एप्रिल २५ - संत

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे .


आपले ह्रदय विषयाने इतके भरले आहे की तिथे भगवंताच्या प्रेमाला जागाच राहिली नाही . बरे , भगवंताचे प्रेम मुद्दाम तिथे घातले , तर ते आत न राहता बाहेर पडते आणि वार्‍यावर उडून जाते . सामानाने गच्च भरलेली जशी एखादी खोली असते , तसे आपले ह्रदय आहे . या ह्रदयाचा संबंध भगवंताशी जोडण्यासाठी , आपल्या ह्रदयात सामान , म्हणजे विषय , खाली करुन त्याच्या जागी भगवंताचे प्रेम भरणे जरुर आहे . साधारणपणे आपला अनुभव असा आहे की , एखादी वस्तू आपल्याला पुष्कळ आणि पुन्हापुन्हा मिळाली तरी तिचा वीट येतो ; म्हणून जी वस्तू आपल्याला कितीही मिळाली तरी तिचा वीट येणार नाही अशी वस्तू आपण मिळवावी ; अशी अवीट असणारी वस्तू एकच आहे . ते म्हणजे भगवंत होय .

राजाने आपल्या नावाचा शिक्का केला , आणि जो अती प्रामाणिक होता त्याच्याजवळ दिला ; त्याप्रमाणे भगवंताने आपले नाम संतांना दिले . त्यामुळे , संत जे करतील त्याला मान्यता देणे भगवंताला जरुरच आहे . आपण आणि संत यांच्यामध्ये मनुष्य या दृष्टीने फरक नाही ; पण फरक आहे तो हा की , संत हा जसे बोलतो तसे वागतो , तर आपण बोलतो चांगले आणि वागतो मात्र याच्या उलट . आपल्या स्वार्थाच्या आड कोणी आले की आपण वाईट बोलतो . ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच वस्तूवर दुसर्‍याने प्रेम केले तर आपण त्याला नावे ठेवतो . आपण नुसती नीतीची तत्त्वे जेव्हा सांगतो तेव्हा अगदी चांगले बोलतो ; पण वागताना मात्र उलट वागतो . यासाठी आपण अशी कृती करु या की आपल्याला नंतर तसे बोलता येईल .

गाडीत बसायला मिळावे म्हणून काही कोणी गाडीत बसत नाही , तर आपल्या स्टेशनाला जाण्यासाठीच मनुष्य गाडीचा आधार घेतो . तसा , मोठमोठ्या संतांनी प्रपंच केला खरा , परंतु तो सुखासाठी केला नाही . आपल्या वृत्तीपासून न ढळता इतरांना तारण्याचे काम संतांनी केले . बुडणार्‍या माणसाला जसा दोरीचा आधार द्यावा , त्याप्रमाणे संतांनी आपल्याला परमात्म्याचा आधार दिला . चंदनाच्या झाडाजवळच्या झाडांना जसा चंदनाचा वास लागतो , त्याप्रमाणे संताजवळ राहतो तोही संतच बनतो . काही कष्ट न करता परमार्थ साधणे हेच सत्संगतीचे महत्त्व आहे .

N/A

References : N/A
Last Updated : May 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP