TransLiteral Foundation

श्रीमद्‍भगवद्‍गीता - अध्याय १०

श्रीमद्‍भगवद्‍गीतेत सांगितलेली भक्ति म्हणजे धार्मिक समाधान देणारे विचारयुक्त साधन आहे शिवाय श्रद्धा व भक्तियुक्त अंतःकरणाने एकाग्र होऊन विचार केल्यास एक वेगळाच शब्दातीत अनुभव येतो.


विभूती योग

श्रीभगवान म्हणाले,

हे महाबाहो ! आणखीही माझे परम रहस्यमय आणि प्रभावयुक्त म्हणणे ऐक. जे मी अतिशय प्रेमी अशा तुला तुझ्या हितासाठी सांगणार आहे. ॥१॥

माझी उप्तत्ती अर्थात लीलेने प्रकट होणे ना देव जाणत ना महर्षी. कारण सर्व प्रकारे देवांचे व महर्षीचे आदिकारण आहे. ॥२॥

जो मला वास्तविक जन्मरहित, अनादी आणि लोकांचा महान ईश्वर असे तत्त्वतः जाणतो, तो मनुष्यात ज्ञानी असणारा सर्व पापांपासुन मुक्त होतो. ॥३॥

निर्णयशक्ती, यथार्थ ज्ञान,असंमूढता, क्षमा, सत्य , इंद्रियनिग्रह, मनोनिग्रह, सुख दूःख , उप्तत्ति प्रलय , भय अभय, ॥४॥

अहिंसा, समता, संतोष, तप, दान, किर्ति-अपकिर्ति-असे हे प्राण्याचे अनेक प्रकारचे भाव माझ्यापासुनच होतात. ॥५॥

सात महर्षी, त्यांच्याही पूर्वी असणारे चार सनकादिक तसेच स्वायंभुव इत्यादी चौदा मनु हे माझ्या ठिकाणी भाव असलेले सर्वच माझ्या संकल्पाने उप्तन्न झाले आहेत. या जगातील सर्व प्रजा त्यांचीच आहे. ॥६॥

जो पुरुष माझ्या ह्या परमैश्वर्यरूप विभूतीला आणि योगशक्तीला तत्त्वतः जाणतो तो स्थिर भक्तियोगाने मुक्त होतो, यात मुळीच शंका नाही. ॥७॥

मी वासुदेवच सर्व जगाच्या उप्तत्तीचे कारण आहे आणि माझ्यामुळेच सर्व जग क्रियाशील होत आहे. असे जाणुन श्रद्धा व भक्तीने युक्त असलेले बुद्धीमान भक्त मज परमेश्वरालाच नेहमी भजतात ॥८॥

निरंतर माझ्यात मन लावणारे आणि माझ्यातच प्राणांना अर्पण करणारे माझे भक्तजन माझ्या भक्तीच्या चर्चेने परस्परांत माझ्या प्रभावाचा बोध करीत तसेच गुण व प्रभावासह माझे किर्तन निरंतर संतुष्ट होतात आणि मज वासुदेवातच नेहमी रममाण होत असतात. ॥९॥

त्या नेहमी माझे ध्यान वगैरेमध्ये मग्न झालेल्या आणि प्रेमाने भजवणार्‍या भक्तांना मी ती तत्त्वज्ञानरूप योग देतो. ज्यामुळे ते मलाच प्राप्त होतात. ॥१०॥

हे अर्जुना ! त्यांच्यावर कृपा करण्यासाठी त्यांच्या अंतःकरणात असलेला मी स्वतःच त्यांच्या अज्ञानाने उप्तन्न झालेला अंधकार प्रकाशमय तत्त्वज्ञानरूप दिव्याने नाहीसा करतो. ॥११॥

अर्जुन म्हणाला,

आपण परम ब्रह्म, परम धाम आणि परम धाम आणि परम पवित्र आहात. कारण आपल्याला सर्व ऋषिगण सनातन, दिव्य, पुरुष, ॥१२॥

तसेच देवांचाही आदिदेव अजन्मा आणि सर्वव्यापी म्हणतात. देवर्षी नारद, असित, देवल व महर्षी व्यासही तसेच सांगतात आणि आपणही मला तसेच सांगता. ॥१३॥

हे केशवा ! जे काही मला आपण सांगत अहात, ते सर्व मी सत्य मानतो, हे भगवान ! आपल्या लीलामय स्वरूपाला ना दानव जाणत ना देव. ॥१४॥

हे भूतांना उप्तन्न करणारे ! हे भुतांचे ईश्वर ! हे देवांचे देव ! हे जगाचे स्वामी ! हे पुरुषोत्तमा ! तुम्ही स्वतःच आपण आपल्याला जाणत आहात. ॥१५॥

म्हणुन ज्या विभूतींच्या योगाने आपण या सर्व लोकांना व्यापून राहिला आहात, त्या आपल्या दिव्य विभुती पूर्णपणे सांगायला आपणच समर्थ आहात. ॥१६॥

हे योगेश्वर ! मी कशाप्रकारे निरंतर चिंतन करीत आपल्याला जाणावे आणि हे भगवान ! आपण कोणकोणत्या भावांत माझ्याकडुन चिंतन करण्यास योग्य आहात ? ॥१७॥

हे जनार्दना ! आपली योगशक्ती आणि विभूती पुन्हाही विस्ताराने सांगा. कारण आपली अमृतमय वचने ऐकत असता माझी तूप्ती होत नाही. अर्थात ऐकण्याची उत्कंठा अधिकच वाढत राहते. ॥१८॥

श्रीभगवान म्हणाले,

हे कुरूश्रेष्ठा ! आता मी ज्या माझ्या दिव्य विभूती आहेत, त्या मुख्य मुख्य अशा तुला सांगेन. कारण माझ्या विस्ताराला शेवट नाही. ॥१९॥

हे अर्जुना ! मी सर्व भुतांच्या हृदयात असलेला सर्वांचा आत्मा आहे. तसेच सर्व भुतांचा आदि, मध्य आणि अंतही मीच आहे. ॥२०॥

अदितीच्या बारा पुत्रांपैकी विष्णु मी आणि ज्योतींमध्ये किरणांणी युक्त सूर्य मी आहे. एकोणपन्नास वायुदेवतांचे तेज आणी नक्षत्रांचा अधिपती चंद्र मी आहे. ॥२१॥

वेदांत सामवेद मी आहे. देवांत इंद्र आहे. इंद्रियांमध्ये मन आहे आणि भूतप्राण्यांमधील चेतना म्हणजे जीवनशक्ती मी आहे. ॥२२॥

अकरा रुद्रांमध्ये शंकर मी आहे आणि यक्ष व राक्षसांमध्ये धनाचा स्वामी कुबेर आहे. मी आठ वसूंमधला अग्नी आहे आणि शिखरे असणार्‍या पर्वतांमध्ये सुमेरू पर्वत आहे. ॥२३॥

पुरोहितांमध्ये मुख्य बृहस्पती मला समज, हे पार्था ! मी सेनापतीमधला स्कन्द आणि जलाशयांमध्ये समुद्र आहे. ॥२४॥

मी महर्षीमध्ये भृगु आणि शब्दांमध्ये एक अक्षर अर्थात ओंकार आहे. सव प्रकारच्या यज्ञांमध्ये जपयज्ञ आणि स्थिर राहाणार्‍यामध्यें हिमालय पर्वत मी आहे. ॥२५॥

सर्व वृक्षांत पिंपळ आणि देवर्षीमध्ये नारद मुनी, गन्धर्वामध्ये चित्ररथ आणि सिद्धांमध्ये कपिल मुनी मी आहे. ॥२६॥

घोड्यांमध्ये अमृताबरोबर उप्तन्न झालेला उच्चेःश्रवा नावाचा घोडा, श्रेष्ठ हत्तींमध्ये ऐरावत नावाचा हत्ती आणि मनुष्यांमध्ये राजा मला समज. ॥२७॥

मी शस्त्रांमध्ये वज्र आणि गाईमध्ये कामधेनू आहे. शास्त्रोक्त रीतीने प्रजोत्पत्तीचे कारण कामदेव आहे आणि सर्पामध्ये सर्पराज वासुकी मी आहे. ॥२८॥

मी नागांमध्ये शेषनाग आणि जलचरांचा अधिपती वरुणदेव आहे आणि पितरांमध्ये अर्यमा नावाचा पितर आणि शासन करणार्‍यामध्ये यमराज मी आहे. ॥२९॥

मी दैत्यांमध्ये प्रह्लाद आणि गणना करणार्‍यामध्ये समय आहे. तसेच पशुमध्ये मृगराज सिंह आणि पक्ष्यांमध्ये मी गरुद आहे. ॥३०॥

मी पवित्र करणार्‍यांत वायू आणि शस्त्रधार्‍यांत श्रीराम आहे. तसेच माशांत मगर आहे आणी नद्यांत श्रीभागीरथी गंगा आहे. ॥३१॥

हे अर्जुना ! सृष्टीचा आदी आणि अंत तसेच मध्यही मी आहे. मी विद्यांतील ब्रह्मविद्या आणि परस्पर वाद करणार्‍यामध्ये तत्त्वनिर्णयासाठी केला जाणारा वाद आहे ॥३२॥

मी अक्षरांतील अकार आणि समासांपैकी द्वन्द्वु आहे. अक्षय काल म्हणजेच कालाचाही महाकाल तसेच सर्व बाजूंनी तोंडे असलेला विराटस्वरुप सर्वाचे धारण पोषण करणाराही मीच आहे. ॥३३॥

सर्वाचा नाश करणारा मृत्यु आणि उप्तन्न होणार्‍यांच्या उप्तत्तीचे कारण मी आहे. तसेच स्त्रियांमध्ये कीर्ती, लक्ष्मी, वाणी, स्मृती, मेधा, धूती आणि क्षमा मी आहे. ॥३४॥

तसेच गायन करण्याजोग्या वेदांमध्ये मी बृहत्सास आणि छंदांमध्ये गायत्री छंद आहे. त्याचप्रमाणे महिन्यांतील मार्गशीर्ष आणि ऋतुंतील वसंत मी आहे. ॥३५॥

मी कपट करणार्‍यातील जुगार आणि प्रभावशाली पुरुषांचा प्रभाव आहे. मी जिंकणार्‍याचा विजय आहे निश्चयी लोकांचा निश्‍चय आणि सात्विक पुरुषांच सात्विक भाव आहे. ॥३६॥

वृष्णिवंशीयांमध्ये वासुदेव अर्थात मी स्वतः तुझा मित्र, पांडवांमध्ये धनंजय म्हणजेच तूं, मुनींमध्ये वेदव्यास आणि कवींमध्ये शुक्राचार्य कवीही मीच आहे ॥३७॥

दमन करण्यांचा दण्ड म्हणजे दमन करण्याची शक्ती मी आहे. विजयाची इच्छा करणार्‍याची नीती मी आहे. गुप्त ठेवण्यासारख्या भावांचा रक्षण मौन आणी ज्ञानवानांचे तत्वज्ञान मीच आहे. ॥३८॥

आणि हे अर्जुना ! जे सर्व भूतांच्या उप्तत्तीचे कारण तेही मीच आहे. कारण असे चराचरातील एकही भूत नाही की, जे माझ्याशिवाय असेल. ॥३९॥

हे परंतपा ! माझ्या दिव्य विभुतींचा अंत नाही, हा विस्तार तर तुझ्यासाठी थोडक्यात सांगितला ॥४०॥

जी जी ऐश्वर्ययुक्त, कान्तियुक्त आणि शक्तियुक्त वस्तु आहे, ती ती तू माझ्या तेजाच्या अंशाचीच अभिव्यक्ती समज. ॥४१॥

किंवा हे अर्जुना ! हे फार फार जाणण्याचे तुला काय प्रयोजन आहे. मी या संपूर्ण जगाला आपल्या योगशक्तीच्या केवळ एक अंशाने धारण करुन राहिलो आहे. ॥४२॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-12-15T13:20:25.4170000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

brake control

  • आरोधी नियंत्रण 
RANDOM WORD

Did you know?

In Hinduism, are women and men treated as equals?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.