समओवी ज्ञानेश्वरी - अध्याय सातवा

ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी या तिन्ही ग्रंथांतून काव्य आणि तत्वज्ञान संत ज्ञानेश्वर आपल्या विलक्षण भाषासौंदर्याने मराठी माणसाला विस्तारून सांगतात.


श्रीभगवान् म्हणाले:
प्रीतीने आसरा माझा घेउनी योग साधित
जाणशील तसे ऐक समग्र मज निश्चित ॥१॥
विज्ञानासह ते ज्ञान संपूर्ण तुज सांगतो
जे जाणूनि पुढे येथे जाणावेसे न राहते ॥२॥

ऐका मग तो अनंत । पार्थासि असे म्हणत । अगा तू योगयुक्त । जाहलासि आता ॥१॥
मज जाणशील परिपूर्ण । जैसे तळहातीचे रत्न - । ऐसे तुज सांगेन ज्ञान । आणि विज्ञानही ॥२॥
विज्ञानाचे काय येथ । ऐसे जरि मनीं येत । तरि तेचि जाणावे लागत । आधी बाबा ॥३॥
मग ज्ञानाचिये वेळे । झाकती जाणिवेचे डोळे । जैसी तीरीं टेकली न ढळे । नाव कधी; ॥४॥
जाणीव जेथ न शिरे । विचार मागुता फिरे । तर्काचे चातुर्य अपुरे । ज्या ब्रह्मस्थानीं; ॥५॥
अर्जुना तया नाव ज्ञान । उर्वरित प्रपंच ते विज्ञान । त्यासचि सत्य म्हणणे अज्ञान । हेही जाण ॥६॥
आता अज्ञान अवघे हरपेल । विज्ञान निःशेष जळेल । आणि आपल्यातचि प्रकटेल । मूर्तिमंत ज्ञान; ॥७॥
ऐसे वर्म जे गूढ । ते होईल शब्दारूढ । थोडयानेही पुरेल कोड । बहुत मनाचे ॥८॥
जेणे सांगणार्‍याचे बोलणे खुंटे । ऐकणार्‍याचा हव्यास तुटे । हे सान, हे मोठे । हा भेदभाव नुरे ॥९॥

लक्षावधीत एखादा मोक्षार्थ झटतो कधी
झटणार्‍या एखादा तत्त्वता जाणतो मज ॥३॥

अगा एखाद्यासचि सहस्त्रात । ज्ञानाचा ध्यास येथ । आणि मज परमेशासी जाणित । ऐसा विरळाचि ॥१०॥
जैसे भरल्या त्रिभुवनात । एकेक शूर निवडतात । लक्षावधी सैन्य ठेवितात । जमवुनी; ॥११॥
आणि त्यातही जेव्हा । तलवारी घालिती घावा । विजयश्रीवरि एकचि तेव्हा । आरूढ होई; ॥१२॥
तैसे ज्ञानेच्छेने महापुरीं । शिरताती कोटीवरी । परी प्राप्तीचे पैलतीरी । एखादाचि निघे ॥१३॥
हे न सामान्य म्हणून । सांगण्या अति गहन । परि आता करितो कथन । ते ऐक ॥१४॥

पृथ्वी आप तसे तेज वायु आकाश पाचवे
मन बुद्धि अहंकार अशी प्रकृति अष्टधा ॥४॥

तर अवधारी गा धनंजया । मह‍तत्त्वादि माझी माया । जैसी प्रतिबिंबे छाया । आपुल्या देहाची; ॥१५॥
हिलाचि म्हणती प्रकृती । हिचे आठ प्रकार असती । हिजपासूनि होई उत्पत्ती । त्रैलोक्याची ॥१६॥
ही आठ प्रकारें भिन्न कैसी । ऐसे धरिसी जरि मानसीं । तर तेचि आता ऐकिसी । विवेचन ॥१७॥
आप, तेज, गगन, । पृथ्वी, वायू, मन । बुद्धि, अहंकार, हे भिन्न । आठ भाग ॥१८॥

ही झाली अपरा माझी दुसरी जाण ती परा
जीवरूपें जिने सारे जग हे धरिले असे ॥५॥

आणि या आठांची जी समस्थिती । ती माझी परम प्रकृती । पार्था, तिजसी म्हणती । जीव ऐसे ॥१९॥
जी देहादिकां जीवनदायी । चेतनेसी चेतवी । मनावया लावी मनाकरवी । शोक मोह ॥२०॥
बुद्धीचे जाणतेपणा । हिचे जवळिकेकारण । हिच्या अहंभावाचे कुशलपण । करी धारण जगासी ॥२१॥

ह्या दोहींपासुनी भूते सगळी जाण निर्मिली
सार्‍या जगास तद‍द्वारा मूळ मी आणि शेवट ॥६॥

ती सूक्ष्म प्रकृती सहजगत । स्थूळ अंगा घडवीत । तेव्हा भूतसृष्टीची सुरू हेत । टांकसाळ ॥२२॥
चार परींच्या आकृती । आपोआप उमटू लागती । मोलें समान असती । परि आकार भिन्न ॥२३॥
चौर्‍याऐंशी लक्ष प्रकारें ऐसी । सीमा नाही भांडारासी । भरे मायेचा गाभारा चुटकीसरशी । प्राणिरूप नाण्यांनी ॥२४॥
ऐसी महाभूतांची । नाणी पडती एकेचि तोलाची । गणती ठेवितसे त्यांची । प्रकृतीचि एक ॥२५॥
आखणी करुनि जे घडवी । तेचि नाणे मग आटवी । मध्ये चालवी तयांकरवी । कर्माकर्मव्यवहार ॥२६॥
परि असो हे रूपक । सांगतो विवरुनी, ऐक । हा नामरूपाचा पसारा, एक । प्रकृतीचि मांडी ॥२७॥
प्रकृति वेगळी न मजहून । माझ्यातचि ती भासमान । आदि - मध्य - अंत - म्हणून । मीचि जगासी ॥२८॥

दुसरे तत्त्व नाहीचि काही माझ्या पलीकडे
ओविले सर्व माझ्यात जसे धाग्यामधे मणी ॥७॥

हे जे दिसे मृगजळ । तयाचे पाहू जाता मूळ । सूर्यकिरण ना केवळ । प्रत्यक्ष सूर्यचि ॥२९॥
अर्जुना, प्रकृतीचीच निर्मिती । लया जाईल सृष्टीअंतीं । आणि पावेल मूळ स्थिती । ती मीचि आहे ॥३०॥
उपजे, दिसे न दिसे । ते सर्व माझ्यातचि असे । मी विश्व धरिले, जैसे - । सूत्राने मणी ॥३१॥
सुवर्णाचे मणी केले । ते सोन्याचे सुतीं ओविले । तैसे मी जग धरिले । सबाह्य - अभ्यंतरी ॥३२॥

पाण्यात रस मी झालो चंद्रसूर्यीं प्रकाश मी
ॐ वेदीं शब्द आकाशीं पुरुषीं पुरुषार्थ मी ॥८॥
मी पुण्यगंध पृथ्वीत असे अग्नीत उष्णता
प्राणिमात्रात आयुष्य तपोवृद्धांत मी तप ॥९॥

म्हणोनि रसगुण जो जळात । स्पर्शगुण पवनात । तेजोगुण चंद्र - सूर्यात तो मीचि जाण ॥३३॥
तैसाचि नैसर्गिक शुद्ध । मी पृथ्वीचे ठायी गंध गगनीं मी शाब्द । वेदीं ॐ कार ॥३४॥
मनुष्याठायी मनुष्यत्व । जे अहंपणाचे सत्त्व । ते पौरुष मी, हे तत्त्व । सांगतसे तुज ॥३५॥
अग्नी ऐशा नावाचे । कवच तेजावरि वरवरचे । ते दूर करिता, साचे । निजतेज ते मी ॥३६॥
आणि नानाविध योनींत । त्रिभुवनीं प्राणी जन्मत । आहार सेवुनी राहत । आपुलाला; ॥३७॥
कोणी वाराचि पिती । कोणी तृणावरी जगती कोणी अन्नाधारें रहाती । जळ सेवुनि कोणी; ॥३८॥
ऐसे प्राण्यांसी भिन्न भिन्न । जे प्रकृतिवशें जीवन । त्या अवघ्याठायी अभिन्न । मीचि एक ॥३९॥

सर्व भूतात जे बीज ते मी जाण सनातन
बुद्धिमंतात मी बुद्धि तेजस्व्यातहि तेज मी ॥१०॥
वैराग्ययुक्त निष्काम बळवंतात मी बळ
राहे धरूनि धर्मास ती मी भूतात वासना ॥११॥

जे उत्पत्तीचे अवसरे । वाढे गगनाचे अंकुरें । जे अंतीं गिळी अक्षरे । ॐ काराची ॥४०॥
हा विश्वाकार असे जोवरी । जे विश्वाचिसारखे तोवरी । मग प्रळयकाळीं परी । निराकार; ॥४१॥
ऐसे अनादि जे सहज । ते गा मी विश्वबीज । तुझिया तळहातीं आज । दे असे ॥४२॥
हे उघड जाणुनी पांडवा - । पोचशील विचारांच्या गावा । उपयोग तयाचा बरवा । देखशील ॥४३॥
असोत परि हे शब्दालाप । सांगतो करुनि संक्षेप । तपस्व्याठायी जे तप । ते स्वरूप माझे ॥४४॥
बलवतांमाजी जे बळ । ते मीचि जाण अढळ । बुद्धिमंतीं केवळ । बुद्धि ती मी ॥४५॥
प्राणिमात्रांठायी काम । तो मी, म्हणे आत्माराम । जयायोगें अर्थ, धर्म,- । हे पुरुषार्थ साध्य ॥४६॥
एरवी विकार जेव्हा बळावत । इंद्रियां प्रिय ते करीत । परि धर्माचे विरोधात । जाऊ न देई ॥४७॥
निषिद्ध कर्माची आडवाट सोडुनी । जाई विधियुक्त मार्गांनी । नियमाचा मशालजी सर्व घेउनी । चालतसे ॥४८॥
ऐशा रीतीने काम चालता । धर्माची होई पूर्तता । मोक्षतीर्थीं मुक्तता । संसारी जनांसी ॥४९॥
वेदगौरवाचे मांडवीं । काम सृष्टीचा वेल वाढवी । मग कर्मफलासह पालवी । मोक्षासि टेके ॥५०॥
ऐसा काम जो नियमित । प्राणिमात्रांसि बीजभूत । तो मीचि, म्हणतात । योगीश्रेष्ठ श्रीकृष्ण ॥५१॥
हे एकेक किती सांगावे । आता वस्तुजातचि आघवे । मजपासुनी जाणावे । विस्तारले असे ॥५२॥

माझ्यातूनि तिन्ही झाले सात्त्विकादिक भाव ते
परी त्यत न मी राहे तेचि माझ्यात राहती ॥१२॥

जे काही सात्त्विक भाव असती । वा राजस तामस देहीं वसती । ममरूपेंचि ते उपजती । ओळख तू ॥५३॥
जाहले जरि माझे ठायी । तरि तयांमाजी मी नाही । जैसी स्वप्नींचे डोहीं । जागृति न बुडे ॥५४॥
जैसे रसेंचि भरदार । बीज होई डौलदार । परि तया फुटे जो अंकुर । त्याचेचि होई काष्ठ ॥५५॥
त्या काष्ठाचे ठायी । असे का बीजपण काही? । तैसा मी विकारी नाही । जरि विकारला दिसे ॥५६॥
गगनीं भरे आभाळ । परि आभाळीं न गगन केवळ । वा आभाळीं जरि असे जळ । जळीं नसे अभ्र ॥५७॥
याचि जळचे आवेशात । प्रगटले तेज लखलखीत । मग काय त्या विजेत । पाणी असे? ॥५८॥
अग्नीपासुनि धूर होई । अग्नि असे का त्या धुराठायी? । तैसा मी विकारी नाही । जरि विकारला दिसे ॥५९॥
ह्या गुणात्मक भावांनी विश्व मोहूनि टाकिले
ज्यामुळे मी न जाणू ये गुणातीत सनातन ॥१३॥

पाण्यावरी शेवाळ येत । ते पाण्यासी झाकित । की ढगात आभासत । लोपले आकाश ॥६०॥
अगा, लटिके म्हणता ये स्वप्न । परि निद्रावशें अनुभविता आपण । राहे काय आठवण । स्वतःची स्वतःसी? ॥६१॥
हे असो, डोळ्यातिल पाणी डोळ्यावरी । पडदाचि रची खरोखरी । आणि पाहणे डोळ्याचे नातरी । काय न गिळे? ॥६२॥
तैसी ही त्रिगुणात्मक माया । माझीचि की जणु छाया । पडद्यापरि आड माझिया । आली असे ॥६३॥
म्हणूनि प्राणी मज न जाणिती । माझेचि परि मी न होती । जळींची जळीं न विरती । मौक्तिके जैसी ॥६४॥
मातीचा घट घडवीत । कच्चेपणी मिसळे मातीत । परि तो भाजता अग्नीत । वेगळाचि होई ॥६५॥
तैसे जे भूतजात होय । साच ते माझेचि अवयव । परि मायायोगें सर्व । जीवदशेसि येती ॥६६॥
माझेचि परि मी नव्हत । माझेचि, मज न ओळखत । मी माझेपण यात भ्रांत । विषयांध जाहले ॥६७॥

माझी ही त्रिगुणी दैवी माया न तरवे कुणा
कासेस लागले माझ्या तेचि जाती तरूनिया ॥१४॥

महत‍तत्त्वादि माझी माया । पार करोनि धनंजया । मद्रूपासी मिळावया । कैसे साधावे? ॥६८॥
ब्रह्माचलाचा तुटका कडा । उसळे मायाजळाचा संकल्पलोंढा । तेथ महाभूतांचा बुडबुडा । सान आला ॥६९॥
जी सृष्टिविस्ताराचे ओघीं । कालगतीचे वेगीम । प्रवुत्ति - निवृत्तीचे लंघी । उत्तुंग काठ; ॥७०॥
जी गुणमेघांचे वृष्टिभरें । भरली मोहाचे महापुरे । घेउनि जात नगरे । यमनियमांची; ॥७१॥
जेथ द्वेषाचे आवर्त दाटती । मत्सराचे वळसे पडती । आणि प्रमाद आदि तळपती । महामासे; ॥७२॥
जेथ प्रपंचाची वळणे अपार । कर्मअकर्माचा येई पूर । तरे पुराड त्यावर । सुखदुःखांचे ॥७३॥
आदळती रतीचिया बेटावरी । कामवासनेच्या लाटा वरचेवरी । दिसे फेसाळला काठावरी । जीवसमुदाय ॥७४॥
अहंकारप्रवाहामुळे । विद्या - धन - कुल - मद उफाळे । लाटेवरी लाट उसळे । विषयोर्मींची; ॥७५॥
जेथ लोंढे उदय - अस्तांचे । पाडती खळगे जन्म - मृत्यूंचे । बुडबुडे पंचमहाभूतांचे । होती जाती; ॥७६॥
मोह - भ्रांतीचे मासे । गिळिती धैर्याची आमिषे । तेथ भोवरे घेती वळसे । अज्ञानाचे; ॥७७॥
भ्रांतीचे गढूळ पाण्यात । प्राणी रुतती आशेचे गाळात । रजोगुणांचा खळाळ गर्जत । स्वर्गापावत; ॥७८॥
तमोगुणाची प्रबळ धार । सत्त्वगुणाचे स्थिरपण गंभीर । तरुनि जाणे अवघड फार । मायानदी ही ॥७९॥
पुनर्जन्माच्या लाटा उसळती । सत्यलोकींचे बुरुजीं आदळती । ब्रह्मांडाचे धोंडे कोसळती । आघातांनी ॥८०॥
पाण्याचा वेग अपार । अजुनी ओसरेना भर । ऐसा हा मायेचा पूर । तरवेल कोणा? ॥८१॥
येथ आणिक एक विस्मय । तरण्या जे जे करावे उपाय । ते सारेचि ठरती अपाय । कैसे ऐक ॥८२॥
आपुल्या बुद्धिभळावरि काही । शिरले त्यांचा थांगचि नाही । कोणा ज्ञानाचे डोहीं । गर्वें गिळिले ॥८३॥
तीन वेदांचे तराफे केले । परि अहंकाराचे धोंडे बांधिले । ते सगळेचि गेले । मदमत्स्यांचे तोंडी ॥८४॥
कोणी तारुण्याचे बळावरी । मदनाची कास धरी । तयां विषयमगरी । टाकिती चघळुनी ॥८५॥
वार्धक्यलाटेवरी तरंगती । मतिभ्रंशाचे जाळ्यात अडकती । अगा, जखडले जाती । चहूकडुनी ॥८६॥
शोककडयावरी आदळती । क्रोधाचे भोवर्‍यात गरगरती । आपत्तींची गिधाडे टोचती । वर येऊ पाहता ॥८७॥
दुःखाचे चिखलीं बरबटले । मरणाचे गाळीं रुतले । ऐसे विषयानादीं लागले । ते गेले वाया ॥८८॥
जज्ञक्रियेची पेटी तेथ । कोणी पोटीं बांधित । ते अडकती कपारीत । स्वर्गसुखाच्या ॥८९॥
कोणा मोक्षीं लागण्याची आशा । कर्मबळावरि ठेविती भरवसा । परि तयां पडला वळसा । विधिनिषेधांचा ॥९०॥
वैराग्याची नाव शिरेना । विवेकाचा वेळू पोचेना । परि क्वचित् योगसाधना । तरवितसे ॥९१॥
ऐसे अंगीचे सामर्थ्याने । ही मायानदी तरणे । ए कशासारिखे बोलणे । म्हणावे गा;? ॥९२॥
अपथ्येंही व्याधी पळे । साधूसि दुर्जनाची बुद्धि कळे । जर ऐश्वर्य लाभले - । त्यागील लोभी; ॥९३॥
जर चोरां सभा घाबरेल । अथवा मासा गळ गिळील । वा भेकड हल्ला करील । पिशाच्चावरी; ॥९४॥
जर पाडस जाळे तोडी । मुंगी मेरू ओलांडी । तरचि मायेची पैलथडी । देखती जीव ॥९५॥
म्हणोनि जैसी, हे पंडुसुता. । स्त्री न जिंकिता ये विषयासक्ता । तैसी मायामय ही सरिता । न तरवे कोणा ॥९६॥
येथ एकचि लीलया तरले । जयांनी सर्वभावें मज भजले । तयां ऐलथडीचि सरले । मायाजळ ॥९७॥
जयांपुढे नावाडी सद्‍गुरू । जे अनुभवाची कास लागती धरू । ते प्राप्त करुनि घेती तारू । आत्मबोधाचे ॥९८॥
अहंभावाचे ओझे फेकिती । विकल्पाचे वारे चुकविती । ओहोटीचे ओघ टाळिती; । आसक्तीचे ॥९९॥
ऐक्याचा उतार गाठित । आत्मबोधाचे तारू घेत । मग पैलतीरा जे झेपावत । निवृत्तीच्या; ॥१००॥
ते वैराग्यकरांनी पाणी कापित । सोऽहंभावबळें तरत । मग अनायासे गाठित । निवृत्तितट ॥१०१॥
ऐसे जे मज भजती । तेचि माझी माया तरती । ऐसे भक्त क्वचित असती । बहुत नव्हे ॥१०२॥

हीन मूढ दुराचारी माझा आश्रय सोडिती
मायेने भ्रांत होऊनि आसुरी भाव जोडिती ॥१५॥
भक्त चौघे सदाचारी भजती मज अर्जुना
ज्ञानी तसेचि जिज्ञासु हितार्थी आणि विव्हल ॥१६॥

कारण बहुतांश अन्यांवर । अहंकाराचा भूतसंचार । म्हणोनि पडिला विसर । आत्मबोधाचा ॥१०३॥
त्यावेळी नियमांचे वस्त्र न आठवे । अधोगतीची लाज न जाणवे । आणि वेद म्हणती, न करावे - । तेचि करिती ॥१०४॥
या शरीराचिया गावा । ज्यास्तव आलो पांडवा, । तो कार्यभाग आघवा । सोडूनिया; ॥१०५॥
इंद्रियग्रामींचे राजमार्गांत । अहंकारें बडबडत । नाना विकारांचे जमवीत । जथे जैसे ॥१०६॥
दुःख - शोकाचे घाव । बैसल्याचे नुरे नाव । सांगावयाचे कारण जीव । मायेने ग्रासले ॥१०७॥
म्हणोनि ते मज मुकले । परि चौघांनी मज भजले ।  जयांनी आत्महित केले । वृद्धिंगत ॥१०८॥
तो पहिला आर्त म्हणावा । दुसरा जिज्ञासु गणावा । तिसरा अर्थार्थी जाणावा । ज्ञानी चौथा ॥१०९॥

ज्ञनी वरिष्ठ सर्वात नित्ययुक्त अनन्य जो
अत्यंत गोड मी त्यास तोहि गोड तसा मज ॥१७॥

आर्त पीडेचे निमित्ताने । जिज्ञासु ज्ञानलालसेने । अर्थार्थीं द्रव्यलोभाने । भजे मज ॥११०॥
मग चौथ्याचे मजठायी । काहीचि मागणे नाही । म्हणोनि भक्त एक, पाही - । ज्ञानी जो ॥१११॥
त्या ज्ञानाचे प्रकाशात । भेद - अभेदाचा अंधार फिटत । मग समरसून मीचि होत - । तो भक्तहि राहे माझा ॥११२॥
आणिकांचिये दिठीसि क्षणैक । जैसा स्फटिकचि भासे उदक । तैसे नव्हे हे, तो मी एक । किती सांगावे कौतुक? ॥११३॥
वारा गगनीं विरे । मग वारेपण वेगळे नुरे । परि भक्तपण तयाचे न सरे । जरि मद्दूप जाहला ॥११४॥
कोणी वारा हलवी । तो गगनावेगळा दिसेही । तो गगनचि असे एरवी । सहजी जैसा; ॥११५॥
तैसे आचरिता शारीर कर्मे । तो भक्त ऐसा गमे । परि अंतरानुभवधर्में । मीचि जाहला ॥११६॥
आणि ज्ञानाचे उदयाने । मी आत्मा हे तो जाणे । म्हणूनि मीही उचंबळुनि म्हणे । आत्माचि तया ॥११७॥
अगा जिवापैलची खूप । ओळखूनि जो वावरे जान । तया देहाचे वेगळेपण । काय वेगळे करी? ॥११८॥

उदार हे जरी सारे ज्ञानी तो मीचि की स्वयें
जोडला स्थिर माझ्यात गति अंतिम पाहुनी ॥१८॥

म्हणोनि आपुलाल्या हिताचे लोभें । कोणीही भक्त मज झोंबे । परि मीचि प्रीती आरंभे । ऐसा ज्ञानी एक ॥११९॥
पहा, दुभत्याचे आशेने । जग बांधी गाईस दोराने । परि वासरू तिचे तान्हे । कैसा मिळवी पान्हा? ॥१२०॥
तनमनप्राणें तेही । न जाणेचि आणिक काही । झेपचि घेई. पाहुनि कोणाही । मायचि की म्हणुनी ॥१२१॥
ऐसी जयाची अनन्य गती । धेनूही करि तैसीचि प्रीती । यास्तव बोलिले लक्ष्मीपती । साचचि ते ॥१२२॥
हे असो, मग बोलिले । जे अन्य तुज कथिले । तेही भक्त असती भले । आवडती आम्हा ॥१२३॥
परि जाणोनि मज खराखुरा । मागुते पाही न संसारा । जैसी सरिता मिळता सागरा । वळे न मागे; ॥१२४॥
तैसी अंत: करणकुहरीं उपजली । जयाची प्रतीतिगंगा मज मिळाली । तो मीचि ही बोली । फार किती बोलू ॥१२५॥
एरवी ज्ञानी जया म्हणावे । तो चैतन्यचि मम जाणावे । हे न म्हणे, परि काय करावे । बोलूनि गेलो ॥१२६॥

अनेक जन्म घेऊनि पावला शरणागति
विश्व देखे वासुदेव संत तो बहुत दुर्लभ ॥१९॥

जी ती विषयांची दाट झाडी । त्यात काम-क्रोधाची साकडी - । चुकवुनि, आला पहाडीं । सद्वासनेच्या ॥१२७॥
मग संतांसवे पार्था, । धरी सत्कर्माचे पथा । कुकर्माचा आडरस्ता । डावलुनी ॥१२८॥
शतजन्मांच्या प्रवासात । कलाशेचे पायतण लेऊ न जाणत । फलहेतूचा कोण तेथ । हिशेब करी? ॥१२९॥
देहतन्मय रात्रीत । तो एकटा असता धावत । कर्मक्षय होऊनि प्रभात । ज्ञानोदयीं झाली ॥१३०॥
गुरुकृपेची उषा उजळली । ज्ञानाची कोवळी तिरीप आली । ब्रह्मैक्याची खाण उघडली । तयाचे दिठीसी ॥१३१।
त्यावेळी तो जिकडे पाहे । तिकडे मीचि तया आहे । अथवा निवांत जरि राहे । तरि मीचि तया ॥१३२॥
हे असो, आणिक काही । तया सर्वत्र मजवाचुनि नाही । जैसे अंतर्बाह्य जळ डोहीं - । बुडालेल्या घटा ॥१३३॥
तैसा तो मजअंतरीं । मीचि तया आतबाहेरी । शब्दांनी सांगण्यापरी । नसेचि हे ॥१३४॥
असो हे यापरी, म्हणुनी - । तया लाभती ज्ञानाच्या खाणी । त्या लाभें सावरुनी । विश्व आपलेसे करी ॥१३५॥
हे समस्तही श्रीवासुदेव । ऐसा प्रतीतिरसाचा ओतला भाव । म्हणोनि भक्तांमाजी राव । आणि ज्ञानीही तोचि ॥१३६॥
जयाचे प्रतीतिभांडार । सामावुनि घेई चराचर । ऐसा महात्मा खरोखर । दुर्लभ असे ॥१३७॥
अन्य बहु असती किरीटी । जयांची भजने भोगासाठी । आशातिमिरें जयांची दृष्टी । मंद जाहली ॥१३८॥

भ्रमले कामनाग्रस्त धुंडिती अन्य दैवते
स्वभाववश होऊनि तो तो नियम पाळिती ॥२०॥

आणि फळाचे हावेने । शिरकाव केला कामाने । की तयाचे घसटीने । विझे ज्ञानाचा दिवा ॥१३९॥
अंतर्बाह्य अंधारीं बुडती । निकट असून मज मुकती । मग सर्वभावें अनुसरती । अन्य देवतांसी ॥१४०॥
आधीचि मायेचे आधीन । वरि भोगासाठी दीन । मग लोलुप होऊन । किती भजती कौतुकें ॥१४१॥
नियम सर्व जाणुनि घेती । पूजासामुग्री जमविती । यथाविधी अर्पण करिती । शास्त्रेक्तपणें ॥१४२॥

श्रद्धेने ज्या स्वरूपास जे भजू इच्छिती जसे
त्यांची तीचि तशी श्रद्धा स्थिर मी करितो स्वये ॥२१॥

तो ज्या देवतांसी खरोखरी । भजावयाची इच्छा धरी । तयाची ती इच्छा पुरी - । करविता मी ॥१४३॥
देव - देवी मीचि, हाही - । निश्चय त्यासि नाही । भाव त्या त्या ठायी । वेगळाले धरी ॥१४४॥

त्या श्रद्धेच्या बळाने ते त्या स्वरूपास पूजिती
मग मागितले भोग पावती मीचि निर्मिले ॥२२॥

मग तो श्रद्धायुक्त । करी आराधन जे उचित । कार्यसिद्धी होइतों समस्त । चालवीतसे ॥१४५॥
ऐसे जो जे फळ इच्छित राही । ते तया प्राप्त होई । परि निपजे सकळ तेही । मजपासूनचि ॥१४६॥

अल्प बुद्धीमुळे त्यांस मिळे फळ अशाश्वत
देवांचे भक्त देवांस माझे ते मज पावती ॥२३॥

ते भक्त मज न जाणिती । कल्पनेबाहेरी न निघती । म्हणोनि कल्पित फळ पावती । नाशवंत ॥१४७॥
किंबहुना ऐसे भजन । संसाराचेचि साधन । तो फळभोग असे स्वप्न । जे क्षणैक दिसे ॥१४८॥
असो हे राहू देत । जे जयाचे आवडते दैवत । तया जर तो पूजित । तर देवत्वा त्याचि पावे ॥१४९॥
जे तनमनप्राण अर्पुनी । निरंतर माझेचि भजनीं । ते देहाचे निर्वाणीं । मीचि होती ॥१५०॥

व्यक्त मी हेचि ते घेती बुद्धिहीन न जाणुनी
अव्यक्त थोर जे रूप माझे अंतिम शाश्वत ॥२४॥

परि प्राणी तैसे न करिती । वृथा आपुले हित सोडिती । जे पाण्यात पोहती । तळहातींचे ॥१५१॥
अमृताचे सागरीं बुडावे । परि तोंड वज्रमिठीत धरावे । आणि मनीं मात्र आठवावे । डबक्यातील पाणी; ॥१५२॥
हे ऐसे कासया करावे? । अमृतीं शिरूनही मरावे । सुखें अमृतचि का न व्हावे । अमृतामाजी? ॥१५३॥
तैसा फळहेतूचा पिंजरा । झुगारूनि धनुर्धरा , । अनुभवपंखांनी चिदंबरा । का न जिंकावे? ॥१५४॥
जावे जितुके जितुके वर । तेवढा सुखें करण्या संचार । उडावया लाभे विस्तार । आपुल्या इच्छेऐसा ॥१५५॥
अमर्यादा माप का लावावे । मज अव्यक्ता व्यक्त का मानावे । साधनांवरी का मरावे । मी सिद्ध असता? ॥१५६॥
परि हा प्रश्न आघवा । जर विचारिसी पांडवा, । तर विशेष या जीवां । न रुचे गा ॥१५७॥

वेढिलो योगमायेने अंधारचि जगास मी
अजन्मा नित्या मी कैसा मूढ कोणी न ओळखे ॥२५॥

योगमायेचे पडद्यामुळे । ते झाले असती आंधळे । म्हणोनि प्रकाशाचेही बळें । न देखती मज ॥१५८॥
एरवी मी नाही । ऐसे कवण वस्तुजात, पाही । कवण जळ रसविरहित राही । सांग अगा, ॥१५९॥
पवन कोण न शिवे? । आकाश कोठे न समावे? । हे असो, एक मीचि आघवे । विश्वीं असे ॥१६०॥

झाली जी जीहि होतील भूते आहेत आज जी
सगळी जाणतो ती मी मज कोणी न जाणती ॥२६॥

प्राणिमात्र जितुके जाहले । ते मीचि होऊनि राहिले । आता आहेत जे सगळे । तेही मीचि ॥१६१॥
भविष्यात जे होतील । तेही मजवेगळे नसतील । हेही बोलणेचि असे केवळ । एरवी काही होय न जाय ॥१६२॥
जैसे दोरीचे सापासी । काळा करडा गव्हाळ ऐसी । संज्ञा न देववे कोणासी । तैसे भूतमात्र मिथ्या ॥१६३॥
ऐसा मी पंडुसुता । सर्वांभूतीं सदा असता । संसार जो लागे भूतजातां । तो वेगळाचि ॥१६४॥
आता थोडी ऐसी । गोष्ट सांगतो, ऐकसी  - । जेव्हा अहंकाराची तनूसी । प्राती जडली; ॥१६५॥

राग-द्वेषांमुळे चित्तीं जडला द्वंद्व - मोह जो
संसारीं सगळी भूते त्याने मोहूनि टाकिली ॥२७॥

तेव्हा इच्छा ही कन्या जन्मली । मग ती कामरूप तारुण्यात आली । आणि द्वेषाची जाहली । वधू ती ॥१६६॥
त्या दोघांचा पुत्र जन्मला । ऐसा द्वंद्व - मोह जाहला । मग तो वाढविला । अहंकार - आजोबांनी ॥१६७॥
हा शत्रु जाहला धैर्या । नियमां जुमानीना भल्या । आशेचे दूध पिउनिया । मातला, धष्टपुष्ट ॥१६८॥
असंतोष - मदिरेने मत्त । पंचविषय - दालनात । विकाररुप स्त्रीसंगत । रमतसे ॥१६९॥
शुद्ध भावाचिये वाटेवरी । विकल्पाचे काटे पेरी । आडवाटा मोकळ्या करी । कुमार्गांच्या ॥१७०॥
तेणें प्राणी भांबावले । संसारअरण्यीं । मग तयांनी सोशिले । महादुःखांचे घाव ॥१७१॥

ज्यांनी झिजविले पाप पुण्यकर्मे करूनिया
ते द्वंद्व - मोह तोडूनि भतती मज निश्चयें ॥२८॥

ऐसे विकल्पाचे निराधार । काटे देखोनि अणकुचीदार । जे मतिभ्रमाची माघार । घेतीचिना ॥१७२॥
सरळ एकनिष्ठ पावलांनी । विकल्प - काटे चिरडुनी । महापातकारण्ये जयांनी । पार केली ॥१७३॥
ते पुण्याची धाव घेती । माझी जवळीक साधिती । किंबहुना तावडीतुनी सुटती । वाटमार्‍यांच्या ॥१७४॥

झटती आश्रयें माझ्या जरा - मृत्यु गिळावया
ते ब्रह्म जाणती पूर्ण तसे अध्यात्म कर्महि ॥२९॥

एरवी तरी पार्था, जन्ममरणाची सरावी कथा । ऐशा यत्ना जयांची आस्था । जन्म देई ॥१७५॥
जयांचा प्रयत्नचि एके वेळे । परब्रह्मरूपें फळे । त्या पिकल्या फळातुनि रस गळे । पूर्णतेचा ॥१७६॥
कृतकृत्यतेने जग भरे । अध्यात्माचे नवल सरे । कर्माचे काम नुरे । नाहीसे होई मन ॥१७७॥
ऐसा अध्यात्मलाभ तया । होय गा धनंजया, । उद्यमीं भांडवल जया । असे मीचि ॥१७८॥
वाढे समवृत्ती तयाची । लाबे समृद्धी ब्रह्मैक्याची । भेदरूप दैन्याचे नुरेचि - । नाव तेथ ॥१७९॥

अधिभूताधिदैवात अधियज्ञात जे मज
देखती ते प्रयाणींहि जाणती मज सावध ॥३०॥

सशरीरें मज वेढुनी । अनुभवाचे हातांनी । अधिदैवासी जयांनी । स्पर्शिले गा; ॥१८०॥
जयां ज्ञानबळाचे वेगें । मी परमात्मा दिसू लागे । कष्टी ना शरीरवियोगें । होती ते ॥१८१॥
एरवी आयुष्याचे सूत्र बिघडता । प्राण्यांची खळबळ उडता । काय न मरणार्‍यांचे चित्ता । युगान्त न गमे? ॥१८२॥
परि कैसे न जाणसी गा? । जे जडले माझिये अंगा । ते प्रयाणाचे कठिण प्रसंगा । नच विसंबती मज ॥१८३॥
करिता सहजी विचार । ऐजे जे निपुण खरोखर । तेचि माझेठायीं स्थिर - । असती योगी ॥१८४॥
परि या शब्दरूपी कुपीतळीं । नव्हतीचि अवधानाची अंजुळी । पळभर अर्जुन त्यावेळी । मागेचि होता ॥१८५॥
वचनफळे ब्रह्मज्ञानाची । नाना रसाळ अर्थांची । दरवळत्या भावसुगंधांची । बहरली होती ॥१८६॥
झुळुक येउनि सहजकृपेची । वचनफळे कृष्णतरूची । अवचित वर्षता अर्जुनाची । भरली श्रवणझोळी ॥१८७॥
जी प्रमेयांचीच घडली । ब्रह्मसागरीं चुबकळली । मग तैसीचि घोळली । ब्रह्मानंदीं ॥१८८॥
त्या बरव्या निर्मळतेमुळे । अर्जुना लागले ज्ञनाचे डोहाळे । तयाने घुटके घेतले । विस्मयामृताचे ॥१८९॥
ती सुखसंपत्ति मिळवुनिया । मग स्वर्गा दावी वाकुल्या । ह्रदयासी आतुनि गुदगुल्या । होती तया ॥१९०॥
ऐसे बाह्म सौंदर्यांचे बरवेपणें । सुख अनुभविले अर्जुनें । तेव्हा रसास्वादाचे हावेने । त्वरा करी ॥१९१॥
मग तर्काचे करतळीं - । घेउनि ती वाक्यफळे सगळी । प्रतीतिमुखीं एके वेळीं । घालू पाहे ॥१९२॥
विचारांचे जिव्हेत न समावती । हेतूंचे दातांनी न फुटती । हे जाणोनि सुभद्रापती । तोंडहि लावीना त्यांसी ॥१९३॥
मग चमत्काराला म्हणे । ही तर जळींची तारांगणे । कैसा फसलो सुलभपणें । अक्षरांचिया? ॥१९४॥
ही पदे नव्हेत साचचि । या गगनाच्या घडयाचि । मारो उडया मति आमुची । थांग न लागे ॥१९५॥
परि ते कळण्याच्या का गोष्टी? । ऐसे मनीं येउनि किरीटी । पुनरपि वळवी दृष्टी । यादवेंद्राकडे ॥१९६॥
मग वीर विनवितसे देवा । अध्यात्म, ब्रह्मादि सात पदे, जिवा - । कोणी न ऐकिली केधवा । ऐसी नवल गमती ॥१९७॥
एरवी करिता एकाग्रचित्त । श्रवणें नाना सिद्धांत । उलगडल्याविण राहत - । काय कधी? ॥१९८॥
परि तैसे हे नव्हे देवा । देखिला अक्षरांचा मेळावा । आणि विस्मयाचिया जीवा । विस्मय जाहला ॥१९९॥
परि कानाचे गवाक्षाद्वारें । शब्दकिरण येती अंतरीं सामोरे । तोंचि या चमत्कारें । अवधान ढळे ॥२००॥
अर्थाची आस मज आहे । हे कथिण्याचाही वेळ न साहे । म्हणोनि निरूपण लवलाहे । करावे देवा ॥२०१॥
ऐसा मागिल पडताळा घेत । पुढिल अभिप्रायीं दृष्टी ठेवित । आणि मध्ये सारीत । इच्छा आपुली; ॥२०२॥
पहा चतुराईचा प्रश्न । मर्यादा न करी उल्लंघन । एरवी कृष्णह्रदया देण्या आलिंगन । उत्सुक अर्जुअन ॥२०३॥
श्रीगुरुसी पुसावयाचे प्रश्न । तेव्हा ऐसे लागे अवधान । हे सर्व एक तो अर्जुन । जाणतसे ॥२०४॥
आता तयाचे ते प्रश्न करणे । वरी सर्वज्ञ हरीचे बोलणे । हे संजय कैसे प्रेमाने । सांगेल पहा ॥२०५॥
अवधान द्यावे त्या गोष्टीसी । बोलली जाईल सरल मराठी ऐसी । कानाचे आधी दृष्टी जैसी । उपयोगा ये ॥२०६॥
बुद्धीचिये जिभेवर । शब्दांचे न चाखता सार । अक्षरांचेचि शोभेवर । इंद्रिये जगती ॥२०७॥
पहा मालतीचे कळे । सुगंधी वाटले परिमळें । परि वरचे सौंदर्येंही डोळे । काय न सुखावत? ॥२०८॥
तैसे मराठीज्चे सौंदर्यें । राज्य करितील इंद्रिये । मग त्वरित जाता ये । प्रमेयांचे गावा ॥२०९॥
ऐशा सुंदर सहजपणें । शब्द सरती ते बोलणे । ऐका ज्ञानदेव म्हणे । निवृत्तीचा ॥२१०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP