एप्रिल ८ - संत

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे .


नामस्मरण करायला सांगितले की लोक सबबी सांगतात . पण खरोखर , नामस्मरण करण्याच्या आड काहीच येत नाही . काम करीत असतानासुध्दा उगाचच इतर विचार मनात येतातच ना ? मग तसेच नामस्मरण करायला कोणती अडचण आहे ? उगाच दुसरे विचार करण्यापेक्षा भगवंताचे नाम घ्यावे हे बरे नाही का ? वेळ सापडताच तो व्यर्थ गप्पागोष्टीत न घालविता नामस्मरण करावे ; श्रध्दा ठेवून करावे . दोन प्रवासी पायी जात होते . त्यांना भूक लागली . जाताना एक आंबराई लागली . त्यांनी मालकाला विचारले , ‘ आंबे घेऊ का ? ’ मालक म्हणाला , ‘ पंधरा मिनिटांत जितके आंबे खाता येतील तितके खा . ’ दोघांपैकी एक होता , तो मालकाजवळ चौकशी करु लागला ; या शेताला पट्टी किती , मालक कोण , वगैरे पुष्कळ विचारपूस करु लागला . दुसरा मात्र भराभर आंबे खाऊ लागला . इतक्यात पंधरा मिनिटे झाली . मालकाने सांगितले , ‘ वेळ संपली , आता तुम्ही जा . ’ एकाचे पोट भरले , दुसरा मात्र उपाशी राहिला . या गोष्टीवरुन हे ध्यानात घ्यायचे की , नुसते प्रश्न विचारण्यापेक्षा , श्रध्दा ठेवून नाम घेऊ लागावे . नामाचा अर्थ आपल्याला जरी कळला नाही , तरी तो भगवंताला कळतो . म्हणून नामाचे महत्त्व कळो वा न कळो , नाम घेत राहावे . ध्रुवाने काय केले ? नारदवचनावर विश्वास ठेवून नामस्मरण प्रेमाने करु लागला . तो इतर विचारांच्या , शंकाकुशंकांच्या नादी लागलाच नाही . ‘ एक तत्त्व नाम ’ हेच त्याने धरले , म्हणून त्याला नारायण प्रसन्न झाला . संत नि :स्वार्थी असतात . ते तळमळीने सांगतात . त्यावर आपण श्रध्दा ठेवावी आणि नाम घ्यायला सुरवात करावी आणि अखंड नामातच राहावे .

नाम किती दिवस घेत राहावे ? नाम सोडावेसे वाटत नाही तोपर्यंत ते घ्यावे . नामात रंगून जाईपर्यंत नाम घ्यावे . नामस्मरणात रंगला की नाम सुटणारच नाही . भगवंताचे नाम हेच श्रेष्ठ आहे . त्या नामात रंगेल तोच खरा . चरित्र विसरले तरी चालेल पण नाम विसरु नये , कारण नामात सर्व चरित्र साठविलेले आहे . ज्ञान , उपासना , कर्म वगैरे मार्ग आहेत , पण सर्वांत नामस्मरण हे सोपे साधन आहे . एक मोठा किल्ला होता . तो अभेद्य होता . मुंगीलाही आत प्रवेश होणे अशक्य असा तट होता . पण त्याला एक मोठा दरवाजा होता . त्याला एक मोठे कुलुप होते . एकाला त्याची किल्ली मिळाली ; मग प्रवेश सुलभ झाला . तसे नाम ही किल्ली आहे . परमार्थ कितीही कठीण असला तरी नामाने तो सुसाध्य असतो . नामावर प्रेम आणि श्रध्दा बसत नाही अशी तक्रार करतात . संतवचनावर विश्वास ठेवून अखंड नाम घ्यावे , त्यानेच समाधान होईल .

N/A

References : N/A
Last Updated : May 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP