श्रीमद्‍भगवद्‍गीता - अध्याय ११

श्रीमद्‍भगवद्‍गीतेत सांगितलेली भक्ति म्हणजे धार्मिक समाधान देणारे विचारयुक्त साधन आहे शिवाय श्रद्धा व भक्तियुक्त अंतःकरणाने एकाग्र होऊन विचार केल्यास एक वेगळाच शब्दातीत अनुभव येतो.


अर्जुन म्हणाला,

माझ्यावर कृपा करण्यासाठी आपण जी अत्यंत गुप्त अध्यात्मविषयक उपदेश मला केला, त्याने माझे हे अज्ञान नाहिसे झाले. ॥१॥

कारण हे कमलदलनयना ! मी आपल्याकडून प्राण्यांची उप्तत्ती आणि प्रलय विस्तारपूर्वक ऐकले आहेत, तसेच आपला अविनाशी प्रभावही ऐकला आहे. ॥२॥

हे परमेश्‍वरा ! आपण आपल्याविषयी जसे सांगत आहात, ते बरोबर तसेच आहे. हे पुरुषोत्तमा ! आपले ज्ञान, ऐश्वर्य, शक्ती , बल, वीर्य आणि तेजयुक्त ईश्वरी स्वरूप मला प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा आहे. ॥३॥

हे प्रभो ! जर मला आपले ते रूप पाहता येईल, असे आपल्याला वाटत असेल, तर हे योगेश्वरा ! त्या अविनाशी स्वरूपाचे मला दर्शन घडवा. ॥४॥

श्रीभगवान म्हणाले,

हे पार्था ! आता तूं माझी शेकडो-हजारो नाना प्रकारची, नाना रंगांची आणि नाना आकांराची अलौकिक रूपे पहा. ॥५॥

हे भरतवंशी अर्जुना ! माझ्यामध्ये अदितीच्यां बारा पुत्रांना, आठ वसूंना, अकरा रुद्रांना, दोन्ही अश्‍विनीकुमारांना आणि एकोणपन्नास मरुद्‌गणांना पहा. तसेच आणखीही पुष्कळशी यापूर्वी न पाहिलेली आश्चर्यकारक रूपे पहा. ॥६॥

हे अर्जुना ! आता या माझ्या शरीरात एकत्रित असलेले चराचरासह संपूर्ण जग पहा. तसेच इतरही जे काही तुला पाहण्याची इच्छा असेल, ते पहा. ॥७॥

परन्तु मला तु या तुझ्या चर्मचक्षूंनी खात्रीने पाहु शकणार नाहीस, म्हणुन मी तुला दिव्य दृष्टी देतो. तिच्या साह्याने तू माझी ईश्वरी योगशक्ती पहा. ॥८॥

संजय म्हणाला,

हे महाराज! महायोगेश्वर आणि सर्व पापांचा नाश करणार्‍या भगवंतानी असे सांगुन मग अर्जुनाला परम ऐश्वर्ययुक्त दिव्य स्वरूप दाखवले. ॥९॥

अनेक तोंडे व डोळे असलेल्या, अनेक आश्चर्यकारक दर्शने असलेल्या, पुष्कळशा दिव्य अलंकारांनी विभूषित आणि पुष्कळशी दिव्य शस्त्रे हातात घेतलेल्या, ॥१०॥

दिव्य माळा आणि वस्त्रे धारण केलेल्या , तसेच दिव्य गन्धाने विभुषित, सर्व प्रकरच्या आश्चर्यांनी युक्त अनन्तस्वरूप, सर्व बाजूंनी तोंडे असलेल्या विराटस्वरूप परमदेव परमेश्वराला अर्जुनाने पाहिले. ॥११॥

आकाशात हजार सूर्य एकदम उगवले असता जो प्रकाश पडेल, तोही त्या विश्‍वरूप परमात्म्याच्या प्रकाशाइतका कदाचितच होईल म्हणजेच होणार नाही. ॥१२॥

पाण्डुपुत्र अर्जुनाने त्यावेळी अनेक प्रकारांत विभागलेले संपूर्ण जग देवाधिदेव भगवान श्रीकृष्णांच्या त्या शरीरात एकत्रित असलेले पाहिल. ॥१३॥

त्यानंतर तो आश्चर्यचकित झालेला व अंगावर रोमांच उभे राहिलेला अर्जुन, प्रकाशमय विश्वरूप परमात्म्याला श्रद्धाभक्तीसह मस्तकाने प्रमाण करून हात जोडून म्हणाला. ॥१४॥

अर्जुन म्हणाला,

हे देवा ! मी आपल्या दिव्य देहांत संपूर्ण देवांना तसेच अनेक भूतांच्या समुदांयांना, कमळाच्या आसनावर विरजमान झालेला ब्रह्मदेवाला, शंकराला, सर्व ऋषींना तसेच दिव्य सर्पांना पाहात आहे. ॥१५॥

हे संपूर्ण विश्‍वाचे स्वामी ! मी आपल्याला अनेक बाहू, पोटे, तोंडे आणि डोळे असलेले तसेच सर्व बांजुनी अनन्त रूपे असलेले पाहात आहे. हे विश्‍वरूपा ! मला आपला ना अन्त दिसत, ना मध्य दिसत, ना आरम्भ. ॥१६॥

मी आपल्याला मुकुट घातलेले, गदा व चक्र धारण केलेले, सर्व बाजूंनी प्रकाशमान तेजाचा समुह असे, प्रज्वलित अग्नी व सूर्य यांच्याप्रमाणे तेजाने युक्त पाहण्यास अतिशय कठिण आणि दृष्टींनी अमर्याद असे पाहात आहे. ॥१७॥

आपणच जाणण्याजोगे परब्रह्म परमात्मा आहात. आपणच या जगाचे परम आधार आहात. आपणच अनादी धर्माचे रक्षक आहात आणि आपणच अविनाशी सनातन पुरुष आहात, असे मला वाटते. ॥१८॥

आपण आदी मध्य आणि अन्त नसलेले, अनन्त सामर्थ्याने युक्त, अनन्त बाहू असलेले, चंद्र व सूर्य हे ज्यांचे नेत्र आहेत, पेटलेल्या अग्नीसारखे ज्यांचे मुख आहे आणि आपल्या तेजाने या जगाला तापविणारे, असे आहात असे मला दिसते. ॥१९॥

हे महात्मन ! हे स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यामधील आकाश आणि सर्व दिशा फक्त आपण एकट्यानेच व्यापून टाकल्या आहेत. आपले हे अलौकिक आणि भयंकर रूप पाहून तिन्ही लोक अत्यंत भयभीत झाले आहेत. ॥२०॥

तेच देवांचे समुदाय आपल्यात शिरत आहेत आणि काही भयभीत होऊन हात जोडून आपल्या नावांचे व गुणांचे वर्णन करीत आहेत. तसेच महर्षी व सिद्धांचे समुदाय ' सर्वाचे कल्याण होवो ' अशी मगलाशा करून उत्तमोत्तम स्तोत्रे म्हणुन आपली स्तुती करीत आहेत. ॥२१॥

अकरा रुद्र, बारा आदित्य तसेच आठ वसु, साध्यगण, विश्वेदेव, दोन अश्‍विनीकुमार, मरुद्‌गण आणि पितरांचे समुदाय, तसेच गंधर्व, यक्ष , राक्षस आणि सिद्धाचे समुदाय आहेत. ते सर्वच चकित होऊन आपल्याकडे पाहात आहेत. ॥२२॥

हे महाबाहो ! आपले अनेक तोंडे, अनेक डोळे, अनेक हात, मांड्या व पाय असलेले, अनेक पोटांचे आणि अनेक दाढांमुळे अतिशय भयंकर असे महान रुप पाहून सर्व लोक व्याकूळ होत आहेत. तसेच मीही व्याकुळ होत आहे. ॥२३॥

कारण हे विष्णो ! आकाशाला जाऊन भिडलेल्या, तेजस्वी, अनेक रंगानी युक्त, पसरलेली तोंडे व तेजस्वी विशाळ डोळे यांनी युक्त अशा आपल्याला पाहून भयभीत अंतःकरण झालेल्या माझे धैर्य व शान्ती नाहीशी झाली आहे. ॥२४॥

दाढांमुळे भयानक व प्रलयकाळच्या अग्नीसारखी प्रज्वलित आपली तोंडे पाहून मला दिशा कळेनाशा झाल्या असुन माझे सुखही हरपले आहे. म्हणुन हे देवाधिदेवा ! हे जगन्निवासा ! आपण प्रसन्न व्हा. ॥२५॥

ते सर्व धृतराष्ट्राचे पुत्र राजासमुदायासह आपल्यात प्रवेश करीत आहेत आणि पितामह भीष्म, द्रोणाचार्य, तसेच तो कर्ण आणि आमच्या बाजुच्याही प्रमुख योद्‌ध्यांसह ॥२६॥

सगळेच आपल्या दाढांमुळे भयंकर दिसणार्‍या तोंडात मोठ्या वेगाने धावत धावत घुसत आहेत. आणि कित्येक डोकी चिरडलेली आपल्या दातांच्या फटीत अडकलेले दिसत आहेत. ॥२७॥

ज्याप्रमाणे नद्यांचे पुष्कळसे जलप्रवाह स्वाभाविकच समुद्राच्याच दिशेने धाव घेतात अर्थात समुद्रात प्रवेश करातात त्याचप्रमाणे ते मनुष्यलोकातील वीर आपल्या धडाडून पेटलेल्या तोंडात शिरत आहेत. ॥२८॥

जसे पतंग मोहाने मरून जाण्यासाठी पेटलेल्या अग्रीत अतिशय वेगाने धावत शिरतात, तसेच हे सर्व लोकही स्वतःच्या नाशासाठी आपल्या तोंडात अतिशय वेगाने धावत प्रवेश करीत आहेत. ॥२९॥

आपण त्या सर्व लोकांना प्रज्वलित तोंडोनी गिळत सर्व बाजूंनी वारंवार चाटत आहात. हे विष्णो ! आपला प्रखर प्रकाश सर्व जगाला तेजाने पूर्ण भरून तापवीत आहे. ॥३०॥

मला सांगा की भयंकर रूप धारण करणारे आपण कोण आहात ? हे देवश्रेष्ठा ! आपणाला नमस्कार असो. आपण प्रसन्न व्हा. आदिपुरुष अशा आपल्याला मी विशेष रीतीने जाणू इच्छितो. कारण आपली ही करणी मला कळत नाही. ॥३१॥

श्रीभगवान म्हणाले,

मी लोकांत नाश करणारा वाढलेला महाकाल आहे. यावेळी या लोकांच्या नाशासाठी मी प्रवृत्त झालो आहे. म्हणुन शत्रूपक्षीय सैन्यात जे योद्धे आहेत, ते सर्व तुझ्याशिवाय राहणार नाहीत. म्हणजेच तू युद्ध केले नाहीस, तरी या सर्वांचा नाश होणार. ॥३२॥

म्हणुनच तू ऊठ, यश मिळव. शत्रूंना जिंकून धनधान्यसंपन्न राज्याचा उपभोग घे, हे सर्व शूरवीर आधीच माझ्याकडून मारले गेले आहेत. हे सव्यसाची ! तू फक्त निमित्तामात्रच हो. ॥३३॥

द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म तसेच जयद्रथ आणि कर्ण त्याचप्रमाणे माझ्याकडून मारल्या गेलेल्या इतरही पुष्कळ शूर योद्धांना तू मार, भिऊ नकोस, युद्धांत खात्रीने तू शत्रूंना जिंकशील म्हणुन युद्ध कर. ॥३४॥

संजय म्हणाला,

भगवान केशवांचे हे बोलणे ऐकून किरीटी अर्जुनाने हात जोडून कापत कापत नमस्कार केला आणि फिरूनही अत्यन्त भयभीत होऊन प्रमाण करून भगवान श्रीकृष्णांना सदगदिंत होऊन तो म्हणाला. ॥३५॥

अर्जुन म्हणाला,

हे अन्तर्यामी ! आपले नाव, गुण आणि प्रभाव यांच्या वर्णनाने जग अतिशय आनंदित होते व तुमच्यावर अतिशय प्रेम करू लागते. तसेच भ्यालेले राक्षस दशदिशांत पळून जात आहेत आणि सर्व सिद्धगणांचे समुदाय आपल्याला नमस्कार करीत आहेत, हे योग्यच होय. ॥३६॥

हे महात्मन ! ब्रह्मदेवाचेही आदिकरण आणि सर्वांत श्रेष्ठ अशा आपल्याला हे नमस्कार का बरे करणार नाहीत ? कारण हे अनन्ता ! हे देवाधिदेवा ! हे जगन्निवासा ! जे सत्, असत् व त्यापलीकडील अक्षर अर्थात सच्चिदानन्दघन ब्रह्म आहे, ते आपणच आहात. ॥३७॥

आपण आदिदेव आणि सनातन पुरुष आहात. आपण या जगाचे परम आश्रयस्थान आहत. जग जाणणारेही आपणच व जाणण्याजोगेही आपणच. परम धामही आपणच आहात. हे अनन्तरूपा ! आपण हे सर्व विश्व व्यापले आहे. ॥३८॥

आपण वायू, यमराज, अग्नी , वरूण, चन्द्र, प्रजेचे स्वामी ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाचेही जनक आहात. आपल्याला हजारो वेळा नमस्कार. नमस्कार असो ! आपणांला आणखीही वारंवार नमस्कार ! नमस्कार असोत ! ॥३९॥

हे अनन्त सामर्थ्यशाली ! आपल्याला पुढून व मागूनही नमस्कार ! हे सर्वात्मका ! आपल्याला सर्व बाजूंनीच नमस्कार असो. कारण अनन्त पराक्रमशाली अशा आपण सर्व जग व्यापले आहे. म्हणून आपण सर्वरूप आहात. ॥४०॥

आपला हा प्रभाव न जाणल्यामुळे, आपण माझे मित्र आहात असे मानुन प्रेमाने किंवा चुकीने मी ' हे कृष्णा ! हे यादवा ! हे सख्या !' असे जे काही विचार न करता मुद्दाम म्हटले असेल, ॥४१॥

आणि हे अच्युता ! माझ्याकडून विनोदासाठी फिरताना, झोपताना, बसल्यावेळी आणि भोजन इत्यादी करताना आपला एकान्तात किंवा त्या मित्रांच्या समक्ष जो अपमान झाला असेल, त्या सर्व अपराधांची अचिन्त्य प्रभावशाली अशा आपणांकडे मी क्षमा मागत आहे. ॥४२॥

आपण या चराचर जगताचे जनक आहात. तसेच सर्वश्रेष्ठ गुरु व अत्यंत पूजनीय आहात. हे अतुलनीयप्रभावा ! त्रैलोक्यात आपल्या बरोबरीचाही दुसरा कोणी नाही. मग आपल्याहून श्रेष्ठ कसा असू शकेल ? ॥४३॥

म्हणुनच हे प्रभो ! मी आपल्या चरणांवर शरीराने लोटांगण घालून नमस्कार करून स्तुत्य अशा आपण ईश्‍वराने प्रसन्न व्हावे, म्हणुन प्रार्थना करीत आहे. हे देवा ! वडील जसे पुत्राचे, मित्र जसे मित्राचे आणि पती जसे आपल्या प्रियतम पत्‍नीचे अपराध सहन करतात, तसेच आपणही माझे अपराध सहन करण्यास योग्य आहात. ॥४४॥

पूर्वी न पाहिलेली आपले हे आश्चर्यकारक रूप पाहून मी आनंदित झालो आहे आणि माझे मन भीतीने अतिशय व्याकुळही होत आहे. म्हणुन आपण मला ते चतुर्भुज विष्णूरूपच दाखवा. हे देवेशा ! हे जगन्निवासा ! प्रसन्न व्हा. ॥४५॥

मी पहिल्यासारखेच आपणाला मुकुट धारण केलेले तसेच गदा आणि चक्र हातात घेतलेले पाहू इच्छितो. म्हणुन हे विश्वस्वरूपा ! हे सहस्त्रबहो ! आपण त्याच चतुर्भुज रूपाने प्रकट व्हा. ॥४६॥

श्रीभगवान म्हणाले,

हे अर्जुना ! मी तुझ्यावर अनुग्रह करण्यासाठी आपल्या योगशक्तीच्या प्रभावाने हे माझे परम तेजोमय, सर्वाचे आदी, सीमा नसलेले विराट रूप तुला दाखवले. ते तुझ्याशिवाय दुसर्‍या कोणीही यापूर्वी पाहिले नव्हते. ॥४७॥

हे अर्जुना ! मानवलोकात अशा प्रकारचा विश्वरूपधारी मी वेदांच्या आणि यज्ञांच्या अध्ययनाने, दानाने, वैदिक कर्मांनी आणि उग्रतश्चर्यानीही तुझ्याखेरीज दुसर्‍याकडुन पाहिला जाणे शक्य नाही. ॥४८॥

माझे या प्रकारचे हे भयंकर रूप पाहून तू भयभीत होऊ नकोस किंवा गोंधळून जाऊ नकोस. तू भीती सोडून प्रीतियुक्त अंतःकरणाने तेच माझे हे शंख-चक्र-गदा-पद्म धारण केलेले चतुर्भुज रूप पुन्हा पहा. ॥४९॥

संजय म्हणाला,

भगवान वासुदेवांनी अर्जुनाला असे सांगुन पुन्हा तसलेच आपले चतुर्भुज रूप दाखवले आणि पुन्हा महात्म्या श्रीकृष्णांनी सौम्य रूप धारण करून भयभीत अर्जुनाला धीर दिला. ॥५०॥

अर्जुन म्हणाला,

हे जनार्दना ! आपले हे अतिशय शांत मनुष्यरूप पाहून आता माझे मन स्थिर झाले असून मी माझ्या मूळ स्थितीला प्राप्त झालो आहे. ॥५१॥

श्रीभगवान म्हणाले, माझे जे चतुर्भज रूप तू पाहिलेस, ते पाहावयास मिळणे अतिशय दुर्लभ आहे. देवसुद्धा नेहमी या रूपाच्या दर्शनाची इच्छा करीत असतात. ॥५२॥

तू जसे मला पाहिलेस, तशा माझ्या चतुर्भुज रूपाचे दर्शन वेदांनी, तपाने, दानाने आणि यज्ञानेही मिळणे शक्य नाही. ॥५३॥

परंतु हे परंतप अर्जुना ! अनन्य भक्तीने या प्रकारच्या चतुर्भुजधारी मला प्रत्यक्ष पाहणे, तत्त्वतः जाणणे तसेच ( माझ्यात ) प्रवेश करणे अर्थात् ( माझ्याशी ) एकरूप होणेही शक्य आहे. ॥५४॥

हे अर्जुना ! जो पुरुष केवळ माझ्याचसाठी सर्व कर्तव्यकर्मे करणारा, मलाच परम आश्रय मानणारा, माझा भक्त आसक्तिरहित असतो आणि सर्व प्राणिमात्राविषयी वैरभाव बाळगत नाही, ते अनन्य भक्त मलाच प्राप्त होतो. ॥५५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 15, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP