मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|नाट्यछटा|
महासर्प

दिवाकर - महासर्प

नाट्यछटा म्हणजे एक प्रसंग, एक पात्र, बोलणेही एकाच पात्राचे, पण दुसया एखाद्या किंवा अनेक व्यक्तींशी ती बोलते आहे असा देखावा, आणि त्यातून मनोगत व्यक्त करण्याची पद्धत.


''.... कोणरे तूं ? चल दूर होः - या गुलाबाच्या फुलाला पुनः हात लाव कीं तुला अगदीं कडकडून डसलोंच म्हणून समज ! - अरे तुम्ही माणसें आपसांत काय वाटेल तें करा - एकमेकांचे गळे कापा - रक्त प्राशन करा - आणि खुशाल मजेनें ढेकर देत बसा ! त्या तुमच्या सुखाच्या आड कोणी येत नाहीं ! - जा बरें, बाबा ! असंतोषानें रात्रंदिवस डोकीं कोरीत बसणार्‍या त्या आपल्या मनुष्यसृष्टींत खुशाल जाऊन बैस ! अरे, आपलीं मनें उजाड करतां तीं करतां - आणि आमच्या या सुंदर वनालाही उजाड करुं पाहतां ? किती सुंदर गुलाबाचें फूल हें ! पहा कसें आनंदानें उड्या मारीत आहे ! - तो पहा ! तो ढग आकाशांत दूर एकटाच फिरत आहे ! - त्यालासुद्धां याच्या बाललीला पाहून किती आनंद झाला आहे ! - या वनांतील मौज पहात तो कसा स्वस्थ उभा आहे ! - नको ! हें सुंदर - चिमकुलें - फूल तोडूं नकोस ! अरे, हें आमचें भावंड आहे ! समज, हें तूं तोडून नेलेंसे, तर - मला, माझ्या या सगळ्या भावंडांना, या ढगाला, आणखी आमच्या प्रेमळ आईला किती दुःख होईल ! - तुमचें लहानसे बालक काळानें आपल्या घरीं खेळायला नेलें, तर तुम्हांला किती बरें शोक होतो ! - कमलाकरा, या सुंदर - सुवासिक - फुलाला आमच्या हातूंन हिसकावून नेऊन तूं काय करणार ? आपल्या पत्नीलाच देणार ना ! अरे, आईच्या स्तनापासून तूं तट्कन ओढून आणलेलें हें मूल तिनें पाहिलें, तर ती चट्कन रडायला लागेल ! - जा, तुझ्या प्रियेलाच येथें घेऊन ये, म्हणजे ती या पुष्पाचें चुंबन घेईल, त्याच्याकरितां गाणीं गाईल, - आणखी, तिचें मधुर गायन ऐकून मला - आमच्या आईला - या वनाला - एकंदर सर्व सृष्टीला - किती आनंद होईल ! तुझी लाडकी प्रेमाचा वीणा वाजवायला लागूं दे, कीं आनंदानें मी अगदी डोलायला लागेन ! मी अतिशय रागीट आहें खरा, - पण प्रेमानें मला कोणी जवळ घेतलें, तर कधीं कोणावर मी रागावेन का ?.... ''

१८ सप्टेंबर १९११

N/A

References : N/A
Last Updated : September 12, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP