श्रीनृसिंहपूर क्षेत्र माहात्म्य - अध्याय ११

श्रीनृसिंहपूर क्षेत्राचे माहात्म्य वाचल्याने प्रत्यक्ष त्या क्षेत्री गेल्याचे पुण्य मिळते .


देवी पार्वती शंकरांना म्हणाली , की आपल्याकडून येथील पवित्र तीर्थांचे अभ्दुत असे माहात्म्य मी ऐकले . ही तीर्थे मोक्षदायी व दुरितांचा नाश करणारी आहेत . आता आपण मला या तीर्थक्षेत्राची यात्रा केव्हा करावी ते सांगावे म्हणजे भक्तांना ते फलदायी होईल . यावर शंकर म्हणाले , देवी , या क्षेत्रास यात्रेकरिता तीनप्रकारे येणे फलप्रद आहे . वर्षातून निदान एकदा , मासिक यात्रा , आणि दैनंदिन यात्रा अशाप्रकारे मुनिवर्यांनी केलेल्या आहेत . वैशाख शुद्ध चतुर्दशी , व्यतिपात व स्वाती नक्षत्र अशा योगाला नृसिंहजयंती म्हणतात . अशा पर्वकाळी वार्षिक यात्रा करावी . या समयी संगमात स्नान , ध्यान , जप इ . कर्मे करणार्‍यांना मोक्षलाभ होतो . यावेळी येणे शक्य नसेल तर रामनवमी गोकुळ अष्टमी अगर महिन्यातील शिवरात्रीला येऊन दर्शन , उपोषणादि करावे . श्रीं नृसिंहांनी सायंकाळी हिरण्यशिपूस मारले असल्याने जे सायं समयी दर्शन घेतील , त्यांना मुक्ती मिळेल . पर्वकाळी गोतीर्थात स्नान करुन नृसिंहपूजन करावे . संक्रमण , ग्रहण व रविवार अशा पर्वकाळी भानुतार्थात स्नान जपादि करावे .

श्री नृसिंहांनी सोमश्रावण योगावर भक्त प्रह्‌लादाला दिव्यरुप दाखविले . यामुळे या योगावर जे यात्रा करतील त्यांना मासिक यात्रेचे पुण्य मिळते . प्रातःकाली , मध्याह्री व सायंकाळी अशा तिन्ही वेळी दर्शन घेतल्याने दैनंदिन यात्रेचे फळ मिळते . या क्षेत्री नृसिंह जयंती , शिवरात्र , व एकादशी या दिवशी उपोशण केल्याने जीवनाचे सार्थक होते . पर्वकाळी सर्व दुरिते अन्नाचा आश्रय करतात , म्हणून उपोषण योग्य आहे . रामनवमी , जन्माष्टमी , वामनद्वादशी , नृसिंहजयंती , एकादशी या दिवशी उपोषण करणे कल्याणदायक आहे . यादिवशी दर्शन , पूजन , दानादि करुन दुसरे दिवशी पारणे करावे . श्रीनृसिंहाचा पूजाविधी ,आरती यावेळी होणारे प्रभूचे भावपूर्वक दर्शन फार फलदायी असे आहे . नैवेद्य अर्पण करते वेळी दर्शनास जाऊ नये . नंतर मात्र प्रसन्न अशा प्रभूचे भावदर्शन करावे . हेतुपूर्वक दुराचरण करणार्‍या , निंदक , हिंसावृत्तीच्या लोकांनी या क्षेत्री राहू नये . नित्य सदाचरण करुन येथे राहाणारे प्रत्यक्ष देवच आहेत , असे समजावे . त्यामुळेच या क्षेत्रात प्रवेश करताच दुरितांचा नाश होतो . श्रीनृसिंह हे मृत्युंजय आहेत , म्हणून भक्तांना प्रत्यक्ष यमदूतांची भीती नाही . या या नृसिंहप्रभूच्या नित्य नामस्मरणाने पवित्र झालेल्या श्रेष्ठ भक्तांना दुर्लभ अशा विष्णुपदाची प्राप्ती होते . हे पद योग्यांनाही दुर्लभ असे आहे .

याप्रमाणे ‘यात्रानिर्णयवर्णन ’ नावाचा अकरावा अध्याय संपला .

N/A

References : N/A
Last Updated : March 17, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP