समओवी ज्ञानेश्वरी - अध्याय अठरावा

ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी या तिन्ही ग्रंथांतून काव्य आणि तत्वज्ञान संत ज्ञानेश्वर आपल्या विलक्षण भाषासौंदर्याने मराठी माणसाला विस्तारून सांगतात.


जय जय देवा तू निर्मळ । निजजनांचे करिसी मंगल । नाशिसी जन्मजरामेघपटल । हे महावादळा ॥१॥

जय जय देवा तू प्रबळ । नाशिसी अमंगळ कुळ । देसी वेदशास्त्रद्रुमफळ । हे फलप्रदा ॥२॥

जय जय देवा तू सकळ । विरागीं जनां वत्सल । कालक्रीडेसी तूचि सबळ । हे कलातीता ॥३॥

जय जय देवा तू उपाधिविण । अत्यानंदा स्फूर्तीस्थान । करिसी सर्व दोषनिरसन । हे मूलाधारा ॥४॥

जय जय देवा तू स्वयंप्रभ । जगद्‌मेघधारक नभ । भुवनोत्पत्तीचा आरंभस्तंभ । भवविध्वंसक ॥५॥

जय जय देवा तू निश्चळ । भक्तांचे चंचलचित्तपानें तुंदिल । जगदुत्पत्ती करिसी तू अढळ । हे क्रीडाप्रिया ॥६॥

जय जय देवा तू विशुद्ध । ज्ञानोदयउद्यानीं गज धुंद । शमदमें करिसी मदनमदभेद । दयार्णवा ॥७॥

जय जय देवा तू एकस्वरूप । हरिसी कामसर्पाचा दर्प । तू भक्तभावभुवनदीप । तापनाशक ॥८॥

जय जय देवा तू अद्धितीय । पूर्ण वैराग्यप्रिय । भक्तांस्वाधीन तू भजनीय । मायेसी अगम्य ॥९॥

जय जय देवा सद्‌गुरु । अकल्पित फलदायी कल्पतरू । स्वरूपज्ञानतरू लागे अंकुरू । रुजाया भूमि तू ॥१०॥

हे एकेक काय ऐसे । नाना परिभाषावशें । स्तुति करू तुजउद्देशें । हे भेदरहिता ॥११॥

ज्या विशेषणीं विशेषावे जे । ते दृश्य नव्हे रूप तुझे । हे जाणे मी, म्हणोनि लाजे । वानावया येथ ॥१२॥

परि मर्यादा न उल्लंघी सागर । ऐसा तोंवरीचि गजर । जोंवरी न सुधाकर । उदया ये ॥१३॥

चंद्रकांतमणी निजपाझरीं । चंद्रा अर्घ्यादिक करी । नव्हे, तो दंद्रचि अवधारी, । करवी तयाकडुनी ॥१४॥

न जाणे कैसी वसंतासंगे । अवचित फुटती वृक्षा अंगे । ते आवरणे तयाहिजोगे । ऐ से नसेचि ॥१५॥

कमलिनीसि लाधे रविकिरण । तेथ मग संकोचे कोण ? । वा जळें शिवले लवण । अंग विसरे; ॥१६॥

तैसे तुज जेथ मी स्मरे । तेथ मीपण मी विसरे । मग व्यापिला ढेकरें । तृप्त जैसा ॥१७॥

तैसे तुवा जी, मज केले । मीपण माझे देशोधडीसी धाडिले । स्तुतिमिषें पिसे लाविले । वाचेसी गा ॥१८॥

देहभानीं तरि राहुनी एरवी । तव स्तुति जेव्हा करावी । गुण-गुणातीताची व्हावी । तुळा भली ॥१९॥

तू, जी, एकरसाची मूर्त । कैसे करू गुण-गुणातीत विभक्त ? । मोती फोडोनि सांधणे युक्त । की तैसेचि भले ? ॥२०॥

आणि तू बाप तूचि आई । या बोलीं न स्तुति काही । लेकरू उपाधीचा न होई । विटाळ तेथ ॥२१॥

पाईक मी तुमचा व्हावे । परि तुम्हा स्वामी कैसे म्हणावे । द्वैत-उपाधीने उष्टावे । ते स्वरूप कैसे वर्णू ? ॥२२॥

एकसरिसा तू आतबाहेरी । हेही म्हणता परी । आतला तू दुरी । घालविला जासी ॥२३॥

म्हणोनि साच तुजलागी । स्तुतीसी शब्द नसे जगीं । मौनावाचुनि लेणे अंगीं । नच लेइसी ॥२४॥

स्तुती ? काही न बोलणे । पूजा ? काही न करणे । तुजसन्निध असणे ?  । काही न होणे ॥२५॥

तर भुलीने घेरिले जैसे । आलाप घेई पिसे । वानू ते माउली तैसे । साहवे तू ॥२६॥

आता गीतार्थाची मुद्रा परी । उठवावी या व्याख्यानावरी । जेणे सज्जनांचिया सभेत धुरेवरी । ते वानिले जाय ॥२७॥

येथ म्हणती श्रीनिवृत्ती । न करी वारंवार विनंती । परिसावरि लोह घासावे किती । वेळोवेळा ? ॥२८॥

ज्ञानदेव प्रार्थिती तेव्हा । हाचि जी, प्रसाद व्हावा । जो मी सांगेन गीतार्थ आघवा । अवधान द्यावे जी, देवें ॥२९॥

रत्नखचित गीतामंदिराचा । कळस हा अर्थरूप चिंतामणीचा । सकळ गीतादर्शनाचा । वाटाडया जो ॥३०॥

लोकीं तरि असे ऐसे । की दुरूनीचि कळस दिसे । आणि भेटचि होतसे । देवतेची जणू ॥३१॥

तैसेचि आहे येथही । जे एकेचि या अध्यायीं । अवघेचि दृष्टिपथीं येई । गीताशास्र ॥३२॥

म्हणे मी कळस या नावें । अध्यायासी अठरावे । तो चढविला श्रीव्यासदेवें । गीताप्रासादा ॥३३॥

कळस चढल्यावरि काही । प्रासदीं काम उरत नाही । ते सांगतसे गीता ही । समाप्तीसी ॥३४॥

व्यासमहर्षी चतुर सूत्रकार । तयांनी वेदरत्नगिरीवर । उपनिषदार्थाचे पठारावर । खणणे आरंभिले ॥३५॥

तेथ धर्म अर्थ काम हा असार । दगडगोटा निघाला जो अपार । त्यायोगें महाभारततट चौफेर । बांधियेला ॥३६॥

त्यामाजी आत्मज्ञानाचा एकवट । चिरा झाडुनी नीट । पार्थ-श्रीकृष्ण संवादपट । घडविला कुसरीने ॥३७॥

परमार्थसूत्रें करुनि आखणी । शास्त्रर्थाची घालुनी पुरवणी । मोक्षरूपाची मांडणी । केली श्रीव्यासदेवें ॥३८॥

ऐसी करिता उभारणी । पंधरा अध्यायांचे थरांनी । भूमिशुद्धीपासुनी । पूर्ण प्रासाद जाहला ॥३९॥

सोळावा अध्याय तर । गळाघटीचा आकार । सतरावा तीचि बैठक वर । कळसाची ॥४०॥

तयाहिवरी अठरावा ठेविला । तो सहजे कळस चढविला । गीतादियोगें उभारिला । व्यासध्वज ॥४१॥

म्हणोनि मागिल अध्याय ते । भूमीचे थर चढते । दाविताहे तयांचे पूर्णते । अठरावा आपुले अंगीं ॥४२॥

जाहल्या कामीं उणे न कोठेही । हे कळसामुळे स्पष्ट होई । अठरावा विवरी तेवी । साद्यंत गीता ॥४३॥

कुशल कारागीर श्रीव्यासमुनींनी । श्रीगीतादेवालय पूर्णत्वासी आणुनी । उद्धरिले नानापरींनी । प्राणिमात्रांसी ॥४४॥

प्रदक्षिणा यासि कोणी । घालिती बाहेरुनी । कोणी श्रवणमिषें संतोषुनी । उपभोगिती छाया ॥४५॥

परिपूर्ण अवधानाची ती । विडादक्षिणा देती । गाभार्‍यात शिरती । अर्थज्ञानाचिया ॥४६॥

त्या निजबोधें उराउरी । भेटे आत्मा श्रीहरी । सकळांसीही मोक्षमंदिरीं । एकचि योग्यता असे ॥४७॥

थोरांधरीं पंक्तिभोजने । तळच्या वरच्यांसी सरिसीचि पक्वान्ने । तैसे श्रवणें अर्थें पठणें । मोक्षचि लाभे ॥४८॥

श्रीविष्णुमंदिर जणु गीता । अठरावा अध्याय हा कळस झळकता । जाणोनि हे मर्म आता । विशद केले ॥४९॥

सतराव्या-पाठोपाठ । अठराव्याची होय भेट । तो संबंध सांगू दृष्टदृष्ट । होइल तैसा ॥५०॥

न मोडिता दोन आकार । घडिले एक शरीर । ते अर्धनारीनटेश्वर । या रूपीं दिसे ॥५१॥

गंगा-यमुना उदक । ओघांमाजी वेगळीक । परि दाविती होऊनि एक । पाणीपणें ॥५२॥

अथवा वाढल्या दिवसें । एकेक कला वाढुनि विलसे । परि वेगळे थर जैसे । चंद्रबिंबीं नसती ॥५३॥

तैसे श्लोकाचे चार चरण । श्लोक-श्लोकभेदांतून । अध्याय-अध्यायापासून । वेगळे गमती ॥५४॥

परि अभिप्रायीं सिद्धांतीं । अन्य अन्य रूप न धरिती । नाना रत्नमण्यां एके सुतीं । ओवावे जैसे ॥५५॥

मोती मिळोनि नानापरी । माळ होय एकपदरी । शोभेसी रूप परी । एकचि होय ॥५६॥

वाढती हारातील फुलेही । परि सुगंध न मोजिता येई । तैसेचि श्लोक हे अध्यायीं । जाणावे हो ॥५७॥

येथ सातशे श्लोक । त्यावरि अठरा अध्यायांचे लेख । परि देव बोलिले तत्त्व एक । तया न दुजे ॥५८॥

मीही न सोडिता संगती । केली ग्रंथाची अभिव्यक्ती । त्याचि धोरणीं पुढती । निरूपण ऐकावे ॥५९॥

तर सतरावे अध्यायासी । शेवटल्या श्लोकासी । श्रीकृष्णदेव पार्थासी । बोलिले ऐसे ॥६०॥

ब्रह्मनामाविषयीं धनंजया । श्रद्धाबुद्धी सोडोनिया । कर्मे करावी, तितुकी वाया । जाती पहा ॥६१॥

ऐकोनि देवाचे बोलासी या । अर्जुन लागे डोलावया । म्हणे कर्मनिष्ठांसी कृष्णराया । उणे लेखे ॥६२॥

तो अज्ञानांध तर बापुडा एक । ईश्वरही न देखे विश्वव्यापक । तर ब्रह्मनाम आणि श्रद्धादिक । तया कैसे कळावे ? ॥६३॥

आणि रज-तम दोन्ही । गेल्याविण श्रद्धा उणी । ती कैसी जडे अभिधानीं । ब्रह्माचिये ? ॥६४॥

मग शस्त्राग्रा आलिंगिणे । दोरीवरी धावणे । नागिणीशी खेळणे । याहुनी घातक; ॥६५॥

ऐसी कर्मे दुष्ट । तयां जन्मांतराचे संकट । एवढे सर्व अनिष्ट । श्रद्धेविण कर्मा ॥६६॥

क्वचित हे पूर्ण होई । तर ज्ञानाची योग्यता लाभेही । एरवी यानेचि जाई । नरकवासा ॥६७॥

कर्मे येथवरी । केली बहुत अवसरीं । आता कर्मकर्त्या कैसी वारी । मोक्षाची ती ? ॥६८॥

तर फिटो कर्माचा पांग । घडो अवघाचि त्याग । आरंभ होवो अव्यंग । संन्यासाचा ॥६९॥

जन्ममरणभयाची काही । गोष्ट जेथ कधीचि नाही । ऐसे आत्मज्ञान स्वाधीन होई । ज्या दोहींयोगें ॥७०॥

ज्ञानाचे आवाहनमंत्र । जे ज्ञानपिकते सुक्षेत्र । ज्ञान आकर्षिते सूत्र । असे जे का ॥७१॥

आता संन्यास त्याग । अनुष्ठोनि सुटो जग । तर हेचि उघड मग । पुसावे देवा ॥७२॥

ऐसे म्हणोनि आता । त्याग-संन्यास व्यवस्था । सुस्पष्ट जाणण्या वैकुंठनाथा । प्रश्न केला ॥७३॥

प्रत्त्युत्तरास्तव तेथ । बोलिले वैकुंठनाथ । प्रकट जाहला त्यात । अध्याय अठरावा ॥७४॥

ऐसे कार्यकारणभावें । अध्याय अध्यायाते प्रसवे । आता ऐकावे बरवे । पुसिले ते ॥७५॥

तर पंडुकुमारा तेथ स्मरले । सतरावे अध्यायीं देव जे बोलिले । ते जाणोनि अंतःकरण जाहले । शंकित भले ॥७६॥

एरवी तत्त्वाविषयी भला । तो निश्चिंत असे जाहला । परि देव उगा राहिला । ते साहवेना ॥७७॥

वत्स तृप्त होय । तरि धेनू न दुरी जाय । प्रीतीची परी अनन्य । ऐसीचि आहे ॥७८॥

काजाविणही बोलावे । देखिले तरी पाहावे । भोगिता प्रेम द्रुणावे । आवडत्याठायी ॥७९॥

ऐसे प्रेम जातिवंत । पार्थ तर प्रेमचि मूर्तिमंत । म्हणोनि करू लागे खंत । उगेपणाची ॥८०॥

आणि संवादाचे निमित्तें । व्यवहारीं जी वस्तु न मिळते । तीचि भोगी, की रूप ते । आरशात जैसे ॥८१॥

संवादा पारखे व्हावे । तर भोगिता भोगणे थोपावे । हे कैसे तयें साहावे सुखें लालचावल्या ? ॥८२॥

यालागी त्याग संन्यास तेथ । पुसावयाचे करुनि निमित्त । उलगडवी महावस्त्र पार्थ । गीतारूप ॥८३॥

हा अठरावा अध्याय ना केवळ । ही एकाध्यायी गीताचि सकळ । वत्सचि ओटीसी लागे वत्सल । मग पान्ह्यासि वेळ कायसा ? ॥८४॥

तैसे समाप्तीचे अवसरीं । गीता आरंभविली माघारी । गुरु-शिष्याचा काय न करी । सुखसंवाद ? ॥८५॥

परि हे असो ऐसे । अर्जुन भाग्याचा पुसतसे । म्हणे विनंती विश्वेशें । अवधारावी ॥८६॥

अर्जुन म्हणाला:

संन्यासाचे कसे तत्त्व त्यागाचेहि कसे असे
मी जाणू इच्छितो कृष्णा सांगावे वेगवेगळे ॥१॥

हां जी, संन्यास त्याग यात । अर्थ एकचि दोहोत । जैसे संघ आणि संघात । समुदायचि दाविती ॥८७॥

त्यागें आणि संन्यासें । त्यागचि सांगणे असे । आमुचे तर मानसें । जाणिले हेचि ॥८८॥

वा काही असे भेद । तो देव करोत विशद । तेथ म्हणती मुकुंद । भिन्नचि गा ते ॥८९॥

एरवी अर्जुना तुझे मनी । त्याग संन्यास दोन्ही । एकार्थ गमले हे मानी । मीही साच ॥९०॥

हे दोन्ही शब्द खरोखर । त्यागचि दाविती त्रिवार । परि येथ भेदा आधार । इतुकाचि; ॥९१॥

निश्चयें कर्म सोडावे । ते सोडणे संन्यास म्हणावे । आणि केवळ फळ त्यागावे । तो त्याग गा ॥९२॥

परि सोडावे कोण्या कर्माचे फळ ? । आणि कोणते कर्म त्यागावे केवळ ? । हेही विवरू सकळ । चित्त दे गा ॥९३॥

रानीं डोंगरीं व्यर्थ किती । झाडे आपोआप जन्मती । भातशेते उद्याने न होती । सहजी तैसी ॥९४॥

न पेरिता तृण उगवे । तैसे साळीचे न पाहे । राब मशागत करणे आहे । बहुत तेथ ॥९५॥

अंग सहज जाहले । परि लेणे उद्यमें घडले । नदी-नद आयते लाभले । विहिरीसी यातायात ॥९६॥

तैसे नित्य स्नानसंध्यादिक । श्राद्धादि कर्म असे नैमित्तिक । परि काम्य कर्म एक । कामनेविना न निपजे ॥९७॥

श्रीभगवान् म्हणाले:

सोडणे काम्य कर्मे तो ज्ञाते संन्यास जाणती
फळ सर्वचि कर्मांचे सोडणे त्याग बोलती ॥२॥

कामनांचे मेळावीं । कर्म जे उभारिले जाई । अश्वमेधादिक पाही । जेथ यज्ञ असती ॥९८॥

आड कूप उद्यान । भूमिदान ग्रामदान । आणिकही नाना संभ्रम जाण । व्रतांचे ते ॥९९॥

ऐसे इष्टपूर्त सकळ । जया कामनाचि एक मूळ । जे करिता भोगवी फळ । धरोनीबांधोनी ॥१००॥

येता गावा देहाचिया । जन्ममृत्यूच्या सोहळ्या । ना म्हणता न ये धनंजया । ज्यापरी गा ॥१०१॥

वा ललाटीचे लिहिले । पुसता न ये जरि काही केले । काळेगोरेपणही धुतले । न जाय कधी; ॥१०२॥

केले काम्यकर्म तरी । फळ भोगाया धरणे धरी । न फेडिले ऋण जरी । सुटका नाही ॥१०३॥

कामना न करिता । सहजी कर्म घडे पार्था, । परि बाणांनी खेळता । वर्मी लागे जैसा; ॥१०४॥

गूळ न जाणोनि घातला तोंडीं । तरि देईचि की गोडी । आगीसी मानिता राखाडी । पाय ठेविता पोळे ॥१०५॥

काम्यकर्मीं हे एक । साधर्म्य असे स्वाभाविक । म्हणोनि नसो त्यात कौतुक । मुमुक्षूंसी ॥१०६॥

किंबहुना पार्था पाहे, । काम्यकर्मं जे आहे । ते विष जैसे त्यजावे । ओकूनिया ॥१०७॥

मग त्यागास । अंतरंगद्रष्टे अशेष । म्हणती संन्यास । या जगीं ॥१०८॥

हे काम्यकर्म सोडणे । ते कामनेसीची उपटणे । धनत्यागें पळवुनी लाविणे । भय जैसे ॥१०९॥

आणि येता चंद्रसूर्यग्रहणे । पर्वणीची कर्मे करणे । मातापितरां स्मरणे । श्राद्धपक्षीं ॥११०॥

काकबळी टाकण्यावेळी अतिथी यावे । तेव्हा जे जे लागे करावे । ते ते कर्म जाणावे । नैमित्तिक ॥१११॥

वर्षाकाळीं क्षोभे गगन । वसंतें दुणावे वन । देहा शृंगारी यौवन । जैसे की ॥११२॥

चंद्रकांतमणी पाझरे चंद्रें । कमळे विकसती रविकरें । येथ असे तेचि विस्तारे । अन्य न ये; ॥११३॥

तैसे नित्य जे कर्म । तया नैमित्तिकाचे लाभता नियम । ते उंचावे, तेणें नाम । नैमित्तिक होय ॥११४॥

आणि सायंप्रातर्मध्यान्ही । जे का करणीय प्रतिदिनीं । परि दृष्टी जैसी लौचनीं । अधिक न होई; ॥११५॥

उसनी न आणिता गती । चरणीं वसेचि जैसी ती । अथवा असेचि दीप्ती । दीपज्योतीत; ॥११६॥

न देता सुवासलेप । चंदनीं सुगंध वसे आपोआप । नित्यकर्मअधिकाराचे स्वरूप । तैसे होय ॥११७॥

नित्यकर्म ऐसे जनीं । बोलती ते हे मानी । ऐसी नित्य-नैमित्तिक दोन्ही । दाविली तुज ॥११८॥

तर हेचि कर्म नित्य-नैमित्तिक । अनुष्ठेय आवश्यक । परि म्हणू पाहती अनेक । निष्फळ यास ॥११९॥

भोजनीं जैसे देख । तृप्ती लाहे जाय भूक । परि नित्य-नैमित्तिक । सर्वांगीं फलद्रूप ॥१२०॥

हिणकस अग्नीत पडे । तर मल नाशे कस वाढे । या कर्मा तयाएवढे । फळ जाणावे ॥१२१॥

दोष तर जळे । योग्यता बहु उजळे । तेथ तत्क्षणी मिळे । सद्‌गती तया ॥१२२॥

एवढे ह सुढाळ । नित्यनैमित्तिकीं होय सढळ । परि त्यजावे जैसे मूल । मूलनक्षत्रींचे ॥१२३॥

लता वाढे आघवी । आम्रा फुटे पालवी । परि हात न लाविता जाई । सोडुनी वसंतऋतू ॥१२४॥

मर्यादेसी न उल्लंघावे । नित्यनैमित्तिका चित्त द्यावे । कर्मफळा निःशेष त्यजावे । जैसी वांतीचि की ॥१२५॥

या कर्मफळत्यागाते । त्याग म्हणती गा जाणते । ऐसे त्याग संन्यास तुज ते । परिसविले ॥१२६॥

हा संन्यास जेव्हा संभवे । काम्यकर्म न उद्‌भवे । निषिद्ध कर्म तर स्वभावें । शास्त्रनिषेधेंचि गेले ॥१२७॥

आणि नित्यनैमित्तिक जे असे । ते या शास्त्रनिषेधेंचि नाशे । शिर तोडिता जैसे । सर्व अंग ॥१२८॥

ताट सुके कणिस पिकता । तैसे कर्मजात नाशता । आत्मज्ञान तया शोधित आता । आपोआप येई ॥१२९॥

ऐशा निगुतीने दोन्ही । त्याग संन्यास आचरोनी । वर्तती ते आत्मज्ञानीं । योग्य होती ॥१३०॥

अथवा ही युक्ती चुके । मग अनुमानें त्यागा ठाके । तेव्हा काही न त्यजू शके । गोवला जाय अधिकचि ॥१३१॥

व्याधींची नसता ओळख । औषध ठरे विष मारक । अन्ना सेविले नसता भूक । तर न मारी काय ? ॥१३२॥

म्हणोनि त्याज्य जे नव्हे । तेथ त्यागा न शिवावे । त्याज्यालागी न व्हावे । लोभपर ॥१३३॥

वर्म त्यागाचे चुके जे । मग सर्वचि त्याग होय ओझे । निषिद्ध कर्मासी सर्वत्र झुंजे । विरागी जो ॥१३४॥

दोषरूपचि ही कर्मे सोडावी म्हणती कुणी
न सोडावीचि म्हणती यज्ञ दान तपे कुणी ॥३॥

न सोडवे फळाभिलाष । ते बंधक म्हणती कमीस । जैसा आपण नागवा, जगास । भांडखोर म्हणे ॥१३५॥

अथवा जिव्हालंपट रोगी । अन्ना दूषण देई अभागी । अंगीं न रुसे कुष्ठरोगी । माशांवरि कोपे ॥१३६॥

तैसे फलत्यागा जे अक्षम । ते हिणकस म्हणती कर्म । मग निर्णय करिती ठाम । त्यजावे ऐसा ॥१३७॥

कोणी म्हणती त्यागादिक । करावेचि ते आवश्यक । यावाचुनी शुद्धिकारक । अन्य नाही ॥१३८॥

ज्ञानशुद्धीचे मार्गीं । विजयी व्हावे गमे वेगीं । तर सबळ कर्मालागी । आळस नच करावा ॥१३९॥

सोने शुद्ध करावे । तर आगीसी न उबगावे । आरशासि स्वच्छ ठेवावे । तर साठवावी राख ॥१४०॥

वस्त्रे निर्मळ व्हावी । ऐसे असे जर जीवीं । तर डोणी न मानावी । मलिन जैसी; ॥१४१॥

तैसी कर्मे क्लेशकर । म्हणोनि न करावा अव्हेर । काय अन्न लागे अरुवार । रांधल्याविना ? ॥१४२॥

ऐशा ऐशा गा शब्दीं । कोणी बांधिती बुद्धी । ऐसा त्याग विसंवादीं । पडोनि राहिला ॥१४३॥

परि आता तो विसंवाद फिटे । त्यागाचा निश्चित निर्णय भेटे । ऐसे सांगे मी गोमटे । अवधान देई ॥१४४॥

तरी ह्याविषयीं ऐक माझा निश्चित निर्णय
त्याग जो म्हणती तोहि तिहेरी भेदला असे ॥४॥

तर त्याग देख येथ । त्रिविध जणू हे पथ । त्या त्रिविधाही सार्थ । वर्णूनि सांगू ॥१४५॥

त्यागाचे तिन्ही प्रकार । होतील जर गोचर । तरी तू इत्यर्थाचे सार । इतुके जाण ॥१४६॥

बुद्धीसी मज सर्वज्ञाचे । जे त्रिवार गा रुचे । आधीं ते तत्त्व साचे । अवधारी गा ॥१४७॥

आपुली कराया सोडवणूक । जो मुमुक्षू असे जागरूक । तया सर्वस्वी हेचि एक । करणे योग्य ॥१४८॥

यज्ञ दान तपे नित्य करणीय आवश्यक
न सोडावीचि ती होती ज्ञानवंतास पावक ॥५॥

यज्ञ दान तपादिक । कर्मे जी आवश्यक । न सोडावी, जैसा पथिक । चालणे न सोडी ॥१४९॥

हरवले न गवसे काही । तोवरि माग काढणे सोडू नाही । तैसे तृप्त न होता ताटही । लोटू नये ॥१५०॥

नाव न त्याजावी थडीसी लागेतों । केळ न तोडावी फळेतों । जैसे ठेविले दिसेतों । न त्यजावा दीप; ॥१५१॥

तैसी आत्मज्ञानाविषयीं । भली निश्चिती नाही । तोवरी न व्हावे उदासीनही । यज्ञादिक कर्माविषयी ॥१५२॥

तर स्वाधिकारानुरूप । ते यज्ञ दान तप । अनुष्ठावे करुनि मंत्रजप । साक्षेपें अधिक ॥१५३॥

चालणे वेगावत जाय । ते बैसण्याचि कारण होय । तैसाचि होय वेगातिशय । नैष्कर्म्यालागी ॥१५४॥

जों जों अधिक औषधी । सेविण्या कंबर बांधी । तों तों तो साधी । मुकणे व्याधीसी ॥१५५॥

तैसी कर्मे सत्वर विधिपूर्वक । केली जाती चोख । तेव्हा रजतम झडती देख । झाडा देउनी ॥१५६॥

अथवा क्षाराची पुटे द्यावी । तेव्हाचि हीण जाई । मग सोने होई । निर्दोष सत्वर ॥१५७॥

तैसे निष्ठेने केले कर्म ते । झाडुनि टाकी रजतमाते । सत्त्वशुद्धीचे धाम आयते । डोळ्यासी दावी ॥१५८॥

म्हणोनिया धनंजया । सत्त्वशुद्धी जो शोधी तया । कर्मे तीर्थाचिया । योग्यतेसी आली ॥१५९॥

त्तीर्थें प्रक्षाळे बाह्य मळ । कर्में अभ्यंतर होय उजळ । ऐसी सत्कर्मे निर्मळ । तीथेंचि जाण ॥१६०॥

की तृषार्ता वैराण देशा । झरा भेटे अमृताऐसा । वा अंधालागी दिठीत जैसा । सूर्य आला ॥१६१॥

अथवा बुडत्यास्तव नदीनेचि धावावे । पडत्यासी पृथ्वीने झेलावे । मरत्यासी मृत्यूने द्यावे । दीर्घायुष्य ॥१६२॥

वा कर्मबंधनातुनि ऐसे । सोडविले मुमुक्षू कर्मांनीचि जैसे । वा रसायनरूपें विषें । मरत्यासी रक्षिले ॥१६३॥

एके हातोटीने या । कर्मे करिता धनंजया । बंधक कर्मेचि सोडवावया । कारण होती ॥१६४॥

आता हीचि हातोटी । तुज सांगू गोमटी । जेणें कर्मायोगेंचि किरीटी, । कर्म नाशे ॥१६५॥

परी ही पुण्यकमेंहि ममत्व फळ सोडुनी
करणे योग्य हा माझा जान उत्तम निर्णय ॥६॥

तर प्रमुख पंचमहायज्ञ आदी । कर्मे घडताही यथाविधी । कर्तुत्वाचा न वाहे कधी । अंगीं गर्व ॥१६६॥

जो ऋण काढुनि तीर्थ जाये । तया मी यात्रा करित आहे । ऐशा थोरवीचा नोहे । तोष जैसा ॥१६७॥

राजमुद्रेचे सामर्थ्यें । राजासीही बांधुनि आणी स्वयें । तो जेतेपणाचे गर्वें । फुगुनी न जाई ॥१६८॥

जो कासोटा धरुनि तरे । तया पोहण्याचा गर्व नुरे । पुरोहित दातेपणाचे भरें । नच मिरचे ॥१६९॥

तैसे कर्तृत्व अहंकारें । आपुले न म्हणता यथा अवसरे । कर्मजातांचे मोहरे । सारावे पुढती ॥१७०॥

आणि केल्या कर्मी पार्था । फलप्राप्तीचिया पथा । वळू न द्यावे मनोरथा । कदापिही ॥१७१॥

आधी फलाशा सोडावी । मग कर्मे आरंभावी । परके बाळ जेजवी । दाई जैसी ॥१७२॥

पिंपरांची धरोनि आशा । न शिंपिती पिंपळ जैसा । तैसी न धरिता फलाशा । करावी कर्मे ॥१७३॥

दुधाची न धरिता आशा । गुराखी राखी गावधन जैसा । किंबहुना कर्मफळीं तैसा । नसावा डोळा ॥१७४॥

ऐशा हातोटीने पुढे । जेव्हा कर्म घडे । तेव्हा तयाची गाठ पडे । आत्मस्वरूपासी ॥१७५॥

म्हणोनि फलाशा सोडूनी । अहंकारा त्यागुनी । कर्मे करावी, हा या रणीं । संदेश माझा ॥१७६॥

जो जीवबंधें शिणला । सुटकेस्तव तळमळला । तयाने न विसरावे या बोला । सांगे पुन्हा पुन्हा ॥१७७॥

नेमिले कार्य जे त्याचा संन्यास न जुळेचि तो
केला तसा जरी मोहें त्याग तामस बोलिला ॥७॥

अथवा अंधाराचे त्वेषें । डोळ्यात रोवावी नखे । तैसे सकळ कर्मद्वेषें । जो कर्मेचि सोडी; ॥१७८॥

तयाचे जे कर्म सोडणे । ते तामस गा मी म्हणे । अर्धशिशीचे रागें खांडणे । शिरचि जैसे ॥१७९॥

अगा मार्ग द्वाड होय । तर निस्तरतील पाय । परि तेचि तोडावे काय । मार्गाचे अपराधें ? ॥१८०॥

भुकेल्यापुढे अन्न । येता भलतेचि ऊन । जर टाकी लाथाडून । घडे लंघनचि ॥१८१॥

तैसा कर्माचा बंध कर्में । निस्तरावा हातोडीचे वर्में ।  हे तामस न जाणे, भ्रमें । माजला जो ॥१८२॥

वर्णाश्रमधर्में जे वाटयासी आले । ते कर्म तयाने सोडिले । परि ऐशा तामस त्यागा, भले । कदापिन स्पर्शावे ॥१८३॥

कष्टामुळेचि जे कर्म सोडणे आंग राखुनी
त्याग राजस तो वांझ न देखे आपुले फळ ॥८॥

अथवा स्वाधिकार समजे । आपुले विहित कर्मही उमजे । परि ते करण्या न धजे । कठीण म्हणोनी ॥१८४॥

कर्मारंभाची कड । काही काळ वाटे द्वाड । खांद्यावरि वाहता गमे जड । शिदोरी जैसी; ॥१८५॥

निंब जिभेसी कडवट । हिरडा प्रथम तुरत । तैसा कर्मारंभ बिकट । सायासाचा ॥१८६॥

गाईसी द्वाड शिंग । शेवंतीचे काटेरी अंग । भोजनसुख महाग । रांधिता कष्टवी ॥१८७॥

ऐसे वारंवार करणे कर्म । जे आरंभीचि अति दुर्गम । म्हणोनि करीता, श्रम । मानी तो ॥१८८॥

एरवी आरंभी यथाविधी । परि कर्मे होत छळवादी । तेव्हा पोळिला ऐसा सोडी, आधी । आरंभिले कर्म ॥१८९॥

म्हणे वस्तू देहाऐसी । आली बहु भाग्यविशेषी । तर कर्मे करुनी दोषी । का होऊ ऐसा ? ॥१९०॥

केल्या कर्मांनी ये द्यावे । ते उधार मज न तोषवे । तर आजचि का न भोगू बरवे । हातीचे भोग ? ॥१९१॥

भिऊनि शरीराचिया क्लेशा । जो कर्मे सोडी, वीरेशा । तो अवश्य परियेसा । राजस त्याग ॥१९२॥

एरवी तेथही कर्म सोडे । परि त्यागफळ न जोडे । जैसे उतू गेले आगीत पडे । ते होमासि न ये ॥१९३॥

बुडोनि प्राण गेले । ते जलसमाधिस्थ जाहले- । ऐसे म्हणो नये, पातले । दुर्मरणचि ते ॥१९४॥

तैसे देहाचेचि लोभें । कर्मावरि पाणी सोडणे आरंभे । तया साच न लाभे । त्यागाचे फळ ॥१९५॥

किंबहुना आपणाठायी । ब्रह्मज्ञान उदया येई । तेव्हा नक्षत्रांते गिळूनि घेई । पहाट जैसी; ॥१९६॥

तैशा अज्ञानासह क्रिया । हरपती गा धनंजया, । तो कर्मत्याग ये जया । मोक्षफळासी; ॥१९७॥

जे कर्मं त्यजिती अज्ञानें । तयां मोक्षफळ प्राप्त न होणे । म्हणोनि तया त्याग न मी म्हणे । तो राजसत्याग ॥१९८॥

तर कोणत्या बा त्यागें । मोक्षफळ घरा ये वेगें । हेही ऐक या प्रसंगें । सांगू आता ॥१९९॥

करणे नेमिले कर्म कर्तव्यचि म्हणूनिया
ममत्व फळ सोडूनि त्याग तो मान्य सात्त्विक ॥९॥

तर वर्णाश्रमधर्माचे नावें । जे वाटयासी आले स्वभावें । ते आचरे विधिगौरवें । शृंगारुनी ॥२००॥

परि हे मी करी एक । ऐसा आठव त्यजी मनःपूर्वक । तैसेचि पाणी सोडी देख । फळाचे आशेवरी ॥२०१॥

अगा, अवज्ञा आणि कामना । मातेचे ठायी अर्जुना, । करिता, दोन्ही पतना । कारण होय ॥२०२॥

तर दोन्हीही त्यजावी । मग माताचि ती भजावी । की सगळी गायचि वारावी । मुख अमंगळ म्हणुनी ? ॥२०३॥

आवडत्या फळीं । असार साल आठोळी । त्यासाठी काय वगळी । फळासीचि कोणी ? ॥२०४॥

तैसा कर्तृत्वाचा मद । आणि कर्मफळाचा आस्वाद । दोहींचे नाव बंध । कर्माचा की ॥२०५॥

तर या दोहोतही । जैसी बापा न वासना लेकीविषयी । तैसा तो दुःखित न होई । विहित कर्म करिता ॥२०६॥

हा तो त्यागतरुवर । जो गा मोक्षफळें होय थोर । सात्त्विक ऐसे गोरवपर । यासचि म्हणती जगीं ॥२०७॥

जैसे बीज जाळुनी । वृक्षाचा निर्वंश करावा कोणी । तैसे फळ त्यागुनी । कर्म त्यजिले जयाने; ॥२०८॥

लागताक्षणीचि परिसासी । लोहाचे गंज कळकटपण तो नाशी । रज-तम दोन्ही तैसी । पलायन करिती तयातुनी ॥२०९॥

मग शुद्ध सत्त्वगुणें । उघडती आत्मबोधाची लोचने । मृगजळें नाहीसे होणे । सांजवेळे जैसे ॥२१०॥

बुद्धिआदिकांपुढयात तैसे । विश्वाभास जो एवढा भासे । तो कोणीकडेही न दिसे । आकाश जैसे ॥२११॥

कर्मी शुभाशुभीं जेव्हा राग-द्वेष न राखतो ।
सत्त्वात मुरला त्यागी ज्ञानें छेदूनि संशय ॥१०॥

म्हणोनि प्रारब्या लाभता बळ । आली कृत्ये कुशल-अकुशल । ते व्योमाअंगीं अभ्रपटल । जिरले जैसे; ॥२१२॥

तैसी तयाचिये दृष्टी । कर्मे ब्रह्मरुप जाहली, किरीटी । म्हणोनि सुखदुःखाच्या वाटाघाटी, । करीना जो ॥२१३॥

शुभकर्महि तो जाणतसे । परि तेहि न करी बहु हर्षें । वा अशुभामुळेहि द्वेषें । पेटुनि न उठे ॥२१४॥

तर याविषयी काही । तया संदेह नाही । जैसे स्वप्नचि तेही । नुरे जागे होता ॥२१५॥

म्हणोनि कर्म आणि कर्ता । या द्वैतभावाची वार्ता । न जाणेचि तो पंडुसुता, । सात्त्विक त्याग ॥२१६॥

त्यजिली कर्मे ऐशी पार्था, । तर त्यजिली जाती सर्वथा । अधिक बांधिती अन्यथा । सोडिली तर ॥२१७॥

अशक्य देहवंतास सर्वथा कर्म सोडणे
म्हणूनि जो फलत्यागी तो त्यागी बोलिला असे ॥११॥

आणि गा सव्यसाची । मूर्ति लाभोनि देहाची । खंत करिती कर्माची । ते अडाणी गा ॥२१८॥

येऊनि मृत्तिकेचा वीट । काय करील तो घट ? । तंतू कैसा पट । त्यागील तो ? ॥२१९॥

तैसेचि वन्हित्व असे अंगें । तर अग्नि आगीसि कैसा उबगे ? । दीप काय करू लागे । प्रभेचा द्वेष ? ॥२२०॥

हिंग त्रासे उग्रपणीं । तर कैसे सुगंधत्व आणी ? । द्रवपण सोडुनि पाणी । कैसे राहे ते ? ॥२२१॥

तैसा देहाचे आभासें नांदत जोवरि असे । तोवरि कर्मत्यागाचे पिसे । कासया तरी ? ॥२२२॥

आपण लाविता टिळा । पुसता ये वेळोवेळा । परि काय काढूनि कपाळा । दुजे ठेविता येई ? ॥२२३॥

तैसे विहित कर्म आरंभिले स्वयें । त्यजावे वाटले, त्यजिता ये । परि कर्मचि देहरूपें अवतारावे- । ते का टाळिता येई ? ॥२२४॥

जे श्वासोच्छ्‌वासापरि स्वाभाविक । निजल्यावरिहि होई देख । न करिताहि होय निर्धोक । ऐसी परी जयाची ॥२२५॥

या शरीराचे निमित्तें । कर्मचि पाठिस लागते । जित्या-मेल्याही न सोडिते । ऐशा रीतीने ॥२२६॥

या कर्मा त्यजिण्याची युक्त । अवधारी, एकचि ती । ते करिता आहारी न जावो मती । फलाशेचे ॥२२७॥

कर्मफळ ईश्वरा अर्पे । त्या प्रसादें बोध उद्दीपे । तेथ दोरज्ञानें लोपे । सर्पशंका ॥२२८॥

त्या आत्मबोधें तैसे । अविद्येसह कर्म नाशे । पार्था, त्यजावे जेव्हा ऐसे । तेव्हा त्यजिले होय ॥२२९॥

म्हणोनि यापरी जगीं । कर्मे करणार्‍या मानू त्यागी । अन्य त्याग, मूर्च्छेसवे रोगी । विसावे जैसा ॥२३०॥

तैसा कर्मीं एके शिणे । की विसावा अन्यत्र जाणे । दांडक्यांचे घाव म्हणे । बुक्क्यांनी घालवी ॥२३१॥

परि हे असो, पुढती । तोचि त्यागी त्रिजगती । जयाने फळत्यागें नैष्कर्म्याप्रती । नेले कर्म ॥२३२॥

तिहेरी फळ कर्माचे बरे वाईत मिश्रित
त्यागहीनास ते लाभे संन्यासी मुक्त त्यातुनी ॥१२॥

एरवी तरी धनंजया, । त्रिविध कर्मा या । समर्थ तेचि भोगावया । ये न सोडिती फलाशा ॥२३३॥

आपणचि जन्मा घालुनी । न मम म्हणे कन्यादानीं । पिता सुटे, परि बंधनीं । जावई अडके; ॥२३४॥

विषाचे आगरही पिकविती । विकुनी लाभें सुखें जगती । अन्य मरती, जे सेविती । वेचूनि मोल; ॥२३५॥

तैसे कर्तेपणें कर्म करी । अकर्तेपणें फलाशा न धरी । न चुके दोघांही परी । कर्म करणे ॥२३६॥

वाटेवरि पिकले फळ वृक्षाचे । ते जो इच्छी तयाचे । तैसे साधारण कर्माचे । फळ जो घेई तया ॥२३७॥

परि करोनि फळ न घे । तो जगराहाटीत न रिघे । कारण त्रिविध जग अवघे । फळचि सर्व कर्मांचे ॥२३८॥

देव मनुष्य स्थावर । तया नाव जगडंबर । हे इतर तीन प्रकार । कर्मफळाचे गा ॥२३९॥

तेचि एक अनिष्ट । एक ते केवळ इष्ट । आणि इष्ट-अनिष्ट । त्रिविध ऐसे ॥२४०॥

परि विषयासक्तबुद्धी । जगी माजवुनि अधर्मबुद्धी । प्रवर्तती ते निषिद्धीं । कुव्यापरीं ॥२४१॥

ते कृमि कीटक ढेकूळ । हे देह लाहती फुटकळ । पार्था, ते कर्मफळ । अनिष्ट गा ॥२४२॥

स्वधर्मा देउनी मान । स्वाधिकार पुढे ठेवून । वेदासी पुसोन । सुकृत करिती ॥२४३॥

तेव्हा इंद्रादिक देवांची । शरीरे लाभती, सव्यसाची, । त्या कर्मफळा इष्ट फळाची । प्रसिद्धी गा ॥२४४॥

गोड आंबट जाण । होय मधुर रुचीचे मिश्रण । जे वेगळे दोहोंहून । दोहोंसीही जिंके ॥२४५॥

अथवा योगाभ्यासें रेचक । जैसा होतसे कुंभक । तैसे सत्य-असत्य होउनि एक । असत्य जिंकिले जाय ॥२४६॥

म्हणोनि समभाग शुभाशुभें । मिळोनि जे आचरण उभे । तेणे मनुष्यत्व लाभे । ते मिश्रफळ ॥२४७॥

ऐसे त्रिविध य भागीं । कर्मफळ मांडिले असे जगीं । ठेविती आशा जे भोगीं- । तयां ते न सोडी ॥२४८॥

जिव्हेचा हात फाटे । इतुके जीवित वाटे गोमटे । परि परिणामीं भेटे । अवश्य मरण ॥२४९॥

भली सावचोरांची मैत्री- । जोवरि अरण्ये न भेटली रात्री । बाजारबसवी बरी- । जोवरि न शिवे अंगा ॥२५०॥

तैसी कर्मे करिता, शरीरीं । उठे थोरवीची भरारी । मग निधनसमयीं सारी । मिळती फळे ॥२५१॥

समर्थ ऐसा सावकार । मागण्या ये वायद्यानुसार । तैसा टाळिता न ये अनिवार । भोग तो प्राण्यां ॥२५२॥

मग कणिसातुनी कण झडे । तो अंकुरे, कणिसा चढे । पुन्हा भूमीवरी पडे । पुन्हा वाढे; ॥२५३॥

तैसे भोगीं जे फळ होय । ते अन्य फळे प्रसवित जाय । चालता पाया पाय । जिंकत जैसा पुढे जाय ॥२५४॥

उतारा लागे होडी । जेथ ठाके, तीचि पैलथडी । तैसी ओढ न सोडी । भोग्य फळाची तया ॥२५५॥

मग साध्य-साधनप्रकारें । फळभोग तो गा पसरे । ऐसे गोविले संसारें । त्यागहीन ते ॥२५६॥

एरवी जाईचे फूल फुलणे । याचेचि नाव जैसे सुकणे । तैसे अभिमान फलाशा त्यजुनि जयाने । न केले ऐसे कर्म केले ॥२५७॥

बियाणे खावया वेचे । तेथ वाढती शेती खचे । तैसे फलत्यागें कर्माचे । सारिले काम; ॥२५८॥

तया सत्त्वशुद्धिसहकारें । गुरुकृपामृततुषारें । बहरल्या बोधें ओसरे । द्वितदैन्य ॥२५९॥

त्रिविध फलांपासून । हे जग होय उत्पन्न । मग आपोआप नाश पावून । भोक्त-भोग्यहि लया जाय ॥२६०॥

घडे ज्ञानप्रधान हा ऐसा । संन्यास जयां वीरेशा । तयांठायी फळभोगसोमा । थारा नसे ॥२६१॥

आणि येणे संन्यासें । आत्मस्वरुपीं दिठी बैसे । तेव्हा कर्म वेगळे ऐसे । देखावे कोठे ? ॥२६२॥

पडोनि जाता भिंती । भित्तिचित्रांचीही होय माती । अथवा उजळता उगवती । अंधार उरे काय ? ॥२६३॥

जेथ रूपचि नाही उभे । तेथ साउली कशाची शोभे ? । आरशाविण बिंबे । वदन कोठे बा ? ॥२६४॥

फिटता निद्रेचा ठाव । कोठला स्वप्नाचा प्रस्ताव ? । मग तया साच-लटिके नाव । कोण देई ? ॥२६५॥

तैसे गा संन्यासें येणें । मूळ अविद्येसीचि नाही जिणे । मग तियेचे कार्य कोणे । घ्यावे-द्यावे ? ॥२६६॥

म्हणोनि या संन्यासीं । कर्माची गोष्ट होइल कैसी? । परि अविद्या आपुल्या देहीं ऐसी । असे जेव्हा की; ॥२६७॥

तेव्हा अकर्तेपणाचे बळें । आत्मा शुभाशुभीं वळे । दृष्टी जेव्हा रुळे । द्वैतसाम्राज्यीं; ॥२६८॥

तेव्हा गा हे सुवर्मा, । कर्म आणि आत्मा । जैसा पूर्व आणि पश्चिमा । यात अपार भेद; ॥२६९॥

अथवा अभ्र आणि आभाळ । सूर्य आणि मृगजळ । वायू आणि भूतळ । यात भिन्नता जैसी ॥२७०॥

पांघरोनि नदीचे उदक । असे नदीतचि खडक । परि जाणिसी का वेगळीक । कोटयावधीची तेथ ? ॥२७१॥

असेनाका पाण्याजवळी । परि शेवाळे ती वेगळी । केवळ संगतीमुळे काय काजळी । दीप म्हणता ये ? ॥२७२॥

जरि चंद्रावरी कलंक । चंद्राशी एकरूप न देख । दृष्टि-डोळ्यात वेगळीक । अपार जैसी; ॥२७३॥

अथवा वाट आणि वाट चालता । ओघ आणि ओघी वाहता । आरसा आणि आरशात पाहता । यात अपार भेद जितुका: ॥२७४॥

पार्था, तितुकेचि असे । आत्म्याहुनि कर्म वेगळे तैसे । परि अज्ञानयोगें भासे । ते एक ऐसे ॥२७५॥

विकासें सूर्योदय उपजवी । सुगंध भुंग्यांकरवी भोवती । ती सरोवरीं बरवी । कमलिनी जैसी; ॥२७६॥

तैशा आत्म्याच्या क्रियाही । अन्य कारणेंचि घडती पाही । करणां त्या पाचाही । करू सुस्पष्ट ॥२७७॥

ऐक तू मजपासूनि ज्ञात्यांचा कर्मनिर्णय
परभारेचि हे कर्म करिती पाच कारणे ॥१३॥

आणि कारणे ती पाचही । क्वचित् जाणसी तूही । शास्त्रे बाहू उभवुनी दोही । बोलती तयांते ॥२७८॥

वेदरायाचे राजधानीत आणि । सांख्यवेदान्ताचे भुवनीं । विरूपणाचे नौषतध्वनी । गर्जताती ॥२७९॥

सर्व कर्मसिद्धीलागी । हेचि मूल हेतू जगीं । येथ न गोवावा अयोग्य भागीं । आत्मराजा ॥२८०॥

या बोलाचे डांगोर्‍यापाठी । तया प्रसिद्धी आली किरीटी, । म्हणोनि तुझेही कर्णसंपुटीं । वसोत ही ॥२८१॥

आणि अन्य मुखातुनि ऐकावे जे । ऐसे कायसे हे ओझे । मी चिद्‌रत्न तुझे । असता हाती ? ॥२८२॥

आरसा पुढे मांडुनिया । का लोकांचे डोळियां । महत्त्व द्यावे पहावया । रूप आपुले ? ॥२८३॥

भक्त ज्या भावें जेथ पाहे । तेथ मीही तैसाचि होऊनि राहे । तोचि मी तुझे जाहलो आहे । खेलणे आज ॥२८४॥

प्रीतीचे वेगें ऐसे । देवा बोलता भान नसे । तों आनंदीं विरतसे । अंगें पार्थ हा ॥२८५॥

चांदण्या येता बहर । चंद्रकांतमण्यांचा डोंगर । विरघळोनी सरोवर । होऊ पाहे जैसा ॥२८६॥

तैसे सुख आणि अनुभूती । या द्वैतभावाच्या मोडुनि भिंती । तेथ देव अर्जुनाकारें पाहती । केवळ सुखचि मूर्त ॥२८७॥

तेथ समर्थ म्हणोनि देवा । अवकाश लाभला आठवाया । मग बुडत्यासी काढाया । धावले जीवें ॥२८८॥

अर्जुनाऐसे प्रस्थ । प्रजापसार्‍यासह होते बुडत । केवढे भरते आले तेथ । तया काढुनी देवा ॥२८९॥

देव म्हणे, अगा पार्था, । तू भानावरि ये सर्वथा । तेथ श्वास घेउनि माथा । तुकविला तयाने ॥२९०॥

म्हणे दातारा, जाणसी । उबगलो नुसत्या शेजारासी । आणि उराउरी ऐक्यासी । येवो पाहे ॥२९१॥

त्याही मजऐशी । लोभें दाविता जर लालसा । तर का जी, घालिता विश्वेशा, । आडआड जीवा या ? ॥२९२॥

तेथ श्रीकृष्ण म्हणती ऐसे । अद्यापी तुज ठावे नसे । काय ऐक्य न तुज दिसे । चंद्र आणि चंद्रिकेत ? ॥२९३॥

हेही बोलाया भावैक्य । वाटे आम्हा भय । की रुसता वाढे सामर्थ्य । ते प्रेम गा ॥२९४॥

येथ एकमेकांचे खुणेने । द्वैत असे तोवरीचि जिणे । म्हणोनि असो हे बोलणे । याविषयीचे ॥२९५॥

मग कैसी कैसी ते आता । बोलत होतो पांडुसुता, । सर्व कर्मासी भिन्नता । आत्म्याहूनी ॥२९६॥

तेव्हा अर्जुन म्हणे, देवें । माझे मनींचेचि स्वभावें । प्रस्ताविले बरवे । प्रमेय जी, ॥२९७॥

जे सकळ कर्मांचे बीज । ते कारणपंचक तुज । सांगेन ऐसे वचन मज । दिधले तुवा ॥२९८॥

आणि आत्म्याचा येथ काही । सर्वथा संबंध नाही । हे बोलिलासि ते कथनीं देई । प्रिय माझे ॥२९९॥

या बोलावरि विश्वेशें । म्हटले बहुत तोषें । यास्तव धरणे धरून बैसे । ऐसे लाभे कोण ? ॥३००॥

तर अर्जुना, निरूपिला जाईल । गाबा भाषेआतिल । परि आवड ही करील । पार्था, ऋणी तुज ॥३०१॥

तेथ अर्जुना म्हणे देव । काय विसरले मागिल भाव । या गोष्टीत राखावे काय । मी-तूपण, जी ? ॥३०२॥

तेथ श्रीकृष्ण म्हणती, हो का ? । आता अवधानाचा आवाका । विस्तारुनी ऐका । सांगतो ते ॥३०३॥

तर साचचि गा कोंदडपाणी, । सर्व कर्मांची उभारणी । होतसे पाच कारणीं । बाहेरबाहेरुनी ॥३०४॥

या पाच कारणसमूही । कर्म आकारा येई । स्पष्टचि ते हेतूही । पाच तेथ ॥३०५॥

या पाच कारणांहून । आत्मा भिन्न उदासीन । ना तो साह्य करी आपण । कार्यसिद्धीसी ॥३०६॥

तेथ शुभाशुभ कर्मे ऐसी । निपजता जी देखसी । रात्र दिवस आकाशीं । ज्यापरी गा ॥३०७॥

पाणी तेज धूम । यांचा वायूशी होता संगम । होय गा अभ्रागम । व्योम ते न जाणे ॥३०८॥

अथवा काष्ठाची नाव जाहली । ती नावाडी ढकली । आणि वार्‍याने चालली । जळ ते केवळ साक्षी ॥३०९॥

कोण्या मातीचे गोळ्याने । एक भांडे अवतरणे । फिरवुनिया दांडयाने । फिरे चाक जेव्हा; ॥३१०॥

ते कर्तृत्व कुंभाराचे । तेथ काय ते पृथ्वीचे ? । ती माती वा आधार याविण काय वेचे ? । विचार करी बा ॥३११॥

हेही असो, लोकांचिये । व्यवहार चालती आघवे । तर कोणते कर्तृत्व सूर्याचिये । अंगा आले ? ॥३१२॥

तैसे पाच हेतू मिळोनी । पाचचि या कारणीं । होई कर्मलतांची लावणी । आत्मा तो निराळा ॥३१३॥

आता तीचि कारणे वेगळाली । पाचही विवेचू गा भली । तोलूनी घेतली । मोत्ये जैसी ॥३१४॥

अधिष्ठान अहंकार तशी विविध साधने
वेगळाल्या क्रिया नाना दैव ते तेथ पाचवे ॥१४॥

तैसी यथालक्षणें । ऐक बा कर्मकारणे । तर देह मी म्हणे । पहिले येथ ॥३१५॥

या देहा अधिष्ठान ऐसे । म्हणती ते याचि  उद्देशें । की स्वभोगांसह वसे । कर्ता जीव तेथ ॥३१६॥

इंद्रियांचे दाही हातीं । श्रमूनिया दिवसराती । सुखदुःखे प्रकृती । जोडितसे जी; ॥३१७॥

सुखदुःखे भोगण्यास्तव । नाही जीवां अन्य ठाव । म्हणोनि देहा नाव । अधिष्ठान ऐसे ॥३१८॥

हे चोवीसही तत्त्वांचे । कुटुंबघर वस्तीचे । सुटे बंधमोक्षाचे । गुंताडे जेथ ॥३१९॥

जागृति स्वप्न सुषुप्ती या अवस्थात्रयां । अगा, देहचि आधार हा । म्हणोनिया देहा । अधिष्ठान हेचि नाव ॥३२०॥

आणि कर्ता जीव ते साचे । दुजे कारण कर्माचे । प्रतिबिंब चैतन्याचे । म्हणती ते ॥३२१॥

आकाशचि वर्षे नीर । निर्मी तळी डबकी भूमीवर । मग बिंबोनि तदाकार । होय तेथ; ॥३२२॥

की बहु निद्राभरे । राव रावपण विसरे । मग स्वप्नीचिये सामावे पुरे । रंकपणीं; ॥३२३॥

तैसे आपुल्या स्वरूपाचे विसरें । चैतन्यचि देहाकारें । आभासोनि आविष्करे । देहपणें  जे ॥३२४॥

आत्मस्वरूपाचा विसर पडे ज्या देहीं । तेथ चैतन्य जीव या नावें प्रसिद्धा होई । जे देहाशी आणभाक घेई । अवघ्याविषयी ॥३२५॥

प्रकृति करी कर्मे । तीमी केली म्हणे भ्रमें । म्हणोनि कर्ता या नामें । ओळखती जीवा ॥३२६॥

अगा दृष्टी अखंड ऐशी । परि पापण्यांचिया केशीं । मोकळी चवरी जैशी । चिरीव गमे ॥३२७॥

करी घरातील दिव्याचा, पार्था । प्रकाश एकचि असता । गवाक्षभेदें अनेकता । भासे जैसी ॥३२८॥

तैसे बुद्धी जाणणे । श्रोत्रादिभेदें येणें । अन्य अन्य इंद्रियपणें । प्रकटे जे का ॥३२९॥

ऐसा तो इंद्रियगण । कर्माचे या कारण । तिसरे गा जाण । नृपनंदना ॥३३०॥

आणि पूर्व-पश्चिम दिशांनी । वाहल्या ओघीं मिळोनी । होय नदी-नदांचे पाणी । एकचि जैसे ॥३३१॥

की एकचि पुरुष जैसा । अनुसरता नवरसां । नवविध ऐसा । भासू लागे ॥३३२॥

क्रियाशक्ती प्राणवायूची जैसी । असे जी अविनाशी । ती नाना स्थानांसी । नाना होय ॥३३३॥

जेव्हा वाचेतुनी करी येणे । तेव्हा तीचि होतसे बोलणे । हाता आली तर देणे घेणे । तीचि होय ॥३३४॥

अगा चरणांचे ठायी । गती तीचि होई । अधोद्वारीं दोही । झरणे तीचि ॥३३५॥

नाभीपासुनि ह्रदयाठायी । प्रणवाते प्रकटी ही । तेव्हा तिजसीचि देहीं । प्राण म्हणती ॥३३६॥

मग ऊर्ध्वीचिये आगम-निर्गमा । तीचि शक्ती गा प्रियोत्तमा, । उदान ऐसिया नामा । पात्र जाहली ॥३३७॥

अधोरंध्राचे गतीस्तव । आपन हे लाभे नाव । व्यापकपणे होय । व्यान तीचि ॥३३८॥

सेविल्या रसें । शरीर भरी सरिसे । आणि न सोडितसे । एकही सांधा ॥३३९॥

ऐशा या राहाटीतून । त्याचि क्रियेसी मागाहून । म्हणती गा समान । ऐसे किरीटी ॥३४०॥

आणि शिंक ढेकर जांभई । ऐसा जो वायुव्यापार होई । तो नाग कूर्म कृकल याही । नावे होत ॥३४१॥

ऐसी वायूची ही क्रिया । एकचि परि धनंजया, । वर्तनायोगें पालटत्या । रूपा येतसे जी; ॥३४२॥

ती भेदली वृत्तिपंथें । वायुशक्ती गा येथे । कर्मकारण ते चौथे । ऐसे जाण ॥३४३॥

आणि ऋतूंत शरद बरवा । शरदीं चंद्रोदय व्हावा । त्यातही सुयोग यावा । पौर्णिमेचा; ॥३४४॥

वसंतीं बहरले उद्यान । उद्यानीं भेटावे प्रियजन । या संगमीं आगमन । प्रेमोपचारांचे; ॥३४५॥

अथवा कमळीं, पांडवा, । विकास जैसा बरवा । विकासींही यावा । बहर परागांचा; ॥३४६॥

वाचे बरवे कवित्त्व । कवित्वीं रसिकत्व । रसिकत्वीं परतत्त्व- । स्पर्श जैसा; ॥३४७॥

तैसी सर्व वृत्तिवैभवीं । बुद्धीचि एकली बरवी । बुद्धीसीही शोभा नवी । इंद्रियसामर्थ्यें ॥३४८॥

समर्थ इंद्रियमंडळा । भूषण एकचि, निर्मळा । तो देवतांचा मेळा । अधिष्ठात्री ॥३४९॥

म्हणोनि चक्षु आदि दाही । इंद्रियांचे पाठीशी पाही । सूर्यादि देवतांचे अनुग्रहीं । तयांचा मेळावा असे ॥३५०॥

ते देववृंद गा आघवे । कर्मकारण पाचवे । अर्जुना, येथ जाणावे । देव म्हणे ॥३५१॥

रुचेल तव बुद्धीसी । पंचविध कारणांची ऐसी । उपजविण्या कर्मजातासी । निरूपिली खाण ॥३५२॥

आता वाढे खाण हीचि । मग सृष्टि घडे कर्मांची । त्यायोगें स्पष्टचि । ते हेतूही दावू ॥३५३॥

काया-वाचा-मनें जे जे मनुष्य करितो जगीं
धर्माचे वा अधर्माचे त्याची ही पाच कारणे ॥१५॥

अवचित वसंत येई । तो नवपल्लवीसी हेतू होई । पल्लव पुष्पपुंजा दावी । पुष्प फळासी ॥३५४॥

की वर्षा आणी ढग । ढगांयोगें वृष्टिप्रसंग । वृष्टीयोगें भोग । धनधान्यसमृद्धीचा ॥३५५॥

वा प्राची अरुणा प्रसवी । अरुणें सूर्योदय होई । सूर्यें सगळा दिवसही । उजाडे जैसा ॥३५६॥

तैसे मन हेतू पांडवा । होय कर्मसंकल्पभावा । तो संकल्प लावी दिवा । वाचेचा गा ॥३५७॥

मग वाचेचा तो दिवटा । दावी कर्मजातांच्या वाटा । तेव्हा कर्ता निघे, सुभटा, । कर्तृत्वव्यापारा ॥३५८॥

शरीरादि समुदायही । शरीरादिका हेतूचि होई । जैसे लोहकाम घडवी । लोखंडी साधनचि ॥३५९॥

अथवा उभ्या तंतूंचे ताण्यासी । आडवे तंतू घालिती बाण्यासी । ते तंतूचि देखसी । होय वस्त्रा ॥३६०॥

तैसे मन वाचा देह यांचे- । कर्म, मन आदि हेतूचि रचे । रत्नें घडे रत्नाचे । आभूषण जैसे ॥३६१॥

येथ शरीर आदि कारणे । तेचि हेतू कैसे हे जाणणे- । कोणा असे, तर तेणे । अवधारावे ॥३६२॥

ऐका, सूर्याचिये प्रकाशा । हेतू कारण सूर्यचि जैसा । वा उसाचे कांडे उसा- । वाढीसी हेतू; ॥३६३॥

वाग्देवता वानावी । तर वाचाचि कामीं लावावी । वेदांनीचि बोलावी । वेदांची प्रतिष्ठा जैसी; ॥३६४॥

तैसी कर्मासी शरीरादिके । कारणे हे निश्चित ठाउके । परि हेचि हेचू हे न चुके । येथ अगा ॥३६५॥

आणि देहादिक कारणीं । देहादि धातूंचे मीलनीं । होतसे उभारणी । कर्मजातांची ज्या; ॥३६६॥

ती शास्त्रार्थें मानिलेल्या । मार्गा अनुसरतील, धनंजया तर न्यायमार्गचि तो न्याया । हेतू होय ॥३६७॥

पर्जन्योदकाचा लोट । सहजचि धरी साळीचा पाट । तर जिरे, परि अचाट । उपयोग त्याचा ॥३६८॥

रागावूनि निघे, थेट । धरी द्वारकेची वाट । तो शिणे, परि पायपीट । व्यर्थ न जाई ॥३६९॥

तैसे हेतुकारणमेळें । निपजे कर्म जे आंधळे । तया शास्त्राचे लाभता डोळे । न्याय्य म्हणावे ॥३७०॥

दूध तापता वर येई । स्वभावें ते उतू जाई । तीही वेच्च, परि न होई । वेचिले ते ॥३७१॥

तैसे केले जे शास्त्रसाहाय्याविण । ते न होय जर अकारण । तर चोरीसी गेलेले धन । लेखावे दान ॥३७२॥

अगा बावन्न वर्णांपरता । कोणता मंत्र आहे, पांडुसुता ? आणि बावन्नही न उच्चारिता । कोण जीव राही ? ॥३७३॥

परी मंत्राची बांधणी । जोवरि न जाणे कोणी । तोवरि उच्चारफळ वाणी । न पावे ॥३७४॥

तैसे कारणहेतूयोगें । जे कर्म स्वैर निघे । ते शास्त्राचिये न लागे । कासेसी कधी ॥३७५॥

कर्म होतचि असे तेव्हाही । परि ते होणे नव्हे, पाही । अन्याय्य मार्ग गा अन्यायींही । हेतू जाणावा ॥३७६॥

तेथ जो शुद्ध आत्म्यास कर्ता मानूनि बैसला
संस्कारहीन तो मूढ तत्त्व नेणेचि दुर्मति ॥१६॥

ऐसी पंचकारणे कर्मा । पाच हेतू हे सुमहिमा, । आता येथ पाहे बा आत्मा । सापडला असे काय ? ॥३७७॥

न होता दृश्यविषय आपण । भानू प्रकाशी दृश्ये, लोचन । तैसे स्वयें न होता कर्मकारण । आत्मा प्रकटी ते ॥३७८॥

प्रतिबिंब आणि आरसाही । स्वयें न होउनि दोही । करी प्रकाशनही । न्याहाळणारा ॥३७९॥

अथवा दिवसरात्र, हे पार्था । स्वये न होत करी सविता । तैसा आत्माही न होता कर्मकर्ता । दावी सवित्यासकट सर्वही ॥३८०॥

परि देहाभिमानभुलीने । बुद्धी देहींचि घातली जयाने । तया आम्याविषयी तेणें । जाहली मध्यरात्र ॥३८१॥

जे चैतन्य ईश्वर ब्रह्म जाण । हे देहाचि मानिती कोण कोण । तयां आत्मा कर्मकर्ता हे प्रमाण । अलोट उपजे ॥३८२॥

आत्माचि असे कर्ता । हाही निश्चय नाही पुरता । देहचि मी कर्मकर्ता । मानी तो साच ॥३८३॥

आत्मा मी कर्मातीत स्पष्ट । सर्व कर्मा साक्षी इष्ट । ही स्वस्वरूपाची गोष्ट । नच घेती कानींही ॥३८४॥

म्हणोनि अमर्याद आत्म्याते । देहेंचि मापिती ते । नवल काय ? दिवसाते- । घुबड रात्र न मानी ? ॥३८५॥

जयाने आकाशींचा सूर्य । कधी देखिलाचि न होय । तो डबक्यातिल बिंबा काय । सूर्य न मानी ? ॥३८६॥

जणु डबक्याचे अस्तित्वें । सूर्या लागे तेथ असावे । तयाचे नाशीं नाशावे । कंपीं कंप पावावे ॥३८७॥

निद्रिता जाग न ये । तोवरि स्वप्न साच मानावे । दोर न जाणुनि भ्यावे । सापचि गमुनी जैसे ॥३८८॥

कावीळ डोळ्यात वसे । तेव्हा चंद्र पिवळा दिसे । काय मृगांनीही मृगजळभासें । भाळू नये ? ॥३८९॥

शास्त्रगुरूचे नावेहि जयें । वार्‍याहि शिवेवरि टेकू न द्यावे । केवळ मूढपणाचेचि जीवें । जगतसे जो; ॥३९०॥

तयाने देहात्मदृष्टीमुळे । आत्म्यावरि घातले देहाचे जाळे । जैसे अभ्राचे वेगीं चंद्र पळे । ऐसे कोल्हा मानी ॥३९१॥

तर ते तैसेचि मानुनी । देहाचे बंदिशाळेत अडकुनी । कर्माचे वज्रगाठींनी । जखडला जो ॥३९२॥

दृढ बंधभावाने वेडा । नलिकेवरि तो शुक बापुडा । मोकळाहि असता चवडा । न सोडीचि दांही ॥३९३॥

म्हणोनि आत्मस्वरूपीं निर्मळ । तो प्रकृतीवरि आरोपी सकळ । मग कल्पकोटी काळ । कर्मातचि जखडे पुरा ॥३९४॥

आता कर्मामाजी असे । परि तया ते न स्पर्शे । वडवानला जैसे । समुद्रोदक ॥३९५॥

तैसे वेगळेपणे । जयाचे कर्मीं असणे । तो जाणावा कोणे लक्षणें । ते सांगू आता ॥३९६॥

मुक्त व्यक्तीसी चिंतिता । लाभे आपुलीचि मुक्तता । जैसी दीपें दिसे पाहता । आपुली वस्तू ॥३९७॥

आरशासि जों जों घासावे । तों तों आपण आपणा निखळ भेटावे । पाण्यासि भेटता पाणी व्हावे । लवणें जैसे ॥३९८॥

हे असो, परतोनि मागुते । प्रतिबिंब पाहे बिंबाते । तेव्हा पाहणे जाउनि आयते । प्रतिबिंब बिंबचि होउनि राहे ॥३९९॥

तैसे हरपले आत्मस्वरूप पावावे । तर संतांसि पाहता गवसावे । म्हणोनि वानावे ऐकावे । तेचि सदा ॥४००॥

इष्ट-विपरीत कर्मीं असूनिही । जो कर्में बांधिला न जाई । चर्मचक्षूंचे चर्में न लिप्त होई । दृष्टी जैसी ॥४०१॥

तैसा बंधमुक्त जो आहे । त्याचे स्वरूप आता पाहे । उभवुनि विचारांचे बाहू हे । सांगू आता ॥४०२॥

नसे ज्यास अहंभाव नसे बुद्धीत लिप्तता
मारी विश्व जरी सारे न मारीचि न बांधला ॥१७॥

तर अविद्येची घेत निद्रा । विश्वस्वप्नाचे व्यवहारा । करीत होता धनुर्धरा, । अनादि कालापासूनि जो ॥४०३॥

तो तत्त्वमसि या महावाक्यें । गुरूंनी आपुल्या कृपेसवे । माथ्यावरि हात ठेविला, नव्हे । थापटुनी जागविला जैसा ॥४०४॥

तैसी त्यागिता विश्वस्वप्नासह । मायानिद्रा जाय । मग त्वरित जागा होय । अद्वयानंदपणें जो; ॥४०५॥

तेव्हा मृतजळाचे पूर । दिसती जे निरंतर । हरपती की चंद्रकर । फाकताचि जैसे ॥४०६॥

बाळपण जाय निघून । तेव्हा बागुलबुवासी नाही स्थान । जैसे सरता इंधन । स्वयंपाक न होई ॥४०७॥

अथवा जागे होता । न दिसेचि स्वप्न, पार्था । तैसी अहंममता । नुरेचि तया ॥४०८॥

सूर्य शोधित अंधारा जरी । शिरे कोणत्याही भुयारीं । तयाचे वाटयासी अंधार परी । न येचि जैसा ॥४०९॥

आत्मत्वें वेढिला जाई । तो जे जे दृश्य पाही । ते द्रष्टेपणासह होई । तयाचेचि रूप ॥४१०॥

वन्हि जया लागतसे । ते अंगें वन्हीचि होतसे । मग जळते जाळिते भेद ऐसे । नुरतचि काही ॥४११॥

आत्मा कर्माहुनि भिन्नचि पाही । परि कर्तेपणाचा आळ येई । तो गेलावरि जे काहीबाही । राही उरून; ॥४१२॥

त्या आत्मस्थितीचा जो राव । तो काय देहीं या मानिल ठाव । का प्रळयजळाचा उठाव । आपणा ओघचि मानी ? ॥४१३॥

तैसी ही पूर्ण अहंता । काय देहपणें आवरे पंडुसुता ? । आवरे काय सविता । बिंबाकारें ? ॥४१४॥

घुसळुनी लोणी काढिले । ते मागुते ताकीं घातले । ते काय मिसळे । अलिप्त असता ? ॥४१५॥

अथवाअ काष्ठापासुनी । वेगळा करिता अग्नी । काय राहे कोंडुनी । पेटीत काष्ठाचिया ? ॥४१६॥

रात्रीचिये कुशीस । उपजला दिनेश । तो रात्र ऐसी भाष । ऐके काय ? ॥४१७॥

तैसे ज्ञेय येउनि ज्ञातेपणापाशी । पडले जयाचे ग्रासीं । तया मी देह ऐसी । अहंता कैसी ? ॥४१८॥

आकाशें जावे जेथजेथुनी । तेथ तेचि असे भरोनी । म्हणोनि राहिले कोंदोनी । आपणातचि आपण ॥४१९॥

तैसे जे तेणे करावे । ते तोचि आहे स्वभावें । मग कोणे कर्मी वेटाळावे । कर्तेपणे ? ॥४२०॥

नुरेचि गगनाविण ठाव । नोहेचि समुद्रा प्रवाह । कदापि न ढळे ध्रुव । तैसे जाहले ॥४२१॥

देहाहंकर ऐशापरी । शिवलाचि नाही जरी । देही निर्वाह जोवरी । तोवरि असती कर्मे ॥४२२॥

अगा वारा वाहोनि ओसरे । तरी डोलणे वृक्षीं उरे । वा कापूर सरता भरे । गंध करंडीत ॥४२३॥

संगीतसमारोह सरल्यावर । ओसरेना गानरंगाचा बहर । जळ लोळुनि जाता भूमीवर । ओल उरे ॥४२४॥

अगा सूर्य मावळल्यावर । संध्या दीप्ती भूमीवर । सहजरम्य सुंदर । दिसे जैसी; ॥४२५॥

लक्ष्य भेदिल्याहिवरी । बाण धावेचि धनुर्धारी । जोवरी भरली असे घरीं । बळाची थोरवी ॥४२६॥

चाकावरि सुगड जाहले । ते कुंभारें काढुनि नेले । तरी चाक फिरतचि राहिले । भोवंडलेपणे; ॥४२७॥

तैसा देहाभिमान जाता । देह ज्या स्वभावें झाला पार्था, । तो सहजचि आता । घडवी कर्म ॥४२८॥

संकल्पाविण स्वप्न । न पेरिता रानींचे वन । न बांधिता मेघांचे गंधर्वभुवन । उभे जैसे; ॥४२९॥

तैसे आत्म्याचे उद्यमाविण । देहादि पंचकारणांकडून । होय आपले आपण । क्रियाजात ॥४३०॥

पूर्वजन्मसंस्कारें देख । हेतू आणि कारणपंचक । घडविती अनेक । कर्माकार ॥४३१॥

त्या कर्मामाजी मग । संहरो अवघे जग । अथवा नवे सजग । जन्म घेवो ॥४३२॥

परि चंद्रकमळ कैसे सुके । ते सूर्यकमळ कैसे फाके । हे दोन्ही रवी न देखे । ज्यापरी गा; ॥४३३॥

विजा वर्षो आभाळ । ठिकर्‍या होवो भूतळ । अथवा करो हिरवळ । पर्जन्यवृष्टी; ॥४३४॥

परि त्या दोहीसी जैसे । नच जाणावे आकाशें । तैसा तो देहींचि असे । देहाभिमानरहित ॥४३५॥

देहादि क्रियांची होय दाटी । घडे मोडे ही सृष्टी । स्वप्न न देखे किरीटी । जागृत जैसा ॥४३६॥

चर्मचक्षूंनी परी । जयां गमे तो देहधारी । ते देह व्यापार करी- । ऐसेचि मानिती ॥४३७॥

अथवा तृणाचा बाहुला । बांधावरी ठेविला । न मानी काय कोल्हा । तो राखणदार ऐसेचि ? ॥४३८॥

वेडे नेसले की नागवे । हे लोकांनी येऊन जाणावे । योद्‌ध्याचे मोजावे । घाव इतरांनी ॥४३९॥

महासतीचे भोग । देखे की सकळ जग । परि ती आग ना अंग । न लोक देखे ॥४४०॥

जैसा स्वस्वरुपें जागा जाहला । दृश्यासह द्रष्टा नाश पावला । तो न जाणे काय वर्तला । शरीरग्रामीं ॥४४१॥

थोर कल्लोळीं लोपे सान । देखती तीरावरचे जन । एकें एका घेतले गिळून । ऐसे मानिती ते ॥४४२॥

तरि पाण्याकडे पाहे । कोण कोणा गिळिताहे । परिपूर्णासि दुजे नोहे । की कोणा तो मारिल ॥४४३॥

चंडिका सुवर्णाची । तिने सुवर्णशूळेंचि । नष्ट केले एके घावींचि । सुवर्णाचे महिषासुरासी ॥४४४॥

जरि गुरवासि तो व्यवहार । साचचि गमला वरवर । तरि शूळ चामुंडा महिषासुर । सोनेचि तत्त्वता ॥४४५॥

चित्रातिल अग्नि आणि जळ । तो दृष्टीचा आभास केवळ । कापडावरि आग वा ओल । दोन्ही नाही ॥४४६॥

विमुक्ताचे शरीर तैसे । हलत संस्कारवशें । देखोनि लोक पिसे । तया कर्ता म्हणती ॥४४७॥

आणि त्या कर्मकार्यात । घडो तिन्ही लोकांचा घात । परि तयें केला ऐसे मत । बोलोचि नये ॥४४८॥

सुर्यापुढे अंधारचि नसे । मग तो नाशे हे बोलणे कायसे ? । ज्ञानवंताहि दुजे न तैसे । जे तो नाशिल ॥४४९॥

म्हणोनि तयाची बुद्धि पार्था । न जाणे पापपुण्याची वार्ता । नटा गंगेसी मिळता । नाशे विटाळ जैसा ॥४५०॥

झटता आगीसी आग । कोण पोळे सांग ? की शस्त्र भेदी अंग । स्वतःचेचि ? ॥४५१॥

तैसे आपणाहुनि दूजेपणें । तो क्रियाजाता न जाणे । तेथ काय लिंपावे कोणे । तयाचे बुद्धीसी ? ॥४५२॥

म्हणोनि कर्ता कार्य क्रिया । हे स्वरूपचि जाहले जया । नाही शरीरादि तया । बंध कर्मीं ॥४५३॥

कुशल कर्ता जीव तो । हेतूंच्या पाच खाणी काढितो । भूमि ऐसी घडवितो । इंद्रियऔतांनी दहा ॥४५४॥

तेथ न्याय-अन्यायपर । द्विविध साधुनि आकार । न लावी उभविता पळभर । कर्मभुवने ॥४५५॥

या थोर कामा । साहाय्यक नव्हे आत्मा । तुवा न म्हणावे या उपक्रमा । तो हात लावी ॥४५६॥

तो साक्षी चिद्रूप, परंतपा, । कर्म प्रवृत्तीचे संकल्पा । तो काय दे निरोपा । आपणचि ? ॥४५७॥

तर कर्मप्रवृत्तीचेहि लागी । जया आयास नाही अंगी । ज्या प्रवृत्तीचे वेठीसी जगीं । लोक असती ॥४५८॥

म्हणोनि आत्म्याचे केवळ । जो रूपचि जाहला निखळ । तया कर्माची ही अटळ । बंदिशाळा न होय ॥४५९॥

परी अज्ञानाचे पटी । विपरीत ज्ञानाचे चित्र, किरीटी । तेथ चितारणारी ही त्रिपुटी । प्रसिद्ध जी ॥४६०॥

ज्ञाना ज्ञेय तसे ज्ञान तिहेरी कर्मबीज हे
क्रिया करण कर्तृत्व कर्मांगे तीन त्यातुनी ॥१८॥

ते ज्ञान ज्ञात ज्ञेय । हे जगाचे बीजत्रय । कर्माची निःसंशय । प्रवृत्ति जाण ॥४६१॥

आता याचि बीजत्रया । वेगळाले करूनिया । ऐक गा धनंजया । सांगू आता ॥४६२॥

तर जीवसूर्यबिंबाचे । रश्मी पाच श्रोत्रादि साचे । धावोनि विषयपद्माचे । उमलविती कळे ॥४६३॥

वा जीवनृपाचे अश्व घेऊनि इंद्रियसमुदाय । आणिती लुटोनि सर्व । विषयदेश जे; ॥४६४॥

हे असो, या इंद्रियीं वावरते । जे सुखदुःखासह जीवा भेटते । सुषुप्तीकाळीं नष्ट होते । जेथ ज्ञान; ॥४६५॥

त्या जीवा नाव ज्ञाता । आणि जे हे कथिले आता । तेचि येथ पंडुसुता । ज्ञान जाण ॥४६६॥

जे अविद्येचे पोटी । उपजताचि, किरीटी । आपणासी वाटी । तीन ठायी ॥४६७॥

आपुलिया धावेपुढती । रचुनी ज्ञेयाचे धोंडे किती । उभे करी मागुती । ज्ञातेपणाते ॥४६८॥

मग ज्ञाता-ज्ञेय दोहोतही । अर्जुना नांदणूक होई । मध्ये जे ज्ञान राही । त्याचेचिमुळे; ॥४६९॥

गाढूनि ज्ञेयाची शीव । पूर्ण होय जयाची धाव । सकळ पदार्था नाव । देतसे जे ॥४७०॥

ते गा सामान्य ज्ञान । या बोला नाही अन्य । तर ज्ञेयाचेही चिन्ह । ऐक आता ॥४७१॥

अगा शब्द स्पर्श । रूप गंध रस । हा पंचविध आभास । ज्ञेयाचा होय ॥४७२॥

जैसे एकेचि आम्रफळें । इंद्रियांसी वेगवेगळे । रसें वर्णें परिमळें । भेटावे स्पर्शें ॥४७३॥

तैसे ज्ञेय तर एक खरे । परि ज्ञान ये इंद्रियांद्वारें । म्हणोनि ते पाच प्रकारें । जाहले असे ॥४७४॥

समुद्रीं ओघाचे वाहणे । वा ध्येयाकडे धावणे । फळीं पिकाचे वाढणे । सरे जैसे ॥४७५॥

जेथ इंद्रियांचे मार्गावर । धावत्या ज्ञानाची होय अखेर । तर अर्जुना म्हणती शारंगधर । तोचि ज्ञेयविषय ॥४७६॥

ऐसे ज्ञाता ज्ञान ज्ञेय । तिहींसी वर्णिले होय । या त्रिविधांची क्रिया काय । तर प्रवृत्ति ऐसे जाण ॥४७७॥

अगा, शब्दादि विषय । हे पंचविध जे ज्ञेय । तेचि प्रिय की अप्रिय । कोणे एके परीने; ॥४७८॥

ज्ञान थोडके ज्ञात्यासी । दावी न दावी देखसी । तोंचि स्वीकारा की त्यजावयासी । प्रवतेंचि तो ॥४७९॥

परि मासा देखोनि बक । अथवा ठेव्यासी रंक । की स्त्री देखोनि कामुक । प्रवृत्त होई; ॥४८०॥

उतारा पाणी धावले । भ्रमर पुष्पाचे सुवासें आले । अथवा सांजवेळे सुटले । वासरू गा; ॥४८१॥

अगा स्वर्गींची उर्वशी । ऐकोनि माणसे जीसी । शिडया लाविती आकाशीं । यागांचिया; ॥४८२॥

पारवा जैसा धनुर्धारी । चढला नभाचे पाठीवरी । पारवीसि देखोनि परी । आंगचि लोटी सगळे; ॥४८३॥

अगा, घनगर्जनेसरशी । मयूर उडे आकाशीं । ज्ञेय देखोनि तैशी । ज्ञाता धावचि घे ॥४८४॥

म्हणोनि ज्ञाता ज्ञान ज्ञेय । हे तिन्ही ऐसे होय । सकळ कर्मीं अवश्य । करिती प्रवृत्त येथ ॥४८५॥

परि तेचि ज्ञेय क्वचितही । जर ज्ञात्या प्रिय होई । तर भोगाया न साही । क्षणही विलंब ॥४८६॥

अथवा अवचित कोठे । ते अप्रिय होउनि भेटे । तर युगान्त लोटला वाटे । सोडतांना ॥४८७॥

सर्प की हार । ही भ्रांति होता नर । हर्ष भय हे बरोबर । भोगितसे; ॥४८८॥

तैसे ज्ञेय प्रिय-अप्रिय । देखोनि त्यासी होय । मग त्याज्य-स्वीकार्य । व्यवहारीं प्रवृत्ते ॥४८९॥

प्रतिमल्ल दिसता समोर । स्वामी सर्व दलाचा वीर । रथ सोडूनि हो पायउतार । आमोरासमोरी ॥४९०॥

तैसे ज्ञातेपणें जे आहे । ते कर्ता या दशेसी ये । जैसे जेवणारे बैसले पाहे । पाकसिद्धी कराया ॥४९१॥

भ्रमरेंचि केला मळा । सोनारचि कसासि दगड झाला । अथवा देवचि निघाला । देवळाचे बांधकामा ॥४९२॥

तैसा ज्ञेयाचे हावेने बरवा । चालवी इंद्रियांचा मेळावा । तेथ ज्ञाता तो पांडवा, । कर्ता होय ॥४९३॥

आणि कर्ता होउनि स्वयें । ज्ञाना करी साधन पाहे । तेथ ज्ञेयचि स्वभावे । कार्य होय ॥४९४॥

ऐसी ज्ञानाची त्रिजगती । पालटे गा सुमती । डोळ्याची शोभा रातीं । पालटे जैसी; ॥४९५॥

वा अदृष्ट होता उदास । पालटे श्रीमंताचा विलास । पुनवेनंतर रजनीश । पालटे जैसा; ॥४९६॥

तैसी चालविली इंद्रिये ज्याने । तो ज्ञाता वेढे कर्तेपणें । तेथली ती लक्षणे । ऐक आता ॥४९७॥

तर बुद्धी आणि मन । चित्त अहंकारगुण । हे चतुर्विध चिन्ह । अंतःकरणाचे ॥४९८॥

बाह्य त्वचा श्रवण । चक्षु रसना घ्राण । ही पंचविध जाण । इंद्रिये गा ॥४९९॥

तेथ अंतःकरणाकरवी । कर्ता स्फुरे कर्तव्यीं । मग सुखप्राप्ती व्हावी । ऐसे देखे; ॥५००॥

तर बाहेरील त्याही । चक्षू आदि इंद्रियां दाही । उठवूनि लवलाही । व्यवहारा लावी ॥५०१॥

मग त्या इंद्रियसमूहा सकळ । राबवी तोवरी पुष्कळ । जोवरी कर्तव्याचे फळ । हाता न ये ॥५०२॥

कर्तव्य जर दुःखाते । प्रसवी ऐसे पाहे तेथे । तर लावी त्यागपथें । ती दहाही ॥५०३॥

मग दुःखाचा ठाव फिटेतो । रात्रंदिन पाठपुरावा करितो । वसुलीसाठी राजा राबवितो । ज्यापरी गा ॥५०४॥

तैसे त्याग-स्वीकार क्रियेमाजी । वाहता इंद्रियांची ओझी । ज्ञात्याते, अवधारा, जी, । कर्ता म्हणती ॥५०५॥

आणि सर्व कर्तव्यकर्मी । औतापरी सक्षम जीवग्रामीं । म्हणोनि इंद्रियां आम्ही । करण म्हणतो ॥५०६॥

आणि ह्याचि करणावरी । कर्ता क्रिया ज्या उभारी । तयांचा व्याप ते, अवधारी, । कर्म येथ ॥५०७॥

सोनार बुद्धीने व्यापी लेणे । चंद्रकर व्यापिती चांदणे । की व्यापे वेल्हाळपणे । वेली जैसी ॥५०८॥

वा प्रभा व्यापी प्रकाश । गोडीने इक्षुरस । हे असो, अवकाश । आकाशें जैसा ॥५०९॥

क्रियेने कर्त्याचिया । व्यापिले जे धनंजया, । ते कर्मचि हे बोलावया । अन्य नाही ॥५१०॥

ऐसे कर्ता कर्म करण । या तिहींचेही लक्षण । सांगितले तुज जाण । विचक्षणशिरोमणी ॥५११॥

येथ ज्ञाता ज्ञान ज्ञेय । हे कर्माचे प्रवृत्तित्रय । तैसेचि कर्ता करण कार्य । हे कर्मसंचय ॥५१२॥

वन्हीत धूम । बीजीं द्रुम । की मनीं काम । सदा जैसा; ॥५१३॥

तैसे कर्ता क्रिया करण । कर्मासी होय जीवन । जैसे सुवर्णखाणीसी सुवर्ण । जीवन होय ॥५१४॥

हे कार्य मी कर्ता येथ । ऐसा भाव असे जेथ । तेथ आत्मा दूर समस्त- । क्रियांपासुनी ॥५१५॥

किती सांगू पुनःपुन्हा प्रियोत्तमा । देहावेगळाचि गा आत्मा । चोख रीतीने, सर्वोत्तमा, । जाणसी तू ॥५१६॥

ज्ञाना-कर्मात कर्त्यात त्रिगुणीं तीन भेद जे
रचिले ते कसे ऐक गुण-तत्त्वज्ञ वर्णिती ॥१९॥

परि कर्म कर्ता ज्ञान । कथिले जे हे तीन । ते तीनठायी भिन्न । गुणयोगें असती ॥५१७॥

म्हणोनि ज्ञान-कर्म-कर्त्यावरी । विसंबू नये धनुर्धारी । रज तम बांधिती, परी । सोडवाया सत्त्वचि समर्थ ॥५१८॥

सात्त्विक ठाउके व्हावे । यास्तव गुणभेद लागत सांगावे । जे सांख्यशास्त्रतत्त्वें । स्पष्ट केले ॥५१९॥

जे विचार बोधसमुद्र । आत्मबोधकौमुदीसि चंद्र । ज्ञानडोळस शास्त्रांचे नरेंद्र । शास्त्र जे ॥५२०॥

प्रकृति-पुरुष दोन्ही । मिसळली जैसी दिनरजनी । तयां निवडुनि त्रिभुवनीं । दावी मार्तंड जे ॥५२१॥

जेथ अपार मोहांची रास । ती मापूनि तत्त्वीं चोवीस । सांसारिक मोहांचा करुनि निराम । परतत्त्वीं सुखी व्हावे ॥५२२॥

अर्जुना ते सांख्यशास्त्र । गाई जयाचे स्तोत्र । ते गुणभेदचरित्र । ऐसे आहे ॥५२३॥

गुणभेंदें अंगबळें ऐसे । त्रिविधपणाचे उठवुनी ठसे । दृश्यजात जितुके सहजसे । अंकित केले ॥५२४॥

सत्त्वरजतमांचा सांगू काय ? । तिहींचा महिमा एवढा होय । निर्मिले ब्रह्मदेवापासुनि त्रैविध्य । तों कृमीकीटकांपावत ॥५२५॥

विश्वींचा समस्त समुदाय । ज्या ज्ञानभेदें भेदिला जाय । ते ज्ञान श्रवणीय । ऐकवू आता ॥५२६॥

दृष्टी करावी चोख । तर काहीही दिसे शुद्धचि एक । तैसे शुद्ध ज्ञानें लाभे देख । पवित्रचि सकळ ॥५२७॥

म्हणोनि ते सात्त्विकजान । सांगू आता दे अवधान । कैवल्याचे निधान । श्रीकृष्ण म्हणे ॥५२८॥

भूतमात्रात जे पाहे भाव एक सनातन
अभिन्न भेदलेल्यात जाण ते ज्ञान सात्त्विक ॥२०॥

तर हे साचचि गाढे । सात्त्विक ज्ञान रोकडे । जयाचे उदयीं ज्ञेय बुडे । ज्ञात्यानिशी ॥५२९॥

सूर्य न देखे अंधार । सरितांसी न जाणे सागर । कवळिली तरि धरिता न ये खरोखर । आत्मछाया ॥५३०॥

त्यापरी ज्या ज्ञानासवे । शिवापासुनी तृणापावत हे । भिन्न न दिसे पाहे । भूतमात्र ॥५३१॥

चाचपुनी चित्र पाहता । पाण्याने मीठ धुता । जागे होउनी स्वप्न स्मरता । जैसे होय ॥५३२॥

तैसे ज्या ज्ञानें । ज्ञेयासी पाहणे । जाणता जाणावे जाणणे । काही न उरे ॥५३३॥

करण्यासी कसाची पाहणी । पारखी न आटवी लेणी । घ्यावे न लागे गाळुनी । तरंगातून पाणी ॥५३४॥

तैसे सर्व वस्तूंठायी । ज्या ज्ञाना भेद ठाऊकी नाही । त्याचि ज्ञानासी पाही । सात्त्विक म्हणती ॥५३५॥

कौतुकें आरशात पाहे । तर पाहणाराचि तेथ बिंबताहे । तैसे ज्ञात्यासी पाहो जाये । तर ज्ञेयरूपेंचि तो आहे ॥५३६॥

तेचि सात्त्विक ज्ञान । जे मोक्षलक्ष्मीचे भुवन । हे असो, ऐक लक्षण । राजसज्ञानाचे ॥५३७॥

भेदबुद्धीस पोषूनि सर्व भूतात पाहते
वेगले वेगळे भाव जाण ते ज्ञान राजस ॥२१॥

तर पार्था परियेस । ते ज्ञान राजस । जे भेदाची कास । धरुनी चाले ॥५३८॥

भूतीं भेदभाव मानून । दावित आपुले वेगळेपण । ज्ञात्यासी जे ज्ञान । चक्रावून टाकी ॥५३९॥

तैसे स्वस्वरूपाआड । लावोनि विस्मरणाचे कवाड । स्वप्नाचे काबाडकष्ट द्वाड । भोगी निद्रा ॥५४०॥

आत्मज्ञानाचे आवाराबाहेरी । असार संसाराचे माळावरी । तिन्ही अवस्थांचे खेळ करी । जीवालागी जे ॥५४१॥

अलंकारपणें झाकले । बाळा सोने जैसे न कळे । तैसे नामीं रुपीं दुरावले । अद्वैत जया ॥५४२॥

घडे गाडगे जी अवतरवी । ती अनोळखी हो मूढां पृथ्वी । वन्ही वन्हि न राही । दीपत्वायोगें ॥५४३॥

वस्र जरी पाहे । मूर्खा तंतू न आठवे । जैसे मूढास्तव कापड लोपावे । देखुनि वरील चित्र ॥५४४॥

भिन्नत्व जाणोनि भूताकारीं । ज्ञानाची वासनाचि पुरी । निमोनि गेली धनुर्धारी । ऐक्यबोधाची ॥५४५॥

मग काष्ठें भेदला अनळ । की फुलांनी परिमळ । वा तरंगभेदें जळीं सकळ । चंद्र जैसा ॥५४६॥

तैसे पदार्थभेद बहुतप्रकारें । लहान-थोर आकारें । या जाणिवेने जे भरे । ते राजसज्ञान ॥५४७॥

आता लक्षण तामसाचे । सांगेन ते ओळख साचे । डावलुनी जावे अधमाचे । सदन जैसे ॥५४८॥

एका देहात सर्वस्त मानुनी गुंतले वृथा
भावार्थहीन जे क्षुद्र जाण ते ज्ञान तामस ॥२२॥

तरी किरीटी, जे ज्ञान । हिंडे शास्त्रविधीचे वस्त्राविण । ते उघडे म्हणुन । श्रुति पाठमोरी तया ॥५४९॥

अन्यही शास्त्रांचे बहिष्कारीं । निंद्य म्हणोनि धनुर्धारी । बोळविले डोंगरीं । अनिष्ट वृत्तीचिये ॥५५०॥

जे ज्ञान गा ऐसे । तमोगुणीं पिशाच्चें जैसे । झपाटले भोवंडतसे । वेडेपिसे होउनी ॥५५१॥

नात्याचा बाध नुरे । कोण्याही पदार्था न नाकारे । सोडिले जैसे कुत्रे । ओसाड गावीं ॥५५२॥

जे तोंडाचे आवाक्यात ना मूळी । वा जे खाता तोंड पोळी । तेचि एक वगळी । इतर खायचि ॥५५३॥

उंदीर चोरी सोने । चोख हिणकस न जाणे । खाणारा मांस न म्हणे । काळे-गोरे; ॥५५४॥

अथवा वणवा वनांतरी । निवड जैसी नच करी । जिते-मेले न विचारी । जैसी बेसता माशी; ॥५५५॥

अगा ओकले की वाढले । साजुक की सडले । हा विवेक कावळे । न जाणती जैसे; ॥५५६॥

तैसे निषिद्ध सोडुनि द्यावे । की विहित आदरें घ्यावे । हे विषयांचे सरावें । न जाणेचि जे ज्ञान ॥५५७॥

जितुके ये दिठीसमोरी । तितुके उधळी विषयंवरी । मग ते स्त्री-द्रव्य चारी । शिश्नोदरां ॥५५८॥

तीर्थ-अतीर्थ ही भाष । उदकीं नसेचि तया देख । तहान भागे तेचि सुख । अन्य भले न जाणे ॥५५९॥

त्याचिपरी खाद्य-अखाद्य । न जाणे निंद्य-अनिंद्य । तोंडा आवडे ते वंद्य । ऐसाचि बोध ॥५६०॥

आणि स्त्रीजात तितुकी । त्वचेंद्रियेंचि ओळखी । तिजसंबंधी देखी । हा एकचि बोध ॥५६१॥

स्वार्था जयांचा उपयोग । तयांचेचि नाव नातलग । शारीर नात्याचा भाग । नसे तामसज्ञानीं ॥५६२॥

मृत्यूसि आघवेचि गमे अन्न । आगीसी अवघेचि गमे इंधन । तैसे सर्व जगचि धन । तामसज्ञाना ॥५६३॥

ऐसे विश्वचि हे सकळ । ज्याने विषय मानिले केवळ । तया एकमेव जाण फळ । उदरभरण ॥५६४॥

आकाशातुनि गळत्या उदका । जैसा सिंधूचि थारा देखा । तैसे कृत्यजात एका । उदरास्तवचि जाणे ॥५६५॥

यावाचुनि स्वर्गनरक असती । तयां हेतू प्रवृत्ति-निवृत्ती । या अवघ्या जाणिवेची पुरती । काळोखी रात्रचि जे ॥५६६॥

देहाच्या मुटकुळ्या नाव आत्मा । ईश्वर ही पाषणप्रतिमा । यापरती, वीरोत्तमा, । नसे बुद्धीची धाव ॥५६७॥

म्हणे शरीर पडता । कर्मासवे आत्मा सरता । मग भोगावयाची कथा । उरे कोण्या स्वरुपीं ? ॥५६८॥

अथवा ईश्वर ठायीठायी । कोणी म्हणे तो भोगवी । तर देवचि खाई । विकूनिया ॥५६९॥

देवळेश्वर गावोगावींचे । जर नियामक सृष्टीचे । तर डोंगर देशींचे । उगे का असती ? ॥५७०॥

ऐसा क्वचित् देव माने । तर पाषाणमात्रचि जाणे । आणि आत्मा तर म्हणे । देहासीचि ॥५७१॥

पापपुण्यादि न जाणे । ते आघवेचि लटिके म्हणे । हितकर मानी आगीप्रमाणे । चरणे जे का ॥५७२॥

चर्मचक्षू जे दाविती । इंद्रिये गोडी ज्याची लाविती । तेचि साच, ही पुरती । प्रतीती तया ॥५७३॥

किंबहुना ऐसी विचारप्रथा । वाढती देखसी पार्था, । धुराची वेली वृथा । आकाशीं जैसी ॥५७४॥

कोरडा ना ओला । उपयोगा न आला । जैसा वाढोनि मोडला । वृक्ष भेंडाचा; ॥५७५॥

अथवा उसाची कणसे । की नपुंसक माणसे । वन लागले जैसे । सावरीचे की ॥५७६॥

वा बालकाचे मन । की चोराघरचे धन । अथवा गळ्यासी स्तन । शेळीचे की ॥५७७॥

तैसे ते व्यर्थपणे । वांझ दिसे जाणणे । तयाते मी म्हणे । तामसज्ञान ॥५७८॥

तेही ज्ञान ही भाषा । बोलिलो तो भाव ऐसा । जन्मांधाचा जैसा । डोळा मोठा ॥५७९॥

की बधिराचे नीटस कान । अपेया नाव पान । तैसे व्यर्थ नाव ज्ञान । तामसा तया ॥५८०॥

हे असो, किती बोलावे ? । तर ऐसे जे देखावे । ते ज्ञान नव्हे जाणावे । साक्षात तम ॥५८१॥

तर ज्ञान ऐसे तिन्ही गुणीं । विभागुनि यथालक्षणीं । दाविले हे श्रोतेशिरोमणी । तुजसी गा ॥५८२॥

आता याचि त्रिविध देखसी । ज्ञानाचे प्रकाशीं । अगा गोचर कैसी । कर्त्याची क्रिया ॥५८३॥

म्हणोनि कर्म अगा । अनुसरे तीन भागा । जैसे अन्य अन्य ओगा । पाणी एकचि ॥५८४॥

तेचि ज्ञानत्रयवशें हे । त्रिविध जे आहे । तेथ सात्त्विक तर पाहे । परिस आधी ॥५८५॥

नेमिले जे न गुंतूनि राग-द्वेष न राखता
केले निष्कामवृत्तीने कर्म ते होय सात्त्विक ॥२३॥

तर स्वाधिकाराचे मार्गें । आले ते मानिले अंगें । पतिव्रता आलिंगे । प्रियासी जैसी ॥५८६॥

सावळ्या अंगा चंदन । तरुणीचे नेत्रीं अंजन । तैसे स्वाधिकारा भूषण । नित्यपणे जे; ॥५८७॥

ते नित्यकर्म भले । जेव्हा नैमित्तिकीं मिसळे । अगा सोन्यासि लेपिले । सौरभ्य जैसे ॥५८८॥

अंगें जीवे कष्टूनिया । बाळाचे करि लालनपालन पहा । परि उबगे न जिवा । माय कदापिही ॥५८९॥

तैसे सर्वस्वें कर्म अनुष्ठिती । परि फळीं दिठी न ठेविती । कर्मे ब्रह्मींचि अर्पिती । सकळही ॥५९०॥

प्रियजन येता सहजसे । सरल्या-पुरल्याचे भान नसे । सत्प्रसंगीं क्वचित् तैसे । नित्यकर्म राही जरी; ॥५९१॥

तरि न करण्याचे खेंदें । विषाद चित्तीं न बांधे । वा जाहल्याचे आनंदे । फुगुनी ना जाय ॥५९२॥

या हातोटीने ऐसे । कर्म जे निपजतसे । सात्त्विक हेचि शोभतसे । गुणनाम तया ॥५९३॥

यावरी राजस कर्माचे । लक्षण सांगेन साचे । नच राहो अवधानाचे । उणेपण ॥५९४॥

धरूनि कामना चित्तीं जे अहंकारपूर्वक
केले महा खटाटोपें कर्म ते होय राजस ॥२४॥

तर मातापित्यांसवे घरी । धड बोलणे नाही संसारी । इतर विश्व आनंदें भरी । मूर्ख जैसा ॥५९५॥

अथवा तुळशीचे झाडा । दुरुनीहि न फेकी शिंतोडा । द्राक्षवेलीचे परि बुडा । दुधचि ओती; ॥५९६॥

तैसी नित्य-नैमित्तिक । कर्मे जी आवश्यक । त्याविषयी देख । बैसला न शके उठू ॥५९७॥

अन्य काम्यकर्माचे तर नावें । देहसर्वस्वहि आघवे वेचिता तया न जाणवे । बहु ऐसे ॥५९८॥

अगा लाभे वाढीदिढीने । तेथ तृप्ती न जाणे । बीज पेरिता पुरे न म्हणे । कधीही तो ॥५९९॥

की परीस येता हाती । लोहास्तव सर्व संपत्ती । वेची उल्हासें अती । धनाशेने जैसा ॥६००॥

तैसे फळ देखोनी पुढे । करी दुष्कर काम्यकर्म केवढे । परी केलेलेही थोडे । ऐसे मानी ॥६०१॥

तरि तेणें फळाकामुकें । यथाविधी नेटके । काम्यकर्म केले तितुके । शास्त्रोक्त असे ॥६०२॥

केल्यानंतर तेही । दवंडी पिटीत राही । वाटी कर्तृत्वाची वाणेही । आपुल्या थोर ॥६०३॥

तैसा भरे कर्माचा अहंकार । मग न म्हणे पिता वा गुरुवर । जैसा न मानी काळज्वर । औषधासी ॥६०४॥

तैसे अहंकारभरें । फळाभिलाषें नरें । केले असे आदरें । जे जे काही ॥६०५॥

परि त्यासाठीही अपार । सायास करी जिवापार। जैसे उपजीविकेस्तव निरंतर । कोल्हाटी करी ॥६०६॥

एका कणासाठी उंदीर । उपसे पाही डोंगर । की बेडूक ढवळी सागर । शेवाळास्तव ॥६०७॥

भिकेइतुकेहि न लाहे । तरि गारुडी साप वाहे । ऐसा शीणचि गमताहे । गोड कोणा ॥६०८॥

हे असो, एके कणालागी । वाळवी पाताळ लंघी । तैसे स्वर्गसुकालागी । भ्रमणे जे लोभें; ॥६०९॥

ते काम्य कर्म सक्लेश । जाणावे येथ राजस । आता चिन्ह परिस । तामसाचे ॥६१०॥

विनाश वेच निष्पत्ति सामर्थ्यहि न पाहता
आरंभिलेचि जे मोहें कर्म ते होय तामस ॥२५॥

तर ते गा तामस कर्म । निंदेचे काळे धाम । निषिद्ध कर्माचे जन्म । सफळ जेणें ॥६११॥

जे निपजविता ऐसे । दिठीसी काही न दिसे । रेघ काढिता जैसे । जळाचे पोटी ॥६१२॥

ताकावरची निवळी घुसळिता । की विझला कोळसा फुंकिता । काही न दिसे गाळिता । घाण्यात वाळू; ॥६१३॥

अथवा उफणिता भुसा । वा विंधिता आकाशा । वा टाकिता फासा । वार्‍यावरी; ॥६१४॥

हे अवघेचि जैसे । वांझ होउनी नाशे । जे केल्यावरिही तैसे । वायाचि जाय ॥६१५॥

एरवी नरदेहाहिएवढे । धन जरी खर्ची पडे । जे निपजविता मोडे । जगाचे सुक ॥६१६॥

जैसा फास काटेरी । ओढिता कमळवनावरी ।  आपण झिजुनी नाश करी । कमळांचाही ॥६१७॥

पतंग जळे आपण । लोकांसी अंधार करी पण । त्वेषें झडप घालून । दीपावरी ॥६१८॥

तैसे वाया जावो सर्वस्व । देहावरिहि पडो घाव । परि इतरां उपद्रव । होय जेणें ॥६१९॥

माशी आपणा गिळावया लावी । गिळणार्‍या वांतीने शिणवी । ते मलिनचि ये आठवीं । आचरणें ज्या ॥६२०॥

तेही करावया पुरेसे । सामर्थ्य असे की नसे । हेही पुढील तैसे । न पाहताचि करी ॥६२१॥

केवढे माझे सामर्थ्य । करण्याचा प्रसंग काय । केल्याने प्राप्त होय । काय येथ ? ॥६२२॥

तुडवुनि या विचारांच्या मार्गा । अविवेकाचे पायें गा । कर्मी उद्युक्त होय उगा । आवेशें तो ॥६२३॥

आपुले घर जालुनी । पिसाटे जैसा वन्ही । वा स्वमर्यादा सोडुनी । सिंधू खवले ॥६२४॥

मग न जाणे बहु-थोडे । न पाहे मागे-पुढे । मागे-अमार्ग जेवढे । एकवटुनि चाले ॥६२५॥

तैसे योग्य-अयोग्य रगडी । आपपर दवडी । कर्मे होत वाकडी । ती तामस जाण ॥६२६॥

ऐसे त्रित्रुणी जाहले भिन्न । त्या कर्माचे जाण । केले विवेचन । उपपत्तीसह ॥६६२७॥

आता याचि कर्मा आचरिता । कर्माभिमानी कर्ता । तो जीवही त्रिविधता । पावला असे ॥६२८॥

ब्रह्मचर्यादि आश्रमवशें । एक नर चतुर्विध दिसे । कर्त्या त्रैविध्य तैसे । कर्मभेदें ॥६२९॥

परि त्या तिन्हीत । सात्त्विक तर प्रस्तुत । सांगेन, चित्त देत । ऐकावे तू ॥६३०॥

निःसंग निरहंकार उत्साही धैर्यमंडित
फळो जळो चळेना तो कर्ता सात्त्विक बोलिला ॥२६॥

तर सोडूनि फळोद्देशा । वाढती सरळशा । शाखा चंदनाच्या जैशा । मलयगिरीवरी; ॥६३१॥

वा न फळताहि सार्थक । जैसे नागवेलीस देख । ऐशा करी नित्यादिक । क्रिया जो का ॥६३२॥

परी फळशून्यता । न आणी तया विफलता । फळासीचि पांडुसुता । फळे कायसी ? ॥६३३॥

आणि बहुत आदरें करी । कर्ता मी हे न गर्जे परी । न गर्जता सुष्टी भरी । जैसी वर्षाकाळींची मेघावली ॥६३४॥

तैसेचि परमात्मलिंगीं । समर्पावयाजोगी । कर्मे जी जागोजागीं । सर्वत्र निपजावया; ॥६३५॥

योग्य काळा न उल्लंघावे । स्थळशुद्धीसीही । साधावे । शास्त्राधारें करावे । कर्मनिर्णय ॥६३६॥

वृत्तीसी एकवटावे । चित्त फळीं न जाऊ द्यावे । नियमांचे बांधोनि घ्यावे । साखळदंडीं ॥६३७॥

हा निग्रह साहावा लागे । म्हणोनि धैर्याचे भले जागे । चिंतन जिते अंगें । वाहे जो का ॥६३८॥

आणि आत्मप्राप्तीचे प्रेमें । करी विहित कर्मे । देहसुखा ना नमे । शिवे न तेथ ॥६३९॥

ऐसी निद्रा दुरावे । क्षुधा न जाणवे । सुखस्वाथ्य न पावे । अंगाचा ठाव ॥६४०॥

कर्मी अधिकाधिक गुंते पुढे । उत्साह बहुत वाढे । सोने तावता जैसे घडे । कस वाढे, वजन घटे ॥६४१॥

जेथ प्रीती असे साच । तर जीवितहि गमे तुच्छ । आगीत उडी घेता रोमांच । जैसे सतीचे अंगीं ॥६४२॥

मग आत्मप्राप्तीस्तव या । देह कष्टताही तया । काय धनंजया । खेद होई ? ॥६४३॥

म्हणोनि विषयसुख तुटे । जों जों देहविषयक प्रेम आटे । तों तों आनंद दुणवटे । कर्मीं तया ॥६४४॥

ऐसे जो कर्म करी । आणि कोणे एके अवसरी । ते थबके ऐशापरी । घडे काही ॥६४५॥

गाडा ये धडाडत कडयावरुनी । मोडताहि अवघड न मानी । तैसे कर्म राहता थबकुनी । थोडा थोडा न होय ॥६४६॥

अथवा जे आरंभिले । पूर्णतया सिद्धीसी गेले । तर तेही जिंकले । ऐसे न मिरवी ॥६४७॥

या लक्षणीं कर्म करिता । देखावा जो पांडुसुता । तया म्हणावे तत्त्वता । सात्त्विक कर्ता ॥६४८॥

आता राजसकर्त्या । ओळखावे ऐसे धनंजया । अभिलाषेसी जगाचिया । आश्रय तो ॥६४९॥

फलकामुक आसक्त लोभी अस्वच्छ हिंसक
मारिला हर्ष-शोकें तो कर्ता राजस बोलिला ॥२७॥

गावींचा कचराकेर । गोळा होय उकिरडयावर । वा स्मशानीं अपवित्र । आघवेचि ते ॥६५०॥

यापरी जो विशेष । विश्वाचे अभिलाषेस । पाय प्रक्षाळण्यास । स्थान जाहला ॥६५१॥

म्हणोनि फळाचा लाभ । देखे जेथ सुलभ । त्या कर्मीं ठेवी लोभ । सरळ रोखें ॥६५२॥

आणि जी आपण जोडी । ती खर्चू न दे कवडी । क्षणोक्षणीं कुरवंडी । जिवाची करी ॥६५३॥

जैसा कृपण ठेव्यास्तव दक्ष । तैसे तयाचे परक्या धनीं लक्ष । बक ध्यानस्थ उभा साकांक्ष । माशास्तव जैसा ॥६५४॥

जवळी जाता गोविती । लगटता अंग फाडिती । फळे आंबट, जीभ पोळीती । बोरीची जैसी ॥६५५॥

तैसे मन-वाचा-कायें । कोणाही दुखवित जाये । स्वार्थ साधिता न पाहे । दुज्याचे हित ॥६५६॥

तैसेचि अंगें कर्म । करण्या नसे सक्षम । परि नच नमोधर्म । तेथुनी वळवी ॥६५७॥

धोतर्‍याचे फळीं, अवधारी । बी अमली, कवच काटेरी । तैसा अंतर्बाह्य दरिद्री । शुचित्वें जो; ॥६५८॥

आणि कर्मजात होता ऐसे । फळ लाधे जर विशेषसे । तर जगा या हर्षें । वाकुल्या दावी ॥६५९॥

वा जयाचा आरंभ करी । ते निष्फळ होय जरी । त्रिवार धिक्कारी । शोकग्रस्त होउनी ॥६६०॥

कर्मीं वर्तणूक ऐसी । जयाची असे देखसी । अवश्य तोचि जाणसी । राजसकर्ता ॥६६१॥

आता अन्य यानंतर । जो कुकर्माचे सागर । तोही करू गोचर । तामस कर्ता ॥६६२॥

स्वच्छंदी क्षुद्र गर्विष्ठ घातकी शठ आळशी
दीर्घसूत्री सदा खित्र कर्ता तामस बोलिला ॥२८॥

तर मी लागता कैसे । पुढिल सर्व जळतसे । हे अग्नी न जाणे जैसे । कदापि गा ॥६६३॥

न जाणे शस्त्र तीक्ष्ण । कैसे ते निपटी कोण कोण । वा न जाणे काळकूट आपण । अनिष्ट जे ॥६६४॥

तैशा आपणा वा अन्या । घातक होती ज्या । आरंभी त्या क्रिया । दुष्ट जो गा ॥६६५॥

त्या करण्याचेही वेळी । काय होय हे न सांभाळी । वावटळीत भरला वायू चळीं । बहके जैसा ॥६६६॥

अगा कर्ता आणि क्रिया । यात मेळ नाही धनंजया । त्यापुढे वेडयाखुळ्यांचा त्या । काय पाड ? ॥६६७॥

चरोनि इंद्रियांनी दिलेले । राखे जो जिणे आपुले । बैलातळीं लागले । गोचिड जैसे ॥६६८॥

हास्या-रुदना वेळ । न जाणताचि आरंभी बाळ । वागण्यात नसे मेळ । त्यापरी गा ॥६६९॥

जो प्रकृतिचे आधीनपणे । योग्य-अयोग्य न जाणे । फुगे केल्याचे तृप्तीने । उकिरडा जैसा ॥६७०॥

अहंमन्यतेचे नावें । ईश्वरापुढेही न लवे । ताठयाने हरवे । डोंगरासी ॥६७१॥

मन जयाचे कपटी । वागणूक पुरती चोरटी । आणि तयाची दृष्टी । वारांगनेची ॥६७२॥

किंबहुना कपटाचा । देहचि वळला तयाचा । ते जिणे की अड्डाचि जुगाराचा । तिठयावरी ? ॥६७३॥

नव्हे काय तयाचा अवतार । स्वार्थी लुटारूंचे नगर ? । न यावे जावे खरोखर । त्या वाटेसी कधी ॥६७४॥

आणि दुसर्‍याचे भले जे । पाहता तया वैर उपजे । दुधीं लवण घातले म्हणजे । अपेय करी जैसे ॥६७५॥

पदार्थ जरी गार । तरि घातला अग्नीवर । तोंचि तत्क्षणी झरझर । अग्नी होय; ॥६७६॥

वा सुद्रव्ये गोमटी । प्रविष्ट होता पोटीं । होउनि राहती किरीटी; । मळचि जैसी ॥६७७॥

तैसे दुसर्‍याचे बरवे । जयाचे अंतरीं पावे । आणि विरुद्धचि आघवे । होउनी निघे ॥६७८॥

इतरांचे गुण मानी दोषास्पद । अमृताचे करी विष दग्ध । पाजताही दूध । उलटे साप जैसा ॥६७९॥

आणि इहलोकीं जगावे । जेणे परलोकासी साच पावावे । ते उचित कृत्य लाभावे । अवसरी ज्या; ॥६८०॥

तेव्हाचि जया सहजशी । निद्रा ये ठेविली ऐशी । तीचि दुर्व्यवहारी जैसी । विटाळभयें पळे ॥६८१॥

द्राक्षरस आम्ररस ठेविता पुढे । कावळ्याचे तोंड सडे । की दिवसा घुबडे । आंधळी होती ॥६८२॥

तैसा कल्याणकाळ पाही । आणि आळस तया खाई । प्रमादकाळीं होई । तो म्हणे तैसे ॥६८३॥

जैसी सागराचे पोटीं । जळे अखंड आगटी । तैसा विषाद वाहे गाठी । जिवाचे जो ॥६८४॥

धूर आगीत लेंडयांचे । की अंगीं दुर्गंधी अपानाचे । तैसा तो जन्मभरी दुज्याचे । मत्सरें ग्रासला ॥६८५॥

आणि कल्पांताचेहि पार । लांबे जयाचे सूत्र । ऐसा आरंभी व्यापार । साभिलाष ॥६८६॥

जगाहिपैलची अती । चिंता वाहे चित्तीं । परि त्याविषयीं हातीं । तृणही न लागे ॥६८७॥

ऐसा लोकांमध्ये करी वास । जो पापांची मूर्तिमंत रास । अगा देखसी तो तामस । कर्मा जाण ॥६८८॥

ऐसे कर्म कर्ता ज्ञान । या तिहींचे त्रिधा चिन्ह । दाविले तुज जाण । सुजनांचिये चक्रवर्ती ॥६८९॥

बुद्धीचे भेद जे तीन धृतींचेहि तसेचि जे
गुणनुसार ते सारे सांगतो वेगवेगळे ॥२९॥

आता अविद्येचे गावीं । मोहाची वस्त्रे वेढुनी नवी । संदेहाची आघवी । लेवूनि लेणी ॥६९०॥

आत्मनिश्चयाचे सौंदर्य । ज्या दर्पणीं दिसे सावयव । त्या बुद्धीचीही धाव । त्रिधा असे ॥६९१॥

अगा या सत्तादि गुणीही । काय एक तीन ठायी । विभागले न जाई । जगामाजी ? ॥६९२॥

आग न वसे उदरीं । ऐसे कवण काष्ठ सृष्टीत तरी ? । तर कैसे दृश्य वस्तूत धनुर्धारी । ते त्रिधा नसावे ? ॥६९३॥

म्हणोनि तिन्ही गुणीं । बुद्धी केली त्रिगुणी । धृतींचीही वाटणी । तैसीचि असे ॥६९४॥

तेचि एकेक वेगळाले । लक्षणीं अलंकारिले । सांगू विस्तारिले । भिन्नपणें ॥६९५॥

परी बुद्धी धृती या । दोन गोष्टीत धनंजया । आधी वर्णन करूया । बुद्धीच्या भेदांचे ॥६९६॥

तर निकृष्ट मध्यम उत्तम या । अगा संसारीं यावया । प्राण्यांसी वाटा, धनंजया । तीन असती ॥६९७॥

करणीय काम्य निषिद्ध । हे तिन्ही मार्ग प्रसिद्ध । जीवां यांपासूनि बाध । जन्म-मरणाचा ॥६९८॥

अकर्तव्यें बंध-भय कर्तव्यें मोक्ष निर्भय
जाणे सोडू धरू त्यास बुद्धि सात्त्विक ओळख ॥३०॥

म्हणोनि अधिकारें मानिले । जे विधींचे बोधें आले । ते एकचि येथ भले । नित्य कर्म ॥६९९॥

तेचि आत्मप्राप्तिफळीं केवळ । बुद्धि ठेवोनि निखळ । करावे जैसे जळ । सेविण्या तहानेल्याने ॥७००॥

इतुक्यानेचि ते कर्म । पळवी जन्मभय दुर्गस । करोनि देई सुगम । मोक्षसिद्धी ॥७०१॥

ऐसे कर्म करी तो भला । जन्म-मृत्यु-भयें त्यागिला । करणीय करोनि आला । मुमुक्षुमार्गा ॥७०२॥

तेथ जी बुद्धी ऐसा । बळकट बांधी भरवसा । मोक्ष ठेविला जैसा । लाभेल येथ ॥७०३॥

म्हणोनि निवृत्तीचि मांडिली । ठेवूनि प्रवृत्तितळीं । ऐशा या कर्मजळीं । डुबी का न घ्यावी ?  ॥७०४॥

उदकें तृषार्ता लाभे जीवन । पुरात पडलेल्या पोहून । अंधकूपीं गेलेल्या किरण । सूर्याचे की ॥७०५॥

औषध घेई पथ्यासंगे । तर रोगें ग्रासलाही जगे । मासाही जिव्हाळा भोगे । जळाचा जर;  ॥७०६॥

तर त्या जीविता । नाही जैसे अन्यथा । तैसे कर्मी या प्रवर्तता । लाभे मोक्ष ॥७०७॥

हे नित्य कर्म करण्याकडे । ज्या ज्ञानाची प्रवृत्ति जडे । अकरणीय कर्माविषयीं पुढे । जाण तू गा ॥७०८॥

जी ती कर्मे काम्यादिक । जन्ममरणांमुळे भयदायक । अयोग्यतेचे शिंतोडे किति एक । उडाले ज्यांवरी ॥७०९॥

कर्मी त्या अकरणीय । येता जन्ममरणसमय । मागल्याचि पाउलीं पाय । प्रवृत्ति पळवी ॥७१०॥

आगीमध्ये न शिरवे । पुरात उडी न घालवे । तप्त शूळ न धरवे । जैसे की ॥७११॥

काळा नाग फूत्कारे । देखोनि न स्पर्शवे करें । न जाववे गुहेचे द्वारें । वाघाचिया; ॥७१२॥

तैसे कर्म अकरणीय़ । देखोनि महाभय । उपजे निःसंशय । बुद्धीत ज्या; ॥७१३॥

वाढिले रांधुनी विषें । तेथ मृत्यू न चुकतसे । तैसा निषिद्ध कर्मी देखतसे । बंधासी गा ॥७१४॥

मग बंधभयभरित पार्था । निषिद्ध कर्मे प्राप्त होता । निवृत्तीचा विनियोग आता । जाणे कर्माचिया ॥७१५॥

ऐसे कार्याकार्यविवेकीं । प्रवृत्ति-निवृत्तीचे मापी की । खरे-खोटे रत्न पारखी । ओळखे ज्यापरी ॥७१६॥

ऐसी कृत्याकृत्यशुद्धी निखळ । जाणे जी तात्काळ । सात्त्विक बुद्धी निर्मळ । तीचि तू जाण ॥७१७॥

कार्याकार्य कसे काय काय धर्म अधर्म तो
जी जाणू न शके चोख बुद्धि राजस ओळख ॥३१॥

आणि बगळ्यांचे गावात । क्षीर-नीर कालवुनि सेवीत । भेद नाही दिवस-रात्रीत । अंधा जैसा ॥७१८॥

जया फुलांचा मकरंद लहे । तोचि काष्ठहि कोरू धावे । परि भ्रमरपण न व्हावे । नष्ट जैसे; ॥७१९॥

तैसी कार्याकार्ये ही । धर्म-अधर्म रूपींही । न निवडिता आचरीत राही । बुद्धी जी गा; ॥७२०॥

न होता मोत्यांची पारख । क्वचितचि मिळती चोख । न मिळणे तर एक । ठेविलेलेचि; ॥७२१॥

तैसी अकरणीय क्वचित् टळती । जर पुढयात न येती । एरवी एकवट जाणती । दोन्ही जी का ॥७२२॥

जी कार्य-अकार्य न जाणे । ती राजसबुद्धी मी म्हणे । जैसी सरसकट अक्षत टाकणे । वधुवरांसवे वर्‍हाडयांवरी ॥७२३॥

धर्म मानी अधर्मास अंधारें भरली असे
अर्थ जी उलटा देखे बुद्धि तामस ओळख ॥३२॥

आणि राजा ज्या वाटेने जाय । ती चोरा अडचणीची होय । वा राक्षसां दिनोदय । रात्र गमे; ॥७२४॥

पुरलेली ठेव अभाग्यासी । रास कोळशाची जैसी । आपुले असुनी आपणासी । नाही ऐसे जाहले; ॥७२५॥

तैसे धर्मजात तितुके । ज्या बुद्धीसी गमत पातके । साच ते लटिके । ऐसेचि मानी ॥७२६॥

ती आघवेचि अर्थ । करुनी टाकी अनर्थ । गुण ते ते व्यवस्थित । दोषचि मानी ॥७२७॥

किंबहुना जे अंगिकारुनी । मान्यतेसी आणिले श्रुतींनी । तितुकेही उलटे मानी । जी बुद्धी गा; ॥७२८॥

ती कोणासीही न पुसता । तामसी जाणावी पंडुसुता । न ये धर्म अर्थ आकळिता । ती काय करावी ? ॥७२९॥

ऐसे बुद्धीचे भेदांसी । सुस्पष्ट कथिले तुजसी । स्वबोधकमळविकासी । चंद्रा तुज ॥७३०॥

आता याचि बुद्धि वृत्ती । कर्मजाताचा निश्चय करिती । तेव्हा त्रिविध धृती । आधार देती ॥७३१॥

त्या धृतींचेही विभाग । सांगू अलग अलग । तिन्ही यथासांग । अवधान दे ॥७३२॥

जी इंद्रिये मन प्राण ह्यांचे व्यापार चालवी
समत्वें स्थिर राहूनि धृति मात्त्विक जाण ती ॥३३॥

तर उगवता दिनकर । चौर्थकर्मासकट निपटे अंधार । वा कुंठवी दुर्व्यवहार । राजाज्ञा जैसी ॥७३३॥

सोसाटयाचे वार्‍याने जैसे । ढग होती नाहीसे । आणि लोपुनि जातसे । गडगडट; ॥७३४॥

अगस्तीचे होता दर्शन । समुद्र बसती धरुनि मौन । चंद्रोदयीं कळळवन । मिटूनी जाई; ॥७३५॥

मदोन्मत्त हत्ती । उचलिला पाय न टेकिती । सिंह गर्जोनी पुढती । येई जरी; ॥७३६॥

तैसा तो धीर । उसळे अंतरी जर । मनादि इंद्रिये व्यापार- । उभ्याउभ्याचि टाकिती ॥७३७॥

इंद्रिय-विषयांच्या गाठी । आपोआप सुटती किरीटी । मनमायेचे शिरती पोटीं । दाही इंद्रिये ॥७३८॥

अध-ऊर्ध्व कोंडी । नऊ वायूंची पेंडी । बांधोनि घाली उंडी । सुषुम्नेमाजी ॥७३९॥

संकल्प-विकल्पांचे प्रावरन । टाकूनि उघडे होय मन । बुद्धीही मागे राहून । उगीचि बैसे ॥७४०॥

ऐसी धैर्यराज याप्रमाणें । मन प्राण इंद्रियां जेणें । स्वकर्माविषयींची संभाषणे । त्यजावया लावी ॥७४१॥

मग अवघेचि एकेक तेथ । ध्यानरूप कोठडीत । युक्तीने कोंडले जात । योगाचिये ॥७४२॥

परि चक्रवर्ती परमात्म्याचे हाती । स्वाधीन होईतों जी धृती । लाच न घेता तया ती । धरुनि ठेवी ॥७४३॥

ती गा धृती येथ । सात्त्विक हे निश्चित । सांगती श्रीकांत । अर्जुनासी ॥७४४॥

धर्मार्थकाम सारेचि चालवी सोय पाहुनी
बुडवी जी फलाशेत धृति राजस जाण ती ॥३४॥

आणि जीवात्मा होउनी शरीरीं । स्वर्ग-संसार या दोन्ही घरीं । नांदे जो पोटभरी । धर्म अर्थ काम या उपायें; ॥७४५॥

तो मनोरथांचे सागरीं । या त्रिवर्गाचे तारूवरी । ज्या धैर्यबळें करी । कर्मव्यापार; ॥७४६॥

जे कर्म भांडवला घालिता । त्याची चौपट व्हावी ऐसे पाहता । एवढे सायास येत साहता । ज्या धैर्यायोगें ॥७४७॥

ती गा धृति राजस । पार्था येथ परियेस । आता ऐक तामस । तिसरी जी ॥७४८॥

निद्रा भय न जी सोडी शोक खेद तसा मद
घाली झापड बुद्धीस धृति तामस जाण ती ॥३५॥

तर सर्व अधम गुणें । जयाचे की रूपा येणे । कोळसा काळेपणें । घडला जैसा ॥७४९॥

अहो सामान्य आणि हीन । तयांही का गुणत्वाचा मान ? । तर राक्षसां पुण्यजन । का न म्हणावे ? ॥७५०॥

ग्रहांमध्ये इंगळ । तया म्हणती मंगळ । तैसा तमोगुणीं ढिसाळ । गुण शब्द हा ॥७५१॥

जो सर्व दोषांचा आसरा । तो तमोगुणचि कमावुनि पुरा । उभारिले शरीरा । ज्या नराचे ॥७५२॥

तो आळस ठेवुनि काखेसी । कधी न मुके निद्रेसी । पापे पोषिता दुःखे जैसी । कधी न सोडिती ॥७५३॥

आवडीने देहधनाचिया । न सोडी नित भय तया । विसरू न शके काठिण्या । दगड जैसा ॥७५४॥

सर्व पदार्थीं स्नेह बांधी । म्हणोनि शोक आश्रये तेथ आधी । पाप टळू न शके कधी । कृतघ्नापासुनी जैसे ॥७५५॥

आणि जीवा असंतोष । धरुनि ठेवी अहर्निश । म्हणोनि प्रारंभ मैत्रीस । विषादें केला ॥७५६॥

जैसी लसणासी दुर्गंधी । वा अपथ्यशीला व्याधी । तैसा तया मरणापर्यंत कधी । न सोडी विषाद ॥७५७॥

आणि तारुण्य वित्त काम । यांनी वाढवी संभ्रम । म्हणोनि मदें आश्रम । तोचि केला ॥७५८॥

आग न सोडी ताप । डूख जातीचा साप । की भय होय वैरी आपोआप । जगासी अखंड जैसे ॥७५९॥

अथवा शरीरासी काळ । न विसंबे कोणे वेळ । तैसा असे अढळ । तामसीं मद ॥७६०॥

ऐसे पाचही हे निद्रादिक । तामसाठायी दोष एकेक । ज्या धृतीने  देख । धरिले असती ॥७६१॥

ते गा धैर्य या नावें । तामस येथ जाणावे । ऐसे म्हटले देवें । जगाचे तेणे ॥७६२॥

ऐसे त्रिविध ज्या बुद्धियोगे होय । केले जाती कर्मनिश्चय । तो या धृतींकडुनि नेला जाय । सिद्धीसी गा ॥७६३॥

मार्ग दाखवी सूर्य । चालती मात्र पाय । परि ते चालणे होय । धैर्यं जेणे ॥७६४॥

तैसी बुद्धी कर्मासि दावी । ते इंद्रियसामुग्री निपजवी । परि निपजवावया असावी । धैर्यशीलता जी; ॥७६५॥

ती गा कथिली तुजसी । ही त्रिविध धृति ऐसी । तिजयोगे कर्मनिष्पत्ती देखसी । जाहल्यावरी; ॥७६६॥

फळ जे एक निपजे तेथे । सुख म्हणती तयाते । त्रिविध जाणावे पुरते । कर्मवशें ॥७६७॥

तर फळरूप ते सुक । त्रिगुणीं विभागले देख । विवेचू आता चोख । चोख बोलीं ॥७६८॥

परि चोख ती कैसी सांगे ? । घेवो जाता शब्दांमार्गें । कानाचेही हातीचा लागे । मळ तेथ ॥७६९॥

म्हणोनि गा अव्हेरी । अवधान जे बाहेरी । आणि ऐक हो अंतरी । जिवाचे जीवें ॥७७०॥

ऐसे म्हणोनि देव । त्रिविध सुखाचा प्रस्ताव । मांडिती तो भाव । निरूपितसे ॥७७१॥

तिन्ही प्रकारचे आता सांगतो सुख ऐक ते
अभ्यासें गोड जे होय दुःखाचा अंत दाखवी ॥३६॥

अगा सुखत्रयसंज्ञा । म्हणोनि जी प्रतिज्ञा । बोलिलो ते प्राज्ञा । ऐक आता ॥७७२॥

तर सुख जे गा मी म्हणे । दावीन तुज दिठीने । जे आत्म्याचिया भेटीने । जिवासि होय ॥७७३॥

परी मात्रेचे मापें । दिव्यौषध घ्यावे साक्षेपें । कथिलाचे करावे रूपे । रसायनक्रियेने ॥७७४॥

वा व्हावया लवणाचे जळ । अगा दोनचार वेळ । शिंपावे लागे अंमळ । जळ जैसे ॥७७५॥

तैसे जाहल्या सुखलेशें । ते जीव वाढवी अभ्यासें । तेणें जीवपणाचे नाशे । दुःख तेथ ॥७७६॥

येथ आत्मसुख । जाहले असे त्रिगुणात्मक । तेही सांगू एकेक । रूप आता ॥७७७॥

जे कडू विख आरंभीं अंतीं अमृततुल्यचि
आत्म्यात शुद्ध बुद्धीस लाभले मुख सात्त्विक ॥३७॥

आता चंदनाचे बूड । सर्पांयोगें जैसे अवघड । वा निधानाचे तोंड । पिशाचायोगें; ॥७७८॥

अगा स्वर्गींचे लाभण्या गोमटे । आडवी येती यज्ञसंकटे । वा बाळपणीही भेटे । पीडाकाळ; ॥७७९॥

हे असो, लावावा दिवा । तर आधी धूर सोसावा । घेई जिभेचा ठाव वा । कडूपण औषधाचे; ॥७८०॥

त्यापरी पांडवा, । ज्या सुखाचे शिरकावा । कष्ट देई मेळावा । यम-दमांचा ॥७८१॥

सर्व स्नेहां ग्रासून । वैराग्य उभे अंगातून । स्वर्गसंसाराचे कुंपण । तोडुनी टाकी ॥७८२॥

अतित्रासें विवेकश्रवणे । तैसी कर्कश व्रताचरणे । करिता वाभाडे निघणे । बुद्धि-आदिकांचे ॥७८३॥

प्राण-अपानांचे लोंढे । गिळावे लागत सुषुम्नेचे तोंडें । बोहोनीसीचि एवढे । कष्ट जेथ ॥७८४॥

विरहीं चक्रवाक मिथुन । वस्त काढिता कासेपासून । उठविता भरल्या ताटावरून । होय जे गा; ॥७८५॥

नेता मायेपासुनि बालक । काळाने एकुलते एक । अगा तुटता उदक । माशासि होय जैसे; ॥७८६॥

तैसे सोडिता विषयांचे घर । इंद्रियां युगान्त गमे घोर । तो विरागी वीर । साहताती ॥७८७॥

ज्या सुखाचा आरंभ कष्टमय । दावी सतत काठिण्य । मग क्षीराब्धीमंथनीं होय । लाभ अमृताचा जैसा ॥७८८॥

पहिल्या वैराग्यगरळासी । धैर्यशंभू सहज प्राशी । तर ज्ञानामृतसोहळ्यासी । भोगी जेथ; ॥७८९॥

जैसे द्राक्ष हिरवेपणे । कोलिताहि हरवे आम्लपणे । परि ते परिपक्वतेने । मधुर होय ॥७९०॥

ते वैराग्यादिक तैसे । पिकल्या आत्मप्रकाशें । वैराग्यदुःखासह नाशे । अविद्याजात; ॥७९१॥

तेव्हा सागरीं गंगा जैसी । आत्मा भेटता बुद्धि तैसी । अद्वयानंदाची अहजशी । खाण उघडे ॥७९२॥

ऐसे मुरता अनुभव । परिणमे मूळ वैराग्य । तेचि गा सात्त्विक सुख होय । म्हणती येथ ॥७९३॥

आरंभी गोडसे वाटे अंतीं मारक जे विख
भासे विषयसंयोगें इंद्रियां सुक राजस ॥३८॥

आणि विषय-इंद्रियांचा या । मेळ होता धनंजया । जे सुख जाय वाहोनिया । दुथडी भरोनी ॥७९४॥

अधिकारी येता गाव । करी जैसा उत्सव । वा ऋण काढोनि विवाह । साजरा केला ॥७९५॥

अथवा रोग्याच्या जिभेसी । केळ गोड साखरेशी । अथवा वचनागविषीं । माधुर्य प्रारंभीं ॥७९६॥

प्रारंभीं सभ्य चोराचे मैत्र । वा बाजारबसवीचे चरित्र । की बहुरूप्याचे विचित्र । विनोद ते ॥७९७॥

जैसे विषयेंद्रियदोषी । जे सुख जिवासि पोषी । रत्ने मानुनी चांदण्यांचे प्रतिबिंबासी । हंस मरे खडकावरी; ॥७९८॥

तैसे जोडले अवघे आटे । जीविताचा ठाव फिटे । सुकृताचेहि धनाची सुटे । गाठ अगा ॥७९९॥

आणि भोगिले जे काही । ते स्वप्नाऐसे नष्ट होई । मग हानीचेचि घावीं । लोळणेउरे ॥८००॥

ऐसे इहलोकीं जे राजस सुख । ते आपत्ती ऐसे परिणसे देख । परलोकीं तर ते होय विष । उलटे अगा ॥८०१॥

पहा, इंद्रियां लावुनी लळा । जाळोनि धर्माचा मळा । भोगिती सोहळा । विषयांचा जेथ: ॥८०२॥

तेथ पापासि बळ चढे । ते नरकीं बुडे । ज्या सुखें अपाय घडे । परलोकीं ऐसा ॥८०३॥

प्रथम गोड बचनागविष । परि अंती मारक जिवास । तैसे इहलोकीं जे मिठ्ठास । अंतीं कडू; ॥८०४॥

पार्था ते सुख साचे । वळिले आहे रजाचे । म्हणोनि न शिवावे तयाचे । अंगा कधी ॥८०५॥

निद्रा आळस दुर्लक्ष ह्यांनी आत्म्यास घेरुनी
आरंभी परिणामीहि गुंगवी सुख तामस ॥३९॥

आणि अपेयाचे पानें । की अखाद्याचेहि भोजनें । वा स्वैरस्त्रीसंगतीने । होय जे सुख ॥८०६॥

अथवा दुसर्‍याचे संहारें । वा परधनअपहारें । की जे सुख अवतरे । भाटाचे बोलीं; ॥८०७॥

जे आळसावरी पोसले । झोपेत जे दिसले । तयाचे आदिअंती भुले । जीव आपुली वाट; ॥८०८॥

ते गा सुख पार्था । तामस जाण सर्वथा । सुखाची असंभाव्य कथा । हे बहुत सांगे ॥८०९॥

ऐसे कर्मभेदें मुळातले । फळसुखही त्रिधा जाहले । हे यथाशास्त्र केले । विशद तुज ॥८१०॥

कर्ता-कर्म-कर्मफळ । ही त्रिपुटी येथ केवळ । तिजवाचुनि सूक्ष्म वा स्थूळ । काही नसे तेथ ॥८११॥

आणि ही तर त्रिपुटी । तिन्ही गुणीं या किरीटी, । गुंफिली असे पटीं । तंतूचि जैसे ॥८१२॥

इथे पृथ्वीवरी किंवा स्वर्गीं देवादिकातहि
काही कुठे नसे मुक्त प्रकृतीच्या गुणातुनी ॥४०॥

प्रकृतिचे आविष्कारीं म्हणुनी । जी न बद्ध या सत्त्वादि गुणीं । ऐसी स्वर्गीं वा मृत्युलोकातुनी । नसे वस्तू ॥८१३॥

काय लोकरीविण कांबळा । की मातीविण गोळा । वा जळाविण कल्लोळा । होणे आहे ? ॥८१४॥

तैसे न होता बद्ध गुणीं । या सृष्टिरचनेत कोणी । नाहीचि गा प्राणी । खरोखर ॥८१५॥

यालागी हे सकळ । तिन्ही गुणांचेचि केवळ । घडले आहे निखिळ । ऐसे जाण ॥८१६॥

ब्रह्मा विष्णु महेश तिन्ही देव । स्वर्ग-मृत्यु-पाताळ-लोकत्रय । कर्मे चतुर्वण्यांस्तव । गुणांनीचि निर्मिली ॥८१७॥

ब्राह्मणादिक वर्णांची कर्मे ती ती विभागिली
स्वभावसिद्ध जे ज्याचे गुण त्यांस धरूनिया ॥४१॥

तर तेचि चार वर्ण । पुससी जर कवण कवण । तर जयां मुख्य ब्राह्मण । धुरेचे की ॥८१८॥

अन्य क्षत्रिय वैश्य दोन्ही । ब्राह्मणांचेचि तोलाचे मानी । अगा, ते योग्य म्हणोनी । वैदिक कर्मीं ॥८१९॥

आणि चौथा शूद्र जो जाणावा । वेदीं अधिकार नाही तया । तर वृत्ती वर्णत्रया- । आधीन तयाची ॥८२०॥

ब्राह्मणादिकांचे जवळिकीने । त्या जीवनवृत्तीप्रमाणे । शूद्रही की तेणे । चौथा वर्ण जाहला ॥८२१॥

जैसे फुलांचेसवे । रसिकें दोर्‍यासी हुंगावे । तैसी श्रुति द्विजासह लाघवें । स्वीकार शूद्रा ॥८२२॥

ऐसी ऐसी गा पार्था । ही चातुर्वर्ण्यव्यवस्था । करू आता कर्मपथा । यांच्या स्पष्ट ॥८२३॥

ज्या गुणीं ते वर्ण चारी । जन्म-मृत्यूची कातरी । चुकवोनिया ईश्वरीं । प्रवेशती ॥८२४॥

ज्या आत्पप्रकृतिचे गुणी । सत्त्वादिक कर्मे तिन्ही । वाटिली चार वर्णी । चार ठायी ॥८२५॥

बापें जोडिले वाटुनि द्यावे लेकां । सूर्ये दावावा मार्ग पथिकां । वा काम नेमुनि द्यावी सेवका । स्वामीने जैसी ॥८२६॥

तैसी प्रकृतिचे गुणी । या कर्मांची विभागणी । केली आहे वर्णीं । चार या ॥८२७॥

तेथ सत्त्वें आपुले अंगी । सम-विषम भागीं । ठेविले अधिकारालागी । ब्राह्मण-क्षत्रिय ॥८२८॥

रजचि परि अल्पसा सात्त्विक । तेथ ठेविले वैश्य लोक । म्हणोनि रजचि तमभेसळ एक । शूद्र ते गा ॥८२९॥

ऐसा एकचि सकळ प्राणिवृंद । तरि चतुर्वर्णत्वें येथ भेद । गुणांनीचि केला हे विशद । करू तुज ॥८३०॥

मग आपुले ठेविले जैसे । आयतेचि दीपें दिसे । गुणभिन्न कर्म तैसे । शास्त्र दावी ॥८३१॥

कोण्या कर्मा काय विहित ते । त्या कर्माचे लक्षण कोणते । हे सांगू आता ऐक पुरते । श्रवणसौभाग्यनिधे ॥८३२॥

शांति क्षमा तप श्रद्धा ज्ञान विज्ञान निग्रह
ऋजुता आणि पावित्र्य ब्रह्मकर्म स्वभावता ॥४२॥

तर सर्वेंद्रियांच्या वृत्ती । घेऊनि आपुल्या हाती । बुद्धि आत्म्यासि मिळे, एकांतीं- । प्रिया जैसी ॥८३३॥

ऐसा बुद्धीचा आत्म्याठायी विश्राम । तया नाव म्हणावे शम । तो गुण गा प्रथम । जया कर्मा ॥८३४॥

आणि बाह्येंद्रियांची धेंडे । पिटूनि विधींचे दंडे । न दे अधर्माकडे । कधीचि जावो ॥८३५॥

तो गा शमाचे साहाय्या । दम दुजा धनंजया । आणि स्वधर्माचे रीतीने या । जे असे जिणे; ॥८३६॥

तेवीचि सटवीचे राती । न विसंबावी दिवलीची वात ती । ईश्वरश्रद्धा तैसी चित्तीं । वाहणे सदा; ॥८३७॥

तया नाव तप । ते तिज्या गुणाचे रूप । आणि पवित्रपणही निष्पाप । द्विविध जेथ ॥८३८॥

मन भावशुद्धीने भरले । अंग विहितकर्में अलंकारिले । ऐसे अंतर्बाह्य साजिरे केले । जिणे जे का; ॥८३९॥

तया नाव शुचित्व पार्था । ते कर्मी गुण असे चौथा । आणि पृथ्वीपरी सर्वथा । सर्व जे साहणे ॥८४०॥

ती गा क्षमा पांडवा । तो गुण येथ पाचवा । स्वरांमाजी गोडवा । पंचमा जैसा ॥८४१॥

आणि वाकडया ओघानिशी । गंगा वाहे सरळचि जैसी । की पृष्ठभागीं वळल्या उसीं । गोडी जैसी ॥८४२॥

प्रतिकूलही जीवांस्तव । बरवा सरलभाव । तो सहावा गा आर्जव । जेथला गुण ॥८४३॥

आणि पाणी प्रयत्नें माळी । अखंड घाली झाडांमुळी । परि फळांनी लहडे डहाळी । तेव्हाचि कष्टाचे सार्थक; ॥८४४॥

तैसे शास्त्राचारे तेणे । ईश्वरचि एक पावणे । हे निश्चयें जे का जाणणे । ते तेथ ज्ञान ॥८४५॥

आणि ते गा कर्माठायी । सातवा गुण पाही । आणि विज्ञानाचे होई । रूप जे गा ॥८४६॥

तर सत्त्वशुद्धीचे वेळे । शास्त्रें वा ध्यानबळें । ईश्वरतत्त्वींचि मिळे । बुद्धि निश्चित ॥८४७॥

हे विज्ञान बरवे । गुणरत्न जेथ आठवे । आणि आस्तिक्य जाणावे । नववा गुणा ॥८४८॥

कोणाही राजमुद्रांकिता । जैसे । अवघी प्रजा भजतसे । शास्त्रें स्वीकारिल्या तैसे । मार्गमात्राते; ॥८४९॥

आदरें जे का वानणे । तया आस्तिक्य मी म्हणे । तो नववा गुण जेणे । कर्म होय साच ॥८५०॥

ऐसे नऊही शम आदिक । गुण जेथ निर्दोष एकेक । ते कर्म जाण स्वाभाविक । सज्जनाचे ॥८५१॥

तो नवगुणरत्नाकर । या नवरत्नांचा हार । अखंड लेई दिनकर । प्रकाश जैसा ॥८५२॥

चाफा चाफेकळ्यांनी पूजिला । की चंद्र चंद्रिकेने धवळिला । वा चंदनतरू चर्चिला । निजसुगंधे जैस; ॥८५३॥

तैसे नवगुणजडित सुभग । लेणे विद्वत्तेचे अव्यंग । कदापि न सोडी अंग । तयाचे गा ॥८५४॥

आता उचित जे क्षत्रिया । तेही कर्म धनंजया । सांगू ऐक प्रज्ञेचिया- । सारसर्वस्वें ॥८५५॥

शौर्य धैर्य प्रजा-रक्षा युद्धीहि अपलायन
दातृत्व दक्षता तेज क्षात्रकर्म स्वभावता ॥४३॥

तर तेजासाठी सूर्य । न अपेक्षी साहाय्य । मृगयेस्तव सिंह । निघे सोबत्याविना; ॥८५६॥

ऐसा स्वयंभू बलिष्ठ । साहाय्याविण श्रेष्ठ । तो शौर्य जेष्ठ । गुण येथ ॥८५७॥

आणि सूर्याचे प्रतापें । कोटीही नक्षत्र हरपे । परि तो तर न लोपे । चंद्रतार्‍यांसह ॥८५८॥

तैसे आपुले सामर्थ्यगुणें गा । विस्मित करावे जगा । विचलित न व्हावे अगा । कशानेही ॥८५९॥

त्या प्रशंसनीय तेजा । ज्या कर्मीं मानिला गुण दुजा । आणि वानिला धीर तो तिजा । जेथला गुण ॥८६०॥

वरि पडले जरि आकाश । बुद्धीचे डोळे न झाकी मानस । ते गा परियेस । धैर्य जेथ ॥८६१॥

पाणी असो केवढेही खोल । परि जिंकोनि विकसे कमळ । अथवा उंचीने आभाळ । जिंके कशासीही ॥८६२॥

तैशा कोसळोत विविध अवस्था । तरि त्या जिंकोनि पार्था । प्रज्ञेने फळत्या अर्था । भेदणे जे ॥८६३॥

ते दक्षत्व गा चोख । जेथ चौथा गुण देख । आणि झुंजणे । अलौकिक । तो पाचवा गुण ॥८६४॥

सूर्यकमळाची झाडे । सदा सन्मुख सूर्याकडे । तैसे सामोरे शत्रूपुढे । हेणे सदा ॥८६५॥

गर्भवती प्रयत्नें जैसी । निर्धारें चुकवी शेजेसी । पाठ न दावावी रिपूसी । समरांगणीं तैसी ॥८६६॥

क्षत्रियांचे आचारीं । पाचवा गुणेंद्र अवधारी । चारी पुरुषार्थाचे शिरीं । भक्ती जैसी ॥८६७॥

आणि येता फुले फळे । वृक्ष देऊनि मोकळे । वा उदार परिमळें । कमलवृंद; ॥८६८॥

वा आवडे तितुके घ्यावे । चांदणे कोणीही लुटावे । घेणार्‍याने इच्छावे । तैसे जे देणे; ॥८६९॥

ते अमाप गा दान । जेथ सहावे गुणरत्न । आणि आज्ञेसी एकचि स्थान । होणे जे का; ॥८७०॥

पोषूनि अवयव आपुले । इच्छित कर्म करावे भले । तैसे पालनें लोभविले । जग जे भोगणे ॥८७१॥

तया नाव ईश्वरभाव । सर्व सामर्थ्याचा ठाव । तो गुणांमाजी राव । सातवा जेथ ॥८७२॥

ऐसे जे शौर्यादि येथ । गुण विशेष सात । करिती कर्मा अलंकृत । सप्तर्षी जैसे नभा; ॥८७३॥

तैसे सप्तगुणीं अलौकिक । जगी जे पवित्र एक । ते सहजचि क्षात्रकर्म देख । क्षत्रियाचे ॥८७४॥

वा क्षत्रिय नव्हे तो नर । तर सत्त्वसोनियाचा मेरूवर । म्हणोनि गुणस्वर्गा आधार । साताही या ॥८७५॥

अथवा सप्तगुणार्णवी । परिवारिली बरवी । ही क्रिया नव्हे पृथ्वी । भोगीतसे तो ॥८७६॥

वा साताही गुणांचे ओघीं । ही क्रिया जणु गंगाचि जगीं । त्या महोदधीचे अंगीं । विलसे जैसी ॥८७७॥

परि बहु असो हे एक । कर्म शौर्यादि गुणात्मक । पार्था गा कर्म नैसर्गिक । क्षत्रियजातीसी ॥८७८॥

आता वैश्य जातीसी । उचित जे पाहसी । ऐक गा निश्चिती ऐसी । तयाची सांगू ॥८७९॥

शेती व्यापार गो-रक्षा वैश्यकर्म स्वभावता
करणे पडिली सेवा शूद्रकर्म स्वभावता ॥४४॥

तर भूमि बीज नांगर । या भांडवलाचा आधार । घेऊनि लाभ अपार । मिळविणे जे; ॥८८०॥

किंबहुना शेतीवरी जगणे । गोधन राखणे । वा स्वस्त वस्तू विकणे । महाग करुनी ॥८८१॥

इतुकाचि गा पांडवा । वैश्याते कर्माचा मेळावा । हा वैश्यजातिस्वभावा । जान उचितचि ॥८८२॥

आणि क्षत्रिय ब्राह्मण । हे द्विजन्मे तिन्ही वर्ण । यांचे जे शुश्रूषण । ते शूद्रकर्म ॥८८३॥

अगा द्विजसेवेपरते । धावणे नाही शूद्राते । ऐसी चतुर्वणोंचित येथ । दाविली कर्मे ॥८८४॥

आपुल्या आपुल्या कर्मी दक्ष तो मोक्ष मेळवी
ऐक लाभे कसा मोक्ष स्वकर्मीं लक्ष लावुनी ॥४५॥

आता हीचि कर्मे विचक्षणा । उचित वेगळाल्या वर्णा । जैसे श्रोत्रादि इंद्रियांना । शब्दादिक ॥८८५॥

वा मेघातुनि झरल्या उदका । उचित सरिता देखा । आणि सरितांसी नेमका । सिंधू उचित ॥८८६॥

शोभे वर्णाश्रमवशें । जे करणीय आले असे । गोर्‍या अंगा जैसे । गोरेपण नितळ ॥८८७॥

स्वाभाविक विहित कर्मा तया । शास्त्राचे मुखें प्रवृत्त व्हावया । प्रज्ञेसी आपुलिया । अढळ करावे ॥८८८॥

जरि आपुलेचि असे रत्न । घ्यावे पारख्याकडुनि पारखून । तैसे स्वकर्म शास्त्रांकडून । जाणुनी घ्यावे ॥८८९॥

दिठी आपुलेचि ठायी । परि दीपाविण उपयोग नाही । कैसे मार्ग न लाभताही । पाय असुनि होय ? ॥८९०॥

म्हणोनि ज्ञातिवशें खरोखर । सहज असे जो अधिकार । तो आपुलिये शास्त्रें गोचर । आपण करावा ॥८९१॥

मग घरचाचि ठेवा । जैसा डोळ्यां दावी दिवा । तर घेता काय पांडवा । आडकाठी असे ? ॥८९२॥

तैसे स्वभावें वाटयासी आले । वरि शास्त्रें खरे केले । ते विहित जो आपुले । आचरे गा ॥८९३॥

परि आळसा झाडावे । फळकामनेसी सोडावे घालूनिया अंगें जीवें । तेथेचि भर ॥८९४॥

ओघीं पडले पाणी न जाणे । अन्य अन्य ठायी वाहणे । तैसा वर्ते व्यवस्थितपणे । आचरणीं गा ॥८९५॥

अर्जुना जो यापरी । विहित कर्म स्वयें करी । तो मोक्षाचे ऐलद्वारी । ठाकतसे ॥८९६॥

अकरणीय आणि निषिद्ध । कर्माशी न ठेवी संबंध । म्हणोनि संसारभयबंध । नसे तया ॥८९७॥

काम्यकर्मींही एके । न वळेचि कौतुकें । खोडयात न अडके । चंदनाचेही ॥८९८॥

अन्य नित्यकर्म सगळे । फलत्यागें वेचिले । म्हणोनि पावू शकली पाउले । मोक्षाचे शिवेसी ॥८९९॥

युक्तीने कर्माचे निरसन करुनी । सुटे शुभाशुभ संसारातुनी । वैलाग्यमोक्षाचे द्वारीं खिळुनी । उभा ठाके ॥९००॥

जी सकळ भाग्याची परिसीमा । मोक्षलाभबुद्धी वीरोत्तमा । अथवा कर्ममार्गश्रमा । शेवट जेथ ॥९०१॥

मोक्षफळें दिधले तारण अढळ । जे सुकृततरुचे फूल । त्या वैराग्यपुष्पी पाउल । ठेवुनि भ्रमराऐसे ॥९०२॥

सूर्योदयाची सुवार्ता । अरुण सांगे पार्था, । तैसी आत्मज्ञानसुदिनाची कथा । वैराग्य सांगे ॥९०३॥

किंबहुना आत्मज्ञान । जेणे हाता ये निधान । ते वैराग्य दिव्यांजन । जिवेभावे घाली तो ॥९०४॥

ऐसी मोक्षाची योग्यता । सिद्धिसी जाय तयाची पार्था । विहित कर्मा या अनुसरता । जाण अगा ॥९०५॥

हे विहित कर्म पांडवा, । आपुला अनन्य ओलावा । आणि हीचि परमसेवा । मज सर्वात्मकाची ॥९०६॥

अगा अवघ्याचि भोगांसवे । पतिव्रता क्रीडे पतीसवे । की जैसी तयाचेचि नावें । तपे तिने केली; ॥९०७॥

मायेवाचुनी बालका । जिणे काही असे का ? । म्हणोनि  तिचेचि आश्रयें एका । राहे तो श्रेष्ठ धर्म ॥९०८॥

अथवा केवळ पाणी म्हणोनि मासा । गंगेसी न सोडिता जैसा । सर्वतीर्थसहवासा । प्राप्त जाहला ॥९०९॥

तैसे आपुले विहितकर्मा पार्था । न विसंबावे हा उपाय आता । ऐसा करावे की जगन्नाथा । ओझे होय ॥९१०॥

अगा, जया जे विहित । ते ईश्वराचे मनोगत । म्हणोनि करिता निभ्रांत । सापडेचि तो ॥९११॥

जिवाचे कसासि उतरली । ती दासी मालकीण जाहली । स्वामीस्तव शिर वेचित्या लाभली । वतने जैसी ॥९१२॥

तैसे स्वामीचिया परमभावा । न चुकावे हीचि साच सेवा । अन्य ते गा पांडवा । वाणिज्य करणे ॥९१३॥

जो प्रेरी भूतमात्रास ज्याचा विस्तार विश्व हे
स्वकर्मकुसुमीं त्यास पूजिता मोक्ष लाभतो ॥४६॥

म्हणोनि विहित क्रिया केली । नव्हे तयाची आज्ञा पाळिली । जयापासुनि ही आली । आकारा भूते ॥९१४॥

जो अविद्येच्या चिंध्या गुंडाळुनी । तयाच्या जीवबाहुल्या करूनी । त्रिगुणांच्या अहंकारज्जूंनी । खेळवितसे ॥९१५॥

तेणे जग हे समस्त । आतबाहेरी पूर्णभरित । जाहले आहे दीपजात । तेजें जैसे; ॥९१६॥

तया सर्वात्मक ईश्वराला । अर्पिता स्वकर्मकुसुमांची माला । पूजा केली होय निर्मळा । अपार तोषास्तव ॥९१७॥

म्हणोनि त्या पूजेने भले । आत्मराज रिझले । प्रसाद तया देऊ लागले । वैराग्यसिद्धीचा ॥९१८॥

ज्या वैराग्यदशेमुळे । ईश्वराचे वेध लागले । सर्वचि आवडेनासे जाहले । जैसी वांतीचि होय ॥९१९॥

प्राणनाथाचे वियोगाने । विरहिणीसि बाधे जिणे । सुखजात त्रिवार तेणें । दुःखचि वाटे ॥९२०॥

यथार्थज्ञान न उदयता । ईश्वरवेधेंचि ये तन्मयता । तैसी बोधाची योग्यता । लाभे तया ॥९२१॥

म्हणोनि मोक्षलाभास्तव येणे ॥ जो अंगी वाहे व्रताचरणे । तयें स्वधर्म चांगल्या आस्थेने । आचरावा ॥९२२॥

उणाहि आपुला धर्म परधर्माहुनी बरा
स्वभावें नेमिले कर्म करी तो दोष जाळितो ॥४७॥

अगा आपुला हा स्वधर्म । आचरिण्या जरि दुर्गम । परि पहावा तो परिणाम । फळेल जेणें ॥९२३॥

सुखवावया आपणासी । कडुनिंबचि एक देखसी । तेव्हा तयाचे कडूपणासी । न उबगावे ॥९२४॥

फळण्याआधी केळीची केळीची झाडे । पाहता आशा मोडे । परि त्यजिली तर फळ गाढे । कैसे मिळे ? ॥९२५॥

आचरण्यासी अवघड । म्हणुनी स्वधर्माविषयी नावड । दाविली तर आत्मसुखा गोड । अंतरलाचि की ॥९२६॥

आणि आपुली माय । कुबडी जरि होय । तरि तिची ममता काय । वाकुडी असे ? ॥९२७॥

अन्य ज्या परक्या आणि । बरव्या जरि रंभेहुनी । त्या करायच्या काय कोणी । बाळासी त्या ? ॥९२८॥

अगा जरि पाण्याहुनी । तूप बहुत गुणी । तरि मासा काय कोणी । तेथ राहू शके ? ॥९२९॥

अवघ्या जगा जे विष । ते अमृत गा विषकिडयास । अगा गूल ते तयास । मरणचि ॥९३०॥

विहित कर्म व्हावे हातून । तुटे संसाराचे बंधन । कर्म कठोर परि आपण । तेचि करावे ॥९३१॥

परआचार गमोत भले । परि ऐसे होय जर आचरिले । पायांचे चालणे केले । डोईने जैसे ॥९३२॥

यालागी कर्म आपुले । जे जातिस्वभावें आले । ते करी, जेणें जिंकिले । कर्मबंधाते ॥९३३॥

आणि स्वधर्मचि पाळावा । परधर्म तो टाळावा । हा नेमही पांडवा, । जर न केला; ॥९३४॥

तर आत्मा अनुभवा न येई । तोवरि कर्म करणे का राही ? । आणि करावे लागे तेथही । सायास आधी ॥९३५॥

सहजप्राप्त ते कर्म न सोडावे सदोषहि
दोष सर्वचि कर्मात राहे अग्नीत धूर तो ॥४८॥

म्हणोनि कोणतेही कर्मी । सायास जर प्रथम उपक्रमीं । तर काय स्वधर्मीं । दोष सांग ? ॥९३६॥

अगा सरळ वाटेने चालावे । तर पायचि शिणवावे । आडरानी धावाने । तरी तेचि ॥९३७॥

अगा दगड की शिदोरी । भार एकचि जरी । जे वाहुनि विसावता परी । सुख मिळे ते घ्यावे ॥९३८॥

एरवी कण आणि भुसा । रांधिता त्रास सरिसा । रांधिता जे श्वानमांसा । तेचि श्रम हविष्यान्ना ॥९३९॥

दही वा जळ घुसळिता । श्रम सरिसेचि पंडुसुता । वाळू वा तीळ घाण्यात घालिता । गाळणे सारिखेचि ॥९४०॥

नित्य होम करावया । वा स्वैर आगी लावावया । अग्नि फुंकिता धूर वाया । साहणे एकचि ॥९४१॥

असो ठेविलेली की धर्मपत्नी । पोषिता जर एकचि ताणाताणी । तर का घ्यावी ओढवुनी । अपकीर्ती उगा ? ॥९४२॥

पाठीवरि पडल्या घावीं । न चुकेचि मरणही । तर आमोरासमोरीचि काही । अधिक का न करावे ? ॥९४३॥

अकुलस्त्री दांडयांचे घाव जैसे । परघर करूनिही सोसे । तर स्वपतीसी वायाचि कैसे । सोडिले की ॥९४४॥

तैसे आवडतेही करिताना । न घडेचि शिणल्याविना । तर विहित कर्मा कोणा । म्हणावे भारी ? ॥९४५॥

घेण्या अमृताचे घोटा देखा । सर्वस्व वेचेना का । जेणे लाभे जीविता एक । अक्षय्यत्व ॥९४६॥

का गा मोल वेचुनी । विष घ्यावे पिउनी । आत्महत्या करुनी । मरणे जे ॥९४७॥

तैसे जाचूनि इंद्रियां । वेचूनि आयुष्या । अन्य काय या । दुःखावाचुनी ? ॥९४८॥

म्हणोनि करावा स्वधर्म । जो करिता हरती श्रम । उचित होईल परम । पुरुषार्थराज ॥९४९॥

जैसे संकटसमयीं । सिद्धमंत्र विसरू नाही । तैसे स्वधर्माचरणही । सोडून नये ॥९५०॥

तर सागरीं नाव जैसी । तैसी दिव्यौषधी महारोगासी । न विसंबावे स्वकर्मासी । त्याचि बुद्धीने ॥९५१॥

मग याचि कपिध्वजा, । स्वकर्माची करिता महापूजा । तोषला ईश तम, रजा । नाशोनिया ॥९५२॥

शुद्ध सत्त्वाचिया वाटांनी । आपुल्या उत्कंठेसी आणी । भव-स्वर्ग वाटावया लावुनी । काळकूटाऐसे ॥९५३॥

ज्या वैराग्य येणे बोले । मागे संसिद्धीसी वर्णिले । किंबहुना मेळवी आपुले । ते अंतिम स्थान ॥९५४॥

मग या भूमिकेसि जिंकित । पुरुष सर्वत्र कैसा होत । आणि जाहल्यावरीहि होय प्राप्त । ते सांगू आता ॥९५५॥

राखे कुठे न आसक्ति जिंकूनि मन निःस्पृह
तो नैष्कर्म्य महासिद्धि पावे संन्यास साधुनी ॥४९॥

तर देहादि या संसारात । मांडल्या गुंताडयात । न गुरफटे जो जाळ्यात । वारा जैसा ॥९५६॥

न धरवे पिकण्याचे वेळे । फळ देठें वा देठ फळें । तैसे ममत्व लुळे । सर्वत्र होय ॥९५७॥

पुत्र वित्त कांता । मानाजोगेही लाभता । तयां आपुले न म्हणता । मानी विषपात्र जैसे ॥९५८॥

हे असो, विषयजातांनी । बुद्धि निघे पोळुनी । पाउले मागुती घेउनी । हृदयाचे एकांतीं शिरे ॥९५९॥

ऐसियांचे अंतःकरण । न मोडी तयांची आण । समर्था भिऊनि जाण । दासी जैसी ॥९६०॥

तैसे ऐक्याचे मुठीत । धरोनिया चित्त । तया गुंतवीत । आत्म्याचे वेधीं ॥९६१॥

राखेने अग्नि दडपता हा । धूर थांबे पहा । तैसी इह-परलोकींची स्पृहा । निमालीचि तया ॥९६२॥

म्हणोनि या नियमियल्या मानसीं । स्पृहा नष्ट होय सहजशी । किंबहुना तो ऐसी । भूसिका पावे ॥९६३॥

विपरीत बोध आघवा । मावळोनि तया पांड्वा । बोधमात्रींचि जीवा । ठाव होय ॥९६४॥

साचविले वेचुनी सरे । प्रारब्ध भोगुनी विरे । अहंकर्तृत्व भावना नुरे । तेणे नुपजे कर्म ॥९६५॥

ऐसी कर्मक्षीणदशा । होय जेथ वीरेशा । मग श्रीगुरु भेटेचि सहसा । आपोआप ॥९६६॥

रात्रीचे चार प्रहर । सरता दिनकर । डोळ्यासी खरोखर । भेटे जैसा; ॥९६७॥

वा फळाचा येता घड । केळीची खुंटे वाढ । गुरु भेटोनि होय गोड । तैसे जिज्ञासूंसी ॥९६८॥

मग आलिंगिता पूर्णिमा । कलांचे न्यूनत्व त्यजी चंद्रमा । तैसे पूर्णत्व लाभे वीरोत्तमा । गुरुकृपेने तया ॥९६९॥

तेव्हा अज्ञानमात्र असे । ते गुरुकृपेने नाशे । तेथ रात्रीसवे जैसे । अंधारे जावे; ॥९७०॥

अज्ञानाचे कुशीसी होय । कर्म कर्ता कार्य । ऐसी त्रिपुटी असे ती जाय । गर्भिणी मारिली; जैसी ॥९७१॥

तैसे अज्ञाननाशासवे । नाशे क्रियाजात आघवे । ऐसा समूळ संभवे । संन्यास हा ॥९७२॥

मूळ-अज्ञान-संन्यासें । दृश्याचा ठाव जेथ पुसे । तेथ जाणावे सहजसे । तोचि आत्मस्वरूप आहे ॥९७३॥

अगा जागे जाहल्यावरी । स्वप्नींया डोहातुनि वरी । काय आपण आपणा खरोखरी । काढण्या जावे ? ॥९७४॥

मी न जाणे आता जाणीन । हे सरले तया दुःस्वप्न । ज्ञाता-ज्ञेय-भेदाविहीन । जाहला चिदाकाश ॥९७५॥

प्रतिबिंबासह आरसा । दूर नेता वीरेशा । पाहतेपणाविण जैसा । पाहणारा उरे; ॥९७६॥

तैसे न जाणणे जे गेले । तेणे जाणणेही नेले । मग क्रियारहित उरले । ज्ञानस्वरूपचि केवळ ॥९७७॥

तेथ स्वभावें धनंजया । नाही कोणतीचि क्रिया । म्हणोनि म्हणती तया । नैष्कर्म्य ऐसे ॥९७८॥

जेव्हा आत्मज्ञान लाहे । ज्ञान आत्मस्वरूपीं लय पावे । तरंग वायुलोपे लोपावे । तेव्हा समुद्र जैसा ॥९७९॥

तैसे न होणे कर्म । ते नैष्कर्म्यसिद्धीचे मर्म । सर्व सिद्धीत परम । सहज हीचि ॥९८०॥

देऊळ पूर्ण होय कळसें । परमगंगा नुरे सिंधुप्रवेशें । सुवर्णशुद्धी सोळा कसें । सरे जैसी ॥९८१॥

आपुले अज्ञान तैसे । ज्या ज्ञानें केले नाहीसे । ते ज्ञानही नष्ट होतसे । ऐसी जी दशा ॥९८२॥

तिजपरते काही । अन्य निपजणे नाही । म्हणोनि म्हणती पाही । परमसिद्धी तिजसी ॥९८३॥

सिद्धीस लाभला ब्रह्म गाठी कोण्यापरी मग
ज्ञानाची थोर ती निष्ठा ऐक थोडयात सांगतो ॥५०॥

परि हीचि आत्मसिद्धी अढळ । कोणी भाग्यनिधी निर्मळ । पावतसे तात्काळ । गुरुकृपालाभकाळीं ॥९८४॥

सूर्य उदया येई । मग अंधारचि प्रकाश होई । वा दीपासंगे पाही । कापूरचि प्रकाश होय ॥९८५॥

लवणाची कणिका । मिळताक्षणी उदका । उदकचि होऊनि देखा । ठाके जैसी ॥९८६॥

निद्रिता जाग येई । स्वप्नासह निद्रा जाई । मग तो आपुल्या स्वरूपाठायी । मिळे जैसा; ॥९८७॥

तैसे जेथ कोणी दैवे । गुरुवचनश्रवणासवे । द्वैत गिळोनि विसावे । आत्मस्वरूपीं ॥९८८॥

अगा कानावचनाचिया । भेटीसरशीचि धनंजया । उठे ब्रह्मवस्तु होऊनिया । कवण एक जो; ॥९८९॥

तया मग कर्म करणे । हे बोलता येईलचि शब्दे कोणें? । अगा आकाशा येणे-जाणे । आहे काय? ॥९९०॥

म्हणोनी तयासी काही । त्रिवार करणे नाही । परि ऐसे न होई । काहीचि जया ॥९९१॥

एरवी स्वधर्माचा चेतवुनी वन्ही । काम्यनिषिद्धाचे इंधनी । रज-तप दोन्ही । जाळिले आधी ॥९९२॥

पुत्र वित्त परलोक । या तिहींचा अभिलाष एक । तयाठायी होई पाईक । हेई जाहले ॥९९३॥

इंद्रिये स्वैर पदार्थीं । शिरोनि विटाळली होती । तयां निग्रहतीर्थीं । न्हाऊ घातले ॥९९४॥

आणि स्वधर्माचे फळ । ईश्वरा अर्पुनी सकळ । सबळ केले अढळ । वैराग्यपद ॥९९५॥

ऐसी साक्षात्कारीं । लाभे ज्ञानाची पर्वणी खरी । ती सामुग्री पुरी । मेळविली ॥९९६॥

आणि त्याचि समयीं । सद्‌गुरु भेटलेही । त्यांनी आत्मबोधकथनाठायी । वंचिले ना ॥९९७॥

परि औषष घेताक्षणी । काय आरोग्य लाभे झणी ? । की उगवताचि दिनमणी । मध्यान्ह होय ? ॥९९८॥

सुक्षेत्र आणि ओलावा आहे । बीजही पेरिले गोमटे पाहे । तर अलोट फळ पावे । परि वेळीचि गा ॥९९९॥

जोडिला मार्ग सरळ । जुळला सुसंगाचाहि मेळ । परि पोचण्या वेळ । लागेचि की ॥१०००॥

तैसा वैराग्यलाभ जाहला । वरि सद्‌गुरुही भेटला । जीवीं अंकुर फुटला । विवेकाचा ॥१००१॥

तेणे ब्रह्म सत्य एकचि असती । अन्य आघवीचि भ्रांति । हीचि साच प्रतीती । दृढ केली ॥१००२॥

परि तेचि जे परब्रह्म । सर्वात्मक सर्वोत्तम । मोक्षाचेही काम । सरे जेथ ॥१००३॥

या तिन्ही अवस्था उदरीं । जिरवी जे गा धनुर्धारी । त्या ज्ञानाचीही समाप्ती करी । जी ब्रह्मवस्तु; ॥१००४॥

ऐक्याचे एकपणा सरे । जेथ आनंदकणही विरे । काहीचि नुरोनि नुरोनि उरे । जे काही गा ॥१००५॥

त्या ब्रह्मी एकपणे । ब्रह्मचि होऊनि असणे । हे क्रमेंचि करुनी तेणें । साध्य केले ॥१००६॥

पहा भुकेल्यासी । वाढिले षड्‌रसीं । तो तृप्ती प्रतिग्रासीं । लाहे जैसा ॥१००७॥

वैराग्यतेल भरिता । विवेकाचा दिवा उजळिता । आत्मठेवा तया तत्त्वता । लाभेचि गा ॥१००८॥

तर आत्मऋद्धी भोगावी । अशा योग्यतेची सिद्धीही । तयाअंगी ठायी ठायी । लेणे जाहली ॥१००९॥

तो ज्या क्रमें ब्रह्मप्राप्ती ही । सुगम करुनि घेई । त्या क्रमाचे वर्मही । ऐक सांगतो ॥१०१०॥

बुद्धि सात्त्विक जोडूनि धृतीचा दोर खेचुनी
शब्दादि स्पर्श टाळूनि राग-द्वेषास जिंकुनी ॥५१॥

तर गुरूने दाविल्या वाटांनी । तीर्थ-तटा येउनी । मळ काढिला धुवोनि । बुद्धीचा त्याने ॥१०११॥

मग राहूने प्रभा ग्रासिली । ती चंद्रें आलिंगिली । तैसी मूळस्वरूपा जडली । शुद्ध ती बुद्धी ॥१०१२॥

कुळे दोन्ही सोडुनी । प्रियतमासी अनुसरे कामिनी । द्वंद्व त्यागुनी आत्मचिंतनीं । जडली बुद्धि तैसी ॥१०१३॥

आणि ज्ञानाऐसे जिव्हार । नेऊनि बाहेरी निरंतर । इंद्रियांनी केले थोर । शब्दादि विषय ॥१०१४॥

जाता सूर्यकिरणांचा समुदाय । मृगजळ लया जाय । तैसे नाशिले शब्दादि विषय । इंद्रियनिग्रहें ॥१०१५॥

अजाणता अधमाचे अन्न । खाता करावे वमन । तैसा वासनांसह इंद्रियांकडून । विषय त्यागविला ॥१०१६॥

मग अंतर्मुखवृत्तीचे चोख । गंगातटीं तया लाविले देख । ऐसी शुद्ध प्रायश्चित्ते कितीक । केली तयाने ॥१०१७॥

आणि सात्त्विक धैर्यें । पावन केली इंद्रिये । मग मनाचे साहाय्यें । योगाभ्यासीं वळविली ॥१०१८॥

प्रारब्ध इष्ट-अनिष्ट मोठे । भोगांसह येउनि भेटे । हे पाहताहि विपरीत कोठे । विषाद न करी ॥१०१९॥

अथवा गोमटे क्वचित् काही । प्रारब्ध आणुनी ठेवी । तरि तयास्तव न होई । जीव अभिलाषी ॥१०२०॥

यापरी इष्ट-अनिष्ट साहुनी । राग-द्वेष त्यजुनी । गिरीकपारीं निर्जन रानीं । हिंडतसे ॥१०२१॥

चित्त वाचा तनू नेमी एकांतीं अल्प सेवुनी
गढला ध्यानयोगात दृढ वैराग्य लेवुनी ॥५२॥

गजबज मागे टाकुनी । वसे वनस्थानीं । अवयवांसगत एकलेपणी । केवळ तो ॥१०२२॥

शमदम आदींशी खेळे । न बोलणेचि बोले । गुरुवचनाचे चिंतनी न कळे । वेळ कैसा जाय ॥१०२३॥

आणि अंगा बळ यावे । की क्षुधेने जावे । वा जिभेचे पुरावे । मनोरथ; ॥१०२४॥

भोजनाचे वेळी मुखीं । ही तिन्ही न तयाचे लेखीं । मित आहारी संतोषी । अमाप तो ॥१०२५॥

जठराग्नीत होय पचन । तया शांतवाया सेवी अन्न । इतुके मोजके की प्राण । जीव धरुनि राहे ॥१०२६॥

इच्छी जरि परपुरुष । कुलवधू न होय वश । अन्नसेवनीं निद्रा आळस । मोकळे न सोडी तैसे ॥१०२७॥

दंडवताचे प्रसंगें । भुईसी अंग लागे । यावाचुनि अन्य न जागे । अविचार तेथ ॥१०२८॥

देहनिर्वाहापुरते । हालवी हातापायाते । किंबहुना आपलेसे ते । सबाह्य केले ॥१०२९॥

आणि मनाचा उंबरा । वृत्तीसी देखू न दे वीरा । तेथ कैसा वाग्‌व्यापारा । अवकाश असे ? ॥१०३०॥

ऐसे देह वाचा मानस । जिंकोनि ब्राह्मप्रदेश । कवळिले आकाश । ध्यानाचे तेणे ॥१०३१॥

गुरुवचने उपजला । त्या बोधीं निश्चय आपुला । न्याहाळी हाती घेतला । आरसा जैसा ॥१०३२॥

ध्याता आपणचि परी । ध्यानरूप वृत्ती अंतरी । ध्येयत्वें घे, ही अवधारी । तेथ ध्यानज्पद्धती गा ॥१०३३॥

ध्यान ध्येय ध्याता । या तिहींची एकरूपता । होई तोवरी पांडुसुता, । करावे ते गा ॥१०३४॥

परि मुमुक्षू तो म्हणोनि । जाहला दक्ष आत्मज्ञानीं । पुढे पक्ष ठेवोनि । योगाभ्यासाचा ॥१०३५॥

अगा ऐक व्यवस्थित । अधोद्वाराचे सध्यात । टाचेने दाबुनी धरित । शिवणमध्य ॥१०३६॥

आकुंचूनि अध । साधूनि तिन्ही बंध । करोनि वायुभेद । एकवट ॥१०३७॥

कुंडलिनी जागवुनी । सुषुम्ना विकासूनी । आधारादि चक्रे भेदुनी । आज्ञाचक्रापावत; ॥१०३८॥

सहस्त्रदळाचा मेघ तेथवरी । अमृतवृष्टी करी । तो ओघ मूलाधारी । आणूनिया ॥१०३९॥

चक्रगिरीवरि असता नाचत । चैतन्यभैरवाचे खापरीत । मन-प्राण-ऐक्याची खिचडी त्यात । वाढूनिया; ॥१०४०॥

पुढे हा सामर्थ्यवान । योगसाधनांचा मेळावा ठेवून । तयाचे मागे ध्यान । सिद्ध केले ॥१०४१॥

आणि ध्यान-योग दोन्ही । या आत्मतत्त्वज्ञानी । प्राप्त व्हावया निर्विघ्नपणीं । आधीचि तेणें; ॥१०४२॥

वैराग्यासारिखा जाण । ठेविला सखा जोडून । तो चाले अजून । अवघ्याचि भूमिकांसवे ॥१०४३॥

पहावयाचे ते दिसेतोंवर । दृष्टीसी न सोडी दीप जर । तर काय लागे अवसर । देखावया ? ॥१०४४॥

तैसे जो मोक्षीं प्रवृत्त होय । वृत्ती ब्रह्मीं लया जाय । तोवरि वसे अंतरीं वैराग्य । मग ब्रह्मैक्या भंग कोठूनी ? ॥१०४५॥

म्हणोनि सवैराग्य । ज्ञानाभ्यास तो सभाग्य । करुनि जाहला सुयोग्य । आत्मलाभा ॥१०४६॥

ऐसे वैराग्याचे अंगिकारी । वज्रकवच अंगावरी । राजयोगअश्वावरी । आरूढला ॥१०४७॥

दृष्टीसी जे आड ये खरोखर । ते निपटी सान-थोर । ज्ञानखड्‌ग विवेकमुठीत सत्वर । बळकट धरी ॥१०४८॥

अंधारीं सूर्य जैसा जात । तैसाचि तो संसाररणात । मोक्षविजयश्रीचा कांत व्हावयासाठी ॥१०४९॥

बळ दर्प अहंकार काम क्रोध परिग्रह
ममत्वासह सोडूनि शांतीने ब्रह्म आकळी ॥५३॥

तेथ अडवावया आले । ते दोषवैरी धोपटले । तयांमध्ये पहिले । देहअहंकार ॥१०५०॥

जो न टाकी मारुनी । जगू न दे जन्मा घालुनी । कुचंबवी खोडयात टाकुनी । हाडांचिया ॥१०५१॥

अहंचा देहदुर्ग हा थारा । मोडूनि टाकिला वीरा । आणि कामबळ हा दुसरा । मारिला वैरी ॥१०५२॥

विषयांचे नावें ऐसे । चौपटीने हा वाढतसे । मृतावस्था प्राप्त होतसे । सर्वत्र जगा ॥१०५३॥

तो विषयविषाचा डोह । अवघ्याचि दोषांचा राव । ध्यानकड्‌गाचा घाव । साहेल कैसा ? ॥१०५४॥

लाभता प्रिय विषय । जे सुख व्यक्त होय । त्या सुखाचे कवचासह । जो अंगीं गर्जे ॥१०५५॥

दर्प जो सन्मार्गा भुलवुनी । मग अधर्माचे अरण्यीं । नरकरूप वाघाचे वदनीं । घाली तो गा ॥१०५६॥

विश्वास दावुनी घेई झेप । तो रिपू निपटिला दर्प । आणि जेणे सुटे कंप । तापसांसी; ॥१०५७॥

क्रोधाऐसा महादोष एक । तयाचा परिपाक देख । भरावा तों तों अधिक । रिता होय जो ॥१०५८॥

तो काम कोणेचि ठायी । नसावा ऐसे केले पाही । की तेचि क्रोधाचेही । सहजी जाहले ॥१०५९॥

मुळाचे तोडणे जैसे । होय शाखांचे उद्देशें । काम नाशता नाशे । तैसा क्रोध ॥१०६०॥

म्हणती काम हा वैरी । तो नष्ट होय खरोखरी । तर सरली वारी । क्रोधाचीही तेथ ॥१०६१॥

खोडा घाली जया नृपवर । पैजेने वाहवी तयाचेचि डोईवर । तैसा हा परिग्रह बलवत्तर । भोगाया लावी ॥१०६२॥

जो चढे डोक्यावरी । अंगीं अवगुण पेरी । मी माझे या अभिमानें भरी । गुंतवी अधिक ॥१०६३॥

शिष्यसंप्रदायविलासें । मठ आश्रमांचे मिषें । वेढिले संगाचे पाशें । निःसंगा जया; ॥१०६४॥

घरी कुटुंबपण सरे । परि वनीं वन्य होउनि संचरे । नागव्यासीही शरीरें । लागला आहे; ॥१०६५॥

ऐसा परिग्रह जिंकिणे असंभव । तयाचा फेडूनि ठाव । भवविजयाना उत्सव । भोगितसे जो; ॥१०६६॥

तेथ अमानित्वादि आघवे । ज्ञानसुरांचे मेळावे । ते कैवल्यदेशीचे बरवे । राव जैसे आले ॥१०६७॥

तेव्हा यथार्थज्ञानाचे या । राज्य साधका अर्पूनिया । गुणपरिवार होऊनिया । राहे अंगें ॥१०६८॥

प्रवृत्तिचे राजमार्गी विराजुनी । जागृति स्वप्न सुषुप्ती या तिन्ही । अवस्था उतरती तयावरुनी । सुखाचे लिंबलोण ॥१०६९॥

बोधाची काठी विवेक धरी । दृश्यरूपांची दाटी दूर सारी । योगावस्था आरती घेउनि करीं । येती जैशा ॥१०७०॥

ऋद्धिसिद्धींच वृंदही । मिळुनि या प्रसंगी पाही । त्या पुष्पवर्षावीं । नाहतसे तो ॥१०७१॥

अगा ब्रह्मैक्यासरिसे । स्वराज्य येता निकट ऐसे । भरोनि टाकी हर्षें । तिन्ही लोक ॥१०७२॥

तेव्हा हा वैरी मित्र हा । ऐसे काही म्हणावया । उरेचिना तया । दुजेपणा ॥१०७३॥

हेचि ना कोणेही निमित्तें । तो म्हणे माझे जयाते । यापरी नसेचि काही दुजे ते । ऐसा द्वैतरहित जाहला ॥१०७४॥

आपुल्या एकछत्री आत्मसत्तेने । सर्वही कवळुनी तयाने । कोठेही डोकवू नये ममतेने । ऐसे केले ॥१०७५॥

ऐसा जिंकिता रिपु सर्व । आपणासीचि मानिता विश्व । आपोआप योगअश्व । स्थिर होय ॥१०७६॥

वैराग्याचे गाढ बैसले । अंगीं कवच जे होते भले । तेही क्षणभर ढिले । तेव्हा करी ॥१०७७॥

आणि ध्यानखड्‌गें नाशावे ऐसे । दुजे काहीचि पुढे नसे । म्हणोनि हात खाली येतसे । ध्यानवृत्तीचाही ॥१०७८॥

जैसे औषध खरे । आपुले काम करुनि पुरे । आपणही नुरे । तैसे होय ॥१०७९॥

देखे मुक्कामाचा ठाव । स्थिरावे धावता पाय । तैसे ब्रह्मसामीप्यें होय । आटे वेग अभ्यासाचा ॥१०८०॥

गंगा मिळता महोदधीसी । आवेग त्यजी जैसी । जणु कामिनी कांतापाशी । स्थिरावली ॥१०८१॥

अथवा केळ फळते । आणि केळीची वाढ खुंटते । वा गावापुढे सरते । वाट जैसी ॥१०८२॥

तैसा आत्मसाक्षात्कार हा । आता येईल अनुभवा । हे देखोनि साधन पहा । हळुच खाली ठेवी ॥१०८३॥

म्हणोनि ब्रह्मासह तया । ऐक्य होय जेव्हा । अगा लागे उपायां । ओहटी ऐसी ॥१०८४॥

मग जे वैराग्याचा सांध्यासमय । ज्ञानाभ्यासाचे वार्धक्य । योगफळाचीही परिपक्व । दशा जी का ॥१०८५॥

ती शांति गा सुभगा । पूणत्वें  ये तयाचे अंगा । तेव्ह ब्रह्म व्हावयाजोगा । होतसे तो ॥१०८६॥

पुनवेहुनि चतुर्दशीसी । जितुके न्यूनत्व चंद्रासी । वा सोळा कसाहुनि जैसी । पंधरात वाण ॥१०८७॥

सागरीं पाणी वेगें जाय । ते गंगेचे रूप होय । उगे निश्चळ जे अन्य । तो समुद्र जैसा; ॥१०८८॥

ब्रह्म आणि ब्रह्मता येणे साक्षात । अंतर असे योग्यतेत । परि शांतीयोगे त्वरित । तेचि तो होई ॥१०८९॥

परि तेचि प्रत्यक्ष जाहल्याविण । प्रतीतीसी आले जे ब्रह्मपण । ते ब्रह्म होण्याची खूण । साक्षात असे ॥१०९०॥

ब्रह्म झाला प्रसन्नत्वें न करी शोक कामना
पावे माझी पराभक्ति देखे सर्वत्र साम्य जो ॥५४॥

तै ब्रह्मभावयोग्यता तया । लाभे मग धनंजया । आत्मबोधप्रसन्नतेचिया । पदीं तो बैसे ॥१०९१॥

जेव्हा स्वयंपाक होई । तो व्यापतापही जाई । तेव्हा जो स्वाद येई । प्रसन्न जैसा; ॥१०९२॥

भरतीचे लगबग वेगा । शरदीं सोडी गंगा । की गीत सरता । मृदंगादि उपांगा । ओहटी लागे; ॥१०९३॥

तैसे आत्मबोधीं उद्यम । करिता होत जे श्रम । तेही जेथ विश्राम । पावती गा ॥१०९४॥

आत्मबोधप्रशस्ती । ही ज्या दशेची ख्याली । ती भोगितसे हे महामती । योग्य तो गा ॥१०९५॥

आपुले म्हणोनि दुःख करावे । की काही लाभावया इच्छावे । हे सरले समभावें । भरल्या तया ॥१०९६॥

रविराज उदया येती । तेव्हा नाना नक्षत्रपंक्ती । हरपती दीप्ती । अंगींची जेवी ॥१०९७॥

तेवी आत्मानुभव उदयता । ही भूतभेदव्यवस्था । मोडित मोडित पार्था । स्वरूपासी पाहे तो ॥१०९८॥

पाटीवरील अक्षरे । जैसी पुसता येती करें । तैसी हरपती भेदांतरे । तयाचे दृष्टीने ॥१०९९॥

तैसेचि विपरीत ज्ञान । दावी जी जागृति आणि स्वप्न । ती दोन्ही होती लीन । अव्यक्तात ॥११००॥

मग तेही अज्ञान । बोध वाढता झिजून । पुरत्या बोधीं बुडोन । जाय समस्त ॥११०१॥

जैसे भोजनव्यवहारीं । क्षुधा जिरत जिरत पुरी । तृप्तीचे अवसरीं । नाहीशी होय ॥१००२॥

वा वाढीने चालीचिया । वाटा गमती थोडया । मग पातल्या ठावा । बुडी देउनि सरती; ॥११०३॥

वा जागृति उद्दीपे । तों तों निद्रा हरपे । मग जागे होता स्वरूपें । नाहीशी होय ॥११०४॥

अगा पूर्णता भेटे । तेथ चंद्राची वाढ खुंटे । आणि शुक्लपक्ष आटे । निःशेष जैसा ॥११०५॥

तैसा बोध्यजात जो बोध गिळे । त्या बोधें मजआत मिसळे । तेथ साद्यंत आकळे । अज्ञान जाय ॥११०६॥

तेव्हा कल्पांताचे वेळे । नदी-सागराचे पेंडोळे । मोडूनि भरे जळें । आब्रह्म जैसे; ॥११०७॥

अथवा जाता घट मठ । आकाश ठाके एकवट । वा जळोनि काष्ठें काष्ठ । वन्हीचि होय; ॥११०८॥

नातरी लेण्याचे अलंकारपण । मुशीत जाता आटून । नामरूपभेद त्यजून । राहे निखळ सोने; ॥११०९॥

हेही असो, जागृति येता काय । ते स्वप्न नाहीसे होय ? । मग आपणचि आपणास्तव । उरावे जैसे ॥१११०॥

तैसे मज एकावाचुनि काही । तया तयाहिसह काही नाही । ही चौथी भक्ति पाही । माझी तो लाहे ॥११११॥

अन्य आर्त जिज्ञासु अर्थार्थी । हे तीन मार्गीं ज्या भजती । ते तिन्ही पाहोनि चौथी । ही म्हणत आहे ॥१११२॥

एरवी तिसरी ना चौथी । पहिली ना सरती । ही माझी सहजस्थिती । भक्ति या नावें ॥१११३॥

जी अजाणात्व माझे जाणुनी । मिथ्यात्वें मज दावूनी । सर्वाठायी सर्वा भजवुनी । समजावीत असे ॥१११४॥

तो जेथ जैसे पाहो बैसे । तया तेथ तैसेचि दिसे । हे उजेडें होतसे । अखंड ज्या; ॥१११५॥

स्वप्नाचे दिसणे न दिसणे । जैसे आपुलेचि अस्तित्वाने । विश्वींचे आहे नाही जेणे- । प्रकाशें जैसे ॥१११६॥

ऐसा हा सहज किती । प्रकाश माझा हे महामती, । अगा,  तो बोलती । भक्ती या रीतीने ॥१११७॥

म्हणोनि आर्ताचे ठायी । जी उत्कट इच्छा पाही । ती भक्ती होऊनि राही । अपेक्षणीयही मीचि ॥१११८॥

जिज्ञासूंपुढे वीरेशा । हीचि हौऊनि जिज्ञासा । मी जिज्ञास्य ऐसा । देखविला ॥१११९॥

हीचि होउनि अर्थकामना । मीचि माझिया अर्थी अर्जुना । करोनि अर्थाभिधाना । आणी मज ॥११२०॥

ऐसे घेऊनि अज्ञानाते । माझी भक्ती ही जी वर्ते । ती दावी मज द्रष्टयाते । दृश्य करोनी ॥११२१॥

येथ मुखचि दिसे मुखें । या बोलीं काही न चुके । परि दुजेपण हे लटिके । आरसा करी ॥११२२॥

दिठीत चंद्रचि ये हे साचे । परि इतुके त्या नेत्रपीडेचे । की जे एकचि असे तयाचे । दोन करुनि दावी ॥११२३॥

तैसा सर्वत्र मीचि मजकडुनी । घेतसे भक्तीने या आकळुनी । दृश्यत्व हे व्यर्थ मानी । अज्ञानवशें ॥११२४॥

ते अज्ञान आता फिटले । माझे द्रष्टेपण मज भेटले । निजबिंबीं एकवटले । प्रतिबिंब जैसे ॥११२५॥

असे हीण मिश्रित काही । तेव्हाही ते सोनेचि- ॥११२६॥

पूर्णिमेआधी पाहे । काय चंद्र पूर्ण नोहे ? । परि त्यादिवशी लाहे । पूर्णता तो ॥११२७॥

तैसा मीचि दिसे ज्ञानाद्वारें । परि अन्य रूपाधारें । द्रष्टेपण ते सरे । मजचि मी लाभे ॥११२८॥

म्हणोनि दृश्यपथातीत पार्था । माझा भक्तियोग चवथा । हेचि तुज विशद करिता । म्हटले गा ॥११२९॥

भक्तीने तत्त्वता जाणे कोण मी केवढा असे
ह्यापरी मज जाणूनि माझ्यात मिसळे मग ॥५५॥

या ज्ञानभक्तिने सहज । भक्त जो एकवटला मज । तो मीचि त्रिवार हे तुज । श्रुतही आहे ॥११३०॥

मी उभवुनिया भुजा । ज्ञानीं आत्मा माझा । हे बोलिलो कपिध्वजा । सातवे अध्यायीं ॥११३१॥

ती ही कल्पारंभींची भक्ती । ब्रह्मदेवासि भागवतीं । उपदेशिली उत्तम अती । धनंजया ॥११३२॥

ज्ञानी हिज आत्मकला म्हणती । शैव म्हणती शक्ती । आम्ही परमभक्ती । आपुली म्हणू ॥११३३॥

ही मज मिळतेवेळे । तया क्रमयोग्या फळे । मग समस्तही विश्व वेटाळे । मजचिरूपें ॥११३४॥

विरे वैराग्य विवेकासवे तेथ । आटे बंध मोक्षासाहित । चिंतनासकट वृत्ती जात । बुडोनिया ॥११३५॥

घेऊनि ऐलपणाते । पैल हरपे जेथे । गिळूनि चारी भूते । आकाश जैसे ॥११३६॥

तयापरी ऐल-पैल-मध्यातीत । साध्य-साधनाचे अतीत । ते मी होऊनि एकवटत । भोगी तो मज ॥११३७॥

मिळोनि सिंधूचिये अंगा । सिंधूवरी तळपे गंगा । तैसा थाट या भोगा । अवधारी बा ॥११३८॥

की आरशापुढे आरसा । पुसोनि ठेविता जैसा । अवलोकिणारा अवलोक्य द्रष्टाचि तैसा । भोग तयाचा ॥११३९॥

जागे होता स्वप्न नाशे । आपले एकलेपणचि दिसे । ते दुज्याविना जैसे । भोगावे की ॥११४०॥

हे असो, नेता दर्पण । तो मुखबोधहि जाता उठून । एकटा ते पाहणेपण । आस्वादी जैसा ॥११४१॥

एकरूप होता बोध तयाचा । ऐसे न हो हा भाव जयांचा । तयां पुसू शब्दें केवी शब्दांचा । उच्चार होय ? ॥११४२॥

सूर्य काय तयांचे गावा । लागे दिवलीने पाहावा ? । की व्योमास्तव मंडप वा । उभारिले तयांनी ? ॥११४३॥

राजेपण नसता अंगीं । राव राजेपण काय भोगी ? । अंधार काय आलिंगी । दिनकरासी ? ॥११४४॥

आणि आकाश जे नव्हेचि ते । तया आकाश काय जाणवते ? । रत्नांचे रूपीं काय मिरविते । गुंजांचे लेणे ? ॥११४५॥

म्हणोनि मी होणे नव्हे । तया मी कोठेचि न सवे । मग भजेल हे बोलावे । काय कैसे कोणें ? ॥११४६॥

यालागी तो क्रमयोगी । मी होऊनिचि मज भोगी । तारुण्य की तरुणांगी । ज्यापरी गा ॥११४७॥

तरंग सर्वांगीं तोय चुंबी । प्रभा सर्वत्र विलसे बिंबी । अथवा अवकाश नभीं । लोळे जैसे ॥११४८॥

तैसा रूप होऊनि माझे । मज क्रियेवीण तो भजे । अलंकार की सहजें । सोन्यासी जैसा ॥११४९॥

जैसा चंदनाचा सुवास । स्वभावें भजे चंदनास । अथवा सहजचि चंद्रास । चांदणे ते ॥११५०॥

तैसी क्रिया न साहे । परि अद्वैतीं भक्ति आहे । बोलण्याऐसे हे नव्हे । अनुभविण्याचिजोगे ॥११५१॥

तेव्हा पूर्वसंस्कारछंदी पाही । जे बोले तो काही । त्या आळवणीने ओ देई । बोलणारा मीचि ॥११५२॥

बोलणारा बोलणार्‍या भेटे । तेव्हा बोलला हा व्यवहार कोठे ? । ते मौन तर गोमटे । स्तवन माझे ॥११५३॥

म्हणोनि तो बोलत असता । त्या बोलण्यात बोलणारा मी भेटता । मौन होय तेणें तत्वता । स्तवी तो मज ॥११५४॥

तैसेचि बुद्धिने की दिठीने । जे तो देखो जाणे । दृश्यासि सारुनि देखणे । देखत्यासीचि दावी ॥११५५॥

आरशाआधी होतेचि मुख जैसे । परि तयें पाहताचि ते दिसे । तयाचे चोख देखणे तेसे । दावी तो देखणार्‍यासी ॥११५६॥

दृश्य जाउनि द्रष्टा आता । द्रष्टयासीचि भेटता । एकलेपण न पार्था । द्रष्टेपणासीही ॥११५७॥

स्वप्नीं प्रियेसि पाही । जागे होता आलिंगू जाई । तर दोन्ही नाही । राहे आपणचि जैसा ॥११५८॥

दोन काष्ठांच्या घसटे । वन्ही एक उठे । तर दोन ही भाषा आटे । राहे वन्हीचि एक ॥११५९॥

अथवा प्रतिबिंब करें । घेवो जाता दिनकरें । तयाचे असलेलेहि बिंबत्व पुरे । जाय जैसे; ॥११६०॥

तैसा देखणारा तो मी होय । दृश्या देखो जाय । तेथ नुरे दृश्य । द्रष्टेपणासह ॥११६१॥

रवीने अंधार प्रकाशिता । नुरेचि जैसी प्रकाश्यता । तैसे दृश्य मद्रूप होता । नुरेचि द्र्ष्टेपणा जैसे ॥११६२॥

देखणे ना न देखणे जे । ऐसी जी अवस्था निपजे । ते ते दर्शन माझे । साचचि गा ॥११६३॥

पार्था, ते कोणत्याही म्हणे, । पदार्थांचिये भेटीने । द्रष्टादृश्यातीत दुष्टीने । भोगी तो सदा ॥११६४॥

आणि आकाश हे आकाशें । दाटले न ढळे जैसे । मज आत्म्याने आपणात तैसे । जाहले तया ॥११६५॥

कल्पांतीं उदक उदकें । रोधिल्याने वाहणे थबके । तैसे मज आत्म्यानें एकें । कोंदला तो ॥११६६॥

पाय स्वतःवरि कैसा चढे ? । वन्हि स्वतःसी कैसा वेढे ? । पाणी स्वतःत कैसे बुडे । स्नानासाठी ? ॥११६७॥

म्हणोनि सर्व मीचिमय जाहल्याने । थोपले तया येणे-जाणे । हेचि गा यात्रा करणे । मज अद्वयाची ॥११६८॥

अगा जळावरील तरंग । जरि धावला सवेग । तरि ना भूमिभाग । आक्रमिला ॥११६९॥

तयें जे सांडावे की मांडावे । जे चालणे जेणे चालावे । ते तोयचि एक आघवे । म्हणोनिया ॥११७०॥

अगा कोठेही जाता । उदकपणे पंडुसुता । तरंगांची एकात्मता । नच मोडे जैसी ॥११७१॥

ऐसा मजपणे हा भरला । तो आघवाचि मजआत आला । या यात्रेने होय भला । यात्रेकरू माझा ॥११७२॥

आणि शरीरस्वभाववशें । काही एक करू जरि बैसे । तरि मीचि तो तेणे मिषें । भेटे तया ॥११७३॥

तेथ कर्म आणि कर्ता । हे जाऊनि पंडुसुता । आत्मा ऐसे मज पाहता । तो मीचि होय ॥११७४॥

पाहता दर्पणासि दर्पणें । अगा न होय पाहणे । सोने झाकिता सुवर्णे । न झाके जैसे ॥११७५॥

प्रकाशी दीपासी दीप । ते न प्रकाशणेचि आपोआप । तैसे करावे होऊनि मद्रूप । ते कर्म करणे कैसे ? ॥११७६॥

करितचि आहे कर्मही । जेव्हा करावे ऐसी भाष जाई । तेव्हा ते न करणेचि होई । तयाचे केले ॥११७७॥

क्रियाजातही मीचि होता । घडे काहीचि न करणे सर्वथा । तयाचि नाव पूजिणे पार्था । खुणेचे माझे ॥११७८॥

करिताहि कर्मजात भले । ते नच होय केले । निपजे ते महापूजन जाहले । ऐसे पूजी तो मज ॥११७९॥

तैसे, तो बोले ते स्तवन । तो देखे ते दर्शन । अद्वया मज गमन । तो चाले तेचि ॥११८०॥

तो जे करी तितुकी पूजा । तो कल्पी तो जप माझा । तो ज्या स्थितीत कपिध्वजा । ती समाधि माझी ॥११८१॥

जैसी कनकासी काकणे । असती अनन्यपणें । तो भक्तियोगें येणें । मजसी तैसा ॥११८२॥

उदकीं कल्लोक । कापुरीं परिमळ । रत्नीं जैसा झळाळ । अनन्य असे ॥११८३॥

किंबहुना तंतूसी पट । की मृत्तिकेसि घट । तैसा तो एकवट । मजसि माझा ॥११८४॥

अनन्यसिद्ध भक्तीने या । दृश्यजातांमध्ये आघव्या । आत्मत्वें तो धनंजया । मज द्रष्टयासी जाणे ॥११८५॥

जागृति-स्वप्न-सुषुप्तींचेद्वारें । उपाधि-उपहित-आकारें । भाव-अभाव-रूप स्फुरे । दृश्य जे हे; ॥११८६॥

ते हे आघवेचि मी द्रष्टा । ऐसिया बोधभरें एकटा । अनुभवाचा, सुभटा । झेंडा तो नाचवी ॥११८७॥

दोर होता गोचर । आभासला तो सर्पाकार । दोरचि ऐसा निर्धार । होय जैसा ॥११८८॥

सोन्याशिवाय काही । लेणे गुंजभरही नाही । हे आठवुनी एके ठायी । करावे निश्चित जैसे ॥११८९॥

उदकावरि तरंग जैसे । नाहीचि जळविरहितसे । म्हणोनि त्या आकारभासें । नच भुले जैसा ॥११९०॥

अथवा स्वप्नविकार आघवे. । जागे होता पाहो जावे । तर आपणापरत्वें । नच पाही काही ॥११९१॥

तैसी भाव-अभाव-रूपें ती । होय जी ज्ञेयस्फूर्ती ॥ ती ज्ञाताचि मी ही प्रतीती । होऊनि भोगी ॥११९२॥

जाणे अजन्म मी अजर । अक्षय मी अक्षर । अपूर्व मी अपार । आनंद मी ॥११९३॥

अचल मी अच्युत । अनंत मी अद्वैत । आद्य मी अव्यक्त । व्यक्तही मी ॥११९४॥

ईश्श्य मी ईश्वर । अनादि मी अमर । अभय मी आधार । आधारित मी ॥११९५॥

स्वामी मी सदोदित । सहज मी सतत । सर्व मी सर्वगत । सर्वातीत मी ॥११९६॥

नवा मी पुराण । शून्य मी संपूर्ण । स्थूळ मी कण । जे काही ते मी ॥११९७॥

अक्रिय मी एक । असंग मी अशोक । व्याप्य मी व्यापक । पुरुषोत्तम मी ॥११९८॥

अशब्द मी अश्रोत्र । अरूप मी अगोत्र । सम मी स्वतंत्र । ब्रह्माहिपार मी ॥११९९॥

ऐसे आत्मत्वें मज एकाते । जाणे अद्वयभक्तीने पुरते । आणि तो जाणे या बोधाते । हे जाणणाराहि मीचि ॥१२००॥

अगा जागे होता पुरे । आपले एकपण उरे । तेही जैसे स्फुरे । आपल्याचि ठायी ॥१२०१॥

अथवा प्रकाशता अर्क । तोचि होय प्रकाशक । तयाही अभेदा द्योतक । तोचि जैसा; ॥१२०२॥

तैसा ज्ञानविषयांचे विलयीं । केवळ ज्ञाताचि उरे पाही । जाणिला जाय तो ज्ञाताही । हेही तोचि जाणे ॥१२०३॥

अद्वयपणासी आपुलिया । जाणती शक्ति जी धनंजया । तो ईश्वर मी हे तया । अनुभवा ये ॥१२०४॥

मग द्वैत-अद्वैतातीत । मीचि आत्मा एक निभ्रांत । हे जाणोनि जाणणे जेथ । अनुभवीं शिरे; ॥१२०५॥

जागे होता एकपण । दिसे जे आपले आपण । तेही जाता न जाणे कोण । राहे जैसे; ॥१२०६॥

डोळ्याने देखताक्षणीं । सुवर्णपण सुवर्णीं । न आटविता होय आटणी । अलंकाराची की ॥१२०७॥

अथवा लवण होई तोय । मग क्षारता तोयत्वें होय । तीही जिरता जैसे जाय । लवणपण ते ॥१२०८॥

तैसे मी तो हे जे असे । ते स्वानंदाभुवसमरसें । कालवुनिया प्रवेशे । मजआत तो ॥१२०९॥

आणि तो ही भाष जेथ जाय । तेथ मी हे कोणासि काय ? । ऐसे मी तो वेगळे न होय । तो माझेचि रुपीं ॥१२१०॥

कापूर जळोनि सरे । त्याचिवेळी अग्नीही ओसरे । मग आकाशमात्र जैसे उरे । दोहोंहुनी वेगळे ॥१२११॥

घालविता एकातुनि एक देख । राहे ते शूण्य निःशेष । तैसा आहे-नाहीचा शेष । मग मीचि असे ॥१२१२॥

तेथ ब्रह्म आत्मा ईश । या बोलीं नुरे रस । न बोलण्याही अवकाश । नाही तेथ ॥१२१३॥

न बोलणेहि न बोलोनी । ते बोलावे तोंड भरुनी । जाणीव-नेणिवेचे ज्ञान त्यजुनी । जाणावे ते ॥१२१४॥

तेथ जाणावा बोध बोधें । आनंद घ्यावा आनंदे । सुखाने नुसते मोदें । सुखाचि भोगावे ॥१२१५॥

तेथ लाभ जोडिला लाभा । प्रभेने आलिंगिली प्रभा । विस्मय बुडाला उभा । विस्मयात ॥१२१६॥

सम तेथ सामावला । विश्राम विश्रांतीसि आला । अनुभव वेडावला । अनुभवें तेथ ॥१२१७॥

किंबहुना ऐसे निखळ । मद्रूपप्राप्तीचे जोडे फळ । सेवुनी वेल वेल्हाळ । क्रमयोगाची ती ॥१२१८॥

क्रमयोगचक्रवर्तीचे मुकुटीं । मी चिद्‌रत्न असे किरीटी, । होय तो साटीलोटीं । अगा माझा ॥१२१९॥

की क्रमयोग प्रासादाचा । कळस जो हा मोक्षाचा । तयावरिल अवकाशाचा । विस्तार जाहला ॥१२२०॥

अथवा संसारअरण्यीं नवी । जोडिली क्रमयोगाची वाट बरवी । ती माझिये ऐक्यगावीं । प्रवेशली असे ॥१२२१॥

हे असो, क्रमयोगओघाने । तेणे भक्तचित्तगंगेने । मज स्वानंदउदधीसी वेगाने । गाठिले की गा ॥१२२२॥

हा येथवरी सुवर्मा । क्रमयोगाचा आहे महिमा । म्हणोनि वेळोवेळी तुम्हा । सांगतो आम्ही ॥१२२३॥

अगा, देशें काळें पदार्थें । साधुनि घ्यावे मज पुरते । तैसा नव्हे मी, आयता सर्वांते । सर्वांच्या सर्वरूपीं ॥१२२४॥

म्हणोनि माझे ठायी । श्रमावे न लागे काही । मी लाभे या उपायीं । साचचि गा ॥१२२५॥

एक शिष्य एक गुरुवर । हा रूढला साच व्यवहार । तो मम प्राप्तिप्रकार । जाणण्यास्तव ॥१२२६॥

अगा, वसुधेचे पोटीं । निधान सिद्ध, किरीटी, । वन्हि सिद्ध काष्ठीं । कासेसी दुध; ॥१२२७॥

परि लाभण्याऐसेचि असे । तरि उपाय शोधावा लागतसे । एरवी सिद्धचि तैसा लाभतसे । कोणेही उपायीं मीही ॥१२२८॥

हा फळ कथिल्यावरी उपाय । का प्रस्तावितसे देवराय । हे पुसाल तर । अभिप्राय । तेथला ऐसा ॥१२२९॥

गीतार्थाचे गुण किती वानावे ? । ते मोक्षउपायपर आघवे । अन्य शास्त्रोपाय की नव्हे । प्रमाणसिद्ध ॥१२३०॥

वारा अभ्रचि फेडी । तो सूर्या न घडवी मोडी । हात शेवाळ काढी । तोय न निर्मी; ॥१२३१॥

तैसा आत्मदर्शनाआड असे । तो अविद्यामळ शास्त्र नाशे । परि मी स्वयंप्रकाशें । प्रकाशे निर्मळपणें ॥१२३२॥

म्हणोनि प्रत्येकचि शास्त्र । अविद्यानाशासी पात्र । त्यावाचूनि न होय स्वतंत्र । आत्मबोधीं ॥१२३३॥

त्या अध्यात्मशास्त्राठायी । साचपणाचा प्रश्न येई । तेव्हा येती जेथ, ती ही । गीता होय ॥१२३४॥

भानुभूषित होता प्राची । सतेज होत दिशा आघव्याचि । तैसी शास्त्रे सनाथ साची । गीतेने या ॥१२३५॥

हे असो या शास्त्रवरें । मागे उपाय बहुविस्तारें । कथिला, जैसा करें । घेता ये आत्मा ॥१२३६॥

परि प्रथम श्रवणासवे । अर्जुना हे क्वचितचि जाणवे । कणवेने या भावें । बोलिले श्रीहरी ॥१२३७॥

तेचि प्रमेय एकवेळ । चित्तीं व्हावया अढळ । सांगतसे सुढाळ । करुनी आता ॥१२३८॥

आणि येथ होय गीतासमाप्ती । म्हणोनि आदि-अन्तीं । श्रीहरी दाविती । एकार्थत्व ॥१२३९॥

ग्रंथाचे मध्यभागी । नाना अधिकारप्रसंगीं । निरूपण अनेकांगी । सिद्धांतीं केले ॥१२४०॥

तर तितुकेही सिद्धांत मांडुनी । दाविले जे या शास्त्रांनी । ते पूर्वापार न जाणे कोणी । ऐसे मानिले; ॥१२४१॥

तर महासिद्धांतांचे आवाक्यातही । सिद्धांतकक्षा अनेक पाही । हे दाविता एकवटे प्रारंभही । समाप्तीसी ॥१२४२॥

येथ अविद्यानाश हे स्थळ । तेणें मोक्षप्राप्ती हे फळ । या दोहोंसी केवळ । साधन ज्ञान ॥१२४३॥

हे इतुकेचि नाना परींनी । ग्रंथविस्तारें निरुपणीं । आता दोन अक्षरांनी । अनुवादावे; ॥१२४४॥

म्हणोनि साध्यहि येता हाती । साधनकथनीं पुढती । देव प्रावर्तती । येणेचि भावें ॥१२४५॥

करूनिहि सदा कर्में सगळी मज सेवुनी
पावे माझ्या कृपेने तो अवीट पद शाश्वत ॥५६॥

मग देव म्हणे । तो क्रमयोगी या निष्ठेने । मी होऊनि प्रविष्टणे । माझे रूपीं ॥१२४६॥

स्वकर्मकुसुमीं बांधिली । पूजा गा भली । त्या प्रसादें आकळी । ज्ञाननिष्ठेसी ॥१२४७॥

ती ज्ञाननिष्ठा हाता येतसे । तेथ भक्ति माझी उल्लासे । तिजयोगें मजसि समरसे । सुखी होय ॥१२४८॥

आणि विश्वप्रकाशका । आत्म्या मज सर्वव्यापका  । जाणोनि अनुसरे जो का सर्वभावें ॥१२४९॥

सोडूनि काठिण्य सकळ । लवण आश्रयी जळ । की हिंडोनि राहे निश्चळ । वायू व्योमीं ॥१२५०॥

तैसा बुद्धि वाचा कायेसहही । जो मज आश्रयुनि राही । परि क्वचित् निषिद्धही । कर्मे करी; ॥१२५१॥

परी गंगेचे संबंधी । एक होय नाला-महानदी । तेसे माझे बोधीं । होय शुभ अशुभ ॥१२५२॥

वा भेद रायवळ-चंदनीं । तेव्हाचि जाय सरोनी । जेव्हा वैश्वानर कवळुनी । घेई दोहोंसीही ॥१२५३॥

हिणकस आणि निखळ । तोवरिचे सोन्यावरि हा आळ । जोवरि करुनि अंगमेळ । एकवटीना परीस ॥१२५४॥

अगा शुभ-अशुभ तैसे । तोवरिचि आभासे । जोवरि एक मी न प्रकाशे । सर्वत्र गा ॥१२५५॥

अगा, रात्र आणि दिवस । हा तोवरिचि द्वैताभास । जोवरि न होय प्रवेश । सूर्यदेवाचे गावीं ॥१२५६॥

माझिये भेटीने म्हणुनी । तयाची सर्व कर्मे लोपुनी । तो बैसे जाउनी । मोक्षपदीं ॥१२५७॥

देशें काळें स्वभावे । नाश जया न संभवे । ते पद माझे पावे । अविनाश तो ॥१२५८॥

किंबहुना पांडुसुता । लाभता मज आत्म्याची प्रसन्नता । अगा, मग ती पावता । कोणता लाभ उरे ? ॥१२५९॥

मज मत्पर वृत्तीने सर्व कमें समर्पुनी
समत्व न ढळू देता चित्त माझ्यात ठेव तू ॥५७॥

या कारणें गा तुवा । सर्व कर्मासि आपुलिया । माझिये स्वरूपीं धनंजया, । संन्यस्त करावे ॥१२६०॥

परि तोचि संन्यास वीरा, । वरपांगी न आचरा । आत्मविवेकीं धरा । चित्तवृत्ती ही ॥१२६१॥

मग त्या विवेकसामर्थ्यें । कर्मातीतत्व स्वयें । निर्मळ स्वरुपीं माझिये । देखशील ॥१२६२॥

आणि कर्माची जन्मभूमी ती । जी की आहे प्रकृती । आपणाहुनि भिन्न दूर अती । देखशील ॥१२६३॥

आपणावेगळी पण । प्रकृति वेगळी न उरुन । की नसे रूपाविण । छाया जैसी ॥१२६४॥

ऐसा होता प्रकृतिनिरास । निपजेल कर्मसंन्यास । अर्जुना, विनायास । कारणासह ॥१२६५॥

मा जाता कर्ममात्रही । मी आत्मा उरे आपुले ठायी । बुद्धि तेथ होउनि राही । पतिव्रता ॥१२६६॥

बुद्धि या अनन्ययोगें । मजमाजी जेव्हा रिघे । चित्त चिंतनविषय त्यागे । मजसीचि भजे ॥१२६७॥

चिंतनजात त्यजिले जाईल । चित्त माझेठायी जडेल । सर्वदा निश्चळ राहील । ऐसे सत्वर करी ॥१२६८॥

मग सर्व भये माझ्या कृपेने तरशील तू
मीपणे हे न मानूनि पावशील निनाशचि ॥५८॥

मग या सेवेने अभिन्न । मजयोगेचि जाइल चित्त भरून । माझा प्रसाद परिपूर्ण । होय तेव्हा ॥१२६९॥

तेथ दुःखघामे सकळ । भोगिती जे जन्ममृत्यु अढळ । दुर्गमही सुगम सरळ । होतील तुज ॥१२७०॥

होता सूर्याचे साहाय्य । डोळियां आसरा होय । तर अंधाराचा तेथ काय । पाड असे ? ॥१२७१॥

तैसे माझिया प्रसादबळें । जीवितास्था तयाची मावळे । तया कैसा कवटाळे । बागुलबुवा संसाराचा ? ॥१२७२॥

म्हणोनि धनंजया । संसारदुर्गतितूनि या । तरशील माझिया । प्रसादायोगे ॥१२७३॥

अथवा अहंभावे जरी । माझे बोलणे खरोखरी । काना-मनाच्या शिवेवरी । न देसी टेकू; ॥१२७४॥

आणि नित्य मुक्त अव्यय । आहेसी ते व्यर्थ जाय । आणि देहतादात्म्याचा घाव । वाजेल तुझे अंगीं ॥१२७५॥

अर्जुना, ज्या देहाविषयीं । पदोपदी आत्मघात ऐकू येई । भोगिता उसंत नाही । कदापिही ॥१२७६॥

ओढवेल एवढे दारुण । मरणाहून मरण । जर न घेसी ऐकून । बोलणे माझे ॥१२७७॥

म्हणसी मी न झुंजेचि हे जे मीपण घेउनी
तो निश्वय तुझा व्यर्थ स्वभाव करवीलचि ॥५९॥

पथ्यद्वेषी पोषी ज्वर । वा दीपद्वेषी अंधकार । विवेकद्वेषें अहंकार । पोषून तैसा; ॥१२७८॥

स्वदेहा नाव अर्जुन । परदेहा नाव स्वजन । संग्रामा नाव मलिन- । पापाचार; ॥१२७९॥

या आपुल्या बुद्धीने कोत्या । तिघां तीन नावे या । ठेवूनिया धनंजया, । न झुंजेचि ऐसा; ॥१२८०॥

जिवामाजी जो निश्चय एक । करिसी गा आत्यंतिक । तो वाया घालवील नैसर्गिक । स्वभाव तुझा ॥१२८१॥

मी अर्जुन, हे नातेवाईक । ह्यांचा वध करणे हे पातक । ही भ्रांति याविण तात्त्विक । काही आहे ? ॥१२८२॥

आधी झुंजार तुवा व्हावे । मग झुंजण्या शस्त्र घ्यावे । अन्यथा न झुंजण्या का न करावे । शपथभाषण ॥१२८३॥

म्हणोनि मी न झुंजे । म्हणसी व्यर्थचि जे । न कोणी मानील तुझे । लोकदृष्टीनेही ॥१२८४॥

तरीही न झुंजेन । ठरवील जरी तुझे मन । तरि प्रकृति वेगळे जाण । करवीलचि ॥१२८५॥

स्वभावसिद्ध कर्माने आपुल्या बांधिलास तू
जो टाळू पाहसी मोहे अवश्य करिशील ते ॥६०॥

पाणी वाहे पूर्वेकडे । पोहणारा निघे पश्चिमेकडे । तो हट्टाग्रहचि, ते तया पुढे । आपुल्या दिशेने नेई ॥१२८६॥

जर साळीचा कण म्हणे । मी न उगवेन साळीप्रमाणे । तर अन्य काय उगवणे । स्वभावाविरुद्ध ? ॥१२८७॥

तैसे क्षत्रिया हे देखसी । अगा प्रकृतियोगें घडिलासी । आता युद्धास्तव न उठेन म्हणसी । तरि उठविला जाशीलचि ॥१२८८॥

शौर्य तेज दक्षता । इत्यादी पंडुसुता । गुण दिधले जन्मता । प्रकृतीने तुज ॥१२८९॥

तर तया गुणसमुच्चया । अनुरूप गा धनंजया, । न करिता उगे या समया । न राहवेल तुज ॥१२९०॥

म्हणोनि या तिन्ही गुणीं । बांधिलेला तू कोंदडपाणी, । निघशील मार्ग चोखाळुनी । शास्त्रांचा निश्चर्यें ॥१२९१॥

अन्यथा हे आपुले जन्ममूळ । ऐसे न चिंतिताचि केवळ । नच । झुंजेन ऐसे अढळ । व्रत जरी घेसी; ॥१२९२॥

तरि बांधोनि हात पाय । जो रथीं घातला होय । तो न चाले तरी जाय । दिगंता जैसा; ॥१२९३॥

तैसा तू आपुलेकडुनी । काहीचि न करी म्हणोनि । न उठसी, तरि सहस्त्र भरवशांनी । तूचि करिसी ॥१२९४॥

विराटपुत्र उत्तर गा धनंजया, । पळता, तू निघालासी झुंजावया । हा क्षात्रस्वभावचि, सवंगडया, । झुंजवील तुज ॥१२९५॥

महावीर अकरा अक्षौहिणी । तुवा एकेचि नागविले रणांगणीं । ती प्रवृत्तीचि तव कोंदडपाणी, । झुंजवील तुज ॥१२९६॥

अगा रोग्यासि काय रोग प्रिय ? । की आवडे दरिद्रया दारिद्रय ? । परि ते भोगविलेचि जाय । बलिष्ठ अष्टृष्टें ॥१२९७॥

ते तर ईश्वराधीन । न करी वेगळे तयाहून । आणि तो ईश्वरही महान । तुझिये हृदयीं ॥१२९८॥

राहिला सर्व भूतांच्या हृदयीं परमेश्वर
मायेने चाळवी त्यांस जणू यंत्रात घालुनी ॥६१॥

सर्व भूतांचे अंतरीं । हृदयमहाअंबरीं । चिदवृत्तीचे सहस्त्रकरीं । उदयला असे जो ॥१२९९॥

अवस्थात्रय तिन्ही लोक । प्रकाशूनि अशेष एकेक । विपरीत दृष्टीचे पथिक । नागविले ॥१३००॥

दृश्य जगताचे सरोवरात । विषयकमळे फुलवीत । जीवभ्रमरांसी सेविण्या देत । दिनेश तो ॥१३०१॥

असो, रूपक हे जाण । सकळ भूतांचे मीपण । निरंतर पांघरुन । प्रकटे तो ईश ॥१३०२॥

स्वमायेचे लावुनि आडवस्त्र । एकला खेळवी सूत्र । बाहेरी नाचवी छायाचित्र । चौर्‍यांयशी लक्ष योनींचे ॥१३०३॥

ब्रह्मदेवापासुनी कीटकांपावत । सकळही भूतजात । पाहोनि योग्यता तेथ । देहाकारासी आणी ॥१३०४॥

तेथ जो देह जयापुढे । अनुरूपपणें मांडे । ते भूत त्यावरि आरूढे । हा मी म्हणोनि ॥१३०५॥

सूत सुतें गुंतावे । तृण तृणेंचि बांधावे । की बालकें प्रतिबिंब घ्यावे । जळींचे जैसे; ॥१३०६॥

त्यापरी देहाकारें । आपणासचि देखूनि दुसरे । जीव आविष्करे । आत्मबुद्धीने ॥१३०७॥

ऐसी शरीराकार यंत्रीं । भूते बैसवुनी, अवधारी । तो ईश्वर हालवी दोरी । प्रारब्धाची ॥१३०८॥

तेथ जया जे कर्मसूत्र । मांडुनि ठेविले स्वतंत्र । ते त्या गतीसी पात्र । होऊचि लागे ॥१३०९॥

किंबहुना खरोखरी । भूतांसी स्वर्गसंसारीं । भोवंडी तृणासी, धनुर्धारी । नभीं वारा जैसा ॥१३१०॥

चुंबकाचे संगर्गें । जैसे लोह फिरू लागे । तैसी ईश्वरसत्तेयोगें । वागती भूते ॥१३११॥

जैशा हालचाली आपुल्या । समुद्रादिक धनंजया । करिती चंद्राचिया । सान्निध्यें एके ॥१३१२॥

त्यायोगें सिंधूसि ये भर । चंद्रकांतमण्यासि फुटे पाझर । आनंदती चकोर । उमलती कुमुदिनी ॥१३१३॥

तैसी बीजप्रकृतिवशें । अनेक भूते एके ईशें । खेळविली जाती तो वसे । तुझिये हृदयीं ॥१३१४॥

अर्जुनपण न घेता । मी ऐसे जे पंडुसुता । तुजहृदयी उमटे, ते तत्त्वता । तयाचे रूप ॥१३१५॥

यालागी तो प्रकृतीसी । प्रवर्तवील निश्वित देखसी । की ती झुंजवील तुजसी । न झुंजेन म्हणसी जरी ॥१३१६॥

ईश्वर तो स्वामी तेवी । प्रकृति ही नियमावी । तिने सुखें राबवावी । इंद्रिये आपुली ॥१३१७॥

करणे न करणे दोन्ही तुवा । प्रकृतिचे माथीं लादूनिया । प्रकृति ही स्वाधीन जया । हृदयस्थ आत्म्या; ॥१३१८॥

त्यातेचि सर्वभावें तू जाई शरण पावसी
त्याच्या कृपाबळें थोर शांतीचे स्थान शाश्वत ॥६२॥

तया अहं वाचा अंग चित्त । देऊनि हो शरणागत । गंगोदक महोदधीत । विसावे जैसे ॥१३१९॥

मग तयाचे प्रसादाने । सर्वशांतिप्रमदेचा कांत होणे । स्वानंदें रमणे । आत्मस्वरूपीं ॥१३२०॥

उत्पत्ति जेणे उद्‌भवे । विश्रांति जेणे विसावे । अनूभूतीही अनुभवे । अनुभवा ज्या; ॥१३२१॥

त्या निजात्मपदींचा राव । होऊनि ठाकसी अक्षय । म्हणे यादवराय । पार्था तू ॥१३२२॥

असे गूढाहुनी गूढ बोलिलो ज्ञान मी तुज
ध्यानी घेऊनी ते सारे स्वेच्छेने योग्य ते करी ॥६३॥

गीता या नावें विख्यात जाण । सर्व वेदांचे सार म्हणून । होय स्वाधीन आत्मरत्न । या ज्ञानें गा ॥१३२३॥

हे ज्ञान ऐसे तेवी । वेदान्तें जयाची थोरवी । वर्णिता कीर्ती विश्वीं । मिळविली चोख ॥१३२४॥

बुद्धि आदिक ज्ञान ऐसे । ज्या ज्ञानाचे की कवडसे । मी सर्वद्रष्टाही दिसे । उदयता जे; ॥१३२५॥

ते हे गा आत्मज्ञान । मज गूढाचेही गुप्तधन । परि तुज दुजा मानून । कैसे लपवू गा ? ॥१३२६॥

याकारणे गा पाहे, । आम्ही गुप्त निधान आपुले हे । तुज दिधले प्रेमभावें । संतुष्ट होउनी ॥१३२७॥

परि भुलली प्रेमरसें । माय बाळाशी बोलतसे । आमुची प्रीतीही तैसे । का न करू दे ? ॥१३२८॥

येथ आकाशहि गाळुनि घ्यावे । अमृतही सोलावे । की दिव्याकरवी करवावे । दिव्य जैसे; ॥१३२९॥

जयाचे अंगप्रकाशें । पाताळींचा परमाणूही दिसे । त्या सूर्या की जैसे । अंजन घालावे;  ॥१३३०॥

तैसे मी सर्वज्ञ असूनिया । दृढ विचार करूनिया । सुयोग्य ते ज्ञान धनंजया । सांगितले तुज; ॥१३३१॥

आता यावरि तुवा पांडवा । परिपूर्ण विचार करावा । आणि निर्धारुनी आचरावा । आवडे तैसा ॥१३३२॥

या देवाचिये बोला । अर्जुन उगा राहिला । देव म्हणती तू भला । वंचना न करिसी ॥१३३३॥

भुकेला वाढणार्‍याचे पुढयात । संकोचें म्हणे मी तृप्त । तेव्हा तो स्वतःसीचि पीडत । आत्मवंचनेचा दोष तया ॥१३३४॥

तैसा भेटे सर्वज्ञ गुरुवर । तरि न पुसे आत्मविचार । अंतरीं धरोनि अपार । भीड जेव्हा; ॥१३३५॥

तेव्हा स्वतःसी वंचे । आणि पाप लागे वंचनेचे । स्वतःसी आत्मस्वरुपा साचे । मुकविले तेणे ॥१३३६॥

अगा उगेपणी तुझिया । हा अभिप्राय असे धनंजया । की एकवेळ घेऊनि आठवा । सांगावे ज्ञान ॥१३३७॥

तेथ पार्थ म्हणे श्रीकृष्णासी । माझिया मना भले जाणिसी । आणि मज जाणणारा देखसी । दुसरा असेचि कोण ? ॥१३३८॥

अन्य ज्ञेय हे जी, आघवे । ज्ञाता तू एकचि स्वभावें । मग सूर्य म्हणोनि वानावे । काय सूर्या ? ॥१३३९॥

या बोलावरि देव पुढे । म्हणे काय हे वर्णन गाढे । अगा हेचि काय थोडे । की जाणतोसि तू ? ॥१३४०॥

सर्व गूढातले गूढ पुन्हा उत्तम वाक्य हे
हितार्थ सांगतो ऐक फार आवडसी मज ॥६४॥

तर अवधान पघळ । करुनि आणिक एकवेळ । वाक्य माझे निर्मळ । अवधारी बा ॥१३४१॥

हे वाच्य म्हणोनि बोलावे । वा श्राव्य म्हणोनि ऐकावे । ऐसे नव्हे, परि बरवे । भाग्य तुझे ॥१३४२॥

अगा कासवी दिठीचे ठाये । पिलांस्तव पान्हावे । आकाश पाणी वाहे । चातकांसाठी ॥१३४३॥

न घडे जेथ जो व्यवहार । तयाचेचि फळ मिळे तेथ खरोखर । काय दैवें न भेटे ? जर- । ते अनुकूल ? ॥१३४४॥

एरवी द्वैताची वारी । सारुनि ऐक्याचे परिवारीं । भोगावे ते, अवधारी । तात्पर्य हे ॥१३४५॥

आणि निरुपचार प्रेमा । विषय होय जे प्रियोत्तमा । ते दुजे नव्हे, आत्मा- । ऐसेचि जाणावे ॥१३४६॥

दर्पणात पहावे । तर लागे तया गोमटे करावे । ते तयासाठी नव्हे । आपणाचिस्तव जैसे; ॥१३४७॥

तैसे पार्था तुझे मिषें । मी बोले आपुल्याचि उद्देशें । माझे-तुझे-ठायी काय असे । मी-तूपण गा ? ॥१३४८॥

म्हणोनि जिव्हारींचे गुज । माझ्या जिवा सांगे तुज । अनन्यगति भक्ताचे मज । असे व्यसन ॥१३४९॥

अगा आपलेपण जळा देता । लवणा भुलले पांडुसुता, । की आघवे तयाचे होता । न संकोचे ते; ॥१३५०॥

तैसा तू माझे ठायी । भेद न ठेविसी काही । तर आता तुजपासुनि ठेवी । गुह्य मी काय ? ॥१३५१॥

म्हणोनि आघवेचि गुढ । जे पावोनि अति उघड । ते गुह्य माझे गोड । वाक्य ऐक ॥१३५२॥

प्रेमाने ध्यास घेऊनि यजी मज नमी मज
प्रिय तू मिळसी माते प्रतिज्ञा जाण सत्य ही ॥६५॥

तर बाह्य आणि अंतरीं । आपुल्या सर्व व्यवहारीं । मज व्यापकाते करी । विषय वीरा ॥१३५३॥

अवघ्याचि अंगें जैसे । वायु आकाशा मिळोनि असे । तू सर्व कर्मी तैसे । मजसीचि मिळावे ॥१३५४॥

किंबहुना आपुले मन । करी मज एका स्थान । माझेचि श्रवणें कान । भरूनी ठेवी ॥१३५५॥

अगा, चोख आत्मज्ञाना गोडीने । संत जे माझी रुपडी तेणें । तेथ दृष्टी पडो आवडीने । कामिनीवरि जैसी ॥१३५६॥

मी सर्व वसतीस ठाव । जे जे पावन ते मम नाव । ते जीवा घ्यावया लाव । वाचेचिये वाटेने ॥१३५७॥

हाताचे करणे । की पायांचे चालणे । व्हावे मजकारणें । ऐसे करी ॥१३५८॥

आपुला वा परका एका । उपकारिसि पांडवा देख । त्या यज्ञें होई याज्ञिक । बरवा माझा ॥१३५९॥

हे एकेक काय शिकवावे ? । सेवकत्व अंगीं बाणवावे । अन्य सर्वही सर्वभावें । मम सेवाचि जाण ॥१३६०॥

तेथ भूतद्वेष जाय । सर्वत्र मीचि एक होय । ऐसा लाभे आश्रय । तुजसी माझा ॥१३६१॥

मग भरल्या जगीं पाही । तिसर्‍याची गोष्टचि नाही । एकांत ठायी ठायी । तुम्हाआम्हा ॥१३६२॥

तेव्हा कोणत्याही अवस्थेसी । मी तुजसी तू मजसी । पार्था, ऐसे भोगिसी । की आयते वाढेल सुख ॥१३६३॥

मग तिजे आड येता । निमेल तेथ पार्था, । तेव्हा तू मीचि हे जाणता । पावसी मज अन्तीं ॥१३६४॥

सूर्याची प्रभा जळीं दिसे । जळ आटता मूळ बिंबीं वसे । यात अडथळा काही असे । काय तेथ ? ॥१३६५॥

अगा पवन अंबरा । की कल्लोळ सागरा । मिळता अडसर वीरा, । कोणाचा गा ? ॥१३६६॥

म्हणोनि तू आणि आम्ही । दिसताहे देहधर्मीं । मग याचे विरामीं । मीचि होसी ॥१३६७॥

या माझ्या बोलांवरि देखा । हो ना ऐसी न धरा शंका । येथ अन्य असे जर का । तुझीच आण ॥१३६८॥

अगा तुझी आण वाहणे । ते माझीचि शपथ घेणे । प्रीतीची जाति लाजणे । आठवू न देई ॥१३६९॥

एरवी मी तर भेदशून्य । जेणे विश्वाभास साच होय । आज्ञेसी पराक्रमाचे साह्य । काळाते जिंके ॥१३७०॥

तो मी  देव सत्यसंकल्प । जगाचा कल्याणकारी बाप । मग शपथेचा विक्षेप । का आणावा ? ॥१३७१॥

अर्जुना तुझे वेधें । म्या सोडूनि देवपणाची बिरुदे । भक्तपण घेतले अर्धे । तू गा मद्रूप सगळा ॥१३७२॥

आपुल्याचि कामास्तव पाही । राजा आपुली शपथ वाही । तैसेचि की हेही । धनंजया ॥१३७३॥

तेथ पार्थ म्हणे देवें । अचाट हे न बोलावे । जी, आमुचे काम नावें । तुझेचि एके ॥१३७४॥

यावरी सांगो बैससी । सांगता शपथही घेशी । या तुझिये विनोदासी । पार असे का जी ? ॥१३७५॥

करण्या कमळवनाचा विकास । पुरे रवीचा एक अंश । परि कमळाचे करुनि मिष । अवघ्या जगा प्रकाशी ॥१३७६॥

पृथ्वीसि निववुनि सागर भरती । एवढे धुवाधार मेघ वर्षती । तेथ निमित्त होती । चातकचि की ॥१३७७॥

अगा औदार्या तुझिये । मी निमित्त का न व्हावे ? । जगा प्राप्ती ज्ञानदानी आहे । राया कृपानिधे या ॥१३७८॥

तेव्हा देव म्हणे राहो हे । या बोलाचा हा प्रसंग नोहे । मज पावसी या उपायें । साचचि गा ॥१३७९॥

सैंधव सिंधूत पडे । तर तत्क्षणींचि विरणे घडे । सैंधवरूपें खडे । उरतील काय करणे ? ॥१३८०॥

तैसे सर्वर मज भजता । तत्त्वता सर्व मी होता । निःशेष जाऊनि अहंता । मीचि होसी ॥१३८१॥

कर्मापासोनी प्राप्तीपावत । दाविले तुज निश्चित । उपाय सुस्पष्ट येथ । अगा, ऐसे ॥१३८२॥

पहा आधी तर पांडुसुता । सर्व कर्मे मज अर्पिता । सर्वत प्रसन्नता । लाभे माझी ॥१३८३॥

मग माझ्या त्या प्रसादीं । ज्ञान सिद्धिसि जाय मजसंबधीं । तेणे मिसळशील स्वरूपीं, हे सुबुद्धी.  । त्रिवार माझिया ॥१३८४॥

मग पार्था, त्या ठायी । साधन नाहीसे होई । किंबहुना तुज काही । उरेचिना ॥१३८५॥

तर सर्व कर्मे आपुली । तुवा सर्वदा मज अर्पिली । तेणे तुज प्रसन्नता लाधली । आज ही माझी ॥१३८६॥

हे प्रसादबळ म्हणोनि । युद्धाचा अडसर न मानी । इतका मी तुजवरि गेलो भाळुनी । एक वेळ ॥१३८७॥

जेणे प्रपंचासह अज्ञान जाय । एक मी गोचर होय । ते युक्तीचे उपाय । म्हणजे गीतारूप हे ॥१३८८॥

मी ज्ञान तुज आपुले । नानापरींनी उपदेशिले । तेणे अज्ञानजात त्यजी सगळे । जे प्रसवी धर्म-अधर्म ॥१३८९॥

सगळे धर्म सोडूनि एका शरण ये मज
जाळीन सर्व मी पापे तुझी शोक करू नको ॥६६॥

आशा जैसी दुःखा या । व्याली निंदा पातका पहा । हे असो, जैसे दैन्या । प्रसवे दुर्भाग्य; ॥१३९०॥

तैसे स्वर्ग-नरक-सूचक । अज्ञान व्याले धर्म-अधर्मादिक । ते अशेष झाडूनि टाक । ज्ञानें या ॥१३९१॥

हाती घेऊनि दोर । त्यागावा जैसा सर्पाकार । वा निद्रात्यागें घराचार । स्वप्नींचा जैसा; ॥१३९२॥

वा कावीळ जाता नाशे । चंद्राचे पिवळेपण जे भासे । वा मुखाचे कडूपण जैसे । व्याधित्यागें; ॥१३९३॥

अगा दिवस मावळता । मृगजळहि जाय पार्था, । वा काष्ठत्यागें वन्हि पुरता । त्यजिला जाय; ॥१३९४॥

तैसे मिथ्या धर्म-अधर्माचे खूळ । दावी जे का अज्ञान मूळ । ते त्यजुनि त्यजीचि सकळ । धर्मजात ॥१३९५॥

मग नाहीसे होता अज्ञान । आपोआप मीचि उरेन । निद्रेसह जाता स्वप्न । आपणचि जैसे; ॥१३९६॥

तैसे मज एकाहुनि काही । भिन्न-अभिन्न अन्य नाही । सोऽहंबोधें त्या मजठायी । अनन्य होई ॥१३९७॥

न मानिता भिन्नत्व स्वये । सर्वत्र मीचि एक आहे । त्याचेचि नाव पाहे । मज शरण येणे गा ॥१३९८॥

म्हणोनि घटाचे नाशें । गगनीं गगन प्रवेशे । मज शरण येणे तैसे । ऐक्य करी ॥१३९९॥

सुवर्णमणी सोन्यासी । कल्लोळ जैसा पाण्यासी । तैसा तू मजसी । शरण ये गा ॥१४००॥

अगा सागराचे पोटी । वडवानल शरण आला किरीटी, । परि तो जाळू न शके ऐशा गोष्टी । सोडूनि दे गा ॥१४०१॥

मजही शरण यावे । आणि जीवपणेंचि असावे । या बुद्धीचे बोलासि धिक्कारावे । धिक् न लाजे कैसी ती ? ॥१४०२॥

अगा सामान्यहि राजाचिया । अंगीं पडे जी धनंजया । ती दासीही की तया- । समान होय ॥१४०३॥

मग मी विश्वेश्वर भेटता । न सुटे जीवदशेचे बंधन, पार्था, । हे बोल अनिष्ट म्हणुनि आता । कानीं  न घे बा ॥१४०४॥

म्हणोनि मी होउनी मजसी । आयते जे पावसी । तेवी जे ये हातासी । ज्ञानें या ॥१४०५॥

ताकातुनि लोणी काढिले । मग पुन्हा ताकात घातले । ते सामावुनि न घेतले । काही केल्या ताकें ॥१४०६॥

टांगले तरी लोह गंजे । परि परिसासंगे ठेविता जे । सोनेचि होऊनि विराजे । मग न शिवे मळ ॥१४०७॥

हे असो, काष्ठापासुनी । काढिला वन्हि मंथुनी । मग काष्ठींही कोंडुनी । न राहे जैसा ॥१४०८॥

तैसे अद्वयत्वें मज । शरण येता तुज । धर्म-अधर्म निज । न होती बाधक ॥१४०९॥

अर्जुना काय दिनकर । देखतसे अंधार ? । की जागृतावस्थेत होय गोचर । स्वप्नभ्रम ? ॥१४१०॥

तैसे मजसी एकवटता । मज सर्वरूपावाचुनी पार्था, । अन्य काही उरावया आता । कारण काय ? ॥१४११॥

म्हणोनि धर्म-अधर्माचे काही । न चिंती आपुले ठायी । तुझे पाप-पुण्यही । मीचि होईन ॥१४१२॥

जळीं पडल्या लवणा । सर्वही जळचि विचक्षणा । तुज मी अनन्यशरणा । होईन तैसा ॥१४१३॥

मजपासूनि भिन्नत्वें । जे पाप द्वैतभावें । माझे बोधीं सहजसे हे । नाहीसे होईल ॥१४१४॥

इतुक्याने सहजतया । सुटलाचि आहेसी धनंजया, । घेई मज जाणोनिया । सोडवीन तुज ॥१४१५॥

याकारणे पुढती । ही चिंता न वाहे चित्तीं । मज एका जाणोनि, सुमती, । ये शरण ॥१४१६॥

सर्व रूपांयोगें जो स्वरूपवान । सर्व दृष्टींयोगे जयाचे डोळसपण । सर्व देशीं जयाचे वसतिस्थान । ते बोलिले श्रीकृष्ण ॥१४१७॥

मग सावळा सकंकण । बाहु पसरोनि दक्षिण । आलिंगिला स्वशरण । भक्तराज तो ॥१४१८॥

व्यक्त न करिता ते । काखेत घालोनि बुद्धीते । बोलणेही मागुते । ओसरले ॥१४१९॥

ऐसे जे काही असते । बोला बुद्धीसीहि अटकाव जेथे । यावयासी निमित्त ते । आलिंगनाचे केले ॥१४२०॥

हृदयासी हृदय एक झाले । या हृदयींचे त्या हृदयीं घातले । द्वैत न मोडिता केले । आपणाऐसे अर्जुनासी ॥१४२१॥

दीपें दीप लावावा । तैसा संबंध तो जाणावा । द्वैत न मोडिता आघवा । आपणचि पार्थ ॥१४२२॥

सुखाचा मग तया । पूर आला जो धनंजया । तेथ बलशाली तरि बुडोनिया । राहिला देव ॥१४२३॥

सिंधू सिंधूते पावे । तेव्हा पाणी दुणावे । वरि पुरवणीसी धावे । आकाशही ॥१४२४॥

तैसे तयां दोघांचे मिळणे । दोघां नावरे, जाणावे कवणें । किंबहुना नारायणें । विश्व कोंदले ॥१४२५॥

ऐसे वेदांचे मूळ सूत्र । सर्वाधिकारपवित्र । श्रीकृष्णें गीताशास्त्र । प्रकट केले ॥१४२६॥

वेदांचे मूळ गीता । हा केव्हा झाला बोध पुरता ? । ऐसे म्हणाल तर आता । प्रसिद्ध उपपत्ती सांगू ॥१४२७॥

तर जयांचे श्वासोच्छ्‌वासातून । जन्मा आले वेद संपूर्ण । ते सत्यप्रतिज्ञ श्रीकृष्ण । बोलिले पैजेवरी ॥१४२८॥

म्हणोनि वेदांसी गीता मूलभूत । म्हणावे हे होय उचित । आणिकही एक येथ । उपपत्ती असे ॥१४२९॥

जे स्वरूपें न नाशणार । जेथ लपे जयाचा विस्तार । ते तयाचे म्हणती खरोखर । बीज जगीं ॥१४३०॥

सूक्ष्मरूपें वृक्ष बीजीं । तैसे संपूर्ण वेद येथ, जी, । अठरा अध्यायी गीतेमाजी । प्रगटले ॥१४३१॥

म्हणोनि वेदांचे बीज । श्रीगीता हे मज- । गमे, आणि सहज । दिसतही आहे ॥१४३२॥

वेदांचे तिन्ही भाग । गीतेत उमटले सांगोपांग । भूषरत्नीं सर्वांग । शोभले जैसे ॥१४३३॥

तीचि कर्मादिक तिन्ही । कांडे कोणकोणते स्थानीं । गीतेत, ते प्रत्यक्ष डोळ्यांनी । दावू ऐक ॥१४३४॥

जया पहिल्या अध्यायीं ठाव । तो शास्त्रप्रवृत्तिप्रस्ताव । दुसर्‍या अध्यायीं सांख्यसद्‌भाव । प्रकाशिला ॥१४३५॥

मोक्षदायी स्वतंत्र । ज्ञानप्रधान हे शास्त्र । इतुके हे सूत्र । दुसर्‍या अध्यायीं उभारिले ॥१४३६॥

मग अज्ञानें बांधिलेल्यांसी । मोक्षपदीं बैसावयासी । साधनारंभ तिसर्‍या अध्यायासी । सांगितला ॥१४३७॥

जे देहाभिमानें बद्ध । तयांनी त्यागुनि काम्य निषिद्ध । प्रमादरहित विहित शुद्ध । अनुष्ठावे ॥१४३८॥

ऐसे सद्‌भावें करावे । ऐसा तिसर्‍या अध्यायीं जो देवें । निर्णय केला ते जाणावे । कर्मकांड ॥१४३९॥

आणि याचि नित्यादिक कर्मांस । आचरिता निःशेष । अज्ञानाचा नाश । कैसा होय बा ? ॥१४४०॥

मोक्षाची इच्छा होई । कर्मबद्धही मुमुक्षुत्वा येई । देवें ब्रह्मार्पणत्वें कर्मेंही । तयास्तव कथिली ॥१४४१॥

देह-वाचा-मानसें । विहित निपजे जे ऐसे । ते करावे ईश्वरोद्देंशें । म्हटले देवें ॥१४४२॥

क्रमयोगें ईश्वराठायी । भजन कथने कशी करावी । हे चवथे अध्यायीं । आरंभिले; ॥१४४३॥

तों ईश्वररूपाचा अकरावा । अध्याय सरेतों आघवा । कर्में ईश भजावा । हे जे कथिले; ॥१४४४॥

आठ अध्यायीं उघड । गीता सांगे उपासनाकांड । तो सारुनि पडदा, जो आड, । बोले मीही ॥१४४५॥

आणि श्रीगुरुप्रसादें त्या । श्रीगुरुसंप्रदाय लाभावा । साच ज्ञान यावे अनुभवा । कोवळे जे ॥१४४६॥

जे अद्वेष्टा इत्यादिक । वा अमानित्व आदिक । दृढ करुनि ज्ञानकांडीं या एक । बाराव्यात दाविले ॥१४४७॥

बाराव्या अध्यायापासुनी । तों पंधराव्यापावत म्हणुनी । लाभतसे निरूपणीं । ज्ञानफळपरिपक्वता ॥१४४८॥

म्हणोनि या चारही । ऊर्ध्वमूळान्त अध्यायीं । ज्ञानकांड या ठायी । निरूपिले ॥१४४९॥

कर्म-उपासना-ज्ञान-निरूपणीं । श्रुतीचि ही गोजिरवाणी । गीताश्लोकरत्नांची लेणी । ल्याली आहे ॥१४५०॥

अगा कांडत्रयात्मक । मोक्षरूप फल जे एक । प्राप्त करणे आवश्यक । म्हणोनि गर्जे ही; ॥१४५१॥

मोक्षाचिये ज्ञानसाधनासवे । वैर धरी जे नित्य नवे । तो अध्यायीं सोळावे । अज्ञानवर्ग प्रतिपादिला ॥१४५२॥

त्याचि शास्त्रासी सखा करावे । सवे घेत वैरी जिंकावे । हा निरोप पावे । सतराव्या अध्यायीं ॥१४५३॥

ऐसा प्रथमाध्यायापासुनी । तों सताराव्यापावत भिडुनी । आत्मनिःश्वास जो वेद, विवारुनी । दाविला देवें; ॥१४५४॥

ते अर्थजात अशेष । सर्व तात्पर्यार्थ विशेष । हा अठरावा कळस । सकळ अध्यायांचा ॥१४५५॥

ऐसा सकळ ज्ञानसिंधू शुद्ध । हा भगवद्‌गीता प्रबंध । औदार्यें आगळा वेद । मूर्तिमंत ॥१४५६॥

वेद ठायी ठायी संपन्न । परि ऐसा अन्य न कृपण । कानीं लागला तीन- । वर्णांचेचि ॥१४५७॥

अन्य भावव्यथेने पीडिलेल्या । स्त्री-शूद्रादी प्राणियां । ज्ञानलाभा अनधिकारी गणूनिया । राहिला स्वस्थ ॥१४५८॥

मज दिसे ते मागील उणे । फेडावया गीतापणें । वेद प्रगटला, घडो सेविणे । कोणाही. म्हणोनिया ॥१४५९॥

अर्थें शिरोनि मनीं । श्रवणें लागोनि कानी । जपमिषें वदनीं । वसोनिया; ॥१४६०॥

गीतेचा पाठ जो जाणे । तयाचे सांगातीपणें । गीता लिहोनि वाहणे । पुस्तकरूपें; ॥१४६१॥

ऐसे निमित्त करुनि वर । संसाराच्या चव्हाटयावर । वेद घालिती अन्नछत्र । मोक्षसुखाचे ॥१४६२॥

परि आकाशीं वसण्यासी । पृथ्वीवरी बैसण्यासी । सूर्यप्रकाशा वावरण्यासी । आवार जेवी नभ; ॥१४६३॥

तेवी उत्तम की अधम ऐसे । सेविणार्‍या कोणाही न पुसे । ऐसे कैवल्यदानीं सरिसे । निववी गीता जगा ॥१४६४॥

यालागी मागिल निंदेसी भ्याला । वेद गीतेपोटी शिरला । आता कीर्ति पावला । जगीं गोमटी ॥१४६५॥

म्हणोनि वेदांचीही सुगमता । ती ही मूर्त श्रीगीता । श्रीकृष्णें पांडुसुता । उपदेशिली ॥१४६६॥

परि वासराचे प्रेमें लाधले । दुभते घरोद्देशें आले । तैसे पांडवांचे निमित्तें जाहले । जगदुद्धरण ॥१४६७॥

कणवेने चातकाचिये । मेघ पाण्यासह धावे । तेथ चराचर आघवे । निवे जैसे; ॥१४६८॥

अनन्यगति कमळास्तव । वेळोवेळा येई सूर्य । की डोळा सुखी होय । त्रिभुवनींचा ॥१४६९॥

तैसे अर्जुनाचे मिषें । गीता प्रकाशूनि हृषीकेशें । दारुण ओझे संसारा ऐसे । फेडिले जगाचे ॥१४७०॥

सर्वशास्त्ररत्नदीप्ती । उजळिता हा त्रिजगतीं । का सूर्य नव्हे लक्ष्मीपती । सुखाकाशींचा ? ॥१४७१॥

थोर पंडुकुळ ते पवित्र । तेथला पार्थ या याना पात्र । जेणें गीता जाहले स्वतंत्र । आवार जगा ॥१४७२॥

हे असो, मग तेणें । सद्‌गुरु श्रीकृष्णें । पार्थाचे ऐक्य पावणे । आणिले द्वैता ॥१४७३॥

मग म्हणतसे पांडवा, । शास्त्र हे रुचले का जिवा ? । तेथ पार्थ म्हणे, देवा । आपुली कृपा ॥१४७४॥

निधान लाभावया । भाग्य लागे गा धनंजया, । परि लाभले भोगावया । क्वचितचि मिळे ॥१४७५॥

अगा क्षीरसागर हे एवढे । विशुद्ध दुधाचे भांडे । सुरां-असुरां सायास केवढे । जाहले मंथन करिता ॥१४७६॥

ते सायासहि फळा आले । अमृतही डोळ्यांनी देखिले । परि मागाहुनि चुकले । जतन करण्या ॥१४७७॥

तेथ अमरत्वास्तव जे वाढिले । ते मरणाचिलागी जाहले । भोगणे  न जाणिता जोडिले । ते ऐसे होय ॥१४७८॥

नहुष स्वर्गाधिपती जाहला । परि वागणुकीत भांबावला । तो भुजंगत्व पावला । न जाणिसी काय ? ॥१४७९॥

म्हणोनि बहुत पुण्य केले तुवा । तेणे अगा धनंजया, । आज शास्त्रराजा या । जाहलासी विषय ॥१४८०॥

तर याचि शास्त्राचिया । पांघरोनी संप्रदाया । शास्त्रार्था या भल्या । आचरी हो ॥१४८१॥

जर संप्रदायाविण । करिसी शास्त्रार्थअनुष्ठान । तर ते होईल जाण । अमृतमंथनाऐसे ॥१४८२॥

गाय लाभे जरि गोमटी । तरि दूध ये तेव्हाचि किरीटी, । जेव्हा जाणावी हातोटी । दोहनाची ॥१४८३॥

तैसा गुरू प्रसन्न होई । शिष्या लाभे भली विद्याही । परि ती फळे संप्रदायीं । उपासिताचि ॥१४८४॥

म्हणोनि शास्त्रीं जो उचित । संप्रदाय असे येथ । तो ऐक आता बहुत । आदरें तू ॥१४८५॥

न कथी हे कधी त्यास तपोहीन अभक्त जो
श्रवणेच्छा नसे ज्यास माझा नत्सर जो करी ॥६७॥

तर हे जे आस्थेने पार्था, । गीताशास्त्र लाधले तुज हाता । ते तपोहीना सर्वथा । न सांगावे हो ॥१४८६॥

अथवा तपस्वी जरि जाहला । तरी गुरुभक्तीत जो ढिला । वेदांनी अत्यंज दूर ठेविला । तैसे तया ठेवी ॥१४८७॥

अथवा कावळा जैसा । वृद्ध तरि अपात्र यज्ञावशेषा । गीता न देई तापसा । गुरुभक्तिहीना तैसी ॥१४८८॥

वा जोडी तो तपही । भजे गुरुदेवांचे ठायी । परि ऐकावयाची नाही । चाड जर; ॥१४८९॥

तर मागिल दोन गुणी । उत्तम असे सर्व जगातुनी । परी गीताश्रवणीं । योग्य नसे ॥१४९०॥

मोती अतीव सुंदर असे । परि तया मुख नसे । तर सूत प्रवेशे । काय तेथ ? ॥१४९१॥

सागर गंभीर आहे । हे कोण म्हणे नोहे ? । परि वृष्टि वाया जाये । जाहली तेथ ॥१४९२॥

तृप्तासि दिव्यान्न वाढणे । ते जैसे वायाचि घालविणे । ते का न द्यावे उदारपणें । भुकेल्यासी ? ॥१४९३॥

योग्य असे एरवी । परि श्रवणाची चाद नाही । तर सहजी चुकूनिही । नच सांगे गीता तया ॥१४९४॥

सुजाणा डोळा जाणे रूपविषय । तरि पुढे करावा का परिमळास्तव ? । जेथ जे फळा ये सुयोग्य । तेथेचि ये गा ॥१४९५॥

म्हणोनि तपी आणि भक्त । पाहावेचि ते तेथ । परि शास्त्रश्रवणीं अनासक्त । टाळावेचि ते ॥१४९६॥

वा तापस आणि गुरुभक्त । गीताश्रवणीं आर्त । ऐसी सकळ सामुग्री तेथ । देखसी जरी; ॥१४९७॥

तरी गीताशास्त्रनिर्मिता । जो मी सकळ लोकशास्ता । तया मज सामान्यचि पार्था, । लेखती जे; ॥१४९८॥

तैसेचि मज आणि भक्तसज्जनांसी । निंदिता जे देखसी । योग्य ना तयांसी । म्हणावेस ॥१४९९॥

तयांची अन्य आघवी । सामुग्री ऐसी जाणावी । ज्योतीविण समई । रात्री जैसी ॥१५००॥

अंग गोरे आणि तरुण । वरी लेणे लेऊन । परि एक प्राण । नाही जैसा; ॥१५०१॥

सोनियाचे सुंदर । निखळ होय घर । परि सर्पांगनेने द्वार । रोधिले जैसे; ॥१५०२॥

निपजे दिव्यान्न चोख । परि त्यात असे विष । हे असो, मैत्रीत कपट देख । गर्भित जैसे; ॥१५०३॥

तैसी तप भक्ति मेधा, । तयाची जाण प्रबुद्धा, । माझिया भक्तींची निंदा । वा माझीही करी ॥१५०४॥

याकारणें धनंजया, । तो भक्त मेधावी तपिया । तरी नको बापा या । शास्त्रा शिवू देऊ ॥१५०५॥

काय बहु बोलू निंदकांविषयी ? । जरि ब्रह्मदेवाचे योग्यतेचाही । तरी गीता कवतिकेंही । न द्यावी तया ॥१५०६॥

म्हणोनि तपाचा सुभटा, । तळी दाटोनि दगडगोटा । वरी गुरूभक्तीचा मोठा । प्रासाद जो जाहला ॥१५०७॥

आणि श्रवणेच्छेची पुढती । द्वारे सद उघडी असती । कळस चोख वरती । अनिंदारत्नांचा; ॥१५०८॥

सांगेल गूज हे थोर माझ्या भक्तगणात जो
तो त्या परमभक्तीने मिळेल मज निश्चित ॥६८॥

ऐशा विशुद्ध भक्तालयीं अर्जुना । करी गीतारत्नेश्वराची प्रतिष्ठापना । मग माझिये योग्यतेसी सुजाण । पावसी गा ॥१५०९॥

अगा ॐ देखसी एकाक्षरपणीं । अ उ म मात्रांचे कुशीतुनी । ॐ कार होता जो कोंडुनी । गर्भावासी; ॥१५१०॥

तो गीतेचिये शाखापल्लवें । वेदबीज ॐ कार विस्तार पावे । वा गीतागायत्री बहरुनि ये । श्लोकफुलाफळांनी; ॥१५११॥

ही गायत्रीमंत्रयुक्त गीता । ती भेटवी माझिया भक्तां । अनन्यजीवन होय माता । बालका जैसी ॥१५१२॥

तैसे भक्तां गीतेपाशी । आदरें नेई जो भेटीसी । तो देह पडता मजसी । एकरूप होय ॥१५१३॥

कोणी अधिक त्याहूनि माझे प्रिय करीचिना
जगीं आवडता कोणी न होय मज त्याहुनी ॥६९॥

आणि देहाचे लेणे । लेवुनिहि असे वेगळेपणें । तरी जीवें प्राणें । मज तोचि प्रिय ॥१५१४॥

ज्ञानी कर्मठ तापसी । या खुणेचिया माणसी । तो एक गा देखसी । आवडता मज ॥१५१५॥

तैसा अवघ्या भूतळीं । अन्य न कोणी दिसे मुळी । जो गीता सांगे मेळीं । भक्तजनांचिया ॥१५१६॥

लाभें मज ईश्वराचिये । जो गीता सांगे विनम्रभावें । तो सभेत संतांचिये । भूषण होय ॥१५१७॥

नवपल्लवीपरि रोमांचित । मंद अनिले कंपवीत । आमोदजळें ओलवीत । फुलांचे डोळे; ॥१५१८॥

कोकिळकलरवाचे मिषें । सद्‌गदित होउनि बोलवित जैसे । गीतवसंत की प्रवेशे । मम भक्तरूप उद्यानीं; ॥१५१९॥

वा जन्माचे फळ होत चकोरा । चंद्र येई अंबरा । वा नवघन मयूरा । ओ देत ये; ॥१५२०॥

तैसा सज्जनांचे मेळावीं । गीतपद्यरत्नांचे वर्षावीं । माझिये रूपीं हेतू ठेवी । आणि वर्ते जो ॥१५२१॥

म्हणोनि जो गीता पढे । तो साच मज आवडे । तैसा नाहीचि कोणी मागे-पुढे । न्याहाळिता ॥१५२२॥

अर्जुना गा येथवरी । तया ठेवी मी जिव्हारीं । जो गीतार्थाची करी । मेजवानी संतां ॥१५२३॥

हा धर्मरूप संवाद जो अभ्यासील आमुचा
मी मानी मज तो पूजी ज्ञानयज्ञ करूनिया ॥७०॥

अगा माझे-तुझे मिळणीं । वाढली जी ही कहाणी । मोक्षधर्म की जीवनीं । आला होय येथ; ॥१५२४॥

तो हा सकळ इच्छित पुरवी । आम्हा दोघांचा संवाद पाही । न लाविता पदांचा अर्थही । पठणचि जो करी ॥१५२५॥

तेणें ज्ञानाग्नीत प्रदीप्त । मूळ अविद्येच्या आहुति देत । तोषविला जो जात । परमात्मा मी ॥१५२६॥

अनुभविता गीतार्था । पावती ज्ञानीं जे पार्था, । ते गीता गात । वर्णिताहि लाभे ॥१५२७॥

गीतपाठकासी असे । फळ अर्थज्ञाचिसरिसे । गीतामाउलीसि भेद नसे । तान्हे पारठे ऐसा ॥१५२८॥

हे ऐकेलहि जो कोणी श्रद्धेने द्वेष सोडुनी
पावेल कर्मपूतांची तोहि निर्वेध सद्‌गति ॥७१॥

आणि सर्व मार्गीं सोडूनि निंदा । शुद्ध आस्थेने प्रबुद्धा, । गीताश्रवणीं श्रद्धा । उभारी जो; ॥१५२९॥

तयाचे श्रवणसंपुटीं । गीताक्षरे येती न येती किरीटी, तोंचि बारा वाटीं । पळेचि पाप ॥१५३०॥

अरण्यामाजी जैसा । वन्हि शिरता सहजसा । लंघिती की दशदिशा ॥ वन्य प्राणी ॥१५३१॥

अथवा उदयाचलीं । प्रकाशता अंशुमाळी । तिमिर अंतराळीं । हरपे जैसा ॥१५३२॥

तैसा कानांचे महाद्वारीं । गीता गजर जेथ करी । तेथ सृष्टीचे आदिपावत खरोखरी । जायचि पाप ॥१५३३॥

ऐसी वंशवेल निर्मळ । होय पुण्यरूप सकळ । याहीवरी लाहे फळ । अचाट ऐसे ॥१५३४॥

या गीतेची अक्षरे । जितुकी शिरती कर्णद्वारें । तितुके होय जणु पुरे । अश्वमेध की ॥१५३५॥

श्रवणें पाप जाय । आणि धर्माचा उत्कर्ष होय । तेणें लाहेचि अंतीं विजय । स्वर्गराज्यसंपत्तीचा ॥१५३६॥

तो गा मजकडे येण्यालागी । पहिले येणे करी स्वर्गीं । आवडे तोवरि भोगी । मग मजचि मिळे ॥१५३७॥

धनंजया, गीता ऐसी । ऐकत्यासी आणि पढत्यासी । फलद्रूप होय, देखसी । माझिये रूपें ॥१५३८॥

याकारणें असो हे आता । ज्यासाठी आरंभिली गीता । ते तुझे काम पार्था । पाहू येथ ॥१५३९॥

तू हे एकाग्र चित्ताने अर्जुना ऐकिलेस की
अज्ञानरूप तो मोह गेला संपूर्ण की तुझा ॥७२॥

तर सांग बा पार्था, । शास्त्रसिद्धांत सर्वथा । एकाग्रचित्तें ऐकता । मनी ठसला ना ? ॥१५४०॥

आम्ही जैसे धनंजया । सोपविले तुझिया कर्णद्वयां । तयांनी तैसेचि चित्तीं तुझिया । ठेविले ना ? ॥१५४१॥

अथवा ऐसे काही जाहले । अधेमधे सांडले विखुरले गेले । उपडे जाहले लवंडले । उपेक्षेने वा ? ॥१५४२॥

जैसे आम्ही सांगितले । तैसेचि ह्रदयीं पावले । तर सांग बा झणी चांगले । पुसेन ते मी ॥१५४३॥

अगा, अज्ञानें जो उपजे । मागे तुज भुलविले मोहें जे । तो मोह येथ ठायी तुझे । गेला की आहे गा ? ॥१५४४॥

हे काय पुसावे अजुनी ? । तू आपुले अंतःकरणीं । कर्म-अकर्म ऐसे मनीं । देखत आहेसी काय ? ॥१५४५॥

पार्थ आत्मानंदरसीं । विरेल, म्हणुनि ऐशा भेददशेसी । केली पुसण्याची निमित्ते ऐसी । श्रीकृष्णांनी ॥१५४६॥

पूर्णब्रह्म जाहला पार्थ । परि पुढिल साधण्या कार्यार्थ । मर्यादा श्रीकृष्णनाथ । उल्लंघू न देती ॥१५४७॥

एरवी आपुला बोधयज्ञ । तो काय न जाणे सर्वज्ञ ? । परि कैले प्रश्न सुज्ञ । ते याचिसाठी ॥१५४८॥

ऐसे प्रश्न करोनिया । लोपलेल्या अर्जुनत्वा । पूर्णत्वासी आणोनिया । तयाचि बोलाया लावी ॥१५४९॥

मग क्षीराब्धीसी सोडूनी । तारकापुंजमंडित होउनी । पूर्णचंद्र दिसे गगनीं । तोचि, तरि वेगळा गमे; ॥१५५०॥

तैसे ब्रह्म मी हे विसरे । तेथ जगचि ब्रह्मत्वें भरे । मग हेही सोडी तर विरे । ब्रह्मपणही ॥१५५१॥

ऐसा देहाच्या स्मरण-विस्मरणें ठाके । तो देहाचे सीमेवरि दुःखें । मी अर्जुन या नावें एके । उभा राहिला ॥१५५२॥

मग कापल्या करतळीं । दडपूनि रोमावळी । ऊर्मी स्वेदजळीं । जिरवूनिया ॥१५५३॥

प्राणक्षेभें थरथरुनी । अंगा अंगचि टेकवुनी । हालचाल विसरुनी । स्तब्ध राहिला ॥१५५४॥

नेत्रयुगुलांचे कडांते । आनंदामृताचे भरते । ओसंडे ते मागुते । आवरोनि; ॥१५५५॥

विविध औत्सुक्यांची दाटी । बांध घालित होती कंठी । ती सावरोनि प्रतिष्ठी । हृदयात; ॥१५५६॥

वाचा वितळे तेणे । सावरुनि प्राणें । श्वासांचे घुटमळणे । आणुनि ठायी; ॥१५५७॥

अर्जुन म्हणाला:

मोह मेलाचि तो देवा कृपेने स्मृति लाभली
झालो निःशंक मी आता करीन म्हणसी तसे ॥७३॥

मग अर्जुन म्हणे काय देव । पुसताति आवडे मोह ? । तो तर सहकुटुंब गेला जी ठाव । सोडूनि आपुला ॥१५५८॥

डोळ्यांपाशी येता दिनकर । काय दिसे अंधार ? । ऐसे पुसावे हे खरोखर । साजिरे कोणे गावीं ? ॥१५५९॥

तैसा तू श्रीकृष्णराय । आमुचिया डोळ्यां गोचर होय । हेचि एक सद्‌भाग्य । नव्हे काय पुरेसे ? ॥१५६०॥

परि मातेहुनि मायेने । सांगसी तोंड भरुनि तेणें । ते कोणत्याही उपायाने । जाणता येईना ॥१५६१॥

आता मोह आहे की नाही । हे काय पुससी काहीही ? । कृतकृत्य जाहलो पाही । तुझेपणें ॥१५६२॥

गुंतलो अर्जुन ऐशा अभिमानें । तो मुक्त, कृष्णा तुझेपणें । आता पुसणे सांगणे । दोन्ही नाही ॥१५६३॥

कृष्णा तुझे प्रसादें । लाभल्या आत्मबोधें । मूल त्या मोहाचे न दे । काहीचि उरू ॥१५६४॥

आता करावे की न करावे । हे उपजे ज्या भावें । ते तुजवाचुनि न जावे । सर्वत्रचि गा ॥१५६५॥

याविषयी माझे ठायी । संदेह नुरेचि काही । त्रिवार कर्म जेथ नाही । ते ब्रह्म मी जाहलो ॥१५६६॥

तुजयोगें मज म्यां पावोनी । माझे कर्तव्य गेलो निपटुनी । परि ते तव आज्ञेवाचूनी । अन्य नाही प्रभो ॥१५६७॥

जे दृश्य दृश्याते नाशी । जे दुजे द्वैताते ग्रासी । जे एक परि सर्व देशीं । वसे सदा; ॥१५६८॥

जयाचे सबंधें बंध फिटे । जयाचे आशेने आस तुटे । जयाचे भेटीने सर्व भेटे । आपुलेचि ठायी; ॥१५६९॥

ती तू माझी गुरुमूर्ती पावन । एकलेपणीची सांगातीण । जिचेसाठी जावा उल्लंघून । अद्वैतबोध ॥१५७०॥

आपणचि होऊनि ब्रह्म । सारावे कृत्य-अकृत्य काम । मग करावी निस्सीम । सेवा जयाची; ॥१५७१॥

गंगा सागरा सेवाया गेली । पावताचि समुद्र जाहली । तैसी भक्तां वाटणी दिधली । निजपदाची ॥१५७२॥

तो तू माझा निरुपचार । कृष्णा, सेवेसी गुरुवर । मग ब्रह्मतेचा हा उपकार । मी का मानी ? ॥१५७३॥

जे माझे-तुझे आड । होते भेदाचे कवाड । ते फेडोनि केले गोड । सेवासुख ॥१५७४॥

तर आता जैसी तव आज्ञा । सकळ देवाधिदेवांचे राज्ञा, । तैसे करीन, देई अनुज्ञा । कोणत्याही विषयीं ॥१५७५॥

या अर्जुनाचिया बोला । देव नाचे, सुखें भुलला । म्हणे विश्वफळा जाहला । फळ हा मज ॥१५७६॥

फेडूनि कलांचे न्यून पूर्णचंद्र । तो देखोनि आपुला कुमार । आपुली सीमा सागर । सोडीचि जैसा ॥१५७७॥

संवादाचे बोहल्यावरी की । लग्न लागले उभय-ऐक्यीं । ते देखोनि जाहला सुखी । तल्लीन संजय ॥१५७८॥

तैणें उचंबळलेपणें । संजय धृतराष्ट्रा म्हणे । जी, कैसे रक्षिले व्यासगुरूने । आपणा दोघां ॥१५७९॥

आज तुम्हा, अवधारा, । नाही चर्मचक्षूही संसारा । परि ज्ञानदृष्टिचे व्यवहारा । आणिले असे ॥१५८०॥

आणि चालविण्या रथ । पारखिण्या घोडे येथ । नेमिले, त्या आम्हा गोचर होत । गोष्टी या सर्व ॥१५८१॥

युद्धाचा अनर्थ घोर । कैसा ओढवला भयंकर । काय मानावी जीत-हार । कुळ तर एकचि ॥१५८२॥

केवढे हे संकट अवघड । परि व्यासांचा अनुग्रह गाढ । की ब्रह्मानंद उघड । भोगविला ॥१५८३॥

ऐसे संजय धृतराष्ट्रा बोलिला । परि न द्रवे उगा राहिला । चंद्रकिरणांनी स्पर्शिला । पाषाण जैसा ॥१५८४॥

ही देखोनि तयाची दशा । मग करीचिना भाषा । परि सुखें जाहला पिसा । बोले पुन्हा संजय ॥१५५८॥

भुलला हर्षवेगें । म्हणोनि धृतराष्ट्रा सांगे । एरवी नव्हेचि हे तयाजोगे । निश्चित जाणे ॥१५८६॥

संजय म्हणालाः

असा कृष्णार्जुनांचा हा झाला संवाद अद्‌भुत
थोरांचा ऐकिला तो मी नाचवी रोम रोम जो ॥७४॥

मग म्हणे धृतराष्ट्राते । ऐसे बंधुपुत्र तुझा तेथे । बोलिला, ते यदुराजाते । गोड जाहले ॥१५८७॥

अगा पूर्व-पश्चिम सागर । केवळ नावाचेचि अंतर । मग आघवे ते नीर । एकचि जैसे ॥१५८८॥

तैसे श्रीकृष्ण-पार्थ ऐसे । हे देहभेदेंचि दिसे । परि संवादीं नसे । काहीचि भेद ॥१५८९॥

दर्पणाहूनि चोख । दोघे होती सन्मुख । तेथ देखती एकमेव । आपण आपणा जैसे; ॥१५९०॥

तैसा देवासह पांडुसुत । आपणा पाहे देवात । पांडवासह देखे अनंत । आपणा पार्थीं ॥१५९१॥

देवभक्तास्तव देवही । विचार करुनी पाही । तेव्हा त्याचि जागीं दोघांसींही । देखे तो ॥१५९२॥

आणिक काहीचि नाही । म्हणोनि करिती काय पाही । एकपणेंचि दोघेही । नांदतात ॥१५९३॥

आता भेद जर मोडे । तर संवादसुख कैसे घडे ? । अथवा भेदही जोडे । तरि संवादसुख कोठे ? ॥१५९४॥

ऐसे बोलता दुजेपणें । द्वैत गिळिले संवादाने । ते ऐकिले बोलणे । दोघांचेही ॥१५९५॥

पुसोनिया आरसे दोन । ठेविले एकमेकांपुढे जाण । तर कोणा पाहे कोण । कैसे कल्पावे ? ॥१५९६॥

अथवा दीपासन्मुख । ठेविता दीप आणिक । कोण कोणा उपकारक । कोण जाणे ? ॥१५९७॥

अथवा सूर्यापुढे सूर्य । उदयला होय । कोणता मानावा प्रकाश्य । प्रकाशक कोण ? ॥१५९८॥

निर्धारू जाता रोकडे । निर्धारा भूल पडे । ते दोघे जाहले एवढे । संवादें सरिसे ॥१५९९॥

मिळत असता दोन उदके । लवण थोपवू ठाके । तर तयाचेहि निमिषीं एके । तेचि होय ॥१६००॥

तैसे श्रीकृष्ण-पार्थ दोघे तेथ । संवादिले ते धारिता मनात । माझीही अवस्था क्षणात । तैसीचि होय ॥१६०१॥

ऐसे थोडके तयें म्हणावे । तोंचि हिरावुनि सात्त्विक भावें । कोठे आठव नेला न ठावे । संजयपणाचा ॥१६०२॥

रोमांच उभे राहत । तों तों अंग संकोचत । सर्वांगीं स्वेदकणिका फुटत । स्तंभित होय, सुटे कंप ॥१६०३॥

अद्वयानंदस्पर्शें । दिठी रसमय जाहली असे । ते अश्रू नव्हेत, जैसे । प्रेमपाझरचि ॥१६०४॥

न जाणे काय न मावे पोटीं । काय न जाणे दाते कंठीं । उसासे-हुंदक्यांची दाटी । थोपवी बोलणे तयांचे ॥१६०५॥

किंबहुना अष्टसात्त्विक भावें । शब्द चाचरत ओठीं ये । आणि संजय होऊनि राहे । चव्हाटा संवादसुखाचा ॥१६०६॥

त्या सुखाची ऐसी जाती । ते आपणचि धरि शांती । मग पुन्हा देहस्मृती । लाभली संजया ॥१६०७॥

व्यासदेवें कृपा केली थोर योगरहस्य हे
मी योगेश्वर कृष्णाच्या मुखें प्रत्यक्ष ऐकिले ॥७५॥

स्थिरावल्य आनंदे । म्हणे, जी, जे उपनिषदे । न जाणती, ते व्यासप्रसादें । ऐकिले मी ॥१६०८॥

ऐकताचि त्या गोष्टी । मज ब्रह्मत्वाची पडली मिठी । मी-तूपणासह दिठी । विरोनि गेली ॥१६०९॥

हे आघवेचि की योग । जया स्थाना येण्या मार्ग । ते देवाचे वचन सांगोपांग । पावलो मी व्यासकृपेने ॥१६१०॥

अहो, अर्जुनाचे मिषें । आपणचि दुजे ऐसे । नटोनि आपुल्याचि उद्देशें । बोलिले जे देव; ॥१६११॥

तेथ माझे जी, श्रोत्र । जाहले अधिकारपात्र । काय वानू स्वतंत्र । सामर्थ्य गुरूचे ॥१६१२॥

हा कृष्णार्जुनसंवाद राया अद्‌भुत पावन
आठवूनि मनीं फार हर्षतो हर्षतोचि मी ॥७६॥

हे बोलता विस्मित होई । त्यातचि बुडोनि जाई । रत्नीं की रत्नकळा येई । झाकित रला तैसी ॥१६१३॥

सरोवरे हिमालयीं । स्फटिकघन होत चंद्रोदयीं । मग पुन्हा सूर्योदयीं । पाझर फुटे ॥१६१४॥

तैसी शरीराची होता स्मृती । तो संवाद संजय धरि चित्तीं । मग पुन्हा देहविस्मृती । तैसीचि होय ॥१६१५॥

स्मरूनि बहु ते रूप हरीचे अति अद्‌भुत
राया विस्मित होऊनि नाचतो नाचतोचि मी ॥७७॥

मग उठोनि म्हणे धृतराष्ट्रासी । श्रीहरीचे विश्वरूपासी । देखोनिही राहो शकसी । कैसा बा उगा ? ॥१६१६॥

न देखोनि जे दिसे । नाहीपणेंचि जे असे । विसरू म्हणे तरि स्मरतसे । ते कैसे चुकवू आत ? ॥१६१७॥

देखोनि विश्वरूपअवतार । अवकाश न म्हणाया चमत्कार । मजहीसह सर्वां हा महापूर । नेत आहे ॥१६१८॥

श्रीकृष्णार्जुनसंगमीं ऐसे । संजय सुखें नाहतसे । तिलांजली देतसे । अहंतेसी ॥१६१९॥

अनावर आनंदें । अलौकिक काही स्फुंदे । श्रीकृष्ण श्रीकृष्ण म्हणत सद्‌गदे । वेळोवेळा ॥१६२०॥

या अष्टसात्त्विकभावांची अल्पही । धृतराष्ट्रा गंधवार्ताहि नाही । म्हणोनि तयाने काही । कल्पावे तोंचि; ॥१६२१॥

जाहले जे सुख अपार । ते आपणात करुनि स्थिर । शांतविला गहिवर । संजयें तेणें ॥१६२२॥

काय होईल कोणे अवसरी । ते सांगायाचे सारुनि दुरी । धृतराष्ट्र म्हणे कैसी परी । संजया तुझी गा ? ॥१६२३॥

तुज येथ श्रीव्यासें । बैसविले कोणत्या उद्देशें । आणि अप्रासंगिक ऐसे । बोलसी काय ? ॥१६२४॥
रानींचा राजगृहा नेता जैसा । सुन्या मानी दाही दिशा । उजाडता होय निशा । निशाचरा ॥१६२५॥

जो जेथला गौरव न जाणे । तो तया विपरीतचि म्हणे । म्हणोनि अप्रस्तुत प्रसंग तेणें । म्हणावा की तो ॥१६२६॥

धृतराष्ट्र संजया म्हणत । उदयलासे जो कलह सांप्रत । तो कोणासी बा रे जैत । देईल अंतीं ? ॥१६२७॥

एरवी विशेषेकरुनि बहुतेक । आमुचे असे मानसिक । की दुर्योधनाचे अधिक । प्रताप सदा ॥१६२८॥

आणि तुलनेत तयांचे । दळही दीडपट यांचे । म्हणोनि जैत पक्षासि आमुचे । निश्चित आणीलचि ॥१६२९॥

आम्हा तर गमे ऐसे । मग तुझे ज्योतिष कैसे । न जाणे, असेल तैसे- । सांग बा संजया ॥१६३०॥

योगेश्वर जिथे कृष्ण जिथे पार्थ धनुर्धर
तिथे मी पाहतो नित्य धर्म श्री जय वैभव ॥७८॥

या बोलावरि संजय म्हणे । तुम्हा परस्परांचे मी न जाणे । परि आयुष्य तेथ जिणे । साचचि की जी; ॥१६३१॥

चंद्र तेथे चंद्रिका । शंभू तेथे अंबिका । संत तेथे विवेका । असणे की, जी; ॥१६३२॥

राजा तेथे सैनिक । सौजन्य तेथे सोयरीक । वन्हि तेथे दाहक । सामर्थ्य की; ॥१६३३॥

दया तेथे धर्म । धर्म तेथे सुखागम । सुखामाजी पुरुषोत्तम । असे जैसा; ॥१६३४॥

वसंत तेथे वने । वने तेथे सुमने । सुमनीं गुंजने । भ्रमरांची; ॥१६३५॥

गुरू तेथ ज्ञान । ज्ञानीं आत्मदर्शन । दर्शनीं समाधान । असे जैसे; ॥१६३६॥

भाग्य तेथ विलास । सुख तेथ उल्हास । हे असो, जेथ प्रकाश । सूर्य तेथे ॥१६३७॥

तैसे सकळ पुरुषार्थ । ज्या स्वामीने की सनाथ । ते श्रीकृष्णनाथ जेथ । तेथ लक्ष्मी ॥१६३८॥

आणि आपुल्या कांतासह ती । जगदंबा जयासंगती । अष्टमहासिद्धी काय न होती । दासी तया ॥१६३९॥

कृष्ण विजयस्वरूप सतत । राहिला असे ज्या पक्षात । कौरवराया, जय साक्षात । तेथेचि आहे ॥१६४०॥

विजय नावें अर्जुन विख्यात । विजयस्वरूप श्रीकृष्णनाथ । श्रियेसह विजय निश्चित । तेथेचि आहे ॥१६४१॥

ऐशा मायबापांचा असता आधार । त्या देशींचे तरुवर । कल्पवृक्षासवे खरोखर । का न जिंकती पैज ? ॥१६४२॥

तेथले पाषाणहि आघवे । चिंतामणी का न व्हावे ? । त्या भूमीसी का न यावे । चैतन्यत्व ? ॥१६४३॥

तयाचे गावीचिया । नदीसी अमृतें नाहावया । नवल काय धृतराष्ट्रराया । विचार करी ॥१६४४॥

तयाचे स्वैरही शब्द । सुखें म्हणो येती वेद । तो सदेह सच्चिदानंद । का न व्हावा ? ॥१६४५॥

स्वर्ग मोक्ष पदे दोन्ही । ही तयांआधीन आणि । ते श्रीकृष्ण-लक्ष्मी बाप-जननी । तया पार्था ॥१६४६॥

म्हणोनि ज्या पक्षा साक्षात । उभा तो लक्ष्मीचा कांत । सर्व सिद्धी स्वये तेथ । अन्य मी न जाणे ॥१६४७॥

समुद्रापासुनि मेघ होत । परि तयाहुनि भले उपयुक्त । तैसा सुभग आज पार्थ । कृष्णाठायी ॥१६४८॥

कनकत्वाची दीक्षा देण्यासी । परीसचि गुरू लोहासी । परि जगा पोषित्या व्यवहारासी । सोनेचि जाणे ॥१६४९॥

येथ गुरुत्वा होतसे उणे । ऐसे क्वचित् कोणी म्हणे । तर वन्हि आपुलाचि प्रकाश दीपपणे । प्रकाशीतसे ॥१६५०॥

देवप्रसादेंचि पार्थासि शक्ती । देवाहुनिही आगळी किती । परि पार्थाचीच स्तुती । गौरवास्पद वाटे देवा ॥१६५१॥

पुत्राने जिंकावे बापासी । ही आस जी तीर्थरूपासी । ती श्रीकृष्णाठायी ऐसी । सफल जाहली ॥१६५२॥

किंबहुना ऐसी कुरुराया, । कृष्णकृपा लाधली धनंजया । तो साक्षेपें जया । पक्षा असे ॥१६५३॥

तोचि विजया ठाव होय । यात तुज संदेह काय ? । तेथ न ये तर विजय । व्यर्थचि की ॥१६५४॥

म्हणोनि श्री-श्रीमंत । जेथ तो पंडुसुत । तेथ विजयचि समस्त । अभ्युदय तेथ ॥१६५५॥

व्यासमुनींचे साच जर । मन मानी तुमचे खरोखर । या बोलासी तर । ध्रुवचि जाणा ॥१६५६॥

श्रीकृष्ण लक्ष्मीसह जेथ । जेथ भक्तश्रेष्ठ पार्थ । सुख आणि लाभ तेथ । मंगलाचा ॥१६५७॥

या बोला अन्य असे । तर व्यासांचा शिष्य मी नसे । गर्जोनि संजये ऐसे । उभारिले बाहू ॥१६५८॥

ऐसा महाभारताचा आवाका । आणुनि श्लोका एका । संजयें कुरुनायका- । हाती दिधला ॥१६५९॥

जैसा न जाणो केवढा वन्हि । आणावा वातीचे अग्रातुनी । सूर्यास्ताची हानी । निस्तरावया ॥१६६०॥

तैसे वेद अनंत । जाहले सव्वालक्ष श्लोकीं महाभारत । भारताचे, सातशे श्लोकात । सारसर्वस्व गीता ॥१६६१॥

त्याही सातशे श्लोकांचा । तात्पर्यार्थ हा श्लोक शेवटचा । व्यासशिष्य संजयाचा । पूर्णोद्‌गार जो ॥१६६२॥

या एकाचि श्लोकावर । जो राहे विसंबून खरोखर । संपूर्ण विद्याजात जिंकुनि सत्वर । हस्तगत त्याने केले ॥१६६३॥

ऐसे हे सातशे श्लोक येथ । गीतेची पदे अंगिकारित । पदे म्हणू की परमामृत । गीताआकाशींचे ? ॥१६६४॥

वा आत्मराजाचे गीतारूप सभेत । सातशे श्लोक हे स्तंभ येथ । ते श्लोक मम प्रतिभेत । ऐसे येत ॥१६६५॥

की गीता ही सातशे मंत्रांअन्ती । साक्षात देवी भगवती । मोहमहिषासुरा देऊनि मुक्ती । आनंदली असे ॥१६६६॥

म्हणोनि मनें काया वाचा । जो सेवक होई हिचा । तया आनंदसाम्राज्याचा । चक्रवर्ती करी ॥१६६७॥

की अविद्यातिमिरा नाशित । श्लोक सूर्यासी पैजा जिंकित । ऐसे गीतेचे करुनि निमित्त । प्रकाशिले श्रीकृष्णदेवें ॥१६६८॥

की श्लोकरूप द्राक्षलतेसी । मांडव जाहली गीता ऐसी । संसारमार्गी श्रांतांसी । विसावावया ॥१६६९॥

की संतभ्रमर भाग्यवंत । करिती गुंजारव जेथ । त्या श्लोककमळीं ही बहरे तेथ । श्रीकृष्णनाम सरोवरीं ॥१६७०॥

की नव्हेत हे श्लोक । हा गीतेचा महिमाचि अलौकिक । वाखाणिते हे स्तुतिपाठक । उदंड जैसे ॥१६७१॥

बांधूनि सातशे श्लोकांचा तट । उभारिला आद्वितीय कोट । या गीतानगरीसी अवीट । शास्त्रे वसावया आली ॥१६७२॥

की आत्म्या निजकांता । प्रेमें भेटावया येता । हे श्लोक नव्हेत, गीता । पसरी बाहू ॥१६७३॥

की गीताकमळींचे भृंग । वा गीतासागरतरंग । की श्रीहरीचे तुरंग । गीतारथाचे ॥१६७४॥

की श्लोकरूप तीर्थें येथ । आली श्रीगीतागंगेत । सिंहस्थपर्वणी अर्जुन तेथ । जाहला देखा ॥१६७५॥

की नव्हेत या श्लोकपंक्ती । ब्रह्मदायी चिंतामणी चित्तीं । व्हावया निर्विकल्प ब्रह्मप्राप्ती । लाविले श्लोककल्पतरू ॥१६७६॥

ऐसे हे सातशे श्लोक । आगळे एकाहूनि एक । आता करूनि वेगळीक । कोणी वानावे ? ॥१६७७॥

दीप आगिल-मागील । सूर्य धाकला-वडील । वा अमृतसिंधू उथळ-खोल । कैसा म्हणता ये ? ॥१६७८॥

कामधेनूवरि ठेविता दृष्टी । तान्ही आणि पारठी । ऐशा भेदाच्या गोष्टी । करिता न येती ॥१६७९॥

तैसे पहिले-सरते । श्लोक न म्हणावे येथ । जुनी-नवी पारिजाते । असती काय ? ॥१६८०॥

आणि श्लोकां समान योग्यता आहे । साच हे काय समर्थावे ? । येथ वाच्य आणि वाचक हे । विभाग ना केले ॥१६८१॥

पहा शास्त्रीं या एक । श्रीकृष्णाचि वाच्यवाचक । हे सर्वश्रुत जाणती लोक । कोणीही की ॥१६८२॥

येथ जे अर्थें तेचि पाठें । दोहींचे फळ समान भेटे । वाच्यवाचक ऐक्य मोठे । साधी गीताशास्त्र ॥१६८३॥

म्हणोनि आता मज काही । समर्थावया विषय नाही । गीता जाणा वाङमयी ही । श्रीमूर्ती प्रभूची ॥१६८४॥

अन्य शास्त्र वाच्यें अर्थें फळे । मग आपण मावळे । तैसे नव्हे हे सगळे । परब्रह्मचि ॥१६८५॥

सकळ जगावरि करण्या कृपा । तेणे महानंद केला सोपा । अर्जुनाचे निमित्तें रूपा । आणिला देवें ॥१६८६॥

चकोराचे मिषें । संतप्त त्रिभुवन कैसे । निवविले चंद्रें जैसे । कलावंतें; ॥१६८७॥

अथवा गौतमाचे मिषें । कळिकाळज्वरपीडितोद्देशें । गंगेचा ओघ गिरीशें । पृथ्वीवरी आणिला ॥१६८८॥

तैसे गीतेचे हे दुभते । वस्त करुनि पार्थाते । दुभली जगापुरते । श्रीकृष्णगाय ॥१६८९॥

येथ जीवे जर नाहाल । तर साच हेचि व्हाल । अथवा पठणमिषें तिंबाल । जीभचि जरी; ॥१६९०॥

तरि लोह एके अंशें । स्पर्शिता परिसें । सकळ लोह आपोआप जैसे । सुवर्णमय होय; ॥१६९१॥

तैसी पाठाची ती वाटी । लावावी जों जों ओंठीं । तों तों ब्रह्मतेची पुष्टी । येई अंगा ॥१६९२॥

अथवा कुशीसी वळुनि थोडे । व्हाल जरी कानोडे । तरी कानींही पडे । तेचि फळ ॥१६९३॥

श्रवणें पठणें अर्थेंही गीता । मोक्षावाचुनि दुजे न दे सर्वथा । जैसा समर्थ दाता । कोणासीही ना न म्हणे ॥१६९४॥

जाणत्यासवे तेवी । गीताचि एक सेवावी । काय करावी आघवी । घेउनि शास्त्रे ? ॥१६९५॥

कृष्णार्जुने मोकळी । गोष्ट बोलिली जी निराळी । ती श्रीव्यासगुरूंनी केली । करतळीं घेता ये ऐसी ॥१६९६॥

बालकासि माय जैसे । जेव्हा जेवू घालण्या बैसे । तेव्हा तया घेता ये ऐसे । घास करी; ॥१६९७॥

किंबहुना शहाण्यांनी । विंझणासी निर्मुनी । अफाट समीरणा आणुनी । आपलेसे केले ॥१६९८॥

जे न लाभे शब्दीं । ते घडवुनि अनुष्टुब छंदीं । बुद्धीत स्त्री-शूद्र आदी - । यांचे सामाविले ॥१६९९॥

स्वाती नक्षत्रींचे वर्षावें । जर शिंपलीत मोती न व्हावे । तर कैसे ते शोभावे । सुंदरांचे कंठीं ? ॥१७००॥

नाद वाद्यातुनी न येई । तर कैसा गोचर होई ? । फुले न होता घ्यावा, पाही । आमोद कैसा ? ॥१७०१॥

पक्वान्न गोड न होय । तर का रसनेसी हो प्रिय ? । दर्पणाविना दिसे काय । नयन नयना ? ॥१७०२॥

द्रष्टा श्रीगुरू मूर्त । न रिघे दृश्यपंथात । तर कैसा उपासनेत । आकळावा तो ? ॥१७०३॥

तैसा अगण्य जो ब्रह्मठेवा । तो गीतेचे सातशे श्लोकीं या । प्रकट न होता वा । तर कोणा लाभता ? ॥१७०४॥

सिंधूचे पाणी वाहे मेघ । परि तयासीचि पाहे जग । जे अमाप अथांग । ते अप्राप्यचि असे ॥१७०५॥

आणि वाचा जे न पावे । ऐसे श्लोक न होत बरवे । तर कानें मुखें सेवावे । ऐसे का झाले असते ? ॥१७०६॥

म्हणोनि व्यासांचा हा थोर । विश्वावरि जाहला उपकार । श्रीकृष्णउक्तीसी आकार । ग्रंथाचा दिधला ॥१७०७॥

आणि तोचि मी हा आता । व्यासांची पदे पाहता पाहता । आणिला श्रवणपथा । मराठीचिया ॥१७०८॥

व्यासादिकांचे उन्मेष चोख । वावरती जेथ साशंक । तेथ मीही रंक एक । वाचाळता करी ॥१७०९॥

परि गीताशास्त्र ईश्वर भोळा । लेई व्यासोक्तीचिया कुसुममाळा । परि माझिये दुर्वादळा । ना न म्हणे की ॥१७१०॥

क्षीरसमुद्राचे तटीं । गजराज येती पाण्यासाठी । तेथ काय तो निपटी । चिलटांसी ? ॥१७११॥

पंख फुटले न फुटले । तोंचि पाखरू नभीं विहरले । आणि त्वरेने नभ आक्रमिले । तो गरूडही तेथचि उडे ॥१७१२॥

राजहंसाचे चालणे । भूतळीं या ठरले शहाणे । म्हणोनि आणिक काय कोणें । चालोचि नये ? ॥१७१३॥

आपुल्या आकाराऐसे । पुष्कळ जळ घ्यावे कलशें । तर चुळीत चूळभर ऐसे । काय न राहे ? ॥१७१४॥

मशालीचे अंगीं बहु थोरवी । म्हणुनि ती बहु तेजस्वी । तरि आपल्यापरीने वातही । प्रकाशेचि की ॥१७१५॥

समुद्राचे विस्ताराऐसे । समुद्रीं आकाश आभासे । डबक्याचे आकारमानें तैसे । डबक्याताहि बिंबेचि की ॥१७१६॥

येथ व्यासादि महामती । विवरण करिती या ग्रंथीं । म्हणोनि आम्ही राहावे स्वस्थ चित्तीं । हे न सयुक्तिक ॥१७१७॥

ज्या सागरीं जलचर । संचरती पर्वताकार । तेथ मासेहि सान इतर । पोहू शकती ॥१७१८॥

जवळीं सारथी होऊन । सूर्यासि देखे अरूण । मग भूतळींची मुंगी सान । न देखे काय ? ॥१७१९॥

यालागी मजऐशा सामान्याने । मराठीत गीता गुंफिणे । हे अनुचित ऐसे म्हणणे । निराधारचि ॥१७२०॥

आणि बाप ज्या वाटेने जाय । त्याचि पाउलीं पुत्राची धाव । तर न पावे काय । तोही तेथे ? ॥१७२१॥

तैसा व्यासांचा मागोवा घेत । भाष्यकारांते वाट पुसत । अयोग्य तरि, मी न पावत- । काय तेथ ? ॥१७२२॥

आणि जयाची लाभोनि क्षमा । पृथ्वी न उबगे स्थावर- जंगमा । जयाचे अमृतें चंद्रमा । निववी जग ॥१७२३॥

जयाअंगींचे अंशभर । तेज लाधोनि भास्कर । संकटाऐसा अंधार । दूर लोटी ॥१७२४॥

समुद्र जयाचे तोय । तोया जयाचे माधुर्य । माधुर्या सौंदर्य । जयाचे होय ॥१७२५॥

पवना जयाचे बल । आकाश जेणे विशाल । ज्ञान जेणे उज्वल । चक्रवर्ती ॥१७२६॥

वेद जेणे सुभाष । जयामुळे पावे उत्कर्ष । हे असो, रूप जगास । जयायोगें ॥१७२७॥

जो सकळां उपकारक समर्थ । श्रीसद्‌गुरू निवृत्तिनाथ । वर्तत मजहीआत । शिरोनिया ॥१७२८॥

आता गीता आयती जगीं । मी सांगे मराठीचे अंगीं । तर काय विस्मयालागी । ठाव आहे ? ॥१७२९॥

श्रीगुरूंचे पुतळ्यास्तव होती । डोंगरीं जयापाशी माती । त्या एकलव्यें त्रिजगतीं । कीर्ति मिळविली ॥१७३०॥

चंदनें अन्य झाडे वेढिली । ती चंदनगंधित जाहली । वसिष्ठें काठी उभारिली । ती सूर्याऐसी प्रकाशिली ॥१७३१॥

मग मी तर चित्तसंपन्न । आणि सद्‌गुरू ऐसा सामर्थ्यवान । कृपादृष्टिने घेई बैसवून । आपुले पदीं ॥१७३२॥

आधीचि देखणी दिठी । वरि सूर्य तेज पुरवी सर्वांसाठी । मग न दिसती ऐशा गोष्टी । आहेत कोठे ? ॥१७३३॥

म्हणोनि माझे नित्य नवे । श्वसोच्छ्‌वासहि व्हावी काव्ये । गुरुकृपने काय न लाधावे ? । ज्ञानदेव म्हणे ॥१७३४॥

याकारणें म्यां येथ । केला मराठीत गीतार्थ । लोकांचे दृष्टिपथीं सतत । यावा म्हणुनी ॥१७३५॥

मराठी शब्दरंगें रंगावे । कवळिता गीता ही जीवेंभावें । परि उदास न व्हावे । गायकाचे उणीवेने ॥१७३६॥

म्हणोनि गीता गाऊ म्हणे । तर गाण्यासि होय लेणे । मोकळे वाचताहि उणे । नच आणी ॥१७३७॥

सुंदर अंगीं लेणे न ल्यावे । तरि ते मोकळेही शोभावे । लेईले तर, आहे- । त्याहुनि उचित काय ? ॥१७३८॥

जैसे जातिवंत मोती । सोन्यासीही शोभा देती । नातरी शोभुनि दिसती । आपुल्या स्वरूपें ॥१७३९॥

अथवा गुंफिली की मोकळी । उणी न परिमळीं । वसंतागमींची वाटोळी । मोगरी जैसी ॥१७४०॥

तैसा गीतेसह मिरवी । गोतेविणहि रंग दावी । तो हा ओवीग्रंथ लाभदायी । केला म्यां ॥१७४१॥

जेणे आबालवृद्धां होईल सुबोध । ऐसा काव्याचा ओवीछंद । मेळवुनी ब्रह्मरससुस्वाद । अक्षरे गुंफिली ॥१७४२॥

पाह, चंदनतरुवरी । फुले येइतोवरी । परिमळास्तव ज्यापरी । थांबावे न लागे; ॥१७४३॥

तैसा ग्रंथ हा श्रवणीं । पडताचि समाधि आणी । ऐकताचि व्याख्यानीं । काय नादीं न लावी ? ॥१७४४॥

सहजी पठण होई । पांडित्य प्रकाशात येई । नच आठवे अमृतही । गोडी लागता ॥१७४५॥

तैसे आयतेचि लाधले । कवित्व हे विसावा जाहले । मनन-निदिध्यासा जिंकिले । श्रवणें आता ॥१७४६॥

आनंदभोगाचा शेलका भाग । कोणासीही देईल यथासांग । श्रवणाकरवी सर्वेंद्रियां मग । तोषवील ॥१७४७॥

चंद्रासी समर्थपणे । भोगुनी चकोर शहाणे । परि लुटावे जैसे चांदणे । कोणीही की; ॥१७४८॥

तैसे या अध्यात्मशास्त्रीं । अंतर्मुखता पावती अधिकारी । लोक वाक्‌चातुर्येंही परी । होतील सुखी ॥१७४९॥

ऐसे श्रीनिवृत्तिनाथांचे खरोखर- । गौरव जी, पुरेपूर । ग्रंथ नव्हे हे तयांचे मजवर । कृपावैभव ॥१७५०॥

क्षीरसिंधूचे परिसरीं । न जाणे केव्हा श्रीत्रिपुरारी । पार्वतीचे कर्णकुहरीं । बोलिले जे ॥१७५१॥

ते क्षीरकल्लोळीं तरी । गुप्त जो मगरीचे उदरीं । त्या श्रीविष्णूचे करीं । प्रविष्ट जाहले ॥१७५२॥

तो मत्स्येंद्र सप्तशृंगीगडावरि जाय । भेटे श्रीचौरंगीनाथ भग्नावयव । त्या भेटीने सर्वांगीं पूर्ण होय । चौरंगीनाथ ॥१७५३॥

मग समाधि अव्यत्यय ऐसी । भोगावी ही वासना जयासी । ती मुद्रा गोरक्षनाथांसी । दिधली मत्स्येंद्रनाथें ॥१७५४॥

जे योगरूप कमळांस्तव सरोवर । जे विषयविध्वंसक वीर । समाधिपदीं अभिषेक तयांवर । सर्वेश्वर गोरक्षनाथें केला ॥१७५५॥

मग गोरक्षनाथें ते सर्व । शैव अद्वयानंदवैभव । उपदेशिले सप्रभाव । श्रीगहिनीनाथांसी ॥१७५६॥

कळिकाळ छळी भूतजाता । हे गहिनीनाथें निश्चित देखता । आज्ञा श्रीनिवृत्तिनाथा । दिधली ऐसी; ॥१७५७॥

श्रीगुरुशंकरापासुनि आली । शिष्यपरंपरा जी जाहली । बोधाची ठेव लाभली । त्यातुनि आम्हा; ॥१७५८॥

तो तू घेउनि संभार आघवा । कळिकाळ गिळू पाहे जीवां । घेई धाव तयां सोडवाया । येई वेगें ॥१७५९॥

आधीचि तर निवृत्तिनाथ कृपाळ । वरि वर्षे गुरुआज्ञेचा बोल । जैसा पातला वर्षाकाळ । खवळले मेघ ॥१७६०॥

मग आर्ताची देखोनि आस । गीतार्थग्रंथाचे करुनि मिष । वर्षिला शांतरस । तो हा ग्रंथ गीता ॥१७६१॥

मी चातक त्या समया । ठाकलो आर्ततेने आपुल्या । तेणेंचि एवढया या । पावलो यशा ॥१७६२॥

ऐसे गुरुपरंपरेने लाधले । समाधिधन जे आपुले । ग्रंथें जणु बांधोनि दिधले । स्वामींनी मज ॥१७६३॥

एरवी पढे न वाची । ना सेवाहि जाणे स्वामींची । ऐशा मज ग्रंथ लिहिण्याची । योग्यता काय ? ॥१७६४॥

परि साचचि मज गुरुनाथांनी । निमित्तासी पात्र करूनी । या ग्रंथायोगें सर्वचि जगा म्हणुनी । रक्षिले जाणा ॥१७६५॥

तरि पुरोहितगुणें । म्यां बोलिले अधिकउणे । ते माऊलीपणे । साहावे जी तुम्ही ॥१७६६॥

तर शब्द कैसा घडे । प्रमेयीं व्याख्यान कैसे चढे । अलंकार म्हणजे काय, केवढे । मी नच जाणे ॥१७६७॥

कळसूत्री बाहुले । चालवित्या सूत्रानेचि चाले । तैसे मज दावित बोले । स्वामी तो माझा ॥१७६८॥

यालागी ग्रंथीं जरि गुण-दोष । क्षमा न मागे विशेष । आचार्यें निर्मिलेचि अशेष । ग्रंथीं म्यां रचिले ॥१७६९॥

आणि तुम्हा संतांचिये सभेमाजी । जे उणीवेसह ठाकलो, जी, । ते पूर्ण न हो तर तुम्हावरिचि माझी । भिस्त सकळ ॥१७७०॥

स्पर्शिताहि परिसाने । हीनदशेसि लोहाने । न त्यजावे, तर तेणें । बोल कोणा लावावा ? ॥१७७१॥

ओहळें हेचि करावे । गंगेचे प्रवाहीं मिळावे । मगही गंगाचि न व्हावे । तर तो काय करी ? ॥१७७२॥

बहु भाग्ययोगें म्हणोनि । पातलो तुम्हा संतांचे चरणी । आता उणेपणाची कहाणी । असे कोठे जगी ? ॥१७७३॥

अहो जी, माझे स्वामी, । मज संत जोडुनि तुम्ही । दिधलेत, तेणे सर्व कामीं । परिपूर्ण जाहलो ॥१७७४॥

पहा बा मज तुम्हासारिखे । माहेर असे, तेणे सुखें । ग्रंथाचा हा हट्ट कवतिकें । सिद्धीसी नेला ॥१७७५॥

जी, कनकाचे निखळ । ओतिता येईल भूमंडळ । चिंतामणीरत्नांचे पर्वत । निर्मिता येतील; ॥१७७६॥

अहो, सातांही सागरांते । सोपे भरणे अमृतें । अवघड नव्हे तार्‍यांते । चंद्र करणे; ॥१७७७॥

उद्यान कल्पतरूंचे । लाविणे न कठीण साचे । परि वर्म गीतार्थाचे । उकलिता न ये ॥१७७८॥

तो मी एक मुका । बोलोनि मराठी भाषा देखा । दृष्टीने घेता ये लोकां । ऐसे केले ग्रंथरूपें ॥१७७९॥

हा एवढा ग्रंथसागर । उतरोनि पैलतीरावर । कीर्तिविजयाचा झेंडा थोर । नाचे जो का; ॥१७८०॥

रचोनि गीतार्थाचे आवारीं । अठराव्याचा कळसमहामेरू वरी । मध्ये स्थापनि श्रीगुरुमूर्ती गाभारीं । जी पूजीतसे; ॥१७८१॥

गीता निष्कपट आई । तान्हे मी चुकुनि हिंडत राही । या मायलेकरांची भेट होई । ही पुण्याई तुमची ॥१७८२॥

तुम्ही सज्जनांनी करविले । हे आकळुनी जी, बोले । ज्ञानदेव म्हणे जे जाहले । ते थोडके नव्हे ॥१७८३॥

काय बहु सांगू सकळां । पावलो संपूर्ण जन्मफळा । ग्रंथसिद्धीचा सोहळा । दाविला जो हा ॥१७८४॥

धरिला तुमचा भरवसा । म्यां ज्या ज्या धरोनि आशा । त्या पुरवोनि जी, बहुतशा । सुखी केले मज ॥१७८५॥

मजसाठी ग्रंथाची स्वामी । दुजी सृष्टी जी केली तुम्ही । ती पाहोनि हसू आम्ही । विश्वामित्रासीही ॥१७८६॥

त्रिशंकूस्तव विश्वामित्राने । आणावया ब्रह्मदेवा उणे । नाशवंत सृष्टी केली ईर्ष्येने । तैसे हे नसे ॥१७८७॥

शंभूने उपमन्य़ूचे मोहें । सागरही केला आहे । येथ तोही उपमेयोग्य नव्हे । पोटीं विष तयाच्या ॥१७८८॥

अंधकाररूप निशाचर । गिळू पाहे चराचर । तेथ धावोनि ये भास्कर । परि ताप देई ॥१७८९॥

तापल्या जगाकारणें । चंद्र वर्षे चांदणे । त्या कलंकिताऐसा म्हणे । ग्रंथ हा कैसा ? ॥१७९०॥

म्हणोनि तुम्ही संतांनी मजवर । ग्रंथरूप जो हा केला उपकार । तो पुनःपुन्हा त्रिवार । निरुपम ॥१७९१॥

किंबहुना तुम्ही करविले । धर्मकीर्तन हे सिद्धीसि गेले । आता माझे जी, उरले । पाईकपण ॥१७९२॥

आता विश्वात्मक श्रीनिवृत्तिदेवें । येणे वाग्‌यज्ञें तोषावे । तोषोनि मज द्यावे । पसायदान हे ॥१७९३॥

दुष्टांचे कुटिलपण जावे । तयांनी सत्कर्मीं रत व्हावे । प्राणिमात्रांनी परस्परांत राखावे । मैर जिवाचे ॥१७९४॥

पापाचे तिमिर नाशो । विश्व स्वधर्मसूर्यें प्रकाशो । जो जे वांछी ते लाभोनि तोषो । प्राणिजात ॥१७९५॥

वर्षत सकल मंगल । ईश्वरनिष्ठांचे वृंद विमल । भेटोत प्राणिमात्रां सकळ । भूमंडळीं निरंतर ॥१७९६॥

उद्यान कल्पतरूंचे साचे । गाव सजीव चिंतामणीरत्नांचे । बोलते अमृताचे । सागर जे ॥१७९७॥

चंद्रमे जे अलांछन । आदित्य जे तापहीन । ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होवोत ॥१७९८॥

किंबहुना सर्व सुखांनी । त्रैलोक्य परिपूर्ण होउनी । राहावे आदिपुरुषाचे भजनीं । अखंडित ॥१७९९॥

आणि विशेष या ठायी । हा ग्रंथ जयां जीवनदायी । तयांनी इहपरलोकीं विजयी । व्हावे जी ॥१८००॥

येथ म्हणे श्रीविश्वेशनिवृत्तिराव । हे होईल प्रसाददान सर्व । येणें वरें ज्ञानदेव । सुखिया झाळा ॥१८०१॥

ऐसे युगांमाजी कलियुगीं । आणि महाराष्ट्रभागीं । गोदावरीचे दक्षिणअंगीं । तीरावरी ॥१८०२॥

त्रिभुवनीं एक पवित्र ऐसे । अनादि श्रीक्षेत्र नेवासे । जेथ जगाचे जीवसूत्र वसे । श्रीमोहिनीराज-विष्णु ॥१८०३॥

येथ सकल कलांनी परिपूर्ण । पृथ्वीपती यदुवंशभूषण । न्यायें केले प्रजापालन । श्रीरामचंद्रें ॥१८०४॥

शिवपरंपरेत जन्मोनिया । श्रीनिवृत्तिराजअनुजें या । लेवविले अंगीं गीतेचिया । मराठी लेणे ॥१८०५॥

ऐसी भारताचे गावीं । भीष्मनाम प्रसिद्ध पर्वीं । श्रीकृष्णार्जुनें जी बरवी । गोष्ट केली; ॥१८०६॥

उपनिषदांचे सार । सर्व शास्त्रांचे माहेर । साक्षात्कारीं परमहंसांनी सरोवर । आश्रयिले जे; ॥१८०७॥

त्या गीतेचा कळस । अठरावा अध्याय हा लोभस । निवृत्तिनाथांचा दास । ज्ञानदेव म्हणे ॥१८०८॥

या ग्रंथाच्या पुण्यसंपत्तींनी । सर्व जीवमात्रांनी । उत्तरोत्तर सर्व सुखांनी । परिपूर्ण व्हावे ॥१८०९॥

शके बाराशे बारा या समयाला । ज्ञानेश्वरें हा टीकाग्रंथ रचिला । सच्चिदानंदबाबा लेखक जाहला । अति आदरें ॥१८१०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP