श्रीनृसिंहपूर क्षेत्र माहात्म्य - अध्याय २

श्रीनृसिंहपूर क्षेत्राचे माहात्म्य वाचल्याने प्रत्यक्ष त्या क्षेत्री गेल्याचे पुण्य मिळते .


देवीपार्वतीने यावर प्रश्न केला की , आपली व भगवान विष्णूंची कोणती शक्ति जलरुपाने प्रगट झाली , ते ऐकण्याची मला इच्छा आहे . शंकरांनी यावर उत्तर दिले की हे देवी , विष्णूच्या जलरुप झालेल्या या शक्तीला निरा हे नाव भक्तांनी दिले . कारण ती निरामय आहे . भगवान नृसिंहाचेच ते जलरुप आहे . यामुळे देव , ऋषी या सर्वांनाच सेवन करण्यास ते योग्य आहे . माझ्या भीमारुपाने प्रगट धालेल्या शक्तीचे नाव ‘शिवा ’ आहे . म्हणजे भय , नाहीसे करते (मां ). या उभय शक्तींच्या संगमात स्नानाचा योग येणे फार दुर्मिळ आहे . हा संगम एक ‘प्रयागच ’ आहे ; कारण येथे अनेक यज्ञयागादीक्रिया झालेल्या आहेत . हे क्षेत्र दक्षिणप्रयाग म्हणून प्रसिद्ध असून ते उत्तरेतील प्रयागाहून अधिक फलदायी आहे . या क्षेत्राचे माहात्म्य दूरुनही ऐकल्यावर अज्ञानजन्य पातके दूर होऊन विष्णुपदाचा लाभ होतो ; मग जे येथे प्रत्यक्ष येऊन स्नानदर्शनाचा लाभ घेतात , त्यांची सर कशाने योणार आहे ? या दिव्य एकात्मभावाचा केवळ संकल्प केल्याने मृत्यूची भीती नाहीशी होईल . या पवित्र संगमातील जललहरींचे दर्शन घेतल्याने अंत :करण शुद्ध होईल .

या क्षेत्री येऊन श्रीनृसिंह आणि संगम पाहणारी व्यक्ति आपल्या कुळाचा आणि पूर्वजांचा उद्धार करील . येथे केलेले श्राद्धादी विधी पितरांना उत्तम गति प्राप्त करुन त्याच्या चित्ताला शांति प्राप्त करुन देते . या संगमातील स्नानाचा महिमाच असा आहे की त्यामुळे मनुष्याला शाश्वतभक्ति आणि पुण्यकर्णांची गोडी लागते . याठिकाणी केलेल्या अन्नदानाचे माहात्म्य फार मोठे आहे . येथे वास्तव्य करणारा नृसिंह सगुणरुप धारण करुन भक्तावर नित्य अनुग्रह करीत असतो . हे क्षेत्र म्हणजे श्रीनरहरीचे मूर्त रुपच असून याचे महत्त्व वर्णन करणे शब्दापलिकडचे आहे . य़ा क्षेत्राचा सर्व परिसर श्रीनृसिंहरुपाने भारलेला आहे . येथील अणु रेणु ईश्वररुप आहेत . आसमंतातील वृक्ष हा तपोधन अशा मुनींचा समुदायच वाटावा . येथील पक्षीगण प्रभूचे जणु गुणगान करीत वास्तव्य करीत आहेत .

हे देवी , येथे श्री नरहरीचे नित्य कीर्तन चालू असल्याने साधकांना येथे अष्ट महादिद्धि प्राप्त होतात . यामुळे हे क्षेत्र मोक्षाचे उत्तम साधन आहे . श्रीनरहरि आपल्या लीलांनी सर्व काही व्यापून राहिलेला आहे . श्रीहरीच्या या अभ्दुत रुपामुळे केवळ मानव नव्हे तर देवांचेही सांत्वन आणि अरिष्टनिवारण होते . या ईश्वरापुढे भक्तांच्या कल्याणासाठी चारी मुक्ति सिद्ध असून मागील बाजूस साक्षात् ‌ धनपती कुबेर आहे . स्वर्गप्रातीही येथे अगदी सामान्य बाब असल्याने ती डाव्या बाजूस आहे ; आणि श्रेय देणारे आत्मज्ञान उजव्या बाजूस आहे . नृसिंह या शब्दातील ‘नृ ’ हे जीववाची , ‘सिं ’ बंधवाची ; तर ‘ह ’ हे विनाशवाची असून शब्दाचा एकूण अर्थ , ‘जिवांचे बंध विमोचन करणारा ’ असा आहे ‘पुर ’ शब्दपूर्णतः या अर्थाचा असल्याने , हे क्षेत्र साधकांना पूर्णतः देणारे आहे . (पहिला अध्याय २ -३२ .३३ )

वेद , उपनिषदे आणि पुराणे या सर्वांनी या क्षेत्राचे वरील रहस्य जाणून गुणगान केलेले आहे . हे देवी , माझ्यावर श्रीनृसिंहाने केलेली ही पूर्ण कृपाच आहे . शंकरांनी म्हटले की , प्रथम ब्रह्मदेवाने , हे गुह्य मला सांगितले ; ते मी नारदांनी बोललो नंतर त्यांच्या पासून अन्य देवांना ते समजले . अशा रीतीने हे क्षेत्र प्रसिद्धीस आले . या पवित्र क्षेत्रात जप , तप , अष्टांगयोग या साधना चालत असतात . येथे प्रेय आणि श्रेय यांची प्राप्ती साधकांना सहजपणे होते . यामुळेच इतर नद्या , संगम आणि सरोवरे अशा रम्य ठिकाणात याचे महत्त्व विशेष आहे . येथील अल्पशा साधनेने सुद्धा कायिक , वाचिक व आत्मिक अशा त्रिविध सुखांचा लाभ होतो . या क्षेत्रांचे माहात्म्य निव्वळ भोगवादी व नास्तिकांना कसे कळणार ? कळिकाळाचा ही काळ असा भगवान नृसिंहाचे येथे नित्य वास्तव्य असल्याने भक्तांना शारीरिक व मानसिक पीडा कधींही तापदायक होणार नाहीत . श्रीनृसिंहाच्या नामसंकीर्तनाची गोडी लागली नाही तोवरच मनुष्याला दुरितांचे भयं राहील . चारी पुरुषार्थ साध्य करु इच्छिणार्‍या साधकांना याहून अधिक प्रभावी असे कोणते आश्वासन असू शकते ? येथे स्नान , दर्शन , साधना करणार्‍या सामान्य साधकांनाही असाधारण असे फल श्रीनृसिंहाच्या कृपेने लीलया प्राप्त होते . श्रीलक्ष्मीनृसिंहाची एकदा का कृपा झाली की मग व्रते , याग आदींची अपेक्षा नसते . दैत्यराज हिरण्यकशिपूचे निर्दालन करणारी दिव्य कथा , या क्षेत्राचे महात्म्य अधिकच प्रकाशमान करीत आहे . ही दिव्य कथा श्रवण करण्यानेही साधकांना अंतिम कल्याणाची प्राप्ती होते . अशाप्रकारे या क्षेत्राचे आणि नृसिंहवताराच्या कथेचे माहात्म्य , हा साधकांच्या परस्पर श्रवण आणि कथनांचा असतो यामुळेच दुरितांचा नाश होऊन शाश्वत आनंदाची प्राप्ती होते .

याप्रमाणे ‘क्षेत्र महिमा वर्णन ’ हा दुसरा अध्याय पूर्ण झाला .

N/A

References : N/A
Last Updated : March 17, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP