श्रीमद्‍भगवद्‍गीता - अध्याय १४

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीभगवान म्हणाले,

ज्ञानांतीलही अति उत्तम ते परम ज्ञान मी तुला पुन्हा सांगतो की, जे जाणल्याने सर्व मुनिजन या संसारातून मुक्त होऊन परम सिद्धी पावले आहेत. ॥१॥

हे ज्ञान धारण करून माझ्या स्वरूपात प्राप्त झालेले पुरुष सुष्टीच्या आरंभी पुन्हा जन्माला येत नाहीत आणि प्रलयकाळीही व्याकूळ होत नाहीत. ॥२॥

हे अर्जुना ! माझी महद् - ब्रह्मरूप मूळ प्रकृती संपूर्ण भूंताची योनी म्हणजे गर्भधारणा करण्याचे स्थान आहे. आणि मी त्या योनीच्या ठिकाणी चेतन-समुदायरूप गर्भाची स्थापना करतो. त्या जड - चेतनाच्या संयोगाने सर्व भूतांची उत्पत्ती होते.॥३॥

हे अर्जुना ! नाना प्रकारच्या सर्व जातींत जितके शरीरधारी प्राणी उप्तन्न होतात, त्या सर्वांची गर्भ धारण करणारी माता प्रकृती आहे आणि बीज स्थापण करणारा मी पिता आहे. ॥४॥

हे अर्जुना ! सत्त्वगूण, रजोगुण आणि तमोगुण हे प्रकृतीपासून उत्पन्न झालेले तिन्ही गुण अविनाशी जीवात्म्याला शरीरात बांधून ठेवतात. ॥५॥

हे निष्पाप ! त्या तीन गुणांमधील सत्त्वगूण, निर्मळ असल्यामुळे प्रकाश उप्तन्न करणारा आणि विकाररहित आहे. तो सुखासंबंधीच्या व ज्ञानासंबंधीच्या अभिमानाने बांधतो ॥६॥

हे अर्जुना ! रागरूप रजोगुण इच्छा व आसक्ती यांपासून उप्तन्न झालेला आहे, असे समज. तो या जीवात्माला कर्माच्या आणि त्यांच्या फळांच्या संबधांने बांधतो. ॥७॥

हे अर्जुना ! सर्व देहाभिमनी पुरुषांना मोह पाडणारा तमोगुण अज्ञानापासुन उप्तन्न झालेला आहे, असे समज तो या जीवात्माला प्रमाद , आळस आणि झोप यांनी बांधतो. ॥८॥

हे अर्जुना ! सत्त्वगुण सुखाला, रजोगुण कर्मांना तसेच तमोगुण ज्ञानाला झाकून प्रमाद करण्याला ही प्रवृत्त करतो. ॥९॥

आणि हे अर्जुना ! रजोगुण आणी तमोगुण यांना दडपून सत्त्वगुण वाढतो. सत्त्वगुण व तमोगुणाला दडपून रजोगुण वाढतो. तसेच सत्त्वगुण व रजोगुणाला दडपून तमोगुण वाढतो. ॥१०॥

ज्यावेळी या देहात तसेच अंतःकरणात व इंद्रियांत चैतन्य आणि विवेकशक्ती उप्तन्न होते, त्यावेळी असे समजावे की, सत्त्वगुण वाढत आहे. ॥११॥

हे अर्जुना ! रजोगुण वाढल्यावर लोभ, प्रवृत्ती, स्वार्थाने प्रेरित होऊन फळाच्या इच्छेने कर्माचा आरंभ, अशान्ती आणि विषयभोगांची लालसा ही सर्व उप्तन्न होतात. ॥१२॥

हे अर्जुना ! तमोगुण वाढल्यावर अंतःकरण व इंद्रिये यांत अंधार, कर्तव्यकर्मात प्रवृती नसणे, व्यर्थ हालचाली आणि झोप इत्यादी अंतःकरणाला मोहित करणार्‍या वृत्ती, ही सर्व उप्तन्न होतात. ॥१३॥

जेव्हा हा मनुष्य सत्त्वगुण वाढलेला असताना मरण पावतो, तेव्हा तो उत्तम कर्मे करणार्‍याच्या निर्मळ दिव्य स्वर्गादि लोकांत जातो. ॥१४॥

रजोगुण वाढलेला असता मरण पावल्यास कर्माची आसक्ती असणार्‍या मनुष्यांत जन्मतो. तसेच तमोगुण वाढला असता मेलेला माणुस किडा, पशु इत्यादी मूढ ( विवेकशून्य ) जातींत जन्मतो. ॥१५॥

श्रेष्ठ ( सात्त्विक ) कर्माचे सात्विक अर्थात सुख, ज्ञान आणि वैराग्य इत्यादी निर्मळ फळ सांगितले आहे. राजास कर्माचे फळ दुःख तसेच तामस कर्माचे फळ अज्ञान सांगितले आहे. ॥१६॥

सत्त्वगुणापासून ज्ञान उप्तन्न होते. रजोगुणापासून निःसंशय लोभ आणि तमोगुणापासुन प्रमाद आणि मोह उप्तन्न होतात आणि अज्ञानही होते ॥१७॥

सत्त्वगुणात असलेले पुरुष स्वर्गादी उच्च लोकांना जातात. रजोगुणात असलेले पुरुष मध्यलोकात म्हणजे मनुष्यलोकातच राहतात आणि तमोगुणाचे कार्य असलेल्या निद्रा, प्रमाद आळस इत्यादीत रत असलेले तामसी पुरुष अधोगतीला अर्थात कीटक, पशु इत्यादी नीच जातीत तसेच नरकात जातात. ॥१८॥

ज्यावेळी द्रष्टा तिन्ही गुणांशिवाय दुसरा कोणीही कर्ता नाही, असे पाहतो आणि तिन्ही गुणांच्या अंत्यंत पलीकडे असणार्‍या सच्चिदानन्दघनस्वरूप मला परमात्म्याला तत्त्वतः जाणतो, त्यावेळी तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. ॥१९॥

हा पुरुष शरीराच्या उप्तत्तीला कारण असलेला या तिन्ही गुणांना उल्लंघून जन्म, मृत्यु, वार्धन्य आणि सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्त होऊन परमानन्दला प्राप्त होतो. ॥२०॥

अर्जुन म्हणाला,

या तिन्ही गुणांच्या पलीकडे गेलेला पुरुष कोणकोणत्या लक्षणांनी युक्त असतो ? आणि त्याचे आचरण कशाप्रकारे असते ? तसेच हे प्रभो ! मनुष्य कोणत्या उपायाने या तीन गुणांच्या पलीकडे जातो ? ॥२१॥

श्रीभगवान म्हणाले,

हे अर्जुना ! जो पुरुष सत्त्वगुणाचे कार्यरूप प्रकाश , रजोगुणाचे कार्यरूप प्रवृत्ती आणि तमोगुणाचे कार्यरूप मोह ही प्राप्त झाली असता त्यांचा विषाद मानत नाही आणि प्राप्त झाली नाही तरी त्यांची इच्छा करीत नाही. ॥२२॥

जो साक्षीरूप राहून गुणांकडुन विचलित केला जाऊ शकत नाही आणि गुणच वावरत आहेत, असे समजून जो सच्चिदानंदघन परमात्म्यांत एकरूप होऊन राहतो व त्या स्थितीपासून कधी ढळत नाही, ॥२३॥

जो पुरुष निरंतर आत्मभावात राहून सुख-दुःख समान मानतो, माती, दगड आणि सोने यांना सारखेच मानतो, ज्याला आवडती व नावडती गोष्ट सारखीच वाटते जो ज्ञानी आहे. आणि स्वतःची निन्दा व स्तृती ज्याला समान वाटतात. ॥२४॥

जो मान व अपमान सारखेच मानतो, ज्याची मित्र व शत्रू या दोघांविषयी समान वृत्ती असते, तसेच सर्व कार्यांत ज्याला ' मी करणारा ' हा अभिमान नसतो, त्याला गुणातीत म्हणतात. ॥२५॥

आणि जो पुरुष अव्यभिचारी भक्तियोगाने मल निरंतर भजतो, तोसुद्धा या तिन्ही गुणांना पूर्णपणे उल्लंघून सच्चिदानंदघन ब्रह्माला प्राप्त होण्यास योग्य ठरतो. ॥२६॥

कारण त्या अविनाशे परब्रह्माचा, अमृताचा, नित्य धर्माचा आणि अखंड एकरस आनंदाचा आश्रय मी आहे. ॥२७॥

N/A

References : N/A
Last Updated : December 15, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP