मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|नाट्यछटा|
बाळ ! या नारळाला धक्का लावूं नकोस बरें !

दिवाकर - बाळ ! या नारळाला धक्का लावूं नकोस बरें !

नाट्यछटा म्हणजे एक प्रसंग, एक पात्र, बोलणेही एकाच पात्राचे, पण दुसया एखाद्या किंवा अनेक व्यक्तींशी ते पात्र बोलते आहे असा देखावा, आणि त्यातून मनोगत व्यक्त करण्याची पद्धत.


'' .... बाळ वेणुबाई ! असें काय बरें वेड्यासारखें करावें ? हें बघ, हा नारळ किं नाहीं, फोडण्याकरितां देव्हार्‍यांत ठेवलेला नाहीं ! याला रोज सकाळी गंध, अक्षता, फुलें वाहून याची पूजा करायची ! - पूजा कशाला करायची ? वेडी पोर ! ऐक, मी काय सांगतो तें. एके दिवशी रात्रीं काय झालें, - आपल्या बागेंत बंगल्याशेजारी नारळाचें झाड आहे तें ? - त्या झाडाखाली, श्रीरामचंद्र, लक्ष्मण - सीतामाईबरोबर गोष्टी सांगत बसलेले तुझ्या पणजोबांना स्वप्नांत दिसले ? सकाळीं ते जे उठून पाहतात, तों आपला एक नारळ त्या झाडाखालीं पडलेला ! झालें ! देवाचा प्रसाद म्हणून पणजोबांनीं तो घरीं आणला, त्याची सालपटें काढलीं, मग देव्हार्‍यांत ठेवून त्याची पूजा केली ! रोज या नारळाची पूजा करावयाची असा त्यांनीं आपला नेम चालविला. पुढें देवाच्या दयेनें त्यांना पुष्कळ पैसा मिळाल्यावर, त्यांनीं याला चांगला सोन्यानें मढविला ! बघ, कशी खर्‍या नारळाच्या शेंडीसारखी जरीची शेंडी आहे ती ! झालेंच तर ही मखमलीची पिशवी, त्याला बसायला रेशमी कापडाची मऊ मऊ गादी - पाहिलीस ना कशी छानदार आहे ती ? - काय ? काय म्हटलेंस ? या नारळांत - या जरीनें, सोन्यानें मढविलेल्या नारळांत - गोड गोड पाणी ! - चांगलें खोबरें असेल ? हः हः वेडी रे वेडी ! बेटा वेणुबाई ! या नारळांत आतां कोठून खोबरें व पाणी असायला ? पणजोबांना ज्या वेळेस तो झाडाखाली सांपडला त्या वेळेस त्याच्यांत खोबरें आणि पाणी असेल ! त्या गोष्टीला जवळजवळ आतां दोनशें वर्षे व्हायला आलीं ! आतां या नारळांतलें पाणीही नाहींसें झालें आहे, व खोबरेंही नाहींसें झालें आहे ! - मग यांत आहे काय ? बेटा, कवटी सोन्याची, शेंडी जरीची, पण आंत किं नाहीं, सडलेली, कुचकी, अशी निवळ घाण आहे ! आतां कांहीं तो खाण्याच्या उपयोगाचा नाहीं ! समजलें आतां ? तो देण्याबद्दल आतां पुनः नाहींना कधीं हट्ट धरायची ?.... ''

२४ नोव्हेंबर १९११

N/A

References : N/A
Last Updated : September 16, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP