ्यास-वैराग्यें त्याचा निग्रह होतसे ॥३५॥

तेव्हा श्रीकृष्ण म्हणती हे साच । तू म्हणसी तैसेच । या मनाचा स्वभावच । चंचल गा ॥४१८॥
परि वैराग्याचे बळें । जर अभ्यासीं वळविले । तर कोणे एके वेळे । स्थिरावेल ॥४१९॥
मनाचे एक भले जाणावे । चाखिल्या गोडीस ते सोकावे । म्हणोनि तया दावित जावे । आत्मानुभवाचे सुख ॥४२०॥

संयमाविण हा योग न साधे मानितोचि मी
परी संयमवंतास उपायें साध्य होतसे ॥३६॥

जयां न ठाउकी विरक्ती । जे अभ्यासीं कधी न वळती । ते मना आवरू न शकती । जाणतो आम्हीही ॥४२१॥
जे यमनियमांचे पंथें न गेले । वैराग्या कधी न स्मरले । केवळ विषयजळीं राहिले । बुडी मारुनी ॥४२२॥
जन्मापासुनि मना कधीही । युक्तीचा चिमटा लाविला नाही । तर निश्चल कैसे ते होई । सांग गा मज ॥४२३॥
म्हणोनि मनाचा निग्रह होय । ऐसा जो काही उपाय । तयाची लावावी सवय । मग पाहू कैसा न होत ॥४२४॥
योगसाधन असे जितुके । ते अवघेचि काय लटिले? । तर अभ्यास पेलू न शके । ऐसे तरि म्हण ॥४२५॥
अंगीं असेल योगबळ । तर असेना का मन चपळ । काय महत‍त्त्वादि सकळ । आपुले न होती? ॥४२६॥
अर्जुन म्हणे, हे योग्य असे । देवांचे बोलणे चुकेल कैसे । साचचि योगबळा तुल्य नसे । मनोबळ ॥४२७॥
परि तोचि योग कैसा, कवण । वार्ता न इतुके दिन । म्हणत होतो जी, म्हणून । मन अनावर हे ॥४२८॥
या अवघ्या जन्मीं आम्हा । तुझेचि प्रसादें पुरुषोत्तमा - । योगाचा सार्थ महिमा । आकळला आज ॥४२९॥

अर्जुन म्हणाला:
श्रद्धा आहे नव्हे यत्न योगातूनि चळूनि जो
मुकला योगसिद्धीस जाय कोण्या गतीस तो ॥३७॥
काय तो उभय -भ्रष्ट ब्रह्ममार्गीं भुलूनिया
नाश पावे निराधार फुटलेल्या ढगापरी ॥३८॥
माझा संशय हा कृष्णा तूचि फेडी मुळातुनी
फेडीलसा दुजा कोणी न दिसेचि तुझ्याविण ॥३९॥

परि आणिक एक गुरुराया, । येथ वाव असे संशया । तो तुजविण कोणी फेडावया । नसे समर्थ ॥४३०॥
म्हणोनि सांग गोविंदा । कोणी झोंबत होता मोक्षपदा । केवळ ठेवुनिया श्रद्धा । परिश्रमाविण; ॥४३१॥
इंद्रियग्रामाहुनी निघाला । आस्थेचे वाटेसि लागला । आत्मसिद्धीचे नगराला । यावयालागी;  ॥४३२॥
तेव्हा आत्मसिद्धी न मिळे । आणि मागुते येणोहि न टळे । ऐसा मध्येचि मावळे । आयुष्यसूर्य तयाचा ॥४३३॥
जैसे अकाली विरळ । ढग विखुरले पातळ । सहजी आले केवळ । ठरती ना वर्षती; ॥४३४॥
तैसी दोन्ही दुरावली । मोक्षप्राप्ती तर दूर राहिली । परि श्रद्धा मनीं धरिली । म्हणुनि अप्राप्यहि न गमे ॥४३५॥
ऐसा दोहोंसी अंतरला । जो श्रद्धेतचि बुडाला । तो पावे कोण्या गतीला । सांगा जी, ॥४३६॥

श्रीभगवान्‍ म्हणाले;
न ह्या लोकीं न त्या लोकीं नाश तो पावतो कधी
शुभकारी कुणी बापा दुर्गतीस न जातसे ॥४०॥

तेव्हा कृष्ण म्हणती, पार्था, । जया मोक्षसुखीं आस्था । तया मोक्षावाचूनि अन्यथा । गती काय? ॥४३७॥
परि इतुकेचि एक घडे । तो मध्येचि विसावुनी पडे । परि त्यातहि सुख केवढे । जे देवांहि न लाभे ॥४३८॥
जर अभ्यासाची पाउले । तो झरझर उचले । तर सोऽहंसिद्धीसि पावेल योग्यवेळे । आयुष्य मावळण्यापूर्वी ॥४३९॥
परि तितुका नव्हेचि वेग । म्हणुनी विसावणे तर भाग । मोक्ष तो ठेविलाचि मग । असे तया ॥४४०॥

पुण्यलोकांत राहूनि तो योगभ्रष्ट संतत
शुचि साधनवंतांच्या घरी जन्मास येतसे ॥४१॥

ऐक कवतिक हे कैसे । शतयज्ञ करुनि सायासें । लोकां लाभे ते अनायासे । पावे मुमुक्षु ॥४४१॥
स्वर्गींचे ते अमोघ । अलौकिक भोग । भोगिताहि यथासांग । कंटाळे मन ॥४४२॥
विघ्न हे अवचित । का ओढवले भगवंत? । ऐसे दिव्य भोग भोगित । पस्तावे नित्य ॥४४३॥
फिरुनि जन्मे संसारीं । सकळ धर्मांचे माहेरीं । जैसा कोंभ उगवे आगरीं । विभवश्रियेच्या ॥४४४॥
ज्या कुळीं नीतिपंथें चालती । सत्य पवित्र तेचि बोलती । पाहावयाचे ते पाहती । शास्त्रदृष्टीने ॥४४५॥
वेद हाचि जागता ईश्वर । व्यवसाय, स्वधर्माचा आचार । आणि सारासार विचार । हाचि मंत्री जेथ; ॥४४६॥
ज्या कुळीं चिंतन । ईश्वराचे चिरंतन । गृहदेवता हीचि प्रसन्न । समृद्धीक की; ॥४४७॥
वाढविली निजपुण्याचे जोडीने । सकळ सुखसंपत्ती ज्या कुळाने । तेथ जन्मे तो समाधानें । योगभ्रष्ट ॥४४८॥

अथवा प्राज्ञयोग्यांच्या कुळींचि मग जन्मतो
अवश्य हा असा जन्म लोकीं अत्यंत दुर्लभ ॥४२॥
तिथे तो पूर्वजन्मींचा बुद्धिसंस्कार जोडुनी
मोक्षार्थ करितो यत्न पूर्वीहूनि पुढे पुन्हा ॥४३॥

अथवा ज्ञानाग्नीत करिती हवन । जे ब्रह्मनिष्ठ वेदसंपन्न, । ब्रह्मसुखाचे क्षेत्रांतून । मिरास जयांची; ॥४४९॥
जे सिद्धांताचे सिंहासनीं । राज्य करिती त्रिभुवनीं । जे संतोषाचे वनीं । कूजिते कोकीळ ॥४५०॥
जे विवेकतरुतळीं बैसत । नित्य ब्रह्मफळे सेवित । त्या योग्यांचे कुळात । पावे तो जन्म ॥४५१॥
सानुली देहाकृती उमटे । आणि आत्मज्ञानाचे तांबड फुटे । सूर्याआधी प्रगटे । प्रभा जैसी ॥४५२॥
तैसी प्रौढत्वाची वाट न पाहता वयाचे मनीं न धरिता । बाळपणींचि सर्वज्ञता । माळ घाली तया ॥४५३॥
पूर्वजन्मींचे बुद्धिलाभात । मनचि सर्व विद्या प्रसवीत । सकळ शास्त्रे निघत । मुखातुनि सहजी ॥४५४॥
ऐसे जन्म जे असती । तयांची देवहि कामना धारिती । आणि जपजाप्य होम करिती । स्वर्गीं सदा; ॥४५५॥
देवांनी भाट व्हावे । मृत्युलोका वानावे । ऐसा जन्म तो पावे । जाण पार्था ॥४५६॥

पूर्वाभ्यासबळाने तो खेचला परतंत्रचि
जिज्ञासेनेंहि योगाच्या जातो वेदांस लंघुनी ॥४४॥

आणि पूर्वजन्मींची सद्‍बुद्धी ती । लाभली त्या जन्मअंतीं । तीचि तया पुढती । नित्य नवी लाभे ॥४५७॥
आधीचि पायाळू आणि भाग्यवंत । डोळ्यां लाभे दिव्यांजन त्यात । मग पाहे जैसे गुप्त । पाताळधन; ॥४५८॥
तैसे सिद्धांत जे दुर्भेद्य । आणि गुरुवाचुनि अगम्य । तेथ विनायास जाय । बुद्धी तयाची ॥४५९॥
प्रबळ इंद्रिये स्वयेंचि होत मनाधीन । एकवटे प्राणवायूशी मन । प्राणवायू मूर्न्धिआकाशीं पावून । मिळोचि लागे ॥४६०॥
हे आपोआप कैसे होई? । अभ्यासचि तयाकडुनि स्वतःसि करवी । समाधि घर पुसत येई । मानसाचे ॥४६१॥
हा योगपीठाचा भैरव । की मूळस्वरूपाचा गौरव । वा वैराग्यसिद्धीचा अनुभव । रूपा आला ॥४६२॥
हा संसार मोजण्याचे माप । की अष्टांगयोगाचा दीप । जैसे परिमळेंचि घ्यावे रूप । चंदनाचे ॥४६३॥
तैसा संतोषाचा घडिला । की सिद्धभांडारातुनि काढिला । तो साधकदशेतचि वाढला । त्याचि योग्यतेचा ॥४६४॥

योगी तत्पर राहूनि दोष जाळित जाळित
अनेक जन्मीं संपूर्ण होउनी मोक्ष पावतो ॥४५॥

तो शतकोटी वर्षांचे - । बांध सहस्त्रावधि जन्मांचे - । लंघूनिया, आत्मसिद्धीचे । थडीसी लागे ॥४६५॥
म्हणोनि अवघे साधनजात । सहजी तयामागे येत । विवेकसाम्राज्याचा धनी होत । आयताचि तो ॥४६६॥
विचारांचे वेगापुढे । विवेकही मागे पडे । मग विचारांपलीकडे । स्वरूपीं हो एकरूप ॥४६७॥
तेथ मनाचे अभ्र विरे । पवनाचे पवनपण सरे । आपण आपल्यात मुरे । आकाशही ॥४६८॥
प्रणवाचा माथा बुडत । ऐसे सुख लाभे शब्दातीत । मग शब्दचि माघारे फिरत । वर्णितांना ॥४६९॥
ऐसी ब्रह्माची स्थिती । जी सकळ गतींची गती । त्या अमूर्ताची मूर्ती । होऊनि राही ॥४७०॥
मागिल बहुत जन्मांतली । विक्षेपांची मळी काढिली । म्हणोनि उपजताचि बुडाली । लग्नघटिका ॥४७१॥
आणि तद्रुपतेशी लग्न -। लागोनि, जाहला अभिन्न । जैशी अभ्रे विरून । आकाशरूप होती; ॥४७२॥
तैसे विश्व जेथ होई । आणि मागुते लया जाई । ते ब्रह्मरूप तो होई । याचि देहीं ॥४७३॥

ज्ञानी तापस कर्मिष्ठ ह्या सर्वांहूनि आगळा
मानिला तो असे योगी योगी होई म्हणूनि तू ॥४६॥

ज्या लाभाचे आशेवरी । धैर्यबाहूंचे भरवशावरी । षट्‍कर्मांचे प्रवाहावरी । उडी घेती कर्मनिष्ठ; ॥४७४॥
अथवा ज्या वस्तूस्तव ज्ञानी । ज्ञानाचे चिलखत घालुनी । प्रपंचासवे समरांगणीं । झुंजताती ॥४७५॥
वा निराधार निसरडा । तपाचलाचा तुटका कडा । नित्य झोंबती त्या गडा - । तपस्वी ज्या इच्छेने ॥४७६॥
भजणार्‍यां जे भजनविषय । याज्ञिकांसी यज्ञविषय । ब्रह्मस्वरूप ऐसे जे पूजनीय । सकळां सदा; ॥४७७॥
तेचि तो आपण । स्वयें जाहला निर्वाण । जे साधकांचे कारण । सिद्धतत्त्व ॥४७८॥
म्हणोनि कर्मनिष्ठांसि वंद्य । ज्ञानवंतांसि जाणण्यायोग्य । तपस्वी जनां आद्य । तपोनाथ ॥४७९॥
जीव - परमात्मा - संगम जेथ । मनाचे अखंड ऐक्य तेथ । देहधारी असून पावत । महिमा तो ऐसा ॥४८०॥
म्हणोनि याचिकारणें । तुज मी नित्य म्हणे । योगी व्हावे अंत:करणें । पंडुकुमरा ॥४८१॥

सर्व योग्यांमधे योगी जीव माझ्यात ठेवुनी
श्रद्धेने भजतो माते तो थोर मज वाटतो ॥४७॥

अगा योगी जया म्हणावे । देवांचा देव तया जाणावे । सुखसर्वस्व माझे समजावे - । आणि चैतन्यचि ॥४८२॥
भक्त, भजनविषय, भजन । हे अवघे जे भक्तिसाधन । ते मीचि जाहलो आपण । अनुभवें अखंडित ॥४८३॥
मग तयाचे - अमुचे प्रीतीचे । स्वरूप शब्दांपलिकडचे । जाण गा हे साचे । सुभद्रापती ॥४८४॥
त्या एकवटल्या प्रेमा - । साजेशी द्यावी उपमा । तर मी देह तो आत्मा । हीचि होय ॥४८५॥
ऐसे भक्तचकोरांचे चंद्र । त्रिभुवनींचे श्रेष्ठ नरेंद्र । बोलिले गुणसमुद्र । संजय म्हणे ॥४८६॥
पूर्वीपासूनिची पार्था । ऐकण्याची होती आस्था - । ती दुणावली, हे यदुनाथा । पुरते कळ्ले ॥४८७॥
सहजचि मनीं तोषला । जणु बोलासि आरसा जोदिला । हरखुनि प्रफुल्ल जाहला । निरूपण आता करील ॥४८८॥
तो प्रसंग पुढे येईल । तेथ शांतरस पुरता दिसेल । कणगी मोकळी होईल । प्रमेयबीजांची ॥४८९॥
सत्त्वगुणांची वृष्टी होउनी । डिखळे तापाची विरघळुनी । सहज बैसले सज्ज होउनी । वाफे चतुर चित्तांचे ॥४९०॥
वरि अवधानाचा वाफसा । लाभला सोन्याऐसा । म्हणोनि पेरावया उल्हा तैसा । श्रीनिवृत्तीसी ॥४९१॥
ज्ञानदेव म्हणे सद्‍गुरुंनी । जणु पेरणीचे चाडे करुनी । माथ्यावरी हात ठेवुनी । बीजचि की घातले ॥४९२॥
म्हणूनि या मुखें जे निघे । ते संतांचे ह्रदयीं साचचि रिघे । “आता सांग वेगें । श्रींरग जे बोलिले” ॥४९३॥
परि मनाचे कानीं ऐकावे । बुद्धीचे डोळ्यांनी देखावे । ते बोल तुम्ही घ्यावे । चित्त देउनी ॥४९४॥
हातांनी अवधानाचिया । न्यावे अंतरीं ह्रदयाचिया । मग बुद्धीसी सज्जनांचिया । रिझवितील हे बोल ॥४९५॥
हे स्वहिता । निववितील । पूर्णावस्थेसि जागवितील । सुखाची वाहतील । लाखोली जीवा ॥४९६॥
आता चतुर श्रीकृष्ण । बोलतील सुंदर ज्ञान । ते ओवीछंदीं गुंफून । सांगेन मी ॥४९७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP