मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|प्रमुख दत्तभक्त|
चक्रपाणी

दत्तभक्त - चक्रपाणी

महान् व्यक्तिंची चरित्रे नेहमीच प्रेरणादायी असतात. दत्तात्रेयांच्या पौराणिक शिष्यांची वा भक्तांची ओळख येथे केलेली आहे. हे दत्तभक्त अवतारी पुरूष म्हणून ओळखले जातात. 

महानुभावपंथाचे संस्थापक श्रीचक्रधर यांचे परमगुरू म्हणून श्रीचक्रपाणींचे नाव विख्यात आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण या गावी जनकनायक नावाचा एक कर्‍हाडा ब्राह्मण रहात असे. त्याची बायको जनकाइसा. व्यापारउदीम करून हे कुटुंब आपले पोट भरीत असे. पुत्रसौख्यासाठी जनकनायकाने पुन: लग्न केले तरी त्याला पुत्र झाला नाही. पहिली पत्नी जनकाइसा हिचे माहेर चाकण येथील. हिच्य़ा माहेरच्या माणसांनीही चाकणच्या ‘चक्रपाणी’ देवतेस पुत्रप्राप्तीसाठी नसस केला होता. जनकनायकाचा नवस याचसाठी ‘चांगदेव’ नावाच्या देवतेस पुत्रप्राप्तीसाठी नवस केला होता. जनकनायकाचा नवस याचसाठी ‘चांगदेव’ नावाच्या देवतेस होता. दोनही देवांची कृपा म्हणून की काय, जनकाइसेला पुत्र झाला. या मुलास चक्रपाणी व चांगदेव अशी दोनही नावे माहेरची व सासरची म्हणून मिळाली, या चांगदेवाच्या पत्नीचे नाव कमळवदना अथवा कमळाइसा होते. चांगदेव प्रथमपासून वैराग्यशील होते. घराण्याच्या व्यापारात वा संसारात त्यांचे तितकेसे लक्ष नसे, संभोगसुखासाठी कमळाइसा आतुर असे, तर चांगदेव पूर्णपणे विरक्त, एकदा एकादशीच्या दिवशी याच संदर्भात त्यांना व्रत मोडावे लागल्यामुळे त्यांना एकंदर प्रपंचाचा वीट आला.

बर्‍याच लोकांबरोबर एकदा चांगदेव चक्रपाणी मातापूर तथा माहूर या क्षेत्राच्या यात्रेस निघाले. गडाच्या पायथ्याशी असलेल्या ‘मेरूमाला; तलावत त्यांनी स्नान केले व ते श्रीद्त्तप्रभूंच्या शयनस्थानाच्या दर्शनासाठी निघाले. वाटेने दाट झाडी होती. एकाएकी एका मोठया वाघाने डरकाळी फोडून त्यांना हटकले. चांगदेवांच्या बरोबरीचे लोक भिऊन दूर पळून गेले तरी ते मात्र त्याच्याकडे पाहात स्तब्ध उभे राहिले. व्याघ्ररूपाने दत्तप्रभूच आपल्यासमोर उभे आहेत असे त्यांनी मनोमन जाणले. चांगदेव एकटेच राहिले, तेव्हा वाघाने आपला एक पंजा त्यांच्या डोक्यावर ठेवला. श्रीदत्तप्रभूंपासून चांगदेवांनी या वेळी शक्तीचा स्वीकार केला. त्यानंतर चांगदेव माहूर येथेच बरीज वर्ष राहिले. त्यांनी अवधूताचा वेष धारण केला होता. गावात भिक्षा मागून पर्वतीय भागावर भटकत राहाणे हा त्यांचा उद्योग होता. त्यानंतर ते द्वारावतीच्या यात्रेसही गेले. तेथील गोमतीच्या तीरावर एका गुंफेत त्यांचा निवास होता. उजव्या हातात खराटा व डाव्या हातात सूप घेऊन ते द्वारावतीचे रस्ते स्वच्छ करीत. सूप अथवा खराटा डोक्यावर मारून त्यांनी बावन पुरुषांना विद्या दिली होती.

एकदा रिद्धपूरहून काही यात्रेकरूंबरोबर श्रीगोविंदप्रभू द्वारावतीस आले. त्यांनी येथेच संन्यासदीक्षा स्वीकारली, चांगदेवांनी आपल्या हातातील सूप व खराटा गोविंदप्रभूंच्या डोक्यावर ठेवून विद्या प्रदान केली. चांगदेवांचा आचार वैराग्यसंपन्न असा होता. उच्चनीच हा भेद त्यांना माहीत नव्हता. ‘शूद्राच्या घरी आरोगण करीति । तैसेचि अंत्येजाचा घरीं क्रीडा करीति ।’ अशी त्यांची वृत्ती होती. योगसामर्थ्याच्या बळावर अनेक प्रकारच्या लीला दाखवून त्यांनी भोवतीच्या क्षेत्रात चांगलाच लौकिक कमावला होता. शेवटी त्यांनी योगसामर्थ्यानेच शरीरांचा त्याग केला व त्याचवेळी भरवस येथील स्मशानात आणलेल्या हरपाळ देवाच्या मृत शरीरात प्रवेश करून नवा अवतार धारण केला. तेच श्रीचक्रधर होत.

N/A

References : N/A
Last Updated : January 30, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP