मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|नाट्यछटा|
तेवढेंच ' ज्ञानप्रकाशां ' त !

दिवाकर - तेवढेंच ' ज्ञानप्रकाशां ' त !

नाट्यछटा म्हणजे एक प्रसंग, एक पात्र, बोलणेही एकाच पात्राचे, पण दुसया एखाद्या किंवा अनेक व्यक्तींशी ते पात्र बोलते आहे असा देखावा, आणि त्यातून मनोगत व्यक्त करण्याची पद्धत.


''.... हो, बरोबर, दोनदां आपल्याकडे येऊन गेलों मी. - नाहीं, काल नाहीं, संध्याकाळीं आलों होतों तें परवा. आणि सकाळचे जें म्हणतां, ती कालची गोष्ट. असो, गांठ पडली चला. - हो, तेंच विचारणार होतों, कीं शेजारी एवढी गडबड कसली ? सारख्या मोटारी अन् गाडया येताहेत ! बायकांची तर ही गर्दी लोटली आहे ! - केव्हं ? आतां मघाशीं सहाच्या सुमारास ? - नाहीं बोवा, तुम्ही सांगेपर्यत वार्तासुद्धां नव्हती याची मला ! आज बरेच दिवस आजारी आहेत, फारशा कुठे जाता - येत नाहींत, येवढें ठाऊक होतें ! पण इतक्यांतच असें कांहीं होईलसें - बाकी बर्‍याच थकल्या होत्या म्हणा ! - साठ कां हो ! साठाच्या पलीकडे खास गेल्या होत्या ! - असो. चला ! मोठी एक कर्तीसवर्ती बाई गेली ! पेशवाईनंतर महाराष्ट्रांत इतक्या योग्यतेची मला नाहीं वाटत दुसरी कोणी असेलशी ! - खरें आहे. अगदी खरें आहे ! मनुष्य आपल्यामध्यें असतें, तोपर्यंत आपल्याला त्याची कल्पना नसते ! - स्वभावानें ना ? वा ! फारच छान ! अतिशय मनमिळाऊ आणि शांत ! कटकट म्हणून नाहीं ! - हळूहळू, थोडंथोडं, पण खरोखरच मोठं कार्य केलं ! अन् फारसा गाजावाजा न करतां ! - आधींच थोरामोठ्यांतली ती ! आणि रावसाहेबांचें वळण ! मग काय विचारतां ! - बोलणें काय, चालणें काय आणि - हो ! लिहिणेंसुद्धां - तेंच म्हणतों मी - कीं, ' आठवणी ' कशा नमुनेदार लिहिल्या आहेत ! मराठींत असें पुस्तक नाहीं आहे ! - तें काय विचारायला नको ! आज गर्दी म्हणजे - सगळा गांव लोटायचा आतां ! - मोटारी अन् गाडयांचा चालला आहे धडाका ! - काय ! खूपच लोटली आहे हो ! दर्शनाकरतां दिवाणखान्यांतच ठेवलेलें दिसतें आहे त्यांना ? - चला, येत असलांत तर .... जाऊं म्हणतों ! इतकीं माणसें जात आहेत तेव्हां - हो गर्दी तर आहेच ! - राह्यलं, तब्येत बरोबर नसली तर नाहीं गेले ! मला तरी कुठें येवढें जावेंसे वाटतें म्हणा ! कारण आतां गेले काय, अन् न गेलें काय सारखेंच ! पण बोवा ' अमूक एक फलाणे प्रोफेसरद्वय आले होते शेवटच्या दर्शनाला ' ! तेवढेंच ' ज्ञानप्रकाशां ' त !.... ''

२५ एप्रिल १९२६

N/A

References : N/A
Last Updated : September 18, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP