मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|प्रमुख दत्तभक्त|
आळंदीचे नृसिंहसरस्वती

दत्तभक्त - आळंदीचे नृसिंहसरस्वती

महान् व्यक्तिंची चरित्रे नेहमीच प्रेरणादायी असतात. दत्तात्रेयांच्या पौराणिक शिष्यांची वा भक्तांची ओळख येथे केलेली आहे. हे दत्तभक्त अवतारी पुरूष म्हणून ओळखले जातात. 

(समाधी, सन १८८६)

आळंदी येथील श्रीनृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांची ख्याती दत्तअवतारी म्हणूनच होती. स्वामींचे पूर्वचरित्र फारसे कोणाला माहीत नाही. ते शके १७९६ च्या सुमारास आळंदीस आले व लोकांना भजनानंदाचे प्रेम त्यांनी लावले. ज्ञानेश्वरी, नाथभागवतावर ते नित्य प्रवचने करीत. ‘हे ब्राहमण आश्वलायन । गोत्र तयांचें ‘कौंडिण्य ।’ असे श्रीदासगणूंनी म्हटले असले तरी निकटवर्तीयांना ही माहिती बरोबर वाटत नाही. स्वामी साक्षात्‌ दत्तावतारी, गुरुचरित्रातील नृसिंहसरस्वतीच अशी त्यांच्या भक्तांची श्रद्धा आहे. ‘याच आळंदींत । झाले नरसिंह विख्यात । जे साक्षात्‌ श्रीदत्त । नमन माझें तयासी ॥’ असे दासगणूही म्हणतात. लोणारच्या सच्चिदाश्रमस्वामींना आळंदीच्या स्वामींनी योगाभ्यास शिकविला. या सच्चिदाश्रमांनी ‘माझा गुरू तोचि दत्त जाण । नरसिंहसरस्वती नामाभिधान । पूर्ण ब्रहम’ अशी श्रद्धा आपल्या ‘अंतरानुभव’ नावाच्या ओवीबद्ध ग्रंथात प्रकट केली आहे. ‘तारावयां जडमूढां । रूप श्रीपाद धरी । अवतीर्ण दत्तराणा । झाला अलंकापुरीं ॥’ असा एक उल्लेख नागपूरचे राजयोगी श्रीअण्णामहाराज आपदेव यांनी आरतीमध्ये केला आहे. ‘सद्‌गुरु ज्ञानाचा सागर । दत्ताचाहि तो अवतार’ अशी श्रद्धा धुळ्याचा भिकुबाई पुरंदरे यांनी व्यक्त केली आहे. दत्तात्रेय हेच श्रीपादवल्लभ व श्रीपादवल्लभ हेच श्रीनृसिंहसरस्वती व हेच नृसिंहसरस्वती म्हणजे आळंदीचे स्वामी होत ! यांचे आयुर्मान सुमारे पाचशे वर्षांवर असावे !

श्रीगुरुचरित्राचे कथानायक श्रीनृसिंहसरस्वती हेच देहत्याग न करता आळंदीत प्रकट झाले. कर्दलीवन, हिमालय, वर्‍हाड, खानदेश, मालेगाव, पिंपळगाव करीत करीत स्वामी आळंदीस आले. कर्नाटकातही त्यांचे वास्तव्य असावे. गुर्लहोसूरच्या श्रीचिदंबर दीक्षितांच्या यज्ञात ते हजर होते. अनेक ठिकाणी यांनी अद्‌भुत चमत्कार करून लोकांना चकित केले. आळंदीत ते एक तपभर होते. तेथे त्यांनी लोकांना भजनप्रेमाचा अनुभव दिला. गोपाळपुर्‍यातील विठ्ठलरखुमाईमंदिर, इंद्रायणीचा घाट, ज्ञानेश्वरांचा रथ, मुक्ताबाईचे मंदिर इत्यादी कामे यांच्याच प्रेरणेने झाली. शके १८०३ पासून स्वामींनी आळंदीत रथोत्सव सुरू केला. एकदा ज्ञानेश्वर माऊलींचा रथ इंद्रायणीच्या वाळूत रूतून बसला. रथ हालत नाही असे समजताच हे भावसमाधीतून जागे झाले व ‘पूर्वी कृष्णावतारी आमचे (अर्जुनाचे) सारथ्य करून दमून गेल्यामुळे आपण रुसलेले दिसता. भगवन्‌ ! आपले मनोगत समजतो. हे पाहा आता आम्ही आपले सारथी’ म्हणून महाराजांनी रथाचे चालकत्व स्वीकारले आणि रथ चालू झाला. स्वामी सर्वसाक्षी व त्रिकालदर्शी होते. स्वामींनी शके १८०७ मध्ये जिवंत समाधी घेतली. प्रतिवर्षी पौष शु. पौर्णिमेस त्यांच्या पुण्यतिथीचा उत्सव होत असतो. दर गुरुवारी त्यांच्या समाधीवर त्रैमूर्तींचा रजत मुखवटा बसवून नित्यक्रमात धुपारत्यांचे वेळी दत्तप्रभूंची आरती म्हटली जाते. त्यांच्या ‘श्रीस्वात्मसौख्य’, ‘अंतरानुभव’, इत्यादी ग्रंथांचा परिचय आपण मागेच करून घेतला आहे. अणासाहेब पटवर्धन, यशवंत महाराज (देव मामलेदार), श्रीपादस्वामी, सच्चिदानंदस्वामी, आपदेव महाराज इत्यादी श्रेष्ठ विभूती त्यांच्या प्रभावळीत होत्या. श्रीपाददेवांना महाराजांनी करून दिलेले पाच अभंग ‘लखोटयाचे अभंग’ म्हणून प्रसिद्ध आहेत. यांच्या पत्रांतील निवडक उतारे दि. का. गर्दे यांनी संपादित करून प्रसिद्ध केले आहेत. श्रीपादबुवा गांधी यांनी यांच्या आठवणी प्रसिद्ध केल्या असून बाळ पाळकर यांनी ‘श्रीआळंदीचे स्वामी’ या नावाने यांचे विश्वसनीय चरित्र लिहून भक्तांच्या हाती दिलेले आहे.

N/A

References : N/A
Last Updated : January 30, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP