श्रीनृसिंहपूर क्षेत्र माहात्म्य - अध्याय १

श्रीनृसिंहपूर क्षेत्राचे माहात्म्य वाचल्याने प्रत्यक्ष त्या क्षेत्री गेल्याचे पुण्य मिळते .


अध्यायाच्या आरंभी श्रीगणेश आणि श्री नृसिंहाला वंदन करुन , या मंदिरातील श्री नृसिंहाच्या मूर्तीचे वर्णन सुंदर शब्दांनी केले आहे . हे दैवत श्री लक्ष्मीनृसिंह या नावाने प्रसिद्ध आहे . सिंहासनावर बसलेल्या नृसिंहाच्या डाव्या अंकावर लक्ष्मी असून वर सर्पफणेचे छत्र आहे . या नृसिंहाने चक्र व धनुष्य ही आयुधे धारण केली आहेत . याच्या छातीवर कौस्तुभमणि रुळत आहे ; आणि इतर देव आणि मुनीगण याला वंदन करीत आहेत . या नृसिंहाच्या दर्शनाने चारी पुरुषार्थ प्राप्त होत असल्याने ऋषींनी या श्रेष्ठ व इष्टद दैवताचे रहस्य ऐकण्याची इच्छा व्यक्त केली .

वरील इच्छा ध्यानी घेऊन सूतांनी महर्षि वेदव्यासांना वंदन करुन त्यांचे चिंतन केले . ते म्हणाले , ‘भगवान श्रीशंकरांनी देवी पार्वतीला जणू आत्म्याचे रहस्यच अशा या नृसिंहाचे स्वरुप वर्णन करुन साम्गितले , ते मी आपणास सर्वांच्या अंतिम कल्याणकरिता सांगत आहे . हा नृसिंहादेव भगवान शंकराच्या ही ध्यानाचा विषय असल्याने पार्वतीला स्वाभाविकच त्याच्या विषयी मोठेच कुतूहल होते . आपणासही या सर्वव्यापी दैवताचे ध्यान करण्याची इच्छा आहे , असे ती म्हणाली ’.

श्रीशंकरांनी पार्वतीला परब्रह्माचे स्वरुपच असलेल्या नृसिंहाचे वर्णन करुन सांगितले . हे शब्दातील , नित्य , अद्वितीय आणि अजर असल्याने अन्य कोणालाही शब्दांनी याचे वर्णन करणे अशक्य आहे . हे परात्पर नृसिंहरुप माझ्या नित्य चिंतनाचा विषयच आहे . सर्व देव याच रुपाला नित्य वंदन करीत असतात . हे रुप परमगुह्य असून केवळ भक्तांना ते यत्नसाध्य आहे . सर्व विश्वाच्या उत्पत्ति , स्थिती आणि लय यांचे कारण नृसिंहच असून त्याच्या सहज लीलेन हे सर्व घडत असते . हे रुप तिन्ही गुणांच्या पलीकडचे असून सर्व चराचर व्यापून राहिलेले आहे . या जगातील सामान्य लोकांना या परमात्म स्वरुपाचे ज्ञान होण्याचा एखादा सुलभ मार्ग सांगण्याची विनंती पार्वतीने केल्यावरुन शंकर म्हणाले , भक्त श्रेष्ठ अशा सज्जनांच्या सहवासामुळे मानवी मनात शुद्ध भक्ति निर्माण होते . या सात्त्विक भक्तीने विवेक आणि वैराग्य निर्माण झाल्यावर श्रीनरहरीचे ज्ञान सुलभ होते . भव बंधनातून मुक्त होण्याचा हा उपाय आहे . कितीही पातकी व दुराचारी मनुष्य असला ; तरी तो या श्रीहरीच्या अनन्य भक्तीने मुक्त होईल . त्रिपुरासुराचा शंकरांनी वध केल्यानंतर त्यांच्या शरीराचा विलक्षण दाह झाला . त्यावेळी त्यांचे रुद्र रुप प्रगट झाले . यामुळे सर्व देव भयभीत होऊन श्रीविष्णूस शरण गेले . त्यांनी भगवान विष्णूला प्रार्थना केली , की त्रिपुरांतक शंकराच्या शरीराचा दाह होत आहे ; यामुळे सर्व सृष्टीच्या विनाशाचे संकट ओढवले आहे . त्यांनी हालाहल विष प्राशन केल्याने प्रलयाची अवस्था निर्माण होऊ नये याकरिता आपण आमचे रक्षण करावे . यावर श्रीविष्णूंनी आश्वासन दिले की , या रुद्र रुपापासून भक्त जनांना कसलेच भय नाही . भगवान शंकर हे विश्वसंहारक अशा कालाचे काल आहेत , आणि सर्व कल्याणांचेही मूळ आहेत . शिव आणि विष्णु यांचे परमचैतन्य एकच आहे , हे मर्म ज्याला कळले ; त्याला कशाचेही भय नाही . श्रीशंकरांचे केवळ रुपच असणार्‍या भीमानदीत , निरानदीच्या रुपाने मी जलरुप होऊन संगम करीन यामुळे (निराकारं वपुःकृत्वा विधास्ते तत्र संगमम्‌। अ . १ .३० ) त्यांच्या शरीराचा भयंकर दाह शमेल . क्रीडाशील शंकराला , भीमेच्या रुपात मी माझे जलरुप मिळवून शांत करीन . हा संगम चारी पुरुषार्थांची प्राप्ती करुन देणारा असल्याने विश्व कल्याणासाठी तेथे या . आमच्या एकात्मतेचे तुम्हास दर्शन घडेल .

याप्रमाणे आश्चासन दिल्यावर भगवान विष्णु गुप्त झाले , व निरारुपाने भीमेशी एकरुप झाले . आर्श्चयमुग्ध झालेले देव तो निराभीमा नद्यांना रम्य व सुखद संगम पाहू लागले . शंकर म्हणाले , ‘अशाप्रकारे माझेच रुप असलेल्या भीमेला निरा मिळाली , आणि जगाच्या कल्याणार्थ पुढे वाहू लागली अशा प्रकारे हरिहरांचा एकात्मभाव या संगमातील निर्मल जलरुपाने व्यक्त झालेला आहे .’ या पवित्र संगमाचे ठायी असणार्‍या रम्य मंदिरातील श्रीलक्ष्मीनृसिंहाला भक्तियुक्त मनाने वंदन करुन देवांनी त्यावर दिव्य फुलांचा वर्षाव केला . या संगमातील पवित्र जलात स्नान आणि श्रीनृसिंहाचे भावयुक्त दर्शन घेतल्याने अज्ञानमूलक अशा सर्व दुरितांचा नाश होतो . येथे या नृसिंहाचे नित्य वास्तव्य आहे . येथे केलेल्या योगसाधनेमुळे अणिमा , लघिमा यासारख्या सिद्धि प्राप्त होतात . हे क्षेत्र यापृथ्वीचे केवळ नाभिस्थान असल्याने (तन्नाभिरेश भूगर्भे क्षेत्रराजो विराजते। अ . १ .४० ) महाक्षेत्राचे रुप याला प्राप्त झाले आहे . अज्ञानाने मूढ बनलेल्या सामान्य जनांना या देवाच्या दर्शनामुळे या जगातील उत्कर्ष आणि मोक्ष यांची सहजपणे प्राप्ती होईल . अशा प्रकारे श्रीनृसिंहदेवाच्या दर्शनाने आणि भक्तिमुळे धर्म , अर्थ , काम आणि मोक्ष हे चारी पुरुषार्थ प्राप्त होऊन अंत :करण दिव्य अशा एकात्मभावाने भरुन जाईल .

याप्रमाणे क्षेत्रोत्पत्ती कथन करणारा पहिला अध्याय पद्मपुराणात आलेला आहे ; तो पूर्ण झाला .

N/A

References : N/A
Last Updated : March 17, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP