मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|प्रमुख दत्तभक्त|
गुरुकृष्णसरस्वती

दत्तभक्त - गुरुकृष्णसरस्वती

महान् व्यक्तिंची चरित्रे नेहमीच प्रेरणादायी असतात. दत्तात्रेयांच्या पौराणिक शिष्यांची वा भक्तांची ओळख येथे केलेली आहे. हे दत्तभक्त अवतारी पुरूष म्हणून ओळखले जातात. 

(सन १८३५-१९००)

कोल्हापूर शहराच्या आसपास बरीच तीर्थक्षेत्रे आहेत. त्या तीर्थक्षेत्रांत नृसिंहवाडीचा समावेश केला जातो. वाडी हे दत्तमहाराजांचे स्थान आहे. हे तीर्थक्षेत्र कोल्हापूर शहराच्या पूर्वेस अदमासे तीस मैलांवर आहे व या तीर्थक्षेत्राच्या पश्चिम बाजूस सुमारे दोन मैलांवर नांदणी नावाचे एक छोटेसे गाव वसलेले आहे.

या गावात अप्पाभट नावाचा एक ब्राह्मण रहात होता. त्याला अन्नपूर्णा नावाची पत्नी होती. हा ब्राह्मण भारद्‌वाज गोत्रातील असून पंचांगाच्या आधारे लोकांच्या अडीअडचणी दूर करून गावातील पूजाअर्चा वगैरे पुरोहिताचे काम करून आपला उदरनिर्वाह करीत असे. या दोघांना देवाधर्माच्या कार्यात नेहमी गोडी वाटत असे. दर पौर्णिमेला व शनिवारी ब्राह्मण आपल्या पत्नीसह दत्ताच्या दर्शनासाठी वाडीस अगदी नियमाने जात असे व दोन दिवस राहून परत गावी येत असे. त्यांना कशाचीही कमतरता नव्हती;परंतु घरी संतान नसल्यामुळे अन्नपूर्णेस घर ओस वाटत असे. त्यामुळे तिने एकदा पतीस सांगितले की, “आपल्या घरात पैसा, अडका व धान्य मुबलक असले तरी आपणांस संतान नसल्यामुळे ते सर्व काही व्यर्थ आहे. तरी श्रीदत्तचरणी प्रार्थना करून माझी ही इच्छा पुरी करावी. तेव्हा शनिवारी श्रीदत्तगावी जाऊन त्या भक्तांच्या कैवार्‍यास विनंती करा. तो त्रिभुवनीचा राजा आपल्याला निश्चित पुत्र देईल व आपल्या संसारात सुख व आनंद निर्माण करील.” परंतु त्या ब्राहमणाने तिचे बोलणे मनावर घेतले नाही.

या गोष्टीला बरेच दिवस लोटले. एके दिवशी तो ब्राह्मण वाडीस गेला असताना दर्शनाच्या वेळी त्याने आपल्या पत्नीची इच्छा ईशचरणी ठेवली.  तसेच देवाचे गुणगान गाऊन व स्तोत्र म्हणून तो भोजन करून झोपी गेला. त्या रात्री त्याने स्वप्नात साधूच्या वेषात एका पुरुषास पाहिले. तो साधू त्यास म्हणाला, “हे ब्राह्मणा, सावध हो. तू उगाच मनाला काळजी लावून घेत आहेस. तू सर्व चिंता सोडून निष्काळजी रहा. मी स्वत:च तुझा पुत्र म्हणून तुझ्या घरी येईन.” ते स्वप्न पाहून तो ब्राहमण जागा झाला व संगमात स्नान संध्या आटोपून तो आपल्या गावी परत आला. त्याने स्वप्नात पाहिलेला सारा वृत्तांत आपल्या पत्नीस सांगितला. ते ऐकून त्याच्या पत्नीस संतोष झाला.

या गोष्टीला तीन महिने उलटून गेले. अन्नपूर्णेस आपण गरोदर असल्याची चिन्हे दिसू लागली. त्यामुळे तिला फारच उल्हास वाटू लागला तिला सारखे बलभीमाचे दर्शनाला जावे, एवढेच नव्हे तर सारखे देवळातच बसून रहावे असे डोहळे लागले. तसेच एखाद्या शोभिवंत सिंहासनावर बसून संसारात गांजलेल्यांची सोडवणूक करावी, पालखीत बसावे असे वाटू लागले. याप्रमाणे दिवसामागून दिवस, आठवडयामागून आठवडे व महिन्यांमागून महिने लोटू लागले आणि शके सतराशे सत्तावन्नच्या माघ महिन्यात कृष्ण पक्षाच्या पाचव्या दिवशी मकर लग्न व पावन नक्षत्र असताना रविवारी प्रात:काळी अन्नपूर्णा प्रसूत होऊन तिला मुलगा झाला. ती गौरवर्णीय देहाची सुंदर मूर्ती पूर्वजन्मीची सर्व पुण्ये घेऊन घरी आली. जन्मवेळी आईस जरादेखील प्रसूतीचा त्रास भगवंताने दिला नाही व अशा तर्‍हेने पुराण-पुरुषाने मानवावतार घेतला. त्याचे नाव श्रीकृष्ण ठेवण्यात आले.

मुलगा थोडा मोठा झाल्यावर तो एके दिवशी आईस म्हणाला की, “आमचे कुलदैवत म्हाळसापत्ती. याचे दर्शन घेण्यासाठी मी मंगसोळीस जावे असे म्हणतो. तरी माझी एवढी इच्छा पूर्ण करण्यासाठी मला परवानगी द्यावी.” परंतु आईचे मन एकटया मुलाला पाठवून देण्यास धजेना; पण अप्पाभटजीने तिची समजूत घातल्यावर ती त्यास पाठवून देण्यास राजी झाली. दुसर्‍या दिवशी सूर्य उगवताच कृष्ण मंगसोळीस जाण्यासाठी निघाला. बरोबर थोडीशी शिदोरी देऊन अन्नपूर्णा कृष्णाला गावाच्या वेशीपर्यंत पोचविण्यास गेली व ‘लवकर परतून ये’ असे मुलाला विनवून ती घरी परतली.

श्रीकृष्ण मंगसोळीस पोहचला. कुलस्वामीचे दर्शन होताच त्याने साष्टांग नमस्कार केला. देवाचे स्तुतिस्तोत्र गाइले व तो म्हणाला. “तुझ्या साक्षात्‌ दर्शनाची हाव धरून मी येथे धाव घेतली आहे. तू माझा कुलस्वामी व मी तुझा अज्ञानी नोकर. तेव्हा तुझ्यावर दृष्टी ठेवून मी लिंबाच्या झाडाखाली तू जोपर्यंत भेट देत नाहीस तोपर्यंत जेवणखाण सर्व सोडून बसून राहीन.” या बालकाची ती प्रार्थना ऐकून तेथे एक ब्राह्मण आला. थोडयाच वेळात त्या ब्राह्मणाचा देह पालटला व कपाळावर चंद्राची कोर असलेला भोळा शिवशंकर पार्वतीसह प्रगट झाला. जो नंदीवर आरुढलेला आहे; असा तो कैलासनाथ डोक्यावर वरदहस्त ठेवून कृष्णास म्हणाला. “तू माझाच अंश असताना उगाच हे अज्ञान का दाखवतोस?” दीन गरिबांचा उद्धार करण्यासाठी तू हा अवतार घेतला आहेस, तेव्हा हे स्तोत्र पुरे करून सत्वर स्वत:चे घरी जावे. प्रथम अक्कलकोटी गावी सूर्याप्रमाणे तेजस्वी नृसिंहभान नावाचे प्रसिद्ध स्वामी आहेत, त्यांच्या पायाला वंदन करावे. भक्तासाठी वारंवार त्रैमूर्तीच देह धारण करतात, तरी बुध्दी स्थिर करून श्रीगुरुमहती वाढवावी.” बालक तेथपर्यंत जातो तोच इतके सांगून चटकन्‌ भगवान अदृश्य झाले. आधीच त्रिमूर्तींचा अंश, त्यांत त्र्यंबकेश भेटल्यावर सर्वच रहस्य कळून आले व कृष्ण मंदहास्य करू लागला. नंतर तो गावी गेला व आईस दर्शन देऊन सुखी केले. मुलाला पाहून आईला अत्यानंद झाला.

आईचा निरोप घेऊन श्रीकृष्ण जो घरातून निघाला तो थेट अक्कलकोटला जाण्यसाठी. कारण त्याला श्रीगुरुंच्या दर्शनाचा ध्यास लागला होता. तीन दिवस मार्ग आक्रमण केल्यावर तो अक्कलकोट गावी आला व त्याने बर्‍याच लोकांना विचारले की, “श्रीगुरू कोठे आहेत?” त्यावर लोकांनी सांगितले की, “अक्कलकोटीचे प्रसिद्ध साधू, ज्यांची कीर्ती सर्वत्र पसरलेली आहे व ज्यांना नृसिंहभान म्हणतात. तेच श्रीगुरूंची मूर्ती आहेत. आजच अरुणोदयी ते म्हणाले की, कृष्ण धावून आला आहे. त्याला एकांतस्थळी नेऊ व उचित कार्य साधून घेऊ” इतक्यात स्वत: महारात जवळ येऊन म्हणाले, “काय काम साधावयास आला आहेस? क्षणभर लोकांची संगत सोड, चल, आपण एकांती, जाऊ.” असे म्हणून त्यांनी कृष्णाचा हात स्वत: धरला व ‘चल, लवकर धाव धाव’ असे म्हणून पळू लागले व क्षणात सर्व लोकांना मागे टाकून दूर गेले. निर्जन अरण्य पाहून व एका वृक्षाच्या बुंध्याजवळ घनदाट छाया पाहून ‘हीच जागा चांगली आहे’ असे म्हणाले. ‘हा दगड आमचे आसन आहे’ असे म्हणून त्यावर श्रीगुरुराय बसले.

त्यांचे तेज म्हणजे जसा अपार सूर्यच. ते तेज पाहून कृष्णाचे मन आनंदमय झाले व त्याने सद्‌भावाने पाय वंदिले. दोन्ही हात जोडून ते नानापरीने स्तोत्र गाऊ लागले. ते सर्व ऐकून श्रीगुरु स्मितहास्य करीत म्हणाले. “हे पूजा, स्तोत्र वगैरे सारे पुरे कर व एक विचार सांगतो तो ऐक. कसला गुरु व कसला सेवक? अवघा एकच विचार कर की, जगाचा उद्धार करण्यासाठी आता आम्हांला व तुम्हांला अवतार घ्यावा लागला आहे. नीतिमत्तेची सीमा न ओलांडता मनाला एक मर्यादा आणून जगात संचार करावयाचा आहे व लोकांची संगत करून जगाला मूर्खता दाखवून आपला हेतू साधावयाचा आहे. तेव्हा तुम्ही करवीरक्षेत्री जावे व तुमच्या अवताराचे कार्य साधावे;जे भक्त पुण्यभावाने भक्ती करतील त्यांना तारावे.” एवढे बोलून आपला कृपेचा हात श्रीगुरुंनी मस्तकी ठेवला. दोघांनाही फार आनंद झाला. ते दोघेही देहाचा व्यापार विसरून गेले.

याप्रमाणे सात दिवस लोटले. नंतर आनंदाची ऊर्मी जिरवून नृसिंहभाग सावध झाले व त्यांनी समोर कृष्णाला पाहिले. त्याच्या पाठीवर हात फिरवून ते म्हणाले. “बाळा, सावध हो. अजून खूप कार्य करावयाचे आहे. तेव्हा आत्ताच हे उचित नाही. आजपासून आम्ही तुमचे श्रीगुरुकृष्ण असे नाव ठेवले. आता आमचे वसतिस्थान गाणगापुरी राहिले. आम्ही तेथे तीन महिने राहू. तुमच्याकडे एक सांगाती येईल. त्याला बरोबर घेऊन करवीर नगरीत जावे. तोपर्यंत येथेच रहावे.” साष्टांग नमस्कार करून कृष्ण म्हणाला. “तुमची आज्ञा ती प्रमाण.” नंतर ती जागा सोडून दोघेजण गावात आले. यानंतर थोडयाच दिवसांनी सलग रात्रंदिवस याप्रमाणे दोन दिवस रस्ता क्रमीत श्रीग्रुरुनाथ करवीरक्षेत्रात आले व राममंदिरात त्यांनी वस्ती  केली. अद्याप हे राममंदिर करवीरक्षेत्री आहे. तेथे त्यांनी एका स्त्रीची समंधबाधा दूर केल्याने फडणवीस नावाच्या एका गृहस्थाची भक्ती महाराजांचेवर बसली व त्याने स्वामींना आपल्या घरी नेले.

श्रीगुरुराया सहा महिने फडणविसांच्या घरी राहिले. तिन्ही त्रिकाळ लोक दर्शनासाठी येत. थोडी प्रसिद्धि होताच ‘आता फडणविसाचे घर सोडू’ असे श्रीकृष्ण म्हणू लागले. तेथून ते महिसाळकर नावाच्या भक्ताच्या घरी आले. एके दिवशी ते फिरत फिरत चालले. महिसाळकर त्यांचे मागून चाललेच होते. श्रीकृष्ण झटकन कुंभारगल्लीत आले व ‘हे माझे स्थान’ असे म्हणाले. तेथे ताराबाई नावाची एक स्त्री रहात होती. तिला दत्तसेवेचे फार प्रेम होते. ती दर पौर्णिमेच्या दिवशी वाडीला जात असे. तसा तिचा नियम होता. पूर्वजन्मीचे चांगले कृत्य तिच्या पदरी असल्यामुळे श्रीगुरु स्वत: तिच्या घरी महिसाळकरांचे बरोबर आले व त्यांनी ‘आई’ म्हणून हाक मारली. श्रीगुरुमूर्ती तिच्या घरी महिसाळकरांचेबरोबर आली त्यावेळी दोन प्रहर दिवस आलेला होता. सूर्यकिरणांचा मारा असहय होत होता. श्रीगुरुदत्त ताराबाईस म्हणाले. “लवकर जेवण दे.” त्यावर ताराबाई म्हणाली, “ब्राहमण दिसता, तेव्हा शूद्रान्न कसे द्यायचे? तुम्हांला शिधा, सामान, देईन; तुम्ही शिजवून खावा” श्रीकृष्ण म्हणाले, “हिला संशय आहे, पण तो सगळा दूर होईल” असे म्हणून ते महिसाळकरांचा हात धरून तत्काळ घरी परत आले आणि जेवणखाण आटोपून सुखाने मार्ग क्रमू लागले. अशा प्रकारे गुरुंनी करवीरनगरी सोडली.

एके दिवशी ताराबाई वाडीक्षेत्रास जाण्यासाठी निघाली. यथाप्रकारे देवदर्शन घेऊन व आपल्या शक्तीनुसार अन्नदान करून नंतर श्रीगुरुस्तोत्र गाऊ लागली. ती म्हणाली, “देवा. दिवसेंदिवस मनस्ताप फारच वाढत आहे. आता या शरीरात काही अर्थ नाही. तेव्हा एकदा पैलतीरी पोचव.” यावर श्रीपादयती स्वप्नात आले व म्हणाले. “आम्ही स्वत: सिद्धान्न मागत असता तुला का भ्रांत पडली? तू असे कसे केलेस? तुला चिंता कशाची पडली होती? आज तुझी व्यथा संपली. त्यामुळे आता येथे येऊ नको. घरीच श्रीकृष्णनाथाला आणून त्याच्या सेवेशी एकनिष्ठ व्हावे. तू त्वरित महिसाळ गावी गेल्यास तुला तेथे श्रीगुरु भेटतील. गेलेला क्षण पुन्हा येणार नाही. गुरुला घेऊन ये वया लोकी सौख्य साधनाचा लाभ घे.” ताराबाई जागी झाली. ती लगेच करवीरी आली व घोडयाचा रथ बरोबर घेऊन विलंब न करता गुरुंकडे गेली.

महिसाळकरांच्या घरी येऊन गुरुमाऊलीला साष्टांग वंदन केले व म्हणाली. ‘हे करूणाघन गुरुराया, तू घरी चालून आला असतानादेखील मी तुला ओळखले नाही. मी किती हीन स्त्री आहे व कसल्या मायेला भुलले होते कोण जाणे की, तुला ओळखले नाही. तरी हा अन्याय पोटी घालून श्रीगुरुराया घरी चलावे.” तिचा हात धरून श्रीकृष्ण म्हणाले, ‘रथ तयार कर’ ते ऐकून तिला फार आनंद झाला व ती म्हणाली. ‘मी कृतकृत्य झाले,’ परंतु महिसाळकराला फार दु:ख झाले, चरणांवर मस्तक ठेवून तो विनवू लागला, “किती विचित्र कर्माची गती आहे की, मला फारच थोडा संगतिसुखाचा लाभ मिळाला. सुखदु:खाच्या साठयाचा हा देह केवळ क्षणभंगुर आहे. म्हणून तुमचा आधार धरला होता. परंतु तो आशेचा अंकुर सुकला.” श्रीगुरु म्हणाले, ‘पुरे, पुरे, रोज हिच्या मंदिरी ये व मनात पूर्ण भावना ठेव. मग आम्ही कधीही दूर जाणार नाही.” श्रीगुरुराज रथात स्थानापन्न झाले. बाई म्हणाली, “मी आज धन्य झाले. माझे शरीर श्रीगुरु-संगतीचे औषध मिळतात निरोगी झाले. अनन्य भावाने मी यांची सेवा करीन. माझा मुलगा शिष्य होईल. हे सारे रहस्य मी त्याला शिकवीन. श्रीगुरुसेवा हाच एक उद्योग. यापेक्षा उत्तम साधन नाही. तोच योगक्षेम चालवील. आत ह्रदयाचा सारा भ्रम नाहीसा झाला.”

अशा तर्‍हेचा विचार करीत ती सायंकाळी घरी आली. पलंगावर बैठक घालून त्यावर श्रीगुरुरायाला बसविले. बाईला श्रीगुरुंची सेवा करण्याचे व्यसनच लागले व सेवा करणे आवडू लागले. याप्रमाणे श्रीगुरूंनी ताराबाईंच्या घरी २५ ते ३० वर्षेपर्यंत वास्तव्य केले. या अवधीत कृष्णा लाड, ऐतवडयाचे देवगोंडा, कागलचे हरिपंत, मिरजेचे मल्लभट जोशी, सिदनेर्लीकर, वासुदेव दळवी, दादा पंडित, व्यास शास्त्री, रामभाऊ पुजारी, नामदेव चव्हाण, बाळकृष्ण राशिवडेकर वगैरे बरीच मंडळी महाराजांची परमभक्त बनली व त्यांची सेवा करू लागली. मध्यंतरीच्या काळात एकादोघांनी श्रीगुरुंना ताराबाईच्या घरातून काढून दुसरीकडे ठेवावे असा कट रचला; परंतु श्रीगुरूंनी त्यांना स्वप्नात येऊन सांगितले की, ‘ताराबाईंनी श्रीहनुमानाची फार भक्ती केली आहे की, त्यामुळे श्रीहनुमान ताराबाईपुढे भक्तीमुळे जखडला गेला आहे व मी हनुमंताचा  अंश असलेने येथे राहून तिच्या भक्तीच्या रुपयातील पंचवीस पैसेदेखील देणे भागवले जात नाही.’ या दृष्टांतामुळे महाराजांना कुंभारगल्लीतील ताराबाईच्या घरातून हलविण्याचा विचार त्या लोकांनी रद्द केला.

महाराजांनी पंचवीस-तीस वर्षांच्या अवधीत बर्‍याच लीला जगताला व भक्तांना दाखवून चकित केले. त्यांचे चरित्र’ श्रीकृष्णविजयचरित्र’ नावाचे एक पुस्तक प्राकृत भाषेत श्री. मुजुमदार यांनी तीस अध्यायांत ओवीबद्ध केलेले आहे. महाराजांना बर्‍याच मदांध लोकांनी त्रास दिला, पण त्यांनादेखील स्वार्मीनी चमत्कार दाखवून दिला व श्रीगुरू त्यांच्याही कसोटीला उतरले. महाराज असेतोपर्यंत परमपूज्य ताराबाईंनी त्यांची मनोभावे सेवा केली. रोज काकडआरती, धूपारती, शेजारती अशा आरत्या करायच्या, भोजन झाल्यावर सुवासिक विडा वगैरे सारे सोडाळे व्यवस्थित करीत.

श्रीगुरु शके अठराशे बावीस या वर्षी श्रावण वद्य दशमी या दिवशी नश्वर देहाचा त्याग करून कुंभारगल्लीत समाधिस्त झाले. सदर गल्लीला सध्या श्रीदत्तमहाराज गल्ली असे नाव आहे. या समाधीचा पत्ता ‘श्रीदत्त मंदिर, १४७ डी वॉर्ड, कोल्हापूर असा आहे, सदरची समाधी अद्यापी वरील रस्त्यावर पहावयास मिळते. श्रीगुरुंनी समाधी घेतल्यानंतरही बर्‍याच भक्तांना दृष्टांत दिलेला आहे व देत आहेत.

N/A

References : N/A
Last Updated : January 30, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP