ब्राह्मणांचे कसब - चाल पहिली

हिंदुस्थानात ब्राह्मण सत्ताधारी होण्यापूर्वी या पुण्यक्षेत्री परशुरामाने महारांना महाअरीत पाताळी कसे घातले याविषयी हा पोवाडा.


सत्ता नऊ खंड ॥ होती अखंड ॥
दाहावी तशीच काशीस ॥
जपले बहुत एकीस ॥
गुणगंभीर ॥ रणामधीं शूर ॥
नेमिले प्रत्येक खंडास ॥
खंडोबा नांव दिले त्यास ॥
वीरप्रचंड ॥ उभे मार्तंड ॥
मुख्य केले काळबैहिरिस ॥
वागवी नऊ खंडोबास ॥
देश आभंड ॥ सुभे उदंड ॥
योजिले पाहून खाशास ॥
मानिती सर्व नवलोबास ॥
मुख्य माहा सुभा१ ॥ पाठिशीं उभा ॥
कमी नाहीं खबरदारीस ॥
दुय्यम काळबैहिरिस ॥
न्याय चौकशी । सोपी सुज्ञाशी ॥
नेमिले बहुत मदतनीस ॥
मुख्य नव२ खंडच्या न्यायास ॥
अनेक पायदळ ॥ घोडयाचें बळ ॥
कमी नाहीं तिरंदाजांस ॥
भिडविले भाले खांद्यास ॥
राजनितीने ॥ लढती शरतीनें ॥
झोंबती मल्ल ते युद्वास ॥
जपले बहुत एकीस ॥१॥
लघु रजवाडे ॥ पडतां कोडें ॥
धावून येती कुमकेस ॥
घेऊन सात१ आश्रयास ॥
पाऊस पाणी ॥ आबादानी ॥
भोगिती सत्ता सावकाश ॥
लाजवी स्वर्गी सुखास ॥
रत्नागिरी ॥ डोंगरावरी ॥
जात होते हवा खाण्यास ॥
पाहून थंडया जाग्यास ॥
गड जेजूरी ॥ जाइ मल्लअरी ॥
बरोबर घेई प्रधानास ॥
नित्यशा बसे मसलतीस ॥
अती रंगले ॥ नादीं लागले ॥
गुंतले ऐष आरामास ॥
कळाले परकी लोकांस ॥
दंगेखोरांनीं ॥ कट करुनी ॥
योजिले मुख्य ब्रम्ह्यास ॥
लागले लुट धुमाळीस ॥
मार देऊन ॥ जेर करुन ॥
दास बा केले बहुतांस ॥
ओळखुन पाहा या शुद्रास ॥
बाकी उरले ॥ लेश राहिले ॥
भिडले परशरामास ॥
जपले बहुत एकीस ॥२॥
देशनात्याची ॥ प्रीत बंधूची ॥
मारिले बहुता उप-यांस ॥
प्रतिज्ञा सोडऊं शुद्रास ॥
परशरामास ॥ झाला बहु त्रास ॥
पाहून विधवा बहिणीस ॥
झोडीले माहा आरीस ॥
नित्य भिडून ॥ मोड करुन ॥
सोडिले नाहीं गर्भिणीस ॥
उपजल्या मारी बाळास ॥
द्विजवंरी ॥ माहा जो आरी ॥
आखेर आणला जेरीस ॥
पाताळीं घातले त्यास ॥
शोध काढिले ॥ नित्य वधिले ॥
पळविले परक्या भूमीस ॥
ओळख दे आतां परभूस ॥
उरले सुरले ॥ अति पीडिले ॥
ह्यणती मांग महा आरीस ॥
भेट ह्या जुन्या क्षेत्र्यास ॥
कुरकुर पुरे ॥ मन चुरचुरे ॥
सोड सुडाची आतां आस ॥
सांगतो नीट तुला खास ॥
नित्य विनवितों ॥ तुला सुचवितों ॥
भोगशील अखेर गोत्यास ॥
जपले बहुत एकीस ॥३॥
केली धूळधाणी ॥ शिवेना कोणीं ॥
सहज बंदी उदमांस ॥
ठेविना कोणी चाकरीस ॥
दाण्याला रे माहाग ॥ पोटाची रे आग ॥
सोई नाहीं पोट भरण्यास ॥
खाती मेल्या जनावरांस ॥
भूक माईना ॥ कळ साहिना
हातामधीं घेती फचकुलास ॥
धडाका उष्टें मागण्यास ॥
माईसाहेब ॥ भाईसाहेब ॥
हाका मारिती सर्वांस ॥
घरांत आल्यागेल्यास ॥
चांडाळास ॥ उष्टें देण्यास ॥
मनाई धर्मी ब्राह्यणांस ॥
पाप जोडे देतां तुम्हास ॥
दारीं बसू नका ॥ मारुं नका हाका ॥
त्रासलों पाहून तोंडांस ॥
उठांना मारीन दगडास ॥
काय तुझा धर्म ॥ कळूं दे रे वर्म ।
भिक्षा शुद्राची खातोस ॥
कोणता धर्म तुझा खास ॥
सोड गर्वास ॥ लाग मार्गास ॥
जाळ ह्या खॊटया धर्मास ॥
जपले बहुत एकीस ॥४॥
धन्य राणीबाई ॥ झोप कसी घेई ॥
आहेस मोर्च्याची धणीन खास ॥
सोडवी दीन बंधूस ॥
सर्व जगाला ॥ धडा त्वां दिला ॥
बंद केले गुलाम करण्यास ॥
लागेल अट्टा कीर्तीस ॥
नांव ऐकून ॥ आलों धांवुन ॥
कधीं तूं येतीस पाहाणीस? ॥
गांजिले मांगा माहारास ।
गोरे कामगार ॥ मोठा दरबार ॥
सोपिती सर्व ब्राह्यणास ॥
मनामधीं भीती फार त्यांस ॥
माहीती थोडी ॥ मिजाज बडी ॥
भोगिती नित्य आरामास ॥
पुरविती हक्क पेनशनीस ॥
मांग माहाआरी ॥ जेर झाले भारी ॥
विसरले आपल्या महत्वास ॥
उमजेना शत्रूकाव्यास ॥
सूड घेतला ॥ नीच मनिला ॥
शिवतां जाती आंघोळीस ॥
शिकवितो कोण लिहिण्यास ॥
शोध स्वताचा ॥ जोतिरावाचा ॥
कळिवतो राणीबाईस ॥
सोडवी गुलाम केल्यांस ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 18, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP