कुलदैवत - शिव-गौरी

मराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.


धवळी गिरीजा सोनेरी देव जोड्यानं राज्य करी
इच्छा झाली पलंगावरी गिरीजा बोले शंकराला
एका पलंगावाचून देवा महाल दिसतो सुना
एवडा उतार आयकिता शंकर तेथून निघाले
सुताराच्या वाड्या गेले येता देवाला देखिले
चंदनपाट बसकार केले काय बसू पाटावरी
आळशावर गंगा न्हाली माझ्या दुबळ्यावर कृपा केली
देवा कोणीकडे केले येणे शंकर बोले सुताराला
एका पलंगावाचून गिरीजा महाल दिसतो सुना
इतका उतार आयकिता ऐसा दिनमान डुबला
सकाळ दिनमान निघाला सुतार सकाळी उठला
झाडा झटक्याने गेला त्याने मुखमार्जन केले
ज्याची सेजेची कामिना गंगाळी पाणी सारले
पाणी तांब्याच्या गंगाळी सुतार तेथून उठले
जाऊन न्हायाला बैसले ज्याची आंघोळ संध्या झाली
धोतर करवती नेसले कपाळाशी चंदन काढले
आंगी जगबगी लेले तुळशी मनभाव पूजीले
ज्याची सेजेची कामिना पाची पकवान केले
जिने विस्तारिले ठाव सुतार तेथून उठले
बरवे पानावर बैसले पाच घास जेवण जेवले
मुखी गुरोळा घेतला बटीसा पाना विडा केला
विडा मुखात घेतला पोटी खोसळ किकर
खांद्यावर घेतला बासला सुतार तेथून निघाला
हनुमंताचे पाळी गेला ज्याला नमस्कार केला
टिका शेंदराचा नेला उभ्या मारगाने नेला
एक वन चहढता दुसरा वन उतरता
गेला भयान्या वनात हिंडू हिंडू बेजार झाला
नाही चंदनाचा खोज पळसाखाली झोपी गेला
पळसा दाविले स्वपन तूं का जाय वरल्या रानी
तेथे चंदनाचे झाड सुरत पडली डाव्या कानी
डावा कड्या पालटला सुतार तेथून उठला
चालून वरल्या रानी गेला गेला चंदनाजवळी
झाड पक्ष्याने झाकिले सोडला कमरेचा पटका
जोडला गोफणीचा गोटा होरे पुकारु लागला
पक्षी उडोन काय गेले हळदी कुंकवाचा सडा
वरतून घाव या घातला चंदन धरणीवर पाडला
ज्याचे तोडून केले गेर गेर पटक्या बांधले
उचलून शिरावर घेतले पटक्या झाले दोन गेर
गेरा वाच्या या फुटली तूं का जाय वरल्या रानी
सुतार तेथून निघाला गेला पळसाजवळी
पळसा वाचा फुटली तूं का देशील मला काय
हळदी कुंकवाचं बोट बेलावरची बेलपत्री
पळस इतक्यानं समजेना पोळा सनया नेमला
अयसा मुरोबा निघाला ज्याने मुरोबा तोडला
ठोकून ठाकून तैयार केला ज्याचे पटके काढले
गेर पटक्या बांधले उचलून शिरावर घेतले
आपल्या राहुळाशी आले ओझे कामठासी टाकले
ज्याची सेजेची कामिना बाईनं पंचारती केली
सुतार ओवाळू लागली गेर तासाशी लागली
जंतर माठ या मांडला गेर जंतरी लागले
सुतारीन ओढे जंतर दोरी सुतार काते नानापरी
भवळा पलंग तयार केला व हिंगूळ ढाळीला
पलंग शिरावर घेतला गेला गिरजाचे वाड्या
येता गिरजाने देखिले ज्याचा सनमान केला
घेतले सुपलीभर मोती टाकले सुताराचे ओटी
सुतार इतक्यात समजेना तान्या वासराची गाय
हे दान दिले सुताराला सुतार खुशालवंत झाला
आपुल्या राहुळीसी गेला भक्त महादेव बोलीला

N/A

References :

संग्राहक: श्री. शा. रा. बाबर

Last Updated : October 17, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP