मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|प्रमुख दत्तभक्त|
विरूपाक्षबुवा नागनाथ

दत्तभक्त - विरूपाक्षबुवा नागनाथ

महान् व्यक्तिंची चरित्रे नेहमीच प्रेरणादायी असतात. दत्तात्रेयांच्या पौराणिक शिष्यांची वा भक्तांची ओळख येथे केलेली आहे. हे दत्तभक्त अवतारी पुरूष म्हणून ओळखले जातात. 

बेळगाव जिल्ह्यातील तालुका चिक्कोडीपैकी हत्तरवाट हा गाव चिक्कोडी, निप्पाणी व संकेश्वर या त्रिकोणात २८०७ फूट उंचीवर आहे. तेथील दरीत श्रीविरूपाक्षबुवा नागनाथ स्वामी महाराज या महान्‌ सत्पुरुषांच्या पुरातन जिवंत समाध्या आहेत.

योगाभ्यासाकरता जागा कशी असावी याचे वर्णन ज्ञानेश्वरी अध्याय सहावा, ओव्या १६४ ते १८० मध्ये केले आहे.

हे वर्णन हत्तरवाट येथील श्रीसद्‌गुरूंच्या समाधिस्थानास अगदी योग्यपणे लागू पडत. या दोनही समाध्या चोहोंबाजूंनी वेष्टिलेल्या हिरवळदरडीच्या मध्यभागी असून त्यांच्या लगत अगदी जवळून वाहणार्‍या दोन ओढयांचा मनोहर संगम झाला असून तेथे बारमाही पाणी असते. गाईवासरांचे कळप चरताना दिसतात. समोर वटवृक्ष असून त्याच्या पारंब्यांची झाडे मनुष्याच्या मिठीत मावत नाहीत. त्या वृक्षशाखांची शीतल छाया श्रीसमाधीवर असून समाधीपुढे हजारो जनसमुदाय ह्या रम्य छायेत बसू शकतो. बाजूस औदुंबर, अश्वत्थ, चिंच वगैरे वृक्ष आहेत. या वृक्षावर मोर, कोकीळ, सारस, पोपट वगैरे अनेक पक्षी विहार करतात. मधुमक्षिकांची पोळी तेथे दिसतात. त्या जागेपासून थोडयाच अंतरावर पूर्वेस श्रीसिद्धेश्वराचे पुरातन शिवाल्य, पश्चिमेस श्रीलक्ष्मी डोंगर व शिवालय व उत्तरेस श्रीमरगाईदेवालय आहे. मधून मधून गाई चारवणार्‍या गोपालांच्या मुरलीचे नाद व त्यांच्या गायनाचे आलाप ऐकू येतात. श्रीसमाधीपुढे बसल्यावर सर्व तहानभूक हरपते व संसाराचाही विसर पडतो. श्रींच्या समाधी म्हणजे दोन तुलसीवृंदावने होत. तोंडाची समाधी श्रीनागनाथस्वामी महाराजांची असून दुसरी श्रीविरुपाक्षबुवा यांची समाधी आहे. समोरील बाजूस शंकराची पिंडी असलेली श्रीशिष्य सखारामबुवा यांची समाधी असून अंदाजे शे-दोनशे हातांवर श्रींचे शिष्य कासार यांची समाधी आहे. श्रीविरुपाक्षबुवा नागनाथ स्वामीमहाराज यांच्या समाधीवर शिलापादुका आहेत. हे स्थान हत्तर गावापासून तीन-चार फर्लांगावर डोंगराच्या घळीत आहे. समाधीच्या बाजूसच श्रीविरुपाक्षबुवांच्या कुटुंबाची सती गेल्याची जागा म्हणून परंपरेने दाखविण्यात येते.

प्रतिवर्षी भाद्रपद वद्य सप्तमी. अष्टमी व नवमी या तीन दिवशी श्रींचा (नागनाथस्वामी महाराज) पुण्यतिथीचा उत्सव आजवर श्रींच्या पुण्याईने चालत आला असून दशमीस लळित होऊन सकाळी उत्सवसमाप्ती होते. बराच समाज जमतो. उत्सवात वेदपारायण, ज्ञानेश्वरी, श्रीगुरुचरित्र, दासबोध आदी धर्मग्रंथांचे पारायण, श्रीसमाधींना रुद्राभिषेक, रात्री भजन-कीर्तन वगैरे कार्यक्रम होत असतो. पूर्वी हा उत्सव डोंगरातच श्रीसमाधीपुढे होत असे. तेथे गोडया पाणाची विहीर हल्लीही असून स्वयंपाकगृह समाधीच्या  मागच्या बाजूस पडित अवस्थेत आजही दिसते. अलीकडे कालमानानुसार उत्सव गावात होतो. पण रोज समाधीस अभिषेक होऊन नैवेद्यही रोज तेथे जातो. नवमीस मात्र दिंडी समाधीस जाऊन तेथे भजन व काल्याचे खेळ व दहीकाला होऊन मंडळी गावात परतात.

श्रीनागनाथ स्वामी हे कोठचे व हत्तरवाटला केव्हा आले व त्यांनी समाधी कधी घेतली यांबाबत कागदोपत्री अशी माहिती महात्मा गांधींच्या वधानंतर झालेल्या सार्वत्रिक जाळपोळीत नाश झाली. त्यामुळे ती आता उपलब्ध होणे अशक्य आहे. परंपरेने ऐकून माहिती असलेली हकीकत अशी: श्रीगुरूचरित्रकार सरस्वती गंगाधर यांचे पूर्वज व श्रीनरसिंहसरस्वतींचे शिष्य श्रीसायंदेव यांचे ज्येष्ठ सुत म्हणून जे नागनाथ तेच हे, असा पूर्वीपासूनचा समज आहे. हा केवळ समज. कागदोपत्री आधार सध्या उपलब्ध नाही, हे वर दिलेच आहे. ‘श्रीविरुपाक्षबुवा हे आमचे पूर्वज असून ते भाग्यनगर अथवा हैद्राबादकडे मामलतीच्या हुद्यावर असताना श्रीनागनाथस्वामी यांचेशी त्यांचा संबंध आला व नोकरी सोडून ते श्रीनागनाथस्वामींचे शिष्य झाले. पुधे ही गुरुशिष्यांची जोडी फिरत फिरत आपल्या मूळ गावी म्हणजे ह्त्तरवाट येथे आली व शेवटी त्या उभयतांनी जिवंत समाधी वरील जागी घेतली’. भक्तांचे माहात्म्य वाढवणे देवास प्रिय, शिष्यांचे माहात्म्य वाढवणे गुरूस प्रिय. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल. राधाकृष्ण, याचप्रमाणे श्रीविरुपाक्षबुवा नागनाथ स्वामीमहाराज असे गुरुशिष्यांचे नाव रूढ झाले व तेच प्रचारात आजही आहे. पुण्यतिथीच्या वेळी म्हटले जात असलेले एक पुढीलप्रमाणे आहे.

गुरुसमर्था । नागनाथा । अवधूता पाहि मां ॥धृ०॥
हरि गुरुभक्त परायण । विरुपाक्ष पंत शिष्य ।
कुलकर्णी ग्रामकर्ता ॥१॥
शिवमेव सखाराम बुवा । जित समाधीचा ठेवा ।
काषायार भक्त चौथा ॥२॥
पंचशा वर्षाणि चालु ज्याचि कीर्ति करणी ।
समाधी संजिवनता ॥३॥
ब्रिद हल्ली लगत अगदीं । हत्तवाट कामींमध्यें ।
एकांतीं वास असता ॥४॥
शुष्क काष्ठीं पल्लव फुटलें । वटवृक्ष विस्तारले ।
अश्वत्था द्वितीयपंथा ॥५॥
भाद्रपद वद्य सप्तमि अष्टमी नवमि दिनें ।
पुण्यतिथी हरिकथा ॥६॥
वरदी पुरुष श्रीपाद प्रास्ताविक । नरसिंह विठूचा ।
दुरित हरिता ॥७॥ (अवधूतमहिमा)

नेहमी म्हटली जाणारी श्रींची आरती पुढीलप्रमाणे आहे -

हत्तरवाट ग्रामीं प्रतिवर्षी नियमी ।
उत्सव होते देखा वृंदावनधामीं ।
भाद्रपदसित सप्तमी ते नवमी ।
श्रीनागनाथ गुरूची पुण्यतिथी नामी ।
जयदेवा जयदेवा गुरु नागनाथा ।
ओवाळित आरति मी प्रेमभरे आतां ।
जयदेव जयदेव ॥१॥
तुमचें स्थान मनोहर या खोर्‍यामाजीं ।
वाहे ओहळ युतीही सत्जल पूरित जी ।
अश्वत्था सह वट हा शोभति तरुराजी ।
देवा वसला ऐशा रम्य वनामाजीं ॥२॥ जयदेव०
शिश्यांमध्ये तुमच्या विरुणाक्षचि थोर ।
सत्‌शिष्य सखारामहि आणिक कासार ।
भावें पुजुनी तुम्हां तरले संसार ।
सर्वहि गमता आम्हां ब्रह्मचि साचार ॥३॥ जयदेत०
उत्सवकालीं होतो वंदांचा गजर ।
कीर्तन भजनीं डुलती वैष्णय जन थोर ।
दहिकाला मोदभरें करिती नारिनर ।
या परि मुनि हे गमती सकला सौख्य कर ॥४॥ जयदेत० ॥

शके १८५६ मध्ये प्रस्तुत लेखकानेही श्रीविरूपाक्षबुवा नागनाथस्वामी महाराजस्तवन या नावाने अंजनीवृत्तात पहिलेच केलेले काव्य पुढीलप्रमाणे -

हिरवळ दरडी चोहिं बाजुंनीं ।
ओहळ युती ती वाहे मधुनी ।
अश्वत्थांच्या वृक्षावरूनी । पक्षी किलबिलती ॥१॥
वटवृक्षांच्या विस्तृत शाखा ।
रोखुनि धरिला मित्रमयुखा ।
शुक मोरादिक नाचति तोखां । धेनू हंबरती ॥२॥
सुरम्य ऐसें स्थान पाहुनी ।
नागनाथ गुरु जाती मोहुनी ।
ध्यान लाविती मग्न होउनी । ब्रह्मचिंतनांत ॥३॥
गांव नजिक जें एक चिमुकलें ।
नामें हत्तरवाट तेथलें ।
कुलकरणी ते शिष्य जाहले । पंत विरुपाक्ष ॥४॥
नागनाथ श्रीसद‌गुरु नमले ।
सखाराम ते भक्तीचि झाले ।
कासारादिक चेले बनले । पूर्ण गुरुभक्त ॥५॥
शिष्य त्रयही आणि ते मुनी ।
ब्रह्मानंदीं जाति रंगुनी ।
अखंड जागृति समाधि लावुनि । वृंदावनिं जागीं ॥६॥
गुरुवियोगें दु:खित होती ।
भक्तमंड्ळी विचार करिती ।
गुरुशिष्यांच्या स्मृती राखिती । समाधि उभवोनी ॥७॥
समाधि पहिली गुरुरायाची ।
वाम बाजुची विरुपाक्षांची ।
सन्मुख सखाराम लांबची । तांवचि कासार ॥८॥
होतो हत्तरवाटा माजीं ।
उत्सव वार्षिक समाधि कुंजीं ।
वद्य भाद्रपद पुण्यतिथी । जी सप्तमि ते नवमी ॥९॥
कीर्तन भजनीं वैष्ण डुलती ।
ब्रह्मवृंद ते वेद घोषिती ।
ज्ञानेश्वरीचे पाठ चालती । पुण्यतिथीकालीं ॥१०॥
दहीकाल्याचा थाट नवमिला ।
हरुष न मावे त्या समयाला ।
गोपालांच्या उत्साहाला । सीमा मुळिं नाहीं ॥११॥
आदर चरणीं सद्‌गुरुस्वामी ।
करनांजलिही अर्पूनि प्रेमीं ।
विश्वनाथ हा राधेय नमी । वंशज विरुपाक्ष ॥१२॥  

--- वि. के. कुलकर्णी, हत्तरवाटकर

N/A

References : N/A
Last Updated : January 30, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP