मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|प्रमुख दत्तभक्त|
मुक्तेश्वर

दत्तभक्त - मुक्तेश्वर

महान् व्यक्तिंची चरित्रे नेहमीच प्रेरणादायी असतात. दत्तात्रेयांच्या पौराणिक शिष्यांची वा भक्तांची ओळख येथे केलेली आहे. हे दत्तभक्त अवतारी पुरूष म्हणून ओळखले जातात. 

(इ. स. चे सतरावे शतक)

एकनाथांचा हा नातू म्हणजे मुलीचा मुलगा, आपल्या आजोबाप्रमाणेच दत्ताचा उपासक होता. याच्या वडिलांचे नाव चिंतामणी, आईचे सासरचे गोदावरी व माहेरचे गंगामाई होते. याचा कुलदेव सोनारीचा भैरव असून कुलस्वामिनी कोल्हापूरची महालक्ष्मी होती. मुक्तेश्वरांच्या कुळात दत्तात्रेयांची उपासना त्यांच्या ‘लीलाविश्वंभर’ या अवताराची होती. ‘ॐ नमोजी विश्वंभरू । तो देव दत्तात्रेय जगदगुरु’, ‘पुराण पुरुषेश्वरा गुरुमुर्ती दातारा लीलाविश्वंभरा दत्तात्रेया’ असे याने म्हटले आहे. कोणी लीलाविश्वंभर हे मुक्तेश्वरांचे गुरूही मानतात. महाभारताची आदी, सभा वन, विराट आणि सौतिक ही प्रर्वे; रामायण, गरुडगर्वपरिहार, हरिश्चंद्राख्यान, एकनाथचरित्र अशी काही वाङमयसंपदा मुक्तेश्वरांची उपलब्ध आहे. काही आरत्या, पदेही मुक्तेश्वरांच्या नावावर मिळतात. भाषासौंदर्य, वर्णनशैली, निसर्गवर्णन इत्यादी बाबतींत मुक्तेश्वरांचा हात धरणारा कवी प्राचीन काळात कोणी दुसरा नाही.

त्यांना रामायणरचनेची स्फूर्ती नरसोबाच्या वाडीस झाली असावी. ‘पवित्र सरिता कृष्णवेणी पंचगंगा समस्थानीं । नृसिंहसरस्वर्तीचे चरणीं । ग्रंथप्रसाद लाधला ॥’ असे यांनी म्हटले आहे. तेरवाद येथे मुक्तेश्वरांचे दत्तमंदिर असून तेथे त्यांच्या पूजेतील दत्तात्रेयांच्या पादुका आहेत. ‘विश्वेश लीलाविश्वंभरु । दत्तात्रय जगदगुरु । तत्प्रसादें मुक्तेश्वरु । निरोपी तें परिसावें ॥ चिन्मूर्त्ति लीलाविश्वंभरु । दत्तात्रय जगद्‌गुरु ।  त्याचेनि नामें मुक्तेश्वरु । कथा बोले भारती ॥’ अशा अनेक ठिकाणी त्याने उल्लेख केलेले आढळतात.

मुक्तेश्वर हे शिवाचे उपासक असल्यामुले यांनी शिवरूप दत्ताची आराधना केलेली दिसते. ‘कां नाभिपादांत कमळासनु । मध्यकंठांत रमारमणु । स्कंधावरुता त्रिलोचनु । अंगत्रयीं जो येकु’ अशी त्रिमूर्ती शिवाची म्हणजे दत्तात्रेयांची कल्पना त्यांनी केलेली आहे.

N/A

References : N/A
Last Updated : January 30, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP