कुलदैवत - शंकर-पार्वती

मराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.


पन्हाळ्याच्या दुर्गाला येळूसेन राजा
पुत्र नव्हता म्हणून बैरागी झाला
आणि मग अरण्याच्या ठायी गेला
दुपारच्या वेळी वृक्षाच्या छायेला
तिथं जागा लोटायला लागला
त्याला महादेवाची पिंडी लागली हाताला
त्या पिंडेची सेवा कराया लागला
पिंडीवर टिपका झारी बांधली
अशी बारा वर्षे सेवा केली
इंद्रसभेला भोळ्या शंकराला कोडे पडले
शंकर इंद्र सोडून मानवखंडात आले
अरण्याच्या ठायाला बैरागी झाले
पायात खडाव, अंगात जडाव
अंगात भगवे, तिरसूळ हातात
जटा सोडल्या, शंख खांद्याला आणि देव निघून चालला
येळूसेन राजाच्या जवळ वृक्षाच्या छायेला
त्यानं सांगितलं सेवा पुरं कर आता
शिरी हात ठेवायला पाहिजे
इमान भाग द्यायला पाहिजे
शिरी हात ठेविला इमान भाग दिला
काय पाहिजे ते मागून घे मला
येळूसेन राजाने पोटी संतान मागितले
देवाने बेलाच्या झाडाचे बेलफळ तोडले
त्या बेलाच्या फळाचे दोन भंग केले
येळूसेन राजाच्या हातात दोन भंग दिले
देवाने सांगितले येळूसेन राजाला
तुझ्या अस्तुरीला उजवा भंग दे खायला
उजव्या हातचा भंग दिलास तर पोटी पुत्र होईल तुला
डाव्या हातचा भंग दिलास तर कन्यारत्न जन्मल तुला
दोन्ही भंग घेऊन येळूसेन राजा निघून चालला
गेला परत आपल्या वाड्याला
घरच्या अस्तुरीला सांगू लागला
उजव्या हातचं भंग खायला पाहिजे याच वेळेला
घरच्या अस्तुरीनं काय केले त्या वेळेला
फळ खाऊन मुलं होणार नाहीत मला
राणीनं रागाच्या भरात दोन्ही भंग घेतले
ते दोन्ही भंग तुळशीवृंदावनात ठेविले
येळूसेन राजा परत आपल्या नगरी आला
म्हणून नगरच्या नारी बघाया गेल्या
त्या नारी राणीला विचारु लागल्या
राजाने काय किमया आणिली दावाया पाहिजे आम्हांला
राणीने सांगितले त्यांना फळ खाऊन मूल व्हायचं नाही मला
बेलाचे दोन भंग आणले ते काय दावू तुम्हाला
नगरच्या नारी विचारती राणीला
ते भंग कुठं आहेत दाखवा ते आम्हांला
राणीने सांगितले त्यासनी त्या वेळेला
तुळशीवृंदावनात दोन्ही भंग आहेत ठेवलेले
नारीनी तुळशीवृंदावनातील दोन्ही भंग घेतले
राणीची समजूत घालून एक भंग खायला दिला
उजव्या हाताचा भंग राहिला गेला
डाव्या हाताचा भंग खाल्ला गेला
तेथून संपूर्ण महिना राणीचा झाला
एक महिना सरुन दुसरा महिना लागला
असे नवमास पूर्ण झाले
राणी प्रसूत झाली तिला कन्यारत्न जन्मले
पाचव्या दिवशी पाचवी पूजली
सातव्या दिवशी सातवी पूजली
नवव्या दिवशी नववी पूजली
बाराव्या दिवशी बारशाचा आरंभ घातला
राणीच्या महालात पालक-पाळणा बांधला
येळूसेन राजाने नगरीतील ब्राह्मण बोलावले
ब्राह्मण मुलीचे नाव पंचांगात बघू लागले
सकाळचा दिवस दोपारला आला
मुलीचे नाव घावंना त्यांला
भोळ्या शंकराला कोडे पडले इंद्रसभेला
भावू सोडून ब्राह्मणाचं रुप धारण केले
एक सोवळे नेसून एक सोवळे काखेला लाविले
जानवे गळ्यात घालून हातात पंचांग घेतले
देव इंद्रसभा सोडून मानवखंडात आले
येळूसेन राजाच्या दरबारी गेले
येळूसेन राजा सांगू लागला
सकाळचा दिवस दोपारला आला
मुलीचे नाव घावंना कुणाला
मुलीचे नाव ठेवायला पाहिजे या वेळेला
भोळ्या शंकराने पंचांग उघडले त्या वेळेला
चार पाने पालटली नाव घावले नाही त्याला
पाचव्या पानाला नाव घावले त्याच वेळेला
पार्वती नाव ठेवून देवशंकर निघून गेले
राजवाड्यात मुलीचे दिवस लोटाया लागले
महिना नि महिना वर्षान वर्ष लोटत गेले
मुलगी पाच वर्षाच्या वयाची झाली
पित्याला खेळ मागाया लागली
सुवर्णाची सुपली मोत्यानं गुंफली
सुवर्णाचे जाते रुप्याचा खुंटा
एक प्रकारचा खेळ मुलीला दिला
पार्वतीने खेळ वट्यात घेतला
चौकात खेळाचा पसारा टाकला
खेळत खेळत वर्षे लोटाया लागली
पार्वती उपवर बारा वर्षाची झाली
मुलीच्या बापाला कोडे पडले जिवाला
म्हणून बोलावून घेतले प्रधानाला
मंदीर महालात बसून सांगू लागला
पार्वती लग्नाच्या वयाला आली
नवखंड पृथ्वी आणि दहावा खंड काशी
देश दुनिया बघून मुलीजोगा वर बघून
मोठा सोयरा जोडून दारी मांडव घालून
लगीन पार्वतीचे करायचे विचार चालविला
पार्वतीच्या कानावर लग्नाचा उतार गेला
पार्वतीने खेळता डाव बाजूला सारला
पित्याला दोन्ही हात जोडून नमस्कार केला
सांगाया लागली कसला विचार चाललाय
पार्वती आजपर्यंत अज्ञान होतीस
उपवर झालीस लग्नाच्या वयाला आलीस
देश-दुनिया फिरुन मोठा सोयरा जोडून
लग्न तुझे करायचे दारी मांडव घालून
पार्वतीने सांगितले मग आपल्या पित्याला
लग्न माझे करायचे कसे माहिती नाही तुम्हांला
मग पित्याने विचारले पार्वतीला
लग्न कसे करायचे ते सांग मला
मग पार्वती सांगते पित्याला
जन्माचा जोडा जन्माचा चुडा
कधी नाही हालायचा कधी नाही डुलायचा
बिनमरणाचा भरतार पाहिजे मला
अशी पार्वती बोलताना मोठे कोडे पडले पित्याला
देश दुनिया फिरले तरी असा वर मिळायचा नाही हिला
मग येळूसेन राजा रागाच्या भरात बोलतो पार्वतीला
तू लेक नव्हं वादीन आलीस माझ्या पोटाला
जन्माची काळोखी देणार तू मला
असे पिता बोलताना राग आला पार्वतीला
पार्वती सांगते आपल्या पित्याला
वाईट वंगाळ बोलू नका मला
जिकडे फुडा तिकडे मुलूख थोडा करीन या वेळेला
पार्वती रागाच्या भरात निघून चालली त्या वेळेला
जाता जाताच हे वर्तमान कळले तिच्या मातेला
माता माऊली सुखाची सावली विचार केला
पार्वती कुठे चालली बघाया पाहिजे या वेळेला
माता पार्वतीच्या आडवी गेली
जवळ जाऊन विचारु लागली
कुठे जातीस पार्वती सांग मला
पार्वती म्हणते मातोश्री काय सांगू तुला
पुढचे पाऊल मागे घेणार नाही ह्या वेळेला
जन्माचा जोडा नि जन्माचा चुडा
कधी नाही हालणार कधी नाही डुलणार
बिनमरणाचा भरतार मिळेल मला
तर परत येईन तुझ्या नगरीला
असा वर नाही मिळाला मला
तर मी येणार नाही तुझ्या नगरीला
असे त्या मातेने ऐकून मनाचा विचार केला
पार्वतीचा हाट कशात पुरवावा
मातेनं पोटाशी धरलं पार्वतीला
पार्वतीला धरुन चालली सराफकट्ट्याला
सराफदादा जडावाचं दागिने द्या माझ्या लेकीला
भरपूर सुवर्णाचे दागिने घेतले पार्वतीला
निघून चालली शेट्याच्या दुकानाला
शेटीदादा उंची पितांबर द्या लेकीला
सगळा साज सिनगार घेऊन निघून चालली
आपल्या महालात जाऊन पार्वतीला समजाऊ लागली
पार्वती महालात जाऊन पितांबर नेसली
सुवर्णाचे दागिने अंगावर घातले
साज सिनगार करुन हातात आयना घेतला
आणि रुप न्याहाळायला लागली
अंगावरचा साज सुना दिसायला लागला
पार्बतीच्या वाईट वाटले मनाला
साज सिनगार केला पण सुना दिसतोय मला
दागिने काढून धरतीला ढीग लावला
माता सांगते पार्वतीला
आवसकून का केलास सांग मला
कोणती वस्तु मिळाली नाही तुला
पैदा करुन देते ह्या वेळेला
मग पार्वती सांगते मातेला
हे लेणं नव्हं माझं या वेळेला
कोणतं हाय पार्वती सांग मला
पार्वती सांगते आपल्या मातेला
पायातले बिरुदे हातातला चुडा
गळ्यातले डोरले कपाळाच कुंकू
कधी नाही हालायचे कधी नाही डूलायाचे
बिनमरणाचा भरतार कुठं भेटेल मला
असा भ्रतार भेटला तर परत येईन नगरीला
नाही भेटला तर येणार नाही तुझ्या नगरीला
असे म्हणून पार्वती चालू लागली
जाता जाता हणमंताच्या राऊळा गेली
बाळ ब्रह्मचारीला नमस्कार केला
बाळ ब्रह्मचारीने विचारले पार्वतीला
का येणे केले सांग पार्वती मला
देवा सांगते तुला, पण इमानभाग द्यायला पाहिजे मला
देवाने इमानभाग दिला
काय मागणी मागायची आहे तुला
पार्वती सांगते बाळ ब्रह्मचारीला
जन्माचा जोडा आणि जन्माचा चुडा
बिनमरणाचा भरतार कुठे भेटेल मला
बाळ ब्रह्मचारीला कोडे पडले जिवाला
नवखंड पृथ्वीत असा वर मिळायचा नाही तुला
असे सांगताना पार्वती सांगते ब्रह्मचारीला
बिनमरणाचा भरतार दाखवा मला
नाहीतर सत्व गेले म्हणून सांगा
सत्वाचं नाव घेताना सांगतो पार्वतीला
अंजनी मातोश्री तुळशीवृंदावनाला
तप धरले त्या जागेला
मातेकडे जा पार्वती ह्या वेळेला
पार्वती निघून चालली ऋषीमुख पर्वताला
अंजनी मातोश्री हात जोडून तुळशीवृंदावनाला
अशा वेळेला पार्वती तिच्या जवळ जायाला
अंजनी माता बोलली पार्वतीला का येणं केलं सांग मला
पार्वती म्हणते मातोश्री काय सांगू तुला
शिरी हात ठेवा इमानभाग द्या मला
मग सांगते संकट कोडे तुम्हाला
अंजनी मातेने शिरी हात ठेविला
इमानभाग दिला सांगते पार्वतीला
काय कोडे पडेल ते सांग मला
पार्वती सांगते अंजनी मातोश्रीला
जन्माचा जोडा नि जन्माचा चुडा
कधी नाही हालायचा कधी नाही डुलायचा
असा भरतार कुठं हाय ते सांग मला
अंजनी मातोश्री विचार करुन सांगते पार्वतीला
खुळी झालीया पार्वती का वेडी झालीया पार्वती
देश दुनियात असा वर मिळणार नाही तुला
माझं मला पार्वती कोडं पडलंय जिवाला
म्हणून तुळशीवृंदावनाला बसले या वेळेला
पार्वती म्हणते मातोश्रीला कोणते कोडे पडलेय तुम्हांला
काय सांगू पार्वती तुला तान्हा बाळ मी आडवा धरला
पाणी पाजते बसले त्याला
तान्ह्या बाळानं चमत्कार केला
तान्ह्या बाळानं उड्डाण मारायला आणि वृक्षावर चढायला
झाड लागलाय येंगायला ह्या डहाळीवरुन त्या डहाळीला
उड्या घेत गेलाय कुणाच्या मुलखाला
आहे कुणच्या खंडाला हे माहित नाही मला
म्हणून तप धरले आहे तुळशीवृंदावनाला
तू कोडे घातलेयस मला
बिनमरणाचा भरतार कुठं दाखवू तुला
पार्वती बोलते मातोश्रीला सत्व गेले सांगा मला
सत्वाचं नाव घेताना मातोश्री बोलते पार्वतीला
खुळी झालीस पार्वती का वेडी झालीस पार्वती
भरतार नाही सुखाचा, जीव जाईल लाखाचा
पार्वती सांगते मातेला भरताराच्या पायात
जीव गेला तरी हरकत नाही या वेळेला
पण बिनमरणाचा भरतार दाखवा मला
मातोश्री सांगते पार्वतीला ऐक पार्वती ह्या वेळेला
वनाच्या ठायाला किर्रर्र दाट अंधार झाडीला
वनगाईच्या शेणानं सारवून सात सुयांची उतरंड लावून
सुईच्या टोकावर जिभीचा शेंडा ठेवून
उपारटे तप धरले पाहिजे त्या वनाला
एवढे ऐकून पार्वती निघून चालली
भरतारासाठी वनाची वाट धरली
भयासूर वनात जाऊन वनगाईच्या शेणा सारवून
सात सुयांची उतरंड त्यावर जिभीचा शेंडा ठेवून
सर्व देह तोलून तप धरले वनाच्या ठायाला
पार्वतीच्या तपाला दिवस लागले लोटायाला
वनाच्या ठायाला पार्वतीच्या तपाला
वाळव्यानी तपाभोवतन वारुळ चढवायेला
पार्वतीचं तप मुजीवलं बनाच्या ठायाला
पार्वतीच्या तपाला बारा वर्ष होयाला
पार्वतीचं तप अगळी होयला
तपामुळे सूर्याचा रथ बंद पडायेला
सूर्यदेवानं मनाचा विचार केला
मधूनच रथ मागे वळवला
घेऊन गेला आपल्या तळाला
सूर्याची माता बोलते सूर्याला
रथ का हो मागे आला
सूर्य म्हणतो मातोश्रीला काय सांगू माते तुला
मानवखंडात कोणी तप धरले त्या वनाच्या ठायाला
तप अगळी झाले वाट मिळेना मला
जिकडे रथ वळतील तिकडे तप वळते त्या वेळेला
म्हणून रथ घेऊन आलो तुमच्या तळाला
माता सांगते सूर्याला कोणी तप धरले माहिती नाही तुला
बाळा तप धरले तुला जितायला
सूर्यदेवानं रथाला वारु जोडीयला
सूर्यदेव रथात बसायला
रथ आकाशमाथी निघून चालला
पार्वतीचे तप लागला शेंदायला
सूर्याचा रथ खाली येईल त्या वेळेला
तसे तप लागले धरतीला जिरायला
सूर्याचा रथ आला धरतीला टेकायला
तरी काय तप लागेना हाताला
सूर्यदेवाने रथ मागे वळविला
घेऊन गेला आपल्या तळाला
सूर्याची माता विचारते सूर्याला
गेलेल्या कामाचे वर्तमान सांग मला
सूर्य सांगतो मातेला तप गेलो शेंदायला
पार्वतीचे तप लागले भूमीत जिरायला
म्हणून तेथूनच रथ मागे वळविला
माता सांगते सूर्याला ऐक या वेळेला
नेमाप्रमाणे रथ घेऊन जा मध भागाला
चौसष्ट झळा बावन्न कळा सोड त्या ठायाला
तुझ्या झळेनं तप जळून जाईल त्या वनाला
सूर्याचा रथ आकाशमाथी निघून चालला
मध भागाला जाऊन दोपारच्या पारात
चौसष्ट झळा सोडल्या त्या ठायाला
सूर्याच्या झळेनं झाडंझुडं उभी जळाली
पाषाणाच्या लाह्या उडल्या
सूर्याने विचार करुन रथ मागे घेऊन गेला
रथ आलेला पाहून मातोश्रीने विचारले सूर्याला
गेलेल्या कामाचं वर्तमान सांग मला
सूर्य म्हणतो मातोश्री काय सांगू तुला
मोठा अपराध झाला शिरी दोष राहिला
सांगितल्याप्रमाणे झळा सोडून दिल्या
वनातील ओली झाडे जळून गेली
किती पशु पक्षी मरुन गेली
हा चमत्कार बघून रथ आणला तळाला
तपाच्या जोरानं काय प्रकार झाला
तपाच्या जोरानं नवलाखांचं तारांगण डुललं
भोळ्या शंकराच्या गादीला धक्का बसला
खेळता डाव सोंगट्यांचा चुकला
शंकराला कोडे पडले जिवाला
तेहतीस कोटी देव बोलाविले सभेला
शंकराने पैजेचा विडा लावला सभेला
सांगतो तेहतीस कोटी देवाला
पैजेचा विडा उचला या वेळेला
तपाचा शोध लावा मानवखंडाला
तेहतीस कोटी देवांनी फरा धरायला
देव धुंडाळायला लागले त्या वनाला
धुंडाळून कासावीस झाले त्या वनाला
तेहतीस कोटी त्या वनाच्या ठायाला
वृक्षाजवळ जमा झाले एका जागेला
तेहतीस कोटी देवांनी विचार केला
हिंडून फिरुन तपाचा शोध नाही लागणार वनाला
किर्रर्र दाट अंधार झाडी या वनाला
तेहतीस कोटी देवांनी कुर्‍हाडी घ्यायला
त्या वनाच्या ठायाला झाडी डंग तोडायला
अग्नि दिली त्याला धुराचा कोट उठला
तेहतीस कोटी देवांनी फरा धरायला आणि वन लागले धुंडायला
देवांना मागचे काय दिसेना अन काय सुचेना
अन दिशाभूल झाले त्या वनाला
तेहतीस कोटी देव जमले त्या वेळेला
आणि विचार करु लागले त्या वनाला
तपाचा शोध लागेना आपणाला
चला जाऊ या इंद्रसभेला
शरण जाऊ या भोळ्या शंकराला
तेहतीस कोटी देव गेले शंकराच्या सभेला
भोळा शंकर विचारतो तेहतीस कोटी देवांना
गेलेल्या कामाचे वर्तमान सांगा मला
काय सांगू देवा तुम्हांला
आम्हांला जीवदान द्या या वेळेला
तपाचा शोध लागत नाही आम्हांला
तेहतीस कोटी देव शंकराला शरण जाताना
शंकराच्या गादीला नंदी होता त्या वेळेला
देव शरण आलेले बघून हसू आले नंदीला
तेहतीस कोटी देव सांगतात नंदीला
नंदी हसलास ते सांग आम्हांला
नंदी सांगतो त्या देवांला
तेहतीस कोटी वीर गेलासा मानवखंडाला
तपाचा शोध नाही लागला तुम्हांला म्हणून हसू आले मला
त्याच वेळी नंदीने विडा उचलला
सांगतो तेहतीस कोटी देवांना
तपाचा शोध लागला तर येईन या इंद्राला
नाही शोध लागला तर येणार नाही इंद्राला
असा निर्धार करुन नंदी निघून गेला
मानवखंडाला त्या त्या वनाच्या ठायाला
वन लागला सारे धुंडायला
सकाळचा दिवस दोपारला आला
उन्हाने कंठ गेला सोकून नंदीचा
तपाचा शोध लागेना त्या वनाला
नंदीने शंकराचा धावा केला
नंदीने मनाचा विचार केला
वारुळ फोडावं या वेळेला
नंदी वारुळाजवळ गेला
वारुळाभोवती वेढा टाकला
डाव्या पायाचा खरका मारला
डावे शिंग लावले त्या वारुळाला
एवड्यात पार्वती सांगते त्या नंदीला
नंदी महाराज जरा दम धरा
राग थंड करुन थोडे मागे सरा
तुम्हाला सांगते ऐका या वेळेला
मी एक मागणी मागते तुम्हांला
नंदी सांगतो त्या पार्वतीला
काय मागायचे ते माग मला निर्माण करुन देतो तुला
पार्वती सांगते नंदीला धन द्रव्य नको मला
जन्माचा चुडा कधी नाही हालायचा कधी नाही डुलायचा
बिनमरणाचा भरतार द्यायला पाहिजे मला
अशी पार्वती बोलताना कोडे पडले त्या नंदीला
नंदी सांगतो पार्वतीला
असा भरतार मिळणार नाही तुला
पार्वती सांगते नंदीला सत्व गेले म्हणून सांगा मला
आल्या मार्गे निघून जावा
नंदी विचार करुन सांगतो पार्वतीला
पार्वती भरतार नाही सुखाचा जीव जाईल लाखाचा
पार्वती सांगते नंदीला भरताराच्या पायात देहप्राण गेला
तरी हरकत नाही या वेळेला
असे सांगताना नंदीने डावा गुडघा टेकला
उजवे शिंग वारुळाला लाविले
वारुळातून पार्वतीचे तप उतरले
आणि नंदीबरोबर इंद्राला गेले
सर्व देवांचे डोळे दिपून गेले
तेहतीस कोटी देवांनी विचार केला
अशी रंभा गरत पाहिजे आपल्याला
नंदीने सांगितले त्या पार्वतीला
हार घेऊन शोधून काढा शंकराला
पार्वतीने हातात हार घेतला
तेहतीस कोटी देवांत लागली हिंडायला
भोळा देव शंकर दिसेना तिला
सभेच्या लांब दूर पल्ल्याला
शंकराला पाहिले त्या वेळेला
कोणची खूण होता भोळ्या शंकराला
पायावरची पद्‍म ओळखली त्या वेळेला
पद्‍म ओळखून हार घातला शंकराला

N/A

References :
संग्राहिका: सौ. शशिकला पाटील

Last Updated : October 17, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP