श्रीज्ञानेश्वरसमाधी महिमा - अभंग ४५ ते ५०

श्रीसंतज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतलेली पाहून श्रीनामदेवांना भरून आले आणि त्यांनी श्रीसंतज्ञानेश्वरांच्या स्तुतीपर हे अभंग लिहीले.


४५
ऐसी स्तुति नमनाची । केलिया भगवंताची ।
ऐकतां जाली रुची । म्हणे धन्य धन्य रे सख्या ॥१॥
कैसी स्तुति परिकर । जपतां नामावळी साचार ।
वेगीं तुष्टले हरिहर । निज ब्रह्म स्वरुप ॥२॥
वैष्णव सभोंवते उभे । तिहीं जयजयकार प्रतिभे ।
करुनि रुक्मिणीवल्लभे । तया प्रसाद दिधला ॥३॥
मागुता ज्ञानदेव वदे । धन्य धन्य तुझीं चरणारविंदें ।
तेथें रातलिया योगिवृंदें । ते चरण धन्य धन्य ॥४॥
पुंडलिकें स्तवन । मांडावें तंव नारायण ।
म्हणे सन्मुख उभा सोपान । यासी समाधि देणें लांगेल ॥५॥
निवृत्ती मुक्ताई दोघें । तीं बुझाविलीं पांडुरंगें ।
उद्धव अक्रुर वेगें । तया संगें निरविलीं ॥६॥
ज्ञानदेवासी उद्धव । बोले एकांतीचा भाव ।
तुम्हां तुष्टला देवाधिदेव । धन्य धन्य वैष्णव तुम्ही ॥७॥
ज्ञानदेव म्हणे स्वामी । दीनें रंकें विठोबाचे आम्ही ।
धन्य धन्य भाग्याचे तुम्ही । जे निरंतर विष्णुसंगें ॥८॥
उद्धव म्हणे ज्ञानेश्वरा । आम्ही जाणो कृष्णावतारा ।
परि पांडुरंग मूर्ति निर्धारा । तूं आणि पुंडलिक जाणसी ॥९॥
नामा म्हणे ज्ञानदेवें मागुतें स्तवन आरंभिलें भावें ।
तें ऐकवया देवें । एकचित्त केलें ॥१०॥

४६
कर जोडोनियां पुढें । लोटांगण टाकिलें गाढें ।
म्हणे स्तवन करावया मी वेडें । काय जाणे तुझा महिमा ॥१॥
तरी पांडुरंगा तूं दयाळु । भक्त भाविकां कृपाळु ।
भीमातटीं उभा गोपाळु । पुंडलिकाकरणें ॥२॥
चंद्रभागा सरोवरीं । निरे भिवरेचां तिरिं ।
वाट पाहसी हरी । भक्तासाह्या कारणें ॥३॥
तरी उदार शूर महिमेचा । खुंटलिया चारी वाचा ।
तेथ पवाडु मज कैंचा । वर्णाविया सामर्थ्य ॥४॥
शेषा ऐसा स्तुती करी । तया नाकळ्सीच श्राहरि ।
जिव्हा चिरलिया भग्नधारी । मग मौन्येंचि राहिला ॥५॥
तो तूं अळंकापुरीं येसी । मज दीना समोखिसि ।
देव म्हणे तूं होसि । साक्षात ज्ञानरुप ॥६॥
ज्ञानदेवो साक्षात नाम तुझें । तें ज्ञान ह्रदयीचें माझें ।
हे जन तारावया काजें । तुवां अवतार घेतला ॥७॥
नामा म्हणे देव हरी । पुढतोपुढतीं साहाकारी ।
वर देऊनि अंगिकारी । आपणची जाला ॥८॥

४७
तव अंतरिक्षीं गगनीं । देव बैसोनि विमानीं ।
वर्षताती दिव्य सुमनीं । पांडुरंगावरी ॥१॥
विठोबा गुणनिधी । सवें पुंडलिक सुबुद्धि ।
लघिमा आणिमादी सिद्धी । सवें असती ॥२॥
मग नेमिलिया तिथी । कृष्णपक्ष अष्टमी समर्थीं ।
नाम संकीर्तन संतसंगतीं । तो ब्रह्मप्राप्ति पावला ॥३॥
नवमीं गजर कथेचा । तरि वैष्णव तोचि साचा ।
चतुर्भुज होईल हे वाचा । वदोनियां गेले ॥४॥
सहज ते दशमी । दिंडी जागरण आश्रमीं ।
तो येईल वैकुंठ ग्रामीं । कीर्तन करीतची ॥५॥
एकादशी श्रेष्ठ गाढी । नामस्मरणें कोटीयाग जोडी ।
येकी घडी युगाएवढी । एवढें सामर्थ्य इयेचें ॥६॥
एकादशी दिननिशीं । जागरणीं ह्रषिकेशी ।
कीर्तन करी अहर्निशीं । तरि तो तारिल सर्व जनां ॥७॥
द्वादशीस क्षीराब्दी । कीर्तन करील आल्हादीं ।
तो पावन होईल गोविंदीं । निजपदीं विष्णूचा ॥८॥
त्रयोदशीं उत्तम थोर । करिल दिंडी पताका गजर ।
टाळ मृदुंगे झणत्कार । तरि तो सकळ कुळ तारील ॥९॥
नामा म्हणे चतुर्दशीं । अमावस्येचा दिवशीं ।
ज्ञानदेवीं राहेल नेमेंसी । तरी तो तरैल भूतकाळीं ॥१०॥

४८
ऐसें वदोनि पांडुरंगें । समस्तांसी वस्त्रें दिली अंगें ।
देऊनि भूषणें अनेगें । रत्नमुक्ताफळें अलंकार ॥१॥
धन्य जन्मले भूमंडळीं । कीर्तनीं नाचती गदारोळी ।
ते विष्णुसन्निध सर्वकाळीं । ऐसें वनमाळी बोलिले ॥२॥
राही रुक्मिणी सत्यभामा । विचारिती पुरुषोत्तमा ।
बहुत विठोजी जंववरी धरा । तंववरि समाधि स्थिरा ।
हरिकीर्तन करितो सैरा । चतुर्भुज होईल ॥४॥
हें शिवपीठ शिवाचें । हेंचि पूर्वस्थान अगस्तीचें ।
जाणोनि जन्म जाले चौघांचे । सर्व क्षेत्रांची आदिभूमि ॥५॥
पूर्वापार युगायुगीं । अनेक पुण्यें घडले यागीं ।
तपें तपिन्नलें महायोगी । तो हा आळंकापुरें ठावो ॥६॥
येथें रामकृष्ण कथा । जो करील सर्वथा ।
तो पुढें पवेल व्यथा । भवबंधापासुनी सुटेल ॥७॥
सप्तद्वीप नवखंड । आणि अवघें गणितां ब्रह्मांड ।
त्याहूनि हें हो उदंड । पुण्य जोडेल नामें ॥८॥
ऐसें उत्तमोत्तम थोर । सकळ जीवांचे माहेर ।
नाम घेतां तरती चराचर । दिला वर रुक्मिणीवरें ॥९॥
नामा म्हणे देवराव । महिमा सांगतसे भाव ।
धन्य आळंकापुरी गांव । आदि ठाव वरिष्ठ ॥१०॥

४९
नित्य अनुष्ठान ये तीर्थीं । त्याचे पूर्वज उद्धरिती ।
जे कां अन्नदान करिती । ते पार्वती वैकुंठीं ॥१॥
ऐसें तीर्थक्षेत्र सर्वोत्तम । आणिक नाहीं यासी सम ।
शिवपीठ हें मनोरम । आळंकापुरीं हें देख ॥२॥
न वर्णवे येथिंची थोरी । जेथें साक्षात श्रीहरि ।
येऊनियां झडकरी । ज्ञानदेवा समाधि दिधली ॥३॥
अनंत पुण्य ज्याचें गांठीं । तरीच ज्ञानदेव पडे दिठी ।
जोडे तप कोट्यानुकोती । ऐसे धूर्जटी बोलिले ॥४॥
सिद्ध साधकांचे स्थळ । सर्व तीर्थाचें हेंचि मूळ ।
वास केलिया सर्वकाळ । तरी महादोष हरतील ॥५॥
अजान वृक्षातळीं हरिकथा । नित्य जो नर करी तत्वतां ।
तो न जाय यमपंथा । ऐसें जगन्नाथ बोलिले ॥६॥
द्वारीं सुवर्णाचा अश्वत्थ । नित्य पूजलिया स्वस्थ ।
लक्ष्मी न सांडी तया सत्य । सकळ आर्ती पूर्ण होती ॥७॥
नित्य प्रदक्षिणा सप्त । तरी अगाध पुण्य त्वरित ।
पूर्वज्क वैकुंठासी जात । बेचाळिसां सहित ॥८॥
नित्य विष्णूचें पूजन । नित्य नाम संकीर्तन ।
नित्य वैष्णव संत भोजन । धन्य पावन इहलोकीं ॥९॥
नामा म्हणे आळंकापूर । सर्व क्षेत्रामाजीं मनोहर ।
पवित्रासी परम परिकर । त्रिभुवनीं दुर्लभ ॥१०॥

५०
ऐसें तीर्थ सर्वोत्तम । सांगतसे पुरुषोत्तम ।
शंकरादि परमधाम । ब्रह्मनाम वर्णित ॥१॥
क्षेत्रमहिमा अति अद्‌भुत । आदि सिद्धेश्वर कुळदेवत ।
समर्थ महाभागवत । नामें गर्जत सर्वकाळ ॥२॥
म्हणे पुंडलिक पूर्वींचे स्थळ । आणि शिवाचें मूळपीठ निर्मळ ।
तेथें निर्विकल्प सोज्वळ । तप विशाळ जोडिले ॥३॥
क्षेत्र पंढरीहुनी अधिक । ऐसें बोलती ब्रह्मादिक ।
म्हणती धन्य येथिंचे लोक । शुद्ध भाविक प्रेमळ ॥४॥
घडे महाविष्णूचें पूजन । तीर्थ व्रत संध्यास्नान ।
वाचे हरिनाम कीर्तन । श्रवणीं गुण विष्णुचे ॥५॥
विठोजी म्हणे ऐक भक्ता । तपोनिधी महंत तूं सर्वथा ।
ज्ञानदेवासारिखा वक्ता । मज आवडता न दिसे ॥६॥
तुम्ही दोघे असा या सृष्टीं । जग उद्धारीं पाटोवाटीं ।
कीर्तन करितां उठाउठीं । तो वैकुंठीं पावावें ॥७॥
पुंडलिकें नमस्कारिले हरी । चरणचज वंदिले शिरीं ।
म्हणे मी भाग्याचा उजरी । तूं कैवारी आमुचा ॥८॥
नामा म्हणे देशभक्त । एक होऊनि समस्त ।
निवृत्तिराज स्तुति बोलत । प्रेम अद्‌भुत दाटलें ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : January 02, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP