एप्रिल २४ - संत

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे .


मी जिवंत राहावे हे जितके जरुर आहे , तितकेच परमात्म्याची ओळख करुन घेणे जरुर आहे . जगात नावे ठेवीत नाहीत कोणाला ? परमार्थाला वाहून घेतले तर प्रपंच नीट करीत नाही म्हणून नावे ठेवतात ; तिकडे लक्ष देऊ नये . मनाच्या विषादाला कारण एकच असावे की , मी अजून भगवंताचा झालो नाही . जो भगवंताच्या इच्छेने वागतो त्याचे चांगले होते . भगवंत ठेवील त्यात समाधान मानून राहावे . भगवंताचे रुप आनंदमय आहे , आणि सृष्टीचा क्रमच असा आहे की तो माणसाला आनंदाप्रत पोहोचवीत असतो . अत्यंत दरिद्र्यालासुध्दा आनंदाची जागा असतेच . आनंदाशिवाय मनुष्य जगणेसुध्दा शक्य नाही . मी मुळात आनंदरुप असताना मग दु :खाचे गाडे कुठून आले ? मला दु :ख होते ते माझे कुठे चुकते म्हणून ! मी चुकलो का बरोबर , ही शंकासुध्दा मुक्ताला येत नाही , कारण तो आणि देव एकच असतात . बध्दालाही शंका येत नाही . कारण तो देव जाणतच नाही ; ‘ सर्व काही मी करतो , आणि देव नाहीच , ’ म्हणून म्हणतो . मुमुक्षूला मात्र ही तळमळ लागते . जेव्हा ही तळमळ तीव्र असते तेव्हा संतांची भेट होते . काही पूर्वीचा ठेवा असल्याशिवाय अशी तळमळ लागणार नाही .

आपण संतांचे होऊन राहावे . त्यांचे झालो म्हणजे त्यांच्याशिवाय आपल्याला कुणी नाही असे वाटले पाहिजे . संतांचे होणे म्हणजे त्यांच्या आज्ञेत वागणे . ते सांगतील तसे करावे , ते वागतील तसे नाही वागू . सत्याची संगत धरली म्हणजे सत्संगती मिळते . कशाचीही आसक्ती न धरता जगात वागणे हेच मुक्तांचे लक्षण . हवेपण नाहीसे झाले म्हणजे मग दु :खाचे कारणच राहात नाही .

जिथे तुम्ही राहता तिथे सदगुरु आहेतच असे तुम्हाला वाटते आणि समाधान होते , हीच त्यांची खरी कृपा होय . श्रध्देने जे काम होते ते तपश्चर्येने होत नाही . आपल्या गुरुंनी सांगितल्याप्रमाणे वागणे हाच आपला परमार्थ समजा . गुरु म्हणजे साक्षात परमात्मा . त्याची आज्ञा पाळणे हीच आपली तपश्चर्या . याहून वेगळे काही करण्याची गरज आहे असे न वाटावे .

माझ्या मनाचे विकार जात नाहीत असे चांगल्या माणसांनासुध्दा वाटते . पण ‘ ते जात नाहीत , जात नाहीत ’ असे घोकून त्यांचा ध्यास घेतल्याने ते उलट वाढतील . तिकडे लक्ष देऊ नये . नाम घेणे हे आपले काम करीत राहावे , म्हणजे विकार आपोआपच कमी होत जातील . मात्र , मनाच्या मागे देहाला जाऊ न देणे , इतके जपले पाहिजे .

N/A

References : N/A
Last Updated : May 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP