TransLiteral Foundation

ग्रहलाघव - चंद्रग्रहणाधिकार

ज्योतिषशास्त्राविना हिंदू धर्मियांचे कार्य एक क्षणसुद्धा चालू शकत नाही .


चंद्रग्रहणाधिकार

ग्रहांसचालन

गतगम्यदिनाहतद्युभुक्तेः खरसाप्तांशवियुग्युतो ग्रहः स्यात् ॥

तत्कालभवस्तथा घटीघ्न्याः खरसैर्लब्धकलोनसंयुतः स्यात् ॥१॥

अर्थ -

गत म्हणजे गेलेल्या किंवा गम्य म्हणजे जाणाऱ्या दिवसांनी ग्रहाचे गतीस गुणून त्यास ६० नीं भागून भागाकार अंशादि येईल तो गत दिवस असल्यास ग्रहांतून वजा करावा आणि गम्य दिवस असल्यास ग्रहांत मिळवावा , म्हणजे इष्टकालीन ग्रह होतो ; तसेंच गत किंवा गम्य घटींनी ग्रहाचे गतीस गुणून ६० नीं भागून भागाकार कलादि येईल तो ; गत घटी असल्यास ग्रहांतून वजा करावा आणि गम्य घटी असल्यास ग्रहांत मिळवावा , म्हणजे इष्टकालीन ग्रह होतो . ह्या भागाकारास चालन म्हणतात .

ग्रहणसंभव आणि चंद्रशर .

एवं पर्वान्ते विराह्वर्कबाह्वोरिन्द्राल्पांशाः सम्भवश्र्चेद्ग्रहस्य ॥

तेंशा निघ्नाः शङ्करैः शैलभक्ता व्यग्वर्काशः स्यात्पृषत्कोऽङ्गुलादिः ॥२॥

अर्थ -

पर्वातीं स्पष्ट रवींतून राहू वजा करावा जी बाकी राहील तो व्यग्वर्क होतो . नंतर त्या व्यग्वर्काचा भुज करून त्याचे अंश करावे आणि ते अंश १४ अंशांहून जर कमी असतील तर ग्रहणाचा संभव आहे असें जाणावें .

व्यग्वर्काचे भुजांशांस ११ नीं गुणून ७ नीं भागावें म्हणजे अंगुलादि शर होतो . तो , व्यग्वर्क मेषादि आहे तर उत्तर आणि तुलादि आहे तर दक्षिण असतो .

उदाहरण .

शके १५४२ मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा बुधवार घटी ३८ पलें ११ रोहिणी नक्षत्र ९ घटी ८ पलें , साध्य योग १० घटी ३६ पलें . ह्यादिवशीं चंद्रग्रहणाचा पर्वकाल समजण्याकरितां गणित .

चक्र ९ , अहर्गण ६३६ प्रातःकालीन मध्यमरवि ८रा . ०अं . ८क . ५९ विकला , मध्यमचंद्र १रा . २५अं . १९क . ५७ विकला , चंद्रोच्च १०रा . ३अं . ३७क . ५विक ., राहू ७रा . २८अं . २५क . २७विक . इष्टकालीन मध्यमरवि ८ रा . ०अं . ४६क . २६ विक ; चंद्र २रा . ३अं . ४३क . ४ विकला , उच्च १०रा . ३अं . ४१क . २० विकला , राहू ७रा . २८अं . २३क . ३६ विकला .

स्पष्टीकरण : रवीचें मंदकेंद्र ६ राशि १७ अंश १३ कला २४ विकला , मंदफलऋण ० अंश ३९ कला ४ विकला ; मंदस्पष्टरवि ८ राशि ० अंश ९ कला २६ विकला , गतिफलधन २ कला ३ विकला , स्पष्टगति ६१ कला ११ विकला . त्रिफलसंस्कृत चंद्र २ राशि ३ अंश ५६ कला १८ विकला , मंदकेंद्र ७ राशि २९ अंश ४५ कला २ विकला , मंदफल ऋण ४ अंश २० कला १२ विकला ; स्पष्टचंद्र १ राशि २९ अंश ३६ कला ६ विकला ; गतिफलधन ३३ कला १५ विकला ; स्पष्टगति ८२३ कला ५० विकला .

आतां रवि चंद्रांपासून आणलेली भोग्य पौर्णिमा घटी २ पळें ३७ ; आणि ह्या घटिका पंचांगस्थ पौर्णिमेंत मिळवून ४०घ . ४८ पळें हा पौर्णिमांत म्हणजे पर्वांत झाला . म्हणून पर्वांत कालीन ग्रहणा करितां २ घटी आणि ३७ पलें ह्यांचे चालन देऊन आणलेले ग्रह ; रवि ८ रा . ० अंश १२ कला ६ विकला ; चंद्र २रा . ० अंश १२क . ६ विकला . राहु ७ राशि २८ अंश २३ कला १८ विकला . आतां स्पष्टरवि ८ रा . ० अंश १२ कला ६ विकला . राहु ७ रा . २८अं . २३क . १८ विकला = ० राशि १ अंश ४८ कला ४८ विकला , हा व्यग्वर्क झाला . याचे भक्तजांश १ ..४८ कला ४८ विकला , १४ अंशांपेक्षां कमी आहेत म्हणून चंद्रग्रहण संभव आहे . म्हणून . भक्तजांश १ ..४८ कला ४८ विकला . ११ =१९ अंश ५६क . ४८विकला ÷७ =२ अंगुलें ५० प्रति अंगुलें हा चंद्रशर झाला . व्यग्वर्कमेषादि आहे म्हणून हा उत्तर आहे .

सूर्यबिंब , चंद्रबिंब आणि भूभाबिंब

गतिर्द्विघ्नीशाप्ताऽङ्गुलमुखतनुः स्यात्खररुचो विधोर्भुक्तिर्वेदाद्रिभिरपत्दृता बिम्बमुदितम् ॥

नृपोश्र्वोना चान्द्री गतिरपत्दृता लोचनकरैरदाढ्या भूभा स्याद्दिनगतिनगांशेन रहिता ॥३॥

अर्थ -

सूर्याचे स्पष्टगतीस २ नीं गुणून ११ नीं भागावें म्हणजे अंगुलादि सूर्यबिंब येते . चंद्राचे स्पष्टगतीस ७४ नीं भागावें म्हणजे अंगुलादि चंद्रबिंब येतें आणि चंद्राचे स्पष्टगतींत ७१६ कला वजा करून बाकीला २२ नीं भागावें आणि भागाकारांत ३२ मिळवून त्यांतून सूर्याचे स्पष्टगतीचा एक सप्तमांश वजा करावा . म्हणजे अंगुलादि भूभाबिंब येते .

उदाहरण .

सूर्य स्पष्टगति ६१ कला ११ विकला  ( =१२२ कला २२ विकला ) ÷११ अंगुलें ७ प्रति अंगुलें , हें सूर्यबिंब झालें . चंद्रस्पष्टगति ८२३ कला ५० विकला ÷७४ =११ अंगुलें ७ प्रति अंगुलें हें चंद्रबिंब झालें .

चंद्रस्पष्ट गति ८२३ कला ५० विकला वजा ७१६ कला = १०७ कला ५० विकला .

आता १०७ कल ५० विकला भागिले २२ = ४ कला ५४ विकला .

४ कला ५४ विकला + ३२ कला = ३६ कला ५४ विकला .

यात रविस्पष्टगति ६१ कला ११ विकला भागिले ७ = ८ कला ४४ विकला मिळविले तर

३६ कला ५४ विकला - वजा ८ कला ४४ विकला = २८ अम्गुलें १० प्रति अंगुले भूभाबिंब .

मानैक्यखंड आणि ग्रास

छायदयत्यर्कमिन्दुर्विधुं भूमिभा छादकच्छाद्यमानैक्यखण्डं कुरु ॥

तच्छरोनं भवेच्छन्नमेतद्यदा ग्राह्यहीनावशिष्टं तु खच्छन्नकम् ॥४॥

अर्थ -

सूर्यग्रहणीं , चंद्रसूर्यास आच्छादन करितो , म्हणून चंद्रासछादक आणि सूर्यास छाद्य असें म्हणतात ; आणि चंद्रग्रहणीं भूभा म्हणजे पृथ्वीची छाया चंद्रास आच्छादन करिते म्हणून भूभेस छादक आणि चंद्रास छाद्य असें म्हणतात . छाद्य आणि छादक . ह्यांच्या बिंबाची बेरीज करून तिला २ नीं भागावें म्हणजे मानैक्य खंड होतें . त्या मानेक्य खंडांतून शर वजा करावा म्हणजे ग्रास बिंब (आच्छादलेलें बिंब ) होतें . परंतु जर मानैक्य खंडापेक्षा शर अधिक असेल तर ग्रहण होत नाही . असे समजावें . छाद्य बिंबांतून ग्रासबिंब वजा करावें म्हणजे शेष बिंब होते . जर छाद्य बिंबापेक्षां ग्रास बिंब अधिक आहे तर ग्रास बिंबांतून छाद्यबिंब वजा करावें म्हणजे खग्रास बिंब होते .

उदाहरण

छादक भूभाबिंब २८ अंगुले १० प्रतिअंगुले + छाद्य चंद्रबिंब ११ अंगुले ७ प्रतिअंगुले = ३९ अंगुले १७ प्रतिअंगुले .

३९ अंगुले १७ प्रतिअंगुले / भागिले २ = १९ अंगुले ३८ प्रतिअंगुले वजा शर २ अंगुले ५० प्रतिअंगुले = १६ अंगुले ४८ प्रतिअंगुले ग्रासबिंब .

१६ अंगुले ४८ प्रतिअंगुले - वजा चंद्रबिंब ११ अंगुले ७ प्रतिअंगुले = ५ अंगुले ४१ प्रतिअंगुले = खग्रासबिंब

ग्रहण मध्य स्थिति .

मानैक्यखण्डमिषुणा सहितं दशघ्नं छन्नाहतं पदमतः स्वरसांशहीनम् ॥

ग्लौबिम्बत्दृत्सिथतिरियं घटिकादिका स्यान्मर्द्दं तथा तनुदलान्तरखग्रहाभ्याम् ॥५॥

अर्थ -

मानैक्य खंडांत शर मिळवून जी बेरीज येईल १० नीं गुणून जो गुणाकार येईल त्याला पुनः ग्रासानें गुणावें , आणि गुणाकाराचे वर्गमूळ काढून त्यास ५ नीं गुणून ६ नीं भागावें . आणि भागाकारास पुनः चंद्रबिंबाने भागावें म्हणजे घटिकादि मध्यस्थिति होते .

उदाहरण .

मानैक्यखंड १९ अंगुले ३८ प्रति अंगुलें +शर २ अंगुलें ५० प्रति अंगुले = ) २२ अंगुलें २८ प्रति अंगुलें १० ( =२२४ अंगुलें ..४० )  ग्रास १६ अंगुलें ४८ प्रति अंगुले = ३७७४ अंगुलें ; ह्यांचे वर्गमूळ ६१ अंगुलें २४ प्रति अंगुलें ५ ( =३०७ अंगुलें ० प्रति अंगुलें ) ÷६ =५१ अंगुलें १० प्रति अंगुलें ; यास चंद्रबिंबाने (११ अंगुलें ७ प्रति अंगुलें ) भागून ४ घटी ३६ पलें ही मध्य स्थिति झाली .

खग्रास मर्दस्थिति .

मानैक्य खंडाबद्दल छाद्य आणि छादक यांच्या बिंबांच्या वजाबाकीचें अर्ध आणि ग्रासाबद्दल खग्रास घेऊन पूर्वीप्रमाणें मध्यस्थिति आणावी म्हणजे ती मर्दस्थिति होत्ये .

उदाहरण

भुभाबिंब २८ अंगुले १० प्रतिअंगुले - वजा चंद्रबिंब ११ अंगुले ७ प्रतिअंगुले = १७ अंगुले ३ प्रतिअंगुले .

१७ अंगुले ३ प्रतिअंगुले भागिले २ = ८ अंगुले ३२ प्रतिअंगुले + शर २ अंगुले ५० प्रतिअंगुले = ११ अंगुले २२ प्रतिअंगुले .

११ अंगुले २२ प्रतिअंगुले x गुणिले १० = ११३ अंगुले ४० प्रतिअंगुले गुणिले खग्रास ५ अंगुले ४१ प्रतिअंगुले = ६४६ अंगुले याचे वर्गमूळ २५ अंगुले २४ प्रतिअंगुले

२५ अंगुले २४ प्रतिअंगुले x गुणिले ५ = १२७ अंगुले भागिले ६ = २१ अंगुले १० प्रतिअंगुले

२१ अंगुले १० प्रतिअंगुले भागिले चंद्रबिंब ११ अंगुले ७ प्रतिअंगुले = १ घटी ५४ पलें = मर्दस्थिती .

 

स्पर्शस्थिति व मोक्षस्थिति आणि स्पर्श मर्द व मोक्ष मर्द .

युग्माहतैर्घ्यगुभुजांशसमैः पलैः सा द्विष्ठा स्थितिर्विरहिता सहितार्कषड्भात् ॥

ऊने व्यगावितरथाभ्यधिके स्थिती स्तः स्पर्शान्तिमे क्रमगते च तथैव मर्दे ॥६॥

अर्थ -

व्यग्वर्काचे भक्तजांशांस २ नीं गुणून जो गुणाकार येईल तो पलात्मक मानून मध्यस्थितींत मिळवावा आणि वजा करावा . मग जर व्यग्वर्क ५ राशि १६ अंश यांपासून ६ राशीं पर्यंत आहे , अथवा ११ राशि १६ अंश यांपासून १२ राशिंपर्यंत आहेतर बेरीज मोक्षस्थिति होते , आणि वजाबाकी स्पर्शस्थिति होते ; आणि जर व्यग्वर्क ६ राशींपासून ६ राशि १४ अंशपर्यंत अथवा शून्यराशीपासून १० राशि आणि १४ अंश ह्यांपर्यंत आहे तर बेरीज स्पर्श स्थिति आणि वजाबाकी मोक्षस्थिति होते . मर्द स्थितीस पलात्मक गुणाकार वरचे प्रमाणें मिळवावा आणि वजा करावा . म्हणजे स्पर्श मर्द आणि मोक्षमर्द हीं होतात .

उदाहरण .

मध्यमस्थिति ४ घटि ३६ पलें -(व्यग्वर्काचे भक्तजांश १ ..४८ ..४८ २ = ) ३ पलें = ४ घटी ३३ पलें , ही मोक्षस्थिती झाली ; कारण व्यवर्क शून्य राशी पासून ० राशि १४ अंश ह्यापर्यंत आहे . मध्यमस्थिति ४ घटी ३६ पलें +गुणाकार ३ पलें =४ घटी ३९ पलें ही बेरीज स्पर्शस्थिति झाली . मर्दस्थिति घटी १ पलें ५४ +पलात्मक गुणाकार ३ =१ घटी ५७ पलें हें वरचे प्रमाणें स्पर्श मर्द झालें ; आणि मर्दस्थिति १ घटी ५४ पलें -३ पलें = १ घटी ५१ पलें हें मोक्ष मर्द झालें .

स्पर्श , मोक्ष , संमीलन आणि उन्मीलन ह्यांचे काल

तिथिविरतिरयं ग्रहस्य मध्यः स च रहितःसहितो निजस्थितिभ्याम् ॥

ग्रहणमुखविरामयोस्तु कालाविति पिहितापिहिते स्वमर्दकाभ्याम् ॥७॥

अर्थ -

पौर्णिमा तिथीचा जो अंत तोच ग्रहणाचा मध्यकाल असतो मध्यकालांतून स्पर्श स्थिति वजा करावी . म्हणजे स्पर्शकाल होतो आणि मध्यकालांत मोक्षस्थिति मिळवावी म्हणजे मोक्षकाल होतो . मोक्षकालांतून स्पर्शकाल वजा करावा म्हणजे पर्वकाल होतो .

तिथ्यंतांतून स्पर्शमर्द वजा करावें म्हणजे संमीलन काल होतो . आणि तिथ्यंतांत मोक्ष मर्द मिळवावें म्हणजे उन्मीलन काल होतो . उन्मीलन कालांतून समीलन काल वजा करावा म्हणजे खग्रास पर्वकाल होतो .

उदाहरण .

तिथ्यंत ४० घटी ४८ पलें हाच ग्रहण मध्यकाल - स्पर्शस्थिति ४ घटी ३९ पलें =३६ घटी ९ पलें हा स्पर्शकाल झाला ; मध्यकाल ४० घटी ४८ पलें +मोक्षस्थिति ४ घटी ३३ पलें = ४५ घटी २१ पलें - स्पर्शकाल ३६ घटी ९ पलें =९ घटी १२ पलें हा पर्वकाल झाला .

तिथ्यंत ४० घटी ४८ पलें - स्पर्शमर्द १ घटी ५७ पलें = ३८ घटी ५१ पलें हा संमीलन काल झाला . तिथ्यंत ४० घटी ४८ पलें + मोक्षमर्द १ घटी ५१ पलें = ४२ घटी ३९ पलें हा उन्मीलन काल झाला . उन्मीलन काल ४२ घटी ३९ पलें - संमीलनकाल ३८ घटी ५१ पलें = ३ घटी ४८ पलें हा खग्रास पर्वकाल झाला .

इष्टकालीनग्राससाधन .

पिहितहतेष्टं स्थितिवित्दृतं तत् ॥

सचरणभूयुग्ग्रसनमभीष्टम् ॥८॥

अर्थ - ग्रासास इष्ट घटिकांनी गुणून त्या गुणाकारास इष्ट घटिका स्पर्शकालीन आहेत , तर स्पर्श स्थितीनें आणि मोक्षकालीन आहेत , तर मोक्ष स्थितीनें भागावें , जो अंगुलादि भागाकार येईल त्यांत १ अंगुल आणि १५ प्रति अंगुलें ही मिळवावी म्हणजे इष्टकालीन ग्रास होतो .

उदाहरण .

स्पर्शानंतर इष्टघटिका २  ग्रास १६ अंगुळें ४८ प्रति अंगुळें = ३३ अंगुलें ३६ प्रति अंगुलें यास स्पर्श स्थितीनें (४ घटी ३९ पलें ) भागून व भागाकारांत (७ अंगुलें १३ प्रति अंगुलें ) १ अंगुल १५ प्रति अंगुलें मिळवून ८ अंगुलें २८ प्रति अंगुलें हा इष्टकालीन ग्रास झाला .

अयन वलन साधन .

त्रिभयुतोनरविः स्वविधुग्रहेऽयनलवाढ्य इतश्र्चरवद्दलैः ॥

नगशरेन्दुमितैर्वलनं भवेत्स्वरविदिक्त्वथमध्यनताच्चयत् ‍ ॥९॥

अर्थ -

सूर्य ग्रहणीं स्पष्टरवींत ३ राशि मिळवावे . आणि चंद्रग्रहणीं स्पष्ट रवींतून ३ राशि वजा करावें . नंतर तो रवि घेऊन त्यांत अयनांश मिळवून त्यापासून प्रथम ७ , द्वितीय ५ , तृतीय १ हीं चरखंडें घेऊन चर साधावें म्हणजे अंगुलादि वलन होते . ते , अयनांश युक्तरवि मेषादि असेल तर उत्तर , आणि तुलादि असेल तर दक्षिण असे जाणावें . ह्यास अयनवलन म्हणतात .

उदाहरण .

स्पष्टरवि ८ राशि ० अंश १२ कला ६ विकला — (चंद्रग्रहण आहे म्हणून ) ३ राशि + अयनांश १८ अंश १८ कला = ५रा . १८अं . ३०क . ६विक . हा सायनरवि ह्याचा भुज = ० रा . ११अं . २९क . ५४ विक . ह्यांत शून्य राशि आहेत म्हणून प्रथम खंड ७ ११ अंश २९ कला ५४ विकला ( =८० अंश २९ कला १८ विकला ) ÷३० =२ ..४० यांत गतखंड ० मिळवून २ ..४० , हे अयनवलन झाले . हे सायन रवि मेषादि रवि मेषादि आहे म्हणून उत्तर आहे .

मध्यनतसाधन .

चंद्रग्रहणाच्या मध्य कालांतून दिनमान वजा करून बाकी राहील ती आणि रात्र्यर्ध ह्यांचे अंतर करावें म्हणजे तें मध्यनत होते . ते ग्रहण मध्यकाल पूर्वरात्रीं असेल तर पूर्व आणि उत्तररात्रीं असेल तर पश्र्चिम असें जाणावें .

असेंच , सूर्यग्रहणाचा मध्यकाल आणि दिनार्ध ह्यांचे अंतर करावें म्हणजे ते सूर्यग्रहणीं मध्यनत होते त्याची दिशा वरील प्रमाणें जाणावी .

उदाहरण .

१५ घटी — चर १ घटी ५४ पलें = १३ घटी ६ पलें हे दिनार्ध म्हणून २६ घटी १२ पलें हे दिनमान , आणि १५ घटी + चरघटी १ पलें ५४ =१६ घटी ५४ पलें हें रात्र्यर्ध , म्हणून ३३ घटी ४८ पलें ५४ =१६ घटी ५४ पलें हे रात्र्यर्ध , म्हणून ३३ घटी ४८ पलें रात्रिमान झालें . आतां चंद्रग्रहणाचा मध्यकाल ४० घटी ४८ पलें -दिनमान २६ घटी १२ पलें = १४घ . ३६प . हा रात्रीं ग्रहण मध्यमकाल , हा रात्र्यर्धांतून वजा करून बाकी २ घ . १८ पलें हें मध्यनत , ग्रहण मध्यकाल पूर्व रात्री आहे म्हणून पूर्व झालें .

ग्रस्तोदित किंवा ग्रस्तास्त असतां मध्यनतसाधन

स्पर्शादिकं यदि विधोर्दिवसस्य शेषे यातेऽथवा द्युदलतद्विवरं रवेस्तु ॥

रात्रेस्तदूनितनिशाशकलं क्रमात्स्यात्प्राक्पश्र्चिमं नतमिदं वलनस्य सिद्ध्य़ै ॥१०॥

अर्थ -

चंद्रग्रहणाचा स्पर्श सूर्यास्तापूर्वी जिनक्या घटिका असेल तितक्या घटिका दिनार्धांतून वजा कराव्या म्हणजे तें पूर्व मध्यनत होते . चंद्रग्रहणाचा मोक्ष सूर्योदया नंतर जितक्या घटिका असेल तितक्या घटिका दिनार्धांतून वजा कराव्या म्हणजे ते पश्र्चिमनत होते .

अक्षवलनसाधन .

विषयलब्धगृहादित उक्तवद्वलनमक्षत्दृतं पलभाहतमत् ॥

उदगपागिह पूर्वपरे क्रमाद्रसत्दृतोभयसंस्कृतिरङ्घ्रयः ॥११॥

अर्थ -

मध्यनतास ५ नीं भागून जो राश्यादि भागाकार येईल त्यास अयनांश न देतां त्यापासून (७ ,५ ,१ ) हीं खंडे मानून वलन आणावें , आणि त्यास पलभेनें गुणून ५ नीं भागावें म्हणजे अंगुलादि अक्षवलन होतें , तें मध्यनत पूर्व असेल तर उत्तर आणि पश्र्चिम असेल तर दक्षिण जाणावें .

अयन वलन आणि अक्षवलन ह्यांची एक दिशा असल्यास बेरीज करावी आणि भिन्न दिशा असल्यास वजाबाकी करावी . नंतर त्यास ६ नीं भागावें . जो अंगुलादि भागाकार येईल ते वलनांध्रि होतात . त्याची दिशा बेरजेस किंवा वजा बाकीस जी दिशा असेल तीच असते .

उदाहरण .

मध्यनत पूर्व २घ . १८ पलें ÷ ५ =० राशि २७ अंश ३६ कला ० विकला ह्यापासून आणलेलें वलन ३ ..३८ ..२४  पलभा अंगुलें ५ प्रति अंगुलें ४५ ( =२० ..५५ ) ÷ ५ =४ अंगुल ८ प्रति अंगुलें हे वलनांध्रि उत्तर आहे .

ग्रासांघ्रि आणि खग्रासाधि

मानैक्यार्द्धत्दृतात्खषड्घ्नपिहितान्मूलं तदाशांघ्रयः

खच्छन्नं सदलैकयुक्तु गदिताः खच्छन्नजाशांघ्रयः ॥ऽऽ॥

अर्थ -

ग्रासास ६० नीं गुणून मानैक्य खंडानें भागावें ; जो भागाकार येईल त्याचें वर्गमूळ काढावें . म्हणजे अंगुलादि ग्रासांध्रि होतात . खग्रासांत १ अंगुल आणि ३० प्रति अंगुलें मिळवल्यानें खग्रासांध्रि होतात .

उदाहरण .

ग्रास १६ अंगुलें ४८ प्रति अंगुलें ६० ( =१००८ अंगु .) ÷ मानैक्य खंड १९ अंगु . ३८ प्र . अंगु . = ५१ अंगु . २० प्र .अं . ह्यांचे वर्गमूळ =७ अंगुले ९ प्रति अंगुलें , हें ग्रासांध्रि झाले . खग्रास ५ अंगुलें ४१ प्रति अंगुलें +१ अंगुल ३० प्रति अंगुल = ७ अंगुलें ११ प्रति अंगुलें हे खग्रासांध्रि झाले .

ग्रहणाच्यामध्याची दिशा .

सव्यासव्यमपागुदग्वलनजाशांघ्रीन्प्रदद्याच्छराशायाः

स्याद्ग्रहमध्यमन्यदिशि खग्रासोऽथवा शेषकम् ॥१२॥

अर्थ -

छाद्यबिंबाच्या अर्धपरिमित कंपासानें एक वर्तुळ काढावें आणि त्या वर्तुळांत दिक् रेषा काढून त्याचे सारखे ३२ भाग करावे . नंतर शराची जी दिशा असेल त्यादिशेच्या म्हणजे उत्तर किंवा दक्षिण दिशेच्या बिंदूपासून जर वलनांध्री उत्तर असतील तर ते उलट क्रमानें म्हणजे उजवे हाताकडून डावे हाताकडे द्यावे . आणि जर वलनांध्रि दक्षिण असतील तर क्रमानें म्हणजे डावे हाताकडून उजवे हाताकडे द्यावें आणि वलनांध्रीची खूण केल्यावर त्या खुणेवरच ग्रहणमध्य होतो . आणि ह्याच्या समोरचे दिशेस खग्रासाचा किंवा शेष बिंबाचा मध्य होतो .

स्पर्श दिशा आणि मोक्ष दिशा .

मध्याच्छन्नाशाङ्घ्रिभिः प्राक्च पश्र्चादिन्दोर्व्यस्तं तूष्णगोः स्पर्शमोक्षौ ॥

खग्रास्तात्खच्छन्नपादैः परे प्राग्दत्तैरिन्दोर्मीलनोन्मीलने स्तः ॥१३॥

अर्थ -

ग्रहण मध्यचिन्हापासून ग्रासांध्रि पूर्वेकडे द्यावें . म्हणजे तेथें चंद्र ग्रहणाचा स्पर्श होतो , आणि पश्र्चिमेकडे द्यावे म्हणजे तेथें चंद्रग्रहणाचा मोक्ष होतो . सूर्य ग्रहणीं याचें उलट आहे , म्हणजे ग्रहण मध्यचिन्हापासून ग्रासांध्रि पश्र्चिमेकडे द्यावे म्हणजे तेथें सूर्यग्रहणाचा स्पर्श होतो , आणि पूर्वेकडे द्यावे म्हणजे तेथें सूर्यग्रहणाचा मोक्ष होतो .

असेंच खग्रास मध्यचिन्हापासून खग्रासांध्रि पश्र्चिमेकडे द्यावे म्हणजे तेथें खग्रास स्पर्श होतो , आणि पूर्वेकडे द्यावे म्हणजे तेथें खग्रास मोक्ष होतो . आणि सूर्य ग्रहणीं खग्रास चिन्हा पासून पूर्वेकडे खग्रासांध्रि द्यावे म्हणजे तेथें खग्रास स्पर्श होतो , आणि पश्र्चिमेकडे द्यावे म्हणजे तेथें खग्रास मोक्ष होतो .

चंद्रबिंब ११ अंगुलें ७ प्रति अंगुले , ह्या त्रिज्येनें वर्तुळ काढून त्यांत ३२ दिशांचे बिंदू दाखविले आहेत आतां शर (२ अंगुलें ५० प्रति अंगुलें ) उत्तर आहे आणि वलनांध्रि १ अंगुल ८ प्रतिअंगुल उत्तर आहेत . म्हणून उत्तर बिंदू पासून उत्तर क्रमाने म्हणजे पश्र्चिमेकडे देऊन तेथें ग्रहणमध्य दाखविला आहे व त्या समोर खग्रासबिंब दाखविले आहे . ग्रहण मध्यबिंदूपासून ग्रासांध्रि (७ अंगुले ९ प्रतिअंगुले ) पूर्वेकडे व पश्र्चिमेकडे देऊन तेथे स्पर्श व मोक्ष यांचीं चिन्हें दाखविली आहेत . तसेंच खग्रास मध्यचिन्हापासून खग्रासांध्रि ७ अंगुलें ११ प्रति अंगुलें पश्र्चिम व पूर्व या दिशेकडे देऊन तेथें मीलन आणि उन्मीलन दाखविलीं आहेंत .

चंद्रग्रहणाधिकार समाप्त .

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2011-02-23T20:35:57.5230000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

तीळ तांदूळ एक झाले, वाटाणे गडगडत गेले

  • काही झाले तरी एका वर्गातील, जातीतील, माणसे भांडली तरी पुढे मागे एक होणार० त्‍यांना बाजूला सारून आपण मध्ये घुसणार मात्र शेवटी बाजूला पडतात. 
RANDOM WORD

Did you know?

कांही धर्मात प्रेताचे दहन तर कांहीत दफन कां करतात?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.