समओवी ज्ञानेश्वरी - अध्याय चौदावा

ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी या तिन्ही ग्रंथांतून काव्य आणि तत्वज्ञान संत ज्ञानेश्वर आपल्या विलक्षण भाषासौंदर्याने मराठी माणसाला विस्तारून सांगतात.


जय जय हे श्रीगुरुवर्या । सकळ देवां वंदनीया । प्रज्ञेची प्रभा उजळत्या सूर्या । सुखोदया ॥१॥

जय जय तू विश्वासि विसावा । सर्वांहृदयीं स्थापिसी सोऽहंभावा । लाटा चौदा भुवनांचिया । समुद्रीं तुझिया ॥२॥

बंधू तू आर्तांसी । कारुण्यसिंधू सकळांसी । अध्यात्मविद्यावधूसी । वल्लभ तू ॥३॥

तुज न जाणती तयां ऐसे । हे विश्व सत्य भासे । तुज जाणिती तयां दिसे । आघवेचि तू ॥४॥

दुज्याची नजरबंदी करणे । हे जैसे गारुडयाचे चकविणे । परि आपणचि आपणा लपविणे । नवल लाघव तुझे ॥५॥

तूचि तू सर्वां या । कोणा बोध कोणा माया । ऐशा स्वभावता लाघविया । नमो तुज ॥६॥

जगीं जळ जे ओले । ते तुझिये बोलें सुरस जाहले । उझेचि क्षमाशीलत्व आले । पृथ्वीसी या ॥७॥

रविचंद्रादि शिंपले । त्रिजगतीं उदयले । तुझिये दीप्तीमुळे । तेज तेजा ॥८॥

वाय़ू जो चळवळे । गुरुदेवा तो तुझेचि बळें । नभ तुजमाजी खेळे । लपाछपी ॥९॥

किंबहुना तुजयोगे डोळस । ज्ञान-अज्ञान अशेष । असो हे वानावया सायास । श्रुतीसी जाहले ॥१०॥

तुजस्वरुपीं न पावत । तोवरि वेद भले वर्णित । मग आम्ही ते एके पंक्तीत । मूग गिळोनी ॥११॥

प्रळयाब्धीचे ठायी । थेंबांचा थांगचि नाही । तर काय महानदी ही । जाणिता ये ? ॥१२॥

जेव्हा भानू उदया येतसे । तेव्हा चंद्र काजव्याऐसा भासे । तुज वर्णिता तैसे । आम्हा-वेदा एक गती ॥१३॥

आणि द्वैताचा ठाव मोडे । परावाणीसह वैखरी बुडे । तेथ कोण्या तोंडें । वानावे तुज ? ॥१४॥

यालागी श्रीगुरुनाथा । स्तुति सोडुनि निवांत आता । चरणीं ठेवावा माथा । हेचि भले ॥१५॥

तर तुज अससी तैसिया । नमो श्रीगुरुराया । मम ग्रंथोद्यम फळावया । सावकार होई ॥१६॥

आता कृपाभांडवल सोडी । भरी मम मतीची पोतडी । ज्ञानें भरल्या काव्याची गोडी । आणी मम वाणीत ॥१७॥

त्यायोगे मी सावरेन । विचारांचिया सुलक्षणी गुंफून । कर्णभूषणे लेववीन । संतसज्जनांसी ॥१८॥

शोधावया गीतार्थनिधान । समर्थ व्हावे माझे मन । म्हणोनि घाली स्नेहांजन । कृपेचे बा ॥१९॥

ही वाक्‌सृष्टी एक वेळ । मम बुद्धीचे डोले देखतील । ऐसे उदया यावे जी, निर्मळ । कारुण्यबिंबें ॥२०॥

माझी प्रज्ञावेली वेल्हाळ । काव्यें होय सुफळ । तो वसंत व्हावे स्नेहाळ । शिरोमणी आपण ॥२१॥

येता सिद्धांतांचा महापूर । यावा मतिगंगेसी भर । ऐशा दिठीने उदार । वर्षाव करी ॥२२॥

अगा सकळ विश्वचिया धामा । तुझी प्रसन्नता हाचि चंद्रमा । करो मज पूर्णिमा । स्फूर्तीची, जी ॥२३॥

आपले डोळे मज अवलोकिती । तेणे उन्मेषसागरा येईल भरती । ओसंडेल माझी स्फूर्ती । रसवृत्तीने ॥२४॥

श्रीगुरु बोलिले संतोषें । म्हटले, विनंतिमिषें । तुवा द्वैत मांडित असे । स्तवननिमित्ते ॥२५॥

‘हे असो बोलणे व्यर्थ । गोमटा करुनि तो ज्ञानार्थ । सांग आता गीताग्रंथ । उत्कंठाभंग न करी’ ॥२६॥’

हो का जी, स्वामी । तेचि पाहत होतो मी । की श्रीमुखें म्हणावे तुम्ही । ग्रंथ सांग ॥२७॥

सहज उगवले दुर्वांकुर । स्वभावता तो अमर । वरी आला पूर । अमृताचा ॥२८॥

तर आता या कृपाप्रसादें । सुस्पष्ट क्ररुनि बहु आनंदें । मूळ गीताशास्त्रपदे । वाखाणीन ॥२९॥

जिवाचे अंतर्यामातील । संदेहाची होडी बुडेल । आणि श्रवणींही वाढेल । आस बहु ॥३०॥

तैसी अवतरो माधुरी । माझिये बोलीत खरी । भिक्षा मागुनि घरी । गुरुकृपेचिया ॥३१॥

मागे तेरावे अध्यायासी । श्रीकृष्णांनी अर्जुनासी गोष्ट काही ऐसी । सांगितली; ॥३२॥

की क्षेत्र-क्षेत्रज्ञयोगें । हे जग जन्मे जगे । आणि गुणसंगे । संसारी होई ॥३३॥

हाचि प्रकृतीचे तावडीत । सुखदुःख भोगित । एरवी असे गुणातीत । केवळ हा ॥३४॥

तर कैसा बा असंगा संग ? । काय क्षेत्र-क्षेत्रज्ञ योग ? सुखदुःखादि भोग । तो कैसे भोगी ? ॥३५॥

गुण ते कैसे किती ? । कोणे रीतीने बांधती ? । अथवा लक्षणे कोणती । गुणातीताची ? ॥३६॥

ऐशा या आघव्या । अर्था मूर्त करावया । विषय येथ चौदाव्या । अध्यायात ॥३७॥

तर आता येथ । परियेसा प्रस्तुत । विश्वेश वैकुंठनाथ । बोलिले ते ॥३८॥

ते म्हणती गा अर्जुना । अवधानाची सर्व सेना । मेळवुनी या ज्ञाना । झोंबावे हो ॥३९॥

आम्ही मागे बहुत । सांगितले तुजप्रत । तरि अजुनी प्रतीत । जाहले न दिसे ॥४०॥

श्रीभगवान् म्हणाले:

सर्व ज्ञानांमधे थोर ज्ञान ते सांगतो पुन्हा
जे जाणूनि इथे मोक्ष पावले सगळे मुनी ॥१॥

म्हणोनि गा पुढती । सांगेन तुजप्रती । पर या नावें श्रुती । वर्णिती जया ॥४१॥

एरवी ज्ञान हे रूप आपुले । परि परके ऐसे जाहले । कारण आवडोनि घेतले । भवस्वर्गादिक ॥४२॥

अगा याचिकारणे । हे उत्तम सर्वांत मी म्हणे । हे वन्ही ती तृणे । इतर ज्ञाने ॥४३॥

भव-स्वर्गाते जाणत । यज्ञयागचि भले म्हणत । सत्य म्हणती द्वैत । भेदभावें ॥४४॥

ती आघवीचि ज्ञाने । केली याने स्वप्ने ॥ जैशा वातोर्मी गगनें । गिळिल्या जाती ॥४५॥

उदयता रविराज । लोपे चंदादींचे तेज । अथवा प्रळयजळाचा माज । लोपवी नदी-नदा ॥४६॥

तैसे हे ज्ञान येता उदया । अन्य ज्ञाने जात लया । म्हणोनिया धनंजया । उत्तम हे ॥४७॥

अनादि जी मुक्तता । आपुली असे पंडुसुता । तो मोक्ष हाता येता । होय जैसे ॥४८॥

जयाची होता प्रतीती । समस्त विचारवीर, सुभद्रापती । संसारासी न देती । माथा उचलू ॥४९॥

मनें मनाचा निग्रह करिती । सहजी लाभे विश्रांती । देहीं असून न होती । देहाधीन ॥५०॥

स्थूळ-सूक्ष्म देहाचे दुबेळके । ओलांडुनी वेळे एके । अगा ते जाहले देखे । माझेचि तोलाचे ॥५१॥

ह्या जानाच्या बळाने ते झाले माझ्याचिसारखे
जगे येवोत जावोत ते अभंग जसे तसे ॥२॥

नित्यतेने माझिया । नित्य ते धनंजया । माझिये पूर्णतेने पूर्णतया । परिपूर्ण ॥५२॥

मी जैसा आनंद अपार । तैसाचि सत्याचा सागर । तैसेचि ते खरोखर । भेद उरेचिना ॥५३॥

कारण मी जेवढा जैसा असे । ज्ञानयोगे तेही जाहले तैसे । घट भंगता घटाकाशें । महाकाश व्हावे जैसे ॥५४॥

वा दीपजोत मूळ एक । तिजमाजी ज्योती अनेक । येउनि मिळता देख । होय जैसे ॥५५॥

अर्जुना गा त्यापरी । सरली द्वैताची वारी । नांदत आहो एके हारी । मी-तूविण ॥५६॥

याचि बा कारणे । जे पहिले सृष्टीचे उपजणे । तेव्हाही तया जन्मणे । न पडेचि ॥५७॥

सर्वारंभी सृष्टीचिया । देहबंध नाही जया । ते कैसे प्रळयींही धनंजया । नाशतील ? ॥५८॥

म्हणोनि जन्मक्षयातीत । ते मी जाहले येथ । अनुसरोनि सतत । ज्ञानासी गा ॥५९॥

ऐसी ज्ञानाची थोरवी मनोभावें । वानिली आवडीने देवें । तैसेचि पार्थाही आपणासवे । लावावया गोडी ॥६०॥

तेव्हा तया वेगळेचि जाहले । सर्वांगी कान निघाले । मूर्तिमंत अवधान जाहले । शरीर तयाचे ॥६१॥

बोल देवाचे पान्ह्याऐसे । प्रेमभरें हा आकळीतसे । म्हणोनि निरूपण आकाशें । कवळिले न जाई ॥६२॥

मग म्हणे गा प्रजाकांता । उजवली आमुची वक्तृत्वता । बोलाचे तोडीचा तू श्रोता । लाभलासी ॥६३॥

तर मज एकासी । गोविती अनेक पाशीं । त्रिगुणरूप पारधी देखसी । कोण्यापरी; ॥६४॥

कैसा मी क्षेत्रयोगे । प्रसवी ही जगे । ते ऐक सांगे । कोणेपरी ॥६५॥

अगा क्षेत्र या नावे । हे यालागी जाणावे । की येथ भूतमात्रांनी पिकावे । मत्संगबीजे ॥६६॥

माझे प्रकृति हे क्षेत्र तिथे मी बीज पेरितो
त्यातूनि सर्व भूतांची उत्पत्ति मग होतसे ॥३॥

एरवी तरी महद्‌ब्रह्म । हे यालागी ऐसे नाम । महत्‌तत्त्वादिका विश्रामधाम । असे हे गा ॥६७॥

बहुत वाढ विकारी । हे क्षेत्रचि करी । म्हणोनि अवधारी । महद‌ब्रह्म हे ॥६८॥

अव्यक्तवादींचे मते हे सुमती । अव्यक्त ऐसे म्हणती । सांख्य म्हणती प्रकृति । ती हीचि गा ॥६९॥

वेदांती हिजसी माया । ऐसे म्हणती प्राज्ञराया । असो किती बोलावे वाया । अज्ञान हे ॥७०॥

आपुले आपणा । विस्मरण जे अर्जुना । तेचि या अज्ञाना । रूप असे ॥७१॥

आणिकही एक असे । हे विचारवेळे न दिसे । दिव्याने पाहता जैसे । अंधार भेटे काय ? ॥७२॥

हालविता जाय । निश्चल असता होय । दुधी जैसी साय । दुधाची ती ॥७३॥

स्वप्न ना जागृती । अथवा ना समाधिस्थिती । ती गाढ सुषुप्ती । जैसी होय; ॥७४॥

वा न प्रसविता वायूते । वांझ आकाश रिते । तयाऐसे निश्चित ते । गाढ अज्ञान, गा, ॥७५॥

पैल खांब की पुरुष । ऐसा निश्चय नाही देख । परि काय न जाणे आभास । होतसे गा; ॥७६॥

तेवी ब्रह्मवस्तु जैसी असे । तैसी खचितचि न दिसे । परि काही विपरीतसे । तेही दिसेना ॥७७॥

ना रात्र ना रवितेज । तो संधिकाल जैसी सांज । तैसे विपरीत ना रूप निज । ते अज्ञान असे ॥७८॥

ऐसी दशा कोणी एक । तिज म्हणती अज्ञान देख । तिने प्रकाश क्षेत्रज्ञ नामक । गुंडाळिला असे ॥७९॥

अज्ञान वाढवावे । आत्मस्वरूप विसरावे । हे लक्षण जाणावे । क्षेत्रज्ञाचे ॥८०॥

हाचि क्षेत्र-क्षेत्रज्ञ योग । भला जाण हा लाग । चैतन्याचे हे अंग । स्वाभाविक ॥८१॥

तैसे मायेसी अनुसरे । चैतन्य आपुले रूप विसरे । परि होय कळेनासे पुरे । किति अनेक रूपे ॥८२॥

जैसा भ्रमला रंक । म्हणे मी राजा एक । अथवा पाहिला स्वर्गलोक । मूर्च्छित म्हणे ॥८३॥

जैसी स्वरूपावरुनि चळता दृष्टी । दृश्यांची होय जी दाटी । तया नाव सृष्टी । मीचि प्रसवी गा ॥८४॥

स्वप्नमोहें एकला जैसे । आपणा बहुविध पाहतसे । आत्म्यासीही होय तैसे । स्वरूपस्मरणाविण ॥८५॥

हेचि रीतीने अन्य । उलगडू पुढती प्रमेय । तर तू प्रतीती जी काय । याची घे गा ॥८६॥

माझी ही गृहिणी । अनादि तरुणी । अनिर्वचनीय गुणी । अविद्या ही ॥८७॥

हिचे नसणे हेचि स्वरूप । व्याप्ती अति अमाप । ही निद्रिता समीप । जागृता । दुरी ॥८८॥

नी निद्रा घेई । त्यावेळी जागे ही । आणि गर्भिणी होई । चैतन्यसंभोगें ॥८९॥

महद्‌ब्रह्यउदरीं । प्रकृतीचे आठ विकारीं । गर्भाची करी । वाढ बहुत ॥९०॥

उभयसंगें पाहिले । बुद्धितत्त्व प्रसवले । ते रजोगुणें भारले । मग होय मन ॥९१॥

ममता कांता मनाची । ती अहंकारतत्त्व रची । तेणें महाभूतांची । अभिव्यक्ती होय ॥९२॥

आणि विषय-इंद्रिये बिलगती ऐसी । स्वभावता त्या भूतांसी । म्हणोनि येती त्यासरशी । तीही रूपा ॥९३॥

क्षोभती विषय इंद्रिये । पाठोपाठ त्रिगुण उभे हो हे । मग जीव वासनापरत्वें । जागोजाग प्रवेशे ॥९४॥

वृक्षाचा आवाका । जीवीं बांधे बीजकणिका । भेटताक्षणी उदका । जैसी की गा ॥९५॥

तैसी माझे संगे अविद्या । अंकुर नाना जगांचे या । घेऊ लागे साकारावया । अणीदार ॥९६॥

मग त्या गर्भगोळ्यासि वीरा । कैसे रूप ये आकारा । ते ऐकावेसी शिष्यवरा । सुजनांचिया राया ॥९७॥

अगा अंडज स्वेदज । उद्‌भिज्ज जारज । उमटती सहज । अवयव हे ॥९८॥

आकाश वायुवशें । वाढता गर्भरसें । अंडज उपजतसे । अवयव तो ॥९९॥

पोटीं ठेवुनि तम-रज । वाढता आप-तेज । उसळूनि स्वेदज । निपजे गा ॥१००॥

आपपृथ्वीचे आधिक्याने । आणि निकृष्ट तमोगुणे । केवळ उमटे तेणे । उद्‌भिज्ज हा ॥१०१॥

पंचमहाभूते साहाय्यक । सज्ज मन-बुद्धि आदिक । यायोगे उपजे देख । जारज हा ॥१०२॥

ऐसे चारही हे सरळ । कर चरणतळ । आणि महाप्रकृती स्थूळ । तेचि शिर; ॥१०३॥

प्रपंच ते तुंदिल पोट । निवृत्ति ती सरळ पाठ । कंठीं देवयोनी आठ । अंगे जया; ॥१०४॥

कंठ उल्हसित स्वर्ग । मृत्युलोक मध्यभाग । पाताळलोक मग । नितंब तो; ॥१०५॥

ऐसे लेकरू एक प्रसवली ही माया देख । जयाचे तिन्ही लोक । हे बाळसे गा ॥१०६॥

चौर्‍यांयशी लक्ष योनी या । हाडापेरांचे सांधे तया । लागे प्रतिदिनी वाढाया । बालक हे ॥१०७॥

नाना देहीं अवयवीं । नामांची लेणी लेववी । मोहस्तन्यें वाढवी । नित्यनूतनपणे ॥१०८॥

सृष्टी त्या वेगवेगळ्या । तिच्या अंगुल्या करंगळ्या । भिन्न योगीतिल अभिमानांचिया । घातल्या अंगठया तिने ॥१०९॥

हे एकुलते चराचर । अविचारकाळी सुंदर । प्रसवोनिया थोर । वाढली माया ॥११०॥

अगा ब्रह्मा तो प्रातःकाळ । विष्णू तो माध्यान्हवेळ । सदाशिव सायंकाळ । बाळासि या ॥१११॥

महाप्रळयशेजेवरी । निवांत निजे खेळल्यावरी । जागे होय विपरीत ज्ञानें परी । कल्पोदयीं ॥११२॥

अर्जुना हे बाळ यापरी । मिथ्यादृष्टीचे घरीं । युगमालिकांची अवधारी । टाकी चोजपाउले ॥११३॥

संकल्प जयाचा इष्ट । अहंकार खेळगडी पुष्ट । ऐशा या बालकाचा शेवट । ज्ञानेंचि होई ॥११४॥

असो हे बोलणेही । ऐसे विश्व माया प्रसवी । तेथ आधारभूत होई । माझी सत्ता ॥११५॥

सर्व योनींमधे मूर्ति जितुक्या जन्म पावती
माता प्रकृति ही त्यांस पिता मी बीज पेरिता ॥४॥

याकारणें मी पिता । महद्‌ब्रह्म ही माता । अपत्य पांडुसुता । जगडंबर ॥११६॥

आता देखोनि शरीरे बहुत । न भेदो हो तुझे चित्त । वसती सर्वचि देहात । मन बुद्धि अहं पंचमहाभूते ॥११७॥

अगा एके चि देहीं काय । नाहीत वेगळाले अवयव? । तैसे पाही विचित्र विश्व । एकचि हे सर्व ॥११८॥

वरच्या खालच्या डहाळ्या । लांब आखूड वेगळाल्या । एकाचि जैशा जाहल्या । बीजाचिया; ॥११९॥

आणि संबंध तोही ऐसा । म्रुत्तिकेसि घट लेक जैसा । वा वस्त्रत्व कापुसा । नातू जणू ॥१२०॥

नाना कल्लोळपरंपरा । संतति जैसी सागरा । आमुचा चराचराचा वीरा । संबंध तैसा ॥१२१॥

म्हणोनि वन्हि आणि जाळ । दोन्ही वन्हीचि केवळ । तैसा मीचि गा सकळ । हा संबंधचि मिथ्या ॥१२२॥

जाहल्या जगें मी झाके । तर जगत्वें कोण फाके ? । माणिक कांतीने पडुनि फिके । लोपे काय ? ॥१२३॥

अलंकारासी आले । तर सोनेपण काय गेले ? । की कमळ उमलले । कमळत्वा मुके ? ॥१२४॥

अवयवांनी हा अवयवी । काय आच्छादिला जाई ? । की अवयवचि होई । तयाचे रूप ? ॥१२५॥

जोंधळा पेरिला । कणसासी आला । तर पेरिला नष्ट झाला ? । की पटींनी वाढला ? ॥१२६॥

म्हणोनि जग दुरी सारावे । मग मजसी पाहावे । ऐसा नव्हे, आघवे- । असे ते मीचि ॥१२७॥

तर पार्था तू खरोखरी । आपुलिये अंतरीं । या सिद्धांताचा करी । दृढनिश्चय ॥१२८॥

आता मीचि मज दाविले । भिन्न शरीरीं वेगळाले । गुणांनी मज बांधिले । ऐसा मी दिसे ॥१२९॥

जैसे स्वप्नीं आपण । कल्पुनि आपुले मरण । भोगावे गा जाण । कपिध्वजा ॥१३०॥

काविळीचे पिवळे डोळे । देखती ते ते दिसे पिवळे । अर्जुना हेही आकळे । त्या डोळ्यांसीची ॥१३१॥

सूर्य प्रकटी स्वप्नकाशें । तेव्हाचि तयावरचे अभ्र भासे । तो अभ्रें लोपला हेही दिसे । तयामुळेचि की ॥१३२॥

जाहली आपणाचिपासुनि जर । त्या छायेसी भ्यावे तर । त्या छायेहुनि काय खरोखर । वेगळे आपण ? ॥१३३॥

नाना देह हे तैसे । दावुनि मी नानाविध होतसे । येथ जो गुणबंध असे । तोही दावी मीची ॥१३४॥

गुणबंधें न व्हावे बद्ध । हेचि मज माझे जाणणे शुद्ध । अज्ञानें उपजे बंध । आत्मस्वरूपाविषयींच्या ॥१३५॥

तर कोणे गुणे देख । मजचि मी हो बंधक । तेचि आता ऐक । अर्जुनराया ॥१३६॥

गुण किती त्यांचे काय धर्म । काय तयां रूप नाम । ते कोठे उपजले हे वर्म । ऐक आता ॥१३७॥

प्रकृतीपासुनी होती गुण सत्त्व रजस् तम
ते निर्विकार आत्म्यास जणू देहात जुंपिती ॥५॥

तर सत्त्व रज तम तिघेजण । तयांसी नाम गुण । आणि प्रकृति ही जाण । जन्मभूमी तया ॥१३८॥

येथ सत्त्व ते उत्तम । रज ते मध्यम । तिहींमाजी तम । सहजचि कनिष्ठ ॥१३९॥

हे एकेचि वृत्तीचे ठायी । त्रिगुणत्व असे पाही । बाल्य-तारुण्य-वार्धक्य देहीं । एकेचि जैसे ॥१४०॥

अथवा हिणकस मिसळून । जों जों वाढे वजन । तों तों सोने होय हीन । कस घटे ॥१४१॥

अगा सावधपण जैसे । वाहवले आळसें । तेव्हा गाढ निद्रा बैसे । दृढावुनी ॥१४२॥

तैसे अज्ञानाचे अंगिकारें । निघाली वृत्ती विखुरे । ती सत्त्व-रज-द्वारें । तमही होय ॥१४३॥

अर्जुना गा जाण । यासी नाव गुण । आता दावू लक्षण । कैसे बांधती ते ॥१४४॥

तर क्षेत्रज्ञ दशेत ऐसे । आत्मा थोडका प्रवेशे । तोचि बोलणे गा आरंभितसे । देह मी हे; ॥१४५॥

जन्मापासुनि मरणापावत । देहधर्मीं समस्त । ममत्वाचा घेत न घेत । अभिमान तोंचि; ॥१४६॥

माशाचे तोंडीं । पडे आमिषाची उंडी । तोंचि गळ हिसडी । कोळी जैसा; ॥१४७॥

त्यात निर्मळ ते सत्त्व ज्ञान आरोग्य वाढवी
मी सुखी आणि मी ज्ञानी शृंखला हीचि लेववी ॥६॥

तैसे सत्त्वगुण पारधी तेथ । सुखज्ञानपाशीं विंधित । मृग जैसा जाळ्यात । तैसा अडके तो ॥१४८॥

मग ज्ञानें चरफडे । जाणिवेच्या लाथा झाडे । स्वयंसुखही व्यर्थ धाडे । हातीचे गा ॥१४९॥

विद्येने मानाने तोषे । लाभमात्रें हर्षे । संतुष्ट स्वतासि देखे । धन्यता मानी ॥१५०॥

म्हणे भाग्य काय ना माझे । आज मजसम सुखी न दुजे । अष्टसात्त्विकभावें सजे । फुगू लागे ॥१५१॥

इतुक्यानेही न सरे । लागण लागे दुसरे । विद्वत्तेचे संचरे । भूत अंगी ॥१५२॥

आपणचि ज्ञानस्वरूप स्वयें । ते गेल्याचे दुःख न वाहे । आणि विषयज्ञानें होऊ पाहे । गगनाएवढा ॥१५३॥

राजा जैसा स्वप्नीं । राजधानीत शिरुनी । दोन दाणे मिळता मानी । इंद्र नव्हे का मी? ॥१५४॥

आत्मा जो देहातीत । तो होता देहवंत । तया तैसे होऊ लागत । बाह्य ज्ञानें ॥१५५॥

व्यवहारशास्त्र जाणत । यज्ञविद्या आकळत । किंबहुना स्वर्गापावत । हात टेके ॥१५६॥

म्हणे आज मजविण । कोणी न सज्ञान । चातुर्यरूप चंद्रा गगन । चित्त माझे ॥१५७॥

अगा सत्त्वगुण देखसी । सुख-ज्ञानाचे बांधुनि दाव्यासी । जिवाची नंदीबैलाऐसी । दशा करी ॥१५८॥

हाचि आत्मा शरीरीं । रजोगुणें ज्यापरी । बांधिला जाय ते अवधारी । सांगू आता ॥१५९॥


रज ते वासनारूप तृष्णा आसक्ति वाढवी
आत्म्यास कर्मसंगाने टाकिते जखडूनि ते ॥७॥

रज नावाचे हेचि कारण । की जिवाचे करी रंजन । हे अभिलाषेचे तरुणपण । सदाचि गा ॥१६०॥

थोडके शिरे जीवीं । आणि तो वाममार्गी लागे पाही । माग वार्‍यावरी आरूढ होई । वासनेचिया ॥१६१॥

अग्निकुंडीं तूप शिंपिती देखे । अगा वज्राग्नी भडके । तेथ बहु थोडके । असे काय ? ॥१६२॥

तैसी इच्छा खवळे पाही । दुःखासकट अवघे गोड होई । गमू लागे इंद्रवैभवही । अल्प ऐसे ॥१६३॥

तैसी तृष्णा वाढता । मेरूही हाता येता । म्हणे दारुणही साहसा । आता । एखाद्या करावे ॥१६४॥

आणि असलेले खर्चेल । तर उद्या कैसे निभेल ? । ऐशा तृष्णेने विशाल । व्यवसाय मांडी ॥१६५॥

करी जीविताची कुरवंडी । ओवाळू लागे कवडी । तृणाचीही मिळता काडी । होई कृतकृत्य ॥१६६॥

म्हणे स्वर्गा जावे । तर काय तेथ खावे ? । यालागी करू धावे । यज्ञयान ॥१६७॥

व्रतामागुनी व्रत । करी कर्मे इष्टपूर्त । काम्यकर्मावाचुनि हात । शिवणे नाही ॥१६८॥

अगा ग्रीष्मांतींचा वारा । विसावा न जाणे वीरा । तैसा ना न म्हणे व्यापारा । रात्रंदिवस ॥१६९॥

काय चंचल मासा । कामिनीकटाक्ष जैसा । चंचलपणा तैसा । विजेसीही नाही ॥१७०॥

तितुक्याचि गा वेगाने । स्वगे-संसार तृष्णेने । क्रियांचिया शिरणे । आगीत देख ॥१७१॥

ऐसा देहीं देहावेगळा । लेई तृष्णोचिया शृंखला । खटाटोप गळ्यात घेई खुळा । व्यापाराचा ॥१७२॥

हे रजोगुणाचे दारुण । देहीं देहधार्‍या बंधन । ऐक आता कुशलपण । तमोगुणाचे ॥१७३॥

गुंगवी तम सर्वांस अज्ञानचि विरूढले
झोप आळस दुर्लक्ष ह्यांनी घेरूनि बांधिते ॥८॥

व्यवहाराचेही डोळे । मंद ज्या तमाचे पडद्यामुळे । मोहरात्रीचे काळे । घनमेघ जो ॥१७४॥

अज्ञानाचे लळे । तया एका लागले । ज्यामुळे विश्व भुलले । नाचतसे ॥१७५॥

अविवेकाचा महामंत्र । जो मौढय-मद्याचे पात्र । हे असो मोहनास्त्र । जीवांसी जो; ॥१७६॥

तमोगुण कैसा अवलोकावा । जो युक्ती रचूनिया । देहचि आत्मा मानिती तयां । जखडुनि टाकी ॥१७७॥

हा साचचि एक शरीरीं । माजू लागे चराचरी । आणिक तेथ दुसरी । गोष्ट नाही ॥१७८॥

सर्वेंद्रियां जडत्व । मनामाजी मूढत्व । अंगिकारी दृढत्व । आळसाचे ॥१७९॥

आळोखेपिळोखे देई । अनावड सर्व कार्यीं । नुसती रेलचेल होई । जांभयांची ॥१८०॥

उघडीचि असे दिठी । परि न देखे कोणत्याहि गोष्टी । न हाकारिताचि उठे किरीटी । ओ म्हणोनि ॥१८१॥

पडला धोंडा जैशी । न पालटे कुशी । मुरकुंडी मारी तैशी । ती न मोडी ॥१८२॥

पृथ्वी जावो पाताळीं । की आकाश कोसळो तळीं । परि उठण्याचे इच्छेसि मुळी । उपजू न देई ॥१८३॥

उचित-अनुचित आघवे । आळसावता न आठवे । जेथल्यातेथ लोळावे । ऐसीचि बुद्धी ॥१८४॥

उभारुनि हाता एके । कपाळ दाबी सारखे । गुडघ्यात डोके । खुपसुनि बैसे ॥१८५॥

निद्रेविषयी भला । जीवीं असे लळा । आणि म्हणे झोपाळला । स्वर्गसुख व्यर्थ ॥१८६॥

ब्रह्मदेवाचे आयुष्य लाभावे । मग निजलेलेचि असावे । यावाचुनी न ठावे । व्यसन दुजे ॥१८७॥

सहजी वाटेने जाता । लागे डोळा कलंडता । न घे अमृतही मिळता । जर झोप आली ॥१८८॥

तैसेचि त्वेषबळें । कोणे एके वेळे । निघावे आंधळे । क्रोधें जैसे; ॥१८९॥

केव्हा कैसे वागावे । कोणासवे काय बोलावे । हे होण्याऐसे की नव्हे । काही न जाणे; ॥१९०॥

वणवाही आघवा । पंखांनीचि पुसोनि घ्यावा । पतंग हावेने या । उडी घाली जैसा; ॥१९१॥

साहसाकडे वळे तैसा । अकरणीय तेथ दावी धाडसा । किंबहुना विचार ऐसा । रुचे जया ॥१९२॥

निद्रा आळस प्रमाद । तमोगुण यापरी त्रिविध । निरुपाधिक विशुद्ध । आत्म्यासि बांधे ॥१९३॥

वन्हि काष्ठ व्यापितसे । तेव्हा काष्ठवत् दिसे । व्योम घटी साकारतसे । ते घटाकाश ॥१९४॥

अथवा सरोवर भरले । तेव्हा चंद्रत्व तेथ बिंबले । तैसे गुणआभासी बांधले । आत्मत्व गमे ॥१९५॥

सुखात घालिते सत्त्व रज कर्मात घालिते
ज्ञान झाकूनि संपूर्ण दुर्लक्षीं घालिते तम ॥९॥
अन्य दोघांस जिंकूनि तिसरे करिते बळ
असे चढे कधी सत्त्व कधी रज कधी तम ॥१०॥

परि हरूनी कफवातासी । जेव्हा पित्त व्यापे देहासी । तेव्हा करी संतप्त पाहसी । देहा ऐसे ॥१९६॥

जाय उन्हाळा पावसाळा । तयां जिंकुनि ये हिवाळा । तेव्हा येत आभाळा । शीतलता जैसी; ॥१९७॥

अथवा स्वप्न जागृती । लोपूनि ये सुषुप्ती । तेव्हा क्षणैक चित्तवृत्ती । जडमूढ होई; ॥१९८॥

तैसे रजतमा हारवी । सत्त्व माज मिरवी । जीवाकरवी म्हणवी । सुखी ना मी ? ॥१९९॥

सत्त्व-रज लोपती कधी । तमाची होई वृद्धी । तेव्हा आत्मा प्रमादी । सहजचि होय ॥२००॥

त्याचि गा परिपाठीं । सत्त्व तमाते घालुनि पोटीं । जेव्हा उठे किरीटी । रजोगुण; ॥२०१॥

तेव्हा कर्मावाचुनि काही । अन्य गोमटेचि नाही । ऐसे मानी देहीं । आत्मा देहराज ॥२०२॥

त्रिगुणवृद्धी निरूपण । तीन श्लोकीं कथिले जाण । आता सत्त्वादिवृद्धीचे लक्षण । सादर परिसा ॥२०३॥

प्रज्ञेचा इंद्रियद्वारा प्रकाश सगळीकडे
देहात पसरे तेव्हा जाणावे सत्त्व वाढले ॥११॥
प्रवृत्ति लालसा लोभ कर्मारंभ अशांतता
ही देही उठती तेव्हा जाणावे रज वाढले ॥१२॥
अंधार मोह दुर्लक्ष अप्रवृत्ति चहूकडे
देहात माजली तेव्हा जाणावे तम वाढले ॥१३॥
वाढले असता सत्त्व जाय जो देह सोडुनी
जन्मतो शुभ लोकात तो ज्ञात्यांच्या समागमी ॥१४॥
रजात लीन झाला तो कर्मासक्तात जन्मतो
तमीं बुडून गेला तो मूढयोनींत जन्मतो ॥१५॥

रज-तमावरि जय मिळवून । देहीं वाढता सत्त्वगुण । लक्षणे ही जाण । ऐसी होती ॥२०४॥

न सामावे प्रज्ञा अंतरी । आणि ओसंडे बाहेरी । सुवास जैसा वसंत भरी । कमळपाकळ्यांतुनी ॥२०५॥

सर्वेंद्रियांचे अंगणीं । विवेक करी राबणी । साचचि कर-चरणीं । होती डोळे ॥२०६॥

राजहंसाचे समोर । ठेविले नीर मिसळुनि क्षीर । तर त्यातिल भेद सत्वर । ओळखे तयाची चोच ॥२०७॥

तैसी दोषादोषविवेकीं देख । इंद्रियेचि करिती पारख । निग्रहवारे एक । सेवा करी ॥२०८॥

न ऐकावे ते कानचि वाळी । न पाहावे ते दिठीचि गाळी । अवाच्य ते टाळी । जीभचि गा ॥२०९॥

दिव्यापुढे जैसे । अंधारे पळू लगतसे । निषिद्ध न राहे तैसे । इंद्रियांसमोरी ॥२१०॥

जैसी वर्षाकाळी । महानदी असे उचंबळली । तैसी बुद्धि पसरली । अनेक शास्त्रीं ॥२११॥

अगा पुनवेचे दिवशी । चंद्रप्रभा धावे आकाशीं । ज्ञानी वृत्ती तैसी । फाके सर्वत्र ॥२१२॥

वासना एकवटे । प्रवृत्ति ओहटे । मानस विटे । विषयांसी ॥२१३॥

ऐसा वाढे सत्त्वगुण । तेव्हाचे हे लक्षण । आणि ये मरण । तेव्हाचि जर; ॥२१४॥

तैसीचि घरची संपत्ती । आणि औदार्य धैर्यवृत्ती । मग इहपरलोकी सुख कीर्ति । का न लाभे ? ॥२१५॥

अथवा सुकाळ व्हावे । सणवार सजावे । प्रिय पाहुणे यावे । पितरे स्वर्गातुनी ॥२१६॥

मग गोमटया या वेळेसी । उपमा कोठली कैसी ? । सत्त्वगुणीं देह ठेविणार्‍या तैसी । दुजी कोठली गति ? ॥२१७॥

ऐसा गुणश्रेष्ठ देख । घेऊनि सत्त्वगुण चोख । जो निघे सोडुनि खोपट एक । भोगक्षय हे ॥२१८॥

अकस्मात ऐसा जो जाई । तो सत्त्वगुणाचाचि नवा होई । किंबहुना लाभे तया जन्मही । ज्ञानियांमाजी ॥२१९॥

सांग बा धनुर्धरा । राजा राजेपणे जाता डोंगरा । तो राजेपणात अपुरा । गमे कय ? ॥२२०॥

नातरी येथला दिवा । नेता शेजारील गावा । तो तेथ तरी पांडवा । दीपचि की ॥२२१॥

तैसी सत्त्वगुणशुद्धी । पावे ज्ञानासह आगळी वृद्धी । तरंगू लागे बुद्धी । विवेकावरी ॥२२२॥

ते महत्‌तत्त्वादि किरीटी । अभ्यासूनि शेवटी । अभ्यासासह ब्रह्मापोटीं । जिरोनि जाई ॥२२३॥

वेदान्तीं सदतिसावे । सांख्यांचे मते पंचविसावे । तैसे त्रिगुण नुरोनि स्वभावे । चवथे जे; ॥२२४॥

ऐसे सर्व जे सर्वोत्तम । जाहले असे जया सुगम । तयासवे निरुपम । लाहे देह ॥२२५॥

याचिपरी देख । तम-सत्त्व बैसत अधोमुख । जेव्हा होई अधिक । रजोगुण ॥२२६॥

आपुल्या कार्याचा ठायी ठायी । धुमाकूळ माजवी देहाच्या गावी । तेव्हांचि उदय होई । चिन्हांचा ऐशा ॥२२७॥

पसरे जैसी वावटळ । वेटाळी सरसकट सकळ । तैसी विषयीं सढळ । मोकळीक इंद्रियां ॥२२८॥

परस्त्रीवरी दृष्टि पडे । ते निषिद्ध न गमे तेवढे । इंद्रियां शेळीचे तोंडें । अनिर्बंध चारी ॥२२९॥

तयाचा लोभ अनावर । करी स्वैर संचार । लुटण्या जे दुष्कर । ते तेचि केवळ उरे ॥२३०॥

आणि येता पुढयात । कोणतेही उद्यमजात । करण्या होय उद्युक्त । हात मागे न घे ॥२३१॥

बांधावा एखादा प्रासाद । वा करावा अश्वमेध । ऐसा अफाट छंद । घेउनी उठे ॥२३२॥

नगरेचि उभारावी । जलाशये निर्मावी । महावने लावावी । नानाविध ॥२३३॥

ऐशा ऐशा अफाट कर्मीं । समारंभ उपक्रमी । आणि इहपरलोककामीं । पुरे न म्हणे ॥२३४॥

सागरही पडे सांदीत । अग्नीसी कवडीची न किंमत । ऐसी अभिलाषा अतृप्त ॥ सदाचि तयाची ॥२३५॥

स्मृहा मनाचे पुढे पुढे । आशेवरी दौडे । अगा विश्व धाडे । इच्छेचे पायदळीं ॥२३६॥

ऐसा रजोगुण वाढे । लक्षणे उघड दिसती पुढे । आणि देह जर पडे । त्याचि मेळीं ॥२३७॥

तर या लक्षणांसह पाही । शिरे अन्य देहीं । परी असे तीही । मनुष्ययोनीचि ॥२३८॥

सुखवैभवासवे भिकारी । बसे जरि राजमंदिरी । तरी काय अवधारी । राजा होय ? ॥२३९॥

बैल तेथ कडबा । हेन कधी चुके बा । जरी तो राहे उभा । श्रीमंतांच्या वर्‍हाडासवे ॥२४०॥

जया व्यापारामुळे पाही । रात्रंदिन उसंत नाही । अगा तो जुंपला जाई । ऐसियांचेचि पंक्तीसी ॥२४१॥

कर्मठांचे कुळाठायी । किंबहुना जन्म घेई । जो रजोवृद्धिचे डोहीं । बुडोनि मरे ॥२४२॥

मग तैसीचि पुढती । गिळोनि रज-सत्त्ववृत्ती । होतसे उन्नती । तमोगुणाची ॥२४३॥

तर तेव्हांचि जी लक्षणे ही । अंतर्बाह्य वसती देहीं । ऐकावी चोखपणे तीही । लक्षूपूर्वक ॥२४४॥

तयाचे होय ऐसे मन । जैसे ते रविचंद्रहीन । रात्रीचे की गगन । अवसेचे ॥२४५॥

तैसे अंतर्याम ओस । होय स्फूर्तीहीन उदास । विचारांचे भाषेस । वाव न तेथ ॥२४६॥

पाषाणासी मागे धाडी । ऐसे मवाळपण बुद्धि सोडी । स्मरणशक्तीही देशोधडी । लागली दिसे ॥२४७॥

अविवेकाचे माजें । अंतर्बाह्य गाजे । एकचि घेणेदेणे जे । मूढपण तेथ ॥२४८॥

अनाचाराची हाडे । रोविली इंद्रियांपुढे । मरेतों त्याचि दिशेकडे । क्रिया होती ॥२४९॥

आणिकही एक दिसे । दुष्कृत्यीं चित्त उल्हासे । अंधारीं देखणे जैसे । घुबडाचे की ॥२५०॥

तैसे निषिद्धाचे घेता नाव । भलतीही सुटे धाव । मग त्याविषयीं घेई धाव । इंद्रियांसवे ॥२५१॥

मदिरा न घेता डुले । वातज्वराविण बरळे । प्रेमाविनाचि भुले । वेडे जैसे ॥२५२॥

चित्त तर गेले असे । परि उन्मनी अवस्था नसे । ऐसा वश होतसे । उन्मत्त मोहा ॥२५३॥

किंबहुना ऐशी ऐशी । चिन्हे तमोगुण पोषी । जेव्हा वाढे सामुग्रीनिशी । आपुलिया ॥२५४॥

आणि प्रसंगोपात जाण । जर हाकारी मरण । लेऊनि तमोगुन । तो पुढल्या जन्मीं शिरे ॥२५५॥

साठवुनी राईपण बीजीं । राईतरू अंग त्यजी । मग बीज अंकुरता दुजी- । गोष्ट काय राईविण ? ॥२५६॥

अग्नीपासुनि लाविता दीप । विझेना का अग्नीचे रूप । जेथ पुन्हा लागे तेथ आपोआप । आघवा तोचि ॥२५७॥

तामसी संकल्प मनीं वाहे । तेव्हाचि जर मरण येऊ पाहे । तर तमोगुणीचि लाहे । देह तया ॥२५८॥

आता काय बोलावे कितीही । जया तमोवृद्धीत मृत्यू येई । तो पशू की पक्षी होई । झाड की कृमी ॥२५९॥

फळ सात्त्विक कर्माचे पुण्य निर्मळ बोलिले
रजाचे फळ ते दुःख तमाचे ज्ञानशून्यता ॥१६॥

याचि गा कारणें । जे निपजे सत्त्वगुणें । ते सुकृत ऐसे म्हणे ।  श्रुतिसंकेत ॥२६०॥

म्हणोनि तया निर्मळ । सुख ज्ञान हे सरळ । अपूर्व ये फळ । सात्त्विक ते ॥२६१॥

मग राजस ज्या क्रिया । त्या इंद्रावणीपरि पिकल्या । बाहेरी सुखें रंगल्या । आत बी दुःखाचे ॥२६२॥

अथवा निंबोळीचे पीक । वरि गोड आत विष देख । तैसे राजसक्रियांचे एक । फळ होय ॥२६३॥

तामस कर्म असे जितुके । ते अज्ञानफळेंचि पिके । विषांकुर विषें एके । ज्यापरी गा ॥२६४॥

सत्त्वातूनि निघे ज्ञान निघे लोभ रजातुनी
अज्ञान मोह दुर्लक्ष निघती ही तमातुनी ॥१७॥

म्हणोनि बा अर्जुना । येथ सत्त्वचि कारण ज्ञाना । जैसा की दिनमाना । सूर्य हा अगा ॥२६५॥

आणि तैसेचि हे जाण । लोभासि रज कारण । जैसे आपुले विस्मरण होऊन । परमात्मा जीवदशेसि येई ॥२६६॥

मोह अज्ञान प्रमादा । मलिन दोषवृंदा । पुन्हा पुन्हा प्रबुद्धा । तमचि मूळ ॥२६७॥

ऐसा विचारांचे डोळ्यांसी दाविला । एकेक गुण हा वेगवेगळा । जैसा सर्व बाजूंनी आवळा । दावावा तळहातीचा ॥२६८॥

तेव्हा रज तम दोन्ही तेथ । देखिले पतन करण्या समर्थ । सत्त्वावाचूनि कोणी न आणीत । ज्ञानाकडे ॥२६९॥

जैसे ज्ञानी अन्य भक्ति त्यागित । संन्यासभक्ती स्वीकारीत । आजन्म सात्त्विकवृत्ती अंगिकारित । कोणी तैसे ॥२७०॥

सत्त्वस्थ चढती उंच मध्ये राजस राहती
हीन वृत्तीत वागूनि जाती तामस खालती ॥१८॥

जैसे सत्त्वगुणाचे उत्कर्षें । जयांचे जगणे-मरणे असे । ते तनु त्यागिता ऐसे । स्वर्गीचे राजे होती ॥२७१॥

यापरि रजोगुणाचे आचरण । करिती ते जाण । संचरती मनुष्य होऊन । मृत्युलोकीं ॥२७२॥

सुखदुःखाची खचडी जेथ । जेवती देहाचे ताटात । ते बाहेरी न पडू शकत । मरणवाटेसी लागले ॥२७३॥

आणि तमोगुण आचरीत । भोगक्षम देहेंचि मृत्यु पावत । ते दाखला मिळवीत । नरकभूमीचा ॥२७४॥

ब्रह्मवस्तुच सत्तेमुळे फोफावती । ऐसे तिन्ही गुण त्रिजगतीं । तयांचे लक्षणांसह तुजप्रती । सांगितले गा ॥२७५॥

वस्तु वस्तुत्वें परिपूर्ण । परि गुणांचे उपाधीने वेटाळून । आपणचि गुणांऐसे जाण । कार्य करी ॥२७६॥

जेव्हा राजेपणें स्वप्नीं । परचक्र आलेले देखे कोणी । तेव्हा जय-पराजय दोन्ही । आपणचि होय; ॥२७७॥

तैसेचि उत्तम-मध्यम-अधोगती । वा स्वर्ग नरक पाताळे ती । हे गुणवृत्तीतिल भेद असती । एरवी ब्रह्मवस्तु विशुद्धचि ॥२७८॥

गुणांविण नसे कर्ता आत्मा तो त्यांपलीकडे
देखणा ओळखे हे जो होय माझेचि रूप तो ॥१९॥

परि असो हा विस्तार । हे न दिसो विषयांतर । परिस आता कथिणार । मागिल गोष्ट ॥२७९॥

तर आपुल्याचि सामर्थ्याने । हे तिन्ही होत सहजपणें । देहाचे निमेत्ताने । गुणचि हे ॥२८०॥

इंधनाचे आकारें । अग्नि जैसा अवतरे । अथवा तरुवरांचे रूपें बहरे । भूमिरस; ॥२८१॥
 
वा दह्याचे मिषें । दूधचि आविष्करे जैसे । की मूर्त होय उसें । गोडी जैसी; ॥२८२॥

तैसे हे त्रिगुणचि अंतःकरणासह । होती स्थूळ-सूक्ष्म देह । जीवबंधा हेचि कारण होय । खरोखरी ॥२८३॥

परि नवल हे जाण । जीवासी असताही बंधन । मुक्त स्थितीसी उणेपण । न ये तयाच्या ॥२८४॥

त्रिगुण आपुलाल्या धर्में । देहीं आचरिता कर्मे । आत्म्याचे गुणातीततेत न गमे । उणे काही ॥२८५॥

आत्म्याची मुक्तस्थिती सहजशी । आता ऐकवू तुजसी । जो तू ज्ञानकमळासी । भ्रमर की ॥२८६॥

चैतन्य गुणांमाजी वसेही । परि गुणांऐसे न होई । मागे जे बोलिलो पाही । तैसेचि हे ॥२८७॥

ज्ञानबोध होता तैसे । चैतन्य गुणावेगळे दिसे । स्वप्न की जैसे । जागे होता ॥२८८॥

वा आपण बिंबलो जळीं । हे तीरावरुनि न्याहाळी । लहरता अनेक स्थळीं । लाटांमाजी ॥२८९॥

अथवा नटण्याचे लाघवें । नट स्वतःसि न चकवे । तैसे गुणजात देखावे । अलिप्तपणे ॥२९०॥

जैसे आकाश ऋतुत्रयासी । धरूनियाही अवकाशीं । आपुल्या वेगळेपणासी । उणे न आणी; ॥२९१॥

त्रिगुणीं असोनि गुणांपल्याड । ते आत्मतत्त्व स्वयंसिद्ध गूढ । मूळपीठावरि होई आरूढ । ‘मी ब्रह्म आहे’ या ॥२९२॥

तेव्हा तेथूनि मग पाहता । म्हणे, साक्षी मी अकर्ता । हे गुणचि क्रियाजाता । योजिताती ॥२९३॥

सत्त्व रज तमांचे भेदांनुसार । कर्माचा होय विस्तार । तो गुणांचाचि विकार । असे गा हा ॥२९४॥

तयामाजी मी ऐसा । वनीं ऋतु वसंत जैसा । वनश्रीविलासा । कारण होय ॥२९५॥

की तारांगण लोपावे । सूर्यकांतमण्याने उद्दीपावे । कमळांनी विकसावे । जावे तमें; ॥२९६॥

या कोण्याही कार्यीं कधीही । सूर्य जैसा नाही । तैसा अकर्ता मी देहीं । केवळ साक्षी ॥२९७॥

गुण दिसती मी दाविता । गुणांचे गुणपणासि मी पोषिता । उरे जे गुण नाशता । ते मी गा ॥२९८॥

जयाचे अंतरीं ऐसा विवेक । येतसे गा उदया, देख । गुणातीतत्व लाभे तया चोख । सर्वोच्च मार्गें ॥२९९॥

देहकारण हे तीन गुण जाय तरूनि जो
जन्म-मृत्यु-जरा-दुःखीं सोडिला मोक्ष गाठतो ॥२०॥

आता आणिक असे निर्गुण । ते तो अचुक ओळखे जाण । कारणा ज्ञानें केले स्थान । तयाचेचि ठायी ॥३००॥

किंबहुना तो पंडुसुता, । पावे मजसी एकरूपता । जैसी की सरिता । सिंधुत्व गा ॥३०१॥

शुक नलिकेवरुनी उठला । मुक्तपणें फांदीवरि बैसला । तैसा तो अहंता त्यजुनि जाहला । ब्रह्मचि गा ॥३०२॥

जो अज्ञानाचे निद्रेत सदा । घोरत होता बदबदा । तो आत्मस्वरूपीं प्रबुद्धा । जाहला जागा ॥३०३॥

बुद्धिभेदाचा आरसा । तयाहातोनि पडला वीरेशा । म्हणोनि जीव या प्रतिबिंबाचे आभासा । मुकला तो ॥३०४॥

देहाभिमानाचा वारा । आता थांबला, हे वीरा, । तेव्हा लाटांचे जैसे सागरा । तैसे जिवाशिवाचे ऐक्य ॥३०५॥

म्हणोनि गा मद्रूप । होई तो आपोआप । वर्षेअंतीं आकाशरूप । घनजात जैसे ॥३०६॥

मी होऊनि साच तैसे । मग देहींचि या असे । तरी तो न गवसे । देहीं उपजल्या गुणां ॥३०७॥

जैसा काचेचिया घरास । न आवरे दीपप्रकाश । वा न विझवू शके वडवानलास । सागरही ॥३०८॥

तैसा आल्या-गेल्या गुणमेळीं । बोध न त्याचा मळे मुळी । आभाळींचा चंद्र जळीं । तैसा तो देहीं ॥३०९॥

त्रिगुण आपुल्या मिरवित प्रौढी । देहीं नाचविती सोंगाडी । परि तो पाहण्या न धाडी । अहंतेसी ॥३१०॥

ऐसा  तो येथवरी । निश्चयें स्थिरावला अंतरीं । आता काय वर्ते शरीरीं । काही न जाणे ॥३११॥

टाकुनी अंगाची खोळ । सर्प गाठी पाताळ । त्या कातेचा कोण करी सांभाळ ? । तैसे देहाचे जाहले ॥३१२॥

सुकल्या कमळाचा सुगंध जैसा । मिळोनि जाय आकाशा । माघारा कमळकोषा । न येचि तो ॥३१३॥

स्वरूपसमरसतेमुळे । तयासी तैसेचि जाहले । तेथ देहधर्म कैसे कोठले । हे न जाणे ॥३१४॥

म्हणोनि जन्म-जरा-मरण । इत्यादी जे सहा गुण । ते देहींचि राहिले, कारण । संसर्ग नसे तयां ॥३१५॥

घटाचिया खापर्‍या । घट भंगता फेकिल्या । घटाकाश महदाकाश त्या ठाया । जाहलेचि आपोआप ॥३१६॥

तैसी देहबुद्धी जाय । आत्मस्वरूपाचा आठव होय । तेव्हा अन्य आहे काय । तयावाचुनी ? ॥३१७॥

ऐसे थोर बोध जाहलेपणें । तयाचे गा देहीं असणे । म्हणोनि तया मी म्हणे । गुणातीत ॥३१८॥

या देवाचिया बोला । पार्थ अति सुखावला । मेघें हाकारिला । मोर जैसा ॥३१९॥

अर्जुन म्हणाला:

त्रिगुणातीत जो देवा त्याचे लक्षण काय ते
वागणूक कशी त्याची कसा तो गुण निस्तरे ॥२१॥

मग तोषोनि वीर पुसे । जी, कोणत्या चिन्हीं तो दिसे ? । जयामाजी वसे । ऐसा बोध ॥३२०॥

काय आचरे तो निर्गुण । कैसे निस्तरे गुण । ते सांगावे जी, आपण । माहेर कृपेचे ॥३२१॥

अर्जुनाचे त्या प्रश्नावर । तो षड्‌गुणराणा शारंगधर । करावया शंकेचा परिहार । बोलत असे ॥३२२॥

पार्था, काय नवलाईचे बोलसी । गुणातीताची कर्मे पुससी । ते नावचि तयाचे पाहसी । काय लटिके ? ॥३२३॥

जो गुणातीत या नांवे असे । तो गुणाधीन तर नसे । गुणांमाजी जरि वसे । गुणां न गवसे ॥३२४॥

गुणाधीन की गुणां न गवसे । परि हेचि जाणावे कैसे । गुणांचिये जेव्हा असे ॥ गुंताडयात; ॥३२५॥

हा संदेह जर वाहसी । तर सुखें पुसू शकसी । परिस आता तयासी । स्पष्ट करू ॥३२६॥

श्रीभगवान् म्हणाले:

प्रकाश मोह उद्योग गुणकायें निसर्गता
पावता न करी खेद न धरी आस लोपता ॥२२॥

तर रजाचे माजें । कर्मांकुर देहीं उपजे । प्रवृत्ति जेव्हा घेत जे । वेटाळुनी ॥३२७॥

तेव्हा मीचि कर्म करणारा । ऐशा गर्वाचा न शिवे वारा । कर्मे निष्फळता खेद जरा । तोही नाही ॥३२८॥

वा सत्त्वगुणाचे उत्कर्षें । सर्वेंद्रियीं ज्ञान फाकतसे । तेव्हा सुविद्येचे तोषें । चढुनी न जाई ॥३२९॥

अथवा तमोगुण वाढताही । जो मोहभ्रमें लिप्त न होई । आणि अज्ञानामुळे खेदही । न बाळताही मनीं ॥३३०॥

तो मोहाचे अवसरीं । ज्ञानाची चाड न धरी । ज्ञानें कर्मारंभ न करी । कर्मे होता न हो दुःखी ॥३३१॥

सायंप्रातर्मध्यान्ह ही । गणना न जैसी सूर्याठायी । तैसी तिन्ही गुणांची न वार्ताही । गुणातीता ॥३३२॥

तया वेगळ्याचि काय प्रकाशें । ज्ञानित्व यावयाचे असे । काय सागर पाउसें । भरला असे ? ॥३३३॥

अथवा आचरिता कर्मे । कर्माभिमान काय गमे ? । सांग हिमालय हमें । कापे काय ? ॥३३४॥

नातरि मोहें आव्हानिता तयासी । काय मुकेल तो ज्ञानासी ? । काय उन्हाळा महाआगीसी । जाळू शके ? ॥३३५॥

राहे जैसा उदासीन गुणांनी जो न चाळवे
त्यांचाचि खेळ जाणूनि न डोले लेशमात्रहि ॥२३॥

तैसे गुणकार्य आणि गुण । हे आघवेचि आपन । म्हणोनि एकेक गुणोत्कर्षें जाण । न होय भग्नचित्त ॥३३६॥

एवढया येता प्रतीतीसी । तो देहा आलासे वस्तीसी । वाटेने जाता संकटांसी । तोंड देत जैसा ॥३३७॥

तो न जिंके न हारवी । तो गुण नव्हे न काही करवी । जैसी की भूमी व्हावी । संग्रामींची ॥३३८॥

अथवा प्राण शरीरीं । वा अतिथी पंडिताघरीं । किंवा खांब चव्हाटयावरी । उदासीन जैसा ॥३३९॥

गुणांचे येरझारांनी । तो ढळे ना चळे मनीं । जैसा हलेना मृगजळलहरींनी । मेरूपर्वत ॥३४०॥

यापरि बहुत काय मी बोले । व्योम वार्‍याने न ढळे । की सूर्या न गिळे । अंधकार ॥३४१॥

स्वप्न की गा जैसे । जागत्या न भ्रमवीतसे । तैसा तो बांधला न जातसे गुणांमाजी ॥३४२॥

गुणांमाजी तो न अडके । उण्यापुर्‍याचा साक्षी होउनि ठाके । कळसूत्री बाहुल्यांचा खेळ कौतुके । देखे दुरुनी जैसा ॥३४३॥

कर्मे करी गुण सात्त्विक । रज तो रजोविषयक । तमोगुण मोहादिक । कर्मे करी ॥३४४॥

सत्तेने गुणातीताचे तया । होत समस्त गुणक्रिया । जाण लौकिक व्यवहारीं या । सूर्यसत्ता जैसी ॥३४५॥

समुद्रा येई भरती । चंद्रकांतमणी पाझरती । कमळे विकसती । चंद्र तो उगा; ॥३४६॥

की वारा वाहे, पडेही । गगन ते निश्चळचि राही । तैसा गुणांचे बजबजपुरीतही । गडबडेना जो ॥३४७॥

अर्जुना या लक्षणांनी युक्त । जाण तो गुणातीत । ऐक आचरण येथ । तयाचे जे ॥३४८॥

आत्मत्वें सम जो पाहे सोने पाषाण मृत्तिका
धैर्यवंत सुखे दुःखे स्तुति-निंदा प्रियाप्रिय ॥२४॥

तर वस्त्राचे पाठी-पोटीं । सुतावाचुनि दुज्या न गोष्टी । तैसे तयाचे दिठीसी किरीटी, । चराचर मद्रूप ॥३४९॥

म्हणोनि सुख-दुखा सरिसे । तोलूनि आचरे ऐसे । रिपु आणि भक्तां जैसे । हरिचे एकचि देणे ॥३५०॥

एरवी तरी स्वभावें । सुखदुःख तेव्हाचि सेवावे । देहजळीं व्हावे । मासोळी जेव्हा ॥३५१॥

आता ते तर तयें सोडिले । आत्मस्वरूपींचि स्वतःसि मांडिले । मळणीअंतीं निवडिले । बीज जैसे ॥३५२॥

गंगा सोडुनी ओघ । पावे सागराचे अंग । शांतवुनी  लगबग । खळाळाची ॥३५३॥

तैसी आत्मस्वरूपींचि जया । वसती लाभली धनंजया, । तयासी देहीं सहजतया । सुख तैसे दुःख ॥३५४॥

रात्र अथवा उजाडले । खांबा जैसे एक जाहले । आत्मारामासि देहाआतले । द्वंद्व तैसे ॥३५५॥

निद्रिताचे अंगाशी । साप तैशी उर्वशी । स्वरूपस्था सरिसी तैशी । देहीं द्वंद्वे ॥३५६॥

म्हणोनि तयाचे ठायी । शेणा-सोन्यात अधिक उणे नाही । रत्ना-धोंडयामाजी काही । न जाणे भेद ॥३५७॥

घरा येवो स्वर्ग । की अंगावरि पडो वाघ । परि आत्मबुद्धीसि भंग । कदापि नाही ॥३५८॥

निवर्तले न उठे । जळले न रुजे कोठे । समत्वबुद्धी न वठे । तयापरी ॥३५९॥

हा ब्रह्मा म्हणोनि वंदा । की नीच म्हणोनि निंदा । जैसी राख न जाणे कदा । जळणे विझणे ॥३६०॥

तैसी निंदा आणि स्तुतीही । कोणत्याचि रूपें व्यक्त न होई । अंधार वा ज्योत नाही । सूर्याघरी जैसे ॥३६१॥

 मानापमान जो नेणे नेणे जो शत्रू-मित्रही
आरंभ सोडिले ज्याने  तो गुणातीत बोलिला ॥२५॥

तो ईश्वरचि या बुद्धीने पूजिला । की चोर म्हणुनि गांजिला । बैल आणि इत्तींनी वेढिला । वा केला राजा ॥३६२॥

की सुहृद जवळीं आले । वा वैरी येऊनि मिळाले । तारि न जाणे रात्र उजाडले । सूर्याऐसेचि ॥३६३॥

साही ऋतू येता जैसे । आकाश लिप्त न होतसे । तैसी विषमता ध्यानीमनीहि नसे । तयाचिया ॥३६४॥

आणिकही एक पाही । आचार तयाचे ठायी । तरि अभाव कर्मभावीं । जाहला दिसे ॥३६५॥

सर्व आरभांचे उच्चाटन जाहले । प्रवृत्ति जेथ मावळे । जेथ जळती कर्मफळे । तो अग्नि तो ॥३६६॥

इहपरलोकींचे नावें । भावचि जीवीं न उगवे । सेवी जे प्राप्त व्हावे । सहजतया ॥३६७॥

सुख अथवा शीण । नच जाणे पाषण । तैसे तयाचे मन । वर्जी देवघेव पूर्ण ॥३६८॥

आता किती हा विस्तार । जो जाणे ऐसा आचार । तोचि असे खरोखर । गुणातीत ॥३६९॥

गुणांसी उल्लंघिणे । घडे उपायें जेणें । तो आता ऐक म्हणे । श्रीकृष्णनाथ ॥३७०॥

जो एकनिष्ठ भक्तीने अखंड मज सेवितो
तो ह्या गुणांस लंघूनि शके ब्रह्मत्व आकळू ॥२६॥

तर एकनिष्ठ चित्तें । भक्तियोगें मज पुरते । सेवी, तो गुणांते । आकळू शके ॥३७१॥

तर मी कोण होय । एकनिष्ठतेचे स्वरूप काय । हा अवघाचि निर्णय । व्हावा लागे ॥३७२॥

तर पार्था परियेसा । मी तर येथ ऐसा । रत्नीं तेजाचा पुंज जैसा । रत्नचि तो ॥३७३॥

अथवा द्रवपणचि नीर । आकाशचि अंबर । गोडी तीचि साखर । अन्य नाही; ॥३७४॥

वन्हि तोचि जाळ । दळासीचि नाव कमळ । वृक्ष तेचि फळ, । डहाळ्या आदिक ॥३७५॥

अगा हिम जे साठले । तेचि हिमालय जाहले । अथवा दूध विरजले । तेचि दही ॥३७६॥

तर विश्व येणें नावें । हे मीचि गा आघवे । चंद्रबिंब नलगे सोलावे । कलांस्तव ॥३७७॥

तुपाचे थिजलेपण । न मोडिता तूपचि जाण । की न आटविता काकण । सोनेचि ते ॥३७८॥

न उकलिता पट । तंतूचि असे स्पष्ट । न विरविता घट । मृत्तिकाचि जैसी ॥३७९॥

म्हणोनि विश्वपण जावे । मग मजसी घ्यावे । तैसे हे नव्हे । अवघ्या विश्वासकट मी ॥३८०॥

ऐसे मज जाणणे । ही अव्यभिचार भक्ती करणे । येथे भेद काही देखणे । तर व्यभिचार तो ॥३८१॥

याकारणें भेदाते । सोडुनि अभेदचित्तें । आपणासकट मज पुरते । जाणावे गा ॥३८२॥

पार्था, सोन्याची टिकली एक । सोन्यासि जडविली देख । तैसीचि आपणात न वेगळीक । मानावी गा ॥३८३॥

तेजाचा तेजातुनि उपजला । तेजींचि असे लागला । त्या रश्मीऐसा भला । बोध व्हावा ॥३८४॥

अगा, परमाणू भूतळीं । हिमकण हिमाचलीं । तैसे मजमाजी न्याहाळी । आपणासि गा ॥३८५॥

असो तरंग लहान । परि सिंधूसी नाही भिन्न । तैसा मी ईश्वराहून । अन्य नसे ॥३८६॥

ऐशा गा सामरस्यात । दृष्टी जेव्हा उल्हसत । ती भक्ति गा सार्थ । आम्ही म्हणू ॥३८७॥

आणि ज्ञानाचे चांगुलपण । याचि दृष्टीचे नावें जाण । योगाचेही परिपूर्ण । सर्वस्व हे ॥३८८॥

मेघ आणि सागर । यात लागे अखंड धार । तैसी वृत्ति पुरेपूर । ब्रह्ममय तयाची ॥३८९॥

आडातल्या आकाशा । जोडिले न महाआकाशा । तो परमरसीं तैसा । एकवटे गा ॥३९०॥

प्रतिबिंबापासून बिंबापावत । प्रभेचा जैसा सरळ पथ । ती सोऽहंवृत्ती तेथ । तैसी होय ॥३९१॥

ऐसे जीव-ब्रह्म ऐक्यीं । प्रकटे ते ब्रह्म मी जीवाठायी । मग ति सोऽहंवृत्तीही । सरे आपोआप ॥३९२॥

अगा सैंधवाचा कण । सिंधूमाजी विरे पूर्ण । तो विरला हेही जाण । नुरतसे ॥३९३॥

अथवा जाळूनि तृण । वन्हीही विझे आपण । तैसे भेद नाशुनी जाण । ज्ञान उरे ॥३९४॥

माझे पैलपण सरे । भक्ताचे ऐलपण नुरे । अनादि ऐक्य जे उरे । तेचि प्रकटे ॥३९५॥

आता गुणासि तो जिंके । ही गोष्टचि ना तेथ ऐके । कारण नुरे एकपणही, देखे । पार्था तेथ ॥३९६॥

किंबहुना जी ऐसी दशा । ते ब्रह्मता गा वीरेशा, । हे तो पावे जो ऐशा । मज भजे ॥३९७॥

आणि ही लक्षणे जयाअंगीं । तो भक्त माझा जगीं । हीं ब्रह्मता जयालागी । पतिव्रता ॥३९८॥

जैसे गंगेचे ओधें । खळाळत जळ निघे । सिंधुपदाविण तयाजोगे । अन्य नाही ॥३९९॥

तैसे ज्ञानाचिये दृष्टीतुनी । जो मज सेवी कोणी । होय तो चूडामणी । ब्रह्मतेचे मुकुटीं ॥४००॥

या ब्रह्मत्वासीचि पार्था, । सायुज्य ऐसी नामव्यवस्था । याचि नावें चौथा । पुरुषार्थ गा, ॥४०१॥

परि माझे आराधन । ब्रह्मत्वीं होय सोपान । तेथ मी जरि साधन । गमेन हो ॥४०२॥

परि न वाढो ऐसे । तुझिये चित्तीं कायसे । अगा, ब्रह्म अन्य नसे । मजहुनी ॥४०३॥

ब्रह्मास मीचि आधार अवीट अमृतास मी
मीचि शाश्चत धर्मास आत्यंतिक सुखास मी ॥२७॥

अगा ब्रह्म या नावा । अर्थ मी धनंजया । मज संबोधिती आघव्या । शब्दांनी या ॥४०४॥

चंद्रबिंब आणि चंद्रमा । यात भेद न हे सुवर्मा । मी आणि ब्रह्म यात तुम्हा । भेद न गमावा ॥४०५॥

अगा नित्य जे निष्कंप । अनावृत धर्मरूप । सुख जे अमाप । अद्वितीय ॥४०६॥

आपुले सरता काम । विवेक गाठी जे धाम । सिद्धांताचे निस्सीम । तेचि मी गा ॥४०७॥

ऐसे ऐसे अवधारा । तो अनन्यभक्तांचा सोयरा । सांगतसे वीरा । पार्थासी ॥४०८॥

धृतराष्ट्र म्हणे तेथ । हे तुज कोणी येथ । पुसल्याविना व्यर्थ । का बोलसी ? ॥४०९॥

फेडी माझी चिंता । सांग विजयाची वार्ता । संजय मनीं म्हणे आता । सोडी या गोष्टी ॥४१०॥

तो मानसीं विस्मयाने । कळवळोनी हाय म्हणे । देवासवे कैसे न जाणे । द्वंद्व याचे ? ॥४११॥

कृपाळू देव होवो तुष्ट । यास गिळवो विवेकघोट । मोहाचा होवो नष्ट । महारोग ॥४१२॥

संजय ऐसे चिंतिता । संवाद तो घोळविता । हर्षाचा येत चित्ता । महापूर ॥४१३॥

म्हणोनि आता येणें । उत्साहाचे बहराने । श्रीकृष्णाचे बोलणे । सांगेल तो ॥४१४॥

त्या बोलातील भाव । घेईल तुमचा ठाव । ऐका म्हणे ज्ञानदेव । निवृत्तीचा ॥४१५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP