मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|प्रमुख दत्तभक्त|
एकनाथ

दत्तभक्त - एकनाथ

महान् व्यक्तिंची चरित्रे नेहमीच प्रेरणादायी असतात. दत्तात्रेयांच्या पौराणिक शिष्यांची वा भक्तांची ओळख येथे केलेली आहे. हे दत्तभक्त अवतारी पुरूष म्हणून ओळखले जातात. 

(शके १४५५-१५२१)

भागवतधर्माच्या कलत्या इमारतीस खांब देऊन ती सावरणारे एक थोर संतुपुरुष एकनाथ हे विठ्ठलाचे उपासक असले तरी प्रारंभी त्यांना दत्तात्रेयांचेच दर्शन झाले होते. एकनाथी भागवत, भावार्थ रामायण या ग्रंथांनी ज्यांचे नाव समग्र वारकरी पंथात आदराने घेतले जाते, त्या एकनाथांनी विपुल अशी अभंगरचना व भारूडनिर्मितीही केलेली आहे. उच्च दर्जाचा गृहस्थाश्रम व चांगली सांपत्तिक स्थिती यांची बाधा परमार्थास होत नसल्याचे एकनाथांच्या उदाहरणावरून दिसते. मानवी समतेचा पुरस्कार केवळ तात्त्विक ग्रंथातच नव्हे तर प्रत्यक्ष आचरणातही करून दाखविणारे एकनाथ हे पहिले कर्ते समाजसुधारक होत. त्यांच्या वारकरी पंथाच्या विठ्ठलभक्तीस दत्तप्रेमाचा एक बळकट धागा समरसतेने विणला गेला असल्याचे दिसून येते. ‘दत्तनाममहिमा’, ‘दत्तमानसपूजा,’ ‘दत्तजन्म’ अशी त्यांची काही छोटी प्रकाणे त्यांच्या दत्तभक्तीचा धागा स्पष्ट करताना दिसतात.

नाथांचे पणजे भानुदास हे एक मोठे सत्पुरुष म्हणून गणले गेले आहेत. पैठणच्या या घराण्यात विठठलाची उपासना होती. यांचेही काही अभंग उपलब्ध आहेत. यांनी पंढरपूर येथील विठ्ठलाची मूर्त्ती अनागोंदीहून परत पंढरीस आणली. या भानुदासांचा मुलगा चक्रपाणी. चक्रपाणीचा मुलगा सूर्यनारायण व सूर्यनारायणाच्या पोटी शके १४५५ मध्ये एकनाथांचा जन्म झाला. एकनाथ मूळ नक्षत्रावर जन्मले म्हणून की काय, थोडयाच दिवसांत त्यांच्या आईवडिलांचे निधन झाले. चक्रपाणीने नातवाचा सांभाळ चांगला केला. नाथांना लहानपणापासूनच स्नानसंध्येची, हरिभजनाची, पुराणश्रवणाची व नामस्मरणची आवड होती. थोडे वय होताच एकनाथ देवगिरीवर जनार्दनस्वामींच्या सहवासात आले. देवगिरीवर मुसलमानी सत्तेत राहूनही जनार्दनस्वामी दत्तभक्तीचा प्रसार करीत. एकनाथांनी जनार्दनस्वामींची हरप्रकारची सेवा करून त्यांची कृपा संपादन केली. यांच्याच कृपेने नाथांना देवगडाजवळील एका निसर्गरम्य अशा एकान्तस्थानी दत्तात्रेयांनी मलंगवेषात दर्शन दिले. सर्वांग चर्माने वेष्टिलेले, बरोबर कुत्रीच्या रूपात कामधेनू, डोळे आरक्त झालेले, असे हे दत्तरूप एकनाथांनी ओळखले. दत्तांच्या आज्ञेवरून जनार्दनस्वामींनी त्या कामधेनूचे दूध काढले, झोळीतून शिळ्या भाकरीचे तुकडे काढून त्यात कालविले आणि उभयतांनी यथेच्छ भोजन केले, भोजनानंतर ते मृण्मय पात्र एकनाथांना विसळण्यासाठी दिले. नाथांनी ते विसळताना हाच आपला प्रसाद म्हणून त्यातील जल सेवन केले. ‘श्रीगुरुंचें उशिटें । लाहे जे  अवचटें । तें तेणें लाभें विटे । समाधीसी’ (१३.३४९) या ज्ञानेश्वरांच्या भावनेने नाथांनी तो प्रसाद म्हणून धारण केला. नाथांची ही निष्ठा पाहून दत्तात्रेयांनी आपल्या खर्‍या रूपात प्रकट दर्शन देऊन नाथांना कृतार्थ केले. दत्त व जनार्दनस्वामी एकरूप असल्याची खात्री नाथांची झाली.

यानंतर एकनाथांच्या दत्तभक्तीस बहर आला. ‘भरला । ओतप्रोत स्वामी माझा देवदत्त,’ ‘दत्त सबाह्य अंतरीं । दत्तात्रेय चराचरीं’ अशी त्यांची वृत्ती बनून गेली. आपल्या ग्रंथांतून नाथ या दत्तकृपेचा मोठया आदराने व श्रद्धेने उल्लेख करताना दिसतात. भागवताच्या प्रारंभीच नाथांनी म्हटले आहे, ‘आतां नमूं दत्तात्रेया । जो आचार्यांचा आचार्या । तेणें प्रवर्तविलें ग्रंथकार्या । अर्थवावया निजबोधु ॥’ (एकनाथी भागवत: १.१४२) तसेच ‘भिक्षुगीते’च्या अखेरीस नाथ म्हणतात, ‘माझे निजगुरूचाही गुरु । श्रीदत्त परमगुरू । तो ‘भिक्षुगीतार्थे साचारू । योग्यां योगेश्वरू तुष्टला ॥ तेणें तोखलेनि अद्‌भुतें । आदरें आश्वासूनि मातें । अभय देऊनि निजहस्तें । पूर्ण ग्रंथार्थे डुल्लत ॥’ (२३.१०००-१००१) या दत्तात्रेयांचे दर्शन एकदा त्यांना काशीसही झालेले होते. ते एके ठिकाणी म्हणतात.

एका एकी एकला काशीवासा गेला ।
स्वलीला श्रीदत्त स्वर्यें प्रकटला ॥
दत्त देव आला, दत्त देव आला ।
स्वभावा सांडोनि भेटावया चला ॥
मुक्तिमंडपामाझारीं निजनाम नगरीं ।
दत्त प्रकटला कीर्तनामाझारीं ॥
भेटणें भेटी उठी दत्ता जाली भेटी ।
सांगणें ऐकणें दत्त होऊनि उठी ॥
कीर्तनाआंतौता नाम श्रीदत्त दत्ता ।
निजकीर्ति ऐकोनि डोले तत्त्वतां ॥
दत्त जंगमीं स्थावरीं विश्वीं विश्व धरी ।
तोचि दत्त घरोघरीं नित्य भिक्षा करी ॥

याप्रमाणे नाथांना वारंवार दत्तदर्शन होत राहिले. नाथांनी स्मरण करावे व दत्तांनी प्रकट व्हावे असे त्यांचे नाते जडले. देवगिरीजवळील शूलभंजन वा सुलभपर्वतावरील सूर्यकुंडानजीकच्या एकांतात ध्यानधारणा करून नाथांनी दत्तात्रेयांना प्रसन्न करून घेतले. दत्ताच्या सगुण दर्शनामुळे त्यांना दत्ताचे व्यापक रूपही ध्यानात आले. ‘स्वानंदें आवडीं दत्त पाहूं गेलों डोळां । तंव चराचर अवघे दत्तचि लीला । विस्मयो दाटला आतां पाहूं मी कैसें । देखतां देखणें अवघें दत्तचि दिसे ॥’ अशी त्यांच्या चित्ताची अवस्था होऊन गेली. भागवताच्या एकादश स्कंधाच्या सात, आठ, नऊ या अध्यायांत दत्तावधूतांनी आपल्या चोवीस गुरूंचे केलेले वर्णन नाथांनी आणखीनच रसाळपणे सांगितले आहे. या यदुअवधूत-संवादातील अवधूत म्हणजे दत्तच असे नाथ म्हणतात. ‘तो अवधूत जाण दत्तात्रेया’ असे नाथांचे या संदर्भात वचन आहे. नाथांची गुरुभक्तीही त्यांच्या दत्तप्रेमास साजेशी होती. नाथांची दत्तभक्ती किती गाढ होती व दत्तांची नाथांवर केवढी प्रीती होती हे समकालीन दत्तभक्त दासोपंतांनीच एका प्रसंगी सांगितले आहे. ‘दत्तात्रय धरूनि दार । रक्ष होऊनि चोपदार ॥’ नाथांच्या दारावर दत्तात्रेय चोपदार बनून त्यांचे रक्षण करतात अशी दासोपंतांची साक्ष आहे. अशा या एकनाथांच्या दत्तावरील अभंगांपैकी चार-पाच अभंगांचा येथे निर्देश करू,

१) दत्त माझा दीनानाथ । भक्तालागीं उभा सतत ॥१॥
त्रिशूल घेउनियां करीं । उभा असे भक्तद्वारीं ॥२॥
भाळीं चर्चिलि विभूति । रुद्राक्षांची माळ कंठी ॥३॥
जवळीं असे कामधेनु । तिचा महिमा काय वानूं ॥४॥
एका जनार्दनीं दत्त । रूप राहिलें ह्रदयात ॥५॥

२) दत्त माझी माय । आम्हा सुखा उणें काय ॥१॥
नित्य प्रीति दत्तनामीं । दत्त वसे गृहास ॥२॥
दत्ताविण नसे दुजें । द्त्त मायबाप माझे ॥३॥
दत्तात्रय दत्तात्रय । नाही कळिकाळाचें भय ॥४॥
एका जनार्दनीं दत्त । नित्य देखे ह्रदयांत ॥५॥

३) माझी माता दत्तगुरू । मज तिचाचि आधारू ॥१॥
तियेविण मजलागीं । कोण रक्षील सर्वांगी? ॥२॥
दत्त माझा आधार । त्यासी चिंती वारंवार ॥३॥
निर्विकार निरंजन । स्वामी माझा दत्त जाण ॥४॥
एकाजनार्दनी द्त्त । नित्य देखे ध्याना आंत ॥५॥

४) हातीं कमंडलु दंड । द्त्तमूर्त्ती ती अखंड ॥१॥
ध्यान लागो माझे मना । विनवितों गुरु राणा ॥२॥
अंगीं चिर्चिली विभूती । ह्रदयीं वसे क्षमा शांति ॥३॥
तोचि चितांत आठव । गुरुराज दत्तदेव ॥४॥
एकाजनार्दनी दत्त । तद्रूप झाले हें चित्त ॥५॥

५) मनासी स्थिरता नामें दत्तवेध । दुजा नाहीं छंद आणिक कांही ॥१॥
म्हणोनी संकल्प दृढ झाला पायीं । दत्तावांचूनी ठाईं नोहे कांहीं ॥२॥
पाहतां पाहणें परतलें मन । पाहण्याचें विंदान विसराल ॥३॥
एकाजनार्दनीं परब्रह्म पुतळा । द्त्त देखिला डोळां आत्मदृष्टीं ॥४॥

६) दत्त सबाह्य अंतरीं । दत्तात्रय चराचरीं ॥१॥
दत्तात्रेय माझें मन । हरोनी गेले मीतूंपण ॥२॥
मुळीं सिंहाद्री पर्वतीं । दत्तात्रयें केली वस्ती ॥३॥
भक्तां मनीं केला वास । एका जनार्दनीं विश्वास ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 30, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP