पूर्वमेघ - श्लोक ३१ ते ३५

महाकवी कालिदास यांच्या मेघदूत काव्याचे मराठी समवृत्त व समश्लोकी भाषांतर.


(३१) त्याचीं पार्श्वें, परिणतफला पीतशी आंबराई ।
झांकी; मूर्ती शिखरिं विलसे श्यामला जों तुझी ही ॥
शोभा तेव्हां अमरमिथुनीं कौतुकें, बा ! पहावी ।
भूदेवीचा स्तन मधिं निळा, बाजुनीं गौर जेवीं ॥

(३२) राहें कुंजीं, विहरति जिथें भिल्लिणी, तूं जरासा ।
वृष्टीनें हो द्रुतगति; पुढें तोडितां मार्ग साचा ॥
रेवा लोळे उपलविषमीं विंध्यपादीं पहासी ।
कीं काढेली गजतनुवरी रंगवल्लीच खाशी ॥

(३३) तीच पाणी, वनगजमदें उग्र जें दर्प घेई ।
जंबूकुंजाकुल, करुनियां वृष्टि, घेवोनि जाई ॥
अंत:सारा ! तुज बुझविण्या, गा ! शकेनाचि वारा ।
रिक्तातें ये लघुपण, वरी पूर्णता गौरवाला ॥

(३४) नीपें झालीं शबल, बघुनी, कोंवळ्या केसरांनीं ।
ओल्या जागीं प्रथम फुलल्या रानकेळी खुडोनी ॥
तैसा माळावरि बहलसा गंध घेतां धरेचा ।
सारंगां त्वत्पथ, नवजलें सिक्त, हो ज्ञात साचा ॥

(३५)  वाटे घाई जरि तुज असे जावयाची मदर्थ ।
होई कालव्यय सुकुटजीं पर्वतापर्वतांत ॥
केकानादें, सजलनयनीं, स्वागता सिद्ध, भावें ।
त्या मोरांही अवगणुनियां, शीघ्र जाया निघावें ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP