मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|प्रमुख दत्तभक्त|
किनाराम अघोरी

दत्तभक्त - किनाराम अघोरी

महान् व्यक्तिंची चरित्रे नेहमीच प्रेरणादायी असतात. दत्तात्रेयांच्या पौराणिक शिष्यांची वा भक्तांची ओळख येथे केलेली आहे. हे दत्तभक्त अवतारी पुरूष म्हणून ओळखले जातात. 

(सन १६२०-१७७२)

एक प्रसिद्ध दत्तोपासक म्हणून बाबा किनाराम अघोरी यांचे नाव उत्तर भारतात प्रसिद्ध आहे. काशीला यांचा मठ असून भाद्रपदात यांच्या भक्तगणांचा मेळावा भरत असतो. वाराणशी जिल्ह्यातील चंदौली तहसीलमधील रामगढ नावाच्या गावात एका रघुवंशीय क्षत्रिय घराण्यात सन १६०० ते १६२० च्या दरम्यान केव्हा तरी किनाराम यांचा जन्म झाला. हे घराणे धार्मिक वृत्तीचे होते. लहानपणीच बालकाच्या अंगावर महापुरुषाची लक्षणे दिसत होती. वटवृक्षाखाली बसून ध्यानधारणा करण्याची सवय त्याला बालपणीच लागली. त्याला लग्न करण्याची इच्छा नसतानाच घरातील वडील मंडळींनी त्याचे लग्न ठरविले. घरात नवरी मुलगी येण्यापूर्वीच ती मरण पावली. लोकांना फार वाईट वाटले; पण विरक्त किनारामच्या मनात चक्र सुरु झाले. घरातून गुपचुपपणे बाहेर पडून त्याने गुरूचा शोध केला. गाजीपूर जिल्ह्यातील कारो गावी तो पोचला. तेथे श्रीशिवरामजी नावाचे एक रामानुज संप्रदायी सत्पुरुष होते. तेथे किनाराम त्यांची सेवा करण्यासाठी थांबला.

एकदा शिवरामजी किनारामला घेऊन गंगा नदीवर स्नानासाठी गेले. गंगेच्या काठावर उभे राहून तिची स्तुती करीत असताना गंगेच्या पाण्याच्या एका लाटेने किनारामच्या पायांना स्पर्श केला. हा पुरुष पुढे मोठा साधू होणार असल्याची खात्री शिवरामजींना पटली. दरम्यान शिवरामजींची पत्नी मरण पावली. त्यांनी दुसर्‍या लग्नाचा विचार केला. ‘तुम्ही दुसरे लग्न कराल तर मी दुसरा गुरू करीन’ असे किनारामने सांगितले तरी त्यांनी दुसरे लग्न केले. तेव्हा किनाराम नैगडही नावाच्या गावी आला. या ठिकाणी त्याने एक चमत्कार केला. तेथील एका म्हातारीच्या मुलाचे जमीनदाराचे पैसे चुकते करण्यासाठी किनारामने जमीनदारास मुलाच्या पाय़ाखालील जमीन खणण्यास सांगितले. खणल्यानंतर सुवर्णमुद्रांनी भरलेला कलश निघाला. म्हातारीचा मुलगा किनारामचा शिष्य बनला. याचे नाव बिजाराम ठेवून हे दोघे गुरुशिष्य गिरनार पर्वताच्या यात्रेकडे निघाले. अम्बामाता, गोरक्षनाथांची धुनी इत्यादीचे दर्शन किनाराम यांनी घेतले. गुरुदत्तशिखरावरील पादुकास्थानी एकटया किनारामांनी सात दिवस उपवास केला. गोरक्षनाथांनी त्यांना उपदेश दिला.

अवधूतश्रेष्ठ श्रीदत्तात्रेय यांचा निवास याच निरनारवर असल्याने त्यांच्याही भेटीची आस किनारामांना होतीच. गिरनार पर्वतास प्रदक्षिणा घालण्यासाठी किनारामनी जंगलात प्रवेश केला. घनदाट अरण्यात त्यांचा रस्ता चुकला. अंधार पडल्यावर वाट सुधारेनाशी झाली. ‘गिरनारी, तेरा भरौसा भारी’ असा तीन वेळा उच्चार करून किनारामजींनी समोर पाहिले. दूर एक पेटलेली धुनी त्यांना दिसली. धुनीच्या समोर एक पिंगल जटाधारी अंगावर मृताजिन पांघरून तपस्वी बसलेला त्यांनी पाहिला. त्या तपस्व्यास त्यांनी मनोभावे नमस्कार केला. तपस्व्याने चिमटयाने धुनीतून तीनचार कंदमुळे बाहेर काढून ती किनारामांना खायला दिली. किनारामांची तहानभूक हरपली. एका नव्या दिव्यशक्तीचा संचार त्यांच्या अंशी झाला. तपस्व्याने किनारामांस विचारले. ‘इतक्या रात्री तू या जंगलात का आलास?’ त्यावर किनाराम म्हणाले.

पुरी द्वारिका गोमती गंगासागरतीर ।
दत्तात्रय मोहि कहँ मिले हरन महाभव पीर ॥

किनारामांची ही निष्ठा पाहून तपस्व्याच्या रूपात असलेल्या दत्तप्रभूंनी आपले शिवस्वरूपाचे दर्शन घडविले. किनारामांना जवळ बसवून त्यांच्या उजव्या कानात अघोरमंत्राची दीक्षा दिली. मस्तकावर हात ठेऊन त्यांच्यात दिव्य शक्तिपात घडवून आणला. ‘विवेकसार’ नावाच्या आपल्या काव्यात किनाराम या प्रसंगासंबंधी म्हणतात.

अति दयाल मम सीसपर कर परस्यो मुनिराय ।
ज्ञान विज्ञान भक्तिदृढ, दीन्हो ह्रदय लखाय ॥

दत्तप्रभूंच्या साक्षात्काराची दिव्य अनुभूती वर्णन करताना किनारामजींनी म्हटले आहे,

सतगुरु निरखत शिष्यको, भयो परम उत्साह ।
चरनबंदी बोलत भयो, लह्यो, सबै कोलाह ॥

यानंतर किनाराम यांनी अवधूतस्वरूप. तत्त्वज्ञान, अवस्था इत्यादींचे ज्ञान दत्तगुरूंकडून घेतले. रात्रभर प्रभूंपासी वार्तालाप करून किनाराम यांनी स्वानंदाची लयलूट अनुभवली. या अनुभवाचे सार सांगताना ते म्हणतात,

कृपा करय़ौ अनुभव कहयौ, काया कमल प्रकास ।
अलखरूपको ज्ञान कहि, दिया मोहि विश्वास ॥
अति अगाध अतिसय अगम, व्यापक सर्व समान ।
बिनु गुरुकृपा कोउल है, रामकिना निरबान ॥

रात्र संपताच दत्तप्रभ्रंनी किनाराम यांना गिरनारची प्रदक्षिणा पूर्ण करण्यास सांगितले. हिमालयाची यात्रा करून काशीस वास्तव्य करण्याच्या आदेश मिळाला. यानंतर दत्तप्रभू अदृश्य झाले. किनारामांना एक नवी शक्ती अंगात संचारलीसे वाटले. किनाराम गिरनारप्रदक्षिणा पूर्ण करून जुनागढला आले. तेथे त्यांचा शिष्य बिजाराम राहिला होता. तेथील राजाने त्याच्यासकट साधूंना पकडून तुरुंगात टाकले होते. किनारामांना तुरुंगात जावे लागले. नबाबास अद्दल घडावी म्हणून किनारामांनी एक चमत्कार केला. तुरुंगातील जाती आपोआप फिरू लागली. नबाबास आपली चूक समजून आली. त्याने किनारामांचा आदरपूर्वक सत्कार केला. नबाबाने गिरनारच्या यात्रेकरूंसाठी एक अन्नछत्र सुरू केले.

यानंतर किनाराम-बिजाराम जोडीने हिमालयाची यात्रा केली. चारी धाम, जमनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बदरीनाथ करून ते काशीस आले. तेथेही त्यांनी अनेक प्रकारचे चमत्कार करून लोकांस दिपविले. काळूराम नावाच्या एका अघोरी अवलियाच्या रूपात दत्तप्रभूंनी किनारामांची वारंवार परीक्षा घेऊन सिद्धींचा व्यर्थपणा पटवून दिला. या सबंधी किनारामांनी म्हटले आहे.

कीना कीना सब कहै, काळू कहै न कोय ।
काळू कीना एक भये, राम करे सो होय ॥

येथून पुढे किनारामजींचे वास्तव्य कृमीकुंडाजवळच चिंचेच्या झाडाखाली दत्तांच्या आज्ञेने होऊअ लागले. त्यांच्या शरीरस्पर्शाची चिंचेची पाने गोड लागत. त्यांच्या शरीरातून कधी सुगंध बाहेर पडे. त्यांना हुक्का पिण्याचा व संगीताचा मोठा षोक होता. या स्थानी असतानाही त्यांनी अदभुत लीला दाखवून आपले सामर्थ्य प्रकट केले. किनाराम अघोरी हे संत तुलसीदासांच्या काळातच काशीस नावारूपास आले. शिवस्वरूपी अघोरी किनारामने काशीच्या एका श्रीमंत व्यांपार्‍याची पुत्रपाप्तीची इच्छा पूर्ण केली. तुलसीदासांनी व त्यांच्या रामाने या व्यापार्‍यास दहा जन्मात पुत्रयोग नसल्याचे सांगितले होते. यावरून त्यावेळी एक म्हणही प्रसिद्ध झाली ती अशी, ‘जो न करे राम, सो करे किनाराम.’

अशा रितीने किनारामबाबांचा महिमा वाढत होता. त्यांनी आपल्या शिष्यांना आपल्या निर्वाणाचा दिवस वेळेसहित अगोदर सहा महिने सांगितला होता. त्यानुसार १७७२ मध्ये ते योग्य वेळी सिद्धासन घालून बसले. गुरुदत्ताचे ध्यान त्यांनी सुरू केले. तीन वेळा प्रणवाचा उच्चार करून त्यांनी आपल्या रूपास निरंजनरूपात सामावून टाकले, निर्वाणसमयी त्यांचे वय दिडशेहून अधिक होते. कृमीकुंडापाशी त्यांना विधीपूर्वक समाधी त्यांच्या शिष्यांनी दिली. आजही त्यांचे शिष्य सांगतात की विशिष्ट दिवशी समाधीतून सुगंध बाहेर पडून आसमंतात दरवळतो. रात्रीच्या वेळी वाद्ये ऐकू येतात. मधुर संगीताच्या लकेरी ऐकू येतात, कोणाकोणास किनारामबाबांचे दर्शन होते.

N/A

References : N/A
Last Updated : January 30, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP