श्रीनृसिंहपूर क्षेत्र माहात्म्य - अध्याय ४

श्रीनृसिंहपूर क्षेत्राचे माहात्म्य वाचल्याने प्रत्यक्ष त्या क्षेत्री गेल्याचे पुण्य मिळते .


या जगात नृसिंह अवतीर्ण झाल्याचे जाणून पार्वतीने विचारले की , महातस्वी प्रल्हाद हा दैत्य कुळात कसा जन्मला . राक्षस तर क्रूर , दुष्ट आणि अहंमन्य असून मुनीजनांना पीडा देत असतात . अशा दुष्ट राक्षसकुलात तपोधन मुलगा कसा जन्मला ? यावर शंकर म्हणाले की , पूर्वी जय विजय या नावाचे भगवान विष्णूचे द्वारपाल होते . सनक , सनंदन हे ब्रह्मदेवाचे मानस पुत्र विष्णूंच्या दर्शनांसाठी आले असता द्वारपालांनी प्रतिबंध केल्याने रागावून त्यांनी जय व विजय यांना , ‘तुम्ही राक्षसकुलात जन्म घ्याल ’, असा शाप दिला . यामुळे ते दोघे दितीच्या पोटी जन्म पावून हिरण्याक्ष व हिरण्यकशिपु या नावाने प्रसिद्धीस येतील . हे दोघे दैत्य देवांना पराजित करुन राज्य करतील . नंतर वराह रुपाने हिरण्याक्षाला भगवान ठार करतील , आणि त्याचा उद्धार करतील . नंतर आपल्या बंधूच्या मृत्यूमुळे दुःखी होऊन हिरण्यकशिपु हा सर्व ऐश्वर्याचा त्याग करुन उग्र तपश्चर्या करील , तो पुष्कळ वर्षे तपस्या करीत असतानाच इकडे इंद्र त्याचा राजधानीचा नाश करुन त्याची पत्नी कयाधू हिचे हरण करील ; तिला आपल्या नगराकडे नेऊ लागेल . शोकाकुल व गर्भिणी अशा कयाधूला नारद वाटेत पाहातील . तिला सोडून देण्याची रदबदली करुन तिला मुक्त करतील . ती साध्वी कयाधू नारदांना पित्यासमान मानून सेवाव्रताने त्यांच्या आश्रमात पतीची प्रतीक्षा करीत राहील . देवर्षी नारद त्रिकालज्ञ असल्याने कयाधूच्या गर्भात असलेल्या भक्तश्रेष्ठ प्रल्हादाला दिव्य ज्ञानाचा उपदेश करतील . नंतर हिरण्यकशिपूला वरप्राप्ती करुन तो राजधानीत परत येईल . कयाधूला पुढे चार पुत्र होतील . त्यापैके प्रल्हाद भगवत्

प्राप्तीसाठी मोठी तपश्चर्या करील . नारदांचा उपदेश ग्रहण केलेला तो प्रल्हाद श्रीहरीचे स्तवन करीत निराभीमा संगमावर माझे समोर उभा ठाकेल .

श्री नारदांनी दिलेल्या गुह्य मंत्राचा त्या प्रल्हाद बालकावर अनुग्रह झाल्याने तो या संगमावर श्रीनृसिंहाची सुंदर अशी वालुकामय मूर्ती तयार करील . भगवान नरहरी संतुष्ट होऊन त्या मूर्तीत प्रगट होऊन प्रल्हादाला अभय देतील . यामुळे अत्यंत सन्ददित अंतःकरणाने आणि कृतार्थ दृष्टीने नृसिंहाला साष्टांग प्रणिपात करेल . भगवान् नरहरी नंतर प्रल्हादाला उठवून त्याला गाढ आलिंगन देऊन त्याच्यावर पूर्ण अनुग्रह करील . त्या दिव्य स्पर्शाने प्रल्हाद पूर्ण ज्ञानी व पावन होईल . दिव्य अनुग्रह झालेला तो आगळा वेगळा भक्त , शुद्ध अंतःकरणाने नृसिंहाची स्तुती करील .

हे देवा , आपण त्रैलोक्याचे स्वामी आहात . सर्व जीवांचा आधार आहात . आपल्या अल्पशा कृपेनेही अमृतत्त्वाची प्राप्ती होते . या मायामय विश्वाची उत्पत्ती , स्थिती आणि लय या गोष्टी केवळ आपल्या सहज लीलेमुळे होत असतात . वेदानांही या अनंत रुपाचा ठाव लागलेला नाही . आपल्या अनंत ऐश्वर्याने आपण या भूमीत वास्तव्य करा ; आणि येथे भक्तिभावांचे उद्यान फुलवून या पृथ्वीचे नंदनवन करा . आपले दिव्यरुप हा भक्तांचा कल्पवृक्षच आहे . त्यामुळे त्यांना दिव्य स्पर्शाने जीवांचे अविद्यारुपी बंधन नाहीसे होऊन आपले वरदान त्यांना लाभेल . जीवांना मोहित करणार्‍या मायेचे आपण स्वामी आहात . काल आपणापुढे विनम्र असतो . आपणच या अनाथ जीवांचा उद्धार करा . आपल्या कृपेने सर्व भेदांचा लय होऊन भक्त चराचरात आपलेच रुप पाहातील .

प्रल्हादाने वरीलप्रमाणे केलेल्या स्तवनामुळे भगवान् ‌ संतुष्ट होऊन त्यास वर देतील . या दर्शनामुळे आता कसल्याही भयशोकांचे कारण नाही . यावर प्रल्हाद म्हणेल की , भगवन् ‌ आपल्या केवळ नामसंकीर्तनाने माणसे भयंकर पातकातून मुक्त होतील . आपल्या दर्शनाहून आणखी आनंद देणारा कोणता वर असू शकेल ? माझी अन्य कोणतीही कामना नाही . हे देवा , ज्या या मूर्तीतून आपण प्रगट झाला आहात . त्या या मे तयार केलेल्या मूर्तीत निरंतर वास्तव्य करा . जे कोणी भक्त या मूर्तीचे भजन पूजन करतील त्यांचे मनोरथ आपण पूर्ण करा . मला अन्य कसलीही इच्छा नाही . माझे मन या आपल्या चरणी सदैव स्थिर राहो . शंकरांनी म्हटले , हे पार्वती श्री नृसिंहाच्या दर्शनाने प्रफुल्लित झालेल्या प्रल्हादाला भगवान म्हणतील . हे प्रिय प्रल्हादा , तू म्हणालास तसे होईल . तू केलेल्या या वालुकामय मूर्तीत मी कायम वास्तव्य करुन दर्शन घेणार्‍या भक्तांचे नित्य रक्षण करीन . (अ . ४ .३५ ) या माझ्या वालुकामय मूर्तीचे पूजन करणारे माझ्या रुपाला प्राप्त होतील . दूर ठिकाणी असणारे भक्तही अनन्य भावाचे पूजन करतील तर त्यांचेही मनोरथ पूर्ण होतील . मग श्रद्धेने या क्षेत्रात येऊन नामस्मरण करणार्‍या भक्तांची गोष्टच कशाला ? या माझ्या रुपाचे दर्शन व्हावे अशी इच्छा होणाराही पाप मुक्त होईल . या क्षेत्राच्या यात्रेची सिद्धता करणारे भक्त अनेक वर प्राप्त करतील .

श्रीनृसिंह पुढे म्हणाले , माझ्या दर्शनाची इच्छा करणारे भक्त या क्षेत्राकडे टाकण्यात येणार्‍या प्रत्येक पाऊली अश्वमेधाएवढे फळ प्राप्त करतील . श्रद्धेने दर्शनार्थ येणारा भक्त ‘याची देहि ’ माझ्याशी एकरुप होईल . या जगात , एकवार दर्शन घडले तरी वैकुंठ प्राप्ती होईल . अंतकाळी नामस्मरण केले तर भक्त नित्य माझ्या जवळ राहील . निरंतर श्रद्धायुक्त असे माझे भक्त या जगात देवतुल्य होतील . कोणत्याही अवस्थेतील भक्त असला तरी केवळ अनन्य श्रद्धेमुळे त्याला उत्तम गती प्राप्त होईल . या वालुकामय मूर्तीला एकवेळ प्रदक्षिणा केली असता पृथ्वीप्रदक्षिणा केल्याप्रमाणे वृत्ती व्यापक होतील . या मूर्तीच्या दर्शन , भजन व पूजनामुळे चारी मुक्ती साध्य होतील . हे प्रल्हादा , तुला तुझा पिता छळू लागेल , त्यावेळी निर्भयपणे तू माझे स्मरण कर . (२ अ . ४ .४८ ) तू सर्व संकटातून मुक्त होशील , हे माझे आश्वासन आहे . केवळ स्मरणाने मी तुझ्या समिध्य राहून तुझे रक्षण करीन .

भगवान शंकर म्हणाले की , या प्रमाणे प्रल्हादाला अभय देऊन श्रीनरहरि त्या वालुकामय मूर्तीत नित्य वास्तव्य करु लागले . नंतर प्रल्हादही अनन्यभावाने त्या मूर्तीला प्रणिपात करुन तीन प्रदक्षिणा घालून जड अंतःकरणाने आपल्या नगरीकडे प्रस्थान करील . पुढे त्याची भगवत् ‍ भक्ती पाहून हिरण्यशिपु त्या छळ करु लागेल . त्या असाह्य बालकाने धावा करताच श्री नृसिंह प्रगट होऊन आपल्या तीक्ष्म नखांनी त्याच्या पित्याचे वक्षःस्थळ फाडून त्याचा नाश करतील . असे हे भक्त प्रल्हादाचे धीरोदात्त चरित्र जे श्रवण करतील त्यांचे परम कल्याण होईल . प्रल्हादाप्रमाणेच त्यांच्या वरही नृसिंह पूर्ण कृपा करतील . प्रल्हादाने केलेले भगवतांचे स्तुतीस्तोत्रही मोठे फळ प्राप्त करुन देणारे आहे . या स्तोत्र पठणाने या जगात उत्कर्ष लाभून अखेर मोक्षासारख्या श्रेयाचा लाभ होईल . हे पार्वती , भूतलावर प्रगट झालेल्या त्या क्षेत्राचे महत्त्व मी तुला सांगितले , आता या परिसरात असणार्‍या इतर तीर्थांचे महत्त्व आणि फल पुढे सांगेन .
याप्रमाणे ‘क्षेत्र प्रगटन ’ नावाचा चौथा अध्याय संपला .

N/A

References : N/A
Last Updated : March 17, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP