श्रीमद्‍भगवद्‍गीता - अध्याय २

श्रीमद्‍भगवद्‍गीतेत सांगितलेली भक्ति म्हणजे धार्मिक समाधान देणारे विचारयुक्त साधन आहे शिवाय श्रद्धा व भक्तियुक्त अंतःकरणाने एकाग्र होऊन विचार केल्यास एक वेगळाच शब्दातीत अनुभव येतो.


संजय म्हणाला,

अशा रीतीने करुणेने व्याप्त, ज्याचे डोळे आसवांनी भरलेले व व्याकुळ दिसत आहेत, अशा शोक करणार्‍या अर्जुनाला भगवान मधुसूदन असे म्हणाले. ॥१॥

श्रीभगवान् म्हणाले,

हे अर्जुना ! या भलत्याच वेळी हा मोह तुला कशामुळे उत्पन्न झाला ? कारण हा थोरांनी न आचरिलेला, स्वर्ग मिळवून न देणारा आणि कीर्तिकारकही नाही. ॥२॥

म्हणून हे पार्था ! षंढपणा पत्करु नकोस. हा तुला शोभत नाही. हे परंतपा ! अंत:करणाचा तुच्छ दुबळेपणा सोडून देऊन युध्दाला उभा राहा. ॥३॥

अर्जुन म्हणाला,

हे मधुसूदना ! युध्दात मी भीष्मपितामहांच्या आणि द्रोणाचार्यांच्या विरुध्द बाणांनी कसा लढू ? कारण हे अरिसूदना ! ते दोघेही पूज्य आहेत. ॥४॥

म्हणून या महानुभाव गुरुजनांना न मारता मी या जगात भिक्षा मागून खाणेही कल्याणकारक समजतो. कारण गुरुजनांना मारुनही या लोकात रक्ताने माखलेले अर्थ व कामरुप भोगच ना भोगावयाचे ! ॥५॥

युध्द करणे वन करणे या दोहोंपैकी आम्हांला काय श्रेष्ठ आहे, हे कळत नाही. किंवा आम्ही त्यांना जिंकू की ते आम्हांला जिंकतील, हेही आम्हांला माहीत नाही. आणि ज्यांना मारुन आम्हांला जगण्याचीही इच्छा नाही, तेच आमचे बांधव -धृतराष्ट्रपुत्र आमच्या विरुध्द उभे आहेत. ॥६॥

करुणाव्याप्त दैन्यामुळे ज्याचा मूळ स्वभाव नाहीसा झाला आहे व धर्माधर्माचा निर्णय करण्याविषयी ज्याची बुध्दी असमर्थ आहे, असा मी तुम्हांला विचारीत आहे की, जे साधन खात्रीने कल्याणकारक आहे, ते मला सांगा. कारण मी तु्मचा शिष्य आहे. म्हणून तुम्हांला शरण आलेल्या मला उपदेश करा. ॥७॥

कारण, पृथ्वीचे शत्रुरहित व धन-धान्यसमृध्द राज्य मिळाले किंवा देवांचे स्वामित्व जरी मिळाले, तरी माझ्या इंद्रियांना शोषून टाकणारा शोक जो दूर करु शकेल, असा उपाय मला दिसत नाही.

॥८॥

संजय म्हणाला,

हे राजा ! निद्रेवर ताबा असलेल्या अर्जुनाने अन्तर्यामी श्रीकृष्णाला एवढे बोलून ‘मी युध्द करणार नाही’ असे स्पष्टपणे सांगितले व तो गप्प झाला. ॥९॥

हे भरतवंशी धृतराष्ट्र महाराज ! अन्तर्यामी भगवान श्रीकृष्ण दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी शोक करणार्‍या त्या अर्जुनाला हसल्यासारखे करुन असे म्हणाले. ॥१०॥

श्रीभगवान् म्हणाले,

हे अर्जुना ! तू ज्यांचा शोक करु नये, अशा माणसांसाठी शोक करतोस आणि विद्वानांसारखा युक्तिवाद करतोस. परन्तु ज्यांचे प्राण गेले आहेत त्यांच्यासाठीही आणि ज्यांचे प्राण गेले नाहीत, विद्वान माणसे शोक करीत नाहीत. ॥११॥

मी कोणत्याही काळी नव्हतो, तू नव्हतास किंवा हे राजे नव्हते असेही नाही आणि यापुढे आम्ही सर्वजण असणार नाही, असेही नाही. ॥१२॥

ज्याप्रमाणे जीवात्म्याला या शरीरात बालपण, तारुण्य आणि वार्धक्य येते, त्याचप्रमाणे दुसरे शरीर मिळते. याविषयी धीर पुरुषांना मोह उप्तन्न होत नाही. ॥१३॥

हे कुन्तीपुत्रा ! इंद्रियांने विषयांशी संयोग हे थंडी-उष्णता आणि सुख-दु:ख देणारे आहेत. ते उप्तन्न होतात व नाहीसे होतात म्हणून अनित्य आहेत. तेव्हा हे भारता ! ते तू सहन कर. ॥१४॥

कारण हे श्रेष्ठ पुरुषा ! सुख-दु:ख समान मानणार्‍या ज्या धीर पुरुषाला इंद्रियांचे विषयांशी संयोग व्याकुळ करीत नाहीत, तो मोक्षाला योग्य ठरतो. ॥१५॥

असत् वस्तूला अस्तित्व नाही आणि सत् वस्तूचा अभाव नसतो. अशा रीतीने या दोहोंचेही सत्य स्वरुप तत्त्वज्ञानी पुरुषांनी पाहिले आहे. ॥१६॥

ज्याने हे सर्व जग-दिसणार्‍या सर्व वस्तू-व्यापल्या आहेत, त्याच्या नाश नाही, हे तू लक्षात ठेव. त्या अविनाशीचा नाश कोणीही करु शकत नाही. ॥१७॥

या नाशरहित, मोजता न येणार्‍या, नित्यस्वरुप जीवाम्त्याची ही शरीरे नाशिवंत आहेत, असे म्हटले गेले आहे. म्हणून हे भरतवंशी अर्जुना ! तू युध्द कर. ॥१८॥

जो या आत्म्याला मारणारा असे समजतो, तसेच जो ‘हा ( आत्मा ) मेला’ असे मानतो, ते दोघेही अज्ञानी आहेत. कारण हा आत्मा वास्तविक पाहता कोणाला मारीत नाही आणि कोणाकडून मारला जात नाही. ॥१९॥

हा आत्मा कधीही जन्मत नाही आणि मरतही नाही. तसेच हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणारा नाही. कारण हा जन्म नसलेला, नित्य, सनातन आणि प्राचीन आहे. शरीर मारले गेले तरी हा मारला जात नाही. ॥२०॥

हे पार्था ! जो पुरुष , " हा आत्मा नाशरहित, नित्य, न जन्मणारा व न बदलणारा आहे, हे जाणतो , तो कोणाला कसा ठार करवील किंवा कोणाला कसा ठार करील ? ॥२१॥

ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्रे टाकून देऊन दुसरी नवी वस्त्रे घेतो, त्याचप्रमाणे जीवात्मा जुनी शरीरे टाकून दुसर्‍या नव्या शरीरात जातो. ॥२२॥

या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाहीत, विस्तव जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा वाळवू शकत नाही. ॥२३॥

कारण हा आत्मा कापता न येणारा, जाळता न येणारा, भिजवता न येणारा आणि नि:संशय वाळवता न येणारा आहे. तसेच हा आत्मा नित्य, सर्वव्यापी, अचल, स्थिर राहणारा आणि सनातन आहे. ॥२४॥

हा आत्मा अव्यक्त आहे, अचिन्त्य आहे आणि विकाररहित आहे, असे म्हटले जाते. म्हणून हे अर्जुना ! हा आत्मा वर सांगितल्याप्रमाणे आहे, हे लक्षात घेऊन तू शोक करणे योग्य नाही. ॥२५॥

परन्तु, जर तू आत्मा नेहमी जन्मणारा व नेहमी मरणारा आहे, असे मानत असशील, तरीसुध्दा हे महाबाहो ! तू अशा रीतीने शोक करणे योग्य नाही. ॥२६॥

कारण असे मानल्यास त्यानुसार जन्मास आलेल्याला मृत्यू निश्चित आहे आणि मेलेल्याला जन्म निश्चित आहे. म्हणून या उपाय नसलेल्या गोष्टींविषयीही तू शोक करणे योग्य नाही. ॥२७॥

हे अर्जुना ! सर्व प्राणी जन्मापूर्वी अप्रगट असता त आणि मेल्यानंतरही अप्रगट होणार असतात. फक्त मध्ये प्रगट असतात. मग अशा स्थितीत शोक कसला करायचा ? ॥२८॥

एखादा महापुरुषच या आत्म्याला आश्चर्याप्रमाणे पाहतो आणि तसाच दुसरा एखादा महापुरुष या तत्त्वाचे आश्चर्याप्रमाणे वर्णन करतो. आणखी एखादा अधिकारी पुरुष याच्याविषयी आश्चर्याप्रमाणे

ऐकतो आणि कोणी कोणी तर ऐकूनही याला जाणत नाहीत. ॥२९॥

हे अर्जुना ! हा आत्मा सर्वांच्या शरीरात नेहमीच अवध्य असतो . म्हणून सर्व प्राण्यांच्या बाबतीत तू शोक करणे योग्य नाही. ॥३०॥

तसेच स्वत:चा धर्म लक्षात घेऊनही तू भिता कामा नये. कारण क्षत्रियाला, धर्माला अनुसरुन असलेल्या युध्दाहून दुसरे कोणतेही कल्याणकारक कर्तव्य नाही. ॥३१॥

हे पार्था ! आपोआप समोर आलेले, उघडलेले स्वर्गाचे दारच असे हे युध्द भाग्यवान क्षत्रियांनाच लाभते. ॥३२॥

पंरतु जर तू हे धर्मयुक्त युध्द केले नाहीस तर स्वधर्म आणि कीर्ती गमावून पापाला जवळ करशील. ॥३३॥

तसेच सर्व लोक तुझी चिरकाळ अपकीर्ती सांगत राहतील. आणि सन्माननीय पुरुषाला अपकीर्ती मरणाहून दु:सह वाटते. ॥३४॥

शिवाय ज्यांचा दृष्टीने तू आधी अतिशय आदरणीय होतास, त्यांच्या दृष्टीने आता तुच्छ ठरशील. ते महारथी तुला ‘भिऊन युध्दातून काढता पाय घेतला ’, असे मानतील. ॥३५॥

तुझे शत्रू तुझ्या सामर्थ्याची निन्दा करीत तुला पुष्कळसे नको नको ते बोलतील. याहून अधिक दु:खदायक काय असणार आहे ? ॥३६॥

युध्दात तू मारला गेलास तर स्वर्गाला जाशील अथवा युध्दात जिंकलास तर पृथ्वीचे राज्य भोगशील. म्हणून हे अर्जुना ! तू युध्दाचा निश्चय करुन उभा रहा. ॥३७॥

जय-पराजय, फायदा-तोटा आणि सुख-दुख समान मानून युध्दाला तयार हो. अशा रीतीने युध्द केलेस तर तुला पाप नाही लागणार. ॥३८॥

हे पार्था ! हा विचार तुला ज्ञानयोगाच्या संदर्भात सांगितला. आणि आता कर्मयोगाविषयी ऐक. ज्या बुध्दीने युक्त झाला असता तू कर्माचे बंधन चांगल्या प्रकारे तोडून टाकशील. ॥३९॥

या कर्मयोगात आरंभाचा अर्थात् बीजाचा नाश नाही. आणि उलट फळरुप दोषही नाही. इतकेच नव्हे तर, या कर्मयोगरुप धर्माचे थोडेसेही साधन जन्ममृत्युरुप मोठ्या भयापासून रक्षण करते. ॥४०॥

हे अर्जुना ! या कर्मयोगात निश्चयात्मक बुध्दी एकच असते. परन्तु अस्थिर विचार असणार्‍या, अविचारी, कामनायुक्त माणसांच्या बुध्दी खात्रीने पुष्कळ फाटे फुटलेल्या व असंख्य असतात. ॥४१॥

हे अर्जुना, जे भोगांत रमलेले असतात, कर्मफलाची स्तुती करणार्‍या वेदवाक्यांची ज्यांना आवड आहे, ज्यांच्या मते स्वर्ग हीच श्रेष्ठ मिळवण्याजोगी वस्तू आहे, ॥४२॥

स्वर्गाहून श्रेष्ठ दुसरी कोणतीही गोष्ट नाही, असे जे सांगतात, ते अविवेकी लोक अशा प्रकारची जी पुष्पित म्हणजे दिखाऊ शोभायुक्त भाषा बोलत असतात, त्यांची ही भाषा जन्मरुप कर्मफल देणारी तसेच, ॥४३॥

भोग व ऐश्चर्य मिळण्यासाठी अनेक प्रकारच्या क्रियांचे वर्णन करणारी असते. या भाषेने ज्यांचे अन्त:करण आकृष्ट करुन घेतले आहे, जे भोग व ऐश्चर्यात अत्यंत आसक्त आहेत, अशा पुरुषांची परमात्म्याविषयी निश्चयी बुध्दी असत नाही. ॥४४॥

हे अर्जुना ! वेद वर सांगितल्याप्रमाणे तिन्ही गुणांची कार्ये असणारे सर्व भोग आणि त्यांची साधने सांगणारे आहेत. म्हणून तू ते भोग आणि त्यांच्या साधनांच्या बाबतीत आसक्ती बाळगू नकोस. तसेच सुख-दु:खादी द्वंद्वांनी रहित, नित्यवस्तू असणार्‍या परमात्म्यात स्थिर, योगक्षेमाची इच्छा न बाळगणारा आणि अन्त:करणाला ताब्यात ठेवणारा हो. ॥४५॥

सर्व बाजूंनी भरलेला मोठा जलाशय मिळाल्यावर लहान जलाशयाची मनुष्याला जेवढी गरज असते, तेवढीच चांगल्या प्रकारे ब्रह्म जाणणार्‍या ब्राह्मणाला वेदांची गरज उरते. ॥४६॥

तुला कर्म करण्याचाच अधिकार आहे. त्याच्या फळाविषयी कधीही नाही. म्हणून तू कर्मांच्या फळांची इच्छा करणारा होऊ नकोस. तसेच कर्म न करण्याचाही आग्रह धरु नकोस. ॥४७॥

हे धनंजया ! तू आसक्ती सोडून तसेच सिध्दी आणि असिध्दीमध्ये समान भाव ठेवून योगात स्थिर होऊन कर्तव्य कर्मे कर. समत्वालाच योग म्हटले आहे. ॥४८॥

या समत्वरुप बुध्दियोगापेक्षा सकाम कर्म अत्यन्त तुच्छ आहे. म्हणून हे धनंजया ! तू समबुध्दीतच रक्षणाचा उपाय शोध म्हणजे बुध्दियोगाचाच आश्रय घे. कारण फळाची इच्छा बाळगणारे अत्यन्त दीन होत. ॥४९॥

समबुध्दीचा पुरुष पुण्य व पाप या दोहींचाही याच जगात त्याग करतो. अर्थात् त्यांपासून मुक्त असतो. म्हणून तू समत्वरुप योगाला चिकटून राहा. हा समत्वरुप योगच कर्मांतील दक्षता आहे, म्हणजेच कर्मबन्धनातून सुटण्याचा उपाय आहे. ॥५०॥

कारण समबुध्दीने युक्त असलेले ज्ञानी लोक कर्मापासून उत्पन्न होणार्‍या फळाचा त्याग करुन जन्मरुप बंधनापासून मुक्त होऊन निर्विकार परमपदाला प्राप्त होतात. ॥५१॥

जेव्हा तुझी बुध्दी मोहरुपी चिखलाला पूर्णपणे पार करुन जाईल, तेव्हा तू ऐकलेल्या व ऐकण्यासारख्या इह -परलोकातील सर्व भोगांपासून विरक्त होशील. ॥५२॥

तर्‍हेतर्‍हेची वचने ऐकून विचलित झालेली तुझी बुध्दी जेव्हा परमात्म्यात अचलपणे स्थिर राहील, तेव्हा तू योगाला प्रात्प होशील म्हणजेच तुझा परमात्म्याशी नित्यसंयोग होईल. ॥५३॥

अर्जुनाने विचारले, हे केशवा ! जो समाधीत परमात्म्याला प्राप्त झालेला आहे, अशा स्थिरबुध्दी पुरुषाचे लक्षण काय ? तो स्थिरबुध्दी पुरुष कसा बोलतो, कसा बसतो, आणि कसा चालतो ? ॥५४॥

श्रीभगवान म्हणाले-हे अर्जुना ! ज्या वेळी हा पुरुष मनातील सर्व कामना पूर्णपणे टाकतो आणि आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहतो, त्यावेळी त्याला स्थितप्रज्ञ म्हटले जाते. ॥५५॥

दु:खदायक प्रसंगी ज्याच्या मनाला खेद वाटत नाही, सुखांच्या प्रीप्तीविषयी ज्याला मुळीच इच्छा नाही, तसेच ज्याचे प्रीती, भय व क्रोध नाहीसे झाले आहेत, असा मुनी स्थिरबुध्दी म्हटला जातो. ॥५६॥

जो पुरुष सर्व बाबतीत स्नेहशून्य असून त्या त्या शुभ किंवा अशुभ गोष्टी घडल्या असता प्रसन्नही होत नाही किंवा त्यांचा द्वेषही करीत नाही, त्याची बुध्दी स्थित झाली. ॥५७॥

कासव सर्व बाजूंनी आपले अवयव जसे आत ओढून धरतो, त्याचप्रमाणे जेव्हा हा पुरुष इन्द्रियांच्या विषयांपासून इंद्रियांना सर्व प्रकारे आवरुन घेतो, तेव्हा त्याची बुध्दी स्थिर झाली, असे समजावे.

॥५८॥

इंद्रियांनी विषयांचे सेवन न करणार्‍या पुरुषाचेही केवळ विषयच दूर होतात; परंतु त्यांच्याविषयीची आवड नाहीशी होत नाही. या स्थितप्रज्ञ पुरुषाची तर आसक्तीही परमात्म्याच्या साक्षात्काराने नाहीशी होते. ॥५९ ॥

हे अर्जुना ! आसक्ती नाहीशी न झाल्यामुळे ही क्षोभ अत्पन्न क रणारी इन्द्रिये प्रयत्न करीत असलेल्या बुध्दिमान पुरुषाच्या मनालाही जबरदस्तीने आपल्याकडे ओढून घेतात. ॥६०॥

म्हणून साधकाने त्या सर्व इन्द्रियांना ताबत ठेवून, चित्त स्थिर करुन, मनाला माझाच आधार देऊन ध्यानात बसावे. कारण इन्द्रिये ज्या पुरुषाच्या ताब्यात असतात, त्याची बुध्दी स्थित होते. ॥६१॥

विषयांचे चिन्तन करणार्‍या पुरुषाची त्या विषयांत आसक्ती उत्पन्न होते. आसक्तीमुळे त्या विषयांची कामना उत्पन्न होते. कामना पूर्ण झाल्या नाहीत की राग येतो. ॥६२॥

रागामुळे अत्यंत मूढता अर्थात् अविचार उत्पन्न होतो. मूढतेमुळे स्मरणशक्ती भ्रष्ट होते. स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की बुध्दीचा म्हणजे ज्ञानशक्तीचा नाश होतो. आणि बुध्दीचा नाश झाल्यामुळे माणसाचा अध:पात होतो. ॥६३॥

परन्तु अन्त:करण ताब्यात ठेवलेला साधक आपल्या ताब्यात ठेवलेल्या राग-द्वेष-रहित इन्द्रियांनी विषयांचा उपभोग घेत असूनही अन्त:करणाची प्रसन्नता प्रात्प करुन घेतो. ॥६४॥

अन्त:करण प्रसन्न असल्यामुळे त्याची सर्व दु:खे नाहीशी होतात. आणि त्या चित्त प्रसन्न असलेल्या कर्मयोग्याची बुध्दी तत्काळ सर्व गोष्टींपासून निवृत्त होऊन एका परमात्म्यामध्येच उत्तम प्रकारे स्थिर होते. ॥६५॥

मन आणि इन्द्रिये न जिंकणार्‍या पुरुषाच्या ठिकाणी निश्चयात्मक बुध्दी नसते आणि अशा अयुक्त पुरुषाच्या अन्त:करणात आस्तिक भावही नसतो. तसेच भावशून्य माणसाला शान्ती मिळत नाही. मग शान्ती नसलेल्या माणसाला सुख कोठून मिळणार ? ॥६६॥

कारण ज्याप्रमाणे पाण्यात चालणार्‍या नावेला वारा वाहून नेतो, त्याचप्रमाणे विषयांत वावरणार्‍या इंद्रियांपैकी मन ज्या इन्द्रियाबरोबर राहते, ते एकच इन्द्रिय या अयुक्त पुरुषाची बुध्दी हिरावून घेते. ॥६७॥

म्हणून हे महाबाहो ! ज्याची इन्द्रिये इन्द्रियांच्या विषयांपासून सर्व प्रकारे आवरुन धरलेली असतात, त्याची बुध्दी स्थिर असते. ॥६८॥

सर्व प्राण्यांच्या दृष्टीने जी रात्रीसारखी असते, अशा नित्य ज्ञानस्वरुप परमानन्दाच्या प्राप्तीत स्थितप्रज्ञ योगी जागतो आणि ज्या नाशिवंत सांसारिक सुखाच्या प्राप्तीत सर्व प्राणी जागतात, ती परमात्मतत्त्व जाणणार्‍या मुनीला रात्रीसारखी असते. ॥६९॥

ज्याप्रमाणे निरनिराळ्या नद्यांचे पाणी, सर्व बाजूंनी भरलेल्या व स्थिर असलेल्या समुद्रात त्याला विचलित न करताही सामावून जाते, त्याचप्रमाणे सर्व भोग ज्या स्थितप्रज्ञ पुरुनषामश्ये कोणत्याही प्रकारच विकार उत्पन्न न करताच सामावून जातात, तोच पुरुष परम शान्तीला प्रात्प होतो. भोगांची इच्छा करणरा नव्हे. ॥७०॥

जो पुरुष सर्व कामनांचा त्याग करुन, ममता, अहंकार आणि इच्छा टाकून राहात असतो, त्यालाच शान्ती मिळते. ॥७१॥

हे अर्जुना ! ब्रह्माला प्रात्प झालेल्या पुरुषाची ही स्थिती आहे. ही प्रात्प झाल्याने योगी कधी मोहित होत नाही. आणि अन्तकाळीही या ब्राह्मी स्थितीत स्थिर होऊन ब्रह्मानन्द मिळवतो. ॥७२॥

N/A

References : N/A
Last Updated : December 15, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP