मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|प्रमुख दत्तभक्त|
पंतमहाराज बाळेकुंद्रीकर

दत्तभक्त - पंतमहाराज बाळेकुंद्रीकर

महान् व्यक्तिंची चरित्रे नेहमीच प्रेरणादायी असतात. दत्तात्रेयांच्या पौराणिक शिष्यांची वा भक्तांची ओळख येथे केलेली आहे. हे दत्तभक्त अवतारी पुरूष म्हणून ओळखले जातात. 

(सन १८५५-१९०५)

बेळगावच्या पूर्वेस सुमारे आठ मैलांवर बेळगाव-कलाउगी रस्त्यावर पूर्वीच्या सांगली संथानापैकी बाळेकुंद्री-बुद्रुक या नावाचे एक खेडे आहे. हा गाव त्या वेळच्या सदर्न मराठा रेल्वे स्टेशन सुळेभावीपासून दोन मैलांवर आहे. या गावी एक पुरातन श्रीरामेश्वराचे जागृत देवस्थान आहे. येथे दोन चार तलाव असून, अजमासे पाच सात फूट खोलीवर मुबलक अमृततुल्य पाणी लागत असल्याने, या गावी गुप्त गंगा आहे अशी आख्यायिका आहे. या गावी रामाजीपंत म्हणून एक ऋग्वेदी भारद्वाजगोत्री देशस्थ ब्राहमण रहात असत. त्यांचे कुलदैवत अंबाबाई असून आराध्य दैवत श्रीदत्तात्रेय होते. हे या गावचे वतनदार कुलकर्णी असून श्रीमंत पेशवे सरकारच्या लष्करात एक लहानसे हुद्देदार होते. यांचा शेवट स्वामीकार्यार्थ लढाईत झाला, त्या वेळी त्यांचे पोटी बाळकृष्ण या नावाचा एकुलता एक मुलगा फक्त सहा महिन्यांचा होता.

बाळकृष्णपंत वयात आल्यावर त्यांनीही वडिलांप्रमाणे कीर्ती संपादिली. हे शरीराने भव्य असून करारी बाण्याचे व व्यवहारदक्ष होते. वृद्धापकाळी चतुर्थाश्रम घेऊन, आपल्या वयाच्या ९० व्या वर्षी आषाढ वद्य त्रयोदशी शके १८९६(३०-७-९४) सोमवारी ते समाधिस्थ झाले. त्यांची समाधी बाळकुंद्री येथे त्यांच्या राहत्या घराच्या परसात आहे. बाळकृष्णपंतांच्या पोटी रामचंद्रपंत, देवजीपंत, जिवाजीपंत व चिंतोपंत असे चार पुत्र झाले. हे सर्व वडिलांप्रमाणे करारी बाण्याचे, सात्विक वृत्तीचे व ईश्वरनिष्ठ होते. रामचंद्रपंत यांचा विवाह बेळगाव जिल्हयातील दड्डी येथील कुलकर्णी नरसिंहपंत यांची कन्या गोदूबाई (सीताबाई) यांच्याशी झाला. या सत्त्वशील दंपत्याच्या पोटी सहा मुलगे (दत्तात्रेय, गोविंद, गोपाळ, वामन, नरसिंह व शंकर) व सहा मुली (अंबा, गंगा, यमुना, तुंगा, तुळसा व अहल्या) अशी अपत्ये झाली. त्यांत दत्तोपंत हे ज्येष्ठ होत व हेच पुढे ‘श्रीपंतमहाराज’ या नावाने प्रसिद्ध झाले.

श्रीपंतांचा जन्म दड्डी येथे मातुलगृही श्रावण वद्य ८ सोमवार शके १७७७ म्हणजे तारीख ३ सप्टेंबर १८५५ इसवी रोजी, दिवसा तिसरे प्रहरी रोहिणी नक्षत्रावर झाला. यांचे बालपण बहुतेक मातुलगृहीच गेले. यांचे मातुल श्रीपादपंत यांनी त्यांचे पालनपोषण पोटच्या मुलाप्रमाणे मोठया प्रेमाने करून, तेथेच त्यांचा मराठी अभ्यास करविला. श्रीपंत आपल्या वयाच्या चवदाव्या वर्षी बेळगावास इंग्रजी शिकण्यासाठी येऊन राहिले. त्या वेळी त्यांची घरची स्थिती फारच खालावलेली असल्याने त्यांना विद्याभ्यासाच्या कामी फारच कष्ट सोसावे लागले. तरी ते सहनशील व दृढनिश्चयी असल्याने, त्यांनी सर्व प्रकारचे हाल मोठया धैर्याने व शांतपणाने सहन करून, आपला अभ्यास चालू ठेविला; व इंग्रजी पब्लिक सर्व्हिस व मँट्रिक्युलेशन परीक्षा ते पास झाले. यानंतर त्यांनी बेळगाव येथील एका इंग्रजी शाळेत शिक्षकाची नोकरी धरिली व क्रमाक्रमाने आपल्या बंधुवर्गास आपल्याजवळ ठेवून घेऊन शिक्षण देण्यास आरंभ केला.

त्यांचे मातुल श्रीपादपंत यांची द्वितीय कन्या यमुनाबाई (लक्ष्मीबाई) हयांच्याबरोबर यांचा विवाह वैशाख वद्य १ शके १८०४ (ता.४-५-८२) दिवशी झाला. पुढे काही वर्षांनी म्हणजे वैशाख वद्य चतुर्थी शके १८०७ (३-५-८५) रविवारी श्रीपंतांचे वडील रामचंद्रपंत हे वारले व प्रपंचाचा सर्व बोजा श्रीपंतांवर पडला. तथापि न डगमगता श्रीपंतांनी आपणांस मिळत असलेल्या थोडया पगारावर गरीबीने प्रपंच चालवून आप्त, इष्ट, स्नेही इत्यादिकांची मुले आपल्या जवळ ठेवून घेऊन त्यांचे शिक्षण चालविले. ते गोरगरिबांच्या मुलांसही शिक्षणाचे कामी मदत करीत असत. मुलांच्या शिक्षणाकडे त्यांचे जितके लक्ष असे, तितकेच किंबहुना जास्त त्यांची नीतिमत्ता, नियमितपणा, सदवर्तन यांकडे असे. म्हणून त्यांच्या देखरेखीखाली ज्यांना ज्यांना म्हणून शिक्षण मिळाले. ते सर्व बहुतेक चांगलेच निपजले.

सन १८९० पसून श्रीपंतांचे एक बंधू प्रपंचास हातभार लावू लागले; व यानंतर श्रीपंतांचा प्रपंच सुखाने चालला. त्यांची पत्नी कुलीन, सुशील व सुस्वभावाची व बंधू आज्ञाधारक व कर्तेसवर्ते असे असल्याने त्यांना प्रपंचात कोणत्याही प्रकारची कमतरता वाटली नाही. या वेळचा त्यांचा नित्यक्रम म्हटला म्हणजे शाळेतून घरी आल्यानंतर भेटीस येतील त्यांच्याबरोबर वेदांतचर्चा चालविणे व रात्रौ सद्‌गुरुभजनानंदात निमग्न असणे हा होय. याप्रमाणे सन १९०३ पर्यंत नोकरी करून त्यांनी आपल्या कामाचा राजीनामा दिला व शेवटची दोन वर्षे शांतपणाने आत्मचिंतनात घालविली.

पुढे फाल्गुन वद्य सप्तमी शके १८२५(८-३-१९०४) मंगळवारी श्रीपंतांचे कुटुंब निवर्तले, त्या वेळी “अनुभव पूर्ण व्हावा म्हणून मला लग्न करून घेण्यास गुरूंनी आज्ञा केली, आता त्यांनीच सोडविले” असे उदगार काढिले. यावरून व त्या सुमाराम झालेले पद नंबर २५६७ यावरून त्यांची प्रपंचाविषयी दृष्टी कशी होती हे दिसून येते. अन्नदान हेच गृहस्थाश्रमीचे मुख्य कर्तव्य आहे, असे ते म्हणत;व त्याप्रमाणे त्यांच्या घरी येणारा अतिथी कधीही विन्मुख जात नसे, त्यांची रहाणी अगदी साधी असून ते प्रेमळ व नि:स्पृह होते. त्यांनी आपल्या प्रेमाने व सौजन्याने संसार प्रेममय बनवून, आपले अवतारकार्य संपताच वयाच्या ५१ व्या वर्षी आश्विन वद्य ३ शके १८२७(१६-१०-०५) सोमवारी अरुणोदयास बेळगाव मुक्कामी आपला देह ठेविला. तेथून त्यांचा देह त्यांच्या हजारो शिष्यांनी मोठया समारंभाने बाळेकुंद्रीस नेऊन तेथील त्यांच्या आमराईत अग्निनारायणास अर्पण केला. त्या ठिकाणी एक औदुंबर वृक्ष लाविला असून, त्याच्या सभोवती षट्‌कोनी पार बांधिला आहे व जवळच विहीर, धर्मशाळा, फुलबाग वगैरे तयार केली आहेत. शिवाय खुद्द श्रीपंतांच्या परसात त्यांच्या आजच्या समाधीशेजारी, त्यांच्या स्मरणार्थ एक लहानसे देवालय बांधून त्यात दत्ताच्या पादुका स्थापन केल्या आहेत. तेथे व आमराईत भाविक लोक नित्य भजनपूजन करीत असतात.

येथवर श्रीपंतांचा संक्षिप्त जीवनवृत्तांत दिला आहे. आता त्यांना परमार्थाकडे ओढा कसा लागला. त्यांस सद्‌गुरुप्राप्ती कशी झाली, वगैरेबद्दलची थोडी हकिकत देतो.

श्रीपंतांचे मातृकुळातील सगळी माणसे फार कोमल अंत:करणाची, धर्मशील व आस्तिक्य बुद्धीची अशी होती व पितृकुळातील पुरुष  सत्यप्रतिज्ञ, ईश्वरनिष्ठ व अढळ सात्विक धैर्याच असून श्रीदत्ताचे नि:सीम भक्त होते. उभय कुळींचे उच्च गुण श्रीपंतांचे ठिकाणी जन्मत:च एकवटले. मातुलगृही लहानपणापासून देवभक्ती, सन्मार्गप्रीती, दुर्जनांचा तिरस्कार, सज्जनांचा आदर, नीतीची योग्यता, सत्याचा जय वगैरे गोष्टींची अनेक पुराणांतील उदाहरणे देऊन माहिती करून दिली. श्रीपंतांस लहानपणापासून पुराणकथा ऐकण्याचा नाद असे. यामुळे त्यांच्या नैसर्गिक सात्विक वृत्तीला पोषण मिळाले. दड्डी हा गाव घटप्रभा नदीच्या काठी वसला असून, त्याच्या आसपास उंच डोंगर व दाट जंगल आहे. यामुळे सृष्टिदेवीचे ते एक क्रीडास्थानच बनले आहे. श्रीपंतांना नदीकाठी व जंगलात हिंडणे फार आवडत असे. त्यायोगे त्यांच्या लहान वयात त्यांना निसर्गदेवतेचा सहवास घडून, त्यांची कल्पनाशक्ती वाढली व उदात्त विचारांचे बाळकडू अनायासे मिळाले. बेळगावी शिकण्याकरिता आल्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांजकडून. श्रीगुरुचरित्र व दत्तमाहात्म्य वगैरे ग्रंथ वाचवून, अनन्यभक्तीचे महत्त्व व तिचा सुखकर परिणाम उत्तम रीतीने समजावून दिला. तेव्हापासून श्रीदत्तांवर श्रीपंतांची दृढ भक्ती बसली. अशा प्रकारे लहानपणापासूनच पारमार्थिक विषयांत त्यांचे मन रमू लागले, तत्त्वज्ञानाकडे ओढा लागला व क्रमाक्रमाने सर्व प्रकारे परिपूर्ण असे मुमुक्षत्व अंशी बाणले.

बेळगाव जिल्हयापैकी खानापूर तालुक्यात मलप्रभातटाकी पार्श्ववाड या नावाचा एक गाव आहे. तेथील कुलकर्णी घराण्यातील बाळप्पा या नावाचे शुद्धाद्वैतं-मार्गी महायोगी सर्वसंग परित्याग करून बाळेकुंद्रीजवळ असलेल्या कर्डीगुद्दीच्या डोंगरात येऊन राहिले होते. या महापुरुषास श्रीपंतांनी आपल्या पदात श्रीबालमुकुंद किंवा बालावधूत असे म्हटले आहे. त्यांनी श्रीपंतांचे मावसबंधू गणपतराव व चुलते चिंतोपंत यांजवर अनुग्रह केला होता;व त्यांच्याच योगाने श्रीपंतास त्या सत्पुरुषाची गाठ पडली; व त्यांनी शके १९९७ आश्विन वद्य १२ च्या दिवशी श्रीपंतांवर अनुग्रह केला. पुढे श्रीपंतांची सत्पात्रता पाहून, आपला संप्रदाय चालविण्यास आज्ञा देऊन, आपण श्रीमल्लिकार्जुनास जातो म्हणून जे गेले, ते परत आले

अनुग्रह झाल्यानंतर श्रीपंतांनी काही काळ योगसाधनात घालविला, नंतर ते आपला विश्रांतीचा वेळ आध्यात्मिक ग्रंथांचे  परिशीलन करण्यात व वेदांतचर्चा करण्यात घालवीत असत. त्यांना मराठी, कानडी, इंग्रजी, हिंदुस्थानी, संस्कृत वगैरे भाषा चांगल्या अवगत असून अभिरुची फार असल्यामुळे, त्यांनी वरील भाषांतील बहुतेक आध्यात्मिक व तत्त्वज्ञान विषयक प्राचीन व अर्वाचीन ग्रंथांचे परिशीलन केले होते. म्हणून कोणीही कोणत्याही बुद्धीने कसाही प्रश्न केला तरी, ते समर्पक असे अनेक तर्‍हेचे दृष्टांत देऊन, त्याचे शांतपणाने पूर्ण समाधान करीत; यामुळे दूरदूरचे शास्त्री, पंडित वगैरे लोकांचा जमाव नेहमी त्यांच्याजवळ असे. त्यांचा शिष्यसमुदाय मोठा व बहुतेक ज्ञातींचा असून सर्वांवर त्यांची सारखीच प्रीती होती. हे परस शांत असून बोलल्याप्रमाणे चालत होते. ते अद्वैतसिद्धांत सांगत; व त्याप्रमाणे आपल्या वर्तनात भेद करीत नसत. पूर्वापार चालत आलेले श्रीगुरुद्वादशी, दत्तजयंती, गुरुप्रतिपदा हे उत्सव मोठया थाटाने व उत्साहाने करीत असत शिवाय अलीकडे श्रीगोकुळअष्टमीचा उत्सवही करीत असत. त्याप्रमाणे त्यांच्या पश्चातही हे उत्सव चालू आहेत.

श्रीपंतांच्या कविता ‘श्रीदत्तप्रेमलहरी’ नावाच्या ग्रथांत समाविष्ट आहेत. श्रीपंतांस भजनाची गोडी फार असे व ते नेहमी श्रीदत्ताचे भजन करीत असत. त्या वेळी उत्सव प्रसंगी सहज स्फूर्तीने त्यांच्या मुखातून जी पदे निघत, ती कोणीतरी टीपून ठेवीत; म्हणूनच अशा शुद्ध अंत:करणरूपी प्रेमोदधीतून सहजी निघालेल्या पदरुपी लहरीला ‘श्रीदत्तप्रेमलहरी’ असे नाव दिले आहे.

श्रीपंतांच्या पदांत स्वरूपवर्णन, कोठे श्रीत्रैमूर्ती दत्तात्रेयांचे, तर कोठे श्रीसद्‌गुंरूचे आहे. तरी श्रीपंतांना श्रीदत्तात्रेय व श्रीसद्‌ग्रुरू हे यत्किंचितही भिन्न दिसले नाहीत; हे (पद नंबर १६२४ व २४१२) यांवरून व दुसर्‍या पदांवरूनही दिसून येईल. जागोजाग त्यांनी ‘सद्‌गुरुविण दैवत नाहीं; कल्पित देवा पुजू नको.’ असा उपदेश केलेला आढळतो. सद्‌गुरुइतकी जगात कोणतीच वस्तू त्यांना प्रिय नव्हती. सद्‌गुरूच्या ठायी त्यांच्यासारखी दृढ निष्ठा व गाढ प्रेम क्वचितच आढळतील. ‘सद्‌गुरूच सर्वेश्वर, सदुरुपायीच दृढ प्रीती, सद्‌गुरुप्रदींच जगणे, सद्‌गुरुपर्दी सर्वस्व अर्पण, सद्‌गुरूच प्रेमळ माय, सद्‌गुरुसेवाच स्वधर्म, सद्‌गुरुस्वरुर्पीच समरस होणे’ असे त्यांचे उदगार पदांतून ठिकठिकाणी आढळून येतात. त्यांना ज्या स्वरूपाचा ईशसाक्षात्कार होई, त्याचे वर्णन ते करीत असत. प्रेमभरीत अंत:करणाने ते भजन करीत असता एके वेळी त्यांना सद्‌गुरूचा साक्षात्कार झाला, तो त्यांनी ‘दिव्य सद्‌गुरु दत्तमूर्ति देखूनी डोळेभरी’ (पद १९४४) या पद्यरूपाने प्रगट केला आहे.

करुणाकर पदे प्रेमाने नुसती ओथंबली आहेत. काहीज ठिकाणी करुणा भाकिली आहे, कोठे उपकारस्मरण आहे, कोठे धन्यवाद गाईला आहे, कोठे विनोद, तर कोठे सलगीचे भाषण आहे. काही पदे इतकी ह्रदयद्रावक आहेत की, ती वाचताना वाचणार्‍याचे नेत्र अश्रुपूर्ण झाल्याखेरीज राहणार नाहीत ! उदाहरणार्थ पद २१ पहा. यात शेवटी जेव्हा निर्वाण झाल, तेव्हा गुरुमाय भेटली, अशी हकीकत आहे. सलगीचे उदाहरण ‘मत्सरी किती तूं दत्ता ॥’ (पद १६८३). उपदेशपर पदांतून सर्वत्र अद्वैत मत स्थापन केले आहे. ते जसे सगुण तसेच निर्गुण ब्रह्मोपासक, व जसे परम भगवद्‌भक्त, तसेच अद्वैतमतवादी होते. द्वैत, विशिष्टाद्वैत व अद्वैत ही तिन्ही वास्तविक भिन्न नसून, त्यांचे पर्यवसान एकच आहे, असा त्यांचा लोकांस बोध असे. हे त्यांचे मत पद १६९० ‘द्वैत दिसूनी अद्वैतासी हानि किमपि नाहीं’ तसेच ‘एकत्वीं न भोग म्हणुनी द्वैत जाहलें’ (पद २४३१) त्याचप्रमाणे ‘वाङमानसासी वारुनि निजशांति भोगिली’ (पद १४६५) यावरून दिसून येते. वस्तुत: ही तीन भिन्न मते निव्वळ बाह्यदृष्टीने पाहणार्‍यात आढळतात. खर्‍या भगवद्‌भक्ताच्या गावी त्यांचा वाराही नसतो. तुकारामाप्रमाणे काही पदांतून ढोंगी लोकांवर कोरडे ओढलेले आढळतात. कर्म, उपासना ही कोणत्या दृष्टीने करावीत, याबद्दल काही ठिकाणी उपदेश केलेला आहे. ‘सद्‌गुरुकृपें ब्राह्मण होता संध्या केली ऐका’ (पद १५६) इतर ठिकाणी ‘घडी घडी काळ गिळतो तुजला’ (६०६) असा इशारा देऊन सद्‌गुरूस शरण जाण्यास सांगितले आहे.

अनुभवपर पदांत कोठे योगाचा अनुभव, कोठे आत्मसाक्षात्कार, व कोठे श्रुतिवचनाचा अनुभव हीही आढळतात. श्रीपंत जरी योगशास्त्र पूर्णपणे जाणत होते, तरी भक्ती व ज्ञान यांच्यापुढे योगास त्यांनी कधीही महत्त्व दिले नाही, म्हणून पदात त्याजबद्दल फारसा उल्लेख नाही; ‘क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया’ (१७६७) यात श्रुतिवचनाचा अनुभवपर अर्थ सांगितला आहे. बर्‍यांच ठिकाणी गुरुप्रेमातिशयाचे अनुभव आहेत. ‘गुरुसवे धरिली आजी कुस्ती रे’ (पद ४०८)

श्रीपंतांचे समग्र वाङमय आज निष्ठावंत दत्तोपासकांना उपलब्ध आहे. श्रीदत्तप्रेलहरी-भजनगाथा, भक्ताताप, बाळबोधामृतसार, प्रेमतरंग, श्रीबालमुकुंद बोधानंदगुटिका, आत्म-ज्योती, परमानुभवप्रकाश, अनुभववल्ली (भाग १ व २), ब्रह्मोपदेश, स्फुटलेख, श्रीदत्तप्रेम-लहरी पुष्प ७ व ८, पंतांची पत्रे, भक्तोद्‌गार किंवा प्रेमभेट इत्यादी पंतवाङमय दत्तप्रेमिकांना मार्गदर्शक व प्रेरक होणारे आहे.

N/A

References : N/A
Last Updated : January 30, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP