मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|प्रमुख दत्तभक्त|
विष्णुबावा ब्रह्मचारी

दत्तभक्त - विष्णुबावा ब्रह्मचारी

महान् व्यक्तिंची चरित्रे नेहमीच प्रेरणादायी असतात. दत्तात्रेयांच्या पौराणिक शिष्यांची वा भक्तांची ओळख येथे केलेली आहे. हे दत्तभक्त अवतारी पुरूष म्हणून ओळखले जातात. 

(सन १८२५-१८७१)

अव्वल इंग्रजीच्या काळात ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या विरुद्ध चळवळ उभारून हिंदू धर्माची बाजू मांडणार्‍या विष्णू भिकाजी गोखले यांच्या कार्यामागे श्रीदत्तात्रेयांची प्रेरणा होती. यांचा जन्म कुलाबा जिल्हयातील शिरवली गावी झाला. घरच्या गरिबीमुळे यांना शिक्षण फारसे घेता आले नाही. तालुका कचेरीत, भुसार मालाच्या दुकानात, कस्टम खात्यात यांना नोकरी करावी लागली. वयाच्या तेविसाव्या वर्षी हे आत्मसाक्षात्कारासाठी घराबाहेर पडून सप्तशृंगीच्या डोंगरावर तपश्चर्या करीत राहिले. यांनी आपल्या संक्षिप्त आत्मवृत्तात लिहिले आहे, ‘मी लग्न केले नाही, या कारणावरून व माझ्या वर्तणुकीवरून मला ब्रहमचारीबाबा म्हणतात.

लहानपणापासून मला वेदोक्त धर्मांचा विचार करण्याची सवय होती. पुढे माझ्या वयाचे विसावे वर्षीं मला ईश्वराकडून साक्षात्कारद्वारा सूचना झाली. नंतर मी आपले वयाची तेवीस वर्षे, आठ महिने, तेवीस दिवस झाल्यावर कौपीन धारण करून एकान्तविचार करण्याकरिता सप्तशृंगीच्या डोंगरावर व आजूबाजूच्या अरण्यात वगैरे गेलो. त्या ठिकाणी निर्मनुष्य स्थलावर काही वर्षे, मास, दिवस भक्ती करून निवास केला.’

यानंतर आपणांस आत्मसाक्षात्कार कसा झाला, दत्तात्रेयांचा वर कसा मिळाला, हे सांगताना विष्णुबावांनी म्हटले आहे. ‘मला आत्मप्राप्तीच्या उत्कंठतेमुळे व विचारामुळे ईश्वराचा साक्षात्कार होऊन आत्मज्ञानप्राप्ती झाली. पहा, मला ईश्वरावाचून सद्‌गुरू कोणी मिळाला नाही.’ विष्णुबावांची चांगली गुरूशी भेटच झाली नाही. बहुतेक सर्व अज्ञानी व ढोंगी भेटले. कोणी जादूच्या. कोणी किमयेच्या, कोणी विषयाच्या छंदात होते. तर कोणी द्रव्यलोभी होते. म्हणून त्यांनी सप्तशृंगीच्या डोंगरावरील एकान्तवास पत्करला. ‘ईश्वरावर भरंवसा ठेवून अरण्यासंबंधी कंदमूलभक्षण करून, निर्झरोदक पान करून गुहेत वगैरे ठिकाणी निर्मनुष्य स्थळी नग्न राहून अवधूत राहिलो आणि वेदान्त विचार, ध्यानधारणा अतिशय केली. तेणेकरून ईश्वराने दयाळूपणाने मला अनुभविक आत्मज्ञानी करून उपदेश करण्याची आज्ञा केली. म्हणून मी उपदेश करीत फिरत आहे.’

विष्णुबावांनी नाना प्रकारचे भलेबुरे अनुभव घेतले. नाना मतमतांतरे तपासली. परंतु त्यांत त्यांचे मन रमले नाही. त्यांना साक्षात्‌ ईश्वरी कृपेचे वरदान मिळाल्याची हकीकत ऐकण्यासारखी आहे. ते म्हणतात. ‘मला हजारो मनुष्यांच्या सभेत ज्या ज्या इसमास जे जे पाहिजे, तेच सुचते, हाच काय तो माझ्यात गुण आहे. तो मला दत्तात्रेयांचा वर आहे. मला प्रश्नाबरोबर तत्काळ आणि जलद उत्तर देऊन समाधान करता येते. मला दत्तात्रेयांचा वर आहे; त्यामुळे बोलण्यात मला कोणी जिंकील असे नाहीच नाही.’ ज्या दत्तात्रेयांनी त्यांना वर दिला त्यांना उद‌देशून ते आपल्या आत्मवृत्तात म्हणतात;

‘हे ईश्वरा, तू मला अरण्यात शंकर-पार्वती रूपाने अनेक वेळा दर्शन देऊन आज्ञा दिलीस की, माझ्या वेदोक्त विषयात ज्या तारक गोष्टी आहेत त्या लोकांच्या मनात ठसवून दे; कारण की त्या गोष्टींचा लोप झाला आहे. त्या तू सांगितलेल्या गोष्टी मी जगात प्रकट केल्या आणि हया वेदोक्त धर्मप्रकाश ग्रंथात व भावार्थसिंधू ग्रंथात लिहून सर्वांस दिल्या. या गोष्टी ऐकून सर्वांचे अंत:करणात ज्ञान उद्‌भूत व्हावे याविषयी तुझी कृपादृष्टी सर्वांकडे व्हावी. हे ईश्वरा, बापा, तू दत्तात्रेय अवताररूपाने दर्शन देऊन बोललास की, तू जगात तारक उपदेश कर. पण त्या वेळेस मी बोललो की, मला संस्कृत भाषा येत नाही. मग तू हास्यवदन करून बोललास की जा, विष्णू, तू सहज भाषण करशील. तोच वेदगर्भीचा परमसिद्धांत होईल. त्याप्रमाणे या जगात मी बोलतो आणि सर्व पोकळीत तुझे ज्ञानरूपी कान आहेत म्हणून तू ऐकतोस.’

याप्रमाणे परमतखंडण करून वैदिक धर्माची स्थापना करण्यासाठी दत्तात्रेयांकडून विष्णुबावांना प्रेरणा मिळाली. पंढरपूर. सांगली, मिरज, वाई, सातारा, पुणे, नगर, मुंबई इत्यादी ठिकाणी त्यांचे प्रचारकार्य चाले. भावार्थसिंधू, वेदोक्त धर्मप्रकाश, सुखदायक राज्यप्रकरणी निबंध, चतुश्लोकी भागवत याचा अर्थ, सहजस्थितीचा निबंध, सेतुबंधनी टीका इत्यादी त्यांच्या ग्रंथांतून त्या काळच्या मानाने खूपच प्रगत व क्रांतिकारक विचार आहेत. ‘सर्व प्रजा एक कुटुंब आहे’ अशा विचाराचा विस्तार त्यांनी केला. फारसा शास्त्रीय आधार नसला तरी बावांचे साम्यवादी विचार आजही चकित करणारे आहेत.

N/A

References : N/A
Last Updated : January 30, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP