समओवी ज्ञानेश्वरी - अध्याय सोळावा

ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी या तिन्ही ग्रंथांतून काव्य आणि तत्वज्ञान संत ज्ञानेश्वर आपल्या विलक्षण भाषासौंदर्याने मराठी माणसाला विस्तारून सांगतात.


मावळवीत विश्वाभास । नवल उदयला दिनेश । अद्वैतकमळाचा करी विकास । वंदू तया श्रीगुरुनिवृत्तिरायासी ॥१॥

अविद्यारात तो निरसी । गिळी ज्ञान-अज्ञान चांदण्यासी । सुदिन करी ज्ञानियांसी । स्वबोधाचा ॥२॥

जयाचे उदयपहाटे । आत्मज्ञान दिठीसी भेटे । देहअहंतेचे घरटे । सोडिती जीवपक्षी ॥३॥

जीवचैतन्यभ्रमर पडे बंदिवासी । लिंगदेहकमळाचे पोटातुनि ऐसी । श्रीगुरुरूप सूर्योदयासी । सुटका होय तयाची ॥४॥

भेदरूप नदीचे दोन्ही तीरीं । शास्त्रांचे विसंगत शब्दांची दरी । आरडे बुद्धि-बोध विरहबावरी । चक्रवाक जोडी ॥५॥

तया चक्रवाकमिथुना । सामरस्याचे समाधाना । भोगवी जो चिद्‌गगनभुवना । श्रीगुरुदीप ॥६॥

उजाडल्या पहाटे जेणे । भेदाची चोरवेळ फिटणे । निघती आत्मानुभववाटेने । पथिक योगी ॥७॥

जयाचे विवेककिरणांसवे । ज्ञानरत्नांच्या ठिणग्यांचे थवे । जाळिती अरण्ये । संसाराची ॥८॥

जयाचा रश्मिपुंज प्रखर । होता स्वरूपमाळावरि स्थिर । ये अष्टमहासिद्धींचा पूर । मृगजळाचा ॥९॥

जो अंतर्मुखवृत्तीचे येता माथ्या । सोऽहंतेचे माध्यान्ही त्या । लपे आत्मभ्रांतीची छाया । आपुल्याचि तळीं ॥१०॥

विश्वाभासस्वप्नें भरो भली । ती विपरीत ज्ञाननिद्रा कोण सांभाळी ? । जेथ पूर्णतया नुरली । मायारात ॥११॥

म्हणोनि अद्वैतबोधगावीं । महानंदाची दाटी होई । मग सुखानुभूतींच्या देवघेवी । मंदावू लागती ॥१२॥

किंबहुना ऐसे ऐसे । कैवल्यमुक्तीचे सुदिवसें । सदा पावावे प्रकाशें । जयाचे की ॥१३॥

जो आत्मस्वरूपव्योमींचा धनी । उदयलाचि परि उदयताक्षणीं । फेडी पूर्वादि दिशांसह ठाव झणी । उदय-अस्तांचा ॥१४॥

न दिसणे दिसण्यासह मावळवी । दोहींनी झाकिले सर्वत्र प्रकटवी । काय बहु बोलू ? ती आघवी- । उषाचि विलक्षण ॥१५॥

तो अहोरात्रांची पैलकड । कोणे देखावा ज्ञानमार्तंड । जो प्रकाश्याविण अजोड । प्रकाशचि असे ॥१६॥

तया चित्सूर्या निवृत्तिनाथा । नमो म्हणू पुन्हा पुन्हा आता । शब्दांनी स्तुति करू जाता । उणी पडे ॥१७॥

गुरुरायाचा महिमा पाहोनिया । स्तुति येतसे रूपा भल्या । जर स्तव्यबुद्धीसह लया । जाईल स्तवणारा ॥१८॥

न जाणणे हेचि जया जाणणे । मौन हेचि वानणे । काहीचि नुरोनि आपण आणणे । जया आपणात ॥१९॥

ज्या तुझिया स्तुतीसाठी । पश्यंति मध्यमा ठेवुनि पोटीं । परावाणीसह पाठी- । वैखरी विरे ॥२०॥

त्या तुजमी सेवकपणें । लेववी बोलक्या स्तोत्राचे लेणे । हे साहावे म्हणणेहि उणे । अद्वयानंदा ॥२१॥

परि रंकें देखता अमृतसागर । तया उचिताचा पडे विसर । मग करू धावे पाहुणचार । शाकभाज्यांचा ॥२२॥

तेथ शाकपालाहि बहुत म्हणवा । तयाचा हर्षावेगचि तो जाणावा । ओवाळी काडवातीने सूर्या । त्याची भक्तीचि पाहावी ॥२३॥

बाळा जर असे औचित्याची जाण । तर कोठे राहे बालपण ? । परि ते मातेचेचि अंतःकरण । म्हणोनि तोषे ॥२४॥

अहो, पाणी गावरसें भरले । गंगेसी तुडवित आले । तर ती काय तया म्हणे- । मागे सर ? ॥२५॥

जी, भृगुचा केवढा अपकार । परि तो लत्ताप्रहारहि प्रेमोपचार । मानूनि तोषलेच ना शारंगधर । गुरुत्वासी ? ॥२६॥

अंधारें भरले अंबर । येता दिवसनाथासमोर । तयाने तया दूर सर । म्हटले काय ? ॥२७॥

तैसे भेदबुद्धीचे ताजव्यात । घालोनि सूर्यासह । पारडयात । तुज तुळिले, ते एकवेळ येथ । साहावे जी, ॥२८॥

जयांनी ज्ञानाचे डोळ्यांनी पाहिले । वेदादिकांनी वाचेने वानिले । तयांसी जैसे साहिले । तैसे आम्हाही करी ॥२९॥

परि मी आज तुझिये गुणीं । लालचावलो अपराध न मानी । देवी, अर्धपोटी राहुनी । न उठेन कदापि ॥३०॥

मी गीता या नावें । तुझे प्रसादामृत सेवावे । वानू लागता दैव बळावे । दुणावुनी ॥३१॥

माझिया सत्यवादाचे तप । वाचेने केले बहुत कल्प । तयाचे फळ हे महाद्वीप । ती पावली प्रभू ॥३२॥

मी पुण्ये केली असाधारण । तव गुणवर्णनाचे फळ पावून । ती पुण्ये मुक्त ऋणांतून । जाहली आज ॥३३॥

जीवदशेचे अरण्यीं । सापडलो होतो मरणगावीं । ती अवदसाचि समस्त ही । फेडिलीस आज ॥३४॥

गीता नावें नावाजली । अविद्येसि जिंकुनि प्रबळ जाहली । ती कीर्ती तुझी पावली । आम्ही वानण्याजोगी ॥३५॥

अगा निर्धनाचे घरीं उलासें । महालक्ष्मी येऊनि बैसे । तर तया निर्धन ऐसे । म्हणता ये काय ? ॥३६॥

अंध:काराचे स्थाना अथवा । दैवें जर सूर्य यावा । तर तो अंधारचि विश्वा- । प्रकाश नव्हे काय ? ॥३७॥

ज्या देवाची पाहता थोरवी । विश्व न गमे परमाणुइतुकेही । तो न होय भक्तिभावबळेंही । प्राप्त काय ? ॥३८॥

म्यां गीता वाखाणणे । हे जैसे आकाशपुष्प हुंगिणे । परि हौस समर्थपणें । पुरविली तुम्ही ॥३९॥

म्हणोनि तुझे प्रसादें । मी अगाध गीतापदे । निरूपीन जी, मोदें । ज्ञानदेव म्हणे ॥४०॥

निरूपिता अध्याय पंधरावा । श्रीकृष्णें तया पांडवा- । शास्त्रसिद्धांत आघवा । उलगडोनि दाविला ॥४१॥

वृक्षरूपकाचे परिभाषेने कथिले । उपाधिरूप चांगले । सद्‌वैद्य जैसे अंगी दडले । दोष सांगे ॥४२॥

मायेसवे जीवात्मा जो अक्षर । तोही दाविला पुरुषप्रकार । उपाधियुक्त चैतन्यावतार । तोही कथिला ॥४३॥

मग उत्तम पुरुष । या शब्दाचे करुनि मिष । दाविले चोख । आत्मतत्त्व ॥४४॥

मग अंतर्यामीं घटमुठ । आत्मप्राप्तीचे साधन बळकट । ते ज्ञानही सुस्पष्ट । सांगितले ॥४५॥

म्हणोनि या अध्यायीं । निरूपिण्याजोगे नुरेचि काही । आता गुरु-शिष्या दोही । स्नेहाचीच जोड ॥४६॥

ऐसे याविषयीं खरोखर । जाणते बुझावले अपार । परि मुमुक्ष इतर । साकांक्ष राहिले ॥४७॥

त्या मज पुरुषोत्तमा, । ज्ञानें भेटे जो, हे सुवर्मा । तो सर्वज्ञ तोचि सीमा । भक्तीचीही ॥४८॥

ऐसे हे त्रैलोक्यनाथ । बोलिले मागिल अध्यायात । तेथ ज्ञानचि बहुत । वानिले तोषें ॥४९॥

प्रपंचाचे भरुनिया घोटा । करी देखणाराचि देखत्या द्रष्टा । आनंदसाम्राज्यीं होय मोठा । ज्याभिषेक ॥५०॥

इतुका बलवत्तर उपाय । देव म्हणे नाहीचि अन्य । सम्यक् ज्ञानाचा राव होय । उपायांमाजी हा ॥५१॥

ऐसे आत्मजिज्ञासू जे होते । तयांनी तोषल्या चित्तें । आदरें त्या ज्ञानाते । ओवाळिले जीवें ॥५२॥

आता जे आवडे । त्याचि ठायी शिरे पुढे । तेव्हाचि घडे । प्रेम ऐसे ॥५३॥

म्हणोनि जिज्ञासूंसी ठायी । जोवरि ज्ञान प्रतीत न होई । तोवरि ज्ञानाचे योगक्षेमाविषयीं । शंकितचि ते ॥५४॥

म्हणोनि तेचि सम्यक्‌ज्ञान । कैसे होय स्वाधीन । आणि जाहल्यावरि वृद्धीचा यत्न । होईल कैसा ? ॥५५॥

की जे उपजूचि न देई । उपजताचि आडवाटे नेई । ऐसे काय विरुद्ध ज्ञानाठायी । ते जाणावे लागे ॥५६॥

मग जाणत्या जे अनिष्ट । तयाची मोकळी करु वाट । चिंतू ज्ञाना जे इष्ट । तेचि सर्वभावें ॥५७॥

जिज्ञासू तुम्ही समस्त । भाव जो धरिला असे मनात । तो पुरवावया लक्ष्मीकांत । बोलतील ॥५८॥

ज्ञान प्राप्त हो उत्तम समयीं । आत्मस्वरूप भेटे आपुलेचि ठायी । ऐसे ते संपत्तीचे दैवी । गातील पवाडे ॥५९॥

आणि ज्या आसुरी संपत्तीने । राग-द्वेषा थारा मिळणे । ज्ञानाचा नाश होय जेणे । तेही वर्णितील श्रीकांत ॥६०॥

सहज करिती इष्ट-अनिष्ट करणी । कवतिकें या दोघीजणी । याची नववे अध्यायीं उभारणी । केली होती ॥६१॥

तेथेचि विस्तारा होता वाव । परि पुढे आला अन्य प्रस्ताव । तरि आता या प्रसंगें देव । निरूपीत असे ॥६२॥

या निरूपणाचा नवा । अध्याय हा सोळावा । क्रम पाहता जाणावा । मागिल्यावरुनी ॥६३॥

परि हे असो प्रस्तुत । ज्ञानाचे पाहता हित-अहित । संपत्ती असती समर्थ । याचि दोन्ही ॥६४॥

मोक्षमार्गी जी मुमुक्षूंचे संगती । मोहरात्रीची धर्मदिवली ती । आधी तर दैवी संपत्ती । वर्णितो ऐका ॥६५॥

पोषिती एकासि एक । ऐसे पदार्थ अनेक । एकत्र संपादिता म्हणती लोक । संपत्ती ऐसे ॥६६॥

सुक निर्मी दैवी ती । तेथ दैवी गुण नांदती । म्हणोनि तिज म्हणती । दैवी संपत्ती ॥६७॥

श्रीभगवान् म्हणाले:

निर्भयत्व मनःशुद्धि योग-ज्ञानीं सुनिश्चय
यज्ञ निग्रह दातृत्व स्वाध्याय ऋजुता तप ॥१॥

त्याचि दैवी गुणीं । जो बैसे प्रथमासनीं । तया म्हणती जनीं । अभय ऐसे ॥६८॥

जर उडी न घेई महापुरीं । तर बुडण्याचे भय न धरी । रोगाचे भय न घरीं । पथ्याचिये ॥६९॥

तैसे कर्म-अकर्मांच्या मार्गां । शिरो न दे अहंकारा, गा । संसाराचा दरारा जो उगा । सोडणे या गुणें ॥७०॥

अद्वैतविस्तारें अथवा । विश्वचि आत्मस्वरूप होय तया । भयवार्ता दवडणे आघव्या । देशोधडीसी जे ॥७१॥

पाणी मिठासि बुडवी । तों मीठचि पाणी होई । आपण जाता अद्वैतगावी । नाशे भय ॥७२॥

अगा, अभय या नावें । बोलती ते हे जाणावे । सम्यक्‌ज्ञानासवे आघवे । धावणे याचे ॥७३॥

आता सत्त्वशुद्धि जी म्हणावी । ती ऐशा चिन्हीं जाणावी । ना जळे ना विझेही । राखाडी जैसी ॥७४॥

प्रतिपदेसी वाढ न घे । अवसेसि घस टाकुनि मागे । मध्ये अतिसूक्ष्म अंगें । चंद्र जैसा राहे; ॥७५॥

अथवा वर्षाकाळीं भरली । ग्रीष्पीं नाही आटली । सहजरूप दावित वाहिली । गंगा जैसी; ॥७६॥

तैसी संकल्प-विकल्पांची ओढ । टाकुनि रज-तमाची कावड । भोगे जी आत्मचिंतनाची आवड । ती बुद्धि उरे ॥७७॥

इंद्रियांनी जरि दाविल्या । गोष्टी विरुद्ध वा भल्या । तरि तरंग काही केल्या । न उठे चित्तीं ॥७८॥

वल्लभ गावा जाता । विरहविव्हाल पतिव्रता । हानी-लाभ कोणता । न मानी जैसी ॥७९॥

तैसे आत्मस्वरूप रुचलेपणें । बुद्धीचे जे अनन्य होणे । ती सत्त्वशुद्धी म्हणे । केशीमर्दन श्रीकृष्ण ॥८०॥

आत्मप्राप्तीस्तव अनुकूल । ज्ञान वा योग यातिल । आपणा जे साधेल । तेचि इच्छावे ॥८१॥

तेथ सकल चित्तवृत्तीही । ऐशा रीतीने अर्पावी । निष्काम पूर्णाहुति द्यावी । अग्नीसी जैसी; ॥८२॥

की कुलवंतें आपुली । कन्या सत्कुळींचि दिधली । हे असो, लक्ष्मी स्थिरावली । मुकुंदीं जैसी; ॥८३॥

तैसे निर्विकल्पपणें । योग-ज्ञानींचि वृत्ति ठेवणे । तो तिजा गुण म्हणे । श्रीकृष्णनाथ ॥८४॥

आता देह-वाचा-चित्तें । यथासंपन्न वित्तें । वैरी होताही आर्ताते । न वंचणे जे का ॥८५॥

पत्र-पुष्प-छाया । फळे-मुळें धनंजया । न चुके वाटसरूसी द्यावया । वृक्ष जैसा; ॥८६॥

तैसे मनापासुनि धनाचेही वरी । जे असेल आपुल्या घरी । तेणे आल्या अवसरीं । श्रांताचे उपयोगा येणे ॥८७॥

तया नाव दान । जे मोक्षनिधानाचे अंजन । हे असो, ऐक लक्षण । दमाचे ते ॥८८॥

तर विषय-इंद्रियांची जोडी । घाव घालुनी फोडी । शस्त्रधारी तोडी । शत्रूसी जैसे ॥८९॥

तैसे विषयजातांचे वारे । वाजू न दे इंद्रियांद्वारे । तयां बांधोनि नियमांचे करें । इंद्रियनिग्रहावरी सोपवी ॥९०॥

सर्वचि त्यागुनि चित्तावेरी । प्रवृत्ति पळे बाहेरी । आग ठेवुनि दाही द्वारीं । वैराग्याची ॥९१॥

श्वासोच्छ्‌वासाहुनी निरंतर । तपे आचरी खडतर । उसंत ना क्षणभर । दिवसरात्र ॥९२॥

अगा, दम ऐसे नाव सार्थ । तो जाण स्वरूपें येथ । यज्ञाचाही संक्षेपें अर्थ । सांगतो ऐक ॥९३॥

विद्वज्जन धुरेवर । तों स्त्रियांदिकांपावत अखेर । वागावे अधिकारानुसार । तयांनी आपुलाल्या; ॥९४॥

जयां जे सर्वोत्तम । भजनीय देवताधर्म । ते तयांनी यथानियम । विधिपूर्वक आचरावे ॥९५॥

पुरोहित षट्‌कर्मे करिती । अन्य तयां नमस्कारिती । सकळां सरसेचि लाभती । यज्ञ परी; ॥९६॥

तैसे अधिकारपरत्वें । हे यज्ञ करणे आघवे । परि विष न कालवावे । फलाशेचे त्यात ॥९७॥

आणि मी कर्ता ऐसा भाव । देहद्वारें न करो शिरकाव । एरवी वेदाज्ञेसी ठाव । व्हावे स्वयें ॥९८॥

ऐशा लक्षणीं, हे प्राज्ञ । सर्वत्र आचरिती यज्ञ । कैवल्यमार्गीचे अभिज्ञ । सांगाती हे ॥९९॥

चेंडू भूमिवरी हाणणे । नव्हे, तो हाता परतुनि आणणे । की शेतात बी विखुरणे । ते पिकावरि लक्ष ठेवुनि; ॥१००॥

अथवा ठेविले देखावया । अवश्य घ्यावा दिवा । शाखांसी फळे यावया । शिंपावे मूळ ॥१०१॥

हे बहु असो, आरसा । आपणाचि देखावया जैसा । पुन्हा पुन्हा बहुतसा । पुसावा प्रेमें; ॥१०२॥

तैसा वेदवर्णित जो ईश्वर । तो व्हावयास्तव गोचर । म्हणोनि वेदांचा निरंतर । अभ्यास करणे ॥१०३॥

विद्वानांसीचि ब्रह्मसूत्र । इतरां स्तोत्र वा नाममंत्र । आवर्तप्पे पवित्र । पावावया ब्रह्मतत्त्व ॥१०४॥

पार्था, जया म्हणती स्वाध्याय । तो हा येथ होय । आता तप शब्दाचा अभिप्राय- । ऐक, सांगू ॥१०५॥

तर दानें सर्वस्व देणे । निष्काम ते वेचणे । जैसे फळोनि स्वयें सुकणे । वनस्पतींचे ॥१०६॥

अग्निप्रवेशीं नाश धुपाचा । तैसा कनकाचे वजनाचा । वा पितृपक्ष वाढता चंद्राचा । र्‍हास जैसा ॥१०७॥

करण्या आत्मस्वरूपाचा विस्तार । प्राण-इंद्रिये-शरीर । ह्यांस झिजविणे जे खरोखर । तेचि तप ॥१०८॥

अथवा वेगळे ऐसे जरी । तपाचे रूप असे तरी । हंसें जैसी क्षीरीं । ठेविली चोच ॥१०९॥

तैसे देह-जीवांचे मीलनीं । जो उदयताचि हात घाली झणी । तो विवेक अंत:करणीं । जागवावा ॥११०॥

पाहता आत्म्याकडे । बुद्धीचा विस्तार आखुडे । निद्रेसह स्वप्न बुडे । जागेपणीं जैसे ॥१११॥

तैसे आत्मावलोकन । हे जयाचे निधान । तेचि तप हे जाण । अर्जुना गा ॥११२॥

बाळाचे हितास्तव स्तन्य । वा नानाभूतीं चैतन्य । तैसे प्राणिमात्रीं सौजन्य ॥ आर्जव ते ॥११३॥

अहिंसा शांति अक्रोध त्याग सौजन्य सत्यता
अलुब्धता दया भूतीं मर्यादा स्थैर्य मार्दव ॥२॥

आणि जगाचिये सुखोद्देशीं । शरीर-वाचा-मानसीं । वर्तणे ते अहिंसेसी । रूप जाण ॥११४॥

अणिदार असोनि कोमल । जैसे जातीचे कमळ । अथवा तेजचि परि शीतल । चंद्रम्याचे ॥११५॥

दाविताचि रोग शके फेडू । परि जिभेसी तर नव्हे कडू । ऐसे औषधचि ना, मग जोडू- । उपमा कोठली ? ॥११६॥

डोळ्यावरी शिडकले । तरि मऊपणें न खुपले । एरवी खडकही फोडिले । पाण्याने जैसे; ॥११७॥

तैसे सत्य ते, तोडावया संदेह । तीक्ष्ण जैसे का लोह । एरवी श्रवणा न दाह । माधुर्या लाजवी ॥११८॥

ऐकता कौतुकें । कानासी निघती मुखे । जे सत्यत्व घडवी बळें एके । ब्रह्मत्वाचा साक्षात्कार ॥११९॥

किंबहुना प्रियपणें । कोणाही चकवू न जाणे । यथार्थ तरी खुपणे । नाही कोणा ॥१२०॥

पारध्याचे गाणे गोड कानासी । परि प्राणघातक मृगासी । आगीचे जाळणे उघड देखसी । परि जळो ते साचपण ॥१२१॥

काना लागता मधुर । अर्थें भेदी जिव्हार । ती वाणी नव्हे सुंदर । लावसट राक्षसीचि ॥१२२॥

कल्याणास्तव लटिका कोप । लालनीं मऊ जैसे पुष्प । तिये मातेचे स्वरुप । जैसे की होय; ॥१२३॥

तैसे श्रवणसुखचतुर । परिणामीं मधुर । बोलणे जे अविकार । ते सत्य येथ ॥१२४॥

आता घालिताही पाणी । अंकुर न निघे पाषाणीं । अथवा न मिळे लोणी ।  घुसळिता निवळी ॥१२५॥

हाणिताहि सर्पकातेचे शिरीं । ती फडा न काढी वरी । वसंतींही जैसी अंबरीं । न येती पुष्पे ॥१२६॥

अथवा रंभेचेही रूपें ।  शुकमुनींसी काम न लिंपे । की भस्मीं वन्ही न उद्दीपे । घृतेंही जैसा ॥१२७॥

बालकही क्रोधें भरे । ऐसी उच्चारिता अक्षरे । यासारिखी निमित्तमात्रे । एकवटता; ॥१२८॥

ब्रह्मदेवाचेही पाया पडता । गतायु न उठे पंडुसुता । तैसी न उपजे, उपजविता । क्रोधऊर्मी गा; ॥१२९॥

अगा अक्रोधत्व ऐसे । या दशेसी नाव असे । ऐसे श्रीनिवासें । म्हटले तया ॥१३०॥

आता मृत्तिकात्यागें घट । की तंतुत्यागें पट । वा त्यजावा जैसा वट । बीजत्यागें; ॥१३१॥

की त्यजुनि भित्तमात्र । त्यजावे आघवेचि भित्तिचित्र । वा निद्रात्यागे विचित्र । स्वप्नजाल; ॥१३२॥

अथवा जळत्यागें तरंग । वा वर्षात्यागें मेघ । त्यजिले जैसे भोग । धनत्यागें; ॥१३३॥

तैसे बुद्धिमंत देहीं । अहंता सोडुनी पाही । सोडिती अशेषही । संसारजात ॥१३४॥

तया नाव त्याग । म्हणे तो यज्ञांग । हे मानूनि तो सुभग । पार्थ पुसे ॥१३५॥

आता शांतीचे जी, लक्षण । सांग स्पष्ट करून । देव म्हणती अवधान । नीट देई ॥१३६॥

गिळोनि ज्ञेयाते । ज्ञाता ज्ञानही मागुते । हारपे जेथे । ती शांति गा ॥१३७॥

जैसे प्रळयजळें अपार । बुडवोनि विश्वविस्तार । होय आपणचि चूर । आपणात ॥१३८॥

नदीचा उगम ओघ सागर । हा नुरेचि भेदव्यवहार । परि जलैल्याचा बोध तर । तोही कवणा ? ॥१३९॥

तैसे लय पावता ज्ञेय । ज्ञातेपणही पावे लय । मग उरे तेचि होय । शांतीचे रूप ॥१४०॥

रोग्याची व्याधी घालवी । तयाचे बळ वाढवी । तेथ आपपर न ठेवी । सद्‌वैद्य जैसा ॥१४१॥

चिखलीं रुतली गाय । धड की भाकड न पाहू जाय । जो तिचे क्लेशें होय । कासावीस ॥१४२॥

अथवा बुडत्यासी दयावान- । न पुसे नीच की विद्वान । काढुनी वाचवावा प्राण । हेचि जाणे; ॥१४३॥

वा पाप्याने घोर वनीं । उघडी केली कोणी । परि तिज नेसल्यावाचुनी । नच पाही सभ्य ॥१४४॥

तैसे प्रमादीं अज्ञानीं । की सदोष प्राक्तनीं । निंद्यत्वाचे सर्व विषयांतुनी । खिळले जे; ॥१४५॥

आपुले अंगींचे गुण । भले तया देऊन । करविती शल्यांचे विस्मरण । जी सलती तयां ॥१४६॥

अगा, इतरांचे अवगुण । आपुल्या दृष्टीने चोख करून । मग करी अवलोकन । तयांचे, गा ॥१४७॥

जैसे पुजोनि देवा पाहावे । पेरूनि शेता जावे । तोषवूनि आशीर्वाद घ्यावे । अतिथींचे ॥१४८॥

तैसे आपुल्या गुणें । दुसर्‍याचे उणे । फेडूनिया पाहणे । तयाकडे ॥१४९॥

एरवी विंधू नये वर्मीं । गोवू नये कुकर्मीं । हाकारू नये नामीं । दोषदर्शक ॥१५०॥

परि करावे ऐसे उपाय । की पडला उभा होय । तेचि करावे, परि वर्मी घाव । न घालावे ॥१५१॥

नीच मनुष्यातही । उत्तमाची योग्यता पाही । दोष न देखे एकही । आपुल्या दृष्टीने ॥१५२॥

गुणग्राहकतेचे लक्षण । अर्जुना, हे साच जाण । मोक्षमार्गी सुखासन । मुमुक्षूंसी हे ॥१५३॥

दया ती ऐसी आता । पूर्णचंद्रिका शांति देता । निवडी जैसी निवविता । सान-थोर ॥१५४॥

तैसे दुःखिताचे शिणणे । हरता सकणवपणें । उत्तम-अधम न जाणे । भेद अगा ॥१५५॥

जगीं पाणी जैसे । जरि आपण नाशे । जाते जीवित रक्षे । तृणाचेही; ॥१५६॥

तैसे दुसर्‍याचे तापें । कळवळुनी कृपें । सर्वस्वासह स्वतःसि अर्पे । तरि अल्पचि म्हणे ॥१५७॥

खळगा भरल्यावाचुनी । ढळणे न जाणे पाणी । तैसा जाय दुःखिता तोषवुनी । सामोरे येता ॥१५८॥

पायीं रुते काटा कोठे । तोंचि व्यथा जीवीं उमटे । तैसा पोळे संकटें । इतरांचे ॥१५९॥

पायां शीतलता येई । ती डोळ्याचिसाठी होई । तैसा परसुखें जाई । सुखावत ॥१६०॥

किंबहुमा तृषितांकारणीं । जगीं निर्मियले असे पाणी । तैसे दुःखितांचे दुःखनिवारणीं । जिणे तयाचे ॥१६१॥

तो पुरुष वीरराया । मूर्तिमंत जाण दया । उपजताचि तया । ऋणी मी लाभे ॥१६२॥

सूर्यकमळ सूर्यासवे । आपणा वळवी जिवेंभावे । तरि तो न शिवे । तयाचे सुवासा ॥१६३॥

वसंताचे आगमनीं । वनश्रींच्या अक्षौहिणी । परि ते न स्वीकारुनी । निघाला तो ॥१६४॥

हे असो, अष्टमहा सिद्धींसवे । जरि लक्ष्मीही निकट ये । तरि विष्णु तिजकडे न पाहे । ध्यानचि देईना ॥१६५॥

ऐसे स्वर्गीचे की ऐहिक । भोग होत इच्छेचे पाईक । परि भोगणे न रुचे सुख । मनासी तैसे ॥१६६॥

हे असो, करिताही कोडकोतुक । जीव अभिलाषी न देख । ऐसी दशा जी एक । ती जाण अनासक्त ॥१६७॥

मधमाशांसी सुखकर मोहोळ । वा जळचरां जैसे जळ । की पक्ष्यांसी अंतराळ । मोकळे हे ॥१६८॥

अथवा बालकाचे उद्देशें । मातेचे लाघव जैसे । की वसंताचे स्पर्शें । मऊ मलयानिलही ॥१६९॥

प्रिय वस्तु भेटता डोळियाम सुक । की पिलांसी कासवीची दिठी पोषक । तैसी भूतमात्रीं वागणूक । स्नेहाळ ती ॥१७०॥

अति मृदु स्पर्शिता । सुस्वाद ये मुखीं ठेविता । सुवास ये वास घेता । तैसाचि अंगें उजळ; ॥१७१॥

तो आवडे तेवढा घेता । जर घातक न होता । तर येथ उपमेसी येता । कापूरचि की ॥१७२॥

पंचमहाभूते पोटीं वाहे । तैसेचि परमाणुमध्ये सामावे । या विश्वानुसार आकारताहे । गगन जैसे ॥१७३॥

काय सांगू ऐसे जिणे । जे जगाचे जीवितास्तव जगणे । तया नाव मार्दव म्हणे । अगा, मीही ॥१७४॥

राजा पराजयाने । कष्टी होय लाजेने । मानी पुरुष हीनदशेने । कष्टी होय जैसा ॥१७५॥

वा अधमाचे घरापाशी । अवचित येता संन्यासी । मग लाज वाटे जैसी । श्रेष्ठा तया ॥१७६॥

रणातुनी पळ काढणे । कोण क्षत्रिय साहे लाजिरवाणे ? । की वैधव्यदर्शक पाचारणे । महासतीसी ? ॥१७७॥

रूपवाना उदयले कुष्ठ । की संभाविता लागे आळाचे बोट । तया लाजेने प्राणसंकट । होय जैसे; ॥१७८॥

साडेतीन हात देहें । जे शव होउनि राहावे । जन्मजन्मोनि मरावे । पुन्हा पुन्हा ॥१७९॥

त्या गर्भमेदमुशीतुनी । रक्तमूत्ररसातुनी । ओतीव पुतळा होऊनि । राहणे ते लाजिरवाणे ॥१८०॥

हे असो, देहपणें । नावारूपासी येणे । नाही ओशाळवाणे । याहूनि काही ॥१८१॥

ऐसी होय अवकळा । म्हणोनि देहाचा ये कंटाळा । ती लाज केवळ निर्मळा । निलाजर्‍या ते गोडचि ॥१८२॥

आता कळसूत्रे तुटती । तर बाहुत्याचि थांबति । तैसी प्राणजयें खुंटे गती । मर्मेंद्रियांची ॥१८३॥

की मावळता दिनकर । सरे किरणांचा विस्तार । तैसा मनोजयें व्यापार । ज्ञानेंद्रियांचा ॥१८४॥

मन-प्राणांचे नियमन ठाम । दाही इंद्रिये होत अक्षम । जे म्हणती चापल्य वर्म । ते ऐसे होय ॥१८५॥

पवित्रता क्षमा तेज धैर्य अद्रोह नम्रता
हे त्याने गुण जो आला दैवी संपत्ति घेउनी ॥३॥

भयानक मरणाऐसे । तेही आले अग्निप्रवेशें । तरी प्राणेश्वरोद्देशें । न गणीचि सती ॥१८६॥

आत्मनाथाची लागता चिंता । विशयविषाची बाधा नाशता । शून्याचे काटेरी पथा । धावणे आवडे ॥१८७॥

न ठाके निषेध आड । न पडे विधींची भीड । न उपजेचि जीवीं कोड । महासिद्धींचे ॥१८८॥

ऐसे ईश्वराकडे निज । धावे आपणचि सहज । तयाचे नाव तेज । आध्यात्मिक ते ॥१८९॥

साहणार्‍यात माझाचि महिमा । ऐशा गर्वा न ये, तीचि क्षमा । जैसे देह वाहतसे रोमां । परि वाहे, हे न जाणे ॥१९०॥

मातले इंद्रियांचे वेग । की प्रारब्धें खवळले रोग । अथवा योग-वियोग । प्रिय-अप्रियांचे; ॥१९१॥

या आघव्यांचाचि थोर । एके वेळे येता पूर । तरि अगस्ती की होउनि धीर । उभा ठाके ॥१९२॥

आकाशीं धुराची रेखा । बहु जोमें उठता देखा । वारा झुळुकेत एका । गिळी जैसा ॥१९३॥

तैसे आधिभौतिक आधिदैविक अतएव । अथवा आध्यात्मिकही उपद्रव । येउनि टाकता जे धैर्य । गिळूनि टाकी तयां ॥१९४॥

आता ईश्वरप्राप्तीलागी । प्रवर्तता ज्ञान-योग-मार्गीं । धैर्याची अंगीं । उणीव नसे ॥१९५॥

ऐसे चित्तक्षोभाचे अवसरीं । धैर्या उचलुनि जी दृढ करी । धृति म्हणावे, अवधारी, । तिजसी गा ॥१९६॥

घडविला शुद्ध कनकें । भरिला अमृतमय गंगोदकें । त्या कलशासारिखे । पावित्र्य असे ॥१९७॥

जयाअंगी निष्काम आचार । जीवीं विवेक खरोखर । तो अंतर्बाह्य घडला आकार । शुचित्वाचा ॥१९८॥

पाप ताप फेडित । तीरींचे वृक्ष पोषित । समुद्रा जळ जात । गंगेचे जैसे ॥१९९॥

अंधत्व फेडित जगाचे । राउळ उघडित लक्ष्मीचे । जैसा भास्कर निघे चराचराचे । प्रदक्षिणेसी ॥२००॥

तैसे बद्धासि मुक्त करित । बुडल्या वर काढित । साकडी फेडित । आर्तजनांची; ॥२०१॥

किंबहुना दिवस-रात । इतरांचे सुख उन्नत- । करित करित आत्महित । साधणे जे; ॥२०२॥

आपुल्या कामास्तव काही । प्राणिमात्रांचे अहित होई । मनीं ऐसे संकल्पही । न करणे जे; ॥२०३॥

अगा अद्रोहत्व ऐशा आता । ऐकसी ज्या कथा । ते तैसे ये पाहता । सांगितल्या दृष्टीने ॥२०४॥

आणि गंगा शंभूचे माथ्यावरी । पावोनि संकोचे जैसी खरोखरी । तैसे मान्य असुनिहि सर्वत्र तरी । मानासि लाजणे जे; ॥२०५॥

त्यासचि गा हे सुमती, । अमानित्व ऐसे म्हणती । सांगू पुन्हा पुन्हा किती? । कथिले तेरावे अध्यायीं ॥२०६॥

हे सव्वीस गुण लेवून । ब्रह्मसंपदा वसे जाण । जणु ताम्रपटीं लिखित वतन । मोक्षचक्रवर्ती परमात्म्याचे ॥२०७॥

अथवा ही संपत्ती दैवी । गुणतीर्थांची नित्य नवी । वा विरक्त सगर राजांचे दैवें ही । गंगाचि आली ॥२०८॥

की ही गुणकुसुमांची माला । घेउनि मुक्तिवधुबाला । वैराग्यें निरपेक्ष वराला । शोधित आली ॥२०९॥

जणु या सव्वीस गुणवाती । उजळुनि निरांजनी ज्योती । आत्मा हा प्रिय पती- । तया ओवाळण्य़ा ये गीता ॥२१०॥

अथवा गीतासमुद्रीं उपजली । ही दैवी संपत्तिशिंपली । उकलुनि बाहेरी आली । निर्मळ गुण-मौक्तिके ॥२११॥

बहु काय वानू किती ? । सहज होय अभिव्यक्ती । गुणरासचि दैवी संपत्ती । वर्णियेली ॥२१२॥

आता दुःखाची बळकट वेली । दोषकाटयांनी जरि भरली । तरि व्याख्यांनीं मी घाली । आसुरी संपत्ती ॥२१३॥

त्याज्यचि ती, त्यजावयालागी- । जाणावी जरि निरुपयोगी । तरि ऐकावी ती त्यागालागी । श्रवणशक्ती एकवटुनी ॥२१४॥

वाढविण्या नरकींचे दुःख । अघोरी दोष जाहले एक । तीचि ही गा, देख । आसुरी संपत्ती ॥२१५॥

एकवटती नाना विषे । तया नाव काळकूट ऐसे । तैसी दाटली दोषें । आसुरी संपत्ती ॥२१६॥

दंभ मीपण अज्ञान क्रोध दर्प कठोरता
लाभती गुण हे त्यास ज्याची संपत्ति आसुरी ॥४॥

त्या आसुरी दोषांत सतत । जो मोठेपणाचा डांगोरा पिटत । पार्था, तया म्हणतात । दंभ ऐसे ॥२१७॥

जैसी आपुली जननी । उघड निंदिली जनीं । ती पावनतीर्थचि, परि अध:पतनीं । कारण होय ॥२१८॥

गुरूने उपदेशिल्या विद्येचा, सुभटा । चव्हाटयावरी करिता बोभाटा । ती इष्टदा, परि अनिष्टा । कारण होय; ॥२१९॥

आपण बडता महापुरीं । जी वेगें काढी पैलतीरी । ती नावचि बांधिता शिरीं । बुडवी जैसी ॥२२०॥

आधार जे जीविता । वानुनि अधिक सेविता । अन्नचि ते, परि पंडुसुता । होय विष; ॥२२१॥

जो इहपरलोकींचा सखाचि एक । त्या धर्माचा दाविता दिमाख । तारणारा, परि दोषांसि अनेक । कारण होय ॥२२२॥

वाचेचे चव्हाटयाठायी । घालिता धर्माचा पसारा, पाही । धर्मचि अधर्म होई । तो दंभ जाण ॥२२३॥

आता मूर्खाचे जिभेवर । उडोत शिंतोडे अक्षराचे चार । मगत तो ब्रह्मसभेसीही खरोखर । न मानी जैसा ॥२२४॥

की शिलेदाराचे घोडे । ऐरावताही मानिती थोडे । कुंपणावरिल सरडे । स्वर्गही ठेंगणा म्हणती ॥२२५॥

तृणाचे इंधनीं । आग धावे गगनीं । डबक्यातिल मासा न गणी । सागरा जैसा ॥२२६॥

तैसा माजे स्त्रियें, धनें । विद्या-स्तुति-बहुमानें । जैसे एक दिवसाचेचि परान्नें । दरिद्रि होय उन्मत्त; ॥२२७॥

अभ्रच्छायेची लागता गोडी । करंटा घर मोडी । मृगजळ देखोनि फोडी । तळे मूर्ख; ॥२२८॥

किंबहुना ऐसे ऐसे । उतणे जे संपत्तिमिषें । तो दर्प गा, वेगळेसे- । सांगणे नलगे ॥२२९॥

आणि वेदांवरी विश्वास । विश्वासी पूज्य ईश । जगीं एक तेजस । सूर्यचि हा; ॥२३०॥

जगासी अभिलाशास्पद । असे एक सार्वभौमपद । अथवा न मरणे हे निर्विवाद- । जगा आवडे; ॥२३१॥

म्हणोनि कोणी उत्साहें । वेदा ईश्वरा मानू जाये । ऐकोनि फुगू लागे गर्वें । मत्सर वाढे; ॥२३२॥

म्हणे ईश्वरा खाईन । त्या वेदात विष घालीन । आपुले गौरवीं सर्व साधन । वेचितसे ॥२३३॥

ज्योत न आवडे पतंगा । काजव्या सूर्याचा त्रास अगा । की टिटवीने सागराशी उगा । वैर धरिले ॥२३४॥

तैसा मी नावाचे मोही । ईश्वराचे नावही न साही । वेदाते म्हणे मज ही । सवत जाहली; ॥२३५॥

ऐसा मान्यतेचा पुष्टगंड । तो दुरभिमानी उन्मत्त मूढ । रौरवाचा रूढ । मार्गचि तो हा ॥२३६॥

आणि दुसर्‍याचे सुखलेश । देखण्याचे होय मिष । की चढे क्रोधाचे विष । मनोवृत्तीत ॥२३७॥

शीतल जल भेटे । तापल्या तेलीं आग उठे । वा चंद्र देखोनि पोटीं पेटे । कोल्हा जैसा; ॥२३८॥

विश्वाचे आयुष्य जेणे उजळे । तो सूर्योदय न्याहाळे । आणि फुटती डोळे । पाणी घुबडाचे ॥२३९॥

जगाची सुखपहाट । चोरा मरणाहुनि निकृष्ट । दुधाचे काळकूट । होय सर्पीं; ॥२४०॥

प्राशित समुद्रजळ अगाध । वडवाग्नी अधिकचि होय दग्ध । तयासी न लाभे स्निग्ध- । शांति कधी; ॥२४१॥

तैसे विद्याविनोदविभवें । देखे इतरांची सुदैवें । तों तों रोष दुणावे । तो क्रोध जाण ॥२४२॥

मन सर्पाची कुटी । नेत्रीं बाणांऐसी दृष्टी । बोलणे ती वृष्टी- । इंगळ्यांची; ॥२४३॥

इतर जे क्रियाजात । ते पोलादाची करवत । ऐसे आंतर-बाह्य रखरखीत । जयाचे गा; ॥२४४॥

तो मनुष्यात अधम जाण । काठिण्याचा अवतार पूर्ण । आता ऐक खूण । अज्ञानाची ॥२४५॥

तर शीतोष्ण स्पर्शा । पाषाण न जाणे जैसा । जाणण्या रात्र आणि दिवसा । जन्मांध तो तैसा ॥२४६॥

अग्नी आरंभित भक्षिणे । तेथ खाद्य-अखाद्य न म्हणे । परीस भेद न जाणे । सोन्या-लोहात ॥२४७॥

नातरी नाना रसीं । शिरे पळी जैसी । परि रसास्वादासी । न जाणेचि ती; ॥२४८॥

अगा वारा न पारखी । आडमार्ग वा सत्पथ की । तैसे कृत्प-अकृत्य-विवेकीं । अंधपण जे; ॥२४९॥

हे स्वच्छ हे गदळ । ऐसे न जाणोनि बाळ । देखे ते सकळ । मुखींचि घाली; ॥२५०॥

तैसे पाप-पुण्याचे खिचडीमुळे । सुख-दुःखरूप भोगिता फळे । बुद्धीसी कडु-मधुर न कळे । ऐसी जी दशा ॥२५१॥

तिचे नाव अज्ञान, पाही । या बोलासी अन्य नाही । ऐसे दोषांचे साही । सांगितले चिन्हा ॥२५२॥

हेचि दोष अंगीं वाही । आसुरी संपत्ती दांडगी होई । जैसे विषय बलिष्ठ सुभगेठायी । जरि अंग सान ॥२५३॥

वडवाग्नी प्रळय विद्युत जैसे । तिन्ही अल्प गमतसे । परि तयां विश्वहि न पुरेसे । प्रानाहुतीसी ॥२५४॥

ब्रह्मदेव जरि जाय शरण । तरि त्रिदोषीं न चुके मरण । त्या तिहींचे दुपटीने जाण । सहा दोष हे ॥२५५॥

या संपूर्ण साही अवगुणांनी । केली हिची उभारणी । म्हणोनि नव्हे ही उणी । आसुरी संपदा ॥२५६॥

परि क्रूर ग्रहांची जैसी । युति व्हावी एकेचि राशीत ऐसी । किंवा येती निंदकापाशी । सर्व पापे; ॥२५७॥

मरणाराचे अंग । व्यापिती अवघे रोग । की कुमुहूर्ती दुर्योग । एकवटती; ॥२५८॥

शेळीचे आयुष्य सरतेवेळी । ड्से सात नांग्यांची इंगळी । तैसी ही पापे सगळी । घेरिती तया ॥२५९॥

सर्वांवरि विश्वासला चोरा भेटावा । वा शिणला महापुरीं पडावा । तैसे दोषी नरा वेटाळाया । अनिष्टचि ये ॥२६०॥

आणि मोक्षमार्गीयांकडे । जेव्हा याचा शिंतोडा उडे । तेव्हा न निघेचि म्हणुनि बुडे । संसारीं तो ॥२६१॥

अधम योनींच्या पायर्‍या । उतरत ओ धनंजया । तळीं स्थावराचिया । येऊनि पडे ॥२६२॥

हे असो, तयाचे ठायी । मिळोनि हे दोष साही । आसुरी संपत्ती ही । वाढविती ॥२६३॥

सुटका करिते दैवी आसुरी बंध घालिते
भिऊ नकोचि आलास दैवी संपत्ति जोडूनी ॥५॥

या दोहींमाजी पहिली । दैवी जी म्हटली । ती मोक्षसूर्यें उदयली । उषाचि जाण ॥२६५॥

अन्य जी दुसरी । संपत्ती आसुरी । ती मोहलोहाची खरी । साखळी जीवा ॥२६६॥

परि हे ऐकून । भय न घेवो तुझे मन । काय रात्रीचा दिन । धाक धरी ? ॥२६७॥

ही आसुरी संपत्ति तया । बंधनकारक धनंजया । जो साही दोषां या । आश्रय होई ॥२६८॥

तू तर पांडवा, । या दैवी गुणांचा बरवा । मूर्तिमंत ठेवा । जन्मलासी ॥२६९॥

म्हणोनि तू धनंजया । दैवी संपत्तीचा या । स्वामी होऊनि कैवल्याचिया । पावावे सुखा ॥२७०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP