पूर्वार्ध - अभंग ५०१ ते ६००

श्री मुक्तेश्वरी पोथी वाचल्याने आत्मिक समाधान मिळते.


प्रेमभरें प्रिय इष्ट मंत्र तें । जपता चिती भगवती होते । प्रसन्न, कारण एकरूप ते । मंत्र भगवती ॥५०१॥
प्रेम वाढवी नित्य जगती परमात्म्याच्या प्रती । अमर बुटी ही प्रीती । मुक्तानन्दा ॥२॥
नारायणस्त्ररूप प्रीती । अन्तरात्म्याची स्थिती । प्रेमच आरती । प्रेमही पूजा ॥३॥
विना प्रेम । होती नेम । रसहीन कर्म । सारे धर्म ॥४॥
प्रेमाचाची सारा । हा जगत‍पसारा । रामाचाच थार । कृष्णही तोच ॥५॥
इंद्रियें निष्काम । कामरहित शुद्ध प्रेम । मुक्तनंदा, तोची परम । नित्यानंद ॥६॥
जप कर तप कर । ध्यान कर योग धर । विधीयज्ञ हवन कर । तरीही ॥७॥
सर्व विद्यांचें करीशी जतन । जगीं देशी जरी भाषण । मुक्तानंदा, प्रेमावीण । सारे जडभार ॥८॥
प्रेमानें परमेंश्वर । वश होऊनि जाणार । करितां प्रेमाचा वापर । सर्पही हो निवींष ॥९॥
शत्रूचा मित्र । प्रेम करी सर्वत्र । मुक्तानंदा, आत्मरूपमात्र । प्रेमच होय ॥५१०॥
प्रेम असे अन्त्ररात्मा । प्रेमची विश्वात्मा । तसेंच जगदात्मा । प्रेमच कीं असे ॥११॥
प्राप्ती म्हणजे प्रेम । जें कांहीं निष्प्रेम । तें साधन होइ श्रम । सारें केवळ ॥१२॥
प्रेमानें पृथ्वी ती । रसमय अन्ना उपजवती । कालानुसार ऋतु बदलती । प्रेमानेंच ॥१३॥
न थकतां वायु वाही । सज्जनांची पूजा होइ । मुक्तानन्दा सारें प्रेमापायीं । प्रेमच राम ॥१४॥
इंद्रियासक्ती । क्रोधपतनाचें मूळच ती । स्वर्गच परमात्मरती । उन्नतीचें तत्त्वही ॥१५॥
आपुल्यावरोनी । जगातें ओळखोनि । सन्मान ह्रदयीं होवोनि । वर्तणें ॥१६॥
गुरु मातापिता मानणें । त्यांप्रती श्रद्धास्नेह ठेवणें । देशाची पूजा करणें । मानवधर्म होय ॥१७॥
स्वधन प्रीती । परधन विरक्ती । स्नेह स्वस्त्रीप्रती । परस्त्रीची पूजा ॥१८॥
अद्वैत भक्ती । वेदान्तोक्त मती । मानवधर्म इती । जाणुनी घेई ॥१९॥
मनुपासुनि निर्मीत । सारें हें जगत । समज एकच असत । मानवगोत्र ही ॥५२०॥
मी मानव समजून । मानव संज्ञेस धरून । करणें आचरण । मानवधर्म हा ॥२१॥
रागद्वेषरहित । भेदाभेद विहीत । स्थिती ही सदोदित । सम असे ॥२२॥
सम गती सम मती । समकृतीयुक्त जगनिर्मिती । भगवानाचीच कलाकृती । समतेनें जगा पाही ॥२३॥
सत् जो होता । पूर्ण सर्वथा । एक पूर्वता । युक्त असोनि ॥२४॥
अवकाश न राही दुजासाठीं । कारण एक पूर्ण जगजेठी । अनेकाकार होण्यासाठीं । पूर्णावतार झाला ॥२५॥
एकाकार परी अपुला । नाहीं बदलला । मुक्तानंदा तो असला । द्वैती नसेच ॥२६॥
निपजेना सतांतुनि । असत् जें असोनि । नारळामधुनि । नोपजे आम्र ॥२७॥
घोडयापासुनि गाय । जन्मते कधीं काय । मुक्तानंदा सच्चिदानन्दमय । जगत आहे ॥२८॥
अगोचर पुरुषाचा विचार । नरनारीचा रूपाधार । करण्या अखिला जगाचा व्यवहार । एकच दो ठायीं ॥२९॥
पति आणि पत्नी । आपणच गेला बनुनी । मुक्तानंदा पाही दोन्हीमधुनि । तव नित्यानन्द ॥५३०॥
शिवशक्तीचें तांडवनृत्य । नरनारीचें हो संसारनृत्य । नसे कसलें सातल्य । आणखी कशाचें ॥३१॥
विवेकें देखतां । ना नर ना नारी तत्त्वता । मात्र  पूरी सत्यता । केवळ नित्यानंद ॥३२॥
माता स्त्री कन्या आणि । दास स्वामी सारे कोणी । एका नारायणाचा पसारा जाणी । मुक्तांनदा ॥३३॥
पिता पुत्र माता । गुरु शिष्य सर्वता । त्या करुणामयाची कारुण्यता । सारी आहे ॥३४॥
नामरूप त्यागोनी । पाही देखोनी । शेष उरे त्यालागोनी । तोचि आत्मा निर्विकार ॥३५॥
व्यवहारी जो भेद । वस्तुतः असे अभेद । दागिने होती विविध । सुवर्ण एकच ना ॥३६॥
क्रिया भेदपूर्ण होतांना भासती । येतीही प्रत्यक्षानुभूती । कारखान्यामधीं विविध आयुधें बनती । तत्त्व एक लोखंड ॥३७॥
ताणा बाणा । वस्त्र गोधडी बिछाना । मुक्तानंदा, सामावलेला असेना । कापूसच ॥३८॥
रंग एक घेऊन । एकच कुचला वापरून । व्यक्तीही एक असून । अनन्त चित्रें चितारिती ॥३९॥
तसेंच ही नर नारी । जतीची एकाच परी । भेदाभेद रचना सारी । ना उच्च ना नीच ॥५४०॥
नरनारी निर्मिती । एकही पंचतत्त्वें तीं । जरी लिंग भेदाकृती । अभेद ज्ञानीसी ॥४१॥
शिवशक्तीचें अभेद ताण्डव । नरनारीचें रूप नव नव । मुक्तानंदा , दोन म्हणुनि ही सावयव । न पाही, न जाणी ॥४२॥
त्या नरातेंही समज नारी । विषयासक्त जो मूढ भारी । असुनि नारी जाण नर तरी । प्ररमार्थी अर्थपूर्ण ती ते ॥४३॥
आहार निद्रा विलास भय । सर्वमाया नारीरूप होय । जितेन्द्रियता आत्मधैर्य । मुक्तानंदा ऐक पुढें ॥४४॥
वैराग्यपूर्ण भक्ति । प्रेममय प्रीती । नराचें यथार्था रूप इति । असेच कीं ॥४५॥
निःसंग त्यागी । एकान्तप्रिय गुरुमार्गावलम्बी । साधनरत व्यवहारकुशल नारी । नरसमान राही ॥४६॥
ब्रह्मज्ञानी गार्गी । जिज्ञासु मैत्रेयी । सती सावित्री । आणखी अनेक ॥४७॥
योगिनी मुक्ताबाई । लल्लेश्वरी आदी । अनुभवी स्त्रीरत्नांहुनी । पुरुषत्व अधिक का ॥४८॥
पूर्ण पतिभक्ती । व्रतांतुनी निष्ठा ठेवी ती । अंतःकरणानें साध्वी सती । व्यवहारींही कुशल ॥४९॥
मुक्तानंदा, अशी गृहिणी । द्दष्टीस पडावी म्हुणुनी । देवही असती राखुनि । अशी इच्छा ॥५५०॥
स्त्रीचा करी सम्मान । नारी असे महान । मोहाग्नीमधें होऊनि जलन । तेज लोपविण्या नसे ती ॥५१॥
संबोधी सर्वां माता म्हणुन । नारीही परमप्रिय असुन । ठेवी पूज्य भाव दूरून । महाग्नी ती असे ॥५२॥
आहे मातृस्थान । जगतीं महान । मातृदेवो भव म्हणुन । श्रुती वदतसे ॥५३॥
मातृसेवेंतुन । प्रकट होऊन । देतसे दर्शन । परमेश्वर ॥५४॥
नकोस स्त्रीतें निंदूं । पापी द्दष्टीनें नको बघूं । मुक्तानन्दा, प्राप्त परमानन्दु । नारीभक्तीनें ॥५५॥
जन्मसी स्त्रीगर्भांतुनि । वाढसी स्तनपान करूनि । मुक्तानन्दा, तीस दोषुनि । मरसी कशास ॥५६॥
स्त्रियांत महान योगिनी । महान कित्येक राणी । सती पतिव्रता आणि । मुक्तानन्दा स्त्री महान ॥५७॥
मानवा स्त्री तव जन्मस्थान । विलासी भूमी केवळ न । स्वर्ग जाइ नरक बनुन । सदोष द्दष्टीनें ॥५८॥
सीता दमयन्ती सावित्री । तारा अहल्या गायत्री । मदालसा लल्ल योगिनी आदि स्त्री । केवढया श्रेष्ठ ॥५९॥
स्त्रीत्व हानीनें नाश होइ राष्ट् । भ्रष्ट स्त्री करी  संसार नष्ट । मुक्तानंदा, जेथ स्त्री न पवित्र सुष्ट । तेथें जाऊं नको ॥५६०॥
नारीधर्माचा करतां नाश नर । जगामध्यें तदा पूर्ण पापाचार । बॉम्बफेकीचें काम न पडणार । अशा राष्ट्रीं ॥६१॥
करणें जर राष्ट्र नष्ट । होतां स्त्रिया आचारभ्रष्ट । अन्य कारण नको अनिष्ट । त्यापरतें ॥६२॥
होतां भ्रष्ट नारी । जगताची, पुण्याची हानी भारी । नरकाची महान खाण ती तरी । जाणी मुक्तानंदा ॥६३॥
पतिसेवाविन्मुख असत । पुत्रस्नेह-रहित । मुक्तानंदा, अशी कुलाचार भ्रष्ट । महामारीच कीं ॥६४॥
कलहप्रिय स्वैराचारी । न मानी पती, धर्म,  घर, नीती सारीं । मुक्तानंदा, नारीरूपी ऐसी नारी । नरककुण्ड ॥६५॥
सुरापानी बहुउभाषी । कलहपूर्ण मति स्वैरवषेभूषी । मुक्तानंदा, प्रकट नरकरूपी अशी । ओळख ॥६६॥
लवकर उठी जी । लवकर निजी । परमात्मा पूजी । आणखी नित्य ॥६७॥
मातापित्यास दे मान । करी सर्वांचा सम्मान । सुखी होइ जीवन । तेणेंकरोनि ॥६८॥
वीर्यत्यागाहुनी । मलत्याग श्रेष्ठ असुनी । मलावरोधांनीं । रोग उपजती ॥६९॥
वीर्याची रुकावट । तेजोबलाची वृद्धी करत । मुक्तानंदा, वीर्याची करामत । जाणुनी घेई ॥५७०॥
कन्या ऋतुहीन । पुत्र यौवनहीन । रसनाश करून । आरोग्यसुख कैसे ॥७१॥
इंद्रियलोलुप मानवी जीवन । तेथ राष्ट्र विजयवान । तसेंच कान्तिमान । न बने ॥७२॥
नसे ज्या जीवान्तरीं । इंद्रियनिग्रह परी । मानवता कुठवरी । रही ॥७३॥
प्रेमानें सौंदर्यानें । तसेंच अत्यादरानें । जरी जीवन जगणें। इंद्रियनिग्रहा करी ॥७४॥
राही आश्रमीं वा घरीं । असे मालक वा करी चाकरी । आश्रमीं राहणें जरी । आश्रमधर्मा पाळी ॥७५॥
आश्रामांत राहुनी । आश्रमधर्मा न पाळुनी । असे जरी विश्वस्त म्हणुनी । परी अनादरणीय होई ॥७६॥
राखा आश्रामाची शुद्धता । नका बिघडवूं निर्मलता । योगशक्तीनें, आश्रमवासी जनता । ब्रह्म बनाल ॥७७॥
सर्व जातींसाठीं ठेवीना । आश्रम जरी समभावना । मग काय आपपर भावना । शिकणें आश्रमीं ॥७८॥
जाती कुलगोत्राचा भ्रम । न राहुं दे आश्रम । आत्मीयतेच्या पूजनाचा धर्म । असे आश्रामाचा ॥७९॥
जन्मीं न जाती जमाती । मरणोत्तरही न राहती । मुक्तानंदा, आंगोपांगीं न भिनती । दूर राही जातीपासूनी ॥५८०॥
जाती कुलगोत्राचें तत्त्व । ओळख एक मूलतत्त्व । मूल जाती परमतत्त्व । उपयोगाचें ॥८१॥
यदि जाती गोत्रानें खटकते । वा नीतीनें अटकते । मुक्तानंदा, बन्धनकारक तें । नव्हे का ॥८२॥
संकल्पाचा न्यस । तोचि संन्यास । सर्व जातींचा विन्यास । कर्मत्यागही तोच ॥८३॥
संन्यास निरुपाधिक । ’मी ब्रह्म’ वदे आणिक । मुक्तानंदा, जाती अधिक । उपाधी राही ॥८४॥
मुंगी तों ब्रह्मदेवापर्यंत । देहद्दष्टीसे त्यां देखत । शरीरें सारीं पंचभूत । मूळ असती ॥८५॥
सर्वांमधला प्राण । क्षुधातृषेचें कारण । मनाचें रूप अंतःकरण । होऊनी राही ॥८६॥
शरीरें जरी अनेक । परी आत्मा एक । मुक्तानंदा, सर्वव्यापक । आत्मैक्य द्दष्टीसें ॥८७॥
बनला पंचभूताकार । जातीरहित भगवंत साकार । आत्मा तत्त्वातीत निर्गुणाकार । मुक्तानंदा, जातीविरहित ॥८८॥
शरीरादि तत्त्वें पंचवीस । पंचीकरण घडवी शरीरास । पंचतत्त्व जाती खास । मात्र देहाची ॥८९॥
आत्म्याची जाती । चैतन्य असे ती । मुक्तानंदा ह्याच दोन असती । इतर नसती ॥५९०॥
परमात्मा ही जाती । परमात्मा ही नीती । परमात्मा ही प्रीती । सारे परमात्मा ॥९१॥
बनुं दे तव जाती । परमात्म्याची जी ती । मुक्तानंदा, सुखी होती । तेणेंकरूनी ॥९२॥
मन होतां अमन । जाइ महादेव बनुन । जीव बने मन राहुन । शिवच जीव होई ॥९३॥
परमात्मा नित्य प्राप्ता जरी । देखतां ह्रदयान्तरीं । मनाची अशुद्धि कारण तरी । अप्राप्य भासवी ॥९४॥
जीवाअ तूं अन जीव । जीवनदाता तो देव । गुरुकृपाप्रसाद पाव । मग हें घडेल ॥९५॥
निद्रित मनाचें रुदान । निद्रित मन कारण । जागृत मन रडे अकारण । ज्ञान-अभावें ॥९६॥
मनीं गंगा मनीं काशी । मनीं पूजा मनीं ध्यानीशी । ज्ञान, राम, शिव पाहशी । मनामधेंच ॥९७॥
मुक्तानंदा मनांत । जें नाहीं वसत । तें कोठेंही नसता । कधींही न दिसे ॥९८॥
पूजी मन, ध्यायी मन । करी सम्मान, सर्वही मन । मनीं नसतां पूजा ध्यान मान । पावशी कोठें ॥९९॥
राखी मन सदा मस्त । मन निजविश्रांतीची मदत । स्थिर न मन जेथ । काय गवसेल तेथ ॥६००॥

N/A

References : N/A
Last Updated : July 01, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP