श्रीनृसिंहपूर क्षेत्र माहात्म्य - अध्याय १२

श्रीनृसिंहपूर क्षेत्राचे माहात्म्य वाचल्याने प्रत्यक्ष त्या क्षेत्री गेल्याचे पुण्य मिळते .


पार्वतीने शंकरांना म्हटले , भगवन् ‍, आपण नृसिंहपूर या क्षेत्राच्या यात्रेविषयी सांगितले , ते ऐकले . आता या भक्तवत्सल श्रीहरिपूजेचा प्रकार आपण मला सांगावा . भगवान शंकरांनी म्हटले , देवी , अनंत रुपा व्यक्त असणार्‍या श्रीहरीच्या पूजनाचे प्रकारही विविध आहेत . परमात्मरुप ईश्वर केवळ साक्षी आहे . तथापि लोकांच्या कल्याणासाठी श्रीनरहरी पूजेचा विधी मी थोडक्यात सांगतो . भाविकांच्या अधिकारानुरुप या पूजेचा विधी , वेदोक्त , मिश्र व तांत्रिक असा तीन प्रकारे करतो येतो . वैदिक मंत्रांनी केलेले पूजन ते वेदोक्त होय . पुराणातील मंत्रांनी केलेले ते तांत्रिक पूजन असते ; आणि वैदिक व पौराणिक अशा दोन्ही प्रकारे केलेले पूजन मिश्र प्रकारचे होय . यापैकी कोणत्याही एका प्रकारे पूजन केले ; तरी नृसिंहकृपेने भक्तांच्या कामना पूर्ण होतात . ईश्वर परात्पर व सर्वव्यापी असल्याने वास्तविक पूजन कठिण आहे . परंतु मानव भावयुक्त अशा पार्थिव पूजेने भगवंताला प्रसन्न करु शकतो . हे पार्वती , अनंत रुपे धारण करणार्‍या प्रभूची , पार्थिव , जलरुप , अग्नि वा वायुरुप अशी कोणतीही प्रतिमा करुन श्रद्धेने पूजन केले असता , अंतर्यामी अखंड वास करणार्‍या श्री नृसिंहाला संतुष्ट करता येते . उत्कट भावाने , अग्नीत हवन करुन , वा उदकाने अभिषेक करुन श्री नरहरीचे पूजन करावे . श्री नृसिंह प्रतिमा वालुकामय , चंदनाने काढलेली , चित्ररुप , काष्ठमय , शिलारुप , रत्नरुप , धातूची वा मृण्मयी अशा आठ प्रकारची असते . अशा प्रतिमांचे आवाहन व विसर्जन करतात . चित्ररुप प्रतिमेला फुलाने सिंचन करावे . गंधलेपन करु नये . वैदिक मंत्रानी ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेली असेल , तिचे विसर्जन करु नये . तसेच ज्या मूर्ती सहज उचलून नेणे शक्य असते ; त्यांचेही आवाहन व विसर्जन करु नये . आता भक्त प्रह्‌लादाने स्थापना केलेल्या वालुकामय मूर्तीच्या पूजनाचा विधी पाहा . पहाटेचे विधी आटोपल्यावर मृत्तिकाधी लावून समंत्र स्नान करावे . धूतवस्त्र परिधान करुन संध्यावंदन करावे . मग पूजासाहित्य घेऊन भक्तिभावाने नृसिंहमूर्तीस वंदन करुन बसावे . नंतर मौन धारण करुन प्राणायामाने आत्मशुद्धी करावी . आपल्या अंतःकरणात ओंकाराचे स्वरुप असणार्‍या परात्पर अशा नृसिंहाचे ध्यान करावे . यामुळे अंतःकरण शुद्ध , दिव्य व व्यापक होईल . अशा उद्दात्त स्थितीत परमात्मचिंतन करीत जवळच असलेल्या सगुण वालुकामय मूर्तीचे पूजन करावे . प्रथम सोळा शक्तींनी युक्त असणार्‍या पीठाचे पूजन करावे . नंतर महाचक्रानुसार ब्रह्मा , विष्णु , महेश इ . ची महामंत्रांनी पूजा करावी . पीठस्थ मूर्तीच्या अणूरेणूत श्री नृसिंह व्याप्त आहे . ह्या मूर्तीचे पाद्य , अर्ध्य स्नानादि झाल्यावर वस्त्र , यज्ञोपवीत , अलंकार , गंध , फुले , धूप , दीप आदि करावे . नंतर नैवेद्य , फल , विडा व दक्षिणा अर्पण करावी . स्तोत्रगायन करावे . छत्रचामर इ . उपहार अर्पण करावेत . प्रदक्षिणा व वंदन करुन विनम्र व्हावे . पुष्पांजली वहावी . नैवेद्य ब्राह्मणांना अर्पण करुन शेष नैवेद्य प्रसाद म्हणून श्रद्धेने भक्षण करावा .

देव , अग्नी व ब्राह्मण यांचे एकाग्र चित्ताने पूजन केले असता सर्व कामना पूर्ण होऊन मुक्ती प्राप्त होते . या क्षेत्रात फुले , तुलशी आदींच्या बाग तयार करील , त्यास चिरकाल स्वर्गसुखांचा लाभ होईल . श्री नृसिंहपूजनावर निर्वाह जो करील त्याला अश्वमेध यज्ञाचे फळ मिळेल . या क्षेत्राच्या जार्णोद्धाराचे मोठेच माहात्म्य आहे . यामुळे विष्णुपदाचा लाभ होऊन स्वरुपानंद प्राप्त होईल . या क्षेत्राविषयी विपरीत आचरण केल्याने कुंभिपाकासारख्या घोर नरक यातना प्राप्त होतील . हे पार्वती , असे हे मोक्ष दायी असणारे या क्षेत्राचे माहात्म्य मी तुला कथन केले . पार्वती म्हणाली की , या परमपावन नृसिंहक्षेत्राचे माहात्म्य ऐकून मला अत्यंत आनंद झाला आहे . आता आपणास एक प्रार्थना आहे , की आपण लोककल्याणासाठी या क्षेत्रात माझ्यासह नित्य वास्तव्य करावे . यावर शंकरांनी म्हटले की , हे पार्वती , ब्रह्मा , विष्णु , व महेश असे आम्ही तिघेही या नृसिंहमूर्तीत वास्तव्य करीत आहोत , यात संशय नाही . याकरिता जे कोणी आम्हा तिघांत भेदभाव करतील . त्यांना परमार्थ प्राप्त होणे शक्य नाही . या मूर्तीत आम्ही तिघे एकात्म आहोत .

वरील गोष्ट परमगुह्य अशी आहे . सात प्रमुख ऋषी , मुनिवर्य नारद , गरुड , प्रल्हादादि भक्त आणि अनेक जीवनमुक्त माहात्म्यांना विदित आहे . श्रेष्ठ भक्तांना या दिव्य ज्ञानाने परमपदास जाता येते . या दिव्य ज्ञानाचा जे अनादर करतात . त्यांना विविध बंधनात राहावेच लागते . त्यांना मोक्ष शक्य नाही . हे पार्वती , तू म्हणालीस त्याप्रमाणे तुझ्यासह मी या क्षेत्रात नित्य वास्तव्य करीन .

हे नृसिंहपूर या क्षेत्राचे माहात्म्य जो पठण करील वा श्रवण करील ; त्याला श्रेय व प्रेय यांचा लाभ होईल . या लक्ष्मीनृसिंहाच्या भजन पूजनामुळे सर्व तीर्थ स्नानांचे , व वेदपारायणाचे समग्र फल प्राप्त होते . असे सांगून सूत म्हणाले , ऋषीजनहो , या क्षेत्राचे माहात्म्य वर्णन केल्यावर भगवान शंकरांनी पार्वतीसह , श्रीनृसिंहमूर्तीत प्रवेश केला . असे हे या क्षेत्राचे माहात्म्य विस्ताराचे वर्णन केले आहे . ही कथा भगवान व्यासांनी वैराग्य संपन्न शुकाचार्यांना सांगितली , श्रीनरहरीच्या सायुज्ज पदाची प्राप्ती करुन देणारे हे माहात्म्य श्रवण केल्यावर सर्व ऋषीजन आनंदित मनाने आपापल्या ठिकाणी परत गेले . आपल्या जीवनात अल्पशा दुःखाचीही बाधा होऊ न देण्याचे सामर्थ्य , या कथेने पुण्यशील भक्तांना लाभेल , हे भगवान नृसिंहाचे आश्वासन आहे .

याप्रमाणे ‘हरिपूजा विधि वर्णन ’ नावाचा बारावा अध्याय पूर्ण झाला ; आणि पद्मपुराणातील नृसिंहपूर माहात्म्यही .

N/A

References : N/A
Last Updated : March 17, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP