पूर्वार्ध - अभंग ८०१ ते ८२३

श्री मुक्तेश्वरी पोथी वाचल्याने आत्मिक समाधान मिळते.


भारतीय आर्थ महर्षी रचित । द्दढ अतर्क्य बुद्धीनें त्यां देखत । विधी विधान असत्य प्रतिपादत । कळों येई ॥८०१॥
नास्तिक मूढ निष्ठुर पाखण्डी । त्याच्या मूढवादाची सत्यता केवढी । मुक्तानंदा हुडकोनी काढी । चौकशी करोनी ॥२॥
आपण कोण जाणी । स्वस्वरूपा शोधोनी । आपुल्यामध्यें आणी । रमुनी राही ॥३॥
जोंवरी आपणांत । न रमसी तोंपर्यंत । मुक्तानंदा स्थिरता प्राप्त । करीशी कोठली ॥४॥
’मी’ पणें जगत दिसे । ’मी’  त देव वसे । मुक्तानंदा ’मम’ धर्म असे ।’मी’ घे शोधुन ॥५॥
स्वप्नावस्थेंत । कण्ठस्थानांत । सूक्ष्म एकोणीस मुखद्वारांत । स्वप्नद्रष्टा जो ॥६॥
शून्य स्थानीं अनेकानेक । कल्पित स्वप्न प्रापंचिक । त्यावरी प्रकाश टाकी विदारक । मुक्तानंदा तो परमात्मा ॥७॥
गाढ सुषुप्ती । परम शून्य निद्रास्थिती । ह्रदयांतील सर्व अभाववृत्ती । भावपूर्ण जो देखे ॥८॥
प्रपंचा लागुनी । शून्य द्दष्टीसे देखुनी । पाही द्दष्टीआड सृष्टी करोनी । शुद्ध आत्मदेव ॥९॥
सहस्त्रारी । ऊर्ध्व मस्तकांतरीं । परम आकाशाच्या अवकाशीं । तेज चिन्मय ॥८१०॥
आत्मानूभूती । नसे का ती । तुरीयातीत स्थिती । परम आनंद तोच ॥११॥
आकाशाच्या पार पलीकडे । ह्रदयाच्याही नजीक सांपडे । दाता सर्वांचा राम चोहींकडे । ज्योतीरूप असे ॥१२॥
क्रियांहुनी भिन्न । जडतापेक्षां अन्य । आवरणापासून । दूर जो आहे ॥१३॥
अव्यय, अखण्डित ज्योती । जेथें जगमगती । सदैव तेथ राहती । तें परमतत्त्व ॥१४॥
तत् त्वम् असि । मग हाय हाय कां करीसी । असा कसा नित्य रडसी । अजाणपणें ॥१५॥
मन बुद्धी वाणी सहित । सर्व अवस्थांचें ज्ञान । आहे तें करणं । जाणुनी घेई ॥१६॥
सूक्ष्माहुनी सूक्ष्म अशा । अंतरामहाज्योतीस देख कसा । शरीरास तेथसा । बघशी कशास ॥१७॥
सर्वज्ञ सर्व प्रकाशक । अशाला सोडुनी आणिक । अंधेरांत नाहक । फिरतोस फुका कां ॥१८॥
द्दष्टीस पडे जें जें । पुरें परशिव समजे । अन्य न जाणीजे । शिवाहुनी भिन्न ॥१९॥
विश्व विश्वम्भराची मूर्ती। कर तीवरी प्रीती । असुं दे ह्रदयीं भक्ती । विश्वप्रेमही ॥८२०॥
विश्वामध्यें विश्वनाथ । अवतरी साथ साथ । शिवदर्शन सर्वांत । करुनी घेई ॥२१॥
ध्यानाचें फलदरूप द्रष्टा । ज्ञानाचें ज्ञाता । मनाचा मंता । सर्व तोच ॥२२॥
साक्षी भासमान जे त्याचा । विज्ञाता जो सर्वांचा । मुक्तानंदा तूंच असे साचा । श्रीनित्यनंदही ॥२३॥

N/A

References : N/A
Last Updated : July 01, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP